Tuesday 24 September 2019

ट्रेक सेंच्युरी



ट्रेक सेंच्युरी
रायरेश्वर
ठिकाण - पुणे जिल्हा
प्रकार -गिरिदुर्ग
चढी श्रेणी-सोपी
डोंगररांग - वाई-सातारा
उंची४६९४ फूट
दि. २२ सप्टेंबर २०१९

दिनांक २२ सप्टेंबर २०१९चा माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा १००वा रायरेश्वर ट्रेक म्हणजे अजब ग्रुप का गजब ट्रेकच असणार हे निश्चित होते. रायरेश्वर हे ठिकाण पुण्यापासून सुमारे १०१ कि. मी. अंतरावर आहे. इथे बसने पोहोचण्यास सुमारे तास लागतात. आमच्या ९० ट्रेकर्सच्या तीन बसेस सकाळी साडेसहाच्या सुमारास तळेगावहून निगडीहून निघून मुंबई बायपास हायवे-खेड-शिवापूर -भोर - नाखिंदा खिंडीमार्गे रायरेश्वराच्या माथ्यावर पोहोचल्या. जातानाच मध्ये एका ठिकाणी थांबून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चहा-नास्ता करून,जाताना हिरव्यागार निसर्गाची मनसोक्त फोटोग्राफी करीत अंताक्षरीच्या तालावर ट्रेकर्स रमून जातात. जाताना भोर शिरूर रस्त्यालगत डाव्या दिशेने कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटाचे शूटिंग झालेला प्रसिद्ध नेकलेस पॉईंट दिसतो. आपल्याला येथील फक्त नेकलेस पॉईंट माहित आहे परंतु याठिकाणी कोयाजी बांदल यांची प्रसिद्ध समाधी देखील आहे.पुन्हा कधी गेलात तर या समाधीला नक्की भेट द्या.

कोयाजी बांदल यांच्याविषयी थोडक्यात माहिती -शाहिस्तेखान म्हणजे सिद्दी जोहर कार्नुलकर नावाचा अजगर सैह्याद्रीच्या वाघाची शिकार करायला पन्हाळ्याला लपून बसला होता तेंव्हाचे स्वराज्याच्या मुशीत शिरलेले मोगली हात.त्या हातानी चाकण , पुणे आणि मावळ लुटायला सुरुवात  केली सह्याद्रीच्या  वाघावर दोन दोन डुक्करांनी एकावेळी हल्ला केला निसटायची वेळ आली त्यावेळी सगळ्या बांदल सेनेनी खिंडीत गनीम कापला आणि स्वारी राजगडापर्यंत आली. रायाजी नाईक बांदल कोयाजी बांदल यांना बोलावण्यात आले . मानाची पहिली समशेर देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले, पण त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सूड दिसत होता कारण एकाचा बाप तर एकाच्या  वडील भावाच्या रक्ताने खिंड पावन झालेली होती. त्याला शाहिस्तेखान कारणीभूत होता. सूडाचा बेत ठरला शाहिस्तेखानावर छापा  टाकण्याचा दिलदार, आणि खानदानी बेत ठरला पण शाहिस्तेखानाचे पाप त्याच्या बोटांवर गेले. शिवशाहीने मोगलीच्या हातांची बोटे कलम केली पण या वेळीही सुतक बांदलाच्या वाड्यावरच आले. कोयाजी बांदल जखमी झाले आणि गण गोतामध्ये मृत्यु पावले, शहीद झाले. इतिहासाने याची नोंद कधीच घेतली नाही परंतु इतक्या वर्षा नंतरही त्यांची समाधी जपून ठेवली आहे .(नेटवरून साभार-करण बांदल )

थोडे पुढे गेल्यावर उजव्या दिशेने भाटघर धरणाची भिंत उभी राहून आम्हाला शुभेच्छा देत होती.रायरेश्वरला जाण्याच्या अनेक वाटा आहेत.  भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे तास लागतात.  काही ठिकाणी ही वाट अवघड आहे.तसेच भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा संध्याकाळी  बस येते. याच वाटेला सांबरदर्याची वाट म्हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर दोन तासावर आहे.

