Tuesday 17 April 2018

मधुर मधु ट्रेक...।



मधुमकरंदगड ट्रेक
प्रकार-गिरिदुर्ग
डोंगररांग -महाबळेश्वर
चढाईश्रेणी –मध्यम
 उंची - सुमारे ४०५४ फूट
जिल्हा -सातारा
दिनांक- १४-१५ एप्रिल २०१८
मधुमकरंदगडाची थोडक्यात माहिती-मधुमकरंद गड हा सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात आहे. तळेगावपासून सुमारे १८६ कि.मी. अंतरावर असून सुमारे साडेचार तासांचा प्रवास करावा लागतो. प्रतापगडावरून हा गड दृष्टीस पडतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४०५४ फूट इतकी आहे. मधुमकरंद जुळ्या भावंडांप्रमाणे आहेत `सातारा रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांची हद्द म्हणजे मधू शिखर होय. शिवाजी महाराजांच्या काळात आजूबाजूच्या गडांवर टेहेळणीसाठी या गडाचा वापर होत असे . जावळीच्या घनदाट खोऱ्यात हा गड वसलेला आहे. गडाचे वैशिष्ट्य असे की आकाश निरभ्र असेल तर दुर्बिणीच्या साहाय्याने गडाच्या एका टोकावरून महाबळेश्वर दिसते तर दुसऱ्या बाजूने कोकणातील विलोभनीय दृश्य आपण पाहू शकतो
शेतकऱ्याला जसे ऊन, वारा, पाऊस, थंडी ची पर्वा नसते तो आपला सतत कार्यरत असतो. तसेच आम्हा ट्रेकर्सना कोणत्याही ऋतूमध्ये ट्रेक असला तरी कसलेही भय वाटत नाही. ट्रेकचा मेसेज माउंटन एज  ट्रेकग्रुप वर येऊन  धडकला  की महत्वाची कामे आटोपून आणि तब्बेत ठणठणीत ठेवून ट्रेकला सदैव तयारच असतो. दिनांक १४-१५एप्रिल २०१७ चा माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुपचा ८३ वा मधुमकरंदगड ट्रेक दिवस उजाडला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण फेब्रुवारी सुरु झाला की ऊन मी म्हणत असते त्यामुळे ट्रेकला जाताना जरा धाडस करूनच पूर्ण तयारीनिशी जावे लागते. गडाच्या उंची आणि अंतरानुसार पाणी घावे, ट्रेक सॅक कमीत कमी वजन असलेली, डोक्यावर टोपी, सफेद रुमाल,पंचा, ट्रेक शूज, सैलसर ड्रेस, फोटोसाठी कॅमेरा किंवा मोबाईल, खजूर, लिंबू सरबत किंवा ग्लुकॉन डी,मोबाईल बॅटरी सहायक, टॉर्च, जरुरीनुसार औषधे, जादाचा एक ड्रेस, किमान इतक्या तयारीत ट्रेकरने असावे.

रणरणत्या उन्हामुळे १५एप्रिल रविवारी सकाळी ट्रेक सुरु करावयाचा असल्याने  शनिवारी रात्री ११ वाजता आम्हा ६१ ट्रेकर्सच्या दोन बसेस तळेगांव-निगडी-बिजलीनगर-डांगे चौक-चांदणी चौक- सातारा हायवे - वाई फाटा- पाचगणी -महाबळेश्वर- आंबेनळीघाट-पारगांव बायपास-शिवकालीन ब्रिज - हातलोट मार्गे जावळीच्या घनदाट अरण्यातून घोणसपूर- मधुमकरंदगड कडे निघाली. दरम्यान प्रवास सुखाचा होण्यासाठी नारळ फोडून मध्ये पुढे  एका ठिकाणी १० मिनिटांचा ब्रेक घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली. वाई फाटा सोडल्यानंतर गार वारा सुखावून गेला आणि खुणावू लागला की आता तुम्ही महाबळेश्वरच्या हद्दीत पदार्पण केले आहे. इतक्या अंधारात तो घाट पार करताना उजव्या हाताला अनेक गड  किल्ले आणि आजूबाजूचा परिसर मंद दिव्यांनी काजव्याप्रमाणे लुकलुकत होता.राजेंच्या पावनभूमीत आहोत याचा अभिमान आहे मला. बघता बघता हलक्या डुलक्या घेत असतानाच पहाटेचे ५ वाजले आणि त्या जावळीच्या घनदाट जंगलात आमची बस थांबून लीडर्सनी खाली उतरून थोडा अंदाज घेतला की बरोबर चाललो आहोत ना ? कारण ती मॅप वाली मधेच झोप लागल्यासारखी थांबली होती. १० मिनिटे पुढे गेल्यांनतर समजले की आम्ही न चुकता अगदी बरोबर चाललो होतो. 

