Tuesday 11 April 2017

"अद्भुत व्ह्यालीचा थरार"

ट्रेक- सांधण व्हॅली (रॅपलिंग)
ठिकाण- अहमदनगर जिल्हा
दिनांक- ८-९ एप्रिल २०१७
चढाई श्रेणी- मध्यम-कठीण




सांधण व्हॅली हे ठिकाण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात साम्रद या गावाजवळ आहे. सांधण व्हॅली ही निसर्गतः जमिनीला पडलेली एक भेग आहे.  ही भेग जवळपास ४५०-५०० फूट खोल आणि २५ फूट रुंद काही ठिकाणी १० फूट रुंद आणि एक किलोमीटर लांब आहे.  सांधण व्हॅली हा एक निसर्गाचा एक रौद्र तरीही अतिशय मोहक अवतार आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतो.   "सांधण व्हॅली" ला  "द व्हॅली ऑफ शॅडोम्हणून देखील संबोधतात. एक अद्भुत व्हॅली म्हणून आशिया खंडामध्ये दोन नंबरवर ह्या व्हॅलीची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीमधील एक नंबरची मोठी अशी ही सांधण व्हॅलीच आहे.
कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य नसले  तर त्याचा आपल्याला विसर पडतो आपण कंटाळतो किंवा सोडून देतो किंवा त्यात गोष्टींमध्ये सातत्य आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी मग ती गोष्ट म्हणजे ट्रेक असो ब्लॉग असो अथवा अजून कोणतीही गोष्ट शिकणे असो. मागच्या महिन्याचा फोना ग्रुपचा एक ट्रेक झाला नाही आणि परीक्षांचे वातावरण चालू असल्याने मलादेखील बाहेर जाता आले नाही त्याचा माझ्या आरोग्यावर किती परिणाम झाला ते मी स्वतः अनुभवले आहे. 
ट्रेक चा वेडापिसा छंद असा लागला जीव हा ट्रेक मध्ये गुंतला.. ह्या ओळी मला स्वतःसाठी मी लावून घेतल्या आहेत.मी १-२ वर्षांपासून ट्रेकिंग करते आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मी दोनदा सर केले परंतु क्लाइंबिंग आणि रॅपलिंग मी केले नव्हते त्याचे मला काही महिने वेध लागले होते. पुण्यातल्या इतर कोणत्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये रॅपलिंग आणि क्लाइंबिंग च्या ऍक्टिव्हिटीचा ट्रेक असला की मी मैत्रिणी गोळा करून आणि आमच्या फोना च्या ग्रुप लीडर ना विचारून जायची तयारी करत असे. परंतु योग काही आला नव्हता.  ८-९ एप्रिल २०१७ चा "फोना" ग्रुप चाच ७२ वा ट्रेक आयोजित करण्यात आला आणि त्यात रॅपलिंग ऍक्टिव्हिटी होती. माझ्या मनातला आनंद गगनात मावत नव्हता. १ सीट बुक करून ठेवली होती. मला काही करून किमान एकदा तरी रॅपलिंग करावयाचे असल्याने ७  एप्रिल ला माझे जाण्याचे पक्के झाले.
दिनांक ८ एप्रिल २०१७ शनिवारी आम्ही दुपारी ११-०० वाजता तळेगाव- निगडी-नाशिकफाटा -मंचर-खेड बोटा-ब्राह्मणवाडा-कोतुळ- राजूर-रतनवाडी-साम्रद अशा मार्गाने ट्रेक मेम्बर्स घेत  निघालो. पुण्यापासून साम्रद हे गाव जवळपास १९६ कि. मी. अंतरावर आहे. तिथे पोहोचण्यास जवळपास ५ तास लागतात. खेडपासून एक तास पुढे गेल्यावर नेहमीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कार्यक्रम करून एक ग्रुप फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघालो.

