Thursday 29 November 2018

"पिंक सिटी गजक जैसी मिठी"



"पिंक सिटी गजक जैसी मिठी" 

जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जातेया शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये महाराजा जयसिंग-दुसरा यांनी केली. महाराजा जयसिंगदुसरा यांच्या नावावरून या शहराला जयपूर हे नावपडले आहे. येथील लोकसंख्या इ.स२००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती.जयपूर शहरयेथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जयपूर हे शहर समृद्धी परंपरा,संस्कृती परंपरा, ऐतिहासिक परंपरा यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे.
जयपूर हे शहर उत्तम आधुनिक शहर तसेच सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहर म्हणून ओळखले जाते. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या सुमारे १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरवर,वस्त्र-छपाई,हस्तकला रत्न व दागिन्यांची आयात निर्यात, आणि पर्यटन व्यवसाय इत्यादी आहेत. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे.भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात जयपूर शहर मोडते. या त्रिकोणात जयपूर-आग्रा-दिल्ली ही शहरे येतात. सवाई जयसिंग-दुसरा यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबरहे शहरआजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे.इ. स. १८७६ मध्ये त्या काळातील महाराजा सवाई रामसिंग यांनी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट यांच्या स्वागतार्थ संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला होता तेव्हापासून या शहराला गुलाबी शहर असे नाव पडले आहे. खरंतर हा गेरू रंग आहे परंतु गेरू रंगाला इंग्रजीत असे काही खास नाव नाही.  हा रंग गुलाबी रंगाशी मिळताजुळता असल्याने या रंगाला पिंक रंग संबोधून जयपूर शहराला पिंकसिटी म्हणतात.


माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे या ग्रुपची जयपूर टूर दिनांक १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान होती.आम्हा ट्रेकर्ससाठी वर्षातून एखादी छोटी टूर असली म्हणजे जरा थकलेल्या जीवाला बरं वाटतं. दिनांक १८ नोव्हेंबरला आम्ही सगळे टूरकर आपापल्या घरातून निघून कोणी कॅबने तर कोणी लोकल ट्रेननेयेऊन पुणेस्टेशनला पोहोचलो. रविवारी दुपारी ४च्या सुमारास आमची पुणे-जयपूर एक्सप्रेस जयपूर कडे निघाली. काही लोक वातानुकूलित बोगीमध्ये बसले आणि आम्ही काही लोक बिनवातानुकूलित बोगीमध्ये बसलो.प्रवासाची सुरुवात अर्थात सोबत असलेल्यांची ओळख परेड आणि अन्ताक्षरीने आणि फोटोग्राफीने झाली.
पुणे स्टेशनहून निघालेली ट्रेन लोणावळ्यातील आमचे काही प्रवासी घेऊन निघाली आणि खंडाळा घाटात पोहोचल्यावर ते संध्याकाळचे कोवळे ऊन, थंडगार वारा आणि सूर्य अस्ताला निघाल्यावरची निरामय शांतता त्या झुकझुक आवाज करणाऱ्या ट्रेनमध्येदेखील जाणवत होती. कारण सह्याद्रीची अनेक छटांची रांग समोर असली, सूर्य सोबत असला,खोल दर्यांचे अप्रतिम दृश्य समोर असले की मला आजूबाजूला काय आहे? कोण आहे याचा देखील विसर पडतो. डोंगरदर्यांच्या मधोमध एखादे कौलारू घरांचे गाव पाहायला मिळणे म्हणजे पंचामृत मिळाल्यासारखेच आहे. पळसदरीमधल्या सूर्यदेवाला टाटा करून आम्ही हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट अशी अनेक गाणी गात खंडाळा घाट उतरत होतो. आमची एक्सप्रेस पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-भिवंडी रोड-वसई रोड-आणि मग पुढे गुजरात सुरत असे करत जयपूरच्या वाटेला निघाली. आम्ही आपले आम्ही आणलेला दिवाळीचा फराळ आणि घरून आणलेला रात्रीचा जेवणाचा डबा संपवून गप्पा करीत झोपून गेलो. 

