Monday 25 January 2016

"पुनरुत्थान समरसता गुरुकुलम"
क्रांतिवीर चाफेकर विद्यालय परिसर,
गावडे जलतरण तलावाशेजारी,
पंढरीचा मळा,
चिंचवडगाव, पुणे-४११०३३.


कुठून सुरुवात करावी हे समजतच नाहीये आज. सध्या मी  ट्रेक ला जावून आले की गंमती, मजा, आपण आयुष्य कसे आणि कित्ती आंनदाने उपभोगतोय याबद्दलचा माझा blog असायचा. तो पुढेदेखील असेलच  अर्थात मी ट्रेक ला गेले तर.
परंतु काल  मी अशा एका ठिकाणाला भेट दिली आणि खारीचा वाटा उचलला की जिथे तुम्हीही जाल तर पुन्हा पुन्हा भेट देवून खारीचा वाटा उचलालच. मी रविवारी दिनांक २४ जानेवारी २०१६ या दिवशी  "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम" या गृरुकुलम ला भेट दिली. मी आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात किव्वा अन्य ठिकाणी असलेल्या आश्रम अथवा अश्या बर्याच संस्था फक्त ऐकल्या आहेत. आणि त्या ठिकाणी चालत असलेले प्रकार फक्त ऐकिवात आहेत. किव्वा दूरदर्शन वरच्या बातम्या मध्ये ऐकलंय, पाहिलंय. ते ऐकलेले असं त्या संस्थान मध्ये दिलेली देणगी किवा मदत तिथे असलेल्या गरजूंपर्यंत बरेचदा पोहोचत नाही. किव्वा तिथे मुला मुलींचे सग्गळ्या प्रकारचे शोषण होते. हे ऐकिवात होते त्यामुळे मी केव्हाही दारात आलेल्या अश्या कुठल्याही संस्थेच्या लोकांना कधी मदत केली नाही. आणि कधी कुठल्या आश्रम किव्वा संस्थेला भेट दिली नाही. मनात एक प्रकारचा राग होता.चीड असायची.अर्थात सगळ्याच संस्था तश्या नसतात. आणि जोवर एखाद्या व्यक्तीचा,ठिकाणाचा, वस्तूचा प्रत्यक्ष भेटून अथवा अनुभव घेतल्याशिवाय आपण आपले मत मांडू नये याचा चांगला अनुभव मला काल आला. मी जरी अश्या ठिकाणाला कधी भेटी दिल्या नाही किंव्वा देणग्या दिल्या नसल्या तरीही मला सामाजिक जाणीव आहे. मला जशी जमेल तशी मदत मी प्रत्येक व्यक्तीला करत आलेय. मग तो नातेवाईक असो, मित्र असो, मैत्रीण असो, माझी कामवाली असो, गरजू असो कोणीही असो. अगदी मी माझ्या २ व्हीलर वरून जात असताना कोणाला गरज असली तर तिथली परिस्थिती पाहून थांबून मदत करते.  

साधारण ७ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतोय मला. माझे मिस्टर श्री. दीपक यांना त्यांच्या ऑफिस मधून एका कलीग ने (श्री आगाशे)यांनी सांगितले की लंडन हून एक आजी- आजोबा आलेयत त्यांना एका गुरुकुलम ला भेट द्यायची आहे आणि ते चिंचवड ला आहे तर त्यांना घेवून जा. माझे मिस्टर जेव्हा त्या वेळी गुरुकुलम ला भेट देवून आले त्या आजीआजोबांच्या निमित्ताने तेव्हा ते आल्यावर जो अनुभव सांगत होते तिथला तो सुन्न करणारा होता. कारण त्यावेळी श्री प्रभुणे यांनी हा वंचित मुलांच्या शिक्षणाचा वसा घेतला होता परंतु ती फक्त सुरुवात होती. कोणत्याही मोठ्ठ्या कार्याची एकट्याने केलेली  सुरुवात ही  फारच कठीण असते. त्याचा पाया रोवायला अवधी हा लागतोच लागतो. त्या ७ वर्षांपूर्वी मुलांना तिथे त्यांचे आईवडील सोडून जायचे. एक वर्षांनी आले तर आले आईवडील नाहीतर ह्या मुलांचे आईबाप हे श्री गिरीश प्रभूनेच झालेत. तेव्हा फक्त ४०-५० मुलं होती. आता या गुकुलम मध्ये ३५० हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. 


