Tuesday 2 July 2019

"हिरवा निसर्ग"


हिरवा निसर्ग 
वन ट्री हिल ट्रेक
दिनांक -३०जून २०१९
ठिकाण- माथेरान (रायगड जिल्हा)
उंची - २६०० फूट

माथेरान हे माझ्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई, पुणे, नगर, नासिक येथील लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा आहेच शिवाय ट्रेकर्ससाठीदेखील उत्तम आणि सुंदर ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. इंग्रजांनी माथेरान वसवले असे म्हणतात त्यामुळे तेथील सर कड्यांना इंग्रजी नावे आहेत.माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडीशी वेगळी झालेली डोंगर रांग आहे. कल्याणचा  मलंग गड,नवरानवरीचा डोंगर,चंदेरीचा प्रचंड उभा सुळका, म्हैसमाळ  डोंगर, नाखिंद डोंगर, पेब त्यानंतर  मग माथेरानची डोंगररंग  सुरू होते.
वन ट्री हिल-चौक पॉईंट जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे. इथूनही खाली चौक गाव दिसते. या पॉईंट समोर डोळे गरगरतील अशी भीषण खोल दरी आहे. नीट पाहिल्यास एक छोटीशी पायवाट छोट्या खिंडीतून एका सुळक्याला जाऊन मिळालेली दिसते. हा सुळका मुख्य डोंगरापासून अलग झालेला आहे. ह्याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल पॉईंट. आता बरीच झुडपे उगवलेली दिसतात. इथूनच ‘शिवाजी लॅडर’ नावाच्या रस्त्याने ‘मॅलेट’ प्रथम माथेरानला आला. असे म्हणतात.

माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे या ट्रेकग्रुप चा ९६वा ट्रेक रविवार  दिनांक ३०जून २०१९ या दिवशी आयोजित केला होता. मार्च नंतर २ महिन्यांच्या अंतराने माझा ट्रेक असल्याने मी तर खुश होतेच कारण माझी ट्रेक वारी काही कारणाने झाली नाही तर मग दवाखाना वारी सुरु होते. परंतु पावसाळी ट्रेकसाठी सर्वच ट्रेकर्स जरा जास्तच खुश होते,उत्साहाने सज्ज होते. सकाळी ६च्या दरम्यान आमच्या ट्रेकर्सच्या ३०-३० ट्रेकर्सच्या दोन बसेस निगडीहून निघून-देहूरोड - तळेगांव येथे नारळ फोडून -जुना मुंबई-पुणे रोड- लोणावळा- खोपोली-एन. डी स्टुडिओ - जवळून मुरबाड रोडने कर्जत चौकातून आंबेवाडीच्या दिशेने वळून आंबेवाडी गावात सुमारे तासात पोहोचलो.

वेळ वाचवण्यासाठी निगडीहून आणलेला इडली चटणीचा मस्त नास्ता जातानाच बसमध्ये फस्त करून वाटेत पूर्व हॉटेलमध्ये बेस्ट चहाचा आस्वाद घेऊन आंबेवाडीत पोहोचलो. आंबेवाडीमध्ये पोहोचायच्या आधीच पावसाची रिमझिम चालूच होती. इथे पोहोचण्याआधी एक छोटा टर्न चुकल्याने स्त्यात एका गावकऱ्याला विचारल्याने, त्याने योग्य रस्ता दाखवल्याने पुन्हा बसेस हिरवाईने नटलेल्या हिरव्या शालीतून राखाडी रस्त्यावरून चालू लागल्या. आम्ही काय तेवढेच आजूबाजूचा परिसर न्याहाळून फोटोग्राफीची संधी शोधतो.






वाटेत गावातील कौलारू घरे,मंदिरे,गावात जाणारे रस्ते पावसात न्हाहून निघाल्याने उठून दिसत होते  आणि एखाद्या चित्राप्रमाणे भासत होते. एकीकडे धुक्याची शाल पांघरलेल्या डोंगररांगा तर एकीकडे छोटे ओढे, नद्या वाहू लागलेल्या दिसत आहेत.भातशेतीची खाचरं हिरवीगार दिसत होती.  खरंच निसर्गापुढे  आपण किती क्षुद्र प्राणि आहोत हे लक्षात येते. ट्रेकला गेल्यावर की रागरुसवे विसरून प्रत्येकात दडलेले लीडरशिपचे गुण आणि सर्वच गुण जागे होतात. ट्रेक का करावा हा प्रश्न पडणाऱ्यांनी प्रत्यक्ष ट्रेक करा म्हणजे आपोआप उत्तर सापडेल.

