Saturday 29 May 2021

लॉकडाऊन रपेट

"लॉकडाऊन रपेट"

२५ मे २०२१

"घोरावडेश्वर"

मार्च महिन्याच्या डोंगरयात्राच्या चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेकनंतर एकही ट्रेक झाला नाही. ट्रेक नाही झाला की त्यामुळे माझी पूर्ण हवा निघून जाते थोडक्यात काय तर माझी मनाची ऑक्सिजन लेवल कमी होते असे वाटते.रोजचे चालणे आहे परंतु त्या नुसत्या चालण्याने आपण ताणले जात नाही आपला डोक्याचा, मनाचा ताण कमी होत नाही. त्यासाठी ट्रेक रपेटच हवी. पण ही रपेट कशी चालू करावी ते समजत नव्हते.डोंगरयात्राचे ट्रेकलीडर मनोजसर रोज फेसबुक स्टोरीला ११-१२की.मी रनिंग करून आल्याचे स्टेटस लावतात. म्हटलं सर रोज इतकी मोठी रपेट करतात आपण एकदा तरी अशी मोठी रपेट करायला.जायला हवे. पण नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न असतात तसं माझं झालं होतं. ऍक्टिवा काढावी तर पोलीस अडवत असतील का?. हात दुखतोय ते वेगळं. तरीही ऍक्टिवा काढावी तर इथे रस्त्याचे काम चालू होते. एकदाचा तो इथला खोदलेला रस्ता तरी मोकळा झाला. आणि मला म्हणतो जणू,"जावा मॅडम,तुमच्यासाठी रास्ता और आसमान भी साफ है." आता आपण निघावेच असा निर्धार केला. ट्रेकलिडर तर खूप लवकर जातात त्याच वेळेला जायला जमले तर बरं होईल. डोंगरातील आडवाटा माहित करून घेऊ आणि ट्रेक चालू होईस्तोवर आपण पंधरा दिवसाला एकदा किंवा आठवड्याला एकदा मैत्रिणीसोबत जाऊ. असा विचार मनात आणला. दोघी मैत्रिणी सोबत यायला तयार होत्या त्यांना विचारून पाहिलं एक तयार झाली.तिचं हो नाही होत तोपर्यँत दुसरी पण तयार झाली. सांगते सांगते म्हणत राहिली. मला अंदाज होता यातली एक आली नाही की या दोघी कॅन्सल होणार कारण त्याना जोडीला लागते. माझं तसं नाही. मी एकटा जीव सदाशिव आहे. घरी किती काम असो काहीतरी जुगाड करून ट्रेक आणि व्यायामासाठी मी कधीच कॉम्प्रोमाईस करीत नाही आणि म्हणून मी माझ्या मुलीलाच विचारून ठेवलं बच्चा चल उद्या आपण डोंगर चढू थोडी मोठी रपेट असेल तुझा पण व्यायाम होईल कारण सध्या तिचंपण सायकलिंग आणि बास्केटबॉल बंद आहे. तिचा दुसऱ्या दिवशी ऑनलाईन पेपर असल्याने हो-नाही म्हणत तयारी झाली एकदाची. सरांना मेसेज केला सर दोघी येऊ टेकडी चढायला सकाळी पिंग करते डोंगराच्या पार्किंगला भेटू. रात्री उशिरा दोघी मैत्रिणींनी मेसेज केला आम्ही उद्या नाही येणार परत कधीतरी जाऊ. सध्या प्रत्येकाकडे काहीतरी अडचणी असतातच त्यामुळे मला कसलाही राग वैगेरे आला नाही. मी ग्रुपमध्ये एकटी ट्रेकला जायला तयार असते.  आपला जुगाडू स्वभाव त्यामुळे आपली सगळ्यांशी लगेच गट्टी जमते. मोस्टली लहानांशीच जास्त जमते त्यामुळे मी आणि माझी मुलगी सकाळी लवकर उठून ऍक्टिवावर निघालो.सहाला रपेट सुरु करायची होती. मला पोहोचायला पाच मिनिटे उशीर झाला सरांचे आलेले फोन मी पुन्हा घरी आल्यावर पाहिले. सरांना वाटले असेल आता काय जयुमॅडम येत नाही. शैतान का नाम लिया और मै शैतान हाजीर हुवा. सरांसोबत तो छोटा पोरगा पाहून मला काही नवल वाटलं नाही उलट भारी वाटलं. कारण त्याला सरांच्या रोजच्या रपेटीच्या फोटोमध्ये पहिले होते मी. पण तो सरांचा मुलगा आहे हे माहित नव्हतं. एक सेकंद वाया घालवता मास्क बांधून आडवाटेने आम्ही आमची रपेट सुरु केली. थोडे पुढे अजून एक मेंबर आमच्यासोबत आला.सूर्य उगवला होता छान कोवळे ऊन पडले होते पटकन एक फोटो काढला आणि रपेट सुरु ठेवली.


