Monday 14 December 2015

ओढ

ओढ
ओढ लावणारा जीवधन गड

जीवधन गड ची उंची सुमारे ३७५४फुट आहे. चढाई श्रेणी कठीण आहे. भारत देशात महाराष्ट्र राज्यात  पुणे जिल्ह्यात घाटघर गावाजवळ नाणेघाट डोंगररांगेत असा हा जीवधन गड आहे. जर घाटघर गावाच्या बाजूने चढाई केली तर एकीकडे हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड हे किल्ले  दिसतात.


 जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा.
राहण्याची सोय नाही.
जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत.
गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे 3 तास

           
घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय आहे.

यामधील फोटोग्राफी फक्त माझीच आहे. माझे फोटो काढताना फक्त माझा मोबाइल दुसऱ्याकडे दिला जायचा एवढेच. 
आपल्या महाराष्ट्रात जीवधन नावाचे दोन किल्ले आहेत. पहिला पालघर जिल्ह्यातील विरार येथे असणारा जीवधनचा किल्ला. माझं गाव ठाणे जिल्ह्यात असल्याने मला याआधी जीवधन नावाचा तोच  गड माहिती होता. आज तो जीवदानी देवीच्या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे. हा किल्ला आज आपले अस्तित्वच हरवून बसलेला आहे आणि दुसरा किल्ला आहे पुणे जिल्ह्याच्या व जुन्नर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला ऐतिहासिक काळातील पुरातन राजमार्ग नाणेघाटाचा रक्षक किल्ले जीवधनगड”.
"१३ डिसेंबर" "जीवधनगड ट्रेक" ह्या दिवशी खरं तर माझ्या मुलीचा वाढदिवस असतो त्यामुळे माझं मन दोन्हीकडे धावत होते. एक म्हणजे वाढदिवसाला मी घरी हवीच आणि मला ट्रेकला देखील मनापासून जायचं होतंच. जरी ट्रेक साठी नाव दिलं गेलं असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझं हो नाही हो नाही असंच होतं. मला मुलीकडून परवानगी मिळाली की "मम्मी तू जावू शकतेस ट्रेक ला". कारण सगळ्यांना हे ठावूक आहे की "ट्रेक" हे एकच असं ठिकाण आहे की जिथे आपला  मनसोक्त व्यायाम होतो,निसर्गाच्या सानिध्यात मन प्रफुल्लीत होतं. मनसोक्त फोटोग्राफी  करता येते. आणि मिळाली संधी तर गाण्याची भडास काढता येते.
ट्रेकचा दिवस कधी एकदा उजाडतो असं  मला नेहमीच होत असतं. आणि १३ डिसेंबर उजाडला आणि आम्ही नेहमीप्रमाणे आमचे फ्रेंड महेश पाठक आणि रूपा पाठक यांच्या सोबत मी स्वतःच्या activa वर आणि ते त्यांच्या गाडीवर निघालो. आमची विमाने (activa)आम्ही धावपट्टीखाली (उड्डाणपुलाखाली) पार्क करून "फोना" च्या ट्रेकिंग बस ची वाट पहात फोटोग्राफी करत राहिलो.


बस सकाळी तळेगाव दाभाडेहून निघाली आणि नंतर निगडी हून ७:०० वाजता जीवधनगड कडे रवाना झाली. तळेगाव दाभाडे…. निगडी आणि मग राहिलेल्या काही मेम्बर्स ना घेवून नासिक फाटा चाकण मंचर…. नारायणगाव……… जुन्नर ……… अशी निघाली. सग्गळे मेम्बर्स आल्यावर नारळ फोडून फोटो काढून बस जीवधन च्या वाटेला निघाली. मधेच बसमधून फोटोग्राफी आपली सुरूच असते त्यासाठी केव्हा केव्हा मला सीट बदलावी लागते भांडून घ्यावी लागते ती सीट मला. डावीकडे आलं ना की उजवीकडचे गड माझी फोटोसाठी वाट  पहात राहतात.







मधेच एका ठिकाणी चहासाठी थांबलो आणि चहा आमच्यासाठी तयार च ठेवला होता जसा त्या चहावाल्याने. चहा प्यायलो आणि एक  गंमत झाली छोटीसी आम्ही जीवधनच्या ओढीने चहाचे पैसे न देताच बसमध्ये बसलो. मग तो म्हणतो चहावाला "अरे पैसे कोण देणार ???" मग दिलेच पैसे. चुकून होते अशी गंमत कधीतरी.