आंबेवाडीमध्ये पोहोचताच ट्रेकलिडर राणे सर आणि मंदार सर यांनी ट्रेकसंधर्भात सूचना केल्यानंतर गावातील उमेश आखाडे गाईड सोबत घेऊन सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली.प्रत्येकाने काळ- निळे जॅकेट,रेनकोट, टोपी घातल्याने तो रेनिट्रेक ड्रेसकोड असल्यासारखा भासत होता.

ट्रेकर्सची मोजणी करून माथेरानची ती रांग चढायला सुरु केली. पाहुण्यांचे स्वागत आपण पाहुण्याला पाय धुण्यासाठी पाणी देऊन करतो त्याप्रमाणे. ट्रेकच्या सुरुवातीलाच विहिरींनी ट्रेकर्सचे स्वागत केले. पावसामुळे विहिरी पाण्याने भरलेल्या होत्या. गाईडच्या मागोमाग आम्ही चालू लागलो.


पाऊस पडत होता तरी फोटोचा मोह कोणालाही आवारत नव्हता. प्लास्टिक कव्हर लावून,प्लास्टिक बॅग मधून फोन बाहेर काढून, छत्री घेऊन असे नानाविविध प्रकारे सगळेजण तेथील स्वर्गमयी नजारा कॅमेऱ्यात कैद करीत होते.वॉर्म-अप होईपर्यंत सुरुवातीला कायमच प्रत्येकाला थोडा दम लागतोच. जो तो आपल्या क्षमतेप्रमाणे थोडा वेळ थांबून ट्रेक चढण चढत होता. जुन्या ट्रेकर्स सोबत राहुल दर्गुडेच्या मित्र परिवार, उदय चौगुले, त्यांच्यातील लेडीज ग्रुप आणि इतर सगळ्यांचेच  अप्रतिम उत्साहाने ट्रेकिंग सुरु होते. प्रतीक याने आणलेल्या बियांचे रोपण त्याने इतर ट्रेकर्ससोबत केले.  सर्वात लहान ट्रेकर्समध्ये आदित्य, सुमित,गार्गी,सारिका यांच्यात कमालीचा वेग आणि  उत्साह होता. त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते


जेव्हा जेव्हा ते ट्रेकला जातील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे थोड़े लक्ष द्यावे लागेल कारण पावसामुळे धुक्यामुळे आजूबाजूला दर्या असतात त्या बिलकुल दिसत नाहीत तिथून थोडा जरी पाय घसरला तर काय होईल याची त्या लहानग्यांना यत्किंचीतदेखील कल्पना नसते. त्यामुळे लहानमुलांना पॅरेंट्सने आपल्या जवळच हात धरून आपल्यासोबतच ट्रेक करायला लावावा नाहीतर गोड बोलून पोकळ धमकी द्यायची की ऐकलं नाहीस तर ट्रेकला आणणार नाही. ही विंनती. आदित्य दर्गुडे, सुमित भावसार या छोट्यांचे काही ट्रेक झाल्यामुळे त्यांना अनुभव आहे सूचना ऐकली नाही तर ट्रेक ला यायला मिळणार नाही त्यामुळे ते आपल्या पेरेंट्स सोबत राहूनच किंवा एखाद्या अनुभवी ट्रेक लीडरसोबत राहूनच ट्रेक पूर्ण करतात .