जाताना मनोजसर ट्रेकप्रमाणेच प्रत्येक टप्प्यावर माहिती देत होते. ही झाडे ह्या ग्रुपने लावलीत त्यांचे संवर्धन सुरु आहे ही झाडे आम्ही लावलीत यांना आम्ही रोज पाणी घालतो. असं बरंच काही. शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी खाली घेतलेला मास्क वाटेत कोणी दिसले की आपोआप नाकातोंडावर चढला जाई. इतकी काळजी तरी घेतली पाहिजे रे. नंतरची प्रोसेस फार बेक्कार असते. त्यापेक्षा मास्क लावा, घरी गेल्यावर वाफ घ्या इतके प्राथमिक नियम मी तरी पाळते. हा पाहुणा जाईपर्यंत सगळ्यांनी हे नियम पाळावेत. असे माझे मत आहे बाकी ज्याचे त्यांनी ठरवा. कोरोना नाही हा गैरसमज आहे तोच मनातून काढून टाका कारण ज्याचे गेले त्यालाच त्याची किंमत माहीत आहे. माझी तर खूप माणसे गेली या कोरोनामध्ये त्यामुळे काळजी घेणे आपले काम आहे पण म्हणून घरात लपून पण बसू नका रोजचा व्यायाम चालू ठेवा आणि फिटनेस सांभाळा. गर्दी जास्त नव्हतीच तरीही आम्ही ती गर्दीदेखील स्किप करण्यासाठी आडवाटेने जात होतो.

घोरावडेश्वर म्हणजे इथे फक्त व्यायामासाठी येणारी लोकच असतात. वर गुहेत शंकराचे मंदिर आहे तिथेदेखील मंडळी होती. मी तर या थोड्या गर्दीला भिऊन ती सगळी गर्दी स्किप केली.जसजसे पुढे जात होतो मनोजसर आम्हाला पाच मिनिटे लहानमुलांसारखे इथे तुम्ही थांबा मी त्या गणपतीमूर्तीपर्यंत जरा रनिंग करून येतो. सर पाच-दहा मिनिटात आले की आम्ही पुन्हा पायपीट सुरु करत असू.

खूप दिवसांनी ट्रेकसारखी रपेट सुरु होती. परंतु सकाळ असल्याने फक्त घाम येत होता ऊन फार जास्त लागत नव्हते.सरांचा मुलगा संग्राम फक्त सहावीची परीक्षा दिलीये. पण सरांनी काय शिकवण दिलीये आणि व्यायामाची काय जबरदस्त शिस्त लावलीये. वाह...  मानलं बाबा. घरात मुलं ऐकत नाहीत पण बाहेर एकदम बेरके जबरदस्त शिस्तीने वागतात.

