Sunday 25 February 2018

"ट्रेकर्सची चंदेरी दुनिया.."

दिनांक २५ फेब्रुवारी २०१८....

फोना ट्रेकींग ग्रुपचा Blog मुंबईच्या दैनिक महासागर या बातमीपत्रात छापून आला. ⛳⛳⛳

Wednesday 21 February 2018

सोनेरी क्षणांचा सोबती "चंदेरी".



ट्रेक - चंदेरी किल्ला
उंची- २३००फूट
प्रकार - गिरिदुर्ग
ठिकाण- ठाणे जिल्हा
डोंगररांग- माथेरान
दिनांक- १८ फेब्रुवारी २०१८


'चंदेरी किल्ला"-माहिती- चंदेरी किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील माथेरानच्या डोंगररांगेत आहे. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे २३०० फूट इतकी आहे.पुण्यापासून सुमारे १२० कि. मी. अंतरावर चंदेरी हा किल्ला आहे. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख ताब्यात घेतला तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा असा अंदाज बांधता येतो. ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते. अतिशय अवघड वाट आणि किल्ल्याच्या माथ्यावर गुहेच्या अगोदर पडक्या अवस्थेत तटबंधी दिसते हे पाहून ह्या किल्ल्याचा इतर किल्ल्यावर आजूबाजूच्या परिसरावर देखरेखीसाठी वापर होत असावा.

चंदेरीहा म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक आहे तसेच  पनवेलचे जवळील  कर्नाळा, प्रबळगड, इर्शाळगड , माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक देखणा गड म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाटआणि मुरबाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीमधील  एक आव्हानच आहे. तामसई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग म्हणजे ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ट्रेकर्सचे खास आकर्षण आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे माझ्यासाठी "सोनेरी क्षणांचा सोबती" असतो कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन्स डे चा एक आठवडा साजरा करता येतो शिवाय माझ्या पार्टनरचा वाढदिवस असतो त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. यावेळी त्यात भर म्हणून चंदेरी किल्याची ट्रेकची सोनेरी संधी मला मिळाली होती.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी फोना टीमचा ८० वा ट्रेक आयोजित केला होता. १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता आमची बस निगडीहुन निघून  तळेगाव-लोणावळा- खोपोली -नेरळ-चारफाटा-मार्गे-  उमरोली- चिंचवली येथे ९ च्या सुमारास पोहोचली.अर्थात मध्ये प्रवास चांगला होण्यासाठी नारळ फोडून आणि चारफाटा कर्जत येथे ठाकरे हॉटेल जवळ थोडा वेळ थांबून नास्ता करून आणि चहा घेऊनच. 😊घाटामधून जाताना ड्युक्स नोज नेहमीच स्मित हास्य करतो. कर्जत फाटा सोडले की एन.डी स्टुडिओ जवळ पाठीमागे मोरबे धरणाचे प्रशस्थ दरवाजे दिसतात.👌

चिंचवली येथे पोहोचल्यावर तिथे एक लग्न असल्याने स्पीकरवर गावाकडच्या लग्नाच्या गाण्याचा आवाज कानाला सुखावून गेला. आमची बस बघून गावातील मंडळी जरा पुढे आली जणू वर्हाड आलं असं समजून😊😊. बस अजून थोडी पुढे नेऊन लगेचच ट्रेकला सुरुवात केली. गावातील गणेश नावाचा वाट दाखवणारा आम्ही सोबत घेतला कारण चंदेरी किल्ला तसा  चढाईस कठीण असल्याने आणि सध्या उन्हाचे दिवस असल्याने इकडे कमी ट्रेकर्स फिरकतात.

