Wednesday 19 September 2018

आमचे बाबा आणि आमचे बाप्पा....


आमचा बाबा आणि आमचा बाप्पा-७० वर्षे पूर्ण
दिनांक १३ सप्टेंबर २०१८
ठिकाण - घोटगांव
बाबा आणि बाप्पा हे आजच्या लेखाचे शिर्षक अशासाठी आहे की माझे वडील आणि माझ्या वडिलांकडे दरवर्षी जो गणपतीबाप्पा येतो त्याचे वय सारखेच आहे. यावर्षी माझे बाबा आणि आमच्या आईच्या घरचे गणपतीबाप्पा यांना सत्तर वर्षे पूर्ण झाली
पूर्वी मोठी आणि संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आणि मुली लग्न होऊन सासरीच जात असल्याने मुलगा असणे, संपत्तीला वारस असणे फार महत्वाचे समजले जाई. त्या काळी समज गैरसमज म्हणा किव्वा काही म्हणा मुलगा हा हवा असायचा. त्यासाठी आमच्या घरात माझ्या माहेरात माझे आजीआजोबा मुलासाठी गणपती बाप्पाला नवस बोलल्याने माझ्या आजीला मुलगा हे रत्न बाप्पाने आजीच्या पदरात घातले त्यावर्षीपासून ते आजतागायत माझ्या माहेरात दीड दिवसाचा गणपती स्थापन करतात आणि कलशात रानातील गौरीच्या फुलाच्या गौराई देखील अडीच दिवस स्थापन करतात.

मला अजून आठवतेय माझ्या लहानपणापासून मी पाहत आलेय. आमच्या तालुक्यामध्ये खूप कमी लोकांकडे गणपती असायचा. मला असे वाटे की आमच्याकडे एकच गणपती असायचा कारण सगळे नातेवाईक, मुंबईचे मामा-मामी, गावचे मामा-मामी त्यांची मुले, माझ्या सहा आत्या त्यांची मुले आणि आक्खा गाव पहिल्या दिवशी आमच्याकडे पाहुणे येत असत.  गणपतीस्थापनेच्या पहिल्या दिवशी रात्री सगळे जागेच असायचो कारण बाप्पा पाहुणा आलेला असायचा. गावचे हनुमान भजनी मंडळ, त्या भजनासाठी भिवंडीहून आमच्या रामनानांचा मित्र शंकर त्याचा अजून एक मित्र आणि माझा आत्येभाऊ चंदर आप्पा आणि भजनीमंडळ अप्रतिम भजन सादर करीत असत त्यानंतर माझी आत्येबहीण आणि मामेबहीण यांच्यात त्यावेळचे कॅसेटवरचा रेकॉर्ड डान्स विरुद्ध कोळी डान्स अश्या नाचाची जुगलबंदी चाले. झिम्मा-फुगडी तसेच आमच्या लाडक्या गंमती शेवंती काकू,यशोदा वहिनी, माझी सर्वात लहान आत्या सखूआत्या आणि माहेरात आलेल्या सगळ्या माहेरवाशिणी गौरी गणपतीची ठराविक गाणी गाऊन जी व्यक्ती ढोलकी वाजवेल त्या ढोलकीच्या तालावर ठेका धरून फेर धरून नाचत असू. म्हातारी माणसे आणि इतर सगळेच भजन संपल्यावर मेंडिकोट  आणि इतर पत्त्यांचे डाव खेळत असत.पूर्वी करमणुकीचा खेळ म्हणून खेळत असत आजकाल जुगारी अड्ड्याप्रमाणे पत्ते खेळतात आणि असे होऊ नये असे मला स्वतःला वाटते. सार्वजनिक गणपतीच्या पाच दिवसांमध्ये गावप्रबोधनाचे चांगले कार्यं करू शकता किंवा पेटीच्या आणि ढोलकीच्या तालावर आपला जुना गणपतीचा नाच पूर्वीसारखाच आपण नाचायचो तसा बेभान होऊन नाचा बरे. काय मजा येते आणि काय आनंद मिळतो बघाच. आपला बाबा आणि गणपती बाप्पा दोघेही खुश होतील. पूर्वी ज्याला ज्यात इंटरेस्ट आहे ते ते खेळ तो खेळत असे. नाचमध्ये हळूहळू गरबा डान्स देखील येऊ लागला होता.एकीकडे बाप्पासाठी पातेलेभर रव्याचा तुपातील गोड शिरा असायचा, उकडीचे मोदक, उंडे चौघड्या असत,त्यातून शिल्लक राहिलेले आम्ही मध्यरात्रीपर्यंत भजन ब्रेक आणि गणपती डान्स ब्रेक मध्ये संपवत असू. मधेच एखाद्या वाहिनीला पातेलेभर चहा बनवायला लावून तो फस्त करत असू.  दुपारी प्रसाद म्हणून खूप लोक जेवून गेलेले असायचेच परंतु गणपतीची रात्र जागवायची मजा काही औरच होती. सगळीकडे आनंदी आनंद असायचा. अजूनदेखील तीच मजा तोच आनंद असतो
आजकाल गावातील गणपती आणण्याची संख्या खूप वाढली आहे. तसेच सार्वजनिक गणपती देखील स्थापला जातो. तरीही तीच मजा असते.
