Friday 17 January 2020

राष्ट्रीय युवादिन” कळसुबाई शिखरावर


“राष्ट्रीय युवादिन” कळसुबाई शिखरावर
“कळसुबाई शिखर ट्रेक”
दिनांक - ११-१२ जानेवारी २०२०
ठिकाण - अहमदनगर जिल्हा
उंची- ५४०० फूट
चढाई श्रेणी कठीण       

कळसुबाई शिखराची थोडक्यात माहिती-
“कळसुबाईचे शिखर”हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखराची उंची सुमारे ५४०० फूट म्हणजेच एक हजार १६४६ मीटर आहे.सह्याद्रीच्या रांगेत पाचहजार फूटांच्यावर तीनच शिखरे आहेत. पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर तर दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे त्यानंतर ‘घनचक्कर’च्या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. कळसुबाई शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्या जवळ असलेल्या बारी गावापासून सुरू होतो. कळसुबाई शिखर पुण्यापासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आहे. बिनाट्राफिक इथे पोहोचावयास ते पाच तास लागतात.
कळसूबाईच्या पायथ्याशी असलेले बारी हे गाव महादेव कोळी या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासूनच  कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी अख्याइका सांगितली जाते की कळसुबाई ही तेथील गावातील सून होती.  तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीचे ज्ञान होते. त्यामुळे ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने कळसूबाईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.
कळसूबाईच्या  मंदिरातील मूर्ती 
शिखरावर जे कळसुबाईचे मंदिर आहे त्याचा आकार एकावेळी तीनच व्यक्ती मावतील एवढा छोटा आहे. शिखरावर मंदिराशेजारी खडकात रोवलेला त्रिशुळ आणि शेजारी खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा दिसतात. मंदिरात स्थानिक पुजाऱ्याकडून दर मंगळवार-गुरुवार पूजा केली जाते. नवरात्रीत शिखरावर उत्सव साजरा केला जातो. उत्सवकाळात देवीच्या मूर्तीची सजावट केली जाते. या शिखराविषयीची अजून एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले त्यावेळी पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. काही दंतकथांमध्ये कळसूने शिखरावर देहत्याग केला त्यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्यात आले असा उल्लेख आढळतो. त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्या दृश्याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ‘दि किंग ऑफ डेक्कन हिल्स’ असे म्हटले.
याच भागात कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य आहे. तेथे बिबट्या, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू, रानमांजर, चिंकारा, तरस असे अनेक प्राणी आढळतात. सोबत मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरूड, धोबी, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, रंगीत करकोचे, खंड्या, बंड्या. स्थानिक आणि स्थलांतरित असे शंभर प्रकारचे पक्षीही पहावयास मिळतात. नोव्हेंबर ते मे महिन्याचा कालावधी येथे फिरायला जाण्याचा योग्य काळ आहे.
दिनांक ११-१२ जानेवारी २०२० रोजी माऊंटन इज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा १०५ वा ट्रेक होता. २०२० या वर्षातील हा पहिला ट्रेक होता. शिवाय १२ जानेवारीला विवेकानंद जयंती असते आणि तो दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे ग्रुपने राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून कळसुबाई शिखर ट्रेक आयोजित केला होता.
ट्रेकप्रवास सुरु करण्यापूर्वीची धमाल 
११जानेवारीच्या शनिवारी रात्रीचा प्रवास असल्याने आमची बस शनिवारी रात्री ११ वाजता पुणे-चाकण-संगमनेर-अकोले-राजूर मार्गे बारी गावाकडे निघाली आणि पहाटे वाजता बारी गावात आम्ही पोहोचली.बसमध्ये आम्ही जी काही हलतडुलत झोप घेतली असेल तेवढीच.अजून अंधार असल्याने आकाशात चंद्र पाहावयास मिळाला. थंडी जरा जास्तच असल्याने आम्ही थोडावेळ शेकोटीचा आनंद घेतला.
त्या अंधारात कळसूबाईशिखरावर दिवे चालताना भासत होते. रात्री शिखर परिसरात तंबू टाकून राहिलेले ट्रेकर्स उतरत होते तर पहाटे चढाई करणारे चढत होते.थोडासा उजेड आला तरीही चंदामामा स्पष्ट दिसत होता. 
थोडासा उजेड आला तरीही स्पष्ट दिसणारा चंद्र आणि कळसुबाई शिखर 