आपल्या देशात भिन्न भाषा,वेश, जाती-पंथ असले तरीही सर्वांना उत्कर्ष करण्याची संधी होती. उपेक्षित -वंचित घटकांना ज्ञानार्जनाच्या मार्गाने सर्वश्रेष्ठ पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होता. उगम,उगमाच्या ठिकाणी नदीचा प्रवाह करंगळी एव्हढासुद्धा  नसतो. हृषी-मुनी -महापुरुष यांची कुळ पाहू नयेत या प्रकारची विचारसरणी होती. आपल्यातलाच एक घास, एक तुकडा  भाकरी, शेतातले पसाभर धान्य अश्या वंचितांना आपुलकीनं दिलं जायचं. शिक्षणाची केंद्रआश्रम पाठशाळा हे समाज च चालवत असे. गावातल्या छोट्या व्यवस्थेपासून ते तक्षशीला, नालंद, कशी, पैठण अश्या विद्यापीठापर्यंत सर्वत्र ज्ञानार्जनाचे कार्य समाजाच्या बळावर सुरु असे.





आणि अशातूनच आजच्या परिभाषेत बोलायचे झाले तर उपेक्षित -मागास जाती जमातीतूनच -वंचित घटकातून वेद-महाभारत-रामायण-इतिहासकर्ते महर्षी व्यास, वाल्मिकी अगस्ती, विश्वमित्रांसारखे असंख्य हृषीमुनी या भूमीने दिले. प्रत्येकाकडे कला होती जगण्याचे साधन होते. हातात काम होते,सर्वच गोष्टींवर सर्वांचा अधिकार होता. स्वतःबरोबरच जगाच्या कल्याणाच्या विचाराने धडपडत होते. आणि बघता बघता केव्हातरी या समरसतेचा प्रवाह खंडित झालाच. उच्चनीचता जातीभेद,प्रांत-भाषाभेद, अंधश्रद्धा-रुढीच्या गुलामगिरीत भारतमाता अडकली. विषमतेने ग्रासली. दरिद्री बनली.पृथ्वी भारत आमची आई आहे  आंम्ही तिचे पुत्र आहोत या बंधुभावाच्या नात्याचा विसर पडला. आज फासे पारधी, डोंबारी कोल्हाटी , लमाण, नंदीवाले, मरिआई वाले, गोंधळी, वासुदेव, बेरड-रामोशी, सुतार, भात-सिक्लागरी, घिसाडी यासारख्या असंख्य भटक्या विमुक्त तसेच पूर्वाश्रमीच्या अस्पृश भटक्या, विमुक्त अपृश्य गणल्या गेलेल्या जाती आणि वनवासी अनुसूचित जमातीतले असंख्य घटक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यातूनच आजची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाचा मोठ्ठा घटक दुर्बल वंचित उपेक्षित राहिला तर समाजाचा गाडा गतिमान कसा होणार??  आपण सर्वांनी मिळूनच या समरसतेच्या गाड्याला बळ द्यायला हवे.चालना द्यायला हवी. हे समाजचक्र गतिमान करायला हवं. समरसतेचा आणि शांतीचा संदेश देणारे सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, मोरया गोसावी आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे क्रांतिवीर चापेकर याच्या या पवित्र भूमीत भारतमातेच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारे आणि साकार करण्यासाठी हे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम. सुरु झाले आहे. सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीवर मात करायची  ती आपण सर्वांनी मिळूनच. आपण काह्रीचा वाट जरी उचलला तरीही खूप झाले.

मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणारे गुरुकुलम. गुरुकुलम या संस्थेवर श्री गिरीश प्रभुणे, पुनम -प्रधानाचार्य , सतिश अवचार- आचार्य, मारुती वाघमारे- निवासी , दिपाली,गणेश,राजाभाऊ विश्वास, राहुल, अशी बरीच मंडळी कार्यरत आहेत. आज या वंचितांच्या शाळेत ३५० हून जास्त  मुले शिकत आहेत. ९ जून २००६ ला शिवराज्याभिषेक दिनी या गुरुकुलम ची सुरुवात झाली. पहिली ते १२वी अशा क्रमाने ही मुले शिकत आहेत. ही मुले प्रामुख्याने फासे पारधी , वडार,कष्टकरी वर्गातील आहेत. ज्यांच्या पालकांना शिक्षण काय कोणते घ्यावे  हे समजत नाही. मुलही शाळेत न जात भटकत रहातात. गुरुकुलम मध्ये त्यांना मराठी भाषेबरोबरच विज्ञान, संगणक, तंत्र कौश्यल्य जसे शेती -भाजीपाला लागवड कंपोस्ट खात, रोपवाटिका, बांधकाम, सायकल आई मोटारसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम इत्यादी सोबत मूर्तीकला, संगीत, गायन, वादन, चित्रकला, लेखन , वाचन, संभाषण असे ऐकून वीस विभागात मार्गदर्शन दिले जाते. वनौषधी पक्षीनिरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो


दहा दहाच्या गटाने हे सर्व विषय शिकवले जातात. या शिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मुळच्या कलाकौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुनांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपारिक ज्ञानाची सांगड घालून शिक्षण देने. मुले इथेच  राहत असल्याने हे शक्य होते. यासाठी चिंचवड येथे निसर्गरम्य वातावरणात हे गुरुकुलम आकार घेत आहे. पंच्कीशावर आधारित स्वंतंत्र असा हा अभ्यासक्रम विकसित करून ही  मुले ४ थी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. तसेच ७,१०,१२वीच्या परीक्षा देतात, देतील याशिवाय विविध स्पर्धात्मक परीक्षात क्रीडा स्पर्धात भाग घेतात.
एकूणच काय तर त्यांच्या मनाचा कल  लक्षात घेवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि आधुनिक कळला सुसंगत असे त्यांना घडवायचे आहे यासाठी अनुभवी मार्गदर्शक तज्ञ शिक्षक आचार्यागण , सेवाभावी कार्यकर्ते आणि आपणासारखे असंख्य हितचिंतक हे गुरुकुलम चालवीत आहेत . या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होवून जगाच्या कानाकोपर्यात ही  मुले यशस्वीपणे निश्चित जातील तरीही त्याचं मन कुटुंबात समाजात आणि मातृभूमीत रमेल.
मला माझ्या कुटुंबाला समाज कार्य करायला आवडते आम्ही जसे जमते तसे या गुरुकुलम ला ही मदत करतो. कारण ही मुले शिक्षण घेताहेत. आपल्या मुलांना एवढ्या  संधी उपलब्ध असूनही  आपली मध्यमवर्गीयाची मुले देखील कधी कंटाळा करतात. हा विषय वेगळा आहे तरीही या मुलांना जर आपण जमेल तशी मदत करावयास हरकत नाही. माझे मिस्टर  गेली ७ वर्षे सतत एक महिन्याचा ४००० पर्यंत चा एक खर्च तिथे देतात. जोपर्यंत आम्हाला जमेल तोपर्यंत करणार आम्ही. इथल्या मुलांना आपल्या मुलांचे जुने परंतु चांगले वापरण्याजोगे कपडे असतील ते देखील आपण देवू शकतो ही मुले आनंदाने घालतात. अगदीच पैशाचे कोणाला जमत नसल्यास आपला आठवड्यातला काही वेळ किव्वा महिन्यातला सुटीचा काही वेळ जरी या मुलांसोबत घालवला तरी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो.कारण ही मुले वर्षातून एकदा आपल्या घरी जातात किवा काही तर जातच नाहीत. काहींना त्यांचे आईवडील सोडून गेले ते आलेले सुद्धा  नाहीत  अशीही मुले इथे आहेत. काल मी जेव्हा पहिल्यांदा इथे भेट द्यायला गेले तेव्हा एका ग्रुप ने येवून इथे जत्रा भरवली होती की जेणेकरून सुटीच्या दिवशी सगळ्या  खेळाचा आनंद घेवू शकतील. मुलांना एकावेळी बाहेर नेणे अशक्य होते. त्या ग्रुप ने स्वखर्चाने या मुलांना खेळण्याचा आनद दिला त्यांच्यासोबत खेळले देखील.

