Monday 29 August 2016

"भिरभिरणारा भिरा"

अंधारबन ते भिराधरण ट्रेक
दि.२८ ऑगस्ट २०१६.

ट्रेक..! ट्रेक...!! ट्रेक...!!! हवा होता सगळ्यांना. घ्या ट्रेक आणि तो ही पावसाळी ट्रेक. "फोना" चा ट्रेक म्हणजे अफलातून मजा असते. जून मध्ये आमचा "ड्युक्स नोज आणि कोराईगड"असा ट्रेक झाल्यानंतर फक्त एकच महिना ट्रेक नाही झाला परंतु असे वाटले कितीक महिने ट्रेकसाठी गड आमची वाट पहात आहेत. आम्हालाही पावसाळी ट्रेक करायचा होताच. बरेचदा "कातळधाराचा"  आमचा ठरलेला पावसाचा ट्रेक असतो. परंतु आमचे मंदार सर आणि मनोज सर आमच्या ट्रेक मेम्बर्स च्या आग्रहाखातर, हौशीखातर वेगवेगळी ट्रेकिंग ची ठिकाणे आमच्या समोर आणून आम्हाला आश्चर्यचकित करीत असतात. असेच यावेळी झाले. मंदार सरांनी भन्नाट ट्रेक ची पंगत आमच्यासमोर आणून ठेवली. पंगत ठेवली खरी पण त्या ट्रेकच्या पंगतीला बसायचे की नाही हा विचार करायला सुद्धा मला वाटते कोणाला वेळ मिळाला नसेल. कारण ट्रेक साठी आधीच भुकेलेल्या ट्रेकर्सनीं क्षणाचाही विचार न करता पटापट आपले ट्रेकिंग साठी बुकिंग करून टाकले. आणि लग्गेच ५० सीट ची बस फुल्ल झाली. आणि लोकांच्या आग्रहाखातर आणि ३२ सीटर बस केली ती देखील फुल्ल झाली. अजून बरेच लोक वेटिंग ला होते. परंतु खूप जास्त ट्रेकर्स ना सांभाळून नेणे आणि आणणे सोप्पे नाही. त्यामुळे फक्त ८०-८२ मेम्बर्स फिक्स केले गेले. 


केव्हा एकदाचा २८ ऑगस्ट येतो असे झाले होते.एकदाचा २८ ऑगस्ट चा रविवार उजाडला आणि आमच्या दोन बस सकाळी ६:३० वाजता वाकड पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबून तिथेच नास्ता केला. पुणे जिल्ह्यातील  मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि. मी.आहे भांबर्डे गावातून घनगड ला जात येते.आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी. वर आहे. सकाळी १० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली आणि आम्ही त्या पाझर तलावापासून ट्रेक ला सुरुवात केली. परंतु आम्ही ट्रेक ची उतराई अंधारबनातल्या हिरडी गावातून भिरा धरणाच्या बाजूने करणार असल्याने आमची बस भिरा धरणाच्या बाजूने आधीच जाऊन थांबली. पाऊस सुरूच होता आणि प्रत्येक डोंगर कापसासारख्या ढंगाने झाकलेला दिसत होता. जणू  काही डोंगरांना थंडी लागू नये यासाठी ढगांनी डोंगरांना लपेटून घेतले असावे. १०:१५ लगेचच ट्रेक ला सुरुवात झाली ती तिथल्या पिंपरी गावच्या उन्नई बंधाऱ्यापासून. आम्ही ६ महिन्यांपूर्वी घनगड पूर्ण आणि अर्धे अंधारबन चा ट्रेक केला त्यावेळी माझे मुंबईचे फ्रेंड्स प्राजक्ता आणि प्रदीप आले होते.तेव्हा याच बंधाऱयांतून आम्ही गेलो होतो तेव्हा पाणी खूप कमी होते. एक क्षण आपण कुठे आहोत हे समजलेच नाही मला. 