रायरेश्वर एकंदरीत या परिसरात येण्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणजे भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे.  पुण्याहून सकाळी .०० वाजल्यापासून दर तासाला भोरसाठी बस आहेत. तर साताऱ्याकडून यावयाचे असेल तर दोन मार्ग आहेत. एक पुणे बंगळुरू महामार्गावरील शिरवळवरून भोरसाठी थेट बससेवा आहे तसेच खाजगी जीप वहातुकहीआहे.तर दुसरा मार्ग सातारा-वाई-मांढरदेवी-अंबाड खिंड- भोर असा लांबचा आहे.
सकाळी ११च्या सुमारास आमच्या बस रायरेश्वरावर पोहोचल्या.
रमतगमत फोटोग्राफी करत गेले तर वरती पठारावर पोहोचवावयास  किमान तास पुरे होतो. भोर पासून रायरेश्वर जवळपास १६ कि. मी. वर आहे.रांगडा तरीही निसर्ग सौंदर्याने नटलेला रोहिदा दुर्ग दिमाखात उभा राहून जणू स्मितहास्य करीत होता. या दुर्गांपुढे आपण किती क्षुद्र आणि छोटे आहोत हे ट्रेक करतानाच समजते. शिवाजीराजेंनी हे दुर्ग आपल्या सुरक्षततेसाठी बांधले आहेत. पावसाच्या सरी अजून चालूच असल्याने छोट्या धारेचे धबधबे वाहताना दिसत होते. परंतु १२चा सुमार असल्याने कडक ऊन जाणवत होते. खूप ठिकाणी रेलिंग लावल्याने आधार म्हणून त्या रेलिंगला धरून चढ चढावयास सोपे जात होते. १०० वा ट्रेक असल्याने कुटुंबातील लहानथोर मंडळी ट्रेकमध्ये सहभागी झाली होती त्यामुळे त्यांच्यासाठी ही लोखंडी शिडीची सोय खूप कामी आली. त्या लोखंडी शिडीवरून समोर केंजळगडचा रौद्र कडा देखणा दिसत होता.
जणू प्रेयसीसाठी त्याचे अजाण बाहू पसरून स्टाईल मध्ये उभा होता. खोल दऱ्या खोल मनाच्या गाभाऱ्यासारख्या भासत होत्या. दऱ्यांचा फोटो घेताना त्यांची अनेक वलये समुद्रावरील लाटांप्रमाणे भासत होती. काय ते दुर्ग आणि निसर्गाचे सुंदर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. लोखंडी शिड्या पार करताना तेथील स्थानिक साध्या चप्पलमध्ये सामानाची ने-आण करण्यास सहज,जलद गतीने उतरत होते. दुर्गावर राहणारे नशिबवानच म्हणायचे. आपण एक दिवस ट्रेक करतो तर इतका आनंद पाठीशी बांधून घेऊन येतो.येथील जनता तर आनंदाच्या डोहात रोजच डुंबून घेते.
जसे आम्ही रायरेश्वराच्या पठारावर पोहोचलॊ तिथे सर्वात आधी उंच भगवा फडकत होता तिथे फोटो काढण्यासाठी सर्व ट्रेकर्सने गर्दी केलेली दिसली कारण भगव्यासोबतचा फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवारत नाही आणि तसे होणे स्वाभाविकच आहे. परंतु अजून खूप चालवायचे होते त्यामुळे आम्ही थोडेसे ट्रेकर्स पुढे चालत राहून रंगीबेरंगी फुलांच्यात रमत होतो. अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुले या सप्टेंबर महिन्यात येथे डोळ्यांना सुखच सुख देतात. निसर्गाचे सुंदर अविष्कार दाखविणारा श्रावण महिना संपतो पाउस जवळजवळ सरत आलेला असतो, मात्र निसर्ग नवे रुप घेऊन उधाणलेला असतो. हा काळ खास गवतफुले पहाण्याचा. साताऱ्याच्या नैसर्गिक फुलांनी बहरलेल्या कास पठारावर सध्या पर्यटकांची अतिशय गर्दी असते. परंतु ज्यांना ट्रेक करून निसर्गाचे मनमोहक रुप, उंचावरून दिसणारी अथांग जलाशये, रंगीबेरंगी फुले पाहावयाची आहेत त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वरला आवर्जून भेट द्यावी. रायरेश्वर पठारावर दिसणारी पिवळ्या रंगाची फुले कौला किंवा बरका म्हणजे स्मिथीया, त्यावर लाल ठिपके असणारी मिकी माउस म्हणून ओळखली जाणारी गैसापसिस, तेरड्याची गुलाबी जांभळट फुले आणि कुरडूचे गुलाबी पांढरट तुरे आपला कॅमेरा आपोआप वळवून घेतात.

