Tuesday 27 August 2019

कृष्ण सुदामा भेट ट्रेक"



"कृष्ण सुदामा भेट ट्रेक"
कातळधारा ट्रेक
दिनांक -२५ ऑगस्ट २०१९
चढाई श्रेणी --मध्यम कठीण
ठिकाण लोणावळा

आपल्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात निगडीहून बिनाट्राफिक कातळधारा या ठिकाणी जायला दीड ते तास लागतात.लोणावळा म्हणजे थंड हवेचे सगळ्यांचे आवडते पर्यटनस्थळ आहे तसेच चिक्कीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे हे काही  कोणाला सांगायला नको.तसेच ट्रेकिंग, रॅपलिंग, क्लाइंबिंगसाठी ट्रेकर्सना आवडतील अशी भरपूर ठिकाणे येथे आहेत.लोणावळा डोंगररांगेतील ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जाणारा राजमाची किल्ला लोणावळा येथून सुमारे १६ कि.मी अंतरावर आहे.खंडाळा घाटातून एकाला एक लागून दिसणारी दोन शिखरे श्रीवर्धन आणि मनरंजन  म्हणजे राजमाची किल्ला होय.आज आम्ही राजमाचीच्याच वाटेवरून रस्ता असणाऱ्या कातळधारा या ठीकाणी जाणार होतो.लोणावळा येथून सुमारे ते कि.मी.अंतरावर राजमाची किल्याच्या वाटेवर कातळधारा हे ठिकाण आहे.  कातळधारा म्हणजे उल्हासव्हॅलीच्या खोऱ्यात सर्वात उंचावरून सुमारे ३५० फुटांवरून कोसळणारा मोठा धबधबा आहे या ठिकाणी  ट्रेकिंग ग्रुप रॅपलिंग देखील करतात.  धबधब्याखाली गुहा आहेत. एक छोटी एक मोठी. जुलै ऑगस्ट मध्ये धुव्वाधार पावसात  त्या अवाढव्य कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाखालून जे ट्रेकर्स त्या गुहेपर्यंत जाऊन सुरक्षित परत येतात त्यात खरे सुख आहे. हे सुख अनुभवण्यास आज माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणे सज्ज होता. दिनांक २५ ऑगस्ट २०१९ या दिवशी माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणे यांचा ९९ वा ट्रेक आयोजित केला होता. मागच्या महिन्यातील मढेघाटचा चिनीमिनी ट्रेक असल्याने मी जाण्याचे टाळले. परंतु असा जर प्रत्येक महिन्याचा ट्रेक मी मिस केला की आयुष्याचा खरा आनंद लुटायचा राहून जाईल असा माझा स्वतःचा एक खास नियम आहे. धुव्वाधार मढेघाट ट्रेकनंतर कातळधारा ट्रेक म्हणजे आम्हा ट्रेकर्ससाठी लॉटरी लागल्यासारखे असते.माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणे चा  ९९ वा कातळधारा ट्रेकचा दिवस उजाडला. आमच्या ५० आणि ३२ सीटरच्या दोन बस सकाळी साडेसहाच्या दरम्यान निगडी-तळेगांव मार्गे लोणावळ्यातून कातळधाराच्या वाटेने निघाल्या.  प्रवासाचा कमी वेळ असल्याने बसमध्ये इडलीचा नास्ता करून आम्ही वेळ वाया घालवता अंताक्षरी सुरु करून धमाल करत करत नऊच्या सुमारास लोणावळा डोंगररांगेत पोहोचलो.३२ सीटरची बस बंद पडल्याने दुसरी यायला थोडा उशीर झाला त्यामुळे आम्ही तोपर्यंत तेथील एकमेव असलेल्या टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन जवळच्या कड्यावरून  वरून पडत असलेल्या आणि जय वाघुळदे यांनी त्या दिवशीच त्या धारेचे नामःकरण केलेल्या एका पातळधारेजवळ  मस्तीवाली फोटोग्राफी केली.