बसमधून जाताना माथेरानची डोंगर रांग अप्रतिम दिसत होती. दुरून चंदेरी कोणता हे ओळखू येत नव्हते परंतु जसजसे जवळ जात होतो तसतसा चंदेरी चमकू लागला होता👌. आमच्या ट्रेक लीडर्सने(मंदार सर आणि राणे सर, रोहित) बरोबर सांगितले होते. मोठा सुळका आणि जवळच एक छोटा सुळका दिसतो (नवरा-नवरी) तो चंदेरी आहे.  ट्रेकसाठी बरेचसे नवीन चेहरे होते परंतु पुणे ते चंदेरी प्रवासात ते आपलेसे आणि जुने झाले होते. 
शिवगर्जनेने ट्रेकला सुरुवात झाली आमच्यातील एका ट्रेकरने २ ओळी ऐकवल्या,
"ओळखलंत का मॅडम मला? फोनामध्ये आला कोणी,
कपडे होते सुपरमॅनचे आणि डोक्यावरती टोपी निळी
संधन व्हॅली रॅपलिंग ट्रेक नंतर भेटलात तुम्ही  
ताज्या झाल्या ट्रेकच्या आठवणी" 
वळून पहिले तर "ओळखले मी त्या क्षणी, अरे हे तर अविनाश आणि दिनेश
संधन व्हॅलीच्या ट्रेकदरम्यान इनोवेटिव्ह फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर खास" 
हास्यकल्लोळ करून जल्लोषात ट्रेक सुरूच राहिला. चंदेरी किल्ला आणि शेजारचा म्हसमाळ सुळका हे दोन्ही सुळके इंग्रजी व्ही अक्षराने जोडले गेलेत. एक डोंगर पार करताना अर्धातासभर चांगलाच चढाव असल्याने सगळ्यांनाच जरा दम लागत होता. यावेळी माझ्यासाठी खास व्यक्ती माझ्यासोबत होती माझा पार्टनर डीपी. 😊😊त्यामुळे मी मनोमन जास्त खुश आणि बिनधास्त होते.
आमचा वाट दाखवणारा मार्गदर्शक आम्हाला अचूक वाट दाखवीत होता. कारण घनदाट जंगल असल्याने एकट्याला वाट सापडणे तसे कठीण वाटत होते. चंदेरी आणि म्हसमाळच्या मध्ये जिथून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो आणि नदीला जाऊन मिळतो त्या दगडी घळीतून आम्हाला वाट काढत जायचे होते. हळूहळू ऊन वाढायला लागले होते. वाटेत डोंगराला वणवे लावून जंगल जाळून लाकूडतोड केलेली दिसली. लाकडाच्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या. मधेच एक मोठे मध काढलेले मधाचे पोळे आम्हाला दिसले.

११ वाजून गेल्यावर ती दगडी घळ चढताना चांगलीच दमछाक होऊन आम्ही थोडे थोडे थांबून थांबून चढत होतो. आमच्यातील ४-५ ट्रेकर(दिनेश,प्रतीक,दिगू,अविनाश, बनसोडे) थोडे पुढे गेले. मी माझ्या पार्टनरसोबत आणि इतर ट्रेकर सोबत थांबून थांबून चढाई करीत होते.


१२ वाजल्यानंतर मात्र उन्हाचे चटके जाणवू लागले आणि अतिशय घसरडा मुरबाड चढ आम्हाला कठीण जात होता.फासफूस करीत आणि पोहोचायचंच आहे असा निर्धार करून घळीच्या डाव्या बाजूने झाडांच्या मुळांना धरीत घसरड्या मातीशी सामना करीत चढत जाऊन त्या व्ही आकाराच्या जोडाजवळ पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला चंदेरी तर उजव्या बाजूला म्हसमाळ फोटोला पोज दिल्यासारखा दिमाखात उभा दिसतो.
चंदेरीचा सुळका अतिशय देखणा दिसत होता. परंतु तरीही तो अजून खूप दूर होता. आणि त्या घसरड्या छोट्या निमुळत्या वाटेवर कुठेही रेलिंग वगैरे काहीही लावलेले नाही. फार फार तर दगडाला धरून चढाई करीत होतो. भूक लागल्याने आणि दुपारी १२चे फेब्रुवारीतील कडक ऊन असह्य झाल्याने ४ पावले टाकली की अक्षरशः बसावे लागत होते. तरीदेखील त्या तशा दमलेल्या अवस्थेत देखील माझी फोटोग्राफ़ी सुरु होती. त्यामुळे मला एनर्जी मिळते.
चंदेरी सुळक्याजवळ चढाई करत असताना पलीकडे दूर मोरबे धरणाचा जलाशय नजरेस पडला. तिथूनच पुढे कलावंतींण आणि प्रबळगड पुसटसे दिसत होते. त्यांच्या आकारावरून मला ते ओळखता आले. या ठीकाणी आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने शांतपणे चढाई केलेली बरी नाहीतर जरा जरी घाई केली तर दरी आपल्याला कुशीत घ्यायला तयारच असते.