छोटेछोटे झरे मंजुळ आवाजात गाणी गुणगुणत होते. त्यावरून चालताना ते झरे ओलांडताना लहानपणी पाण्यात खेळलेलो सगळे खेळ आठवतात. आमच्यातील लहान मुले त्या झऱ्यात खेळताना पाहून खूप गंमत वाटत  होती. लहानपणीची मराठीच्या पुस्तकातील गवतफुला कविता आठवली. "गवतफुला रे गावात फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा."

खरंच निसर्ग हा एकमेव सखा आहे की तो कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला भरभरून देतो. आपल्यावर सुखाची बरसात करीत असतो.  परंतु आपण त्याच्या हद्दीत जाऊन त्याचे खरे रूप नष्ट करू लागलो तर तो तितकाच रौद्र देखील होतो. कोल्हापूरच्या पुराचे उदाहरण आपल्यासमोर ताजे ताजेच आहे.
निसर्गरम्य रायरेश्वरदुर्ग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटगड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड . दुर्ग दिसतात.
रायरेश्वर पठाराची लांबी सुमारे ११.४४० कि.मी. असून, रुंदी .२०० कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे रहातात.


सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. शिवरायांचे नाव घेतले तरी अभिमानाने उर भरून येतो आणि शिवबांच्या पावनभूमीत जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले रायरेश्वराच्या शिवमंदिराशिवाय जननी देवीचे मंदिर पाण्याची शिवकालीन टाकी आहेत .गडावर असलेल्या सुमारे ५०० लोकसंख्येपैकी जवळपास दीडशे लोकच गडावर राहत आहेत. त्यांच्यातील काही लोक उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी रहातात .या गडावर जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे राहतात दुर्गभ्रमंती करणाऱ्यांची या गडावर राहण्याचीही व्यवस्था होऊ शकते.रायरेश्वर,केंजळगड,कमळगड अशी एक दिवसाची मोहीम केल्यास तीनही दुर्ग एका दिवसात सर करू शकतो.
छत्रपती शिवरायांनी वयाच्या केवळ १६व्या वर्षीच स्वराज्याचे तोरण बांधले. अगदी थोड्या मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची कल्पना समोर मांडली.  हिंदवी स्वराज्यासाठी मूठभरमावळ्यांनी जिवाची पर्वा करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक-एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण,तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले.
भगव्यासोबत फोटो घेताना धोम धरणाच्या अथांग जलाशय मिस्किलपणे हसून म्हणतोय जणू कितीफोटो काढताय राव इकडे माझ्याकडे बघा जरा मी किती दिवस वाट पहातोय माऊंटन एज ट्रेक ग्रुपचीरंगीबेरंगी फुलांमध्ये मनसोक्त रंगीत फोटो काढून हिरव्या गालिच्यावरच्या गुलाबी वाटेतून आम्ही चालत होतो. दुपारची जेवणाची वेळ झाल्याने आता पोटात कावळे ओरडत होते.