माथेरान थंड हवेचे ठिकाण असल्याने येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. आत्ताच पावसाळा सुरु झाल्याने पावसामुळे माथेरान हिरवंगार झालंय. प्रत्येक कडेकपारीतून वधूच्या मोत्याच्या  मुंडावळ्या शोभून दिसाव्या त्याप्रमाणे मोत्याची माळरुपी पांढरे शुभ्र धबधबे वाहताना शोभून दिसत होते. जून ते ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस पडतो. या काळात धुक्याचे साम्राज्य संपूर्ण माथेरानवर असते. सूर्यप्रकाशही फार कमीवेळा दिसतो. पूर्वी पावसाळ्यात पर्यटक येतच नसत. कारण जून ते सप्टेंबर आगगाडी आणि हॉटेल्स बंद असत. पण आता तरूण,प्रेमी युगुलं,कुटुंब, मित्रांचे लोंढे. तसेच ट्रेकरच्या लाटांच्या लाटा येथे पावसात ट्रेकिंगसाठी दिसतात. मी कॉलेजमध्ये असताना एकदा सहलीला माथेरानला जायचे असे ठरले होते परंतु येथे जळवा असतात त्या भीतीने माझी सहल मी कॅन्सल केली होती. आयुष्यात सहलीसाठीदेखील मी माथेरान फिरले नव्हते. डायरेक्ट ट्रेकसाठीच माथेरानवरील वन ट्री हिल वर जाणार असल्याने मी मनोमन खूप खुश होते.

जसजसे उंचावर जात होतो तसतसे आल्हाददायक वाटत होते. वन ट्री हिल ट्रेक रूट वर कुठेही रेलिंग नाही. ती नाहीये म्हणून तर ट्रेकची खरी मजा आहे परंतु फक्त सेल्फी फोटोग्राफर्सने आणि मस्ती करणाऱ्या ट्रेकर्सने पावसात खूप सांभाळून गेले आणि सुरक्षित ट्रेक केला तर ट्रेकचा आनंद द्विगुणित होतो. हरिश्चन्द्रगडावर रेलिंग लावून राजाला बेड्या घातल्यासारखे वाटतेय. रेलिंग आणि गडावर बांधकाम केले की गडाची नैसर्गिक शोभा तर जातेच शिवाय गड प्रदूषित करून  त्याला आपण आजारी पाडतो असे वाटते. जिथे बुरुजांची डागडुजी गरजेची आहे ती केलीच पाहिजे. एका गडावर एकावेळी किती ट्रेकर्स जाऊ शकणार त्यासाठीचा नवीन नियम लागू होतोय ते खूपच चांगले आहे. माथेरानवर मुक्काम करून सगळे पॉईंट फिरून माहिती घ्यावी लागेल. आम्हा ट्रेकर्सकडे वन डे ट्रेक दरम्यान इतका वेळ नसतो.
साधारण बाराच्या सुमारास आम्हाला वन ट्री हील वाला उंच डोंगर दिसू लागला तो देखील कापूसरूपी ढगांमध्ये लपत होता. हा ट्रेक करताना मला हरिहर ट्रेकची खूप आठवण आली कारण हरिहरचा चढ काही ठिकाणी बऱ्यापैकी असाच आहे. त्यामुळे जास्त थ्रिल वाटत होतं. दुपारी १२च्या सुमारास एक विहीर लागते त्याठिकाणी एक बाणाची खूण आहे तिथून उजव्या वळणाने घनदाट जंगल तुडवत आम्ही निघालो.  पक्षांचे निरनिराळे मंजुळ आवाज येत होते. त्यांच्या आवाजाप्रमाणे आपण आवाज काढला की छान प्रतिसाद देत होते याचे मला फार नवल वाटत होते. ट्रेकर्सची जर चुकून पांगापांग झाली तर गरजेच्या वेळी लीडरने शिटी वाजवणे वेगळे आणि विनाकारण ओरडत जाणे वेगळे असते. तसे कोणीही करू नये. आपण प्राण्या-पक्षांच्या हद्दीतून जाताना जरा शांतता बाळगावी.