राजस्थानच्या हद्दीत सकाळ उजाडली. आपल्यासारखा तिकडे प्रत्येक स्टेशनवर चहा मिळत नाही. कोटा जंक्शनवर सकाळच्या चहाचा आस्वाद घेतला, पुढे मधुर पेरूचा आस्वाद घेतला, सवाईमाधोपूरवर थोडावेळ उतरून फोटोग्राफ़ी करून आम्ही १९ तारखेला दुपारी दोनच्या सुमारास जयपूर स्टेशनला उतरलो. माऊंटन एज ग्रुपचे नियोजनच भारी असते. आम्ही पोहोचण्याच्या आधीच एक भारी बस आम्हा पाहुण्यांना घ्यायला आली होती. आमच्या आगमनाने जयपूरचे गाल आनंदाने गुलाबी गुलाबी झाले असावेत असे भासत होते. आम्हाला  भूक लागल्याने आम्ही राजस्थानच्या प्रसिद्ध दाल-बाटीचा आस्वाद घेऊन मगच आम्ही ४दिवसाच्या पाहुण्या घरी गेलो.(हॉटेलवर). 


चोवीस तासाच्या प्रवासानंतर हॉटेल राजप्लाझामध्ये प्रवेश करून  खांद्यावरची वजन सॅक उतरवून फ्रेश होऊन वेळ वाया न घालवता ५च्या सुमारास संध्याकाळच्या शहर भेटीला निघालो. हॉटेलच्या बाहेर लगेचच विवेकविहार हे मेट्रो स्टेशन आहे तिथे आम्ही रोज फोटो काढू लागलो आणिमी मी एकदा तरी मेट्रोत बसेन असे वाटले परंतु यावेळी मेट्रोमध्ये बसण्याची संधी मिळाली नाही. 


संध्याकाळी सर्वात आधी जलमहलला भेट दिली पाण्यात खालून तीन मजली असे हे जलमहलआहे.  जयपूर शहराच्या मानसागरझिलच्या मधोमध हे ऐतिहासिक महल आहे. अरवली पर्वताच्या कुशीतआणि मधोमध असल्याने याला आयबॉल असेही म्हणतात. सवाई जयसिंग यांनी हे दोन मजली महल बांधले असून छत्रीच्या आकाराचे बुरुज आणि शिड्यांचेजिने अशी याची बांधणी आहे.हे जलमहल आता पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा विकसित होत आहे. इथल्या नर्सरीतएक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत तसेच राजस्थानातील सर्वात उंच झाडे इथे पाहावयासमिळतात. राजे लोकांनी स्नानासाठी तसेच राण्यांसोबत खास वेळ घालवण्यासाठी हे महल बनवले गेले असे म्हणतात. आम्ही रात्रीच्या वेळी हे महल पाहिल्याने रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशामुळे पाण्यात त्याचेप्रतिबिंबदिसत होते.