 सकाळी १० वाजता आमची बस घाटघर गावाजवळ पोहोचली. आणि मंदार थरवल यांनी बसवाल्याला नाणेघाटाच्या बाजूने थांबायला सांगून ट्रेकर्स ना सूचना करून घाटघर मार्गे जीवधन गड चढाईला सुरुवात केली.

जाताना एक गाडी आली तिथे आणि तुतारीचा आवाज आला मोट्ठ्याने जणूकाही आमच्या स्वागतासाठीच ती गाडी आली असं वाटलं परंतु ती गाडी आईस्क्रीम ची होती. २ लेडीज ऐटीत बसल्या त्या गाडीत. 
आम्ही आपले फोटोग्राफी करत करत चढाई सुरु केली घाटघर गावातून डावीकडे वळून खूप पुढे जावून गड चढाई सुरु केली. अजून एक ट्रेकर्स चा ग्रुप चढत होता. थोडावेळ आम्हाला वाट सापडत नव्हती. पण थोड्याच वेळात सापडली आणि सपसप पुढे चालत राहिलो आमच्यातल्या मागच्या ट्रेकर्स ना आरोळ्या देत. "अरे चला रे…. "

 एका ठिकाणी मला रॉकेट दिसलं. मला खूप नवल वाटलं. लहानपणी अशी रॉकेटस दिसायची तेव्हा खूप नवल वाटायचं की नक्की काय असावं हे. आताही नवल च वाटतं.






मधेच एखादा रॉक प्याच मधेच झाडी मधेच पाणी पडायची वाट असा टप्पा पार करत करत जेव्हा जीवधन गडाच्या पायऱ्या दिसल्या तेव्हा हायसे वाटले.खरतर अजून एक तास लागणार होता अंदाजे. आणि तो रॉक प्याच थोडा अवघड होता दोर असलेला बारा सोबत. त्यात ऊन तापलं होतं. आम्ही काही लोक त्या रॉक प्याच वर असताना उन्हाने हात पोळत होते लाल-लाल झाले होते. पण चढलो बिन रोपचेच जरासं थ्रिल हवं ना.?”



तो रॉक प्याच पार केल्यावर एक गुहा लागली त्यात पाण्यावर मस्त पिवळ्या रंगाचे शेवाळ आले होते. अतिशय सुंदर असे दिसत होते ते शेवाळ. फोटोग्राफी करत काही मेम्बर्स पुढे जात राहिलो. दुपारचा एक वाजला खूप भूक लागली होती आणि अजून काही ट्रेकर्सना  यायला अजून अवकाश होता. उन्हाचे चटके बसत होते पण गडावर पोहोचल्याचा आनंद जास्त होता त्यावेळी. गडावर  पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते. असा म्हणतात..



 


गडावर पोहोचलो तेव्हा मंदिरासारखी दिसणारी धान्याची कोठी होती तिथे दुसरा एक ट्रेकिंग चा ग्रुप मस्त ताटे घेवून जेवत होता आणि ताटात काय तर पुरी भाजी, गुलाबजामून होतं. आईशप्पथ खरा तर तोंडाला पाणी सुटायला हवे प तसे नाही झाले. मनात विचार आला की ही लोकं जीवधन गड उतरतील की आज इथेच मुक्काम करतील असलं चमचमीत जेवून? आणि उतरताना त्याची प्रचीती आलीच आम्हाला कल्याण दरवाज्याच्या बाजूने उतरताना त्या ग्रुप च्या काही मेंबर्स ची हालत झाली होती पण ग्रुप लीडर ने छान निभावून नेले. असो.
तर गडावर पोहोचलो खर पण बसायला जागाच मिळेना. पाण्याच्या ताक्याजवळ जावून फोटोज क्लिक केले. जर तोंडावर पाणी मारले आणि मग जेवायला जागा शोधू लागलो
 