तिथे पोहोचल्यावर लगेच फ्रेश होऊन चहा-नास्ता करून लीडर्सच्या सूचनेनुसार सकाळी वाजता ट्रेकला सुरुवात केली. प्रदूषणविरहित वातावरण आणि अजूनही थंडी असल्याने वातावरण अल्हाददायक आणि प्रसन्न होते. शिखरावर चढाई करण्याच्या एकूण तीन वाटा आहेत असे ऐकलेय परंतु आम्ही बारी गावातूनच चढाईस सुरुवात केली. चढाई करताना सुरुवातीलाच सुंदर हिरवीगार अशी भात शेती दिसते.मला स्वतःला हे वातावरण कायम माझ्या माहेरची आठवण करून देते त्यामुळे मी अश्या खेडेगावच्या कायम प्रेमात असते
ट्रेकची सुरुवात प्रसन्न चेहऱ्याने करणारे ट्रेकर 



चढाई करताना सर्वांचे चेहरे प्रफुल्लित होते. राष्ट्रीय युवादिनामुळे अनेक नवनवीन ट्रेकर्स सहभागी झाले होते. चंद्र अजून दिसेनासा होतोच आहे तोवर थोड्या वेळाने सूर्यदेवदेखील हळूच डोंगररांगेतून डोकावू लागला.
कळसुबाईच्या पायथ्याला असताना झालेला सूर्योदय 
त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सगळ्यांचे कॅमेरे पुढे सरसावले. जसजसे चढाई करीत होतो तसतशी गावातील घरे इवलीइवलिशी दिसू लागली होती. एकीकडे शिखर स्मित हास्य करतेय तर एकीकडे आमच्या उड्या, बदक उड्या,सुरु झाल्या. त्याच्याने वॉर्म अप मात्र भारी झाला. ट्रेकर्सची अफाट गर्दी पाहायला मिळाली. काही वर्षांपूर्वी दोनतीन ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत त्या ज्यांनी लावल्या त्यांना सलाम. कारण इतक्या उंचावर नुसते चालणे देखील खूप अवघड आहे तिथे या वजनदार शिड्या नेऊन लावणे ही खूपच मेहनतीची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे आता चढाई करणे थोडे सोपे होतेय.

चढाई करताना सगळ्यात छोटा ट्रेकर ऋत्विक आणि त्याचे आईबाबा. 
जसजसे शिखर सर करत होतो तसतसा उत्साह वाढतच होता. खाली वळून पाहिले की शिखराच्या पायथ्याचे गाव,भातशेती आणि समोरच्या डोंगररांगा अतिशय सुंदर भासत होत्या. ट्रेकर्सच्या देखील रांगा छान दिसत होत्या. सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी डोंगरांच्या कधी गडद तर कधी फिक्या छटा दिसत होत्या.
आम्ही आपले फोटोग्राफी करत निसर्गाचा आनंद घेत त्या प्रदूषण विरहित वातावरणात रमून गेलो होतो. नेहमी येणारी बरीच मित्रमंडळी ट्रेकमध्ये होती त्यामुळे मला सगळ्यांसोबत फोटो काढणे फार गरजेचे वाटत होते. ट्रेकफोटो म्हणजे आठवणी, ट्रेकफोटो म्हणजे आठवणींच्या साठवणी, फोटो म्हणजे सह्याद्रीचे बोलावणे,ज्याला ट्रेकचे वेड आहे त्याला फोटोची भावनिक,मानसिक जोड आहे.

शिखरावर राहण्याची सोय नाही.आपण जर तंबू घेऊन गेलो तर आपला तंबू शिखरावरील खालच्या टप्प्यात असलेल्या जागेत लावू शकतो. विहिरीजवळ असलेल्या टपरीत भजी आणि चहाची सोय होते. अधेमध्ये बिसलेरी पाणी,लिंबू-सरबतच्या टपऱ्या आहेत.
तेथील गावकऱ्यांना तेवढेच उपजीविकेसाठी एक साधन बनते.शेतीशिवाय इथे येणारे ट्रेकर्स त्यांच्यासाठी चहा-नास्ता -जेवणाची ऑर्डर मिळाली म्हणजे थोडीशी कमाई झाली. निसर्गाची साखळीच अशी आहे एका प्राण्यावर एक प्राणि अवलंबून असतो आणि उपजीविका करीत असतो. निसर्गाकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, शिखरमाथ्यावर पोचायला साधारण तीन तास पुरतात.