भुकेची वेळ झालीच होती बस थांबून जास्त वेळ वाया न घालवता सोबत आणलेले आमचे जेवणाचे डब्बे काढून आम्ही बस मधेच खाऊन घेतले अंताक्षरी सुरु केली आणि वातावरण उत्साही झाले. बरेचसे नवीन मेम्बर असल्याने अजूनच मजा आली. दिनेश आणि प्रतीक यांनी सुपरमॅन चा रोल अर्धा अर्धा केला(एकाने सुपरमॅन ची टोपी घातली तर एकाने सुपरमॅन चे शर्ट घातले होते) ऐकावे आणि पाहावे ते अद्भुतच. (हाहाहा)


बस २० मिनिटे थांबवून ड्राइवर काकांना जेवणाचा डबा देऊन जेवण करावयास सांगून आम्ही जरा तिथल्या आंब्याच्या सावलीत थांबलो तिथल्या दत्तमंदिरात श्री. दत्ताचे दर्शन घेतले आणि तिथल्या शेतात पाय मोकळे केले.  इलाईत चिंचा,कैऱ्या आणि चिंचा खाल्ल्या.  मग पुन्हा अन्ताक्षरीच्या तालावर प्रवास सुरु झाला. ५:३० ला आम्ही अकोले तालुक्यातील रतनवाडी गावात उतरलो.

रतनवाडी गावातून रतनगडला जाता येते. रतनगडचा ट्रेक करताना या ठिकाणी थांबलो होतो. रतनवाडी ला उतरल्यावर आम्ही सगळ्यात आधी श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.मंदिरात एका बाजूंला खलबत्याच्या आकाराचे काही होते. तिथले स्थानिक लोक म्हणत होते की मनात एक इच्छा धरून  कानाला हात पकडून हाताच्या कोपराने तोच दगड एका दमात उचलून अलगद ठेवेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होते. आमच्यातील बऱ्याच हौशी कलाकारांनी  तो दगड उचलून त्यातील गंमत अनुभवली आणि मंदिराच्या सुंदर नक्षीकामाचे फोटोग्राफी केली.

जवळ विहीर होती त्या विहिरीवर पाणी पिण्याचा आणि विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आंनद घेतला आणि बाजूला गावातील मुले क्रिकेट खेळत होती तिथे काही लोक चेंडूफळी खेळून आले. मग चहा घेऊन साम्रद गावाकडे निघालो.

रतनवाडीपासून साम्रद हे गाव जवळपास ८ कि. मी. आहे.संध्याकाळी  ६-३० च्या सुमारास आम्ही साम्रद गावात पोहोचलो. अशी आशा होती की लवकर पोहोचलो तर तिथल्या मिनी कोकणकडयावरचा सूर्यास्त अनुभवता येईल परंतु तिथे पोहोचेपर्यंत सूर्य दिसेनासा झाला होता.




परंतु इथे सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड आणि कळसुबाई यांचे पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन होत होते. अतिशय रम्य संध्याकाळ तोच लालसर संधिप्रकाश मन मोहून घेत होता. सूर्यास्त नाही मिळाला तरी रतनवाडीहून जाताना बसमधून दिसणारा भंडारदरा धरणाचा अथांग जलाशय मनाची तहान शमवून गेला.
आम्ही त्या सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या संध्याकाळचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले आणि लगेच आमचे टेन्ट जागेला लावून घेतले.

साम्रद हे गाव छोटेखानी आदिवासी गाव आहे. इथे चहा, नास्ता, जेवणाची उत्तम सोय होते. वेळ पडली तर दत्ता भांगरे याच्या घरात एक पडवीत २०-२५ लोकांची झोपण्याची सोया सुद्धा होईल इतकी जागा आहे. आम्ही चहा घेतला काहींनी मॅगी सूप चा आनंद लुटला.
आम्ही ३२ लोकांचे जेवण तयारच होते. मस्त पिठले भाकरी वरण-भात  पापड लोणचे याचे जेवण आटोपून घेतले.आमच्यातली काही कलाकार मंडळी सांधण व्हॅली च्या नावाशी कॅमेऱ्याने खेळत होती. शेवटी मोबाईलचा लाईट आणि मोठा कॅमेरा यामुळे एक उत्तम फोटो जमवलाच.  

