Tuesday 26 March 2019

कारकाई जंगल ट्रेक,जुन्नर खजाना😊

कारकाई जंगल ट्रेक
ठिकाण -पुणे
चढाई श्रेणी - मध्यम
उंची - ४००० फूट
दिनांक - २४ मार्च २०१९
ग्रुप - माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे

फेब्रुवारी महिना चालू झाला की खरंतर उन्हाचे ट्रेक नको वाटतात परंतु हेच उन्हाळ्याचे ट्रेक आपली शारीरिक क्षमता तपासण्यासाठी योग्य असतात. माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर चे मागील दोन ट्रेक (धोडप आणि माहुली ट्रेक) दोन्ही ट्रेक रात्री प्रवास करून केल्याने भन्नाट झाले होते. मार्च महिना लागला की बऱ्याच मुलांच्या परीक्षा असल्याने पर्यायाने काही ट्रेकर्स हे भन्नाट (धूरकाढे ट्रेक) चुकवतात. चुकवू नये असे माझे मत आहे. असोमाऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्सचा ९५ वा कारकाई जंगल ट्रेक दिनांक २४ मार्च २०१९ या दिवशी आयोजित केला गेला. उन्हाळ्यात चढाई श्रेणी मध्यम असलेला आणि जंगल वॉक असा ट्रेक आहे असे ट्रेक लीडर्सने सांगितले होते. यावेळी माझे कुटुंब ट्रेकला असणार म्हणून मी मनातून खुश होते.

दिनांक २४ मार्च ला सकाळी आमची ४० ट्रेकर्सची  बस सकाळी साडेसहाच्या सुमारास  निगडी- तळेगाव- चाकण मार्गे निघून प्रवासाची शुभ सुरुवात म्हणून  नारळ फोडून राजगुरूनगर येथे नास्ता करून पुढे   नारायणगाव-अळेफाटामार्गे- कोल्हेवाडी येथे सुमारे साडेदहाच्या सुमारास पोहोचली. निगडीपासून कारकाई जंगल सुमारे १०८ कि. मी. इतके आहे. पुण्याहून इथे पोहोचावयास सुमारे तीन ते साडेतीन तास लागतात.

ऑक्टोबर २०१८ मध्ये हटकेश्वर ट्रेक केला होता तो चांगलाच आठवणीत आहे. कारकाईला जाताना बसमधून हा हटकेश्वरचा प्रशस्त डोंगर आणि तो नैसर्गिक पूल अगदी स्पष्ट आणि सुंदर दिसत होता. त्या ट्रेकला आलेल्या ट्रेकर्सना आश्चर्य वाटत होते की हा ऑक्टोबरच्या उन्हात इतका मोठा डोंगर आम्ही सर केला  होता. त्या अफाट ट्रेकचे संपूर्ण क्रेडिट आमचे ट्रेक लीडर्स मंदार सर, राणे सर, रोहित सर, अनिल जाधव ,निकाळजे आणि निलेश कुमकर यांना जाते.

आताचा कारकाई जंगल ट्रेक आमच्यासाठी नवीनच असल्याने आम्हा सगळ्यांनाच फार उत्सुकता होती. डावीकडे हटकेश्वर, मध्ये पिंपळजोगा धरणाचा अथांग जलाशय आणि उजवीकडे कारकाई जंगल असे ते रमणीय,दृश्य होते. मार्च महिना असून जलाशयाच्या पाण्याने गारवा सुखवीत होता. लीडर्सने आणि स्थानिक ट्रेक गाईड आणि ट्रेकर निलेश यांनी ट्रेक संदर्भात  सूचना केल्या आणि कोल्हेवाडी गावातून तुकाराम नावाचा वाटाड्या घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. तो भव्य कातळ पाहून असे वाटले निलेश आम्हाला असल्या भर उन्हात त्या कातळावर नेतो की काय?. खरंतर असं खोटं फसवून गोड बोलून लीडर्सने नेलं तरच मोठा ट्रेक ग्रुपसोबत सहज शक्य होतो. प्रॉपर ट्रेक शूज, फुलबाही ट्रेकड्रेस, टोपी, उन्हात सफेद रुमाल, हातात काठी,खायच्या गोष्टी, चरायचा खाऊ, एनर्जी  पेय,पाणी आणि इतर साहित्याबाबतच्या सूचना केलेल्या असतातच. त्यामुळे सगळे ट्रेकर्स तयारीत असतात. परंतु आधीच खूप मोठा ट्रेक आहे म्हंटलं की नवीन ट्रेकर्स घाबरून जातात. त्यामुळे मध्यम आणि छोटासा-थोडाच ट्रेक आहे असेच सांगितले जाते आणि तेच बरोबर असते
ट्रेकला सुरुवात केली आणि पहिलाच टप्पा खडा चढ असल्याने सगळ्यांचे धाबे दणाणले. मला तर क्षणभर असं वाटलं की लीडर हा मोठा कातळ आज आम्हाला चढवणारच. अर्ध्या पाऊण तासाचा चांगला उन्हाचा टप्पा आणि थोड़ा कठीण चढ पार केल्यावर एका झाडाखाली सगळ्यांनी क्षणभर विश्रांती घेऊन पुढे निघालो. एका झाडाची आणि घोटभर पाण्याची किंमत अश्यावेळीच कळते.