आपल्या घरी पहिला गणपती आणत असल्याने पहिला गणपती स्थापनेचा मान आपला असे आजदेखील आहे. म्हणजे भटजीबुवा आपल्याकडे पहाटे ते साडेचारला येत असत. गणपती बाप्पा आदल्या दिवशी संध्याकाळीच येऊन एका खोलीत विराजमान असत आणि पहाट होण्याची आणि बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची वाट पाहत असत. घरातील सर्व लहानथोर मंडळी पहाटे उठून आंघोळ करून नवे कपडे घालून गणपतीसाठी लागणारी फुले, दुर्वा, बेलपत्र  गोळा करत असू.माझे बाबा अंघोळ करून  पहाटे विहिरीवरून बाप्पापुरती एक-दोन कळशी पाण्याची स्वतः आणत असत. आमच्याकडे गणपती हा सण एक उत्सव असे आणि आहे. बाबा आम्हाला सर्वाना नवे कपडे आणत असत. आमच्या घरी खूप मोठे कुटुंब होते. माझी एक आत्या-आत्यानजी त्यांची पाच मुले आम्ही चार भांवंडे आई-बाबा-आजी असे आमचे मोठे कुटुंब होते आणि कायम पाहुणे चालूच असायचे त्यामुळे आमचे घर कायम भरलेले असायचे. बाकी काही असो आम्हाला लहान मुलांना पाहुणे असले की मजा यायची. थोडी अभ्यासाला सुटी मिळायची बाबांचा मार वाचायचा. बाबा खूप कडक शिस्तीचे होते. वयानी मोठ्या असलेल्या आत्यादेखील त्यांच्याशी पटकन काही सांगायला घाबरायच्या.  आमचा मुलांचं तर विचारूच नका काहीही सांगायचे असेल तर आई आणि आजीकडून ते बाबांपर्यंत पोहोचवायचे इतका दरारा होता. स्वच्छता,टापटीपपणा, रात्र व्हायच्या आत म्हणजे सातच्या आत घरात, जे घरात बनवलय ते चुपचाप खायचं. मोठ्यांचा आदर करणे, उलट बोलणे, खोटे बोलणे, बाहेर जाताना विचारल्याशिवाय जाणे, फिदीफिदी हसणे अशी एक ना अनेक बंधने आम्हाला असत, अजूनदेखील आम्ही हे सर्व त्यांचा आदर म्हणून  पाळतो . बाबा खूप रागीट आणि चिडखोर होते. ताकद तर इतकी आहे की आम्हाला एक लाफा लावला (फटका मारला) की आम्हाला घाबरून सुसु यायची. आपल्यावर रागवायचा,चिडायचा,वेळप्रसंगी फटका द्यायचा अधिकार आपल्या जन्मदात्यांना आहेच आहे. नाहीतर आजच्या आपल्या मुलांना काही सांगायची सोया नाही. 