गावात हनुमान मंदिरात काही कलाकार मंडळी आली होती त्यांची कला बघण्यासाठी आम्ही लोक साम्रद गावातील मंदिरात गेलो आणि आम्ही देखील त्या घुंगराच्या नाचत सहभागी झालो. तिथे एक राक्षसरूपी ड्रेपरी करून आलेल्या कलाकार माणसाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जाऊ तिथे थोडा भाव खाऊ आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद लुटू इतकेच आम्हा ट्रेकर्सना समजते.

रात्री ११:०० च्या सुमारास तंबू मध्ये आलो आणि किमान १२ वाजता तरी झोपायचे ठरवले होते दुसऱ्या दिवशी उन्हाच्या आता रॅपलिंग करावयाचे होते त्यासाठी  ५ वाजता ट्रेक सुरू करायचा  होता परंतु आमच्या ग्रुप सोबत अजून बरेच ग्रुप ने तिथे तंबू ठोकले होते त्यातील काही ग्रुपचे रात्रीचे २:३० वाजेपर्यंत जरा जास्तच मोठमोठ्याने ओरडणे असा गोंधळ चालू असल्याने मला तरी लवकर झोप लागली नाही. सुरक्षिततेसाठी मुलींचे टेन्ट गृप लीडरने काळजीने मध्यभागी घेतले होते. आणि सगळेच जण बराच वेळ जागे होतो. पहाटे ३ नंतर हवेतला गारवा वाढल्याने झोप लागते ना लागते तोवर ४:३० चा गाजर वाजला आम्ही उठलो आणि भराभर आवरून सकाळी ६:३० वाजता आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.


१०/१५ मिनिटातच वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांधण व्हॅलीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.व्हॅलीच्या  सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. आत व्हॅलीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद व्हॅली होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. मोबाइल बॅगेत टाकला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने एक-दोघांचा मोबाईल भिजला. त्यामुळे हा पाण्याचा टप्पा पार करण्याआधी मोबाईल प्लास्टिक बॅगमध्ये पूर्ण पॅक करून बॅगेत टाकून बूट काढून घ्यावेत आणि त्याच्या लेस बांधून खांद्याला लटकवावेत आणि हळूहळू साखळी करून पाण्याचा टप्पा पार करावा म्हणजे पुढचा प्रवास नीट होतो.  आता तीव्र उतार सुरु झाला होता. व्हॅली अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरश: तिथे खच पडला होता. कुठेही पाय ठेवावा तर पायात ताकद आणि ग्रीप हवी नाहीतर सारखा पाय घसरतो. 

अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद व्हॅली पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण व्हॅलीत कधीही उन पोहोचत नाही त्यामुळे कायमच सुखद गारवा असतो.पण फक्त सांधण व्हॅली पर्यंतच हा गारवा असतो. साधारण  एक की. मी. ची ही व्हॅली आहे. त्यांनतर पुढे अजून २ की.मी. खोल व्हॅलीमध्ये  उतरून आम्ही रॅपलिंग च्या प्रतीक्षेत होतो. खरं तर आम्ही ५-७ जरा जास्तच पुढे गेलो होतो त्यात मी(जयू) आणि खोल्लम स्नेहल, दीपक गवळी, महेश अवटे, अनिल जाधव, राजेश जठार,संदीप गोरे, तुषार इतके लोक होतो. "पर वो कुछ लोग इस जयू को छोड के चले गये. पर "ऐ ५ लोगो अगले  ट्रेक को मै तुम्हे देख लुंगी" हर एक ट्रेक का नशा वेगळा होता है."
रॅपलिंग ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तिथेही नंबर होते अर्थात आम्ही पुढे असलेले मेम्बरच घाईवर होतो पण मनात भीती सुद्धा होतीच. काही चुकलं आणि पडलो धडपडलो तर?? पण खरे तर असे काही होणार नाही अशी खात्री होती कारण "फोना"ग्रुपने तसे तज्ञ सोबत आणले होते तसेच ट्रेकिंग करणारे अनुभवी लोकदेखील आमच्यासोबत होते. ४-५ ट्रेकर नंतर माझा नंबर होता. रॅपलिंग साठी तिथल्या गावातील दत्ता भांगरे आणि त्याचे सहकारी यांनी मिळून आम्हाला एकामागून एक असे करून ३२ लोकांना सुरक्षितरित्या आणि शांतपणे ५०-६० खोल दरीत रॅपलिंग करीत उतरवले. 








