Monday 28 January 2019

धोडप किल्ला-नासिक जिल्हा...


ट्रेक - धोडप किल्ला
ठिकाण -नाशिक जिल्हा
श्रेणी - मध्यम कठीण
दिनांक - २६-२७ जानेवारी २०१९
उंची - ४३१९फूट

धोडप किल्ल्याचा थोडक्यात इतिहास-धोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला पुरातन किल्ला असून नासिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४३१९ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याचा उल्लेख प्रथम व्या शतकात धरब या नावाने येतो. त्यावेळी हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांचा सरदार अलावर्दीखानाने निजामांच्या किल्लेदारास लाख रुपयांच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये अलावर्दीखानाने किल्ला ताब्यात घेतला . १६७०-७१मध्ये शिवाजीमहाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला परंतु त्यांना किल्ला ताब्यात घेता आला नाही. नानासाहेब पेशवे आणि हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या मालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून झाला. .. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड राघोबांनी(रघुनाथराव पेशवे)धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला आणि मोठी लूट माधवराव पेशव्यांना मिळाली. पुढे .. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. असा उल्लेख संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हट्टी गाव, चांदवड यांनी गावात प्रस्थापित केलेल्या बोर्डवर आढळला.
माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ९२ वा धोडप किल्ला ट्रेक दिनांक २६-२७ जानेवारी २०१९ या दिवशी आयोजित केला होता. २०१९ या नव्या वर्षातील हा पहिला ट्रेक होता. धोडप किल्ला नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात आहे. पुण्यापासून सुमारे २६० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. इथे पोहोचावयास जवळपास ६ तास लागतात.२६ जानेवारीला आमची ३२ ट्रेकर्सची बस रात्री ११च्या सुमारास निगडीहुन निघून प्रवासाची सुरुवात नेहमीप्रमाणे श्रीफळ फोडून करून तळेगाव-चाकण-नासिक मार्गे निघाली. बसमध्ये पांघरून घेऊन देखील प्रचंड थंडी जाणवत असल्याने नासिकमध्ये किती थंडी असेल याचा अंदाज येत होता.लीडर्सच्या आणि यावेळीचे आमचे गाईड विनोद मुळे(कारण ते या ठिकाणी आधी जाऊन आले होते) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या उत्तम ड्रायविंगमुळे आम्ही आग्रारोड मार्गे पहाटे साडेपाचच्या सुमारास धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावाजवळ उतरलो. थंडी मी म्हणत होती.बसचे दार उघडले की बर्फाचा डोंगर कोसळावा इतका चिल्लम चिल गारवा होता. ब्रश करून फ्रेश होऊन यावे तर मला तर हुडहुडी भरली होती. तरीही सगळ्यांनी पटापट आवरुन शेकोटी पेटवून थोडे शेकून घेतले.थोड़ा उजेड आल्याने धोडप किल्ल्याचे दर्शन झाले. सकाळची निरामय शांतता मन प्रसन्न करून गेली. साडेसहावाजता पुण्याहून आणलेला इडलीचा नास्ता करून थंडीच्या नशेत चहाच्या आशेवर हट्टी गावात गेलो. गरम चहा पोटात गेल्याने थोडे हायसे वाटले. ट्रेक लीडर राणे सर आणि मंदार यांनी ट्रेक संदर्भातील सूचना करून लगेच ट्रेकला सुरुवात झाली.