मला सहा आत्या परंतु काका मात्र एकच आहेत. ते काका इयत्ता दुसरीत असताना माझे बाबांचे बाबा वारले. माझ्या बाबांच्या सगळ्या भावाबहिणींची जबाबदारी पार पाडावयाची असल्याने आणि जमीन जुमला भरपूर असल्याने शिवाय मुख्य व्यवसाय शेती हा असल्याने माझ्या बाबांना पर्यायाने इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शाळा सोडावी लागली. परंतु ते शाळेत शिकलेले पाढे, पावकी-निमकी आजदेखील   तोंडपाठ आहेत. गणित विषय पक्का आणि अक्षर देखील सुवाच्च होते,आहे.  जबाबदारी कमी असती तर माझे बाबा पुढे शिकून आज कुठेतरी मुंबईत ऑफिसर म्हणून रिटायर झालेले असते. असो. परंतु बाबांनी  सगळ्या बहिणींची लग्न चांगल्या घरी जमवून दिली. बहिणींच्या मुलींनादेखील चांगली स्थळे मिळवून दिलीयेत. शेवटी  गोष्टीला कोणी कसे घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. कारण कोणासाठी कितीही केले तरी ते कमीच पडते याचा अनुभव मीदेखील माझ्या आयुष्यात घेतला आहे, घेते आहे.वेळ पडली तर आजही ते शेतात काम करू शकतात इतकी एनर्जी त्यांच्यात आहे.  माझ्या नजरेत माझे आई-बाबा महानच आहेत. 
आम्हाला आजपर्यंत कोणत्याही वस्तूची कधीही कधीही कमी पडू दिली नाही. गरिबीचा दिवस काय असतो आम्हाला माहितीच नाही. अर्थात या सर्वाला माझ्या आत्या-आत्यानजी आणि माझ्या सर्व मामां-मामींची,काका-काकूंची   साथ सोबत मिळाली. माझे मोठे मामा मधुमामा आज या जगात नाहीत एका अपघातामध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. परंतु माझे बाबा आणि माझे मामा खूप चांगले मित्र होते. कुठेही गेले तरी सोबत जाणार. आज मी पुण्यात आहे ते माझ्या बाबा आणि मामांमुळेच. त्यांनीच स्थळ पाहून योग्य ठिकाणी आपली भाची दिली. आज माझे मामा असते तर माझे मिस्टर डी.  पी. यांची प्रगती पाहून आणि एकंदरीतच माझा आणि माझ्या सर्व भावंडांचा  आयुष्याचा प्रवास पाहून खूप खुश झाले असते. माझ्या मामांनी  भावंडांसाठी भाच्यांसाठी तर खूप काही केले परंतु ठाण्यासारख्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे एक घर नात्यातील मुलामुलींना खास शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी राहण्यासाठी फ्रीमध्ये दिले होते. हॅट्स ऑफ टु माय मामा.वर्षानुवर्षे त्या घरात कोणी ना कुणी राहून शिक्षण घेत होते आणि नोकरी करीत होते.   मामा जितके सर्वांसाठी झटत होते तसेच माझे आई-बाबा-आजी देखील सर्वांसाठी झटत होते.माझी आजी साधा परंतु चविष्ट,उत्तम स्वयंपाक करायची या सर्वांच्या  उपकाराची परतफेड आम्ही  या जन्मी तरी करू शकत नाही. आज आम्ही सर्व भावंडे जी पण आहोत ती त्यांच्याच आशिर्वाद आणि कष्टामुळे आहोत. ज्याची जशी बुद्धिमत्ता जशी आवड तसा तो शिकत गेला. मी माझे नवी मुंबईचे एल.एन. पाटील काका-काकी, दादरची माझी लाडकी पुष्पा मावशी, वसईचा अशोक मामा, ठाण्याचा बबन मामा, आणि माझा मोठा मामा मधू मामा या सर्वाकडे राहून शिक्षणाचे धडे घेतले आणि यांच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकले. तसेच माझ्या काही बुकं शिकलेल्या परंतु अनुभवाने खूप मोठ्या असलेल्या माझ्या लाडक्या आत्या-अत्यानजी. आत्येभाऊ-बहिणी, मामे भाऊ-बहिणी, सगळ्या वाहिन्या, सगळे भाऊसगळे मित्र, सगळ्या मैत्रिणी आणि माझे यजमान,मुले आणि माझा सासर यांचा माझ्या आयुष्यात मोलाचा वाटा आहे. तसेच आम्हा भावंडांच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा खूप मोठा फायदा असतो आणि माणसांमध्ये प्रेम जिव्हाळा देखील तितकाच असतो. मोठे होत गेलो कुटुंब विभक्त होत गेले.