Monday 17 October 2016

"कलावंतीणगड ट्रेक"एक अविस्मरणीय अनुभव..

कलावंतीण दुर्ग ट्रेक
ठिकाण- रायगड जिल्हा
उंची- २३०० फूट
चढाई श्रेणी- कठीण
दिनांक-१६ ऑक्टोबर २०१६.

गडाची माहिती आणि इतिहास-रायगड जिल्ह्यात पनवेल पासून १५ कि. मी.अंतरावर माथेरानच्या डोंगर रांगेत कलावंतीण हा गड आहे  मुंबई पुणे महामार्गावरून जाताना डाव्या बाजूला आपणास एक डोंगररंग दिसते या डोंगर रांगेत अनेक किल्ले आपल्याला खुणावत असतात पण  "प्रबळगड" आणि "कलावंतीण सुळका" हे दोन जोड किल्ले आपले खास लक्ष वेधून घेणारे आहेत. प्रबळगड त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आहे. तसेच गडाचा पसारा देखील विस्तीर्ण आहे. इतिहासात कलावंतीण दुर्ग नावाने नोंद असणारा हा बुरुज समुद्र सपाटीपासून २३०० फुट उंचीवर आहे. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये हा किल्ला घेतला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये याचाही समावेश होता. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व देखील आहे. कलावंतीण या नावाचा अर्थ "नर्तिका" होतो. मूळ अर्थ कला सदर करणारी. पण सर्रास पणे नर्तिकेसाठी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे असे समजले जाते की इथे एका नर्तिकेचे वास्तव्य होते ज्यामुळे यास "कलावंतीण" हे नाव पडले. तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की  एका राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीच्या नावाने हा किल्ला बांधला असावा.
कलावंतीण गडाच्या नावामुळे आणि प्रबळगडावरून घेतलेल्या छायाचित्रांमुळे कलावंतीण गड मला नेहमी आवडत असे. आज प्रत्यक्ष तिथे मी जाणार म्हटल्यावर मनातून मी जास्त खुश होते. 

फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन(फोना) चा ६८ वा कलावंतीण गड ट्रेक दि.१६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आम्ही पूर्ण केला. मागच्या वेळेस "फोना"चा प्रबळगड ट्रेक माझ्याकडून मिस झाला होता त्यामुळे कलावंतीण गड मिस नाही करायचा असे ठरवले होते. परंतु १५ दिवसात ट्रेक करणे म्हणजे माझ्यासाठी जरा अवघड होते कारण मी सुद्धा माणूसच आहे. महिन्यातला एक ट्रेक म्हणजे माझ्यासाठी खूप झाला. परंतु एकदा ट्रेक ला गेले की कितीही असह्य झाले तरी फोनासोबत ट्रेक असला की माघार घेणे नाही मी तो पूर्ण करतेच आणि  "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ." ह्या म्हणीनुसार गड चढताना कितीही कठीण टप्पा आला तरी एकमेकांच्या मदतीने ट्रेक पूर्ण होतोच होतो. मी ट्रेक करते म्हणजे मी काय फार मोट्ठी ट्रेकर नाही आणि ब्लॉग लिहिते म्हणजे मी काय खूप मोट्ठी लेखिका नाही. एक ट्रेक केला आणि  ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि एक ब्लॉग लिहिला आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे सगळ्यांनी एक ब्रीदवाक्य लक्ष ठेवा "कोणालाही कोणत्याही वयात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये." आवड असली की सवड आपोआप मिळते. 
सकाळी ६:३० ला निघालेली आमची बस "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट" आणि अजून अश्या कितीतरी गाण्याच्या सुरात, नादात १० वाजता गडाच्या पायथ्याशी केव्हा पोहोचली तेदेखील समजले नाही. गडाच्या पायथ्याशी बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. इथे जाण्याआधी कलावंतीण गडाचे फोटोज पाहिले होते ते दृश्य तिथून तरी दिसत नव्हते.


सुरुवातीला थोडेसे चालल्यावर आम्ही काहींनी शॉर्ट कट चा रास्ता निवडला सॉलिड दमछाक झाली. मला तर असे वाटले की मी आजचा ट्रेक पूर्ण करूच शकणार नाही. खरे कारण होते दमट वातावरण आणि गडाचा चढ जास्त होता. सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आम्हाला वाटले की गडाच्या शेंड्यावर एवढे ऊन नसेल परंतु तसे काही घडले नाही. जाईसतोवर ज्याला चरबी नाही त्याची सुद्धा चरबी वितळली असेल. 