दत्ता भांगरे याने त्याच्या १८-१९ वयापासून हे रॅपलिंग चे तंत्र आत्मसात केले. तसे ट्रेंनिंग घेतले आहे आणि तोच त्याचे सहकारी खंडू मामा यांच्या सोबत येणाऱ्या ट्रेकर्स ना रॅपलिंग देखील शिकवतो आणि सुरक्षित रित्या उतरवतो. आधी स्वतः रॅपलिंगचे रोप स्वतःला बांधून तयारीत असतो. ही व्यक्ती साम्रद गावातीलच असल्याने ट्रेकर्स ना सोपे जाते. रॅपलिंग सुरु झाले,सगळे सगळ्यांना चियर अप करत होते. फोटो काढत होते. मला स्वतःला विश्वास नव्हता की मी रॅपलिंग करीत आहे. आणि सुरक्षित रित्या सगळ्या मेम्बर्स चे रॅपलिंग झाले. दत्ता भांगरे ला आणि जुने मेम्बर्स राणे सर, मंदार सर, रोहित, विवेकानंद,दिनेश,अविनाश,स्नेहल खोल्लम, आनंद, दिग्विजय, प्रकाश,  प्रतीक, गीता, रश्मी, मुक्ता, ऋजुता, हिरल, सेजल, हेरंब, गणेश गोसावी, राजेश जठार, तुषार, महेश, संदीप गोरे, अंबादास कदम, प्रदीप मिश्रा, शेवकर सर, अभिनव, सगळ्यांना सलाम. सगळ्याच्यां सहकार्याने रॅपलिंग चे सगळे पॅच चांगल्यारितीने पार पडले. 
आम्ही पुढे असलेलो ५-७ जण पुढे जात राहिलो पुढे ४ टप्पे पुन्हा रॅपलिंग चे पॅच आले होते तिथे रोप ची अतिशय गरज होती तरीही आमच्यातल्या एक्सपर्ट लोकांनी आम्हाला बिना रोपचे दोन टप्पे पार करवले.मी तर खडकाला लटकून,हात सोल्वटून घेतले. इतने बडे (सेमी हार्ड) ट्रेक में ऐसी छोटी-छोटी बातें तो होती रहती है. वेळ आली तशी एकाच्या डोक्यावर बसून उतरले. लहानपणी मामाच्या खांद्यावर बसलो होतो त्याची खूप आठवण झाली. अनिल जाधव सॉरी आणि धन्यवाद. वेळप्रसंगी लाल टी-शर्ट दीपक चा अनिल जाधव यांचा जाम ओरडा खाल्ला. काय झालं होतं मला काय माहिती रॅपलिंग चा ६० फुटाचा पॅच पार पडल्यावर जरा समजेना झालं होतं. मला बिना रोपचे कठीण पॅच उतरायला जास्त भीती वाटत होती. मी जर पडले आणि माझे एखादे हाड मोडले तर याच लोकांना उचलून न्यावे लागणार याची मला चिंता वाटत होती म्हणून मी जरा जीवाला जपत होते इतकेच. नाहीतर हम भी किसीसे कमी नहीं है.  (हाहाहा). 