तरीही आजदेखील तीच आपुलकी आहे. फरक इतकाच आहे की जो तो आपापल्या आयुष्यात इतका मग्न झाला आहे की आपण फक्त आपले तीन-किंवा चार व्यक्तींचे कुटुंब इतकाच विचार करतो. आपले आईवडील आजी-आजोबा काका काकू आत्या-आत्यांजी आते-बहिणी, मामे-बहिणी चुलतबहिणी या सगळ्यांपासून थोडेसे दुरावलो आहोत. तरीहीदेखील फेसबुक आणि वॉट्सअँपमुळे पुन्हा एकदा सगळॆ कनेक्टेड राहू लागले आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजच्या व्यस्त आयुष्यात आपण आपल्या आईवडिलांना म्हणावे तशी वागणूक देत नाही, म्हणावा तसा वेळ देत नाही आपल्या आईवडिलांना आता उतार वयात काय हवे ? तर फक्त त्यांची विचारपूस करणे, त्यांना वेळेवर जेवायला देणे त्यांची काळजी घेणे, इतकेच आपल्या आईवडिलांना अपेक्षित असते त्यांना सुख देता येत नसेल तर किमान दुःख देऊ नये. असे मला वाटते.  शहरातील आजकाल बरेच म्हातारे आईवडील वृद्धाश्रमात पाहावयास मिळतात. अशी परिस्थिती कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये असे माझे आणि माझ्या यजमानांचे मत आहे. मी माझ्या सासरच्या मंडळींसाठी जेवढे करता येईल तेवढे साधेपणाने केले. आज सासू-सासरे या जगात नाहीयेत परंतु त्यांची मुलं-मुली आहेत त्यांचे जितके जमेल तितके करतो. आजच्या गडबडीचा आयुष्यात एकत्र जमून सगळे सण साजरे करतो. सासू सासऱ्यांच्या जास्त जीव त्यांच्या मुली आणि जावयांमध्ये होता. आणि आमच्या आईबाबांचा जास्त जीव त्यांच्या मुलं आणि सुनांमध्ये नातवंडांमध्ये आहे. शेवटी दोन्हीकडे मी जराशी नावडती झालेय कारण मी एकटी जगायला शिकले आणि वेळेअभावी नातेवाईकांकडे जाणे कमी झाले शिवाय काहींच्या मते मी थोडी आगाऊ झाले आहे. आईवडील बोलून दाखवत नसले तरी त्यांचे आपल्यावर कायम प्रेम असते. आता त्यांना आपल्या प्रेमाची जास्त गरज आहे. 

मी तर गावाला माझ्या माहेरी गणपतीसाठी १३ वर्षांपूर्वी गेले असेल. रक्षाबंधन,दिवाळी,भाऊबीज सगळे सण सासरीच साजरे केले. सासरच्या लोकांमधेच भाऊ-बहीण आहेत असे मानून सगळे सण आजतागायत सासरीच साजरे केले. त्यामुळे अगदी असंच्या असं नाही परंतु माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना मायेची, प्रेमाची विचारपूसची गरज आहे  ती त्यांच्या मुले आणि सुनांनी त्यांना द्यावी. कारण आपल्यावर प्रेम करताना आपल्यासाठी कोणतीही वस्तू आणताना आपल्याला खाऊ-पिऊ घालताना आपल्या आईवडिलांनी कधीही कसलाही विचार केलेला नसतो. आपण आपल्या आईवडिलांना जशी वागणूक देऊ तशी आपली मुले आपल्याला म्हातारपणी वागणूक देतील. खरंतर हे सर्व माझे भाऊ-वाहिनी करत आहेत ते असेच अविरत आईबाबाच्या हयातीपर्यंत त्यांनी करावे असे आम्हा मुलींना वाटते.आमचं बहिणीचं काहीही केले नाही तरी चालेल. 
कारण आम्ही मुली कितीही इच्छा असली वर्षातून एकदा-दोनदा माहेरी जाणार त्यात सगळयांना भेटण्यात वेळ जातो त्यावेळी आईवडिलांना भेटतो तितकेच. त्यामुळे जरी आजकाल वेगवेगळे राहत असले तरी भाऊ-वाहिनी सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतात त्यामुळे आम्हा मुलींपेक्षा जास्त तेच त्यांची सेवा करू शकतात.