वरच्या पठारावर कौलारू घरे, काहींना पत्र्याचे छत होते. तर काहींना गवताने तयार केलेल्या गवती भिंती पावसापासून घरे वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या होत्या. कारण इथे खूप पाऊस पडत असतो वाराही जोराचा असतो त्यामुळे पावसाच्या मुसळधार सरींपासून त्या गवती भिंती घराचे संरक्षण करतात. रायरेश्वरवर रायरेश्वर मंदिर, गोमुखतळे,नाखिंदा खिंड,पांडवलेणी, शिडीपासून सूर्योदय सूर्यास्त, गडावरून नीरा देवघरधरण या गोष्टी प्रामुख्याने पाहण्यासारख्या आहेत.

येथील जंगम जमात प्रामुख्याने भातशेती करताना आढळते. रायरेश्वर दुर्ग खूप स्वच्छ आढळला. आम्ही दुपारी दगडूच्या छोट्या कौलारू घरात २०-२५ ट्रेकर्स च्या चार पंगतीमध्ये बसून जेवण केले. माझ्या मनात एक क्षण विचार आला होता. इतरांची जेवणे आटोपेपर्यंत आम्ही काही ट्रेकर्स थॊडा पाठीमागचा परिसर फिरून येऊ.परंतु तशी संधी मिळाली नाही. शिवाय आजच्या १०० व्या ट्रेकचे खास आकर्षण होते ते म्हणजे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद बोराडे यांचे ऐतिहासिक व्याख्यान आणि ग्रुपची वेबसाइट लॉन्चिंग. ठरल्याप्रमाणे जेवणानंतर लगेच सगळे लीडर्स पाहुणे ट्रेकर्स तेथील एका छोट्या हॉल मध्ये जमा झाले. सतरंज्या टाकून खाली फतकल मांडी घालून आम्ही सगळे बसलो. पुणेकर असल्याने जेवण केल्यानंतर सर्वानांच वामकुक्षीची सवय असावी त्यामुळे आता सरांचे व्याख्यान चालू झाल्यावर कोणी झोपले नाही म्हणजे मिळवले. त्या आधी आमचे लीडर्स रोहित सर, मनोज सर  यांनी १०० वा ट्रेक असल्याने ग्रुप विषयी थोडक्यात माहिती दिलीमाऊंटन एज ग्रुप २००७ साली थापना झाला. पहिला ट्रेक सज्जनगडापासून सूर केला गेला. २००८ मध्ये वर्षाला - असे एकदिवसाचे छोटे ट्रेक झाले. हळूहळू वार्षिक ट्रेक संख्या वाढवून २०१४ पासून महिन्याला ट्रेक असा ट्रेक होऊ लागला. २०१४ पासूनच मध्यम कठीण श्रेणीचे ट्रेक होऊ लागले. वर्षातून - कात्रज ते सिहंगड सारखे होऊ लागले. हार्ड ट्रेक कमी प्रमाणात असतात कारण या ग्रुप मुख्य उद्देशच हा आहे की १२ते ५८ वयाच्या सर्व गटातील लोकांना ट्रेक करता यावा. पिंपरी-चिंचवड मधील असा उपक्रम करणारी ही एकमेव संस्था आहे. ट्रेकबरोबरच,जंगल सफारी, भारतातील प्रेक्षणीय स्थळांच्या सहली, परदेश टूर असे अनेक  उपक्रम हि संस्था करते. लीडर रोहित सर राणे सर यांनी ग्रुपची माहिती देतादेता अचानक एक सरप्राईज नावाची गोष्ट जाहीर केली. ट्रेक ग्रुपमध्ये जणांना कौतुक म्हणून ट्रॉफी आणि गुच्छ देऊन आणि सोनेरी शब्दांनी जणांचा कौतुकरूपी सन्मान करण्यात आला त्यात माझे नाव पहिले असल्याने मला आश्चर्याचा आनंदरूपी धक्काच बसला. सगळा शीण, दुपारची वामकुक्षी कुठच्याकुठे पळाली. टाळ्यांच्या गजरात पाच जणांचा कौतुक सोहळा पार पडला.