विहिरीपासून १५ मिनिटे पुढे गेल्यावर एक ओढा लागतो तिथे मार्गक्रमणाची एक खूण म्हणा किंवा स्थानिक लोकांनी छोटेसे मंदिर म्हणून - घंटा आणि छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या आढळल्या. आपण नकळत नतमस्तक होतोच आणि पुढे चालू लागतो. पुढे गेल्यावर मात्र  वन ट्री हिल छान दिसू लागला होता परंतु जिथून आत्ताच धबधबे वाहू लागले होते त्या निसरड्या वाटेने आम्ही सांभाळून चढाई करत होतो. पावसाळा आता सुरु झाल्याने पाण्याचा प्रवाह थोडा कमी होता त्यामुळे शेवाळ अजून जमा होतेच आहे. अन्यथा थॊडे कठीणच आहे. जाणाऱ्या ट्रेकर्सने सांभाळून जावे. म्हणता म्हणता दुपारी एकच्या सुमारास आम्ही वन ट्री हिल च्या अगदी जवळ उभे राहिलो.दरीत पडणाऱ्या पावसाचे तुषार हवेच्या दाबाने पुन्हा आमच्यापर्यंत येत होते. मला तर क्षणभर हलल्यासारखे वाटले इतका वारा होता. इथून समोर खंडाळा, राजमाची, नागफणी ही मुख्य सह्याद्री रांगेतील टोके दिसतात. तसेच माणिकगड, कर्नाळा, मोरबे धरणाच्या अथांग जलाशयाच्या त्या बाजूला इर्शाळगड. प्रबळगड, कलावंतीण गड दिसतात. परंतु धुक्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते.

आम्ही गेलो तेव्हा पावसाचे ढग आमच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत होते त्यामुळे एका बाजूने फोटो क्लिक करेपर्यंत दुसऱ्या बाजूचा जलाशय. हिरवेगार डोंगर भातखाचरे एका क्षणात अदृश्य होत होती. निसर्गाची किमया दुसरे काय. “हिरवेहिरवेगार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे.” “आला आला वारा संगे पावसाच्या धारा,”या ओळी ओठांवर आल्याशिवाय राहत नाही.


माथेरानच्या जंगलात जवळपास १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत.इथे खूप पाऊस पडत असल्याने जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. ह्या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉईंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही.माथेरानमध्ये माकडांचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे. माकडांप्रमाणेच रानमांजरे, हरणे, ससे हे प्राणी इथे आहेत. शिवाय खालच्या जंगलातून कधीकधी बिबटे देखील वर येतात पण माणसांना त्रास दिल्याचे ऐकिवात नाही. क्वचित कधीतरी गाय, शेळी या बिबट्याने मारली, अशी माहिती जवळच्या गावातील लोकांकडून ऐकायला मिळते. इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल, दयाळ, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट इ पक्षी आहेत. पॅराडाइज फ्लायकॅचर नावाचा एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी इथे आढळतो.असे ऐकलेय आणि नेटवर वाचलेय.
माथेरानचा थोडक्यात इतिहास असा आढळतो की इ.स. १८५० मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवरून वर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला. नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले.असे म्हंटले जाते.
आजूबाजूचा परिसर न्याहाळून बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर फोटोग्राफ़ी सुरु होती.
हा आमचा मुख्य ट्रेकटोक असल्याने इथे ग्रुप बॅनर फोटो,फक्त लेडीज बॅनर फोटो ,सोलो बॅनर फोटो, असे सगळे फोटो काढून झाल्यावर मात्र पोटात डोमकावळे ओरडायला लागले. सपाटून भूक लागून आम्ही भुकेने झपाटून गेलो होतो. आता गोव्यातील दूधसागर सारखा रस्त्याने दुतर्फा घनदाट झाडी असलेला लाल मातीचा कच्चा रस्ता आम्ही चालू लागलो. पचाक पचाक पावले आपटत कोणाकोणाच्या अंगावर पाणी कसे उडवायचे याच्या क्लुप्त्या शोधत गाणी गात चाललो होतो कारण आता पोटात भुकेचा राक्षस घुसला होता. माथेरान पठारावर गेल्यावर पॅनोरमा पॉईंट, सनसेट पॉईंट किंवा पॉर्क्युपॉईन लुईझा पॉईंट, इको पॉईंट,चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गार्बट पॉईंट,दस्तुरी अथवा माऊंटबेरी पॉईंट, रामबाग पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट, माधवजी पॉईंट, मंकी पॉईंट, हार्ट पॉईंट, मालडुंगा पॉईंट, चिनॉय पॉईंट, रुस्तुमजी पॉईंट, मलंग पॉईंट, एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, लिटल चौक पॉईंट असे अनेक पॉईंटचे बोर्ड अधून मधून दिसत होते.