इथून लगेच आम्ही अमेर किल्याकडे रवाना झालो. जयपूरच्या हद्दीतच अमेर हे शहर आहे. राजा आलनसिंह यांनी आमेर शहराची स्थापना केली. येथील मंदिर आणि शहर,किल्ला राजपुती कलेचे उत्तम उदाहरण आहे. सुप्रसिद्ध निर्माता फिल्मच्या शूटिंगसाठी इथे येत असतात. चाळीसखांबवाला शीशमहल इथेच आहे, इथे माचीसची काडी किंवा मेणबत्ती  पेटवली असता पूर्ण शीशमहल दिपावलीसारखे उजळून निघते. स्थानिक पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांचे हे खास आकर्षण आहे. आंबेर देवीच्या मंदिरामुळे हे शहर देशभरात प्रसिद्ध आहे तसेच येथील  हत्तीची सवारी खास आकर्षण आहे. आम्ही अमेर किल्यावर एक तासाचा संगीतमय लाईट शो अनुभवलाआकाशात चांदणे, अचूक माहिती, अप्रतिम प्रकाशयोजना, मधुर संगीत आणि  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज या सर्वामुळे आमेर किल्यावरील लाईट शो आम्हा सगळ्यांनाच आवडला.
अमेर किल्यावरून प्रसन्न मनाने निघालो आणि बाहेरच रात्रीचे जेवण आटोपून हॉटेलवर जाऊन ओळख परेड करून आपापल्या रूममध्येगप्पा मारीत गुडूप झालो. सकाळी पहाटे ६वाजता झालना लेपर्ड सफारी साठी तयार होऊन निघालो खरे.आम्ही २० लोक असल्याने ३जिप्सी केल्या होत्या, दोन जिप्सी पुढे गेल्या आणि आमच्या जिप्सीचा चालक हॉटेलजवळच चकरा मारत होता आणि असं दाखवत होता कीजणू याला सगळं माहिती आहे. नंतर आम्हीच म्हटलं," भैया यही पे चक्कर क्यू काट रहे हो?"तेव्हा लेकाचा सांगतो मै नया हूं रास्ता नहीं मिल रहा. त्यापुढे पुढेगेलेली एक जिप्सी पुन्हामागे बोलवून मग सोबत गेलो तेव्हा अचूक रस्त्यावरपोहोचलो. 


त्या गुलाबी शहरात गुलाबी थंडीमध्ये खुल्या जिप्सीमध्ये भन्नाट अनुभव घेता आला. अर्धा तेपाऊण तास अंतर आम्ही तेथील प्रसिद्ध पंडितजीची  गरम चहा आणि खुल्यारोड वर खुली जिप्सी सफारी खुल्या मनाने अनुभवली आणि जाल्हनाच्या जंगलात पोहोचलो. पोहोचताच मोर, निल गाय, हरीण, माकडे, ट्री-पाय पक्षी यांनी आमचे स्वागत केले. त्या नवीन चालकाला शहरातला रस्ता माहित नव्हता परंतु जंगलातील रस्ता चूक माहित होता आणि प्राणि पक्षांबद्दलची अचूक माहिती तो देत होता.शिवाय रिव्हर्स एक्स्पर्ट होता. इतका एक्स्पर्ट होता की आम्हाला जीव मुठीत धरून बसावा लागे. या जंगलात ३०ते ३५ बिबटे आहेत असे तेथील जंगल अधिकारी आणि गाईड चालक यांनी सांगितले परंतु सकाळच्या २ तास सफारीमध्ये  आम्हाला एकही बिबटे महाराज दिसले नाही. परंतु आम्ही जंगलातील खुली सफारी, शांतात, त्यात पक्षांचे मधुर आवाज ऐकले आणि फोटोग्राफ़ीचा आनंद घेतला आणि आमच्या ३ जीप्सचे समोरासमोर आल्या की आम्ही एकमेकाला विचारात असू, "तुम्हाला किती बिबटे दिसले रे ?"आम्हाला ३ बिबटे दिसले. नंतर समजले आम्ही एकमेकाला खोटे सांगत होतो. 
सफारीहून निघताना आता सपाटून भूक लागली होती हॉटेलवर परतत असताना बिकानेरवाला इथे आम्ही आपापल्या आवडीचा नास्ता केला. या ठिकाणी असंख्य प्रकारची मिठाई आम्हाला पहावयास मिळाली. 