ट्रेक सुरु केल्यावर छोटे छोटे धबधबे आमचं स्वागत  करत होते. जसे  पाहुणे आल्यावर आधी पाणी देतात नंतर जेवण देतात तसंच आधी छोटे धबधबे पाय धुण्याचे कामकाम करत होते. आणि नंतर मग मोठ्या धबधब्यात मनसोक्त भिजणे. ट्रेकच्या सुरुवातीलाच कुंडलिका व्हॅलीतून भिरा धरणाचा नजारा खूप छान दिसतो परंतु ढगांनी सारे डोंगर दऱ्या अच्छादून टाकल्या होत्या त्यामुळे आम्ही तोच निसर्ग डोळ्यात साठवून घेऊन अंधारबन ची वाट चालू लागलो.  म्हणता म्हणता आम्ही न थांबता अर्ध्यात आलो होतो. कुठे आलो ते काहीच कळत नव्हते.अंधारबन चा खरा अनुभव अंधारबनात गेल्यावरच येत होता. घनदाट जंगल. आम्ही काही लोक आणि जंगल ची वाट माहित असलेले विवेक रामायणे आमच्या सोबत होते कारण ट्रेकिंग चा अनुभव असलेली एकतरी व्यक्ती पुढे जाणाऱ्या सोबत असावीच. नाहीतर वाट सगळ्या सारख्या दिसतात परंतु एक वाट चुकली की वेळ वाया जातो आणि ट्रेक वेळेत होत नाही शिवाय शोधाशोध करावी लागते ती वेगळी. असे आम्हाला ग्रुप प्रमुखांनी शिकवलंय.


आम्ही झपझप चालत होतो पण तरीही निसर्गाचा आनन्द घेत, हळूच फोन बाहेर काढून फोटो काढत, गाणे म्हणत जंगल पार करत होतो.मधेच काही लोक दिसायचे आमच्याच गृप चे पण आमचा वेग वाढला की ते लोक अदृश्य व्हायचे. एक ठिकाणी २ प्राणी मरून पडले होते माकडे होती ती.त्याची दुर्गंधी इतकी होती की आम्ही धावतच राहिलो थोड़ा वेळ. दुपारचा १ वाजून गेला होता. मध्ये चॉकलेट्स व स्नीकर्स च खात होतो आणि पाणी पीत होतो. पोटामध्ये कावळे ओरडत होते. आमचे काही मेंबर्स मागे होते वाट चुकू नये यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो मोकळ्या माळरानावर तिथे अजून ग्रुप आधीच पोहोचून जेवण करत होते. त्यातला एक ग्रुप जेवण करून कचऱ्याची पिशवी तिथेच टाकून गेला किंवा विसरून गेला. आणि आम्ही तिथे आत्ताच आलो होतो त्यामुळे तिसरा गृप आमच्यावर भडकला तुमचा कचरा घेऊन जा.. अरे बाबानो आम्ही चॉकोलेट चा कागद पण गडावर टाकत नाही तर अशी कचरा भरलेली पिशवी कशी टाकू.???  त्या गृप चे लोक जरा जवळ येऊन बघतात तर ओळखीचेच निघाले. मग ते ट्रेकर्स ती कचऱ्याची पिशवी स्वतः उचलून घेऊन गेले.