निकाळजे काका,हर्षद श्रेया म्हणून एक छोटी मुलगी आणि आकाश (मागच्या एका ट्रेक ला होता सो तो एक ओळखीचा दिसत होता) त्या मुलांमध्ये होता आणि काही मुले नवीन होती. असे बरेच नवे मेंबर्स असतात . आणि माझ्यासाठी जो फोना ग्रुप ला येतो नवा नसतोच कधी. मला आपली सगळ्यांना हाक देत जायची सवय आहे आणि फोनासोबत आलेल्या लोकांवर विश्वास असतो कायम सो कोणीही असले पाच सात लोक कि माझी पावलं झपझप चालत राहतात. अर्थात फोनचा एक तरी लाइफ़ मेंबर सोबत असल्याशिवाय मी जात नसते यावेळी निकाळजे काका होते. उन इतके वाढले होते आणि पोटात कावळे ओरडत होते. त्यासाठी कधी एकदा एखादे झाड मिळते आणि आम्ही जेवायला बसतो असं झालं होतं आम्हाला. आणि बाकीचे मेम्बर्स अजून मागे होते.दुपारचा  १:३० वाजला होता. माझ्याशी नवीन मधले कोणी बोलायला तयार नव्हते. मग मीच म्हंटलं अरे जेवायला बसण्यासाठी झाड बघा मिळालं एखादे तर त्या डाव्या म्हणजे गडाच्या दक्षिण बाजूलाआकाश आणि काही मुले गेली आणि आम्ही बरोब्बर गडाच्या मध्यात उभे होतो.
        काही लोकं. तर काय करावं ती मुले झाड शोधायला गेली ती आलीच नाहीत बराच वेळ मग मी आणि श्रेया आणि हर्षद सफाई/सफारी आणि अजून काही मुले त्या दिशेने निघालो पायाला ती सुई सारखी टोचणारी पाने असलेली झुडपे बोचत होती. तरीही निघालो त्या दक्षिण टोकाला. मधेच पडझड झालेले छोटे मंदिर दिसले. देवीची मूर्ती होती. शंकराची पिंडी होती. आणि मध्ये गावत मध्ये मोठे मोठे खड्डे होते कुणीतरी म्हंटलं पण "जरा संभलके चलना बीच में गड्डा है" तब किसी अपने की याद जरूर आयी. आणि बघतो तर काय तिकडे एकही झाड नाहीये.पण तिथला view अप्रतीम होता आधी हवर्यासारखे फोटो काढले. मग सग्गळे विचार करत बसलो आता काय करायचेआम्ही १५-२० लोक पुढे आलो होतो. कुठे थांबू कुठे थांबू ? असं करता करता गडाच्या दक्षिण बाजूस एवढ्या लोकांना बसता येईल असं झाड शोधत शोधत गेलो आणि शेवटी उन्हातच जेवायला बसलो कारण त्या दिशेला एकही झाड सापडले नाही.  मग काढले न्यूज पेपर आणि डब्बे जेवायला बसायची तयारी केली. पण आकाश त्यांनी  भेळ बनवायला घेतली. मला क्षणभर हसु आलं. कारण भेळ कितीही खाल्ली तरी खावीच वाटते. आणि त्या भेळेने मन भरते पण पोट भरत नाही. पण कांदा कोथिंबीर च्या सुगंधाने राहवत नव्हते .आणि ती भेळ २० लोकांना पुरेल त्याहून जास्त होती. वेडी मुलं रे. पण भारी बनवली भेळ. रंगीबेरंगी दिसत होतं ते दृश्य. एकीकडे भेळ एकीकडे माझा आवडता ब्रेड आणि जाम होता. मी तर  ताव मारून दोन स्लाइस खाल्ल्या. त्यावेळी विनोद भाई ची आठवण आली खूप तो बरेचदा असं गोड काहीतरी आणतो ट्रेक मध्ये आणि ब्रेड जाम आणतोच आणतो. तो ब्रेड जाम मी खाते आणि माझा टिफिन त्याला देते. 











तर मग आम्ही तिथे टिफिन शेअर केला नेहमीप्रमाणे. आणि भेळ राहिली होती मात्र निघायच्या वेळी बसमध्ये खाता आली पण अतिशय छान टेस्ट होती त्या भेळची.






पण त्या दिशेचा view अतिशय सुंदर होता छान फोटोग्राफी केली आणि जेवण  आटोपून पुन्हा गडाच्या मध्यभागी आलो तोपर्यंत बाकी लोक नाणेघाटाच्या बाजूने उतराइच्या बाजूने एका पाण्याच्या टाक्याजवळ जेवण करत बसले होते. सगळ्यांचे जेवणाचे डबे तपासले आणि रंगीबेरंगी भाज्या पाहून च मन भरलं. आपण  एकदा जेवलो  की झालं. कोणी चिंचेची गोळी काढली ती खाल्ली बुवा मी. आणि पुन्हा फोटोग्राफी, हसी-मजाक आणि "फोना"ग्रुप फोटो झाला आणि निघालो नाणेघाटाच्या दिशेने उतराई साठी. त्या ठिकाणाहून "नानाचा अंगठा" चा view काय दिसत होता तुम्हाला सांगू.…. "अप्रतीम, लईच भारी. नयनरम्य." 