प्रत्येक पावसात प्रत्येकाने अश्या ठिकाणी किमान रोपे तरी लावूयात. दुपारचे १२ वाजले होते. डोक्यावर कडक ऊन होते परंतु डाव्या बाजूने पिंपळजोगा धरण जणू आम्हाला गारवा देण्यासाठीच होते. हे धरणा तुझे खूप खूप आभार रे. पुढे जंगल दिसत तर होते परंतु अजून आम्ही उन्हातच चालत होतो. १२ नंतर अधून मधून झाडे दिसायला लागली मग हायसे वाटले. सगळेजण पाणी,सरबत, ग्लुकोन-डी घटा-घटा पित होते. उन्हाच्या ट्रेक दरम्यान आपल्याजवळ पाण्याचा साठा थोडा जास्तच असावादुसऱ्याजवळ पाणी मागण्याची वेळ येऊ नये कारण प्रत्येकाला आपली बॅग ट्रेक करताना नको वाटत असते.
म्हणता म्हणता घनदाट जंगल लागले बाबा एकदाचे. लीडर्ससाठी मनातून शुभेच्छा निघत होत्या. छोट्या ट्रेकर्स मध्ये गार्गी आणि प्रभाच्या सोबतचे तेजस, ईशान आणि इतर छोटे ट्रेकर्सचा छान ग्रुप जमला होता. घनदाट जंगलात ४००वर्षांपूर्वीची उंबराची आणि इतर झाडे पाहावयास मिळत होती. करवंदाच्या झाडांना करवंदे आली होती परंतु अजून ती पिकायची बाकी होती. आम्ही त्याची देखील चव घेतली

उंबराच्या झाडाला आलेली फळे मात्र आम्ही पाडून खाल्ली. लहानपणी आम्ही खेड्यात उंबराच्या झाडावर बसून अभ्यासाच्या नावाने उंबराची पिकलेली फळे खायचो आणि उंबर फोडून त्यातले  ते चिलटे उडवायचे आणि ते उंबराचे पिकलेले फळ दाबून म्हणायचो, "तेलाचा तेल गोड, उंबराचा उंबर गोड"ही कोकणी भाषा आहे. परंतु या वाक्याचा खरा अर्थ काय ते मला अजून कळले नाही. पण त्याने उंबराचे फळ गोड लागायचे हे मात्र खरे. त्याची आठवण झाली. उंबर म्हणजे आज आपण अंजीर खातो अगदी तशीच चव लागते. जंगलात चालताना झाडाच्या फांद्या पडून सुकल्याने त्यात पाय अडकत होते आणि काहींनी तर धपाकदिशी पडायचा आनंद देखील घेतला. मधल्या भागात एका ठिकाणी हरणटोळ नावाचा मध्यम विषारी साप पहावयास  मिळाला. हा पक्षांना प्राण्यांना चावला तर विष चढते.  सर्पमित्र निकाळजे यांनी तो हातात घेऊन त्याविषयी आम्हाला  माहिती देऊन पुन्हा जंगलात सुखरूप सोडून दिला. जंगलात चालताना जंगल इतके घनदाट होते की ट्रेकर्स मागे पुढे झाले की लगेच वाट चुकली जात होती. त्यामुळे कायम ग्रुप छोटा असो की मोठा उत्साहाच्या भरात अजिबात पुढे-पुढे जाऊ नये. ग्रुप सोबतच रहावे. कारकाई जंगल येथे ट्रेकर्सचे जाणे तसे कमी आहे त्यामुळे जंगलातील वाट काही ठिकाणी मळलेली नसल्याने थोडी चुकायला होते त्यामुळे स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावाच. 