ज्याला ज्याला गुरुकुलम ची माहिती मिळाली तो डायरेक्ट गुरुकुलम ला जावून जमेल ती मदत करतो. कोणी पैशाची  मदत करतो, कोणी वस्तू नेवून देतो, कोणी खाद्य  पदार्थ  देतो, कोणी शैक्षणीक साहित्य देतो. मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी विचारले कसली नितांत गरज आहे ते जमल्यास देईन मी आणून. मला ते म्हणाले सध्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे जमले तर A४ साहिज रिम पेपर द्या. मी संध्याकाळी १०रिम नेवून दिल्या. हे समाधान शब्दात सांगणे कठीण आहे. आणि महत्वाचे हे आहे की आपल्यावर कसलीही सक्ती नाही. कोणी न कोणी येतोच आणि मनापासून मदत करतो.
मी २४ जानेवारी च्या रविवारी गेले होते तेव्हा ही मुले जत्रेत गुंग होती.मला जास्त त्यांच्या सोबत फोटोज काढता आले नव्हते.  मी त्या जत्रेचे फोटोज काढले शिवाय या गुरुकुलम चे मुख्य अध्यक्ष कार्यकर्ते श्री गिरीश प्रभुणे यांचा साधा वेश पाहून मला विनोबा भावेंची आठवण झाली. इतक्या महान व्यक्तीसोबत आठवण म्हणून एक फोटो काढलाच मी अर्थात त्यांच्या परवानगीनेच. खरतर ७ नंतर कोणालाही परवानगी नाहीये जायला.  परंतु मी आणि माझे मिस्टर रात्री जेव्हा तिकडे गेलो होतो रिम पेपर द्यायला तेव्हा मुलांच्या जेवणाची वेळ होती. मी आवर्जून आत गेले. तेव्हा मला त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. पण आज ती मुले माझ्यासाठी सेलिब्रिटी होती. काही मुले जेवण करत होती. एक लहान मुलगी वाढणाऱ्या मुलीला म्हणते ताई मला जरा जास्त वाढ ग. मला हसू आले. तिथे सगळ्या मुलांना जेवण ते मुबलक मिळते. कसलीही कुचंबना नाहीये. आतमधेच दवाखाना आहे. काही नवीन बांधकाम चालू होते. मुलांसाठी जेवणाचा hall बांधणे सुरु होते. मी सगळं गुरुकुलम दुपारी फिरून घेतले. मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या भिंतीवर वारली पेंटिंग केलेले दिसले.कलाकार आहेत ही मुले. अशा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. जेवढे आता आठवले ते सांगितले.
मला राजकारण आवडत नाही. पण आजच्या पिढीतही मी तरुण कार्यकर्त्यांना निस्वार्थीपणे काम करताना पाहिले आहे. अभिमान वाटतो या आजच्या पिढीचा सुद्धा.आपण जे समाज कार्य करतो त्याचा टेंभा मिरवायला नाही आवडत. परंतु आपले रोजचे आयुष्य, घर-संसार, नोकरी सांभाळून जर अशा शिक्षणापासून वंचित मुलांसाठी खारीचा वाटा  उचलता आला तर किती समाधान मिळते आपल्याला याचा अनुभव मला आला.


याआधी  गुरुकुलम चा विषय जरी काढला माझ्या मिस्टरांनी तरी मी चिडायचे परंतु आता तो राग ती चीड पूर्ण निघून गेली आहे. आणि उलट मला माझ्या मिस्टरांचा अभिमान वाटतो आहे. शिवाय "फोना" सारख्या चांगल्या (निसर्ग वाचवणारी संस्था) करणाऱ्या संस्थेशी मी जोडली गेलीये त्यात आता या  गुरुकुलम संस्थेशी मी जोडली गेलेय. अभिमान वाटतो आहे मला.   या मुलांची शिक्षणाची ओढ, जगण्याची धडपड, कलेची आवड बघता हे शिकलेय की, "अशा लोकांना मदत करा की ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, अश्या लोकांवर प्रेम करा की ज्यांना खरोखर प्रेमाची गरज आहे, अश्या लोकांवर वेळ आणि पैसा खर्च करा की जे आपल्या वेळेची आणि प्रेमाची कदर करतील आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कार्याची कदर करतील आणि लगेचच पावती देतील." २०१६ हे वर्षे अश्या बर्याच चांगल्या संधी घेवून आलेय माझ्या पुढे. आणि मी प्रत्येक संधीचे सोनेच करते.मग ती संधी ट्रेक ची असो, blog लिहिण्याची असो किंव्वा समाजकार्याचा खारीचा वाटा  उचलण्याची असो. 

Wednesday 20 January 2016


हरिश्चंद्रगड ट्रेक
(१६-१७ जानेवारी २०१६)
हरिश्चंद्रगड तारामती गड
उंची४८५० फूट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईश्रेणी :मध्यम
ठिकाण: नगर महाराष्ट्र
पायथ्याचे जवळचे गाव : पाचनई आणि खिरेश्वर.
डोंगररांग: हरिश्चंद्राची डोंगर रांग.

हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. 
या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे.
इतिहास :
साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.....
ठिकाणे :
टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास-दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :  मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच मंगळगंगेचा उगमअसेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे.


केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.

कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.


गडावर जाण्याच्या वाटा

गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत राहता येते. गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे आणि पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. खिरेश्वर मार्गे ४ ते ५ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ५  तासात मंदिरापर्यंत पोहचते. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
नगर जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. परंतु आम्ही २ तासांच्या आतच पोहोचलो.  वाट फारच सोपी आहे परंतु चढ खूपच कठीण आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.

सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग :गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून बेलपाडाया कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच नळीची वाटअसेही म्हणतात.
काही माहिती मला माझ्या फ्रेंड्स कडून मिळाली आहे. मला फक्त खिरेश्वर मार्गे जाणारी वाट आणि पाचनई कडून जाणारी वाट माहिती आहे. आणि नळीची वाट ऐकूनच आहे अजून नळीच्या वाटेने गडावर जाण्याचा योग आला नाही.
हरिश्चंद्रगड पूर्ण पहावयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. कोकणकड्यावरून देखील तारामती शिखरावर जायला वाट आहे. परंतु आम्ही जास्ती मेंबर असल्याने सगळेच रस्ते धोक्याचे आहेत म्हणून आम्ही कड्यावरून आधी मंदिराजवळ आलो तिथे आमच्या पाठीवरच्या पिशव्या (sack)ठेवल्या. आमच्यातले ४-५ मेंबर तिथे थांबले होते. मग आम्ही ३०-३५ लोक तारामती शिखरावर गेलो. कारण मी फोना ग्रुप सोबत च २ वर्षापूर्वी गेले हरिश्चंद्र गडावर तेव्हा मात्र तारामती शिखर गाठायचे राहून गेले होते. 

तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमुर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात.
माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक १ सप्टेंबर २०१३ चा कर्जत तालुक्यातला कोथळीगड हा होता. आणि लगेच ऑक्टोंबर महिन्यातला दुसरा ट्रेक होता हरिश्चंद्रगड. हाच होता तो गड. परंतु तेव्हादेखील आम्ही इथून पुण्यातून जरी रात्री निघालो होतो तरी आम्ही टेंट टाकून कुठे राहणार नव्हतोच वेळ कमी होता. पहाटेच्या ३-३० ला पोहोचून लगेच ट्रेक सुरु केला होता आणि सकाळी ७ ला कोकणकडा गाठला होता अर्थात त्या आधी एका ठिकाणी सकाळी ६ वाजता चा सूर्योदय थांबून फोटोग्राफी करून डोळ्यात साठवला होता.


नवीन वर्षाची सुरुवातच माझ्या जन्मगावच्या ट्रेक ने झालीये. दि. ९ जानेवारी २०१६ या दिवशी जानेवारीचा ट्रेक झाला होता. आणि त्याला अजून आठवडाही झाला नव्हता. तरीही नशिबाने ९ जानेवारीला फोना ग्रुप चा ट्रेक नव्हता त्यामुळे या महिन्यात मला २ ट्रेक मिळतील अशी आशा होती. पण पण माझे Mr.हे एक आठवडा ऑफिस च्या कामासाठी बाहेरगावी होते त्यामुळे माझी निराशा झाली होती. आणि लगेचच ट्रेक ला जायची हौस पुरी होईल असे वाटत नव्हते तरीही मी ठरवलं होतंच की ट्रेक ला नाही गेले  तरी मी काहींच्या मागणीचा विचार करून पन्नास एक तिळाचे लाडू संक्रांतीच्या दिवशी बनवून ठेवले होते ते मी ट्रेकर्स ना बस सुटते तिथे नेवून देणार होते. आणि शुक्रवारी रात्री माझे मिस्टर बाहेरगावाहून आले आणि आल्या आल्या म्हणाले की महेश आणि रूपा हे दोघे डॉक्टर शैलजा पवार यांच्या आग्रहाखातर ट्रेक ला निघालेत बघ जाशील तर मंदार सर ला कॉल करून विचार जागा आहे का ते. मी क्षणाचा विचार न करता मंदार सर ला कॉल केला की मला परवानगी मिळालीये ट्रेक ला यायची. जागा आहे का?? आता मंदार सर जागा नाही असं म्हणूच दे मग बघू. पण दयाळू मंदार सरांनी मला कशीबशी जागा मिळवून दिली एकच सीट आहे म्हणून. मग काय धबड घाई झाली माझी आधीच एक आठवडा आधी केलेल्या ट्रेक चा थकवा होता अंगात ताप होता. आणि मी फक्त महिन्यातून एकच ट्रेक करते घर सांभाळून. तेव्हढ्यात समाधान मानते. पण ही दुसर्या ट्रेक ची सुवर्णसंधी कोण सोडणार? मी तरी नाही सोडणार. आणि  तयारीला सुरुवात केली. विचार केला सकाळपर्यंत जर ठीक वाटले तरच जायचं जरी मंदार सरांना कॉल केला असला तरीही. कारण ट्रेक हा २ दिवसांचा होता. शिवाय गडावर मोठ्ठ गाठोडं घेवून चढायचं होतं. पण पुन्हा तेच "जयू ने एक बार ठाण ली के ठाण ली,उसे वो खुद भी नहीं रोक सकती."
रात्री चे १:३० झाले तरी आवारतच होते पुन्हा सकाळी ५ ला उठून सगळा स्वयंपाक  उरकून घेतला कारण ३ मेंबर घरी होतेच. आणि ५ पुरणपोळ्या ५ तिळाच्या पोळ्या आणि ते ४० तिळाचे लाडू घेतले गाठोड्यात आणि चपाती भाजी बांधून घेतली. जशी जत्रेची तयारी झाली. एव्हढं सामान टेन्ट, स्वीप्पिंग म्याट इ.  "ओ माय God"