थेट शेवटच्या टप्प्यात विहीर आहे प्यायचे पाणी फक्त तिथेच मिळते. इतक्या उंच ह्या विहिरीत पाणी येते कुठून याचे आश्चर्य वाटते. "देवाची करणी आणि नारळात पाणी दुसरे काय."ती विहिर फक्त - फूट खोल असेल तरीही त्यातले पाणी आटत नाही हे नवलच. शिखरावर - ठिकाणी लिंबू सरबत विकणारे आणि तिथे नास्ता बनवून देणारे तिथले लोक ह्याच विहिरीचे पाणी वापरतात शिवाय ट्रेकर्स आणि इतर कळसुबाई मंदिरात जाणारे लोक देखील या विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात.
सरबत पिण्यासाठी निवांतक्षणी बसलेले आमचे लीडर मंदारसर आणि मयुरी थरवल     
आम्हाला सुद्धा त्या विहिरीतून पाणी काढण्याचा मोह आवरला नाही. कितीतरी थकलेले ट्रेकर्स विहिरीतून पाणी काढून फक्त तोंडावर मारत होते. जेव्हा मी म्हणाले की हे पाणी पिण्याचे आहे तेव्हा सगळेजण प्यायला लागले आणि बाटल्या भरून भरून घेऊ लागले.पाणी काढण्याच्या पोहऱ्यात हातात घालून पाणी घेणारे पोहऱ्याने पाणी ओतून घेऊ लागले. एकाने काही चांगले कार्य केले तर त्याचे अनुकरण चांगल्या पद्धतीनेच होते. ट्रेकर्सची जमातच अशी आहे मग तो कोणताही ट्रेकर असो सह्याद्रीत गेला की घडला समजा.हा माझा अनुभव आहे.

सेल्फी किंग निलेश ट्रेकचे अंतर मोजणारा  भूषण आणि गायक  चंदू 
त्याच्याही आधी जेव्हा लोखंडी शिड्या नसतील तेव्हा अनेक लोक ट्रेकच्या निमित्ताने किंवा कळसुबाई देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने शिखरावर जात होते तो प्रवास किती कठीण असेल किती कसरत करावी लागत असेल याची कल्पना येते. शिड्यांच्या पायऱ्या काहीशा अरुंद असल्याने गर्दी न करता त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्या व उतराव्या लागतात. वाटेत आंबा, करवंद आणि जांभूळ यांची अनेक झाडे लागतात. आता आंबा करवंदांचा ऋतू नसल्याने आम्हाला त्याचा आस्वाद घेता आला नाही एवढेच. अवघड ठिकाणी किंवा वळणावर रेलिंग, तर काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चढाई अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत होते.
एव्हरग्रीन गायक शेवाळकर सर आणि इतर नवे ट्रेकर 

ठिकठिकाणी  सरबत, चहासाठी कुडाच्या झोपड्या  आहेत परंतु कचरा टाकण्यासाठी  पिशव्या  ठेवल्या आहेत 

शिखराच्या मधल्या भागात माकडे आहेत त्यांच्यासमोर खाऊ काढला तर ती माकडे आपल्या बॅगा ओढून घ्यायला कमी करत नाहीत त्यामुळे तिथे जपूनच जावे लागते. कधीकधी रिकामी बॅग सुद्धा ओढतात त्यामुळे जाणाऱ्यांनी जरा सावधगिरीनेच जावे. मोबाइलदेखील लपवावा लागत होता. खरंतर पृथ्वीवर प्रत्येक प्राण्याला त्यांचे आयुष्य त्यांच्यापद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. या माकडांना तिथे खायला काही मिळत नसल्याने ते आपल्या बॅगा ओढून हिसकावून खातात. याच टप्प्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा खूप आढळला अश्या अवघड ठिकाणी कचरा होता की तो सहज उचलणे शक्य नव्हते. त्यापेक्षा प्रत्येक ट्रेकर्सने आणि प्रत्येक पर्यटकाने ठरवले की कोणत्याही गडावर किव्वा कुठेही असा विरघळणारा कचरा फेकूच नये तर सह्याद्री अतिशय स्वच्छ आणि सुंदर राहील. 
आमच्या ट्रेकरची बॅग उचकटून कसा साधाच जाऊन बसलाय हा माकडोबा 