जुने-नवे ट्रेकर्स आता सगळेच एकमेकांचे दोस्त बनतात. कोणी कोणासोबत गप्पा मारत चालले होते. मी-हिरल राणे आणि सर्पमित्र निकाळजे कधी पुढे निघून चालू लागलो कळालेच नाही. आम्हाला पर्यटकांची प्रचंड गर्दी पहावयास  मिळाली.हिरव्या गर्द झाडीत  रंगीबेरंगी रेनकोट छत्र्या पाहुन प्रसन्न वाटत होते. त्यामुळे गाणी गाण्यांशिवाय काही सुचत नव्हते. जो आपल्या चालीच्या वेगाला मॅच करीत येतो तो आपल्या सोबत चालतो. ट्रेकमध्ये एक हात फुगडी फोटो, एक माणूस एक झाड संदेश देणारा फोटो, मॉडेलिंग करणारे फोटो असे अनेक नमुना फोटो आम्ही नेहमीच काढतो आणि ट्रेकचा भरभरून आंनद घेतो.

माथेरानला जी आगगाडी येते ती या ‘पेब’ आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून. या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते. लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुकगाडी नेरळवरून वर चढते. २१ कि.मी.चे अंतर दोन तासांत पार करते. ह्या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे.

सहलीसाठी जाणाऱ्यांसाठी माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत.एम.टी.डी.सी. ची रेस्ट हाऊसेस आहेत. यांचे बुकिंग मुंबईच्या एम्.टी.डी.सी.च्या कार्यालयातून होते.इतर देखिल बरीच हॉटेल्स आहेत. कुमार प्लाझा, माणिकलाल टेरेस, रॉयल, प्रेमदीप, सेंट्रल, शिरीन, वुडलँडस् ही काही नवीन झालेली हॉटेल्स आहेत; तर दिवाडकर, लक्ष्मी, गिरीविहार, रिगल, लॉर्डस् ही जुनी आणि चांगली हॉटेल्स आहेत.  त्याचे दर बरेच कमी आहेत. ट्रेकिंग करून येणाऱ्यांसाठी जेवणासाठी सोय दिवाडकर हॉटेल उत्तम आहे.आम्ही दिवाडकर हॉटेल मध्ये जेवण केले.,जलद सेवा आणि उत्तम, चविष्ट जेवण होते.


आम्ही जेवण केल्यांनतर पुन्हा या ट्रेनच्या पटरीवरून आणि ट्रेन आली की पटरीच्या बाजूने तासाभराची पायपीट केली. त्या छोट्या ट्रेन मधून जाण्याचा आंनद आम्हाला लुटावयाचा होता परंतु पर्यटकांची ट्रेकर्सची इतकी गर्दी होती की त्या ट्रेकचे तिकीट काढून ट्रेनमध्ये बसून जाईस्तोवर आम्ही पटरीचा रस्ता ओलांडून माथेरानचा जिप्सीचा प्रवास करून आम्ही पुण्याला देखील पोहोचणार असे दिसले. त्यामुळे लीडर्सच्या सूचनेनुसार आम्ही आपले चालू लागलो आणि दूधसागरच्या पटरीचा खडतर प्रवास आणि दूधसागरला पोहोचण्याचा आनंद आठवू लागलो.



माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले की माऊंटबेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे १.५ कि.मी. किंवा चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत.असे म्हणतात की १९०७ मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली.माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत.याचे फारच कौतुक वाटते. पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवकजावक होत असल्यामुळे इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स् आहेत. सांबराच्या कातड्याच्या वहाणा व बूट प्रसिद्ध आहेत. तसेच ‘पांढरी’ची काठीही मिळते. रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू, इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फज देखिलबऱ्यापैकी प्रसिद्ध आहे.ट्रेककिंगसाठी गेल्यामुळे आणि वेळेअभावी आम्ही हा मार्केट फक्त पहिला. खरेदी करायला वेळ मिळाला नाही तरी माथेरानच्या हिरव्यागार वनराईने आणि डोंगररांगांनी अथांग जलाशयांनी डोळे आणि मन भरून पावलो.