पुढे जाणारा प्रत्येक जण सतत थांबताना दिसत होता.पुढच्याला अजून किती वेळ आहे?? असे विचारल्यावर अजून पाचच मिनिटे आहेत असे आमच्या लीडर्सच्या शब्दात सांगून समजूत काढत असे.   असे करत करत एकमेकाला धीर देत  दुपारच्या एक वाजता आम्ही चंदेरीच्या सुळक्याजवळ पोहोचलो. परंतु गुहा काय अजून दिसता दिसेना. त्याठिकाणी आधी ५ मिनिटे बसून मग आम्ही गुहेकडे निघालो. अमोल, प्रवीण म्हणाले मॅडम तुमचा स्टॅमिना चांगला आहे.थँक यु ट्रेकर्स.  परंतु खरे तर माझे हाल काय होतात ते फक्त मला माहित असते. महत्वाचे म्हणजे  हा स्टॅमिना ट्रेकच्या सातत्यामुळे येतो. आपला निर्धार आणि फोना टीम आणि लीडर्सच्या सहकार्यामुळे कठीणातील कठीण ट्रेक देखील आपण सहज करू शकतो फक्त आपण लीडर्सच्या नियमांचे वेळोवेळी पालन केले पाहिजे.


जवळपास दीडच्या सुमारास आम्ही गुहेत पोहोचलॊ. गुहेत जाताना तिथे एक पाण्याचे टाके आहे त्यात रंगीबेरंगी मासे पहावयास मिळाले. यात कायम पाणी असते असे गणेश गाईड म्हणाला. आम्ही तोंडावर ते गार पाणी मारून गुहेकडे रवाना झालो. गुहेजवळ छोट्या घंटा असलेली कमान आहे. पुढे गेल्यावर गणपतीची मूर्ती आणि शंकराचे छोटे संगमरवरी मंदिर बांधलेले दिसले. इथे पूजा होत असावी असा अंदाज येतो कारण हळदकुंकू पसरलेले दिसले.  तसेच त्या छोट्या मंदिराजवळ लाद्या मारलेल्या दिसल्या. इतक्या वर हे सामान नेऊन हे बांधकाम कसे केले असावे हा मला आणि सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही फक्त पाणी आणि जेवणाचा डबा असलेली छोटी सॅक घेऊन जातो तरी थकून जातो.

शंकराची पिंड, नंदी  यांची पूजा करीत असतानाची पार्वतीची मध्यम आकाराची मूर्ती हसरी,अतिशय रेखीव देखणी होती. जे आधी पोहोचले ते ३-४ जण  जण इतर ग्रुपचे २ एक्सपर्ट ट्रेकर्स सोबत असल्याने सुळक्यावर गेले. खरंतर लीडर्सचा आदेशच होता की वरच्या कठीण सुळक्यावर यावेळी आपण जाणार नाही आहोत फक्त २००० फुटापर्यंत जाऊन गडाची माहिती घेऊन उतराई करणार होतो. टप्प्या-टप्प्याने ट्रेकर्स येत होते.चंदेरी  गुहेत पोहोचल्याचा आनंद स्वर्गसुखाइतकाच होता. त्या गुहेत ३०-४० जण आराम करू शकतील इतकी जागा आहे. पूर्ण गुहेला आतून चंदेरी रंगाचा स्प्रे केल्यासारखा वाटत होता. आम्ही आमचे जेवणाचे डबे काढून जेवण केले.
३०० फूट वर सुळक्यावर गेलेले आमचे दोघे ट्रेकर्स परत आले आणि आमच्यातील बनसोडे काकांना डिहायड्रेशन होऊन त्रास झालेला ऐकला त्यावेळी लीडर्ससहित सगळे फर्स्ट एड् चे सामान घेऊन सुळक्याकडे रवाना झाले त्यांना कसेबसे करून गुहेपर्यंत आणण्यात आले. ट्रेकिंग करताना आपले वय, आपणच आपली क्षमता ओळखून वेळोवेळी थोडेथोडे पाणी पिणे गरजेचे आहे.  गरजेप्रमाणे पाणी शरीरात गेले नाही तर पायात कळा येतात चालणे अशक्य होते आणि त्याचा त्रास स्वतःबरोबर सर्व ट्रेकर्सना देेखील होतो, वेळ वाया जातो. कृपा करून सर्व ट्रेकर्सनी याची नोंद घ्यावी.जेवण झाल्यावर  ट्रेकर्स ची ओळख करून घेतली. फोनासोबत प्रत्येक वेळी हुरहुन्नरी ट्रेकर्स असतातच. यावेळी रोहितचा मित्र प्रवीण हरपळे हा एक त्यातला होता. "महाराष्ट्रातील गढी" यावर तो पुस्तक लिहितो आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी उत्कृष्ट  कला असते त्याचे ज्ञान पुस्तकरूपाने तोच आपल्यासमोर आणणार आहे.प्रवीणला शुभेच्छा दिल्या. 