पुन्हा हॉटेलवर जाऊन मस्त आवरून दुपारचे जेवण करून संध्याकाळच्या सफारीला निघालो यावेळी आमचा जिप्सी चालक बदलला होता. आम्ही सफारी साठी गेलो असता तिथे कडक नियम आहे की जिप्सीच्या खाली कोणीही उतरू नये परंतु तेथील जंगल खात्यातील जंगलात काम करणाऱ्या बायका जिगरीने बिबट्याचा वावर असेल तिथे काम करत होत्या चहा बनवत होत्या
त्यांना सलाम.
सकाळी बिबटे महाराज दिसले नाही आता तरी दर्शन देतील अशी आशा हॊती.जंगलातप्रवेश केल्यावर साडेतीनच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिलेआणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या जिप्सीना बोलावण्यासाठी आमच्या चा लकाने काय जोरदार शिट्टी वाजवली. सगळ्या जिप्सी बिबट्या पाहावयास एका जागी जमा झाल्या. खचाखच-खचखच-खचाखच नुसता कॅमेऱ्यांचा आवाज येत होता. खरंतर ती ज्युलिएट नावाची बिबटिन होती. पाणी प्यायला आली होती ती. त्यानंतर तिला भूक लागली असावी ती एका मोराच्या मागे चालू लागली मोर झाडावर चढल्यावर ती त्याला खाली ये म्हणून अशा अर्थाने गुरुगुरु लागली.त्यानंतर तो मोर काही झाडावरून उतरला नाही त्यामुळे ती एक सशाच्या मागे लागली त्यानेही तिचा डोळा चुकवला आणि तो ससा बचावला.  आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर पुन्हा दुसऱ्या बाजूने आमच्या समोरून नीलगाईकडे चालत होती.  नीलगाय घाबरून जिवाच्या आकांताने पळत होती. इथे जंगलात बिबट्या दिसला तर सगळे प्राणी एकमेकांना विशिष्ट आवाज काढून सावध करत असतात हे विशेष आहे त्याला कॉल आला म्हंटले जाते. माकड, नीलगाय,खारुताई, मोर  यांचे घाबरत ओरडणे म्हणजे बिबट्या जवळपास कुठेतरी आहे असे अचूक ओळखणे म्हणजे चालकाचे कौशल्यच म्हणता येईल. बिबट्याचे आगमन झाल्यावर मात्र टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतात सगळेच बाळगतात त्यामुळे आपण बिबट्याचे नीट दर्शन घेऊन शकतो फोटोग्राफी करू शकतो. मनसोक्त फोटोग्राफी व्हिडीओ क्लिप्स केल्या गेल्या.एक वेळेला इतक्या जिप्सी आजूबाजूला असताना ती मात्र राणीसारखी रुबाबाबतच चालत होती. पुन्हा ती नीलगायीला शोधत जंगलात गायब झाली.

सफारीची वेळ अजून संपली नव्हती त्यामुळे चालक आम्हाला अचूक फिरवीत होता. संध्याकाळीनिघायच्या वेळी पुन्हा एकदा ज्युलिएटचे आम्हाला दर्शन झाले. ती एका झाडीत उलटी करत होती त्याचा आवाज आमच्या चालकाने ऐकला  होता. आमची जिप्सी उभी होती त्यामुळे ती बाहेर येत नव्हती. आम्ही थोडे बाजूला झाल्यावर मोठ्या भिंतीवरून उडी मारून आमच्या समोरून जाऊ लागली. त्यावेळी तिने आमच्याकडे अतिशय रुबाबी कटाक्ष टाकला. आम्ही पुन्हा दुसऱ्या बाजूने तिला पाहायला गेलो तेव्हा मात्र ती झाडीमध्ये अदृश्य झाली. एका दिवसात इतक्या वेळा मिसेस बिबटीण दिसल्यामुळे दिल खुश हो गया था पैसा वसूल सफारी झाली. सूर्याला टाटा करून येताना चहा घेऊन रोड सफारीचा आंनद घेत पुन्हा राहत्या हॉटेलवर आलो-जेवलो. त्यादिवशी माझी पुण्यातली मैत्रीण जोना आणि शैलेशभाई जयपूरची प्रसिद्ध मिठाई गजक आणि माझी आवडती सोनपापडी घेऊन मला भेटायला आले. २तास मस्त गप्पा मारल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 


दिनांक २० नोव्हेंबर सकाळी पुन्हा एक सफारी होती. आम्ही काही लोकांनी रूमवर आराम केला २जण आमेर किल्ला पाहण्यास गेले आणि सफारीवाले आल्यावर आम्ही नास्ता करून जयपूरमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहावयास गेलो. हवामहल,सिटी पॅलेस, अल्बर्ट मुझियम,जंतर-मंतर-वेधशाळा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये भरपूर वेळ गेला परंतु आमचे गाईड संदीप जैन यांनी अचूकमाहिती देत आम्हाला महाराज सवाई मानसिंग-दुसरा मुझियम, सिटी पॅलेस फिरवले. युद्धात वापरले जाणारे अंगरखे, तलवारी-भाले, बंदुका, जे पाहावे ते अवर्णनीय असे होते.


