Tuesday 13 March 2018

किंग फोर्ट, किंग ग्रुप,किंग ट्रेक....


गडांचा राजा हरिश्चंद्रगड
हरिश्चंद्र गड आणि तारामती शिखर ट्रेक
उंची - ४८५० फूट
प्रकार - गिरिदुर्ग
चढाईश्रेणी - मध्यम
ठिकाण- नगर जिल्हा
डोंगररांग - हरिश्चंद्राची डोगररांग

हरिश्चंद्रगड माहिती-महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात पाचनई गावाजवळ हरिश्चंद्र हा गड आहे खरे तर इथे पोहोचण्यास चार-पाच वाटा आहेत. खिरेश्वरकडील वाट -टोलार खिंड, सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग नळीची वाट, आणि पाचनई गावाजवळून जाणारी वाट. हरिश्चंद्रगड-तारामती शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४८५० फूट उंचीवर आहे. खिरेश्वर आणि पाचनई ही पायथ्याची गावे आहेत.हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा पर्वताप्रमाणे दिसणारा प्रशस्थ डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड, हाराष्ट्रात सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई आहे त्यानंतर हरिश्चंद्रगड हे उंचीनुसार दोन नंबरच्या स्थानावर येते. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पूर्वेला तारामती शिखर तर पश्चिमेला कोकणकडा असा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो
इतिहास-साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो..... महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीरही या जमातीचे प्रतीक आहेत. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. असा हा गडाचा थोडक्यात इतिहास सांगता येईल.
ठिकाणे :
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :  मंदिराच्या प्रांगणात  भिंत आहे. या  भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे.
केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती परंतु सध्या एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास थंडगार पाण्यातून जावे लागते.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे म्हणतात 
कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा,वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.

तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल,घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात.
दिनांक १०-११ मार्च २०१८ या तारखेला माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुपचा ८१ वा हरिश्चंद्रगड ट्रेक म्हणजे आमच्यासही पर्वणीच असते. कारण फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरु होतो. आणि अशा कडक उन्हात कॅम्पिंग असले की जरा हायसे वाटते.तेथील सूर्योदय सूर्यास्त शांतपणे अनुभवता येतात. खरे तर आमच्या फोना ग्रुपचे नामकरण झाले आहे नवीन नाव माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे असे ठेवण्यात आले आहे. या नवीन नावाच्या ब्यानरसहित हा पहिला ट्रेक होता आणि तोही गडांचा राजा हरिश्चंद्रगड  येथे होता त्यामुळे सर्वच ट्रेकर्स खुश होते. पुण्यापासून सुमारे १६५ किमी अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. १० मार्च शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास आमची माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुपची बस ट्रेकर्सना घेत-घेत निगडी-तळेगांव-चाकण-राजगुरूनगर,बोटा-ब्राह्मण वाडा- कोतुळ मार्गे पाचनई गावात म्हणजे गडाच्या पायथ्याशी पोहोचली. मध्ये आमचे अन्ताक्षरीचे पुढारी, उत्साही शेवाळकर सर यांच्या  घरी भर उन्हात सरबताची उत्तम पर्वणी मिळाली.
एका ट्रेकरला काही कारणाने मधेच उतरून परत जावे लागले. तासाभराच्या अंतराने बस जरा गरम झाल्याने अर्धातास थांबल्याने काही ट्रेकर्सने लहानपणीचा पारंब्याचा खेळ अनुभवला तर काहींनी रास्ता रोको फोटोग्राफीचा आनंद घेतला. एकूणच काय तर मिळालेला वेळ सत्कारणी लावला. असा हा मध्ये थोडा वेळ गेल्याने पुणे ते पाचनई गावापर्यंत पोहोचायला ५ तासाऐवजी ६ तास लागले इतकेच. मला मनोमन सूर्यास्ताची ओढ लागली होती.सूर्यास्त गडावर मिळेल की नाही मिळेल याची मनात शंका आली होती म्हणून मी बसमधून सूर्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत होते.
संध्याकाळी ५:४५ च्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचल्यावर पटापट आमच्या ट्रेक सॅक पाठीवर बांधल्या आणि लगेच ट्रेकला सुरुवात केली. खरंतर त्या शांत रम्य संध्याकाळी फक्कड  चहाची तप आली होती परंतु तिथे तो फक्कड चहा पित बसलो असतो तर गडावर पोहोचण्यास जास्त उशीर आणि अंधार झाला असता. त्यामुळे आम्ही लगेचच गड चढाई सुरु केली. गडाच्या पायथ्यापासून तो गडाचा  प्रशस्त पसारा पाहून अंदाज येत होता की नवीन ट्रेकर्सना थोडी धास्ती वाटत होती की ते ट्रेक करू शकतील की नाही. पण ग्रुप लीडर्सची नवीन ट्रेकर्सना दिलासा देण्याची रीत खूप छान असते ते सगळ्यांचा उत्साह वाढवत असतात.