सकाळी ६ च्या दरम्यान आम्ही जंगल व्हॅली रिसॉर्ट या ठिकाणी पोहोचलॊ. बसमधून उतरून पटापट फ्रेश होऊन इडली चटणीचा नास्ता करून त्या सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त फोटोग्राफी करून पुन्हा मधुमकरंद गडाकडे निघालो. इथून सुमारे ४-५ की. मी अंतरावर मधुमकरंद गड आहे. सकाळी ७ वाजता लीडर्सनी ट्रेकसंदर्भातील सूचना देऊन लगेच ट्रेकला सुरुवात केली. मधुमकरंदगड हे एकमेकांना जोडलेले आहेत.

कारवीची मातीची कौलारू घरे, प्रत्येक घरापुढे शेणाने सारवलेले अंगण, घरासमोर भाताच्या लोम्ब्यांच्या राशी, प्रत्येक घराला कुंपण,सकाळ्ची कोवळी सूर्यकिरणे धरणीमातेला भेटावयास आली आणि धरणी उजळून निघाली. अप्रतिम असे ते दृश्य मला माझ्या माहेरची आठवण करून देत होते. 

शिवगर्जना करून ट्रेक सुरु झाल्यावर लगेचच एक नदी (सध्या एका ठिकाणी अगदी तळाशी पाणी असलेली) त्यावर असलेला छानसा पूल ओलांडून, काही कौलारू घरांची अंगणे पार करीत  आम्ही त्या घनदाट जंगलात प्रवेश केला.  अजून वॉर्म अप होईपर्यंत खरी कसोटी असते याच चढावावर प्रचंड धाप लागली, घाम गळू लागला होता परंतु हिरवेगार घनदाट जंगल असल्याने आणि सकाळची वेळ असल्याने थोडा गारवा असल्याने तोच घसरणारा चढाव देखील जर सोपा वाटू लागला.
डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तहान लागली नाही तरी थोडे थोडे पाणी जरून प्यावे.या जंगलात मधमाशांचा रहिवास असल्याने डार्क परफ्युम अथवा डिओड्रंट न मारलेला उत्तम. आणि चढताना उतरताना वाटेच्या बाजूच्या झाडांना फांद्यांना न धरलेले चांगले कारण चापड्या आणि इतर सरपटणारे विषारी साप या फांद्यांवरच लपलेले असतात त्यामुळे  सावधगिरी बाळगलेली उत्तम. गावातुन चढताना गावातील २ जण  त्या जंगलातून कळशीभरून मध घेऊन येताना आणि बाटल्यांमध्ये भरताना आमच्यातील काहींना दिसले.
 