आणि दुसरी बस आल्यावर लिडरनी ट्रेकविषयीच्या सूचना द्यायला सुरुवात केली. मी आपली नेहमीप्रमाणे फोटोग्राफी केली आणि फोन बंद करून खिशात ठेवला.. कातळधाराकडे जाणारा रास्ता पुढे राजमाचीला देखील जातो. त्यामुळे राजमाचीकडे छोटी वाहने त्याच रस्त्याने जातात आणि ट्रेकर्सची गर्दी असल्याने गाडीचे हॉर्न कर्कश्श वाजवातच जातात. परंतु एक ऍक्टिवा कर्कश्श हॉर्न वाजवता आपली स्वतःच्या आवाजात चालली होती. रस्त्यावरून थोडे बाजूला व्हावे म्हणून मी नकळत  वळून पहिले आणि मी क्षणाचाही विलंब करता त्या ऍक्टिवाला दोन्ही हातानी हॅलो केले जणू लिफ्टच मागितली तर ती ऍक्टिवा  चक्क थांबली. त्या ऍक्टिवावर दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या ओळखीच्या दोन ग्रेट व्यक्ती होत्या. एरवी कायम कामात बिझी असलेले परंतु रविवारी मित्रांसोबत सहज फिरायला निघालेले साध्या वेशातील योगेश उंब्रे आणि रोहित वर्तक हे होते मी सगळ्यात आधी माझा बंद केलेला फोन चालूं करून आमचे तिघांचे खूप सारे सेल्फी घेतले.
नंतर डोक्यात विचार आला की या ग्रेट व्यक्तींना असं कसं जाऊ देऊ ??
योगेश उंबरे हे एक रॉक क्लायम्बर ऍथलेट स्लॅकलाइनर शिवदुर्गमित्र लोणावळा, शिवदुर्ग क्लायंबिंग टीम कोच आणि रेस्क्युअर शिवाय स्वतःचा जॉब सांभाळून बारा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच रोहित वर्तक हे एक रॉक क्लायंबर, भारताचे पहिले हायलायनर,रेस्क्युअर शिवदुर्ग मित्र लोणावळा, शिवाय स्वतःचा जॉब सांभाळून तेरा वर्षांपासून क्लाइंबिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पावसात पाण्यात,पुरात अडकलेल्या माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील वाचवणारे, किंबहुना जीवदान देणारे देवदूतच आहेत ते. रात्री-बेरात्री, वेळी-अवेळी दऱ्याखोऱ्यात अडकलेले रस्ता चुकलेले ट्रेकर्स पर्यटक यांना तर ते मदत करतातच परंतु दरीत पडलेले मृतदेह, काही वेळेस कुजलेले मृतदेह मेडिकेटेड करून,स्वच्छ करून कित्येक  हजार फुटांवरून वर आणणे आणि पोलिसांच्या मदतीने ते ताब्यात देणे असे कठीण आणि निस्वार्थी कार्य ते करत आहे.कोणत्याही मोबदल्याशिवाय शिवदुर्ग टीम हे कार्य करत आहेत त्यांच्या या महान कार्याला माझा आणि माझ्या टीमचा सलाम.  हॅट्स ऑफ  योगी, रोहित आणि  शिवदुर्ग टीम 
.
मला इतका आनंद झाला होता की तो केव्हाही मी शब्दात सांगू शकणार नाही.माधुरी दीक्षित एक कलाकारा म्हणून माझी फेवरेट आहे तिला भेटल्यावर जसा आनंद होईल त्याहून कैक पटीने जास्त आनंद मला या ग्रेट टीमला अचानक भेटल्याचा झाला. मी लगेचच या टीमची माहिती आमचे लीडर राणे सर यांना दिली. आमच्या पूर्ण टीमला ह्या टीमच्या कार्याची माहिती दिली त्यांचे स्वागत आणि कौतुक करून या सेलिब्रेटींसोबत मी आणि सगळ्यांनीच मनसोक्त फोटोग्राफी केली.
