Thursday 25 March 2021

चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक

 

चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक

ठिकाण - जावळी खोरे, महाबळेश्वर,

डोंगररांग महाबळेश्वर,

चंद्रगड उंची- २३३७ फूट

आर्थरसीट उंची-४७२१ फूट

डोंगरयात्रा ट्रेक ग्रुप,

दिनांक - १४मार्च २०२१

दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही मधुमकरंदगड केला होता तेव्हा जावळीखोऱ्याची खूपच ओढ लागल्यागत झाले होते. माउंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणेचे आमचे लीडर मंदारसर बरेचदा सांगायचे की आम्ही आर्थरसीट ट्रेक केला तेव्हा इतका भारी अनुभव आला होता. असलं भारी वाटलं होतं वगैरे,वगैरे. ते असलं भारी वाटलं होतं ते मला कधी अनुभवायला मिळेल याची मी आतुरतेने वाट पाहत होते. मागच्या महिन्यात महाबळेश्वरला एक दिवस भेट दिल्यानंतर पुन्हा तो आर्थरसीटट्रेकचा विचार डोक्यात घिरट्या घालतच होता. लोडविकपॉईंट वरून आजूबाजूला दिसणाऱ्या त्या घाटवाटा पावलांना साद घालत होत्या. आपण अश्या वाटेने कधी ट्रेक करणार हाच विचार सारखा मनात येत होता. जसे खवय्यांचे लक्ष कायम चांगल्या मेनूकडे वळते,  कुठे काय काय खास खायला मिळेल याकडे असते. लग्न झालेल्या मुलामुलींचे लक्ष कायम चिकण्या शिकाराकडे असते,वाचकांचे लक्ष कायम चांगल्या पुस्तकांच्या शोधात असते,तसेच आपल्या डोक्यात कायम नवीन आणि वेगळा ट्रेक कधी करायला मिळेल याकडे असते.

डोंगरयात्रा टेकग्रुपचा चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेकची इव्हेंट नजरेस पडली डोक्यात वळवळत असलेला कावळा लोळायला लागला कारण हाच तो ट्रेक आणि हाच तो मार्च महिना माझ्यासारख्या साध्या ट्रेकरचा आणि सगळ्यांचा धूर काढतो. ऑफिसात काम करणाऱ्यांचा आणि ट्रेक करणाऱ्यांचादेखील घाम आणि धूर एकसाथ काढत असतो तो मार्च महिना. ज्याला विचारावे तो हेच म्हणू लागला की ट्रेक मोठा आणि कठीण आहे. हे सगळे जरी मान्य असले तरी अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. आम्हाला सध्या रेंजट्रेक करायचा नादच लागलाय.आमची गॉगल गॅंग आणि डोंगरयात्राग्रुप असला की कठीण गोष्टदेखील सोपी होऊन जाते.म्हणता म्हणता आमच्यागॅंगचे पाच ट्रेकर्स तयार झाले.बाकी आता काय होईल ते ट्रेकला गेल्यावर बघू. १३ मार्चला रात्री दहाचा सुमारास कोरोनासंदर्भातील मूलभूत तपासणी करून निगडीहून निघून चाफेकर चौक,डांगे चौक,चांदणी चौक, खंडाळा, सातारा असे सगळ्या स्टॉपवरचे ट्रेकर्स जमा करीत वाईमार्गे पहाटे चारच्या सुमारास आम्ही जावळीखोऱ्यातील उमरठ येथे पोहोचलो.सगळे साखरझोपेतच होते. उमरठला बसमधून उतरल्यावर समजले की मुंबईची गॅंग देखील आहे. आम्ही ट्रेकग्रुपच्या खाजगी वाहनाने गेलो त्यामुळे आम्हाला वाहनांच्या वेळा पाहण्याचा त्रास झाला नाही. तुम्ही सरकारी वाहनाने जाणार असलात तर पोलादपूर वरून १२.३० वाजता उमरठमार्गे ढवळेला जाणारी एक एस. टी. आहे.

उमरठ येथील तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांचे स्मारक 

उमरठ म्हणजे तानाजी मालुसरे यांचे स्मारक असलेले गाव आहे. तानाजी मालुसरे यांचे बालपण सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उमरठ म्हणजेच त्यांचे शेलारमामा यांच्या गावी गेले. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.तानाजी मालुसरे असे नाव घेतले की लोकांना त्याच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते.तानाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मढेघाट म्हणतात.स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठ या गावात येऊन ते राहिले होते. या भागातील लोकांशी आपुलकीने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले.(सर्व माहिती नेटवरून वाचून  घेतली  आहे )  

तानाजींची स्मारके-तानाजी मालुसरेच्या स्मृतीप्रित्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

रायगड जिल्ह्यातील उमरठ ह्या गावीही त्यांचा पुतळा स्मारक उभारण्यात आले आहे शिवाय उमरठ येथे शेलारमामा यांचेदेखील स्मारक उभारले आहे.