सूर्य जणू खुणावत होता,”चला या रे लवकर नाहीतर माझी घरी परतायची वेळ झाली आहे. आमच्यासोबत अजून एक-दोन ट्रेकग्रुप होते. माझ्यासोबत सुप्रिया होती मला माझ्यापेक्षा जास्त क्षमता असलेले, जास्त कुवत असलेले जास्त वेग असलेले आणि मजा मस्ती फोटोग्राफी करीत जाणारे ट्रेकर्स आवडतात. त्यामुळे सुप्रियाची माझी गट्टी जमली होती. तिची बहिण पहिल्यांदाच ट्रेकला आल्याने आणि मागे राहिल्याने तिला खूप काळजी वाटत होती.परंतु आमचे लीडर्स एक पुढे एक दुसरा मध्ये आणि एक दोन मागे असे सर्वांना सोबत घेऊन येण्यासाठी थांबलेले असतात.ट्रेकर्स हो, एक लक्षात ठेवा,आपल्याला मदत करण्यास कोणी नाही आपल्याला एकट्यालाच आपली सॅक घेऊन फोटोग्राफी करीत मजा मस्ती करीत परंतु तरीही शिस्तीत गड चढायचा आहे  याची  एकदा मनाशी गाठ बांधली की आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्यासोबत कोणीतरी आपल्या मदतीला आहे असे मनात आणले की आपला आत्मविश्वास कमी होतो.