एरवी हवाहवासा वाटणारा गार वारा आता क्रूर वाटत होता.  क्रूर गार वारा अंगाला बोचत असल्याने जवळजवळ सगळ्यांनीच जॅकेट्स-स्वेटर-कानटोपी, परिधान केले होते. माझे तर हात गोठून त्याचा रंग बदलत होता. थोडे हातावर हात घासून घर्षण केले की बरे वाटत होते.जवळपास २कि.मी. अंतर चालून गेल्यावर धोडपच्या पायथ्याला सेंदूर लावलेली हनुमानाची भगवी मूर्ती आढळली.
इथून किल्ला चढाई सुरु झाली.  नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलाढ्य किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दुरूनदेखील उठून दिसतो.. जाताना उजव्या हाताला निसर्ग पर्यटन केंद्र हट्टी(धोडप) असे लिहिलेली एक कमान दिसली. इथे थोड्या प्रमाणात का होईना त्या कंपाउंडच्या आत छोटी छोटी  झाडे लावलेली आढळली. सातमाळ रांगेतील जे किल्ले दिसत होते ते चमन केल्यासारखेच भासत होते म्हणजे त्यावर अति कमी प्रमाणात झाडे दिसत होती किंबहुना थोडीफार झुडुपेच दिसत होती. वृक्षांचे प्रमाण फारच कमी असल्याने सरासरी पाऊस कमी पडल्याने या भागात पाण्याची फार टंचाई भासते.
छोटी छोटी शेततळी दिसली त्यात अगदी कमी प्रमाणात पाणी आढळले. थंडी मात्र अतिप्रमाणात जाणवत होती. पावसाच्या ट्रेकमध्ये डोंगररांगामधून ढग चालताना किंवा विरघळताना नेहमी पाहतो परंतु जानेवारी महिन्यात धुक्याचे ढग चालताना मी पहिल्यांदाच पाहिले इतकी थंडी तिथे होती. जवळपास पाऊणतासात एक टप्पा पार केला. दुसऱ्या बाजूने धोडपचा आकार अजून वेगळा दिसू लागला. दुसरा टप्पा सुरु झाला तिथे थोडीशी रुंद दगडी पायवाट तयार केलेली दिसली पावसात ही वाट उपयोगात येत असावी. पहिल्या कमानी जवळून इराकी सुळका स्पष्ट दिसत होता. कमानीतून आत प्रवेश केल्यावर किल्ल्यावरील ऐतिहासिक दगडी वस्तू आढळून आल्या जसे विहिरी, दगडी पसरट भांडे,तसेच सोनार वाडी वस्ती, जेवण नाविन्याची मोठी  लोखंडी हंडी असे एक ना अनेक अवशेष इथे आढळून आले. इथे ऐतिहासिक विहिरीची बांधणी वेगळी आणि अप्रतिम होती. चरायला आलेली गुरे, तिथे रहाणारे ते बोबडे महाराज "म्हणे पुणेरी महाराज" किल्यावर जिवंतपणा आणत होते. ते कोणालाही खरे नाव आणि गाव सांगत नाहीत तरीही आम्ही पुण्याचे आहोत म्हंटल्यावर आम्हाला म्हणालेमाझे नाव बोबडे बाबा आणि म्हणे मी पण पुण्याचा भामटा आहे.”


जसजसे किल्ल्यावर जात होतो तसतसे पायथ्याची गावे चित्रातील घरांप्रमाणे भासत होती. सूर्य डोंगरातून केव्हाचाच पूर्णपणे बाहेर आल्याने कोवळे ऊन हवेहवेसे वाटत होते. परंतु थंड वारा तरीही बोचत होता. पुढचा टप्पा थोडा कठीण असल्याने बरेच ठिकाणी लोखंडी जिने लावले आहेत. प्रत्येक टप्प्यावरचे किल्ल्याचे सौन्दर्य वेगळे आणि विलोभनीय होते
दुसरा टप्पा पार केल्यावर दगडी पायऱ्यांचा जिना सोडला की दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख आढळला. हा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख पारसी लिपी भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणिदुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. येथील चौदा किल्ल्यात धोडप,चांदोर(चांदवड),इंद्राई,राजदेहर,कोळदेहर,कांचना,मांचनाकण्हेरा,जोला(जवळ्या),रोला(रवळ्या),मार्कांड्या,अहिवंत,अचलगड,रामसेज यांचा समावेश आहे. या शिलालेखाविषयी श्री आनंद  पाळंदें सरांच्या लेखात वाचले आहे.