कवलापूर (ता. मिरज जि. सांगली) या गावात नरवीर तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. (सर्व माहिती नेटवरून साभार)

मालुसरे म्हंटलं की मला तर वाटले आम्ही सोलो ट्रेलर,क्लायम्बर सुरज यांच्याच गावी पाहुणे म्हणून निघालोय की कायकाय सांगावे हे कधी कोणत्या जंगलातून, कोणत्या खिंडीतून वाघासारखे समोर येतील.

त्या पहाटेच्या शांत वातावरणात ट्रेकलीडर रवीसरांनी तानाजी मालुसरे स्मारक, शेलारमामा स्मारक, नरवीर तानाजी मालुसरें इतिहास याविषयी खूप छान सविस्तररीतीने माहिती दिली. सर,तुमचा गडकिल्ले आणि इतिहासाविषयीचा अभ्यास खूप चांगला आहे. ट्रेकदरम्यान गडकिल्ल्यांविषयी माहिती गोळा करायची असेल तर इच्छुकांनी शक्यतो रवीसर किंवा गाईड असेल तर गाईडसोबत थांबावे. बॅग पॅकिंग, ट्रेकिंग बूट, तांत्रिक गोष्टी मनोजसरांकडून ऐकाव्यात. मनोजसर, चंद्रगडनंतरच्या जंगलात तुम्ही ट्रेकबॅग, ट्रेकबूट, ट्रेकर्सनी ट्रेकदरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी जी माहिती दिलीत ती ट्रेकदरम्यान नेहमीच देत जावा. फार गरजेचे आहे ते नाहीतर काही ट्रेकर्स ट्रेकला फार सोपा समजून सस्त्यात घेऊन लीडरना रस्त्यात आणत्यात. ट्रेक छोटा असो की मोठा आपण आपल्या पूर्ण तयारीनिशी यायलाच हवे. मान्य आहे ट्रेकचा पल्ला मोठा असेल तर वजन थोडे कमी असेल तर बरे वाटते. परंतु आपले वजन कमी करण्यासाठी आपले थोडे थोडे सामान इतरांच्या बॅगेत नाही टाकायचं. निसर्गाच्या सानिध्यात येतो तर निसर्गाचा आस्वाद घेऊ, माहिती घेऊ, फोटोरूपात आठवणी घेऊ नुसताच रटाळ ट्रेक नाही करायचा. ज्यालात्याला आपली ट्रेकसॅक आपली बॅग वजनच वाटत असते. त्यासाठी कोणती बॅग आणायची सामान कसे पॅक करायचे ते लीडर्सना विचारून घ्या. ह्या खूप छोट्या आणि बेसिक गोष्टी आहेत परंतु प्रत्येक ट्रेकरने हे छोटे नियम पाळले तर सर्वांना सोयीस्कर होईल.