जंतर-मंतर ही जगप्रसिद्ध वेधशाळा आहे असे म्हणतात. जंतर-मंतर किंवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेतइ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित वभाकित करणे हा होता. सवाई जयसिंगने अतिशय सूक्ष्मपणे ज्योतिविषयक वेध घेण्यासाठी जयपूर मध्ये वेधशाळा निर्मिली आहे ती आम्हाला पाहावयास मिळाली.


त्यानंतर आम्ही दुपारचे जेवण करून जयपूरमधील प्रसिद्ध बापू बाजारला भेट देऊन थोडीशी खरेदी केली. साच्यांनी कापडयावर फळांचे नैसर्गिक रंगाचे ठसे उमटवून पेंटिंग कसे करतात याचेप्रात्यक्षिकदेखील आम्ही पहिले. बापू बाजारमध्ये असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी  कपडे दागिने आम्ही पाहत होतो घेत होतो. परंतु घेण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा होती. परंतु इतक्या मोठ्याबाजारात फिरून आम्ही लेडीजने जर खरेदी नाही केली तर नवलच. जमेल तेवढी खरेदी करूनआम्ही रात्री आठच्या सुमारास तेथील गणेश मंदिर आणि बिर्ला मंदिरला भेट दिली आणि हॉटेलला जाऊन जेवण करून आमच्या दोन दिवसात विस्कटलेल्या बॅगा पुन्हा भरून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही राजप्लाझा हॉटेलला टाटा करून अजमेरकडे निघालो. 
जाताना बसमध्ये माफिया खेळाने रंगत आणली. मध्ये एका ठिकाणी नास्ता करून पुन्हा अजमेरकडे निघालो. अजमेरच्या दर्गाला भेट दिली तेथील कपड्याचा आणि दागिन्यांचा बाजार खूपछान होता. जमेल त्यांनी इथे पुन्हा खरेदी केली. या दर्ग्याला भेट देण्यासाठी देशभरातून भक्तजन येत असतात.मन्नतचा धागा बांधून जातात अल्लाच्या दुवा घेऊन जातात.  दर्ग्याच्या अफाट गर्दीतून कसेबसे निघालॊ. येताना आनासागर लेक चौपाटीवॉर थांबू वाटत होते परंतु आम्हाला अजमेरचा जगप्रसिद्ध पुष्कर मेळा पाहायचा होता.