दुसरा दरवाजा पार केल्यावर आपण चढाई करून प्रथम वरील पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीमध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात. आम्ही - ट्रेकर्स त्या सुळक्यावरील थोडे उंचावर असलेल्या गुहेत जाऊन आलो इथे एक टप्पा थोड़ा कठीण आहे तरीही लीडर राणे सरांच्या मार्गदर्शनाने आणि एकमेका साह्य करूच्या नियमाने आम्ही काही ट्रेकर्स त्या गुहेत जाऊन आलो. इथे लपून बसण्यासाठी या गुहेचा वापर होत असावा असे दिसते. इथून उतरताना घसारा करीत उतरून पुढच्या गुहेच्या दिशेने निघालो. इथे माकडांचा प्रचंड वावर आहे. खाण्याच्या वस्तू  त्यांच्यासमोर आपण काढल्या की ते आपल्या हातातून ओढून घेऊन जातात त्यामुळे सावध असावे.
हा सुळका यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसऱ्या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. इथे बारामहिने पिण्याचे पाणी उपलब्ध असते. एका गुहेत २०ते २५ लोक आरामात राहू शकतात. किल्ल्यावर तंबू लावून आपण राहू शकतो परंतु जेवणाची सोय आपली आपल्याला करावी लागेल.फक्त किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये किल्ल्याची हानी करू नये.हा नियम सर्व ट्रेकर्सने पाळला की झाले. सगळ्या गुहांमध्ये दगडी भिंतीवर मुलामुलींची नावे लिहून त्या गुहा जणू त्यांच्या नावावर केल्यात असे वाटत होते. असे काही पहिले की चीड येते आणि खंत वाटते. आपल्याला लाभलेला  हा गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा कसा जपला पाहिजे हे कोणालाही सांगायला लागू नये. असो  १०-१२ जणांचा छोटा ग्रुप असेल तर काही ट्रेकर्स इथे एकावेळी सलग २दिवसात २ते तीन किल्ले सहज करतात.जून ते मार्च महिन्याचा कालावधी इथे जाण्यास योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे.अंदाजे पन्नास फूट खोली आणि पस्तीस ते चाळीस फुटांची लांबी असलेला मधला भाग नैसर्गिकरित्या तुटून अथवा झिजून पडला आहे वाटते परंतु एका बाजूने असेही वाटते की त्याबाजूने शत्रूने प्रवेश करू नये त्यासाठी ही दगडी भिंत तोडून काढली असावी. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो.
येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात.थोडे धूसर वातावरण असल्याने हे किल्ले पुसट दिसत होते. वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा काही पाण्याची टाकी आहेत.सुळक्याला फेरी देखील मारता येते.

धोडपचा हा शेवटचा टप्पा पहिला की लोहगडाचा विंचूकडा आणि रायगडचे टकमक टोक यामध्ये बरेच साम्य आहे असे आढळून आले. इथे बॅनर फोटो घेऊन वेगवेगळ्या दिशेने मनसोक्त फोटोग्राफी केली. आजूबाजूचा गडकिल्ले, परिसर न्याहाळून त्याची माहिती घेऊन आम्ही तेथील गुहेतील मंदिरात जेवण केले.
जेवण करताना आम्हाला  माकडांनी खूप त्रास दिला. दोन वेळा आमच्या पुढ्यातील चपाती आमच्या समोर उचलून नेली. कारण त्यांना समजले होते की हे लोक ओरडण्याशिवाय काही करणार नाहीत. त्यांना तिथे काहीही खायला मिळत नाही त्यामुळे ते प्राणी असे करत असावे.

आम्ही १२ च्या सुमारास किल्ला उतराईस सुरुवात केली. चढाई करताना एक टप्पा थोडा वळसा घालून गेलो होतो. उतरताना थोड़ा घसरडा परंतु थोडा जवळचा मार्ग निवडला.

त्यामुळे तासात आम्ही खाली उतरून हट्टी गावात पोहोचलॊ. सगळ्यांचे  चेहरे थकलेले दिसत होते तरीही ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.गावातील एका घराच्या अंगणात  १० मिनिटांची विश्रांती घेऊन आम्ही धोडांबे गावात जाऊन हेमाडपंथीय शिवमंदिराचे दर्शन घेतले. अप्रतिम कलाकुसर पाहावयास मिळाली.