स्मारकावर माथा टेकून आम्ही ढवळे या गावी निघालो. माझे लक्ष तो कच्चा रस्ता, ती छोटी-छोटी मातीची घरे, ते गावात पोहोचलेले प्रकाशाचे दिवे, घराशेजारी असलेल्या पेंड्याच्या राशी.( धान्याच्या तणाच्या राशी) ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने भातशेती हा व्यवसाय असल्याने शेतातील भात कापून,सुकवून,झोडून झाल्यावर गुरांच्या पायाच्या सहाय्याने अथवा यंत्राच्या सहाय्याने ते तण मळून तयार केलेल्या लाट्यांना पेंडा असे म्हणतात. गुरांना चारा म्हणून याचा वापर होतो. तसेच कुडाची, मातीची घरे असतील तर पावसापासून संरक्षण होण्यासाठी घराच्या छतावर ह्या पेंड्याच्या राशी ठेवतात. पूर्वी तर भांडी घासायला देखील हा पेंडाच वापरत असत.शेतकऱ्याच्या शेतातील एकूण एक वस्तू जिन्नस वापरात येणारेच असतात.मी एक शेतकरी आहे आणि स्वतःला फार नशिबवान समजते. खाजगी वाहन किंवा एस. टी. यापैकी कोणत्याही पर्यायी वाहनाद्वारे ढवळे या चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचता येते.ढवळे गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई किंवा पुणे येथून पोलादपूर गावी जावे. पोलादपूरवरून ढवळे गाव अथवा उमरठला येणारी एस.टी पकडावी. उमरठ गावाहून ढवळे गाव साधारण कि.मी. अंतरावर आहे. गाईड पप्पू दादा म्हणाले की गावात विचारले असता आपल्याला मराठा तलवारी पट्टा एका दुकानदाराकडे पहावयास मिळतील. पोलादपूर/महाड बस स्थानकातून संध्याकाळी ढवळे गावासाठी थेट बस सुटते. ती बस मुक्कामी असून रात्री ढवळे गावात थांबून सकाळी परत जाते. आम्ही नास्ता करण्यासाठी जिथे थांबलो होतो तिथे ही एस.टी. उभी असलेली मी पाहिली. अशा वेळी मला गावची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मला अजूनही एस. टी.चा प्रवास आवडतो. प्रत्येक थांब्यावर स्पीड ब्रेकर आल्यावर मागच्या सीटवर बसून उंच उडण्याची मजा काही वेगळीच असते. ढवळे गावात पोहोचल्यावर फ्रेश होऊन गाईड पप्पू कदम यांचेकडे आम्ही चहा नास्ता केला आणि दुपारचे जेवण डब्यात भरून घेतले. इतक्या पहाटे ४०-४१जणांचा नास्ता जेवण बनवून तयार ठेवणे म्हणजे खरंच कमाल आहे. ट्रेकलिडरनी ट्रेकविषयी आवश्यक सूचना देऊन सकाळी सहा वाजता अंधारातच ट्रेक सुरु केला. सगळ्यांचे हेड टॉर्च लक्ख चमकत होते. रात्रीच्या चांदण्यात ट्रेक करणे किंवा खूप सकाळी ट्रेक सुरु होण्याचा आनंद खूप वेगळा असतो. जास्त अंतर कमी वेळात पार केल्याचे आत्मिक आणि सात्विक समाधान मिळते.

स्वराज्य मिळवताना सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी "चंद्रगड/ढवळगड/गहनगड"हा जावळी खोऱ्यातील एका उंच ठिकाणी बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला पारघाटाचा प्रशस्त परिसर यांच्या दाटीत जावळीचे खोरे वसलेले आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल खोल दऱ्यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोऱ्यावर मोरे घराण्याने पिढ्यानपिढ्या राज्य केले. त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता. त्यावरूनच या किल्ल्याचे नाव चंद्रगड ठेवले असावे.

ओळख परेड आणि ट्रेकविषयी महत्वाच्या सूचना देताना लिडर मनोज सर आणि रवी सर 

पहाटेच्या अंधारात चंद्रगड बिलकुल दिसत नव्हता. सूर्य उजाडल्यावर मात्र स्पष्ट दिसू लागला. चंद्रगडावर तुरळक झाडे आहेत असे पायथ्यापासून दिसत होते. पायथ्याशी ट्रेकर्सची ओळखपरेड झाल्यावर पुन्हा चढाईला सुरुवात केली. यावेळी लीडर्सची गावची गॅंग सातारकर होते, हिमालयन ट्रेक करणारे ट्रेकर्स होते, लिंगाणा वैगेरे करणारे ट्रेकर्स होते, या आधी चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक केलेले ट्रेकर्स होते. फक्त आम्हीच एकदिवसीय ट्रेक करणारे साधे,गरीब ट्रेकर्स होतो त्यामुळे ट्रेक पूर्ण होईपर्यंत थोडीशी धाकधूक होती. कारण माघारी यायची संधी नव्हती. माघारी कोणाला यायचे असते म्हणा.?? एकदा गेले की ट्रेक पूर्ण करूनच यायचे नाहीतर मग जायचेच नाही. असे आम्ही सध्या तरी ठरवले आहे.




चंद्रगड चढताना बऱ्यापैकी खडा चढ आहे,कुठेही रेलिंग नाही तेच बरे आहे. इकडे फार ट्रेकर्स येत नसल्याने वाट जेमतेम दिसते.