सकाळी ९:४५ ला घरातून निघाले. "फोना"ची बस आली आम्ही सकाळी ११ ला निघालो. नाशिक फाटा सोडल्यानंतर एका ठिकाणी नारळ फोडला नि फोटो काढून ट्रेकर्स निघालो हरिश्चंद्र गडाकडे. बसमध्ये गाण्यांचा धुमाकूळ घातला. मला काय स्वयंपाकात फारसा इंटरेस्ट नाहीये पण माझ्याकडून आपोआप चांगलं बनतं जे बनवते ते. म्हणून  मला कोणी फ्रेंड्स ने आवर्जून मागितलं तर मी बनवते आणि घेवून जाते. आणि तसंच मी या ट्रेक ला ४० एक तिळाचे लाडू, ४-५ तिळाच्या पोळ्या आणि ४-५ पुरण पोळ्या घेवून गेले होते. ते लाडू पुरले सगळ्यांना पण पुरणपोळी आणि तिळाची पोळी प्रसादासारखी वाटली. या सगळ्या गडबडीत मी रूपा आणि महेश पाठक यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट. आणायचे राहून गेले. ते पेंडिंग राहिलंय रे.आम्ही ४ वाजता गडाच्या पायथ्याशी पाचनई गावात उतरलो. लगेच मंदार सरांनी पटकन instructions दिल्या आम्ही वेड्यासारखे गड चढायला लागलो कारण आम्हाला कोकण कड्यावरचा सूर्यास्त डोळ्यात साठवायचा होता मनसोक्त फोटोग्राफी करायची होती. आणि म्हणता म्हणता सुपर फास्ट गाडी जावी तसे पोहोचलो ५:२० ला गडावर. परंतु अजून गडावर पठार मोठे आहे. त्यामुळे कोकणकडा यायला वेळ लागणार होता. आणि आम्हाला चिंता होती ती तिथल्या सूर्योदयाची. मिळतो का नाही मिळतो. आणि आणि आम्ही सूर्यास्तापूर्वी पोहोचलो रे हरिश्चंद्र गडावरच्या कोकण कड्यावर. आम्ही काहीजण पुढे होतो. मी, तनया, रोहिणी,छोटा आदित्या, रुपा, महेश पाठक, राणेसर, राहुल दर्गुडे आणि अमोल आणि लगेचच पाठोपाठ बाकी मंडळी होतीच. यावेळी सगळेच एक्स्प्रेस च्या वेगात होते.गड चढताना सूर्यास्त पाहण्यासाठी सुर्य पळून जातो की काय यासाठी आम्ही अक्षरश: धावत च गेलो. 



मनसोक्त तिथला स्वर्गच जणू तो डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतला. सुर्य पार अस्ताला जाईस्तोवर तिथे बसलो होतो. कोणाच कोणाकडे लक्ष नव्हत. फक्त कोकणकडा सूर्य आणि कॅमेरा आणि आम्ही क्रेझी ट्रेकर्स. काय नजरा  होता तो. सुर्य अस्ताला गेला आणि आम्ही मात्र आमचे टेंट तिथेच एका जागी ठोकायला सुरु केले. थंडी म्हणते मी. टेन्ट लावले आणि शेकोट्या पेटवल्या.
शेकोटीजवळ म्हातारा-म्हातार्याची बायको शेकोटीला आला या गाण्याने मस्त मजा आणली आणि तिथेच प्रदीप अडागळे यांनी पोवाडा गायला आम्ही त्याला  कोरस दिला. वाह काय अभिमान वाटतो "शिवाचा" पोवाडा गाताना.................!
आधीच फोन करून जेवणाची सोय गडावर केली होती. तिथे आता पायथ्याला राहणारी लोक शनिवार रविवारी ट्रेकर्स साठी सध्या सोप्या जेवणाची सोय करू लागले आहेत. टिपूर चांदणे आणि त्यात शेकोटी आणि त्यात अनिल जाधव यांनी जेवणाआधी गरमागरम सूप बनवलं तिथे चूल  पेटवून . . वाह वाह काय सूप झाला होता. धन्यवाद अनिल जाधव.आम्ही शेकोटीचे गाणे म्हणत थोडा वेळ घालवला आणि जेवायला गेलो. गरम बाजरीची भाकरी एक भाजी आमटी आणि कढी लोणचं असं ते जेवण जेवलो मस्त. आणि कढी काय वरपली म्हणता. जाम च वरपली. नंतर पुन्हा शेकोटीजवळ बसून ओळख करून घेतली आणि काही गंमती जमतीचे  किस्से सांगत बसलो होते जरी एव्हढे थकलो होतो. दुसर्या दिवशी रूपा आणि महेश पाठक यांच्या लग्नाचा वाढदिवस होता सो त्या रात्रीच्या जेवणाची सोय त्यांच्या तर्फे त्यांनी केली होती. त्यासाठी महेश आणि रूपा यांना खूप खूप धन्यवाद. 