ट्रेन आली की ट्रेन समोर फोटो, पटरीवरून चालून प्रात्यक्षिके, पटरीवर बॅनर फोटो, मागे जवळ ट्रेक आलीये आणि आम्ही फोटो काढतोय. असा भन्नाट अनुभव आम्ही घेतला. त्या मिनी ट्रेनचा वेग खूप कमी असल्याने मला तर फारच कौतुक वाटत होते. लहानपणी ऐकलेली माथेरानची मिनी ट्रेन ती हीच ट्रेन मी प्रत्यक्ष पहात होते.  माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. झुकझुकगाडीने नेरळवरून येता येते.लिट्ल चौक ह्या पॉईंटच्या खालून येणारी वाट आहे.  हीच वाट मोटारींना वर नेण्यासाठी आहे.कर्जतच्या दिशेने गार्बेट पॉईंटवर निघणारी १३ कि.मी.ची वाट आहे.गाडेश्वर तलावावरून पनवेल, नेर, वाघाची वाडी अशा रस्त्याने येणारी वाट सनसेट किंवा पॉर्क्युपाईन पॉईंटवर येऊन मिळते. ही वाट साधारण १९ कि.मी.ची आहे.नेरळवरून सरळसरळ डांबरी रस्त्याची ८ कि.मी.ची सोपी वाट आहे तिथून आम्ही जिप्सीने खाली उतरलो. 


आम्ही दिवाडकर हॉटेेलमध्ये जेवून अमन लॉज या रेल्वेथानकापर्यंत एक तासाची पायपीट केली आणि अमन लॉज रेल्वेस्टेशन पासून जिप्सीमधून एका व्यक्तीस ८० रुपये असे सगळे ट्रेकर्स नेरळच्या हुतात्मा चौकात आलो. आमच्या ट्रेक बसेस इथेच येऊन थांबल्या होत्या. पटापट ओले कपडे चेंज करून. येताना पुन्हा पूर्व हॉटेलमध्ये संध्याकाळचा चहा घेऊन दोन्ही बसमधल्या टीमने धमाल अन्ताक्षरीच्या तालावर रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे गाठले.

सर्व प्रथम इतक्या सुंदर,पावसाळी भन्नाट ट्रेकचे आयोजन-नियोजन करणारे आमचे ट्रेकलिडर्स मंदार थरवळ सर, मनोज राणे सर, रोहित सर, अनिल सर, सर्पमित्र निकाळजे  यांचे खूप खूप आभार आणि कौतुक करावेसे वाटते. एक नंबर ट्रेक होता सर. ट्रेक दरम्यान नवीन लहानग्या ट्रेकर्सना लागेल तशी मदत करणारे, राहुल दर्गुडे, निलेश यादव, प्रशांत भावसार, शेवाळकर सर,राहुल शिंदे, आकाश, प्रतीक,निकाळजे, उदय चौगुले कुटुंब आणि त्यांचा मित्र परिवार, तसेच उत्तम न रागवता फोटो काढणारे फोटोग्राफर राहुल दर्गुडे आणि टीम, राणे सर मंदार सर, सलोनी, प्रीती, प्रीतम, सायली,प्रिया ताई, छोटा ऍक्टिव आर्टिस्ट ऋतुजा  (दिनांक ५ ते १२ जुलै २०१९रोजी ऋतुजा दीक्षित यांच्या पेंटिंग चे आणि इतर कलेचे प्रदर्शन पी.एन,जी. गाडगीळ अँड सन्स १/१ गोखले वृन्दावन चाफेकर चौक चिंचवड येथे आहे तरी सर्व ट्रेकर्स आणि त्यांच्या मित्रपरिवाराने आवर्जून प्रदर्शनास भेट द्यावी असे ऋतुजाने स्वतः निमंत्रण दिले आहे.) कल्पना,हर्षदा स्नेहल खोल्लम, मीनल रानडे,सरिता,प्रतीक,आकाश आणि टीम, भूषण ,पोलिस आणि टीम,लहान-थोर, नवे जुने सर्व ट्रेकर्सचे ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि धमाल आणलीत त्यासाठी मनापासून कौतुक करावेसे वाटते.रोहित,वैशाली, कविता, दिनेश, स्मित, गीता अतिशय सुंदर ट्रेक मिस केलात तुम्ही. मी खास सर्व ट्रेकर्ससाठी घरी बनवून आणलेली घी वाली नानकटाई आणि घी वाले पौष्टिक लाडू कोणाला मिळाले नसतील त्यांनी मला माफ करा आणि पुढच्यावेळेस लाजू नका आणि मागू नकामाऊंटन एज अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा जवळपास १३ किलोमीटरचा ९६वा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. माऊंटन एज रॉक्स.