गडावरील पाहण्यासारखी ठीकाणे- चंद्रगड हा मध्यम श्रेणी असलेला गड आहे. खडा चढ आल्यावर "चंद्रगड दर्शन" असा मोठा फलक  लावला आहे. चंद्रगडाच्या चढावर थोडा घसारा असून गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी मळलेली वाट आहे. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक छोटा रॉकपॅच पार करून साधारण दीड तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.गडमाथ्यावर सपाटी असून, चढ चढून गेल्यावर समोर दिसते त्या पायवाटेने पुढे चालत रहावे. या पायवाटेच्या उजवीकडे वरच्या बाजूस एका चौकोनी खड्डयात दगडामध्ये कोरलेले शिवलिंग आणि नंदीची अतिशय रेखीव मुर्ती आहे.नंदीच्या मूर्तीला हारफूले अर्पण केलेली होती.  गावकऱ्यांसाठी हे श्रद्धेचे स्थान असून महाशिवरात्रीला येथे पूजा-अर्चा देखील करण्यात येते. सकाळची सूर्यकिरणे सर्वत्र पसरली असल्याने वातावरण प्रसन्न आणि गार होते.  याच पायवाटेने थोडा चढ चढून गेल्यावर आयताकृती पाण्याचे टाके लागते. ज्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्याच्या वरच्या अंगाला असलेल्या चौथऱ्यामध्ये अजून एक शिवलिंग आढळून आले.


पुढे चालत असताना दोन्ही बाजूने तटबंदी बरीचशी ढासळलेली आहे. ठिकठिकाणी काठीला अडकवलेले भगवे फडकताना दिसत होते. डाव्याबाजूकडील तटबंदीवरून खाली पाहिल्यास अजून पाण्याची टाकी दिसतात, परंतु तिथे पोहोचण्याची वाट अत्यंत कठीण आहे. माझी गडकिल्ल्यांवरची दिशा समजायला कायम गफलत व्हायची आता त्या दिशा थोड्या समजू लागल्यात.
आयटी जोडी गहन विचारात 


सूर्य उगवलाय त्यानुसार मीच दिशा समजून घेतल्या. गडमाथ्यावर उत्तरेकडे पुढे चालत असताना उजव्या बाजूस काही चौथऱ्याचे अवशेष देखील पाहावयास मिळतात. त्यातील एका ठिकाणी पाटा-वरवंटा दिसतो. या चौथऱ्यांना उजवीकडे ठेवत पुढे गडाच्या उत्तर कड्याच्या दिशेने चालत जाऊन आम्ही काहीजण थोड्या पायऱ्या उतरल्यावर उजवीकडे थंडगार पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. गडावर रहाण्याची आणि जेवणाची तशी सोय नाही, परंतु पायथ्याशी असलेल्या ढवळे गावात किंवा गावात असणाऱ्या मंदिरात एक रात्र रहाण्याची सोय होऊ शकते. आपण-आपले जेवण सोबत घेऊन गेलेलेच बरे. गडावर असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांपैकी एका टाकीतले पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु इकडे ट्रेकर्सचे सतत येणे-जाणे नसल्यामुळे तेथील पाणी पिण्यायोग्य आहे का?ते तपासून घ्यावे. आपल्याकडे आपले पाणी असलेले बरे.

येथील पाण्याच्या टाक्याचा आकार अगदी गरुड पक्षाच्या आकाराप्रमाणे आहे. या टाक्याच्या पुढे अजून एक टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गाईडच्या मतानुसार किल्ल्यावर एकूण १४ टाकी आहेत, परंतु आपण पूर्ण गड कोपरा कोपरा निवांत फिरलो तरी आपल्याला ११ टाकीच नजरेस पडतात.आम्हाला तर दोनच पाण्याची टाकी दिसली. गडावरून मंगळगडाचे दर्शन होते शिवाय गडावरून ढवळी नदीचे प्रशस्त पात्र दिसते परंतु सध्या ही नदी कोरडी आहे मी लगेच कल्पनाविश्वात जाते. पावसाळ्यात इथे खूपच सुंदर दृश्य असेल. चंद्रगडावरून आजूबाजूचा परिसर मात्र सुंदर रमणीय दिसत होता आणि नेहमीप्रमाणे मला तर इथेच बसून रहावे वाटत होते. पर ऐसा कभी हो नहीं सकता आम्हाला बहिरीची घुमटी आणि आर्थरसीट गाठायचा असल्याने सगळे ट्रेकर्स आल्यांनतर आम्ही ह्याव फोटो-त्याव फोटो काढून अर्ध्या तासात चंद्रगडावरून निघालो.