आमच्या सोबत आजूबाजूला इतरही लोकांनी तंबू ठोकले होते. सगळीकडे शेकोट्या पेटल्या होत्या. बेधुंद करणारे असे ते वातावरण होते. थंडी खूप वाढली होती आणि आता मात्र तंबू मध्ये जावे आणि झोपावे असं वाटत होतं पण शेकोटी सोडू वाटत नव्हती. 
आम्ही तिथे शिवरायांच्या घोषणा केल्या. आणि आम्हाला दुसर्या ग्रुप कडून देखील "श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा प्रतिसाद मिळाला. अभिमान आहे शिवरायांचा आम्हाला. सकाळी उठून पुन्हा सूर्योदय अनुभवायचा होता कोकण कड्यावरचा म्हणून आम्ही निघालो आपआपल्या तंबूमध्ये. गप्पा सुरूच होत्या प्रत्येक तंबू मध्ये आणि झोपायचा प्रयत्न करत होतो पण थंडीमुळे बिलकुल झोप येत नव्हती. तेव्हा जायच्या आधी काही लोक म्हणाले होते की थंडी खूप असेल जावू नको  पण मी ऐकलं नाही. आणि कुडकुडत बसले कानटोपी शाल असूनही सॉल्लिड  थंडी लागत होती रे. तंबूवर दव पडले होते त्याने गारवा अजूनच वाढला होता.  पण  त्याच क्षणी गीटार आणि बासरीचे सूर ऐकू येवू लागले. अतिशय मन मोहक सूर होते ते. "रोजा जानेमन" माझं आवडतं गाणे आणि कित्तीतरी गाणी ऐकायला येत होती. आम्ही पण वन्स मोअर दिला आमच्या ग्रुप कडून. आणि आम्हाला प्रतिसाद ही आला. अशीच रात्र निघून चालली होती. ती बेधुंद रात्र संपूच नये असं वाटत होतं. मी जास्त ओझं नको म्हणून माझं जर्किन बसमध्येच ठेवलं त्याचा पश्चाताप झाला. पण तनया मी एका टेन्ट मध्ये असल्याने शेवटी न राहून तिचा स्वेटर काढून घेतला त्यामुळे मी जरा  तरी वाचले थंडीपासून. thanks तनया. आमच्यातले काहीजण रात्रीचे २-३ वाजता फोटोग्राफीसाठी कोकणकड्यावर जावून आले. टिपूर चांदणे पडले होते. त्यात चंद्र ही होताच सोबतीला. आणि गीटार-बासरीच्या सुरात म्हणता म्हणता रात्र संपली देखील. मला खूप थंडी लागत असल्या कारणाने मी पुरी रात्र जागीच होते. पण तंबूमधून पुन्हा बाहेर यायची हिम्मत नव्हती. 


तंबूतून बाहेर पडलो ते आवरूनच कारण कोकण कड्याचा सूर्योदय वाट पाहत होता. उठलो पुन्हा शेकोटी पेटवली  कारण थंडी भयंकर होती. सकाळी पोह्याचा नास्ता  केल्यानंतर राणे सरांनी महेश रूपा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक आणला होता आणि मंदार सरांचा वाढदिवस दुसर्या दिवशी होता म्हणून एकूण तीन केक आणले होते. ते त्यांनी कापले आणि आम्ही तंबूची जागा सोडली. आणि तंबू जमा करून. निघालो आम्ही वेडे ट्रेकर्स कोकणकड्यावर.