माझे तर हृदयाचे ठोकेच वाढले होते. माझ्या बकेटलीस्ट मध्ये सगळ्यात शेवटी असलेली ख्वाईश अचानक आणि खूप लवकर पूर्ण झाली होती किंबहुना ही ख्वाईश कधी पूर्ण होईल की नाही याची पण खात्री नव्हती. खूप हुशार असून उच्च प्रकारचे उत्तम कार्य करत असून ज्यांचे पाय जमिनीवरच आहेत असे शिवदुर्ग टीमचे शिलेदार मित्र हो, योगेश आणि रोहित आपल्या अमूल्य वेळेतील थोड़ा वेळ आमच्यासारख्या फॅन साठी दिलात मनापासून धन्यवाद. मला तर कृष्ण सुदामाची भेट झाल्यासारखे वाटले. मी गरीब सुदामा आणि तुम्ही कृष्ण आजचा माझा ब्लॉग मी तुम्हाला समर्पित करतेय. आज आमचे अनेक विषयांचे अफाट ज्ञान असणारे लीडर प्रोफेसर रोहितसर हवे होते त्यांनी तुमचे अगदी समर्पक आणि तुफानी कौतुक केले असते. तुम्हाला  लवकर सोडलेच नसते आणि अजून जास्त धमाल आली असती. 
कुठे तरी दर्या खोऱ्यात भेटू असे वाटले होते आणि अगदी तसेच घडले. मी तर त्या दिवशी सातवे आसमाँ पे होते. अगदी १५ मिनिटांची कृष्ण-सुदामाची भेट माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील अवघ्या १५ मिनिटामध्ये इतक सारं भारी घडून आम्ही धन्य झालो.
ट्रेकविषयीच्या सूचना पूर्ण करून आम्ही पावणेदहाच्या सुमारास ट्रेक सुरु केला. एक किमी चालून गेल्यावर आमचे लीडर मंदार थरवळ यांच्या आवारात मिळालेली धामण आमच्या ग्रुपचेच सर्पमित्र संजय निकाळजे यांनी बरणीत भरून आणली होती त्या बिनविषारी सापांविषयी सर्व टीमला माहिती देऊन त्या सापाला मुक्त वातावरणात विहार करण्यासाठी कातळधाराच्या घनदाट जंगलात सोडण्यात आले.

जाताना लोणावळा डोंगररांग हिरवाईने नटलेली दिसत होती. प्रत्येक डोंगर शिखरांवर धुक्याचे मुकुट सजवले होते. हिरवा आणि सफेद  निळा रंग निसर्गाचे सौंदर्य वाढवीत होते  आणि डोळ्यांना सुखावीत होते. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद व्हा रे हे गाणे सहज ओठांवर येतेच येते.  ट्रेकिंग ड्रेसकोड म्हणजेच फुल ट्रॅकपॅंट फुलबाहीशर्ट, टोपी, जॅकेट,पाणी आणि जेवणाचा डबा असलेली कमी वजनाची सॅक, ट्रेकिंग शूज, एखादी काठी,पावसाळा आहे म्हणून मोबाइलला सेफ्टी कव्हर अश्या तयारीत सगळे ट्रेकर्स सज्ज होऊन आम्ही निघालो.  जुन्या नव्या ट्रेकर्सने ट्रेक लीडर्सच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले की ट्रेक उत्तम रीतीने पार पडला म्हणून समजा.
२५ ऑगस्ट ला सकाळी अजिबात पाऊस नव्हता तरीही आधीच्या धुव्वाधार पावसाने आजूबाजूची डोंगररांग वेगवेगळ्या सुंदर रूपात दिसत होती. एखाद्या डोंगर रांगेवर धुक्याचे मुकुट, धुक्याची शाल तर  एखाद्या कातळातून धबधब्याची रांग कोसळत होती. काही ठिकाणी बारीक जलधारा खडकांवर पांढया रंगाच्या रेघोट्या ओढल्यासारख्या दिसत होत्या तर दूरवर अनेक छटांच्या डोंगररांगा साद घालत होत्या. हे सुंदर दृश्य अजूनदेखील नजरेसमोरून जात नाही. गडकिल्ल्यांवर आम्ही नेहमी चढाई करतो त्यावेळी सुरुवातीला वॉर्म अप होईपर्यंत थोडा तरी दम लागतो परंतु यावेळी आम्हाला दरीत उतराई करावयाची असल्याने सगळ्या ट्रेकर्सचे चेहरे उल्हासित आणि आनंदी होते. फोटोग्राफीची मजा काही औरच होती. ८२ ट्रेकर्सना सांभाळून नेणे काही खाऊ नाहीये. तरीही आमचे - लीडर्स इतक्या ट्रेकर्सची जबाबदारी घेत असतात. ज्याला निसर्गाची अतिआवड, अतिओढ आणि अचूक माहिती असेल त्याच व्यक्ती हे कार्य यशस्वीरीत्या पार पाडू शकतात. आमचे ट्रेकग्रुप लीडर्स ग्रेट.