परंतु सोबत्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने पुन्हा चढाई सुरु ठेवली  दीड तासांनंतर पहिली १० मिनिटांची विश्रांती झाली आणि खडकावर उंच हवेत फोटो काढल्याने आणि लिंबू सरबत प्यायल्याने पुन्हा उत्साह आला. थोड्या वेळाने मात्र कलावंतीण आणि प्रबळगड दिसू लागले. परंतु दोन्ही गड आपल्या अंगावर येत आहेत की काय असे भासत होते.



इथे दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती रेखीव दिसत होती. 


आधी असे ठरले की या ठिकाणी जेवण करून थोडी विश्रांती घ्यावी आणि मग चढाई सुरु करावी परंतु जेवल्यावर गड चढणे जाम जीवावर येते आणि एकदाचा कलावंतीण गड फत्ते करावा आणि मगच काळजाला ठंडक मिळेल असे वाटले. माची प्रबळ या तिथल्या आदिवासी लोकांच्या वस्तीतील गावातून अर्ध्या-पाऊण तासात प्रबळगड आणि कलावंतीण गड च्या खिंडीत आम्ही पोहोचलो. तिथून खाली पाहिले की विश्वास बसत नव्हता की आम्ही त्या व्ही आकाराच्या खिंडीमध्ये आलोय. तिथून मात्र कलावंतीण चा शेवटचा टप्पा अतिशय कठीण दिसत होता.




संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या (होळीच्या)सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. गडाच्या माचीवर आदिवासी लोकांची वस्ती आहे. कलावंतीण गडाच्या पायऱ्या पाषाणात कोरलेल्या दिसत होत्या आणि धरायला आधाराला काहीही  नव्हते. दुपारचे ऊन म्हणते मी. तरीही पुन्हा चढाई सुरु केली. भर उन्हात सपसप सपसप एखाद्या सापासारखे चढत राहिलो. कलावंतीण च्या वरच्या टोकाला रोप लावून चढावे लागले. यावेळी तो थरार देखील अनुभवला. आम्ही दुपारी १:३० वाजता गडावर पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून सगळा शीण निघून गेला. कलावंतीण गडाचा आकार किंचित त्रिकोणी आहे. गडावरून सभोवताली माथेरान,चांदेरी,इर्शाळगड,कर्नाळा गड दिसतात. मग काय विचारू नकात. गडाच्या सगळ्या बाजूने फोटोग्राफी केली. गृप फोटोज काढले एकमेकांचे फोटोज काढले. एक हात से फोटो दे एक हात से फोटो ले. अश्या गमती-जमती सुद्धा झाल्या.


गडाच्या शेंड्यावर शिवाजी राजेंच्या घोषणा केल्या तेव्हा समोरच्या खिंडीमध्ये त्या घोषणांची गुंज कानाला अतिशय सुमधुर वाटत होती. वरून उन्हाचे चटके मात्र असे लागत होते की ही टॅन झालेली स्किन आता २-३ महिन्यांनीच पुनःपदावर येईल असे वाटते. आता मात्र पोटामध्ये कावळे ओरडण्यास सुरुवात झाली. परंतु गडावर ३२ लोकांना बसायला एकही झाड नव्हते त्यामुळे पुन्हा ३ वाजता कलावंतीण गड उतराई सुरु केली. गडाच्या मध्याशी माची प्रबळ ह्या छोट्या गावाजवळ एका ठिकाणी ट्रेकर्स साठी बसण्यासाठी जागा होती तिथेच आम्ही जेवण केले. थोडी विश्रांती करून सूर्यास्त मिळाला तर बरे होईल असा विचार करून तिथल्या पठारावरच "फोना"सोबत आलेल्या सगळ्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली तिथेच सूर्यास्तासोबत चहा घेतला आणि फोनाच्या इतर कार्याची सुद्धा माहिती दिली आणि गड उतरण्यास सुरु केले.शेवटी इतका अंधार झाला की पायाखालची जमीन काही दिसेना झाले होते. रात्री ७-३० पर्यंत सगळे मेम्बर्स बसच्या ठिकाणी जमा झाले आमची बस पुण्याकडे रवाना झाली.  सुमारे १३ कि.मी.चा कठीण चढाईचा कलावंतीण ट्रेक चा थरार अनुभवला. ट्रेक लीडर मंदार सर, मनोज सर, विवेक सर, आणि निकाळजे सर यांनी गडावर लई थंडगार हवा आहे याचे जणू आमिष दाखवून आम्हा सर्व मेंबर्सना ट्रेक पूर्ण करण्यास मदत केली. ट्रेक पूर्ण केल्याच्या समाधानाने रात्री १०:३० वाजता घर गाठले.