दुपारी १च्या सुमारास आम्ही सोबत आणलेला जेवणाचा आस्वाद घेतला. त्यात भेंडी बटाटा, वांगे, पिठले भाकरी, दही साखर, वालाचे बिरडे, चटणी लोणचे, बिस्किट्स, चतुर्थी असल्याने बनाना चिप्स, राजगिरा लाडू, द्राक्षे संत्रे, सांज्याची पोळी, काकडी गाजर,शेंगदाणा लाडू, आणि खूप भारी भारी पदार्थांचा आस्वाद घेतला. जंगलाच्या मध्यभागी झाडांच्या सावलीत, आभाळाच्या छताखाली, पानांच्या गालिच्यावर अर्धातास स्वर्गसुखी वामकुक्षी घेतली आणि ओळख परेड करून घेतली. तेव्हा समजले की आमच्या सोबत ट्रेकसाठी खास बारामतीहून २ट्रेकर आणि मुबईहून एक ट्रेकर आले होते त्यांचे विशेष कौतुक. गरजूंना अन्न वेळेवर पुरवणारी रॉबिनहूड संस्था त्यात सहभागी असणारे रघु पाटील आणि इतर ट्रेकर्सचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. ट्रेकिंगचा खूप फायदा होतो हे फक्त माझ्यासारख्या सतराशे साठ आजार असलेल्यालाच ठाऊक आहे. कठीणातील कठीण आजार ट्रेकमुळे कमी होऊन पळून जातात. एक ट्रेकर मुलगी तर हार्ट पेशंट होती तरी आली होती. तिला माझा सलाम. 

प्रवीणने महाराष्ट्र पोलीस यांच्यावर गायलेला पोवाडा वाखाणण्यासारखा होता. जवळपासच्या किल्ल्यांविषयी आणि लेण्यांविषयी निलेश कुमकर याने खूप छान माहिती दिली. आपण फक्त लेण्याद्री येथील लेण्या पाहतो.  परंतु भारतात सुमारे १२०० लेण्या आहेत.  त्यापैकी ८००-८५० लेण्या महाराष्ट्रात आहेत त्यातील ३५० लेण्या  आहेत त्या एकट्या जुन्नर मध्ये आहेत. शिवनेरीच्या पोटात,पाठीमागे तुळजाभवानी लेणी  नारायणगावजवळ मानमोडीला, हडसर किल्ल्यावर,निमगिरी जवळ, खिरेश्वर जवळ अश्या अनेक ठीकाणी लेण्या आहेत. लेण्यांचे दोन प्रकार आहेत ऐहिक लेणे आणि चैत्य लेणे. चैत्य लेणे म्हणजे जैन बौद्ध यांनी धर्मप्रसारासाठी बांधलेली लेणी म्हणजे ही सर्व लेणी. पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले लेणे म्हणजे ऐहिक लेणे होय.  भारतामध्ये महाराष्ट्रात ते ऐहिक लेणे फक्त नाणेघाटमध्ये आहे. तेथील ब्राम्हीलिपीतील शिलालेख हा अपभ्रंश होऊन नंतर मराठी बोली भाषेत आला.खासदार पूनम महाजन यांनी नाणेघाटातील  शिलालेख निवडून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सादर केला. आपली भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखले जायला किमान १२०० वर्षे पूर्ण असावे लागतात.  काही वर्षानी हा शिलालेख फार महत्वपूर्व मानला जाईल. २००० वर्षांपूर्वी नागणिका  राणीने यज्ञ केला त्या खर्चाचा  उल्लेख आहे. पूर्वी इंग्रजांच्या काळात लुटारुंच्या टोळ्या वाहने लुटायचा त्यावेळी सातवाहन राजाची नागणिका राणीने नाणेघाटाची निर्मिती केली.टोल  टाकण्यासाठी रांजण ठेवले आहेत ते आपण तिथे पाहू शकतो. भारतातील ही पहिली टोल  पद्धती असेल. ही फार अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी शिवनेरी, चावंड, निमगिरी, नाणेघाट,जीवधन, हडसर, कुंजरगड,  ह्या किल्ल्यांची निर्मिती केली. कुंजरगड हा किल्ला नगरमधील अकोले गावाच्या हद्दीत येतो. पूर्वी इंग्रज अधिकारी पोफ़ हा अकोले गावाचा मुख्य होता तो फक्त संडेला या गावात यायचा त्यामुळे तेथील गावाला पोफ़संडी हे नाव पडले आहे. त्याला हे कुंजरगडच्या पायथ्याचे दऱ्याखोर्याने वेढलेले गाव फार आवडत असे. इथे सूर्य साडेसात नंतर दर्शन देतो इतके हे खेडे डोंगराच्या आत वसलेले आहे.लीडर्स हो,आपला कुंजरगडचा ट्रेक झालाच पाहिजे.