आपण आपल्या मुलांचे, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे वाढदिवस साजरे करतो. सर्व मित्रमंडळींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतू आपल्या आईवडिलांचे वाढदिवस आपल्या लक्षातदेखील नसतात. माझे आई-बाबा माझ्याकडे आल्यावर मी आणि माझे मिस्टर आम्हाला जमेल तसा वेळ त्यांच्यात घालवतो. यावर्षी माझ्या बाबांना सत्तर वर्षे पूर्ण झाली त्यासाठी मला त्यांचा वाढदिवस साजरा करू वाटत होता.  गणपतीला सगळ्यांनी गावाला नक्की या यासाठी दरवर्षी ते फोन करतात  परंतु कित्येक वर्षे आमचे गणपतीसाठी माहेरी जाणे झाले नाही. माहेरचा गणपती त्यांच्याच नवसाचा असल्याने माझ्या डोक्यात एक कल्पना आली की कधी नाही ते एक दिवस सगळ्यांना सुटी आहे तर आपण बाबांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करू शकतो. परंतु गावी कोणालाही सांगायचे नाही सरप्राईज द्यायचे आणि अचानक जायचे असे ठरवले. मी माझे मिस्टर  आम्ही आईबाबांसाठी छोटीसी काहीतरी एखादी भेटवस्तू,  लहानांना खाऊ आणि गणपतीबाप्पाला पेढ्याचा मोदक आणि एक मोठा केक घेऊन गणपतीस्थापनेदिवशी सकाळी पुण्याहून निघून ठाणेमार्गे गावी निघालो

सकाळी साडेदहाच्या सुमारास आम्हाला चौघांना दारात पाहून बाबांना आणि सगळयांना खूप आनंद झाला. सरप्राईजचा आनंद बहुत वेगळा होता है बाबू. गणपतीची स्थापना नेहमीप्रमाणे सकाळीच झाली होती.प्रदूषणविरहित गणपतीसाठी सजावट केलेली पाहून मनोमन खूप आनंद झाला. 
गावातील मंडळी गणपतीच्या दर्शनासाठी येणे चालू होते.बाबांचे मित्र नारायण काका,सदू काका, उंदु काका तसेच गावातील खूप मंडळी हजार होती. आलेल्या थोड्या मंडळीला थांबवून आईबाबांना औक्षण करून पुण्याहून घेऊन गेलेलो केक आईबाबाच्या हस्ते कापला गेला. आईबाबाच्या हस्ते अश्यासाठी की बिचाऱ्या आईने आणि बाबांनी उभ्या आयुष्यात त्यांचे कधी वाढदिवस साजरे  केले नाही आणि आपली आई बाबांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी दोघांचे औक्षण करून दोघांच्या हस्ते केक कापून सगळ्या भावंडांकडून दोघांनाही एक छोटी भेटवस्तू देऊन सगळ्यांनी आईबाबांचा आशिर्वाद घेतला. असा मनात आणलेला छोटासा वाढदिवस साजरा केला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. शिवाय आम्ही भावंडे कधीं नाही ते एकत्र आलो. (फोटोमध्ये का होईना)



आपल्याला जे आपल्या आईवडिलांसाठी आपल्या आप्तस्वकीयांसाठी करू वाटते ते ते त्यांच्या हयातीत असेपर्यंत करूयात. नंतर पितृपंधरवड्यात तर आपण पूर्वजांना कागवास  देतोच. परंतु जिवंतपणी आपण त्यांच्यासाठी जे आनंदाचे क्षण आणू तेच त्यांच्या लक्षात राहणार आहेत असे मला वाटते. आपल्या आईवडिलांच्या कर्तृत्वापुढे हे फार छोटे कार्य आहे तरीही प्रत्येक मुलामुलींनी आपल्या आईवडिलांसाठी वाढदिवसच करावे असे काही नाही परंतु एरवी आणि उतारवयात आनंदाचे क्षण नक्की त्यांना द्यावेत.

अश्याप्रकारे कित्येक वर्षांनी माहेरच्या गणपतीबाप्पाची आरती माझ्या मिस्टरांच्या हस्ते झाली.   केळीच्या पानांच्या पंगतीवर सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि बाबांच्या शेततळ्यावर आणि भावांच्या शेतात एक चक्कर मारून घरी येऊन चहा घेऊन आणि आठवण म्हणून खूप सारी फोटोग्राफी करून सर्व मंडळींना भेटून निरोप घेऊन पुणेरी पुणेकर पुण्याकडे रवाना झाले बरं का....