अजमेरपासून सुमारे १४ कि.मी अंतरावर पुष्कर गाव आहे. इथे कार्तिक पौर्णिमाला हा मेळा सुरु होतो हा मेळा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात असतो. या ठिकाणी देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने हजरअसतात. इथे जगातील ब्रह्माचे एकमेव मंदिर आहे शिवाय हे तिर्थक्षेत्र असल्याने हजारो हिंदू भाविक इथे पवित्र स्नानासाठी येतात आणि पुष्कर झिलमध्ये स्नान करून पवित्र होतात. स्थानिक नगरपालिका या मेळ्याची व्यवस्था पहाते. सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
यावेळी इथे म्हैस, घोडा, अशा प्राण्यांचे प्रदर्शनअसते.. यावेळी जवळजवळ १३००किलो वजनाची,१.३ करोड किमतीची रोज २५ लिटरहून अधिक दूध देणारी जोधपूरची म्हैस प्रदर्शनात असणे हेमेळ्याचे आकर्षण होते.  दोन उंटांना ट्रकमध्ये घालून नेत  होते  तर तो उंट जिवाच्या आकांताने हंबरत  होता. मुक्या प्राण्यांनासर्वात आधी कळते. त्यांना आता दुसऱ्या गावी नेत  आहेत  याची जाणीव होऊन तो रडत असावा. जातिवंत घोडे देखील प्रदर्शनात होते. उंटांना सजवून ज्याचा उंट देखणा दिसेल  त्यांना बक्षीस देखील दिले जाते.
आम्हाला जेवढे जमेल तेवढेच आम्ही फिरलो. कारण इतका प्रशस्त मेळा फिरायला वेळ आणि ताकद भरपूर हवी. टूरचाशेवटचा दिवस असल्याने आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. या मेळ्याला इथे खास महत्व आहे. कपडे-दागिने-आपापले प्राणी घेऊन स्थानिक लोक इथे मेळ्यामधे येतात . प्राण्यांसाठी खेळ देखील आयोजित केलेले असतात. प्राण्यांना बक्षीस दिले जाते. अनेक प्रकारची खाण्याची दुकाने, सर्कस, उंच झुलणारे पाळणे, उंट सवारी अशी अनेक प्रकारची दुकाने इथे एका ठिकाणी पहावयास मिळतातपुष्कर मेळ्यामधे प्रवेश केल्यावर आधी कुठे जाऊ हा प्रश्न पडला होता मेळ्यामधे आमच्या ग्रुपचे लोक वेगवेगळी विखरली गेली होती. नम्रता, बुदगे सर कुटुंब, अंजली आणि मी असे ५ जण सोबत फिरत होतो.   राजस्थानी वेषभूषा करून फोटोग्राफी केली. वाळवंटामध्ये उंट सवारी केली. त्यावेळी करण-अर्जुन चित्रपटाचे शूटिंग झालेले मंदिर एका डोंगरावर पहिले आणि त्यात असलेली हवेली आम्हाला पहावयास मिळाली.
आवळ्याच्या झाडांची बाग पहिली. लोकगीते ऐकली. विकावयास आलेले सैंधव मिठाचे मोठमोठेखडकांसारखे खडे पहिले. पहावं ते आमच्यासाठी अद्भुत आणि नवल होते. आणि हेच वेगळेपण पाहण्यासाठी आपण दुसऱ्याराज्यात जातो. त्यादिवशी  दुपारचे जेवण म्हणजे फलाहारच केला. काहींनी दालबाटीचा आस्वाद घेतला.  त्यानंतर फिरफिरफिरलो  आणि तेथील  पवित्र समजला जाणाऱ्या ब्रह्मा घाटावर  जाऊन आलो व  ब्रह्ममंदिराला भेट दिली. त्यानंतर मात्र वेळ संपत आली आणि आम्ही तिथला रिक्षा पकडून आमच्या बसजवळआलो. आमची एक्सप्रेस  अजमेरहून असल्याने आम्हाला पुन्हा १४ कि.मी  आमच्या बसने अजमेरला यावे लागले. रात्री ८च्या सुमारास आम्ही अजमेर-बांद्रा एक्सप्रेसमध्ये बसून पुन्हा मुंबईमध्ये आलो आणि मुंबईतून पुण्यामध्ये आलो. अश्याप्रकारेगुलाबी शहराची (जयपूरटूर) करून सगळ्यांचे चेहरे आंनदाने गुलाबी होऊन आले. आमचे टूर लीडर श्री रोहित सर यांना टूर उत्तम रित्या आयोजित करून उत्तम रित्या पार पाडल्याने आणि उत्तम फोटोग्राफी केल्याने त्यांना मनाचा मुजरा.टूरसाठी न आलेले आमचे लीडर्स श्री मंदार सर आणि श्री  राणे सर पुढच्यावेळी संपूर्ण राजस्थान ट्रिप आयोजित करावी ही विनंती आहे.  सागर धुमाळ कुटुंब. बांदल कुटुंब,सविता कुटुंब, रोहितसर-वैशाली आणि त्यांचे आईवडील, नम्रता, बुदगे सर, अंजली या  सर्व टूरकरांचे  उत्तम सहकार्याबद्दल विशेष कौतुक.