चंद्रगडावरून खाली उतरताना अर्ध्यात आल्यावरच उतरताना गडाच्या दक्षिणेला वळून थोडासा घसरडा ट्रॅव्हर्स पार करून जावे लागते. नंतर लगेचच घळीतून नुसता घसारा करीत उतरत होतो. सोबत काठी असली की उतरताना गुढग्यांवर लोड कमी येतो असं म्हणतात. मी पहिल्यांदाच डी-कॅथेलोन मधून ट्रेकची काठी आणली परंतु मला त्या काठीची सवय नसल्याने थोडीशी दिक्कत होत होती.
यंदा कर्तव्य आहे 



घळीमध्ये एका ठिकाणी दगडात काठी अडकली होती तर मी डोक्यावर पडू नये म्हणून चेंडूसारख्या चारपाच उड्या मारल्या असतील आणि पाठीमागचे ट्रेकर्स सॉल्लिड हसले असतील. हसू देत पण माझं डोकं वाचलं  बरं का? त्या घळीतून उतरताना सुरुवातीला घसारा,घसारा आणि घसारा होता. मी मागे थांबून सगळं शूटिंग करायला हवे होते मजा आली असती लै लोक घसरले होते. घळीतून उतरताना सगळ्यांचेच धाबे दणाणले होते कारण बहिरीची घुमटी आणि तो आर्थरसीट बाबा काही दिसत नव्हते.घळ उतरतानाच इतका घाम गळत होता की इथेच आता आमचे पाणी,ओआरएस संपतंय की काय असे वाटू लागले.
कधी पोहोचायचो आम्ही चंद्रगडवर गहन विचारात असलेले गाईड डोक्याला हात लावून बसलेत 
अर्धी घळ उतरलो सकाळचे साडेदहा वाजले असतील.घळीतून उतरताना सगळेच चक्रावून गेलो होतो.घनदाट जंगल असल्याने पुढची वाट चुकू नये यासाठी सगळे येईपर्यंत थांबून थांबून चालत होतो. कशीबशी ती घळ पार झाली. पूर्ण घळ उतरून खाली गेल्यावर एक ट्रेकरला त्रास होऊ लागला. तिथून वापस जायचे म्हणजे त्याला सुखरूप नेले पाहिजे त्यासाठी दोन गाईडपैकी एका गाईडला त्याच्यासोबत देऊन ढवळे गावात पाठवले आणि आम्ही पुढे चालू लागलो. आम्ही गाईडच्या वेगात चालण्याचा प्रयत्न करीत होतो परंतु गाईडचा स्लीपर घालून देखील चालण्याचा वेग आमच्याहून अधिक होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाईडना आम्हाला आर्थरसीटवर पोहोचते करून एकट्याला माघारी ढवळे गावात जायचे होते. ही गोष्ट मात्र कमालच होती. किती वाजले असतील इतके अंतर पार करायला त्यांनाच काय माहित.  गाईडनी माझी सॅक अधूनमधून घेतली त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद. मी अडचणीत असल्यावर कोणीतरी असा देवमाणूस मला भेटोतच. ट्रेकमधील प्रत्येकाकडे आपली सॅक असतेच. त्यामुळे आपण त्रास होत असताना इतर कोणाकडे आपली सॅक देणे बरोबर नाही. गाईडकडे वजन कमी असते शिवाय त्यांना हे जंगल, ऊन, घाटवाट, दरीखोऱ्या हे थोडे सवयीचे असते. तरीही मी त्यांच्या परवानगीने माझी सॅक त्यांचेकडे अधूनमधून दिली त्यामुळे मला वीडेओशूट,निसर्गाचे फोटो काढणे थोडे सोप्पे गेले. गाईडच्या वेगाने चालल्यामुळे गडकिल्ल्यांची माहिती देखील मिळते . 
त्यादिवसाचे ग्रेट गाईड पप्पू कदम 