संध्याकाळी ६ च्या सुमारास सुरु केलेला ट्रेक आम्ही ५-६ ट्रेकर्सनी ७-१५ पर्यंत पूर्ण केला. खरेतर सुमारे २ तास तरी लागतात हि वाट चढण्यास आम्ही सूर्यास्ताच्या ओढीने गड जरा लवकर सर केला परंतु  सूर्य आमची वाट पाहून निघून गेला होता. आता मात्र अंधार पडल्याने आम्ही आमच्या इतर ट्रेकर्ससाठी थांबलो. लगेच पाठोपाठ अर्ध्या तासामध्ये सगळे ट्रेकर्स आलेच. नवीन ट्रेकर्स मधील सुरुवातीला आम्ही हा ट्रेक पूर्ण करू शकणार नाही असे म्हणाऱ्या  परवीन, पल्लवी, सायली यांना येताना पाहून आम्ही एकाच जल्लोष केला.गडावर जेवणाची सोय होते परंतु मोठा ट्रेक ग्रुप असेल तर तिथे त्यांना फोन करून तसे कळवावे लागते. याठिकाणी पोहोचल्यावर काहींनी तिथे चहा आणि काहींनी सरबताचा आस्वाद घेतला.  आम्ही  आता  हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचलो होतो आम्हाला अजून कोकणकडा गाठायचा होता. अंधार पडल्याने आम्ही आमच्याजवळील बॅटऱ्या काढल्या आणि एका रांगेत लीडर्सच्या आदेशाचे पालन करत शिस्तीत चालत राहिलो. अंधार खूप झाल्याने काहीही दिसत नव्हते. आमच्या ग्रुपची शिस्त आणि एकी, लीडर्सचा समजूतदारपणा  पाहून  चुकू नये म्हणून इतर ६ मुलांचा ग्रुप आला होता तोदेखील आमच्या लीडर्सच्या परवानगीने आमच्यासोबत कोकणकड्यापर्यंत आला. त्या अंधाऱ्या जंगलात एक जरी वळण चुकले तर दिशाभूल होऊ शकते. आणि मग ढुंढते रहो परिस्थती होऊ शकते त्यामुळे माहिती नसणार्यांनी तेथील गाईड किंवा वाटाड्या घ्यावा. त्या रात्रीच्या  अंधारात आमच्या बॅटरीच्या उजेडात ट्रेकर्सची रांग अप्रतिम दिसत होती. २८ जणांचा मोठा ग्रुप असल्याने कसलेही भय वाटत नव्हते.हजारो ट्रेकर्सच्या जाण्याने वाट तुडवून तुडवून जमीन धसून झाडांची मुळे वर आलेली आहेत त्यामुळे रात्रीच्या ट्रेकला काही ठिकाणी काळजी घ्यावी.
रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो. तिथे आमच्या लीडर्सने भास्कर नावाच्या व्यक्तीला आधीच सांगून ठेवल्याने आमचे साधे जेवण तयारच होते शिवाय काही तंबू लावून ठेवले होते. सगळ्यांना हायसे वाटले. आम्ही लगेच तंबूकडे रवाना होऊन आमच्या वजन सॅक तिथे ठेवून तोंडावर पाणी मारून जेवणासाठी भास्करच्या कारवीच्या घराजवळ गेलो. भात, भाजी, कढी तयार होते गरम भाकरी बनवणे चालू होते. झोपडी लहान असल्याने आम्ही २-३ पंक्ती करून जेवलो. इतक्या उंच कड्यावर त्या कारवीच्या घरात गरम गरम जेवणाची मजा काही औरच. गेल्यावर्षी गडावर प्लास्टिकचा कचरा थर्माकॉल कचरा तसेच सहली नेणारे दारू पिऊन दारूच्या बाटल्यांचा खच पाडत असत. गडाच्या स्वच्छतेची वाट लागली होती. त्यामुळे वनविभागाने सगळ्यांनाच कॅम्पिंग करण्यास बंदी आणली होती. त्यामुळे गडावर आता बिसलेरी पाणी मिळत नाही.  पाणी फक्त हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ मिळते तेव्हढेच. कोकणकडा इथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे आपल्या जेवणाची सोय करणाऱ्या लोकांना स्वयंपाकाला आणि प्यायला पाणी आणावयास इतक्या दूर जावे लागते ते देखील छोट्या पायवाटेने डोंगर ओलांडून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागते. त्यामुळे आपण माणुसकी म्हणून त्या जेवणाला नावे न ठेवता उलट त्या जेवण बनवणाऱ्या मावशी-काकांना सलाम करायला हवा. आपण जरी पैसे दिले तरी त्या कार्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात याचा अंदाज आणि जाणीव गड चढून गेलेल्या ट्रेकरलाच येतो.त्यामुळे पाणी सुद्धा जपून वापरले. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण अशा अनेक गोष्टी शिकून येतो. 
जेवण झाल्यावर आम्ही तंबू मध्ये सॅक ठेवून कॅम्पफायर केले. उंच ठिकाण असल्यावर तिथे थंडी होतीच.  कॅम्प फायरच्या ठिकाणी सर्व ट्रेकर्सची ओळख करून घेतली. कोणी उखाणा, कोणी गाणे, कोणी चारोळी, थोडक्यात कला सादर केली. माऊंटन एज ऍडव्हेंचर ग्रुप विषयी सगळ्यांना माहिती दिली आणि दोन-दोनच्या तिन-तीनच्या   ग्रुपने आपापल्या टेन्ट मध्ये झोपण्यास गेलो. रात्री १२ च्या सुमारास आमच्याच टेन्ट मध्ये कोणीतरी लाईट आणि २-३ वेळा फटके मारल्यासारखे वाटले. मी लीडर्सना सांगितल्यावर निकाळजे आणि अनिल यांनी पाहणी केली परंतु कोणीही आढळले नाही. परंतु मनात भय घर करून बसल्याने झोप मात्र लागली नाही. माझे टेन्टमेट अपूर्वा आणि शोभा आम्ही नंतर मात्र उगाच  भीतीला सोबत घेऊन  रात्र काढली. रात्री वाऱ्याचा वेग वाढल्याने टेन्ट नुसता फडफड करीत होता. पहाटे गजर व्हायच्या आतच आम्ही ५ला उठून पटापट यावरून तयार झालो आणि चहा घेऊन कोकणकड्याकडे निघालो.
कोकणकड्याचे सौंदर्य पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असाच तो आहे. एखाद्या प्रेयसींप्रमाणे वेड लावणारा मोहात पाडणारा असा तो आहे.इथे कसलेही रेलिंग लावलेले नाही . आपण जेव्हा त्याच्या कवेत जाऊन बसतो तेव्हा जणू तो   त्याच्या हाताच्या मिठीने घट्ट पकडून ठेवतो कोणालाही खाली पडू देत नाही .तरीही आपण आपली सावधगिरी बाळगलेली बरी.  कोकणकड्यावरून समोर नाणेघाट आणि माळशेज घाटाची रांग नागिणीसारखी वळणाची दिसत होती.   वातावरण जरासे धूसर असल्याने पूर्ण स्पष्ट दिसत नव्हते. परंतु हळूहळू सूर्य वर येऊ लागला तसे सह्याद्रीचे कडे स्पष्ट दिसू लागले. पावसात सुमारे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे.असे ऐकले आहे.  कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. ज्यांनी चारी वाटांनी ट्रेकिंग केले आहे अंडी गडाचा सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या लेखात वाचले आहे की, हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. आजूबाजूची शिखरे फोटोमध्ये आपण आपला फोटो येण्यासाठी जसे आपली मान उंचावतो त्याप्रमाणे हे शिखरे मान उंचावत असल्यासारखे वाटत होते. कोकणकड्यावरून उठावेसेच वाटत नव्हते. यावेळी कोकणकड्याचा  तो अर्धगोलाकार वक्र पाहण्यासाठी कोकणकड्याच्या पश्चिमेला आम्हा ट्रेकर्सना नेऊन लीडर्सने खूप माहिती दिली.इथे आम्ही  फलकन  आणि इतर पक्षांना विहार करताना वरून पाहत होतो. 
 