खरंतर हा आम्हा ट्रेकर्सचा सन्मान नाहीये तर हा प्रत्येक ट्रेकरचा सन्मान आहे. आम्ही ट्रेकर्स इतर येणाऱ्या सर्व ट्रेकर्सचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ते बक्षिस स्वीकारले. मी जयु साने या ट्रेकगृपमध्ये तशी उशिरा ३ ते वर्षांपूर्वी सहभागी झाले. परंतु जशी सहभागी झाले तसे हा ग्रुप माझे एक कुटुंब बनले. माझ्या घरात देखील मी भावांची एकच बहीण आहे तसेच मला इथे आल्यावर सुरक्षित वाटते आणि त्याच विश्वासाने माझ्या घरचे मला विश्वसनीय ग्रुपसोबत ट्रेकसाठी जाण्यास परवानगी देतात. आमचे लीडर्स वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेतात आणि वेळप्रसंगी काही चुकले तर समजुतीचा ओरडा देखील बसतो.  अश्या या कुटुंबामध्ये मला कायम ट्रेक करायला आवडेल. ट्रेकसोबत असंच सहजच अचानक ट्रेकब्लॉगलेखन सुरु केलं त्यातही सातत्य ठेवले. फोटोग्राफी, निसर्गप्रेमी, ट्रेक ब्लॉग यासाठी ट्रॉफी आणि ट्रेकचे ब्रॅण्ड-अँबॅसिडर अशा सोनेरी शब्दांचा  गौरव आम्हा साध्या ट्रेकर्सना अजून १०० ट्रेक करण्याचे बळ देतो. सायली बुधकरने ट्रेकग्रुपची वेबसाईट बनवली त्यासाठी तिचा ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ  देऊन कौतुकास्पद सन्मान करण्यात आला. हजारो सापांविषयी माहिती असणारे आणि हजारो साप सुरक्षितरित्या जंगलात सोडणारे ग्रुप मधील सर्पमित्र श्री.  निकाळजे यांचे ट्रेकमधील वाखाणण्याजोगे योगदान यासाठी त्यांचा ट्रॉफी पुष्पगुच्छ  देऊन कौतुकरूपी सन्मान करण्यात आला. सायकलिंग क्षेत्रात सहचारिणीने वाढदिवसाची भेट म्हणून दिलेल्या  नॉन गियर सायकलवर गिनिज बुक-लिम्बका बुक रेकॉर्ड करणारे संतोष होळी यांचादेखील ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ    देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या छोट्या आदित्यला ट्रेकची लहानपानापासूनच आवड लावून त्याला ट्रेकमध्ये घेऊन येऊन प्रत्येक ट्रेकमध्ये उत्तम आणि सर्वात जास्त फोटोग्राफीसाठी आणि इतर मदतीसाठी श्री राहुल दर्गुडे यांना ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन कौतुकरूपी सन्मान करण्यात आला. ते उपस्थित नसल्याने त्यांचे परम मित्र निलेश यांनी तो स्वीकारला, तसेच स्वतःची ट्रेकिंगची आवड जपता जपता आम्हालादेखील सह्याद्रीच्या ट्रेकिंगचे वेड लावणारे आमचे लीडर्स रोहित सर, मंदार सर, राणे सर, अनिल जाधव, निकाळजे सर यांचा उदयसर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रमोद बोराडे यांचे श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या यांच्या हस्ते माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे या आमच्या ग्रुपची वेबसाईट लॉन्च करण्यात आलीwww.moutainedgeadventure.in   संपूर्ण हॉल जाल्लोशाने दणाणून गेला होता. त्यानंतर मात्र खास पाहुण्यांचे व्याख्यान ऐकायला आम्ही सज्ज झालो होतो.


