Tuesday 5 November 2019

छोटा पॅकेट बडा धमाका


"छोटा पॅकेट बडा धमाका "

ड्युक्स नोज सुळका सर ,

शिवदुर्ग क्लायंबर्स टीम, 

लोणावळा

दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ .


"ड्युक्सनोज" हा सुळका समुद्रसपाटीपासून सुमारे २००० फुट उंचीवर आहे. हा सुळका नाकाच्या आकाराचा आहे म्हणून त्याला ड्युक्स नोज हे नाव आहे. याला नागफणी पॉईंट देखील म्हणतात. हा अतिशय सुंदर असा ट्रेकिंग, कलायम्बिंग आणि रॅपलिंग स्पॉट आहे. मी मुंबईला जाताना कायम याचा दुरून फोटो काढत असते.
प्रत्यक्ष इथे कधी जाईन असे वाटले नव्हते.परंतु मी एकदा कोराईगड आणि ड्युक्स नोज सुळका ट्रेक केला आहे. इथे जवळच आय. एन. आय. शिवाजी ह्या संस्थेचा.मोठ्ठा आणि सुन्दर परिसर आहे. गड छोटा असला तरी तसा चढ भरपूर आहे. परंतु जर हा चढ चढून स्वर्ग दिसणार असला तर कोणाला नकोय. मी तर या स्वर्गरूपी निसर्गाच्या छब्या टिपण्यासाठी आणि फिटनेससाठीच सह्याद्रीमध्ये भटकंती करीत असते. ड्युक्सनोजवर एक छोटेसे शंकराचे छान मंदिर आहे शिवाय या उंच सुळक्याहून आजूबाजूला स्वर्गरुपी देखावा दिसतो. सकाळच्या कोवळ्या सोनपावली सूर्यकिरणांनी हा सुळका सोनेरी होतो.पावसातील ट्रेक असेल तर ते पांढरे शुभ्र कापसासारखे ढग डोळ्यासमोरून धावत असतात क्षणात नकळत आपल्याला स्पर्शून जातात. येथून दूरवर लोणावळा डोंगररांगेत वसलेला तो अवर्णनीय वळणावळणाचा एक्सप्रेस हायवे मोहक दिसतो.
अश्या या कठीण टोकदार सुळक्याची चढाई दोराच्या सहाय्याने कलायम्बिंग करून करणे खूप कठीण आहे. परंतु शिवदुर्ग टीमच्या छोट्या शिलेदारांनी हा सुळका सर करून कौतुकाची थाप मिळवली आहे. आतापर्यंत या दोन सुळक्यादरम्यान व्हॅली क्रॉसिंग कसे करतात ते ऐकले होते आणि फोटोज पाहिले  होते. शिवाय शिवदुर्ग टीमचेच क्लायंबर रोहित वर्तक हे भारतातील पहिले हायलायनर आहेत. त्यांनी या दोन सुळक्यावरूनच हायलायनिंगचा सराव करून त्यात यश मिळवून अनेक सुळक्यांसोबत वानरलिंगी सुळका आणि जीवधनगड दरम्यान क्लायंबिंग आणि हायलायनिंगचा झेंडा रोवून आलेत. शिवदुर्ग टीममध्ये एकाहून एक सरस सगळे हिरे भरलेत असे मला वाटते.

शिवदुर्गमित्र ही लोणावळ्यातील संस्था गेली अठरा वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंग करताना, सहली करताना, डोंगर-दऱ्यात, धरणात, नद्यांमध्ये, धबधब्यांमध्ये अनावधानाने अनेक अपघात होतात त्यांना रेस्क्यू करण्याचे अतुलनीय कार्य शिवदुर्ग टीम करते. तसेच प्राण्यांना रेस्क्यू करण्याचे मोलाचे कार्य शिवदुर्ग टीम करते.  तसेच रॉक क्लाइंबिंग या क्षेत्रात देखील त्यांची पुढील पिढी तयार होते आहे. "शिवदुर्ग क्लायंबिंग वॉल" या ठिकाणी योगेश उंबरे, रोहित वर्तक, गणेश गीध, ओंकार पडवळ, समीर जोशी सनी कडू आणि इतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली लहान वयातील क्लायम्बर्स तयार होऊन कठीणातील कठीण दुर्ग आणि कठीणातील कठीण सुळके सर करीत आहेत. 