जेवण करताना डीपी, मंदार सर, ईशान नितीन किरण निकाळजे आणि इतरांनी  मंदिराच्या बरेच दूर  खाली उतरून एका छोट्या झऱ्यातून पान लावून ४० लिटर पाणी सोबत आणलेल्या बाटल्यांमध्ये भरले असेल. जंगलात फक्त एका ठीकाणी पाणी मिळाले. या ट्रेकला जाताना पाण्याचा भरपूर साठा जवळ ठेवावा. प्रत्येक वेळेला ओळख परेड झालीच पाहिजे आणि जुन्या नव्याची सगळ्यांची ओळख झाली पाहिजे कारण नवे जुने एकमेकांना नवीनच असतात. 

साडेतीनच्या सुमारास जंगलातील ताजा प्राणवायू, मातीचा सुगंध, ही फार अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. लागलेल्या धुराचा सुवास, करवंदाच्या फुलांचा सुगंध, पानांचा सुगंध, पानांची सळसळ, झाडांमधून दिसणाऱ्या स्वच्छ आकाशाचा प्रकाश, झाडांची  गडद सावली, गारवा सगळ्या स्वर्गमयी आठवणी सोबत  घेऊन दुसऱ्या बाजूने जंगल चालण्यास सुरुवात केली. थोडेसे पुढे गेल्यावर अचानक एक मोठा पट्टा मोकळा दिसला. दोन्ही बाजूला जंगल आणि मधेच २एक एकराचा मोठा भाग पूर्ण मोकळा दिसला. या ठिकाणी  ३वर्षांपूर्वी वरती दिसणाऱ्या मोठ्या कातळाचा मोठा भाग पावसात कोसळून पडला आणि येथील दोन ते अडीच एकराचे जंगल गाडले गेले. या गाडलेल्या जंगलामुळे खाली  असलेले नागेश्वरवाडी हे गाव वाचले. जंगल नसते तर हा मातीचा भाग आणि मोठं मोठे खडक सरळ गावात वाहून गेले असते आणि गाव नामशेष झाले असते. दुसरी माळीण घटना घडली असती. जंगलाच्या सुदैवाने ही  दुर्घटना टळली. जंगलाचे झाडाचे अनेक फायदे आहेत. आपण जसे निसर्गाला देऊ तशीच परत फेड निसर्ग आपल्याला करतो. कातळातून कोसळले मोठे अफाट खडक झाडांना अडल्याने  ते तसेच तिथे उभे आहेत. निसर्गाची किमया दुसरे काय.