चला दिवाळी आली आता मोती स्नानाची वेळ झाली तसेच सूर्यकिरणे वर आली आता बॅनर फोटो काढायची वेळ झाली. यावेळी मुलींची संख्या चांगली होती आणि सगळे ट्रेकर्स सगळ्यासाठी हौशी होते. जे हौशी नव्हते ते आमचे फोटोग्राफीचे वेड पाहून फोटोग्राफीचे वेडे झाले. हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे. आपण निसर्गापुढे फिके पडतो आणि निसर्गावर प्रेम करायला शिकतो. आम्ही मुली कड्यावर फोटोग्राफी करीत असतानाच लीडर्सने माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ट्रेक ग्रुप  चा बॅनर आमच्या हातात दिला आमचा आनंद गगनात मावेना झाला. घरात एखादी नवी वस्तू आल्यावर घरच्या लक्ष्मीच्या हस्ते तिचे उदघाटन होते तिची पूजा होते आणि मग त्या वस्तूची भरभराट होते तसे झाले.  तसेच नवा बॅनर आम्हा मुलींच्या हाती लीडर्सने देऊन आमचा मान वाढवला आमची आणि बॅनरची शान वाढवली.  मंदार सर, राणे सर मनापासून धन्यवाद
त्यानंतर पूर्ण ट्रेकर्सचा बॅनर फोटो घेऊन आम्ही कोकणकड्याचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. एखादा मनोरा रचावा  त्याप्रमाणे बॅनर फोटोसाठी सगळे बसले होते. सगळे कसे शिस्तीत पार पडत होते. गड खूप स्वच्छ आढळला. तिथून आल्यावर भास्करच्या घरात आम्ही पोह्याचा नास्ता केला आणि चहा घेऊन त्या मावशींना धन्यवाद देऊन टेन्ट मधून आमचे सामान घेऊन हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो.
रात्रीच्या वेळी जी वाट पार केली ती आता दिवसा दूर वाटत होती. १० च्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो मारुतीच्या तात्पुरत्या घरात आम्ही आमच्या सॅक ठेवल्या आणि १०:३० च्या सुमारास तारामतीशिखरावर चढाई सुरु केली. आमच्यातील २-३ ट्रेकर्स तिथेच थांबले बाकीचे सगळे ट्रेकर्स तारामती शिखरावर निघालो. सुरुवातील घनदाट झाडी होती अश्या वेळी चापड्या नावाचा विषारी साप फांद्यांवर पानांवर बसून असतो त्याबद्दलच्या सूचना दिल्या गेल्या आणि सावधगिरीने आम्ही शिखर सर करू लागलो.

चढाव तसा खूप होता परंतु चापड्याच्या भीतीने आम्ही पटापट चढत होतो. एका ठिकाणी डाव्या हाताला पिंपळगाव जोगा धरणाचा प्रशस्त जलाशय पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आजूबाजूला असंख्य सह्यकडे आणि हा जलाशय पाहून मन भारावून आणि सुखावून गेले.
थोडे वर गेल्यावर थोडासा कठीण रॉकपॅच आला तिथे जरा सांभाळून चढत होतो एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला देखील शिखराची दरीच होती. २-३ शिक्षक शाळेच्या २० एक  विद्यार्थ्यांना घेऊन  त्या उंच शिखरावरून उतरताना पाहून नवल वाटले. आम्ही शिखरावर पोहोचलो आजूबाजूचा परिसर न्याहाळला. यावेळी नीट दिसले नाही परंतु असे वाचले आहे की तारामती शिखरावरून  शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.कुठेही रेलिंग लावलेले नाही. वर छोटे पठार आहे २-३ शिवलिंगे पाहावयास मिळाली.
१२ वाजले होते आणि वर एकही झाड नव्हते त्यामुळे आम्ही भगव्यासोबत बॅनर फोटो काढून शिखर उतराईस सुरुवात केली.