दोन छोटे ओढे पार करून पुढे चालू लागलो प्रत्येक शुभ कार्याला आपण जसे देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नाही तसेच जंगलाच्या सुरुवातीला इथे एक शेंदूर लावलेला दगडातील देव म्हसोबा दिशादर्शक म्हणून दिसतो त्याचा आशीर्वाद घेऊन तेथून  जंगलात प्रवेश केला. नाहीतर सगळ्या वाटा सारख्याच दिसतात चकवा कधी लागेल सांगता येत नाही. ट्रेक ग्रुपच्या रांगेच्या सुरुवातीला एक लीडर मध्ये लीडर्स आणि ट्रेकर्सच्या  शेवटी एक लीडर अशी विभागणी केल्याने प्रत्येकाला नेहमी सुरक्षित वाटते. त्या घनदाट जंगलात चुकून देखील एकट्याने अथवा गाईड घेतल्याशिवाय जाऊ नये. अनेक जण या जंगलात भरकटले आहेत आणि दिवसाने पोलिसांनी रिस्क्यू ग्रुपच्या मदतीने त्यांना जखमी अवस्थेत कसेबसे बाहेर काढले आहे.निसर्गापुढे आपण खूप क्षुद्र किडा-मुंगी सारखे प्राणी आहोत. निसर्गाला कमी लेखू नये. तो सुंदर आहे तितकाच रौद्र देखील आहे.
लीडर्सच्या मागोमाग आम्ही उतराई करू लागलो.अधे मध्ये वाट अचूक सापडावी यासाठी काही ठिकाणी काही ट्रेकर्सने झाडांना गुलाबी भगव्या रंगाच्या रिबिनी लावल्या आहेत त्यानुसार वाट चालत राहिलो. चकवा लागणाऱ्या अनेक वाटा दिसल्या की थोड़ा वेळ थांबून पुन्हा वाट शोधून अचूक वाट चालत होतो. ट्रेकर्स मागेपुढे झाले तर लगेच कृपाकरून कोणीही गोधळ घालून ओरडू नका रे.  एखादी बारीक शीळ किंवा ट्रेकर्सची एखादी शिट्टी खूप होते.  खरंतर आपण निसर्गामध्ये आल्यानंतर त्या प्राण्या-पक्षांच्या  हद्दीत आल्यानंतर त्यांना असा गोंधळाचादेखील धक्का लावू नये असे माझे मत आहे. आवाज करता जाणे हा नियम सगळ्यांनी पाळला आणि निसर्गातील प्राणी-पक्षांचा आवाज अनुभवला, पानांची सळसळ अनुभवली, छोट्या छोट्या झऱ्याची झुळझुळ ऐकली तर कोणालाही त्रास नाही होणार. परंतु सगळे ट्रेकर्स सारखे नसतात आरडाओरडा करणारे चार ट्रेकर्स तरी असतात. त्यांनी या नियमांचे एक ट्रेकर म्हणून पुढच्या वेळी पालन करावे.


तास अंतर जंगल उतरल्यावर एक ओढा लागतो तिथे सर्व ट्रेकर्सने भिजण्याचा आनंद घेतला. तिथे मात्र फारच घसरडे होते जो येतो तो घसरत होता. निसर्ग जणू सांगत असतो "हे माझे घर आहे इथे मस्ती नको करू माणसा,मला जर त्रास दिलास तर तू टिकणार नाहीस फारसा अर्धा तास घालवल्यानंतर पुढे अजून जास्त घनदाट जंगल आहे तिथे एक झाड निसर्गतः आडवे पडले आहे तिथे थोडी गम्मत म्हणून गमतीशीर ग्रुप फोटो घेतले आणि  राणे सरांसोबत पुन्हा ट्रेक सुरु केला.