ट्रेकिंगचे सातत्य आणि ब्लॉगचे सातत्य यासाठी मला, माझ्या पार्टनरला तसेच फोनाचे ८० ट्रेक उत्कृष्टरित्या(बेष्टंम बेष्ट) पार पाडले यासाठी ट्रेक लीडर्स राणे सर आणि मंदार सर यांना रोहितने फोना ट्रेकर्स ग्रुप आणि  फोनाच्या सेक्रेटरी निर्मला मॅडम, निकाळजे काका  यांच्या कडून "शौर्यगाथा मावळ्या शक्तिपीठांची" हे प्रमोद बोराडे आणि प्रिया बोराडे लिखित पुस्तक बक्षीस देण्यात आले. लीडर्सचा सत्कार म्हणजे सगळ्या ट्रेकर्सचे आणि फोना टीमचे कौतुक. 'अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे" या राजू राऊतांच्या पोवाड्याने गुहा दणाणून गेली. आमच्यातील ३ ट्रेकर्स चंदेरी सुळक्यावर गेले होते ते म्हणाले की गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. छोटी अरुंद वाट, खाली दरी त्यामुळे हल्ली सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. वर  शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा एका मोठ्या शिळेवर भगव्यासोबत विराजमान आहे
सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरखगड, पेठचा किल्ला इ. दिसतात.बाकी काही असो वेळेअभावी मला त्या तिन ट्रेकर सोबत चंदेरी सुळक्यावर जाता आले नाही त्यामुळे अजूनही जीवाची अतिशय घालमेल होतेय.😢 तब्बेत बिघडलेल्या ट्रेकरला बरे वाटल्यावर बॅनर फोटो काढून ४ वाजता चंदेरी किल्ला उतराईस सुरुवात केली. उतरताना आजूबाजूचे गड, किल्ले, घनदाट जंगल डोळ्यात आणि  कॅमेऱ्यात साठवून घेतले आणि उतराईला सुरुवात केली. आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने आणि घसरडे असल्याने चढताना जितके कठीण वाटत होते त्यापेक्षा जास्त उरताना पाय लटपट करीत होते.


यावेळी ट्रेक मध्ये मी आणि निर्मला अश्या दोघीच लेडी ट्रेकर्स  असल्याने मला आमचा दोघींचा अभिमान वाटत होता तरीही मी कविता, ऋतुजा, बाकीच्या सर्व लेडी ट्रेकर्सना मिस करीत होते. कारण त्यांनी हा चंदेरीचा अप्रतिम सोनेरी ट्रेक मिस केला.उन्हामुळे चढताना साडेतीन ते ४ तास लागलेला चंदेरी दोन ते ३ तासात उतरलो. उतरताना ६ नंतर सावली असल्याने थोडा गारवा होता. एकीकडे सूर्य मावळत होता परंतु आम्ही चंदेरीच्या एकदम पायथ्याशी चालत असल्याने आम्हाला तो दिसत नव्हता परंतु त्या संधीप्रकाशात सह्याद्रीच्या डोंगररांगा अतिशय गडद दिसत होत्या. अंधार होऊ लागल्याने सकाळी न दिसलेले घोस्ट ट्री आता उठून दिसू लागले होते.

शेवटचा टप्पा पार करताना पायातले बळ नेहमीच संपते. परंतु इतका मोठा गड सर केल्याचा परमानंद असतो.यावेळी पार्टनर सोबत असल्याने आणि त्यात लग्नाचा वाढदिवस असल्याने मला हा ट्रेक कायम स्मरणात राहील असा होता. ७ च्या सुमारास पूर्ण अंधार झाल्यावर मोबाईल बॅटरीच्या उजेडात चिंचवली गावात आम्ही पोहोचलो. आमचा गाईड गणेश याने शेवट पर्यंत सर्व ट्रेकर्स येईस्तोवर आमची साथ सोडली नाही. त्याचा आणि चंदेरीचा समाधानी मनाने आणि जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही अंताक्षरीच्या तालात पुन्हा त्याच मार्गाने पुणे गाठले. फोना लीडर्सचे उत्तम-योग्य नियोजन आणि सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य यामुळे फोना टीमचा ८० ट्रेक उत्तमरीत्या पार पडला. या ट्रेकचे बेस्ट फोटोग्राफर दीपक, रोहित, जय, प्रतीक,दिगू, दिनेश,अविनाश, शेवाळकर सर, प्रवीण लष्करी  सर आणि सगळ्यांचेच विशेष कौतुक. "फोना रॉक्स."   


गणेश ढुमणा-चंदेरी ट्रेक गाईड मोबाईल नंबर-७०३०९७६७८०)