पण त्या आधी आम्हाला "वानरलिंगी  सुळका " पहायचा होता. तिकडे वळलो आम्ही आख्या गडावर गड चढताना दगड निवडुंग लागत होता हाताला. आणि गडावर गेल्यावर एक वनस्पती होती तिची पाने काट्यासारखी पायाला बोचत होती. ज्यांनी तरी थ्री-फोर्थ घातली होती त्यांना जरा  जास्तच जाणवली असेल ही बोचणारी पाने. आणि हो गडावर मधूनच काही फुलांचा सुगंध येत होता मधेच गार वारा होता..




उतरताना समोरच नानाचा अंगठा हे गड दिसतात. आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे तो उतरताना लक्ष वेधून घेतोच घेतो. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करुनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहेत्यामुळे जरा जपूनच चढावे.
वानरलिंगी सुळक्याजवळ पोहोचलो त्यावेळी आठवण झाली हरिश्चंद्रगडच्या कोकण कड्याची.……. कोकण कड्या इतका मोठ्ठा नसला तरीही अप्रतीम दृश्य होतं ते.  ऊन असून गार वारा होता. आणि फोटो काढण्यासाठी सगळ्यांनाच  घाई होती. पण ती घाई आणि हौस मला जरा जास्त च असते. सुळका पळून जाइल की काय या भीतीने भरभर मनमुराद  फोटो काढून घेतले आणि मगच त्या कठीण दिसणाऱ्या कड्याजवळून जराशी बाजूला झाले. इतरांनाही फोटो काढता यावा यासाठी.


वानरलिंगी सुळका पाहून झाल्यावर वेध लागले होते ते नानाच्या अंगठ्याचे. कधी एकदा उतरतो आणि नानाचा अंगठा जर जवळून पाहतो असा झालं होतं. उतरताना गडाच्या प्रवेशद्वाराची कमान तेवढी उभी आहे. प्रवेशद्वारात दगड, मातीचा ढिगारा कोसळून प्रवेशद्वार अर्धे अधिक गाडले गेलेले आहे. प्रवेशद्वाराची पडझड पण बरीच झालेली आहे. प्रवेशद्वाराच्या वर मधोमध कलश त्यात आंब्याची पाने व वर फळ असे वैदिक चिन्हे कोरून काढलेली आहेत. कलशाच्या उजव्या व डाव्या हाताला सूर्य, चंद्र यांची शिल्पे कोरून काढलेली आहेत.  





आम्हाला प्रवेशद्वारातून वाकूनच पुढे जावे लागले. आमच्या पुढे अजून एक ट्रेकिंग होता तो ही गड उतरतच होता. त्यांच्या मागोमाग आम्ही उतरलो. एका ठिकाणी सेफ्टी म्हणून रोप लावला होता पण आम्ही बिना रोप चे उतरून पहिले काही जणांनी आणि जमलेच आम्हाला. आता पुढे उतरत होतोच तर नानाचा अंगठा जवळून पाहता आला तरी खूप झाले हा मानस होता. पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसा विचार बदलत गेला. पुढे आलोच आहोत तर बसण्यापेक्षा नानाचा अंगठा पाहून होईल. परंतु जीवधन च्या पायथ्यापासून आमची बस च २ किलोमीटर अंतरावर होती. बसजवळ फोहोचलो खूप थकलो होतो. निकाळजे काका जिंदाबाद ५ मिनिटे थांबलो पाणी प्यायलो आणि आता मस्त चहा सांगून बाकीच्या लोकांची वाट पाहूयात अश्या विचारात असताना आमच्यातली काही मुले त्या नानाच्या अंगठ्याकडे रवाना झाली. माझा जीव खाली वर होत होता. आता पुन्हा जीवधनगडावर केव्हा येईन हे ठावूक नव्हते.

नानाचा अंगठा उतरताना आम्हाला वाट सापडत नव्हती निकाळजे काका सोबत होते तेही गायब झाले म्हणजे पुढे गेले त्यांच्या पायाला एक भिंगरी असते. त्यात दोन तीन मुले आणि तो दुसरा ग्रुप होता (बहुतेक गिरीप्रेमी पुणे)सोबत तो आम्हाला वाट दाखवत होता एक्सपर्ट होता ग्रुपअचूक वाट दाखवत होता. कारण आमचे ग्रुप लीडर मंदार सरविवेकरोहित हे बाकीच्या मेम्बर्स न रोप लावून उतरवत होते. आणि मला वेध लागले होते ते नानाच्या अंगठ्याचे. जर पुढे गेलो तर मिळाला तर मिळाला नानाचा अंगठा जवळून पाहायला. 