संध्याकाळी ४ते ५ पाचच्या दरम्यान आम्ही उतरत होतो. फोटोग्राफी करताना एकीकडे सिंदोळा, एकीकडे दूर भैरवगडचा सुळका तर जवळचा हरिश्चन्द्रगडचा बालेकिल्ला दिसत होता. किंग फोर्टच्या इतका जवळ हा डोंगर असून दुर्लक्षित राहिला आहे. हरिश्चन्द्रगड  ट्रेकर्सने श्रीमंत  आणि हा कारकाई डोंगर ट्रेकर्सने गरीब भाऊ आहे असे वाटते. परंतु  कारकाईच्या माथ्यावरून दिसणारा पिंपळजोगाचा अथांग जलाशय अतिशय सुंदर दिसतो आणि सतत गारवा देतो.सह्याद्रीतील प्रत्येक गडाचे सौन्दर्य हे वेगवेगळे असते. एकसारखे सौदर्य असले तर आपल्याला देखील कंटाळा येईल. उतरताना भैरवगड उठून उभा राहून खुणावत होता तर हरिश्चन्द्रगडचा बालेकिल्ला स्मितहास्य करीत होता. सकाळी ट्रेक सुरु करतानाच माझ्या मोबाइलला अचानक काहीतरी झाले आणि बहुतेक बॅक लाईट बंद पडला असावा. त्याला आज माझी सोबत करायचीच नव्हती जणू. परंतु माझे मिस्टर आणि अजून एक डिजिटल कॅमेरा सोबत असल्याने माझा गेलेला जीव परत आला. कारण ट्रेक दरम्यान मोबाइल हा माझा आत्मा असतो. त्यामुळेच तर इतक्या साऱ्या आठवणी फोटो रूपात सोबत आणता येतात. 
दुपारी हिरव्यागार जंगलात "वारा गायी  गाणे, प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली, धुंद फुल पाने..." हे गाणे गावेसे वाटत होते तर संध्याकाळी उतरताना त्या घनदाट जंगलाच्या पाचोळ्यातून उतरताना "वारा पिसाटलेला, पाचोळा सैरावैरा, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले....."  हे सिरीयलचे टायटल song  म्हणत होतो. संध्याकाळी ६च्या  सुमारास करवंदाचे जंगल पार करीत कुडीच्या फुलांचा सुवास घेत सूर्यास्ताच्या दिशेने आम्ही उतराई केली. वाटाड्या तुकाराम भाऊला त्याचे बक्षीस देऊन आम्ही खिरेश्वर कडे थोडावेळ चालत निघून बसमध्ये बसून पिंपळजोगा धरणाच्या त्या भिंतीवरून निघालो. (खालील फोटोमध्ये तुकारामभाऊ गाईड)
डुगूडुगू करीत आमची बस निघाली होती एकीकडे सुंदर असा सूर्यास्त दिसत होता तर एकीकडे बसच्या आवाजाने धरणाच्या पाण्याच्या कडेला आलेली बदके पाण्यात पोहू लागली त्यामुळे छानशी वलयांकित नक्षी तयार झाली होती. बघावे ते नवलच. निसर्गामध्ये जातो तेव्हा पूर्णपणे निसर्गासोबत रमून जायचे तरच खऱ्या अर्थाने ट्रेक सार्थकी लागतो. कारकाई जंगलाच्या गोड आणि गार आठवणी घेऊन आम्ही क्षणभर विश्रांती (मच्छिन्द्र अहेर-९८६०३८८९५१) या ठिकाणी कांदा भजी, मी आणलेली साजूक तुपातील पुरणपोळी आणि ताक चहा, सरबतचा आस्वाद घेऊन  थकलेले चेहरे पुन्हा ताजेतवाने होऊन पुणेकडे रवाना झालो. दिवसभराच्या सुमारे ६-७ कि.मी च्या ट्रेकमुळे  थकलेले असताना देखील लगेच जोरदार हमरीतुमरीवाली अंताक्षरी सुरु केल्याने ३-४ तासांचा प्रवास कसा गेला हे कोणालाही समजले नाही.. 

मयुरी, स्मिता, पवार मॅडम, पवार सर, डीपी साने, मंदार सर, राणे सर, नितीन,भुजबळ मॅडम, शेवाळकर सर, किरण, रघु, मंगेश, हर्षद,प्रवीण, बारामतीकर,स्नेहा,स्नेहल, ढमढेरे आणि सगळेच एकापेक्षा एक गायक आणि हमरीतुमरीवाले तुफानी अभिनय करणारे कलाकारहो, वाह सर्व ट्रेकर्सनी अंताक्षरीमध्ये ठासून सहभाग घेऊन खूपच मजा आणलीत. प्रत्येकाचे कौतुक. न आलेले ट्रेकर्स  रोहित,वैशाली, कविता, निलेश, राहुल, कल्पना, आदित्य, निलेश, गीता,मीनल, प्रतीक, विवेक,आनंद,आकाश, प्रतीक, सायली, सलोनी,ऋतुजा,अपूर्वा शोभा, शुभांगी,स्नेहल, अस्मिता आणि इतर सगळेच ट्रेकर्सहो, खूप छान गार ट्रेक मिस केलात तुम्ही.   माऊंटन   एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड  ट्रेल्स  चा ९५ वा ट्रेक भन्नाट झाला. ट्रेक लीडर्स मंदार थरवळ,मनोज  राणे, रोहित, अनिल जाधव , निकाळजे अतिशय सुंदर ट्रेक आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. स्थानिक बेस्ट गाईड ट्रेकर निलेश कुमकर याचे मनापासून आभार.माझा मोबाइल आजारी पडल्याने आजच्या ट्रेकचे खास फोटोग्राफर डीपी साने, प्रभा आणि इतर सर्व फोटोग्राफेर्सचे खूप खूप आभार. माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स.