काही अंतर गेल्यानंतर खडा चढ होता इतक्या पटपट उतराई करीत आलेले आम्ही सगळेच आता थोडेसे दमलो होतो. परंतु म्हणतात ना मेहनत का फल बहुत मिठा होता है. अगदी तसे झाले. तो कठीण चढ चढून गेल्यावर कातळधारा फॉलच्या त्या प्रशस्त आणि नयनरम्य कोसळणाऱ्या धारा पाहून डोळे गरागरा फिरले आणि सुखावले त्यामुळे सगळा थकवा निघून गेला.फोटोग्राफीसाठी सगळ्यांनी मोबाइलला कामाला लावले. एकीकडे कातळधारा एकीकडे  राजमाची टोक असा तो सुंदर देखावा प्रत्यक्ष अनुभवावाच. त्या एका स्पॉटला देखील आम्ही ट्रेकर्स शिस्तीत फोटोग्राफी करीत होते. नव्या ट्रेकर्सना सावध राहण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. कारण प्रत्येक दगडावर शेवाळ साठलेले असते. या ठिकाणी सहलीला जाणारे लोक कमी येतात आणि ट्रेकर्सच जास्त येतात. कारण कातळधारा फॉलचा शेवटचा टप्पा तसा  थोडा कठीण आहे. गवत वाढलेले असल्याने दरीची कठीणता आणि उतार समजून येत नाही. त्यामुळे वरच्या टप्प्यावर मस्ती करता त्या पाषाणाच्या उजव्या अंगाला सावधगिरीने चालत राहावे. आमच्या लीडर्सने थोडे पुढे जाऊन तिथे असलेल्या गुहेत जाण्याची दगडी घसरडी वाट पाहून त्याठिकाणी रोपची आवश्यकता आहे हे जाणून रोप लावला कारण इथे अपघात होतात हे लीडर्स जाणून आहेत. यावेळी पाऊस कमी असल्याने त्या ठिकाणी जवळजवळ ३५० फूट उंचीच्या धबधब्याच्या फवाऱ्याच्या तुषारांचा हलका मारा अंगावर डोळ्यांवर होत होता तो हवाहवासा वाटत होता.

एकीकडे लीडर्सने त्या घसरड्या दरीत रोप लावून थोड्या थोड्या ट्रेकर्सना खाली सावधगिरीने उतरण्याच्या सूचना करीत होते. त्या प्रवाहाखाली गेल्यानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणतात. काही नवीन ट्रेकर्स त्या कोसळणाऱ्या प्रवाहाखालून घसरड्या खडकावरून जाण्यास नाही म्हणत होते परंतु आमचे लीडर्स हिम्मत देऊन एकूणएक ट्रेकरला त्या गुहेत कुंड दिसत असले तर कुंडात सुरक्षित घेऊन जातात  .
यावेळी पाऊस कमी असल्याने त्या प्रशस्त फॉलखालील ते खोल कुंड दिसत होते आणि मी तर खास तेच पहाण्यासाठी आज ट्रेकला आले होते. साडेबाराच्या सुमारास ८२  ट्रेकर्स गुहेत आल्यानंतर आम्ही एकच जल्लोष केला. कारण त्या अदभुत गुहेत गेल्यानंतर आजूबाजूने त्या पाण्याच्या प्रवाहाने पूर्ण गुहा आच्छादली जाते आणि त्या पाण्याचा आवाज, नाद ढगांचा गडगडाट व्हावा अगदी तसा भासतो अदभूत गुहा अदभूत अनुभव. बाहेर ऊन सावलीचा खेळ सुरु होताच त्यात ऊन पडल्यानंतर राजमाचीचे टोक स्पष्ट दिसत होते तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण आम्ही कुठेतरी निसर्गाच्या कुशीत जगावेगळे लपून आहोत आणि आपला आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे आम्हाला वाटत होते. गुहेखाली त्या पाण्याच्या प्रवाहाने मोठे खोल कुंड निर्माण झाले आहे. या गुहेत गेल्यानंतर मात्र आतील खडक पूर्ण घसरडा आहे त्यामुळे कोणीही गुहेच्या कडेला जाऊन फोटोग्राफी करू नये यासाठी लीडर्स वारंवार सूचना करून अक्षरशः हाताला धरून बाजूला घेत होते. हीच काळजी, हेच ते कसब, हेच ते धैर्य, हीच सहनशक्ती,हेच ते पॅशन आज आमच्या लीडर्सना ९९ व्या ट्रेकपर्यंत घेऊन आले आहे आणि आम्ही त्यामुळेच निर्धास्तपणे माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणेसोबत ट्रेक करतो .  शेवटी आपल्याला काय कोणी उचलून नेत नाही चालावे तर आपल्यालाच लागते परंतु ते चालण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास, चलाखी आम्ही लीडर्स कडूनच घेतो आम्ही सर्व ट्रेकर्स तुम्हा सर्व लीडर्सना सलाम करतो. हॅट्स ऑफ टू यू अवर ग्रेट लीडर्स.