                (waril 3 pics nantar saral karnyat yetil.)

मग निकाळजे काका म्हणाले  की अरे मंदार सरांनी सांगून ठेवलयं की ज्यांना शक्य होईल त्यांनी नानाचा अंगठा पाहून वेळेत बसापाशी पोहोचवावे. माझी तर चांदीच झाली.   मी माझी पाठीवरची sack ठेवली  बसमध्ये.  निकाळजे काका आणि मी निघालो त्या नानाच्या अंगठ्याच्या दिशेने. आमच्यातलीच काही मुले आधीच  तिकडे पोहोचली देखील. सुर्य अस्ताला जात होता आम्ही चालत होतो. वरून बोटीच्या आकाराचा दिसणारा नानाचा अंगठा आता मोठ्ठा डोंगर दिसायला लागला होता. 
आणि आम्ही जात असताना मधेच मला खानदेशी भाषा ऐकायला मिळाली माझ्यासोबत असलेल्या काही मेम्बर्सच्याकडून की जी भाषा मला खूप आवडते. त्यामुळे आलेला शीण आपोआप निघून जात होता. 
मन किती हावरे असते आपले बघा. नानाच्या अंगठ्यावर जायला मिळालं आता  किमान सनसेट तरी नानाच्या अंगठ्यावर मिळावा ही माझी हाव वाढली. आणि सपसप पावले चालू लागली. जर लवकर पोहोचवावे यासाठी रस्ता सोडून गवतातून निघालो शॉट कटने. पण तिकडे पुढे गेल्यावर लक्षात आले की जवळ मोठ्ठी दरी आहे मग आमचा पचका झाला बारीकसा. 



पुन्हा रस्ता धरला आणि फोटोग्राफी करत एकदाचे त्या नानाच्या अंगठ्यावर पोहोचलो.… woooow … आनंद गगनात मावत नव्हता. त्या ठिकाणाहून दिसणारे दृश विलोभनीय होते.फोटोग्राफी केली……पण  शेवटी सुर्य हातात घेता आलाच नाही. 


एक आवाज येणारा फोटो मात्र काढला. पण नानाच्या अंगठ्यावर पोहोचलो याचे अपरंपार समाधान होते. आणि तिथून आम्हाला काय दिसले आमच्या बस चे तोंड वळलेलं दिसले. 
नानाचा अंगठा उतरत असताना तिथे एक छोटंसं मंदिर दिसल ते जवळून नाही पाहता आलं. कारण निघायची घाई होती. अंधार वाढायला लागला होता.  


घाईत  त्या नाणेघाटाच्या बाजूने अतिशय सुंदर गुहा होत्या आणि अतिशय सुंदर दृश्य होत म्हणे तिकडे. त्या मी मिस केल्या.पण ट्रेक मेम्बर्स कडून फोटोतून पाहता आले मला ते. 

आणि आता जर वेळेत बसपाशी पोहोचलो नाही तर जरासा ओरडा खावा लागेल ग्रुप लीडरचा सो पुन्हा २ किलोमीटर अंतर झटक्यात पार केले आणि आणि बसपाशी वेळेत पोहोचलो आणि चहा घेतला पिशवीतला थोडा खावू काढून वाटला आणि मी भरल्या मनाने बसमध्ये बसले. प्रत्येक वेळी काही तरी बघायचा राहून जातं वेळेअभावी. गडाचे एक तरी टोक राहून जातं. पण यावेळी मनसोक्त गड फिरून झाला. आणि जीवधन आणि नानाचा अंगठा एका दमात केला याचे समाधान शब्दात सांगणे नाही. त्यासाठी जीवधन गड सर करून यावा. असा हा ओढ लावणारा जीवधन गड…. ट्रेक सुफळ संपूर्ण.

           


सुर्य अस्ताला गेल्यावर आमची बस जीवधन हून घराकडे रवाना झाली  यावेळी गाण्याची भडास नाही काढता आली.का? ते विचारू नका.होतं असं कधी कधी. रात्री १०:३० घरी पोहोचले .१३ डिसेंबर या दिवशी मुलीचा वाढदिवस असल्याने तिला औक्षण करून केक कापून तिचा वाढदिवसही साजरा झाला. खुश खुश खुशाम ……।