अगदी शेवटचा टप्पा पार करताना आम्ही चारपाच ट्रेकर्स शिडीचा वापर करता दुसऱ्या बाजूने रॉकवरून चढून गेलो. चक्रम हायकर्सच्या डिसेंबरच्या सह्यांकनला प्रत्येकाकडे किमान दहा फुटी रोप असावा असा नियम होता. हा रोप केव्हा कामी येईल सांगू शकत नाही त्यामुळे छोटा रोप जवळ ठेवायची आता सवय लागली. सह्याद्रीमध्ये प्रत्येक ट्रेकग्रुपकडून नवीन काहीतरी शिकायला मिळते. सकाळी सात वाजता सुरु केलेला ट्रेक इतका रमत गमत केला तरी ११वाजता आम्ही शिखरावर पोहोचलो होतो.
या बाजूने अलंग मदन आणि कुलंगची रांग धुके असल्याने पुसटशी दिसत होती. दुर्बिणीने थोडीशी स्पष्ट दिसत होती. 
शिखरावर पोहोचल्यावर सगळा शीणच निघून गेला. कळसूबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. आजूबाजूचा अतिशय सुंदर असा नजारा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतला. एका बाजूला भंडारदरा धरणाचा दूरवर पसरलेला जलाशय आणि एका बाजूला अलंग, मदन, कुलंगची रांग, एका बाजूला दूर हरिश्चंद्रगड. कायकाय डोळ्यात साठवून घ्यावे ते सुचत नव्हते.  
उत्तम फोटो काढणारा युवराज, स्नेहल आणि पाठीमागे पुसटसा दिसणारा भंडारदरा धरणाचा अथांग जलाशय  
कळसुबाई शिखराचा माथा म्हणजे एक मोठा खडक आहे त्यावर ते मंदिर बांधले आहे. तिथे एक लोखंडी साखळी आहे मनात एक इच्छा धरून ती साखळी जर आपण एका दमात खेचली तर म्हणे मनातली इच्छा पूर्ण होते असा समज आहे. आमच्यातल्या काही ट्रेकर्स नी ती हौस देखील पूर्ण केली.  

शिखरावर खडकाच्या कडेला लोखंडी कुंपण केले आहे त्यामुळे फोटोग्राफी करताना आणि तिथे फिरताना थोडा आधार मिळतो परंतु तरीही सावधगिरी बाळगलेली चांगली असते. शिखरावर गेल्यावर गारवारा मनाला सुखवीत होता. डावीकडे बघू की उजवीकडे बघू असे झाले होते. चारीबाजूने डोंगर दऱ्या शीळ घालून खुणावित होते. कडेच्या खडकावर उभे राहताना उडून जाऊ की काय अशी भीतीदेखील वाटत होती.
राष्ट्रीय युवादिनानिमित्त ट्रेकसाठी हजर असलेली मुलींची गॅंग 
मनसोक्त फोटोग्राफी करून बॅनरफोटो घेऊन शिखराची लीडर्सकडून माहिती मिळवून तिथून दिसणाऱ्या गडांवर जाण्याची इच्छा मनात घेऊन थोड्याच वेळात आम्ही कळसुबाई शिखर उतरायला सुरुवात केली. वरची पहिली लोखंडी शिडी उतरलो आणि समोरचे दृश्य पाहून आश्चर्य वाटले.

आम्हाला समोर तीन सेलिब्रिटी भेटल्या.समोरून कुबड्या घेऊन शिखर सर करणारी मुलगी पाहून मी तर तिच्याकडे वेगाने चालत गेले आणि जलद गतीने विचारपूस सुरु केली. त्या तीन सेलिब्रिटींसोबत आमचे फोटोसेशन सुरु झाले. कुमारी अंजना प्रधान कुबडी घेऊन ११ वेळा कळसुबाई सर करून विक्रम करणार आहे.शिवाय जलतरण स्पर्धेतदेखील तिला गोल्ड मेडल मिळाले आहे. कुमारी मयुरी चौधरी ही डाऊनसिंड्रोम बाधित आहे. तिची कळसुबाई शिखर सर करण्याची दुर्दम्य इच्छा होती. तिने गिरिदुर्ग ट्रेकग्रुपच्या मदतीने शिखर सर केले. तिलाही २किलोमीटर अंतराचे जलतरण स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे तिच्या आईला पोहणे येत नव्हते परंतु आपल्या मुलींसाठी आईदेखील पोहण्याची कला शिकली. एका लेकरासाठी आई काय-काय करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.तसेच सागर बोडके हा अंध असून त्याने २१ वेळा कळसुबाई शिखर सर करून विक्रम केला आहे. कठीणातील कठीण वजीर सुळका सर करून विक्रम करणारा सागर हा भारतातील पहिला अंध मुलगा आहे. गिरिदुर्गच्या सदस्यांनी या तीन हिऱ्यांना घेऊन "जिजाऊ जयंती" साजरी करून शिखरावर स्वच्छता मोहीम देखील राबवली. त्यांच्याशी थोडा वेळ संभाषण केल्यावर आम्हाला ही माहिती त्यांच्याकडून मिळाली. सगळ्यांच्याच डोळ्यात कौतुकाने आनंदाश्रू आले. आपण चांगले धडधाकट असून थोडेसे हातपाय दुखले की दहावेळा सांगतो. या खास व्यक्तीकडून ही मोलाची शिकवण आणि प्रोत्साहन घेण्यासारखे आहे. आमचा कळसुबाई शिखर ट्रेक सार्थकी लागला म्हणावा लागेल. गिरिदुर्ग आणि ह्या तीन छोट्या खास ट्रेकर्सना आमचा सलाम.