Tuesday 4 October 2016

"भरारी"

सैराट



सैराटहा मराठी चित्रपटावर जेव्हा प्रदर्शित झाला मला तो चित्रपट मनापासून आवडला. त्यामागची कारणे अनेक आहेत. त्यावेळीच मला त्या चित्रपटाविषयी थोडंसं काहीतरी चांगले लिहावे असे वाटले होते परंतु माझ्याकडून राहून गेले. अजूनही या चित्रपटाची जादू कायम आहे त्यामुळे मी एक प्रेक्षक म्हणून आज जरी मी लिहिले तरी वावगे ठरणार नाही असे मला वाटते.


सैराटहा मराठी चित्रपट दिनांक २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. सैराट च्या गाण्यांची जाहिरात दूरदर्शन वर मी पहात असे त्यावेळी मला वाटायचे की हा सिनेमा सुपरडुपर हिट होईल आणि सुपरडुपर हिट झालाच. मला अश्या चांगल्या वाटणाऱ्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी सिनेमागृहात जावे असे नेहमीच वाटते परंतु सैराट ज्या दिवशी प्रदर्शित होणार होता त्यादिवशीचे सिनेमागृहाचे तिकीट मला मिळेल की नाही यात शंकाच होती. सिनेमागृहाचे सैराटचे शो हाऊस फुल्ल होते. तरीही माझं नशीब कधीकधी साथ देते म्हणा. अगदीच पहिला दिवस आणि पहिल्या शो ची तिकिटे नाही मिळाली परंतु पहिल्या दिवशीच्या शो ची तिकिटे मिळाली ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती.सिनेमागृह कुठले ते मात्र विचारू नका. सिनेमा ला गेले सिनेमा खूप आवडला सिनेमाने सिनेमागृह दणाणून सोडले होते. सगळे झिंगूनच बाहेर पडले. 

सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आहेत. संगीत दिग्दर्शक माझे आवडते अजय-अतुल ह्यांची गाणी अफलातून, मन मोहवून टाकणारी, याड लावणारी आणि ठेका धरून नाचायला लावणारीच आहेत.नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली.चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.  सैराट हा मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. चित्रीकरणासाठी मंजुळे सरांनी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड केली. हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कलकत्ता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला .यातले कलाकार म्हणजे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ह्या नव्या जोडीने आणि तानाजी गालगुंडे,अरबाज शेख पहिल्याच सिनेमात उत्तम अभिनय केला आहे. आहेच शिवाय नागराज मंजुळेदेखील कलाकार म्हणून दिसतात. अजून  इतर कलाकारांसोबत माझे ट्रेकचे फ्रेंड्स देखील आहेत. पूजा डोळस, मिथुनचंद्र चौधरी हे कलाकार आहेत. ते दोघे ह्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक देखील आहेत. आम्ही वासोटा किल्ला ट्रेक, कातळधारा ट्रेक, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चा ट्रेक असे २-३ ट्रेक सोबत केले आहेत आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे. ही दिग्दर्शक, कलाकार मंडळी अतिशय टॅलेंटेड आहे पण तरीही माणूस म्हणून खूप साधी आणि प्रेमळ आहेत. पुन्हा कधी सोबत ट्रेक होईल तेव्हा मी त्यांच्यासोबत नक्की सेल्फी फोटो काढणार.मंजुळे सर सुद्धा खूप अगोदर फोना च्या ट्रेक ला येत असत परंतु तेव्हा मी ट्रेक नव्हते करत. शिवाय पूजा डोळस यांचा भाऊ अभिषेक डोळस आणि श्वेता अभिषेक ही जोडी सिंगापुर ला राहतात. हे देखील २ ट्रेकला सोबत होते. सिंगापूर ला राहतात पण पुण्यात आले की नक्की सह्याद्रीच्या रांगेत ट्रेक ला येतात. एकदा ट्रेकला सिंगापूर च्या खूप छान छान गोष्टी सांगत होते. मी ऐकलंय श्वेता आणि अभिषेक डोळस ही सिंगापूरची जोडी पुण्यात आलीये. त्यामुळे एखादा ट्रेक सोबत झाला तरी आम्हाला आवडेल.  मी कधी जाईन तेव्हा जाईन परदेशात. आमच्या वतीने आमचे मित्रमंडळीच परदेशी वाऱ्या करून येतात आणि तिथले अनुभव, गंमती-जमती सांगतात. परंतु आपल्या भारतापेक्षा इतर काही देशात स्वच्छता विषयक नियम आणि इतर नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जाते. आपणदेखील ही अशी शिस्त बाळगली तर वाह क्या बात है.. पण तरीही माझा भारतच सुजलाम सुफलाम आहे आणि मला प्यारा आहे. अनेक जाती-धर्म, अनेक भाषा, अनेक वेशभूषा तरीही अजून टिकून आहे. आणि त्यात सह्याद्री सारखा निसर्ग आहे की ज्यामध्ये आम्ही सध्या ट्रेकिंगचा आनंद घेतोय. हिमालयात जाईन तेव्हा जाईन पण अजून माझ्या महाराष्ट्रातले किल्ले तरी पूर्ण होऊ देत.  ट्रेक म्हंटले की मला दुसऱ्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो.   