आताचे मात्र पाणी संपत आलं होतं. बहिरीच्या घुमटीवर पाणी आहे हे माहित होते. परंतु तिथपर्यंत जायला देखील अवसान नव्हते. दोन मिनिटे चालल्यावर लगेच थांबत होतो. पी पाणी पी आर एस करून पायाच्या पिपाण्या वाजू लागल्या होत्या. आम्ही थोडेच लोक पुढे होतो. जंगलामुळे सगळेच दिसत नव्हते. आम्ही आपला आवाज देत पुढे जात होतो. आलोच असा आवाज आला की आम्ही थोडे पुढे सरकत होतो. खूप पुढे गेल्यावर बहिरीच्या घुमटीच्या उंचीच्या  लेवलला  आम्ही आलो होतो आणि या ठिकाणाहून चंद्रगड स्पष्ट दिसू लागला होता. कारण आजूबाजूला इतका मोठा निसर्गाचा पसारा होता की चंद्रगड आता छोटासा दिसत होता विश्वास बसत नव्हता आम्ही इतक्या उंचावर आलोय. राहुलने अर्धा किलो ग्लुकॉन-डी आणले होते त्याचे सरबत अधून मधून मिळत होते. माझ्याकडे सुकवलेली फळे असतात ती उपयोगात येत होती. अशा रखरखत्या उन्हात शरीराला पाणी साखर मीठ फार गरजेचे असते. थोडे थोडे पाणी प्यायचे हा नियम अशा ठीकाणी चुलीत जातो बरं का. कारण माहित होते बहिरीच्या घुमटीवर कसे का असेना पाणी मिळणार आहे ते कितीही गढूळ असले तरी गाळून पिऊ परंतु आता आहे ते पाणी प्यायल्याशिवाय राहवत नाही. कविता दिनेश मागे राहिल्याने हुरहूर लागली होती आम्ही होतो तिथे मात्र झाड साऊली काही नसल्याने थांबावे पण वाटत नव्हते. आणि दुपारचा एक कधी वाजून गेला होता हे कळलेदेखील नाही.

दुपारी एकच्या सुमारास बहिरीच्या घुमटीच्या उंचीला समांतर जागी आल्यावर तेथून दिसणारा चंद्रगड 

म्हणता म्हणता पाण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचत आलो. मी आपलं गाईडला सारखं-सारखं विचारीत असे किती राहिलं किती राहिलं ?? गाइडचं एकच उत्तर असे अहो, मी कितीही सांगितलं थोडं राहिलय थोडं राहिलंय तर ते काय कमी होणार आहे का?? जितकं चालायचं तितकंच चालावे लागेल. आणि पुन्हा म्हणायचे चला आता थोडेच राहिलेय. असं म्हणत म्हणत आम्ही पुढे असलेलो पाचसहा ट्रेकर दुपारी सवादोनच्या सुमारास बहिरीच्या घुमटीजवळ पोहोचलो. इतिहासकालीन मूर्तीनी आम्हाला दर्शन दिले.

बहिरीच्या घुमटीवरील मूर्ती 
गाईडला म्हटलं बाबा आधी त्या पाण्यापाशी ने आम्हाला आणि पाणी पिवूदे आधी. तो स्वतःदेखील थकला  होता तरीही त्याने आधी आम्हाला पाण्याच्या बाटल्या भरून दिल्या. ते पाणी थोडंसं पिवळसर दिसत होते तरीही थंडगार आणि चवदार होते. मी तर तिथेच सॅक आपटून आधी गटागटा पाणी पिऊन घेतले चेहऱ्यावर साठलेले टणभर मीठ धुवून काढले आणि पायातले बूट आणि सॉक्स काढून थंडगार पाण्याने पाय धुतले.
बहिरीच्या घुमटीवरील पिण्यायोग्य असलेले पाण्याचे टाके - अमृततुल्य 
अक्षरशः स्वर्गमयी,अमृततुल्य पाणी होते ते. पाणी प्यायलो पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि घुमटीच्या मूर्ती आहेत तिथे बसून जेवण केले. मला पाणी भरून घ्यायला आणि पाय रिलॅक्स करायला थोडा वेळ लागल्याने मी येईपर्यंत आमच्या गॅंगने जेवण करून घेतले होते त्यामुळे यावेळी मी घरच्यासारखेच एकटीनेच जेवण केले. ट्रेकमध्येच मी काय ते सगळ्यांसोबत एकत्र बसून हसत खेळत जेवण जेवत असते.म्हणून मला ट्रेक जास्त आवडतो. नाहीतर घरी मात्र एकटीच जेवत असते कारण आधुनिक युगात ज्याला त्याला माणसांपेक्षा टीव्ही जास्त महत्वाचा वाटतो. प्रत्येकाच्या नशिबात सगळ्या गोष्टी नसतात. एकत्र जेवणाची मजा काही औरच असते. खरेतर इतकं पाणी प्यायल्यावर जेवण करण्याची इच्छा नव्हती परंतु ढवळेकरांनी इतकं प्रेमाने आणि कष्टाने बनवून दिलेल्या भाजीभाकरीची चव तर घेतलीच पाहिजे.एक भाकरीमधली मी अर्धी भाकरी खाल्ली असेल. त्यात ती तांदुळाची उकडीची भाकरी जशी मी माझ्या घरी बनवते  तशी होती त्यामुळे दुपारचे जेवण म्हणजे स्वर्गसुख होते. अन्नदाता सुखींभव.