मनोज सर सध्या रनिंगची प्रॅक्टिस करतायत. ते रनिंगला गेले की मला संग्राम विचारायचा तुमचा धाक बहिरी झालाय का? मी आपलं निमूटपणे अजाणतेपणाने नाहीरे झाला. संग्राम तुझा झाला का रे? त्याचे उत्तर असे हो माझा ढाकबहिरी दोनतीनदा झालाय आणि सध्या लोकांनी जाऊ नये म्हणून तेथील दोर कापून टाकलेत ही पुढची माहितीदेखील त्याची हजर होती. मला असेच ट्रेकर बाजूने, मागेपुढे चालताना आवडतात ज्यांच्याकडून मला खूप माहिती मिळते, खूपकाही शिकायला मिळते.


घोरावडेश्वरच्या चारपाच वाटा मलाही माहिती आहेत पण त्याला त्याहून जास्त वाटा माहिती आहेत मला याचे फार कौतुक वाटे. मनोजसर रन करून आले की आजूबाजूच्या सर्व डोंगर-टेकड्या, गडकिल्ले यांची इत्यंभूत माहिती देत होते की जी मला कायम हवी असते. कुठे गुहा आहेत? कुठे काय आहे हे सगळं मी ऐकून घेत होते.

सर रनिंगला गेले की तो म्हणायचा ऊन स्किप करायचं असेल तर तिथून जाऊयात का? मी आपले मुद्दाहून मला माहित असलेल्या वाटांवर पण अज्ञान असल्यासारखे दाखवून त्याला म्हणत होते संग्राम, चल बाबा तू नेशील तिथे येतो आम्ही.

पुढचा प्रश्न तुम्ही ए.एम.के. केलाय? मी आपला नाहीरे केलाय. तू केलाय? हो केलाय म्हंटल्यावर पोराला उचलून घेऊ का काय असं वाटलं होते. त्याचा सकाळीच पहिला प्रश्न होता तुम्ही माकडनाळ केलीये का?त्यानंतर मी प्रत्येक प्रश्नाला नाही,नाहीच म्हणत गेले. तो म्हणाला मला माकडनाळ करायची आहे. मनात म्हंटलं माझे नशीब असले तर आपण सोबतच माकडनाळ करू. संग्रामकडे पाहून तरी मी सगळ्यांनी घाबरवलेला ट्रेक पूर्ण करेन.मी काहीच ट्रेक केले नाही असे वाटले मला. माझी बोलतीच बंद केली होती संग्रामने.

माझ्या प्रभूचा पेपर असल्याने ती थोडी कंटाळली होती. सर गहुंजे स्टेडिअमला राऊण्ड मारायला गेल्यानंतर गहुंजेच्या बाजूने चढाई करायला तिला थोडा कंटाळा आला होता परंतु ती गुहा मला बघायची होती त्यासाठी थोडेच राहिले, थोडेच राहिले असे गॉड-गॉड बोलून आम्ही त्या गुहेपर्यंत पोहोचलो. आम्ही पाहिलेली गुहा पहिली, थोडी फोटोग्राफी केली. त्यातही माझी मुलगी एक्स्पर्ट आहेच पण हा संग्राम पिल्लू त्यात पण एक्स्पर्ट आहे. त्या गुहेत तरस आणि सापाची विष्ठा असते हेपण त्याला माहित आहे. गुहेकडे जाताना एक छोटे झाड होते. त्या झाडाला हात लावून हे झाड तकलादू आहे उतरताना जोरात भार पडला तर ते झाड तुटेल आणि आपण घसरू शकतो. किती-किती भारी माहिती आहे ह्या छोट्याकडे की जी एका ट्रेकरकडे असावीच. संग्राम म्हणजे कमाल होता. आमच्यात अजून एक पाचवा मेंबर होता तो आधीच घरी निघाला कारण त्याला ऑफिसला जायचे होते. 