आम्ही एक टप्पा खाली येऊन जिथे विहीर होती तिथे भजी बनवणाऱ्याच्या टपरीत थांबून जेवणाचे डबे आणले होते ते काढून जेवण संपवले. मस्त गरमागरम भजीच्या दोन-चार प्लेट घेऊन सगळ्यांनी फस्त केल्या. अर्धा तास थांबून दोन तासाच्या गप्पा मारून इकडच्या तिकडच्या फेकाड्या गप्पा मारून लगेच शिखर उतरण्यास सुरुवात केली.

    भजीवाले दादा आणि सेल्फीकिंग-गायक निलेश  

उतरताना
सर्व ट्रेकर्स पायाला भिंगरी लावल्यासारखे उतरत असतात. दोन-तीन ठिकाणी लिंबू सरबताचा आस्वाद घेत आम्ही उतारलॊ. उतरताना बारी आणि आजूबाजूची गावे खरच खूपच सुंदर दिसत होती.
अनोळखी ट्रेकर फ्रेममध्ये  छान बसत होता कॅमेऱ्यात कैद केला.   
सर्पमित्र  निकाळजे काका 
गावातील शेतकरी शेतात भाजीपाल्याची लागवड करताना किंवा त्यातील गावात काढण्यात रमून गेले होते. घराशेजारीदेखील भाजीपाल्याची लागवड केली होती. शेतकऱ्याकडून छोट्यात छोट्या जागेचा कसा चांगला वापर करावा हे शिकण्यासारखे आहे.


   बारी गावात प्रत्येकाने घराशेजारील जागेत लावलेला भाजीपाला 


चारच्या सुमारास कळसुबाई शिखर उतरून बारीगावातील आमच्या बसच्या जागी उशिराहून येणाऱ्यांची वाट पाहत चहाचा आस्वाद घेतला. गावचा रस्ता एकेरी असल्याने आणि इतरही ट्रेकग्रुपच्या खूप बसेस असल्याने आमची बस गावाच्या वेशीपाशी एक कि.मी. अंतरावर उभी केली होती. 
 सायकलिंगमध्ये जागतिक विक्रम करणारे श्री. संतोष होळी एका निवांत क्षणी सरबत पिताना 
ट्रेकिंग करणारे सोडले तर तेथील काही लोक नाशिक घोटीच्या बाजूने आलेले लोक, मंदिरात जाणारे बरेचसे लोक काही चप्पल घालून तर काही अनवाणी शिखर चढताना दिसले.गावात पिण्याच्या पाण्यासाठी बोअर वेल, विहिरी आहेत. तसेच शौचालयाची सोय दिसली. बारी गावाच्या वेशीपाशी एक शाळा देखील आहे. डोंगराच्या पायथ्याशी खेड्यापाड्यात देखील अश्या सोयी पाहून मनाला समाधान वाटले

ट्रेक संपल्यानंतरचा ट्रेकर्सचा फ्रेश लुक 
पाचच्या सुमारास आमची बस पुन्हा त्याच मार्गाने पुणेकडे रवाना झाली.भंडारदराजवळ रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. येताना गरमागरम वडापाव आणि कडक चहाचा आस्वाद घेऊन उदय सर आणि मित्रमंडळींची सुमधुर गाणी ऐकत रात्री १२च्या सुमारास घरी पोहोचलो. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे ग्रुपने राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून कळसुबाई शिखर ट्रेक आयोजित केला होता.त्याची बातमी देखील बातमीपत्रात आली. जवळपास १५ कि.मी.चा ट्रेकयशस्वीरित्या पार पडला.सर्व लीडर्सना उत्तम ट्रेक आयोजित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्व ट्रेकमेम्बर्स आणि फोटोग्राफर्सचे अभिनंदन.माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स
लीडर्स रॉक्स