दूर दिसतोय तो आर्थरसीट पॉईंट 

आर्थरसीट पॉईंट हा महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारी सावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात ही सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर  टायगर स्प्रिंग, इको पॉईंट, एल्फिस्टन पॉईंट,आहेत.ह्या ट्रेकचे प्रामुख्याने टप्पे आहेत, ढवळे गाव ते बहिरीची घुमटी (बहिरीची घुमटी इथे काही प्राचीन मूर्ती आहेत) आणि दुसरा टप्पा बहिरीची घुमटी ते मढी महाल किंवा आर्थरसीट पॉईंट. पहिल्या टप्प्यात वाट सापडायला थोडी कठीण आहे, त्यामुळे प्रथमच जात असाल तर गावातून गाईड घेतलेले उत्तम (पप्पू कदम, संतोष) बहिरीची घुमटी ते आर्थरसीट पॉईंट वाट मळलेली आहे. चुकण्याची शक्यता फार कमी आहे. वरच्या टप्प्यात घसारा खूपच जास्त आहे त्यामुळे पायात चांगले ग्रीपवाले बूट असणे फार गरजेचे आहे. घनदाट जंगल देखील आहे त्यामुळे फुलबाहीचेच टीशर्ट असावे. टोपी, पंचा, काठी, किमान चार लिटर पाणी, आरएस हवेच, शक्य असल्यास संत्री, मोसंबी, द्राक्ष, यासारखी फळे नाहीतरी माझ्याकडे असतात तशी सुकवलेली फळे, खजूर अश्या खायच्या गोष्टी जवळ ठेवाव्यात. मी या वेळेस पाण्याची पिशवी (ब्लॅडर)आणि ट्रेकस्टिक घेतली ती फार उपयोगी पडली. या दोन गोष्टींची आठवण करून दिल्याबद्दल कविता आणि तुषार, दिनेश, राहुल तुमची मी आभारी आहे. बहिरीची घुमटी वरून थोडेसेच पुढे गेल्यावर आहे. पाण्याची टाकी वाटेच्या डाव्या बाजूला दिसतात. ह्याला जोरचे पाणी म्हणतात कारण इथून एक वाट जोर गावात उतरते. बहिरीची घुमटी सोडून वाटेत कुठेही पाणी नाही.पहिल्या टप्प्यात दाट झाडी असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. पण बहिरीची घुमटी पासून पुढे थोडा उन्हाचा त्रास होऊ शकतो.  चढण असल्याने बऱ्यापैकी दमछाक होते. चंद्रगड करून अथवा त्याला नुसता वळसा घालून अशा दोन्ही प्रकारे तुम्ही जाऊ शकता, चंद्रगड करायचा असल्यास वेळेत थोडाफार फरक पडेल.आम्ही सकाळी सहाला सुरु केलेला ट्रेक संध्याकाळी सहावाजता पूर्ण झाला.  प्रत्येक ट्रेकरने आयुष्यात एकदा तरी जरूर करावा असा हा ट्रेक आहे. काही ट्रेकर्स आर्थरसीट ते ढवळे असा ट्रेक करतात तर काही आम्ही केला तसा चंद्रगड ते आर्थरसीट असा ट्रेक करतात.

गॉगल गॅंग 

मी मोबाईल मधून विडिओ वैगेरे केल्यामुळे फोनची बॅटरी संपली होती परंतु मी पावरबँक आणली होती. सॅकमधले वजन कमी करण्याच्या गडबडीत टाईपसी वायर बसमधल्या सॅकमध्ये राहिली आणि साधी वायर आणली. पुढच्या ट्रेकचे शूटिंग फोटो काढायची पंचाईत आली होती. परंतु म्हणतात ना अगर किसी चीज को सच्चे दिलसे चाहो तो सारी कायनात उस चीज को तुमसे मिलानेकी कोशिश में लग जाती है. माझ्यासाठी ट्रेकदरम्यान मोबाईल बॅटरी फुल असणे म्हणजे कायनातच आहे. जेवताना सहज कोणाला तरी विचारले आणि कोणीतरी मला हवी ती वायर दिल्याने मी थोडा आराम करेपर्यंत मोबाईल चार्ज करून घेतला. ३५ टक्के मोबाइल चार्ज झाला तो आर्थरसीट पर्यंत सहज पुरणारा होता. ज्यांनी कोणी मला टाईपसी वायर दिली त्यांना शतशः धन्यवाद. दुपारी जेवून सगळे ट्रेकर्स गवताच्या सावलीत अक्षरशः आडवेतिडवे पडले होते. एकतासात साडेतीनच्या सुमारास लीडर चलचला करीत आले आणि बहिरीच्या घुमटीला रामराम करीत निघालो.