गुहेमध्ये आम्ही सर्वांनी आणलेला दुपारच्या जेवणाचा डब्बा काढून जसे बसलो होतो त्या गुहेतील खंड्यांमधे पाण्यात बसून जेवण केले त्या जेवणाचा आनंद काही आगळाच.    ट्रेक पूर्ण केला त्यासाठी आदित्य, जान्हवी आणि इतर छोट्या मुलांचे खूप कौतुक.  धनंजय तुम्ही तर आमच्यातील तुमच्या पहिला ट्रेकला फोटोग्राफी, अंताक्षरी, पाण्यात मनसोक्त भिजणे आणि मजेशीर गप्पा याचा पुरेपूर आनंद लुटला. "आप तो छा गये".
आम्हाला असेच हौशी ट्रेकर्स हवे असतात.  लीडर राणे सर तर एकापेक्षा एक गाणी आणि विडंबन गाणी शोधून आणतात मंदार सर दुसऱ्या बसमध्ये असल्याने आम्ही त्यांची तोंडपाठ असलेली शिवरायांची ऐतिहासिक स्तुतीपर गाणी मिस केलीआर जे संग्राम उदय सर तर टॅलेंट का खजाना,गाणे का खजाना, मिमिक्री का खजाना, पुढच्या वेळेस तो माईक आणू नका बरं, सगळ्या नैसर्गिक गुण बाहेर येऊ देत. . 
तीनच्या सुमारास गुहेत आणि त्या मोठ्या कुंडात बॅनर फोटो घेऊन आणि व्हिडीओ शूटिंग तसेच मनसोक्त फोटोग्राफी करून आम्ही दोन-अडीच तासात तिथून निघालो कारण जंगलात अंधार व्हायच्या आत निघालेले चांगले असते.. गुहेत जास्तीत जास्त १५० लोक आरामात माऊ शकतात. परंतु अडकलो तर इथे बाकी कसली सोय नाहीये आणि पाण्याचा प्रवाह केव्हा आणि किती वाढेल याचा नेम नाही त्यामुळे आम्ही समाधानी मनाने गुहेचा निरोप घेतला लीडर्सच्या सूचनेनुसार आम्ही पुन्हा त्या प्रवाहातून बाहेर येऊ लागलो.. ऑगस्ट महिन्यापर्यंत इथे जोरदार पाऊस पडत असल्याने या कातळधाराच्या  पावसाळी ट्रेकचा आनंद ट्रेकर्स घेऊ शकतात.. गुहेतून बाहेर आल्यावर आता रोपच्या आधाराने पुन्हा त्या घसरड्या खडकांचा चढ चढताना थोडेसे कठीण जात होते परंतु गुहेतला आनंद अंगात असल्याने सगळे हसत हसत चढाई करीत होते..