आम्ही आपले तीन-तिगाडा आडवाटा फिरत होतो. मी तर एका ठिकाणी थोडेसे पाणी प्यायले असेल आणि संग्रामने बिस्कीट काढलेकी पोराला नाही म्हणू वाटत नव्हते म्हणून आपलं आम्ही सगळेच टाइमपास म्हणून बिस्कीट खात होतो.फार गुणी पोरगं.मला भूक नसेल तर अधेमधे खायची सवय बिलकुल नाही. मोठ्या ट्रेकला दमलो की आपोआप खाऊ निघतो परंतु मुलांना खायचे असेल म्हणून मी आपली आवळाकॅण्डी बाहेर काढत असे आणि पोरांना विचारत असे. माझेतर किती दिवसांनी रपेट करायला मिळते यानेच पोट आणि मन भरले होते. ती गुहा पाहिल्यावर सर हजरच होते. अरे? अजून तुम्ही इथेच आहात? सरांना आता काय सांगू? मला आज बाहेर पडायला मिळाले होते हेच माझे नशीब. झेंड्याजवळ दोनचार फोटो काढून आम्ही इकडच्या तिकडच्या (म्हणजे त्या ट्रेकच्याच असतात. त्या मागच्या हटकेश्वर ट्रेकच्या गप्पा होत्या. निलेश कुमकर तुला उचक्या लागल्या असतील) गप्पाटप्पा करत कधी उतरलो ते समजलेच नाही. आपापल्या बाईकवर बसून आपापल्या वाटेला निघालो आणि घर गाठले.

ह्या छोट्या संग्रामने खूप गोष्टी शिकवल्या. छोटा बच्चा समझके हमको ना टकराना रे. असंच जणू म्हणत होता तो. बाप से बेटा सवाई होता. त्याने म्हणे ५०हुन अधिक ट्रेक केलेत. अरे हा जन्माला आल्यापासून ट्रेक करतो की काय हा प्रश्न मला बापुडीला पडला आहे. खरंच खूप ग्रेट आहेस संग्राम तू. असेच भरपूर आणि कठीणातील कठीण ट्रेक करत रहा, खूप मोठा हो, खूप अभ्यास कर आणि पूर्ण सहयाद्री फिर, भारत फिर परदेशवारीदेखील कर आणि महत्वाचे म्हणजे आईला,ताईला,बाबांना मदत कर त्यांचे ऐकत जा, घरात सर्वांचे म्हणणे ऐकत जा म्हणजे तुला ट्रेकला आणले जाईल. मनोजसर, मनापासून धन्यवाद माहित नसलेल्या आडवाटा दाखवून दिल्यात, खूपसारी माहिती मिळाली. झाडे लावताना फुलझाडे किंवा फळझाडे लावली तर पक्षी,प्राणी,सरपटणारे प्राणि यांची साखळी नियंत्रित राहते ही माहिती मोलाची आहे. या जंगलात बऱ्याच ठिकाणी झाडे मुळासकट उखडून निघाली आहेत. अशी झाडे फक्त फारतर सावली देतात पण वाऱ्यापावसात लवकर कोलमडतात. मला इतक्या वाटा माहित होत्या. एक वाट नव्याने माहिती झाली, एक गुहा नव्याने माहिती झाली. अजून सगळ्या गुहा सगळ्या वाटा पछाडून काढायच्या आहेत. ट्रेक सुरु होईपर्यंत अशीच रपेट करायला पुन्हा जाऊ. मनोज सर,प्रभू,संग्राम ग्रेट मनापासून धन्यवाद.

खूप दिवसांनी १२-१३ किलोमीटरची पायपीट तुमच्यामुळे मला करता आली. मनोज सर तुम्ही रोज इतकी पायपीट करता शिवाय झाडे लावता त्यांना पाणीदेखील घालता. नव्याने साध्या सायकलवर मोठी रपेट पण करता. ट्रेकलिडर तर आहातच तेही रेंजट्रेक अरेंज करता. वाह वाह वाह सर,आम्हाला अतिशय प्रेरणा मिळते यातून.  सलाम तुम्हाला. असेच स्वतःला तंदुरुस्त ठेवा आणि इतर सर्वांना व्यायामाचा आदर्श समोर ठेऊन तुमचे अथक प्रयत्न सुरु राहोत. भेटू माझ्या लाडक्या सह्याद्रीत.