पुढे दरी उतरत राहिलो. पण तिसऱ्या एक कठीण पॅच ला संदीप गोरे सोडले तर मात्र आम्ही सगळेच थांबलो.संदीप गोरे यांनी रॅपलिंग च्या पुढचे दोन्ही कठीण पॅच एकट्याने बिना रोप चे पार केले परंतु ते पुढे थांबले होते. नंतर मात्र आमची "फोना"ची गॅंग रॅपलिंग करून उतरत होती तसतसा आवाज घुमू लागला. कितीही  ठरवले की दरीमध्ये आरडाओरडा करायचा नाही तरी इतक्या लोकांचा आवाज एकत्र आला की तोच आवाज घुमतो आणि मोठ्याने बोलतो असा भास होतो. आम्ही ५-७ जण आपले पुढे आलो खरे पण माकडांची कॉलनी दिसली आणि जरा भीती वाटली कारण आवाज व्हायला लागला की ती माकडे सैरभैर पाळायला लागतात आणि मग  दगड पडायला सुरुवात होते. असेही अधून मधून दगड पडतच होते.  त्यामुळे आम्ही कपारीच्या अगदी कडेला बसून राहिलो आणि खंडू मामांनी इतक्या दुरून,वरून आमच्यासाठी आणलेला पोह्याचा नास्ता केला. खंडू मामा सुद्धा चकित झाले की अरे एवढा कठीण रॉक पॅच बिना रोप चा कसा पार केला म्हणून. शेवटच्या कठीण पॅच ला रोप लावून आम्हाला सुद्धा कमरेला दोर बांधून आम्ही उतरलो.