तर मी सैराट विषयी बोलत होते. सगळ्याच कलाकारांचा अभिनय खूप छान झाला आहे. आता गं बया बावरलं”, “सैराट झालं जी’, “याड लागलं”, “झिंगाट”, ही गाणी अप्रतिम आणि तालसुरातील आहेत. मी तर जेव्हा ही गाणी आली असतील तेव्हापासून फोन मध्ये डाऊन लोड करून घेतली आहेत.  परवा  दांडियाच्या ठिकाणी प्रभाचा ग्रुप डान्स होता तिथेही  सैराट च्या गाण्यावर दीड वर्षाच्या मुलासहित ६-७ जणांनी नाच केला. लग्नाची मिरवणूक असो,गणपती बाप्पाची मिरवणूक असो की देवीची मिरवणूक असो सैराट च्या गाण्याची जादू कायम आहे. या सिनेमातील नवख्या कलाकारांचे आयुष्यच बदलून गेले आहे. जगाच्या इतिहासात सिनेमाच्याजगात सैराट चे नाव कायमचे कोरले गेले आहे. आजही सैराट सिनेमाची नशा तशीच आहे. सैराट मधले बरेच कलाकार सोलापूरचे असल्याने माझ्या आजूबाजूचे सोलापूरकर तर हवेत होते आणि अजूनही आहेत. आणि शिवाय चित्रीकरणदेखील सोलापूर मधेच झाल्याने सॉलिड भाव खातात सोलापूरकर. अर्थात ज्याला त्याला आपल्या मायभूमीच्या मित्रांचा अभिमान असतोच तसेच मलाही आहे. मी पण वेळोवेळी जाम भाव खाल्ला.  सैराट चे कलाकार पूजा डोळस आणि मिथुनचंद्र चौधरी हे माझे ट्रेक मधले अतिशय जवळचे फ्रेंड्स आहेत. नागराज सरांना मी प्रत्यक्ष कधी भेटले नाही परंतु जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा ते फोना सोबत ट्रेकिंग ला येत होते.खरोखर मला माझ्या सर्व मित्रमंडळींचा खूप जास्त आदर आणि अभिमान आहेच.
माझ्या वॉट्स अँप प्रोफाइल चे नाव सुद्धा मी सैराट ठेवले आहे.
"सैराट" ही निरागस प्रेमाची कथा आहे. सैराट म्हणजे कोणतेही बंधन न मानता मनमोकळे जगणे, वावरणे. सैराट ची  कथा, गीते, संगीत, कलाकारांचा अभिनयसगळॆच उत्तम आहे. सैराट चे डायलॉग तर सतत वॉट्स अँप वॉर चालू होते. "मराठीत सांगितलेले कळत नाही का इंग्लिशमध्ये सांगू का?"आजही लहान- थोरांच्या तोंडून सैराटचे डायलॉग ऐकतो आपण. सैराट चा शेवट मन हेलावणारा आहे. त्यावर अनेकांनी विचार मांडले. परंतु हा सिनेमा आहे. एखाद्या दिग्दर्शकाला त्यावेळी जे सुचले ते त्याने केले. अहो असं काय करता सिनेमा जगप्रसिद्ध झाला. आता  सिनेमाचा शेवट काय घेऊन बसलाय? काहींनी दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात डोकावून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला बातमीपत्रात अनेक बातम्या वाचायला मिळत होत्या. परंतु कोणाचे खाजगी आयुष्य आणि सिनेमा याचा एकमेकांशी संबंध जोडू नये असे मला वाटते. एखाद्या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकाला असे प्रश्न सहसा केले जात नाहीत. पण  साधा माणूस दिसला प्रसिद्धीच्या झोतात येताना दिसला की त्याला खाली कसा आणण्याचा हे लगेच लोकांना समजते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री नंतर सैराट च्या यशामागे सिनेमाच्या दिग्दर्शकांची कलाकारांची आणि सगळ्यांचीच काय मेहनत असते ते त्यांचे त्यांनाच माहिती. या विषयात आपण प्रेक्षकांनी न पडलेले बरे असे माझे मत आहे. शाळेत एखादा नाच किंवा छोटे नाटक बसवायचे असेल तरी काय ढोर मेहेनत घ्यावी लागते ते मला स्वतःला माहित आहे. सिनेमा बनवणे आणि तो जगप्रसिद्ध होणे ही खूप मोठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