त्यानंतर इथून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक मार्च, .. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.हे मंदिर म्हणजे पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना असून १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.  पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप गाभारा आहे. गाभाऱ्यावर  बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. मंदिरात गाभाऱ्यात रेखीव शिवपिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो


गोंदेश्वर मंदिराच्या आवारात अर्धा तास थांबून मंदिराचे अप्रतिम सौन्दर्य न्याहाळून परतीच्या वाटेल निघालो. मी आणलेला शेंगदाणा तिळाचा लाडू, राणे सरांनी आणलेली भाकरवाडी आणि इतर स्नॅक्स प्रसादासारखा खाऊन पुण्याकडे निघालो. चहाच्या प्रतीक्षेत बरेच थकलेले चेहरे डुलक्या घेऊ लागले. चारपाच बडबडे लोकच हॉटेलचे बोर्ड बघत बसलो होतो. नगरच्या हद्दीत आल्यावर एका ठिकाणी चहा-नास्ताचा आस्वाद घेतल्यावर सगळे तरतरीत झाले.
त्यानंतर मात्र राहवून अंताक्षरी सुरु झाली.अंताक्षरी असो की दम शेराज असो सगळे किती आत्मीयतेने सहभाग घेतात त्यावर त्या खेळाचा आनंद महत्वाचा असतो. अन्ताक्षरीमध्ये मराठी हिंदी गाणी, लहानमुलांची गाणी, सहलीची गाणी, मेहबूबची गाणी, विरहाची गाणी, धांगडधिंगा गाणी अगदी ९०च्या दशकाआधीपासूनची गाणी ते आताच्या डीजेपर्यंतची गाणी सर्व ट्रेकर्संनी सहभाग घेऊन सादर केल्याने पाच तासाच्या प्रवासाला चार चाँद लागले. महत्वाचे काय तर आपण थकलेले असताना वेदना विसरण्यासाठी त्या अंताक्षरीमध्ये किती रमून जातो आणि किती आनंदून जातो इतरांना किती आनंद देतो त्यात किती समरस होतो हे महत्वाचे आहे,असे माझे मत आहे. काहींना वाटत असेल नेहमी अन्ताक्षरीमध्ये तीच तीच गाणी गाण्यात काय मजा येत असेल या लोकांना?? नुसती गाणी गाणारे वेगळे असतात आणि गाणी गाऊन समा बांधणारे महफिल रंगवणारे वेगळे असतात. आम्ही गाणी गाऊन समा बांधून महफिल रंगवणारे आहोतच परंतु प्रत्येक गाण्याचा कस लावून किस पाडणारे आहोत.  काही गाण्यांचे रिमिक्स करून त्यात पण वेगळेपण आणून धुवा उडवणारे हुरहुन्नरी गायक देखील आमच्यात आहेत. नुसता ट्रेक करून बसमध्ये गप्प झोपून जाणारे ते ट्रेकर्स आम्ही नव्हेतच. जे आले नाहीत त्यांच्यासाठीच हे धमालचे वर्णन ईत्यंभूतरित्या करणे अत्यंत गरजेचे आहे बरे. हाहाहा रोहित, वैशाली,प्रतीक, विवेक,कविता, दिनेश, ऋतुजा, सलोनी, स्मिता, गीता, स्नेहल-अस्मिता,तुम्ही अप्रतिम अफलातून मजेशीर ट्रेक चुकवलातअश्या प्रकारे   माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ९२ वा धोडप किल्ला ट्रेक लीडर्सच्या उत्तम नियोजांमुळे आणि सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे अतिउत्तम असा झाला. लीडर्स राणे सर, मंदार सर, आलेले रोहित सर, निकाळजे, विनोद मुळे, DSLR फोटोग्राफर जय थरवळ,राहुल, मंजुळ जावळे, विनोद आणि इतर सर्व बेस्ट फोटोग्राफर्स मंदार सर, राणे सर,पवन, निकाळजें,महेश, निलेश,आकाश, संपन्न,शेवाळकरसर,माधवरावसर,सर्वेश,अक्षदा,कैलास,नेहा,गुरुप्रसाद,सुरेखा,शुभांगी कुलकर्णी 
संपदा,यश यांचे सर्व फोटोग्राफ़र्सचे आणि छोटा ट्रेकर आदित्य याचे विशेष कौतुक. माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स रॉक्स.