रविवार दिनांक नोव्हेंबर २०१९ या दिवशी शिवदुर्ग क्लाइंबिंग टीमचे गुरु योगेश उंबरे,समीर जोशी आणि छोटे चार क्लायंबर्स क्लाइंबिंगचे सर्व साहित्य घेऊन लोणावळ्यातून पहाटे निघून .४५ ड्युक्स नोजच्या पायथ्याशी पोहोचले. तसेच ओंकार पडवळ, सनी कडू आणि इतर टीम गावातून . १५ ला ट्रेक करून वाजता ड्युक्स नोजच्या पायथ्यापाशी पोहोचले. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली व्हावी यासाठी गणपती बाप्पाला आपण श्रीफळ वाढवूनच त्याची पूजा करतो. आम्हा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे दुर्ग, सुळके म्हणजे देव आहे आणि शिवाजी राजे म्हणजे कुलदैवत आहेत
ड्युक्स नोज म्हणजे शिवदुर्गसाठी आणि इतर क्लायंबर्ससाठी देवच आहे त्या देवाची पूजा करून त्याला नारळ वाढवून छोट्या क्लायंबर्सची पहिली चढाई सुरक्षितरित्या पार  पडण्यासाठी मनोभावे देवाला प्रार्थना करून क्लायंबर्सने चढाई सुरु केली.
चढाईदरम्यानचे फोटोज पाहून त्या कातळकड्याकडे पाहून सामान्य माणसाला तर घेरीच येते. तशा कठीण खडकावर नोव्हेंबरच्या ऊन-पावसात इतक्या लहान वयात चढाई करणे म्हणजे जिगरचे काम आहे आणि शिवदुर्ग टीमच्या छोट्या क्लायंबर्सने ते सहज करून दाखवले आहे. संपूर्ण रोपक्लाइंबिंग दोन टीममध्ये पार पडले. पहिल्या टीममध्ये लीडक्लायंबर हर्ष तोंडे तर सेकंड मॅन आदित्य पिलाने यांनी कार्यभार सांभाळला. दुसऱ्या टीममध्ये लीड क्लायंबर रितेश कुडतरकर तर सेकंड  मॅन आयुष्य वर्तक यांनी कार्यभार सांभाळला.सकाळी ७ वाजता सुरु केलेली चढाई दुपारी दोन वाजताच्या सुमारास पूर्ण झाली. छोटे क्लायंबर्स तुम्हाला आमचा सलाम. 


चढाई पूर्ण केल्यानंतरचे विजयी हास्य सर्वकाही सांगून जाते
दिनांक नोव्हेंबर २०१९ रोजी दैनिक लोकमत पुणे मध्ये छोट्या पॅकेटचा बडा धमाकावाली बातमी वाचली आणि खूप कौतुक वाटले. 
शिवदुर्ग मित्र लोणावळा  यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम शिवदुर्ग क्लायबींग टीमची पुढील पिढी करीत आहे. क्लायंबर हर्ष तोंडे  (व्ही. पी. एस. हायस्कुल वय-१६ वर्षे), आदित्य पिलाने (ऍड. बोन्डे हायस्कुल,वय -१३ वर्षे) रितेश कुडतरकर (व्ही. पी. एस. हायस्कुल, वय - १५वर्षे ) आयुष्य वर्तक(डॉन बॉस्को हायस्कुल लोणावळा,वय- ११वर्षे )यांनी अतिशय कमी वयात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या चार छोट्या क्लायंबर्सनी कुरवंडे येथील लोणावळयातील पर्यंटनस्थळापैकी एक डयूक्सनोज ह्या ९० अंशातील ३५० फुटी सुळक्यावर यशस्वी रित्या चढाई केली.
ही संपूर्ण चढाईमोहीम शिवदुर्गटीमचे गणेश गीध, रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, योगेश उंबरे, सुनिल गायकवाड, यांच्या  मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मोहिमेत सपोर्टटीम म्हणून सनी कडू, राजेंद्र कडू, अंकुश महाडीक काका, प्रवीण ढोकळे, ओम हरसुले, समर्थ जरांडे, प्रिन्स बैठा, वैष्णवी भांगरे, प्रणय अंबुरे यांनी कार्यभार सांभाळलासर्व क्लायंबर्सचे खूप खूप  अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख-लाख शुभेच्छा


आजच्या  डिजिटल युगात आपण मुलांवर जसे संस्कार घडवू तसे ते घडतात. इतिहासकार श्री प्रमोद बोराडे सरांच्या मते आपण  आपल्या मुलांचा आदर्शच बदलून टाकायचा. फिल्मी नटनट्यांऐवजी एखाद्या कलेसोबत श्री. शिवाजी राजेंचा आदर्श समोर ठेवा, त्यांना  इतिहास  सांगा समजवा, त्यांना अभ्यासाबरोबर महिन्यातून किमान एकदा सोबत घेऊन सह्याद्रीत ट्रेकिंग करा, क्लायम्बिंग, रॅपलिंग सारख्या साहसी कला शिकवा.वाघासारखे जगायला शिकवा. बघा मुले कणखर होऊन यशाची सर्वच उंच शिखरे कशी पादाक्रांत करतात ते. लहान मुलांना एकदा उंचीवर चढण्याचे वेड आणि वेध लागले की मुलांच्या हातात मोबाइल गरजेपुरताच दिसेल. सह्याद्री आपल्याला सामर्थ्यवान बनवून खूप चांगल्या गोष्टी शिकवतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. क्लायंबर्सहो, असेच असंख्य सुळके क्लाईंब करत रहा. मी एक साधी ट्रेकर म्हणून "माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" या ग्रुप सोबत सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करते.  परंतु आम्हाला शिवदुर्ग टीमचा,शिकवणाऱ्या गुरूंचा आणि छोट्या क्लायंबर्स तुमचा सार्थ अभिमान आहे. शिवदुर्ग क्लायंबर्स रॉक्स.