पुन्हा तो सुर्य,कॅमेरा, कोकणकडा आणि आम्ही ट्रेकर्स. आज आम्हाला तारामती शिखर सर करायचे होते. कोकणकड्याचा निरोप घेतला आणि तारामती शिखराकडे निघालो आमच्यातले ४-५ ट्रेकर्स काही कारणाने थांबले तिथे मग आम्ही आमची गाठोडी ठेवली तिथे गणपती मंदिरापाशी आणि निघालोच. ४० मिनिटांमध्ये पोहोचलो शिखरावर. ऐश्वर्या अडागळे पण भारीच सगळ्यात पुढे पोहोचली तारामती शिखरावर आम्ही आपले फोटोच्या नादात होतो. ती म्हणतेच आहे की  मी आधी पोहोचले रे तशी आम्ही चार पाच जणांनी धाव च मारली दुसर्या वाटेने आणि आम्ही पोहोचलो.  बिचारीची जराशी निराशा झाली. जराशी गम्मत. तिथूनही दिसणारा नजरा डोळ्यांना तृप्त करत होता. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. पुन्हा फोटोग्राफी केली आणि निघालो तारामती शिखराच्या पायथ्याला. १०-१५ मिनिटांमध्येच आलो खाली आंघोळी केल्या तिथे असणार्या कुंडांमध्ये आणि एका गुहेत जेवण केले भाकरी-ठेचा आणि अर्धा तास बसून लगेच हरिश्चंद्र
गड उतरायला सुरुवात केली. २:१५ ला उतरायला सुरु केले आणि ४-४५ ला उतरलो पण खाली. तो आनंद शब्दात सांगणे कठीण आहे पण तिथे जावून आल्यावर जो प्रत्यक्षातला अनुभव आहे न तो तिथे जावून च     अनुभवावा असा हा गडात गड हरिश्चंद्र गड. पुन्हा बसमध्ये बसून पुणे येइसतोवर गाण्यांची धमाल.        बसमध्ये तर  त्या सखूच्या गाण्याने तर वेडच लावले. पूर्ण प्रवास त्या सखूच्या गाण्याने छान झाला.     आमचे जीवा-शिवा म्हणजे मंदारसर-मनोज सर सग्गळ्या गाण्यात मर्ज होतात. मनोज राणेंची जुनी नवी गाणी कडवीच्या कडवी तोंड  पाठ भारीच.       कव्वाली, पोवाडे, कोळी गीते. चित्रपट गीते धमाल आली. मी,तनया, सौरभ, निलेश, शोएब, रेखा, प्रशांत, सुमित,  रोहित, स्नेहल, आदित्य, राहुल, रोहिणी, अबोली, महेश पंडित आणि सगळ्यांनी सखूच्या गाण्यावर धमाल आणली.      आणि एका ठिकाणी थांबून गरम वडापाव आणि चहा झाला अर्थात माझा चष्मा विसरल्यामुळे मी ट्रीट दिली स्वखुशीने.  आणि भरल्या मनाने रात्री चे ११ वाजता घरी पोहोचलो.
पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. शिवाय उन्हाळ्यात विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो.


छोटा आदित्य आणि नवा मेंबर सुमित भावसार कमाल केलीत तुम्ही. जुने आणि अजून काही नवे मेम्बर्स यांनी सुद्धा गड उत्तमरीत्या सर केला. धन्यवाद माझे सहकारी ट्रेकर्स ज्यांनी माझा टेन्ट न्यायला मदत केली. प्रथमेश आणि अमोल यांनी  टेन्ट घेवून मला मोलाची मदत केली. आणि खूप खूप धन्यवाद माझ्या घरच्यांना. वेळेवर जायला परवानगी दिली आणि विश्वास ठेवला की तब्बेत ठीक नसतानाही मी हा महाराष्ट्रातील उंचीच्या मानाने कळसुबाई नंतर दोन नंबरला असलेला हरिश्चंद्रगड सर करू शकेन. धन्यवाद ……धन्यवाद सगळ्या मेम्बर्स ना. मंदार सर, राणे सर, रोहित, प्रथमेश, रंजीत, महेश पंडित, अनिल जाधव, डॉक्टर शैलजा आणि  डॉक्टर शशिकांत सर, संकेत, हर्षद, राहुल, सौरभ, शोएब, अमोल, रूपा, अबोली, तनया, स्नेहल, रोहिणी, निलेश, प्रशांत, रेखा, प्रदीप आणि ऐश्वर्या  बाकी कोणी राहिलं असेल त्या सगळ्यांना धन्यवाद.........................
.