आर्थरसीटचा शेवटून दुसरा टप्पा 

जेवल्यानंतर पुन्हा खडा चढ चढायला जीवावर येते परंतु उजेडात सूर्यास्ताच्यावेळी तरी आर्थरसीटवर पोहोचलो पाहिजे म्हणून चालत राहिलो. जास्तीत जास्त उंचावर आल्याने आता थोडेसे ऊन आणि थोडासा गारवा होता परंतु जीव मात्र थकलेला होता.मला त्या डोंगररांगा त्या तिकडे कुठेतरी वाहणारी सावित्री नदी दिसते का ते पाहायचे होते परंतु इकडेतिकडे पाहून फोटो घेताना ट्रॅव्हर्स पार करताना गरगरत होते तरी मी मरतमरत फोटोशूट करत होते.

महाबळेश्वरमध्ये ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोटजवळ मिळते. प्राचीनकाळापासून महाड गावातून वाहणाऱ्या सावित्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे.(वरंधा,आंबेनळी,पारघाट,मढेघाट,ढवळ्याघाट .) त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर चांगले रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या)मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड इत्यादी किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळगड,केंजळगड  इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. या घाटवाटांपैकी पोलादपूरहून महाबळेश्वरच्या आर्थरसीटला जाणाऱ्या "ढवळ्या घाटावर" नजर ठेवण्यासाठी चंद्रगडाची निर्मिती करण्यात आली होती.चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट हा सुद्धा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीनकालीन गडअवशेष पुरावा म्हणून आहेत. चंद्रगड ते आर्थरसीटपॉईंट हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेकमध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटीपासून जवळपास ४७२१ फूट उंच महाबळेश्वरपर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची मनाची कसोटी पहाणारा, धूर काढणारा आहे.


सगळे ट्रेकर्स एकमेकाला साहाय्य करीत होते. कुणी अडकलेली काठी वर घेतय, कुणी हात देतंय, कुणी मजा बघतंय सगळं सुरु असतंय हाहाहाहा. शेवटचा टप्पा पार करताना पाठीमागे पाहिले असता इतका मोठा टप्पा आपण पार केलाय यावर माझा विश्वास बसत नव्ह्ता. शेवटच्या टप्प्यात एक रॉकपॅच आहे तो सगळ्यांनी सहज पार केला रोप लावण्याची गरज पडली नाही. पुढे मात्र गवा दिसल्यावर तो जाईस्तोवर आम्ही सगळेच थांबलो कारण अजून ट्रेक संपायचा होता. थोड्या वेळाने गवा महाराज तिथून बाजूला गेले आमची वाट मोकळी केली आणि आम्ही महाबळेश्वरच्या आर्थरसीट पॉइंटवर पोहोचलो.


तिथे आर्थरसीटपॉइंटवर फोटोग्राफी करणारे लोक आमच्या थकलेल्या परंतु आनंदाने फुललेल्या चेहऱ्यांकडे आश्चर्याने बघत होते. खरंच रखरखत्या उन्हातला इतका मोठा ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद जगावेगळा होता. सूर्य आमची वाट पाहतच होता. लीडर्सनी मोजून दहा मिनिटे देऊन ग्रुप फोटो, बॅनर फोटो घेऊन लगेच चला-चला चा नगारा वाजवला आणि ताकीद दिली लवकर निघालो नाहीतर मग रात्रीचा एक वाजेल बरं का??




मग मात्र आम्ही खरोखर आर्थरसीटचा जड अंतकरणाने निरोप घेऊन निघालो कारण मला इथे किमान अर्धातास तरी थांबायचे होते. 


गवामहाराज पुन्हा समोर आले. मी विडिओ घेताना त्याने मला एखाद्या मॉडेलने पोज द्यावी अशी जबरदस्त पोज दिलीये. आर्थरसीट पॉईंटसे निघते निघते दिल खुश कर दिया इस चिकणे गवेने.  सर्व लीडर्सचे उत्तम ट्रेक नियोजन, सर्व ट्रेकर्सचे आणि आमच्या गॉगल गॅंगचे,उत्तम सहकार्य यामुळे चंद्रगड ते आर्थरसीटपॉईंट ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. प्रत्येकाचे अभिनंदन भेटू पुन्हा सह्याद्रीत.