"सैराट" चित्रपटाच्या गाण्यांमधून 'झिंगाट' नृत्य करणाऱ्या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची वेगळी परिभाषा सांगू पाहणाऱ्या या सिनेमातील नायक नायिकेने प्रेक्षकांना याड लावलंयच शिवाय या चित्रपटात आणखी काही जमेच्या बाजू आहेत. जगभर गाजलेला फॅन्ड्री हा चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. अजय-अतुल या प्रतिभावंतांनी या सिनेमाला दिलेलं संगीत ही जमेची बाजू आहे.  बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ मध्ये सहभागी झालेला एकमेव मराठी चित्रपट आहे. बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट आहे. हॉलीवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला 'सैराट' हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट ठरलाय.रिंकू राजगुरु या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अकलूजच्या (सोलापूर) मुलीने  पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाआहे. हा सिनेमा जगप्रसिद्ध होण्यास अशी एक ना अनेक कारणे आहेत.

पिस्तुल्या”, “फँड्रीआणि आता सैराट'’या तीनही चित्रपटासाठी अनुक्रमे सुरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारे कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे हे आहेत. नवख्या गावच्या पोरांना(की ज्यांना अभिनयाचे काहीही ज्ञान नव्हते ) घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख मंजुळे यांनी बनवली आहे.  खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारे ,सामाजिक भान असणारे,जातीपातीच्या विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारे  दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आहेत. या सिनेमाची प्रदर्शित झालेली गाणी दर्जेदार व प्रेक्षकांची मनं जिंकणारी आहेत.  आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला अगदी साजेसा असा देखणा नायक आहे. एकाच त्याच त्याच अपेक्षांच्या  साच्यात बसवलेल्या आपल्या प्रेक्षकांना  नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा चित्रपट ठरला आहे. 
सिनेमा गृहात सिनेमा पाहताना पूजा मॅडम, मिथुन सर, आणि मंजुळे सर पडद्यावर दिसले की मी हाताचा शंख करून ओरडून दाद देत असे. आपली माणसे प्रत्यक्ष पडद्यावर पहाताना अभिमानाने उर भरून येतो. सैराट सिनेमा पाहणारी प्रत्येक व्यक्ती गाण्यावर नाच करायला जागेवरून उठून त्या स्क्रिन जवळ जाऊन नाचत होती. सैराटमय झाले होते सगळे. झी मराठीच्या हवा येऊ द्या या कार्यक्रमात सैराट ची टीम आल्यावर आम्ही टीव्ही समोर बसून सगळे संवाद ऐकून सैराट ची जादू अनुभवत असायचो. सैराट सिनेमा टीव्ही वर आला तरी सैराट ची जादू यत्किंचितही कमी झालेली नाही.  सैराट विषयी जेवढे चांगले बोलावे तेवढे कमीच आहे.
मला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा गर्व नाही तर माज आहे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी मातीचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा अभिमान असलाच पाहिजे. सैराट सारखे असे अनेक उत्तमोत्तम मराठी सिनेमे तुमच्याकडून बनू देत आणि जगप्रसिद्ध होऊ देत. "सैराट"च्या सर्व टीम ला पुढील  वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.