या ठिकाणाहून तैलबैला आणि घनगड चा नजारा खूपच छान दिसतो असे ऐकले होते वाचले होते परंतु पाऊस आणि ढगांमुळे तिथल्या छब्या टिपताच आल्या नाहीत. ८०-८३ लोक पुन्हा एकत्र आल्यावर पुन्हा पावले चालू लागली. दुपारी २:३० वाजता आम्ही हिरडी गावात पोहोचलो आणि त्या छोट्या छोट्या कौलारू घराजवळ जेवणासाठी जागा शोधात होतो. ती कौलारू घरे पहिली की हमखास मला  माझ्या गावाची आठवण येते. आम्ही सगळेच चिंब भिजले असल्याने आम्हाला कोणी घरात बसा म्हणून आग्रह केला नाही आणि आम्ही बसलोही नाही. तिकडे एक मंदिर आहे तिथे एवढ्या लोकांना जागा होईल असे ऐकले पण जायला कोणाच्यात ताकद नव्हती. त्यामुळे तिथेच घराच्या ओट्यावर आपापले डबे काढून जेवण केले. यावेळी थोडा वेळ मिळाला त्यामुळे मी खाऊ बनवून आणला होता. मी आणलेल्या कोथिंबीर वड्या आणि आळू वड्या आणि पुरणपोळी  खूप कमी लोकांना मिळाल्या असे वाटते. ज्यांना नाही मिळाल्या त्यांना सॉरी. पण जेवणाच्या वेळी वरूण राजाने थांबून मेहेरबानीच केली. तिथेच आम्ही ग्रुप फोटो काढले आणि ३:२५ ला आम्ही  हिरडी गावाच्या बाजूने भिरा धरणाकडे उतरायला सुरु केले. ग्रुप प्रमुख म्हणाले किमान २ तास लागतील उतरायला. आणि तसेच झाले आम्ही झपाझप उतरत होतो कोण कुठे आहे याचा पत्ता नव्हता. पुन्हा एक तास गेल्यावर तिथे ५ मिनिटे फोटोग्राफी केली आणि पुन्हा निघालो.

संध्याकाळी ५:१५ वाजता भिरा धरणाच्या दरवाज्यापाशी आलो. खरे तर धरणाच्या भितीवरून चालायला फोटो काढायला परवानगी नाही परंतु ट्रेकर्स दमून आलेले असतात त्यामुळे इथून शांतपणे जाण्यास परवानगी देतात. कारण दुसरा रस्ता  ७-८ किलोमीटर्स चा आहे. त्यांचे आभारच मानले पाहिजेत. त्या धरणाच्या रस्त्यावरून निघावे वाटत नव्हते आणि तिथले रक्षक तिथे थांबूही देत नव्हते त्यामुळे आम्ही निघालो. जे अंधारबन आम्ही चाललो आणि ज्या दऱ्या तुन आम्ही उतरलो ते पाहून आणि आठवून आमचं आम्हालाच आश्चर्य वाटत होते. कारण आम्ही सकाळी १०:१५ ते संध्याकाळी ६ पर्यंत भर पावसात ते जंगल तुडवून आलो होतो. निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यासारखा ट्रेक करण्यासारखा दुसरा आनंद नाही. भिरा धरण१०० टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग चालू होता. तिथून पुढे कोलाड नदी ओसंडून वाहत  होती. आम्ही आमच्या बस जवळ आलो गप्प बसमध्ये येऊन बसलो आणि सगळे ट्रेकर्स आल्यानंतर बस निघाल्या पुन्हा घराकडे. 
निसर्गासारखा दुसरा सखा सोबती नाही. आणि त्यात फोना सोबतचा ट्रेक म्हणजे दुधात  साखर. ट्रेक ला गम्मत जम्मत असते परंतु गृप प्रमुखाने सांगितलेले कुठले नियम आम्ही तोडत नाही आणि त्यामुळे आमचा ट्रेक अतिशय सुंदर, सुखरूप आणि यशश्वी होतो.









अंधारबन च्या ट्रेक ची उन्हाळ्यातली मजा वेगळी आणि पावसातली मजा वेगळी. उन्हाळ्यात ऊनसावलीचा खेळ तर पावसात पावसाचा आणि कापसाळी ढगांचा खेळ आणि भिजायचा आनंद. "अंधारबन ते भिरा धरण"  13 किलोमीटर चे अंतर एका दिवसात कसे काय पूर्ण करू शकतो आपण यावर माझा विश्वास च बसत नाहीये. फक्त हे "फोना ट्रेकिंग गृप सोबतच शक्य आहे. रात्रीचे १० वाजून गेले होते घरी यायला. एकंदरीत "अंधारबन ते भिरा धरण"ट्रेक यशस्वी सुफळ संपूर्ण झाला.