यावेळी पाण्याचा प्रवाह कमी असल्याने प्रवाहाच्या त्या बाजूने काही ट्रेकर्स जेवण करताना दिसले तेव्हा मला त्यांचा हेवा वाटला कारण मला त्या बाजुने जायचे होते परंतु ग्रुप सोडून लीडर्स कुणालाही दुसरीकडे जाऊ देत नाहीत म्हणून मी गप्प बसले..एक टप्पा चढ चढल्यावर  पुढे जर पाऊस असला आणि घसरडी वाट असली तर एका ठिकाणी छोटा रोप लावण्याची गरज पडते परंतु यावेळी तशी वेळ आली नाही.मी  मागे वळून पुन्हा पुन्हा त्या धबधबा कोसळणाऱ्या फॉलला मनात आणि डोळ्यात साठवीत होते.

जाताना सोपी वाटणारी वाट येताना पटकन चुकायला होत होती. म्हणून लीडर्स म्हणतात झुंड में रहो या फिर जिसको ट्रेक रूट पक्का पता होता है उसके साथ रहोगे तो रास्ता नहीं भटकोगे "येताना पुन्हा एका ओढ्यात चिखलाने भरलेले शूज आणि पॅन्ट धुवून निघाल्या.तिथे थोडा वेळ घालवल्यावर मात्र आता सपासप उतरलेले जंगल चढायचे होते त्यामुळे थोडीशी दमछाक होत होती. येताना आम्ही थोडे ट्रेकर्स सोबत असल्याने शांत वातावरणात झऱ्याची झुळझुळ पानांची सळसळ किर्रर्र किड्यांचा आवाज ऐकला आजूबाजूला कोसळणारे छोट्या छोट्या धबधब्यांच्या जणू गप्पा ऐकल्या मधल्या ओढ्यापासून दीड तास जंगल चढाई केल्यानंतर  जाताना आमचा देव म्हसोबा दिसला आणि आम्ही सुस्कारा सोडला.हुश्श संपत आला एकदाचा ट्रेक असे वाटले..

मधल्या ओढ्या जवळ एका ग्रुपचे तिघे जण काही कारणाने पुढे जाऊ शकले नाही ते पुन्हा माघारी निघाले आणि एका ठिकाणी चुकलेच पुन्हा आम्ही आल्यावर आमच्या सोबत बरोबर त्यांच्या बसजवळ पोहोचले.  कारण त्यांना आपण रस्ता चुकू असे वाटले नाही.अशी चूक कोणाकडून देखील होऊ शकते.अश्या वेळी आपल्या ग्रुप मधल्या माहिती असलेल्या व्यक्तीला सांगून थांबावे मग अडचण येत नाही आम्ही देखील मागच्या वेळी असेच १० मिनिटे रस्ता चुकलो होतो आणि एकामागून एक चालत राहिलो होतो. झुंडमध्ये असल्याने आणि सोबत पाठीमागेच लीडर्स असल्याने लगेच लक्षात आले होते. दिवसभर वाट पाहून पडलेला पाऊस आता मुसळधार पडू लागला आणि सगळ्यांचे चेहरे आनंदले.त्यामुळे शेवटचा टप्पा एकावेळी पावसाने आणि घामाने भिजूनच पार पडला. ट्रेक सोपा असो वा कठीण असो शेवटी शेवटी केव्हा एकदाचा संपतो असे होते आणि पावले जड होतात. कितीही जीवावर आले तरी त्या बसेस पर्यंत चालावे लागणारच होते हे निश्चित. बसमध्ये जाऊन पटापट चेंज करून टपरीवरील चहाचा आस्वाद घेतला ६च्या सुमारास  आमच्या बसेस घराकडे रवाना झाल्या. आणि पहिल्यांदाच ९च्या आत घरात पोहोचलो. सगळ्यांनी केलेले सहकार्य, पाळलेली शिस्त, सूचनांचे काटेकोर पालन यामुळे माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणे यांचा ९९वा कातळधारा ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला.ओळख परेड झाल्याने ओळखत  नसलेले सर्व ट्रेकर्स रेगुलर ट्रेकर्स आणि आमच्या  ग्रेट  लीडर्सना हॅट्स ऑफ आणि मनापासून धन्यवाद  इतक्या साऱ्या फ्रेंडजना निसर्गासारख्या सख्यासोबत आम्हाला भेटवले आणि बेष्टंम-बेस्ट ट्रेक घडवून आणला माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स ग्रुप पुणे रॉक्स.