डॉक्टर प्रमोद बोराडे सर हे इंद्रायणी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असून इतिहास विषयांचे प्रमुख आहेत. इतिहास विषयामध्ये त्यांनी पी एच डी केली आहे. एम. पी. एस. सी. यु. पी. एस.सी.स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना इतिहासविषयक मार्गदर्शन करतात. इतिहास विषयात एम.फील. पी. एच. डी. करणाऱ्या  तरुणांना मार्गदर्शन करतात. मावळची राजधानी दुर्ग विसापूर, शौर्यगाथा मावळच्या शक्तिपीठांची, तळेगाव दाभाडे इतिहास. दुर्गभारत इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.  महाराष्ट्रातील अनेक दुर्गसंवर्धन मोहिमांत त्यांनी सहभाग घेतला असून भारतातील बहुतांश दुर्ग पादाक्रांत केले आहेत. दुर्गांची सुमारे सुमारे ३लक्ष छायाचित्र छायाचित्रित केली आहेत. अपरिचित बंद भुयारे उजेडात आणून तपासणी संशोधन केले आहे. अपरिचित अल्पपरिचित लेणी शोध संशोधन केले आहे, मार्गदर्शक सेवेतून अनेक दुर्ग लेणींच्या समूहांना भेट दिली आहे. मोडीलिपीतील अनेक अप्रकाशित पत्रांचे लिप्यंतर करून त्यांचे प्रकाशन केले आहे. सुमारे ५००० ग्रंथ संग्रह करून शिवशाही मोफत ग्रंथालयांची स्थापना केली आहे. व्याख्यानाच्या माध्यमातून शिवचरित्र इतिहास विषयाचा महाराष्ट्रात प्रसार केला. महाराष्ट्रातील नामांकित चर्चासत्र व्याख्यानमालांत सहभाग घेतला आहे. वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालीके, दिवाळी अंक स्थानिक साप्ताहिक, शोध निबंध संशोधन ग्रंथातून अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन काळातील ऐतिहासिक वस्तू, चित्रे शस्रास्रे यांचा संग्रह करून साधारणतः ५०० प्रदर्शनांचे महराष्ट्रात अन्य राज्यात आयोजन त्यांनी केले आहे. सुमारे २००० ऐतिहासिक शस्रास्रे वस्तू संग्रह करून शिवशाही संग्रहालयाची तळेगाव दाभाडे येथे स्थापना केली.    करण्यात आली. अश्या ह्या सर्वगुणसंपन्न व्याख्यात्याचे व्याख्यान सुरु झाले आणि टाचणी पडेल तर आवाज येईल इतकी शांतता सगळ्यांनीच राखली. शिवबा आणि जिजाऊंबद्द्दल ऐकताना  अभिमानाने ऊर भरून येत होता. शिवरायांचा इतिहास आणि जिजाऊंची आणि मावळ्यांची शौर्यगाथा ऐकून अंगावर शहारे येत होते. बोराडे सरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आजकालची मुले मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात रमतात त्यामुळे त्यांचे आदर्श हे वेगवेगळे असतात आपण त्यांचा आदर्शच कोणी फिल्मी नायक न ठेवता शिवरायांसारख्या नायकाचा आदर्श समोर ठेवला तर ते तसेच घडतील. लहानपणापासून मुलांना किल्ले बनवू द्या आपला इतिहास समजून सांगा, वाचायला द्या.  ट्रेकला आणून प्रत्येक दुर्गाची माहिती द्या महती सांगा बघा बरं आजच्या पिढितदेखील शिवरायांसारखे आदर्श घेऊन अनेक शिवराय जन्माला येतील. औरंगजेबाच्या तोंडून शिवरायांची स्तुती ऐकताना मराठी मातीत जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटतो. एक तास आम्ही ते ऐतिहासिक व्याख्यान तल्लीन होऊन ऐकत होतो. कोणाचेही मोबाईलकडे लक्ष गेले नाही की कोणीही जागचे हलले नाही की जराही चुळबुळ केली नाही की कोणी डुलकी मारली नाही. त्यांनी अजून शिवरायांबद्दल बोलावे असे सर्वांना वाटत होते. परंतु वेळेअभावी फक्त एक तासाच्या भन्नाट व्याख्यानावरच आम्हाला समाधान मानावे लागले.