जसे आम्ही सगळ्यांच्या पुढे जात होतो तसे दरी उतरत राहिलो. आता मात्र उन्हाचा तडाखा वाढला होता. एप्रिलचे ऊन त्यात मध्ये कुठेही प्यायचे पाणी, सरबत असे काहीही नाही. किमान ४ लिटर पाणी जवळ हवेच हवे तरच आपण ट्रेक पूर्ण करू शकतो. पुढे गेल्यानंतर मात्र दरी उतरताना तापलेले खडक हाताला चटके देत होते. हातात ग्लोज घातले तरी काही उपयोग होत नव्हता. सांधण दरी उतरून झाली परंतु आता पुन्हा २-३ तासाची दुसरी दरी चढायची होती. भुकेची वेळ झाली होतीच. काही लोक गावातील लोकांना दरीतच जेवण बनवण्याची ऑर्डर करतात आणि तिथे जेवून ऊन कमी झाले की मग डोंगर चढाई सुरु करतात. परंतु आमच्यातले काही ट्रेकर्स आघाडीवर होतो(मी सुद्धा होते बरे त्यात) त्यातले ५-६ जण लीडर च्या सांगण्यावरून आधीच पुढे गेले होते. त्यामुळे सगळ्यांनीच आता चढाईला सुरुवात केली. दुपारचे १२:३० ऊन मी म्हणत होते. टोपी,सफेद पंचा असून माझ्या पायातले तर त्राणच गेले होते.
मागची मंडळी  हळूहळू येत होती. पण मला काही केल्या ऊन सहन होईना. छोटेसे झुडूप जरी आले तरी बसू वाटू लागले. ग्रुप लीडर राणे सर आणि रोहित सर मागे राहिलेल्या मंडळीला हळूहळू घेऊन डोंगर चढाई करत होते तर ग्रुप लीडर "मंदार सर द ग्रेट" थकलेल्यामध्ये कसा हुरूप आणायचा हे त्यांना पक्के माहिती आहे. "थोडेच राहिले थोडेच राहिले"असे करत करत थोडी सावली आली की गंमत जम्मत करीत बराच मोठा टप्पा भर उन्हात पार करवला. मागून सगळी टीम आली. सगळेच पार दमले होते.
मी तर म्हणत होते की ४ वाजता येईन आता नाही येऊ शकत. रडून पण घेतलं थोडं.  एक तास राहिला असताना एका झाडाखाली थांबून मग आमच्यात उत्साह आणण्यासाठी लीडर राणे आणि मंदार सर, प्रतीक आणि सगळ्यांनीच गाणी,पोवाडे,शिव गर्जना आणि शूर मराठे यांच्या गोष्टी सांगायला कमी नाही केले. एखाद्या लहान मुलाला झोपवण्यासाठी जसे अंगाई गीत गातात  तसेच आमच्यात पुन्हा बळ येण्यासाठी गाणी आणि पोवाड्यांचा आधार घेतला (अंधार फार झाला एक दिवा पाहिजे-या देशाला जिजाऊचा शिव पाहिजे)आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला. मी पुन्हा हळूहळू चढाई करायला सुरु केली. आणि थांबत थांबत का होईना २:४५ ला आम्ही तिथल्या कोकणकड्याच्या टोकावर पोहोचलो. हळूहळू सगळेच येत होते. आता सपाट रस्त्यावर कोणीच कोणाची वाट पाहत नव्हते. जो-तो बसजवळ कधी पोहोचतो हेच बघत होता. आम्ही काही मंडळी ३:१५ ला आमच्या बसजवळ पोहोचलो. पुढे असणारे स्नेहल खोल्लम आणि इतर ५ लोक २ तास आधी पोहोचून जेवून आराम करून निवांत बसले होते. आम्ही देखील पोहोचल्यावर तोंडावर पाणी मारून आधी जेवण केले आणि मग दत्ता ट्रेकर्स मार्गदर्शकच्या घराच्या  मांडवात येऊन बसलो. सर्व मंडळी आल्यावर जेवण आटोपून ट्रेक कश्याप्रकारे  सुखरूप पार पडला यावर चर्चा करून संध्याकाळी ६ वाजता ट्रेक संपवून आम्ही पुण्याकडे रवाना झालो आणि रात्री ११:३० घरी पोहोचलो. काहींना उन्हाचा त्रास झाला पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात. अश्या प्रकारे अद्भुत सांधण व्हॅलीचा ट्रेक आणि रॅपलिंग चा भन्नाट अनुभव घेऊन नेहमीप्रमाणे सर्व ट्रेकर्स च्या सहकार्याने जवळपास ८ कि.मी चा ट्रेक यशस्वी  (सकाळी ६:३० ते दुपारी ४) झाला. 


सांधणव्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या गावकऱ्याला  सोबत घ्यावे. खडक व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणाऱ्या  प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील एकट्याने जाणे टाळावे. तसंच दरी पार करताना रात्र झाल्यास रहाण्याची सोय तिथेच होऊ शकते, म्हणून त्यासाठी तंबूंची व्यवस्था आपल्यासोबत असलेली बरी.  ऊन असल्याने टोपी आणि सफेद रुमाल असावा की ज्याने कान आणि मान झाकली जाते आणि उन्हाचा त्रास कमी होतो.  गावकऱ्यांना आगाऊ सूचना दिल्यास खाण्याची व्यवस्था होते. पण तयार जेवण, थोडा खाऊ, भरपूर पाणी, लिंबू पाणी, सोबत न्यायलाच हवे. कृपा करून ट्रेकिंग जाताना आपण तिथला गडांवरचा कचरा साफ करू शकत नाही तर निदान आपण तिथे पाण्याच्या बाटल्या,थर्माकोलची  ताटे, प्लास्टीक चा कचरा टाकून येऊ नये. आपला सह्याद्री स्वच्छ आणि सुंदर ठेवूयात. धन्यवाद....