एका बाजूने चढलो तर दुसऱ्या बाजूने उतरलो. उतरताना जास्त तोल जातो परंतु जरा सांभाळून उतरले तर मजा पण तेवढीच येते. साडेबाराच्या आत आम्ही शिखर उतरलो हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरात जाताना तिथे आम्हाला श्री जयवंत नारायण  कठाळे हे गृहस्थ भेटले त्यांनी त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला . पौर्णिमेला शंकराच्या पिंडीवर आपोआप दीपप्रज्वलन झालेले त्यांनी पहिले. या परिसरात  १२ शिवमंदिरे आहेत. या ठिकाणी आल्याने इतकी शक्ती मिळते की वर्षभर ही शक्ती टिकते.येथील मंदिरांमध्ये प्राकृत मराठी भाषेत शिलालेख लिहिले आहेत ते आपण वाचू शकतो.  गडांचा राजा हरिश्चंद्रगड हे त्यांचे पुस्तक  लवकरच लिहून पूर्ण होऊन प्रकाशित होईल. त्यात आपल्याला गडाविषयी, मंदिरांविषयी इत्यंभूत माहिती मिळेल असे त्यांनी म्हंटले.

त्यांच्याशी बोलून आम्ही मंदिरात गेलो मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळले. आम्ही गाभाऱ्यात जाऊन थोडावेळ ओंकारचा जप केला तेव्हा त्या ओंकारच्या कंपनाने अप्रतिम असा अनुभव आला. पिण्याचे गार आणि स्वच्छ पाणी  इथे एकाच ठिकाणी मिळते. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे वाचले आहे. 
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या ळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या.

आम्ही थोडा वेळ तेथील पाण्यात पाय टाकून बसलो माशांनी पायांना मस्त मसाज केला. इथे आंघोळ करण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे कारण एकतर ही नैसर्गिक संपत्ती आहे दुसरे म्हणजे इथे पोहणाऱ्यांचा पाण्यात असलेल्या वेलींमुळे खडकांमुळे जीव देखील गेला आहे.
आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. मारुतीच्या घरातील पडवीमध्ये आम्ही सर्वांनी १ च्या सुमारास  मस्त गरम गरम जेवण केले आणि थोडी विश्रान्ती घेऊन गडाचा निरोप घेऊन लगेच २:३० च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली.
फोनची बॅटरी आता संपल्याने फोन बंद करून सपासप पावले टाकून आता पायाला भिंगरी लावल्यासारखे उतरत होतो.ट्रेक संपत आला की पाठीवरची सॅक आपोआप जड वाट्याला लागते पाय जड होतात तसे आमचे झाले होते. गडाच्या शेवटी एका ठिकाणी सरबत बनवून ठेवले होते परंतु तिथे कोणीही नसल्याने आम्ही आमचे सरबत गाळून प्यायलो आणि पैसे काढून ठेवणार तितक्यात सरबतवाले दादा आले त्यांना पैसे दिले. त्यांनी आमचे आमच्या ट्रेकर्सजवळ खूप कौतुक केले असे समजले. साडेतीनच्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचलो आमच्या आधी फक्त ४५ मिनिटांमध्ये पाटील पोहोचले होते. एकामागून एक ट्रेकर्स आले आणि आम्ही लगेच साडेचार वाजता पाचनई गावाचा निरोप घेऊन पुणेकडे रवाना झालो. यावेळी सगळ्याच्या सगळ्या ट्रेकर्सने अन्ताक्षरीमध्ये सहभाग घेतला आणि खूप रंगत आणली हे खूपच कौतुकास्पद होते. एकापेक्षा एक सरस, चढाओढ आणि धमाल आली.  सर्वच ट्रेकर्स अप्रतिम जुगलबंदी होती. सर्वांनी एक लक्षात ठेवा कितीही थकलो तरी अन्ताक्षरीने खूप थकवा जातो. ट्रेक लीडर रोहित आणि नेहमीचे ट्रेकर्स हो किंग फोर्टचा किंग ग्रुपचा किंग ट्रेक मिस केलात तुम्ही.  माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुप चा ८१ वा ट्रेक सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे आणि लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडला. ग्रुप लीडर्सना धन्यवाद. जियो माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे.