Tuesday 23 January 2018

ओढ हरीहरची सुरुवात नव्या वर्षाची...।


हरिहर किल्ला
ठिकाण-नासिक जिल्हा
उंची- ११२० मीटर
चढाई श्रेणी-मध्यम
प्रकार- गिरिदुर्ग
दिनांक- २१ जानेवारी २०१८
हरिहरगड विषयी माहिती- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर  हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे ट्रेकर्स च्या  परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा एका बाजूने त्रिकोणी तर एका बाजूने आयताकृती आकाराचा किल्ला, कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्या बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही.या दगडी जिन्याच्या तो प्रेमात पडला आणि आपण ज्याच्या प्रेमात पडतो त्याला उध्वस्थ करण्याची इच्छा कधीच होत नाही.  यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन म्हणजेच "फोना"या ट्रेकिंग ग्रुपने आतापर्यंत पुणे,रायगड, नगर,ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवरील अनेक गड-किल्ल्यांचे ट्रेकिंग केले आहे. यावेळी आम्हा ट्रेकर्सच्या आग्रहाखातर म्हणा किंवा दूरच्या पाहुण्याला भेटायला जायच्या ओढीने म्हणा देवीदेवतांचे शहर नासिक शहर याठिकाणी ट्रेकिंगची वारी वळवली. नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या हरिहर किल्ल्याचे नाव ऐकताच झटपट ट्रेकिंगसीट बुक झाल्या कारण २ वर्षे झाली आम्ही सर्व  ट्रेकर्स हरिहर किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी आतुर होतो.या वर्षातील हा पहिलाच ट्रेक असल्याने सगळेच ट्रेकर्स उल्हासीत होते. दिनांक २०जानेवारीला शनिवारी रात्री ११च्या दरम्यान आमची बस निगडी-तळेगांव-चाकण-नारायणगाव-नासिक-त्र्यंबक रोड मार्गे निरगुडपाडा या ठीकाणी पहाटे ५ वाजता पोहोचली.प्रवासातच यावेळी फोना ग्रुपच्या नावाच्या निळया रंगाच्या टोप्या वाटप करण्यात आल्या त्यामुळे आमचे चेहरे प्रफुल्लित झाले होते."आज ब्लु है पानी पानी आणि आम्ही आनंदी साऱ्या जणी असे झाले होते.' 

पुणे ते हरिहरकिल्ला हे अंतर सुमारे २४५ कि. मी. इतके आहे.इथे पोहोचण्यास  सुमारे ५ ते साडेपाच तास लागले. पोहोचल्यावर तिथले वातावरण झुंजुमुंजूच होते. त्या १५ ते २० घरांच्या गावात गायी दावणीला बांधलेल्या होत्या. कडाक्याची थंडी आणि धुकेही पसरलेले होते.परंतु ट्रेकिंगसाठी खूप वाहने थांबलेली दिसली त्यामुळे सारे गाव जागेच होते. चहाचा सुगंध येत होता. पोहोचल्यावर आधी शेकोटी पेटवली आणि लगेचच फ्रेश होऊन चहा घेऊन  हलका नास्ता केला. आमच्या अगोदर तिथे बरेच ट्रेकिंग ग्रुप हरिहरची चढाई करण्यास तयारीत होते. लीडर्सने किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती दिली आणि ट्रेकिंग विषयी सूचना करून लगेच ट्रेकला सुरुवात झाली.
सकाळचे वातावरण अतिशय रम्य होते. एकदा का वॉर्म अप झाला की थंडी हळूहळू कमी होते त्यामुळे आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या असलेली सॅक पाठीवर अडकवली आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत निघालो.  हरिहर गडाची उंची पाहून जरा हबकलोच परंतु फोना ट्रेकर्स ४० जणांचा मोठा ग्रुप घेऊन मस्त पैकी मजा मस्ती करीत निघाल्यावर कसली आली भीती आणि धास्ती. त्या ठिकाणी छोटे छोटे पाडे असल्याने आणि भात शेती असल्याने अनेक वाटा शेताकडे विहिरीकडे जात होत्या त्यातून नेमकी पाऊलवाट पकडून आम्ही हरिहरच्या चढावावर येऊ लागलो. सागाच्या वृक्षांची पानांची छाटणी केलेली होती तरीही ती हेअर कट केल्यासारखी देखणी दिसत होती.
उजेड येऊ लागला होता आणि थंडी कमी झाली होती परंतु जसजसे वर जात होतो तसतशी थंडी लागत होतीच. इतरही ट्रेकिंग ग्रुपची जणू जत्राच होती. २ तासांचे अंतर कापून गेल्यावर हरिहरचा तो डोळ्यांचे पारणे फेडणारा दगडात कोरलेला जिना समोर येऊन स्वागताला जणू उभा होता. एक ग्रुप उतरत असताना दुसरा मोठा ग्रुप चढाई करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तिथे मनसोक्त फोटोग्राफी केली. गडाच्या उजव्या बाजूला वैतरणा धरणाचा जलाशय आणि सर्वत्र पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगा डोळ्यांना सुखवीत होत्या.
हरिहरगडचा तो दगडी प्रशस्त जिना एखाद्या पहाडी मित्रासारखा आमची वाट पाहत आमच्या स्वागतासाठी आपले बाहू पसरून उभा होता. "आ जावो मुझमें  समाँ जावो" असा म्हणत होता जणू. जितके त्याला न्याहाळत होतो तितके त्याचे सौंदर्य खुलून दिसत होते. एक ग्रुप पुढे गेल्यानंतर आम्ही चढाईस सुरुवात केली. कॅमेरा मोबाईल सगळं आवरून सॅक मध्ये टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्या जिन्याच्या पायऱ्यांना पकडण्यासाठी खोबण्या केलेल्या होत्या. परंतु चढाई करताना मागे पहिले की डोळे गरगर फिरत होते. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. आम्ही एकामागून एक हळूहळू त्या पायऱ्या चढत होतो.
९० पायऱ्यांचा जिना चढल्यावर ती भगवी सुंदर कमान ओलांडून एक टप्पा पार केला आणि मागून येणाऱ्या ट्रेकर्सची रांग न्याहाळत राहिलो. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वाराशेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल.  या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर  एक नेढे दिसते. 


त्यानंतर परत साधारण ३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी  आम्हाला दिसला.

 
एक मोठा रॉक प्याच पार करून प्रतीक आणि दिगूच्या मार्गदर्शनाखाली सावल्यांच्या खेळाची वेगळी फोटोग्राफी केली. दिनेश सरांच्या डी एस एल आर ने खूप छान सोबत केली.या ठिकाणाहून वैतरणाचा जलाशय आणि गडाच्या पायथ्याची गावे एखाद्या  चित्राप्रमाणे भासत होती. 
पुढच्या पायवाटेने निघालो तेव्हा उजव्या हातास ३०ते ४० फूट उंचीची एक कोणतीही लोखंडी रेलिंग नसलेली एक टेकडी आम्हाला दिसली. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी शेवटचा कातळटप्पा चढून पार करावी लागते.आम्ही त्या टेकडीला बालेकिल्ला म्हणालो. कलावंतीण गडाची देखील वरच्या माथ्याची अगदी अशीच रचना आहे. त्या बालेकिल्ल्यावर इतर ग्रुपची प्रचंड गर्दी होती त्यामुळे आम्ही पूर्वेकडील समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत गेलो मी आत उतरून प्रवेश केला तिथे खूपच अंधार होता. कोपऱ्यात एक दिवा होता यावरून तेलाचा दिवा रात्री तिथे लावीत असावेत.  प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. कोठारातून बाहेर आल्यावर आम्ही ब्रह्मा आणि ब्रह्मगिरी मनसोक्त न्याहाळला आणि बालेकिल्ल्याकडे निघालो.
बालेकिल्ल्यावरून २ ग्रुप उतरल्यानंतर आमचा ग्रुप झपाझप वर माथ्यावर जाऊन पोहोचला. कसलाही आधार न घेता चढणे तसे कठीणच आहे परंतु फोना असल्यावर कसली भीती आणि भय. बघता बघता आमच्यातले काही ट्रेकर्स आमच्यापुढे माथ्यावर पोहोचलेले पाहून मला खूप कौतुक वाटले. कीप इट अप ट्रेकर्स. 
येथे माथ्यावर पोहोचताच  या टेकडीच्या माथ्यावरून सभोवतालचे दृश्य मात्र अप्रतिम दिसते. इतर ट्रेकिंग ग्रुपची तिथल्या गडांविषयीची चर्चा मी ऐकत होते. गडाच्या डावीकडे नजर फेकताच वाघेरा तर  उंजवीकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. एकीकडे कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.

एकामागोमाग एक फोना टीमचे सगळे ट्रेकर्स हरिहरच्या माथ्यावर पोहोचले आणि एकच जल्लोष झाला. फक्त या सगळ्यात उंच भागावर लोखंडी रेलिंग नसल्याने अतिशय सावधगिरीने वावरलेले चांगले. फोना बॅनर फोटो आणि सोलो फोटोग्राफी  करून प्रतीकने भगव्यासोबत शिवगर्जना करून गड दणाणून सोडला होता. उतरताना नुसता कात्रज ते सिह्गडच्या ट्रेकसारखा घसारा होत होता.हरिहरच्या पूर्ण पठारावर खूप ट्रेकर्स मावळ्याप्रमाणे  भासत होते.
यावेळी थ्रिल्लिंग ट्रेक असूनदेखील मुलींची संख्या जास्त असल्याने खूप छान वाटत होते.  १२ च्या सुमारास हरिहर गड उतरण्यास सुरु केले पोटात मात्र आता कावळे नाही तर डोमकावळे ओरडायला लागले होते इतकी भूक लागली होती. गड उतरताना तर खरी कसरत करावी लागली. चढाई करताना त्या पायऱ्या चढणे थोडे तरी सोपे वाटत होते परंतु उरताना मात्र उलटे वळून उतरावे लागत होते. जरा अंदाज चुकला तर दरीत पडण्याचा संभव होताच. परंतु योग्य अंतर ठेवून एकमेकांच्या सोबतीने पायर्यांचा अंदाज घेऊन उतरले गेल्याने ती गोष्ट देखील जरा सोपी जाऊ लागली. जस जसे खाली उतरू लागलो तसतसे हायसे वाटू लागले. आता ९० पायऱ्यांचा पाषाणी जिना चढताना खरी कसरत करावी लागली पाय थोडे लटपटत होते पण एकमेका साहाय्य करू एवढे धरू सुपंथ. एकमेकांचे पाय मात्र धरू नये नाहीतर एका रांगेत सगळे ट्रेकर्स खाली सरकण्यास वेळ लागणार नाही.
जाताना ३ ते साडेतीन तास लागले परंतु उतरताना मात्र २ ते सव्वादोन तासातच आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्ही ५-७ ट्रेकर्स थोडा १ कि. मी चा जास्तीचा फेरा मारून निर्गुडीपाडा मध्ये पोहोचलो. गडावरील पाण्याचा तलाव आणि पाण्याचे टाके स्वच्छ होते. परंतु काही ठिकाणी चॉकलेट्सच्या रॅपर्सचा कचरा होता तो येताना प्रतीक गोळा करून घेऊन आला.कीप इट अप प्रतीक. 

तेथील खेडेगावात आल्यावर तिथे एका घरात जातानाच साध्या जेवणाची सोय केली होती परंतु ते जेवण अपेक्षेपेक्षा अतिशय उत्तम होते. वाखाणण्याजोगे होते. जेवण आटोपल्यावर लगेच पुण्याच्या दिशेने निघालो. हरिहरचा निरोप घेताना जरा मन जड झाले होते. वेळेअभावी येताना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वळता आले नाही तेथील सगळे गड एका माळेत मणी ओवावेत तसे एकसारखे माळेप्रमाणे भासत होते.बसमधून तेथील सातमाळाचे उत्तम दर्शन झाले.
शेवाळकर सरांचा वाढदिवस असल्याने "फिरसे कहो कहते रहो"  या गाण्याने अन्ताक्षरीला चार चाँद लगा दिए.सगळ्यांनीच अन्ताक्षरीमध्ये उत्तम सहभाग घेऊन रंगत आणली. फोनाचा ७९ वा ट्रेक लीडर्स आणि सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे बेस्टम बेस्ट रीतीने पार पडला. फोना रॉक्स.