त्यांच्यासाठीच्या टाळ्यांची गुंज अविरत घुमत होती. ट्रेकच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ट्रेकर्सने ट्रेकग्रुपविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच राणे सरांनी १२ वर्षांच्या १०० ट्रेकचा आढावा घेतला आणि कार्यक्रमाची सांगता केली. प्रमोद सरांच्या शौर्यगाथा मावळच्या शक्तिपीठांची या पुस्तकांच्या प्रती त्यांच्या ऑटोग्राफसहित आम्ही घेतल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत ब्यानर सोबत ग्रुपफोटो घेऊन रायरेश्वराचा जड अंतःकरणाने समाधानाने निरोप घेतला आणि सूर्यास्ताच्यावेळी पुणेकडे रवाना झालो. येताना राहिलेली फोटोग्राफी केली शिवाय मध्यमविषारी साप वाटेतच एका पानावर आढळला त्याची माहिती आम्हा सर्वांना देऊन सापाला सर्पमित्र निकाळजे यांनी सुरक्षितरित्या त्याला त्याच्या आवारात गवतात सोडले. येताजाताना आपण आनंदाच्या भरात छान पैकी गवतावर झोपून फोटो काढतो पानाफुलांना हात लावीत जातो. हा महाराज एका पानावरच बसला होता. त्यामुळे आमचे ग्रुपलीडर्स नेहमी सूचना करीत असतात की ट्रेकर्सहो, जरा आजूबाजूला पाहून पाऊल टाकावे. येताना तेथील गावकरी स्वयंपाकासाठी लागणारा सिलेंडर घेऊन उतरत होते आणि जिथे कार जीप येते त्या एक तासाच्या टप्प्यावरून भरलेला सिलेंडर घेऊन जात होते, आपल्याला जिथे एक सॅक घेऊन ट्रेक करायला नको वाटते तिथे ५किलोचा मिनी सिलेंडर घेऊन चढणे म्हणजे या लोकांची कमालच आहे त्यात दोन पुरुष आणि एक स्त्री होती. तो क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासारखाच होता.
तेथील स्थानिक लोक म्हणाले की अडीच महिन्यानंतर २२सप्टेंबरला दुपारी छान ऊन पडले होते. संध्याकाळी ढग दाटून आले आणि सूर्यास्तानंतर पाऊसही पडला. त्या चिंब पावसात आम्हाला त्या टपरीवरील अद्भुत चहाचा आणि भजीचा आस्वाद घेता आला. आमच्यासाठी हा दिवस भाग्याचा होता म्हणायचा. ऊन पडल्यामुळे आम्हाला रायरेश्वराचे सुंदर रूप पहाता आले. सहयाद्री आपल्याला किती चांगल्या गोष्टी शिकवतो ते आपण पाहतो.  त्यासाठी ट्रेकच केला पाहिजे तोदेखील माऊंटन एज ग्रुपसोबतच. राहुल दर्गुडे यांच्या अनुपस्थितीत डीएसएलआर वाले आणि जाणता राजाचाचा भगवा असणारे भोसलेसर आम्हाला उत्तम फोटोग्राफर म्हणून लाभले होते. शिवाय नीलिमा भावे, प्रेरणा पोळेकर आणि ग्रुप तसेच उदय सर, अमर बुदगे सर, ज्योती, चंद्रशेखर, स्नेहल, दिनेश, प्रतीक, शेवाळकर सर, निधी, निलेश वाघुळदे, ऋतुजा तुषार शिंगारे, इरा, कविता, प्रिया, सायली आणि इतर सर्वांनीच उत्तम फोटोग्राफ़ी आणि ट्रेकसहाय केले आहे सर्वांचे मनापासून विशेष कौतुक. अंताक्षरी असो की फोटोग्राफी असो, विनोद असो की मिमिक्री असो, भाषण असो की दम शेराज असो, प्रत्येक ट्रेकरमध्ये हा प्याशनचा किडा दडून बसलेला आहे त्याला ऍक्टिव करण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजे माऊंटन एज ट्रेक ग्रुप. रोहित सरआपल्या १००व्या ट्रेकसाठी प्रमोद सरांसारख्या हुशार आणि इतिहासाचे सखोल ज्ञान असलेल्या व्याख्यात्याची ग्रेट भेट घडवण्याचे पुण्य तुम्ही केलेत त्यासाठी संपूर्ण टीम तुमची शतशः ऋणी आहे.