२ तासाच्या अंतरावर गेल्यावर गडाच्या मध्यात श्री मल्लिकार्जुनाचे देऊळ लागले. त्यात सुंदर असे वेगळ्या प्रकारचे शिवलिंग पहावयास  मिळाले.  
इथे राहण्याची उत्तम सोय होते तसेच आपल्याला हवे असल्यास जेवणाची सोय देखील होते.  आपल्याला शाकाहारी  जेवण बनवण्यासाठी येथील भांडी आपल्याला मिळू शकतात. या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. इथे जंगम समाज असल्याने जास्तीत जास्त शंकराची मंदिरे आढळतात. या ठिकाणी कै. एम आर  भिलारे याच्या अर्धपुतळ्याचे स्मारक बांधले आहे. तसेच विसाव्यासाठी एक पत्र्याचे शेड बांधलेले दिसले.
या ठिकाणाहून कोयना धरणाचा दूरवर पसरलेला अथांग जलाशय उठून दिसत होता. तसेच अधून मधून आभाळ आल्याने सूर्यकिरणांचा लपंडाव सुरु होता.  
सर्व ट्रेकर्स या मंदिरापर्यंत आल्यानंतर गडाचा वरचा टप्पा सुरु केला. थोडी विश्रांती न घेतलेली बरी कारण शरीर थंड झालं की पुन्हा सुरुवातीचा वॉर्म अपचा कठीण अनुभव येतो. परंतु ट्रेकर्स जास्त असल्याने कोणाचीही गैरसोय होऊ नये, फसव्या वाटा चुकू नयेत यासाठी सर्व ट्रेकर्स पुन्हा सोबत निघाले. काही ट्रेकर्सने मोबाईलला साऊंड सिस्टीम कनेक्ट करून गाणे लावले. लीडर्सनी इथे मात्र अडवले ते बरे केले.  लीडर्सच्या बोलण्याचा कोणीही राग मनू नये. नियम सगळ्यांना सारखेच.  ट्रेकर्स हो, सुमधुर संगीत सगळ्यांना आवडते परंतु तेच संगीत निसर्गाच्या ठिकाणी मोठ्या आवाजात न लावलेले बरे कारण हे जंगल हा निसर्ग प्राणी-पक्षी यांचे घर आहे. आपण त्यांच्याच घरात जाऊन त्यांचाच त्रास देतो हे कितपत योग्य आहे? कसल्याही मोठ्या आवाजाने हे प्राणि पक्षी व्यत्ययीत होतात. आपल्या घरात येऊन आपल्यावर  कोणी रुबाब केलेला, हक्क गाजवलेला, आपल्याला त्रास दिलेला चालेल का आपल्याला? नाही चालणार. मग आपण देखील निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर प्राणि, पक्षी, पानाफुलांची सळसळ, वाऱ्याचा नाद, सूर्यकिरणांचा लपंडाव याचा अनुभव घेऊ. ओंकारचा जप करून पाहू यातदेखील आपण मनमुराद आनंद घेऊ शकतो.
गडाच्या मध्यानंतर वणवे लावून गवत पेटवले होते त्यामुळे वाटा स्पष्ट दिसत होत्या परंतु एखाद दुसरेच झाड दिसत होते.त्यामुळे सकाळचे साडेदहाच  वाजून गेले होते तरी उन्हाने घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या परंतु त्या अधिक शोभून दिसत होत्या आणि त्या घामाने सगळ्यांचे चेहरे चकाकत होते. माथ्यावर जायला २ वाटा आहेत एक डावीकडून एक उजवीकारून दोन्ही वाटा घसरड्या आणि कुठेही रेलिंग नसलेल्या आहेत त्यामुळे सावकाश आणि सांभाळूनच जावे. काही ट्रेकर्स डावीकडून गेले.
आम्ही उजव्या बाजूने गेलो या बाजूने खूप चढून पुढे गेल्यावर पांडवकालीन पाण्याचे तळे पाण्याने भरलेले दिसले.  ही खांब असलेली रहाण्यासाठी कोरलेली गुहा असावी त्यानंतर ती गुहा खोदून त्याचे तळे बांधले गेले. हे पाणी पिण्यालायक आहे.इथे हातपाय धुण्यास सक्त मनाई आहे.  या तळ्यातूनच खाली पायथ्याच्या गावामध्ये पाईपने इतक्या उंचावरून पाणी घेतले आहे आणि ते पाणी एका दगडी टाकीमध्ये साठवून त्या पाण्याच्या टाकीला वरून शेड केले आहे त्यामुळे पाणी अगदी बर्फतुल्य आणि अमृततुल्य आहे.

ते पाण्याचे तळे पार केल्यावर पुन्हा थोडा कठीण चढ लागतो. एका ट्रेकरने वरून आवाज दिला इथून मुलींनी येऊ नका दुसऱ्या सोप्या वाटेने या. असे म्हंटल्यावर  मग वाघिणींच्या शेपटावर पाय दिल्यासारखे वाटले. त्यानंतर मग आम्ही हटकून त्याच वाटेने गडाचा माथा गाठला. हो वाट कठीण जरूर होती परंतु अशक्य नव्हती. आमच्यासोबत इतके अनुभवी लीडर्स असताना आणि मनात जिद्द असतं कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे मला वाटते. गडाच्या माथ्यावर पुन्हा एक शिवमंदिर आणि एक स्मारक दिसले.स्मारकाजवळ फडकणाऱ्या भगव्यासोबत फोटो काढून आणि मंदिरात दर्शन घेऊन तिथेच थोडावेळ बसलो.कृपा करून कोणत्याही गडावर कोणत्याही  स्मारकावर, तोफांवर, ऐतिहासिक संपत्तीवर कोणीही उभे राहून फोटो काढून नये.  तिथे एक-दोनच झाडे होती इतक्या उंचावर भर उन्हात अश्यावेळी झाडांची महती कळते. 

आजूबाजूला दिसणाऱ्या गडकिल्यांविषयी परिसराविषयी लीडर्सनी थोडक्यात माहिती दिली.इथून जर आकाश निरभ्र असले तर एका बाजूला महाबळेश्वर, एका बाजूला महिपतगड, रसाळगड, सुमारगड दिसतात, प्रतापगड गड दिसतो.जे महाबळेश्वरचे प्रसिद्ध पॉईंट ट्रिपला जाणारी लोक अनुभवतात तेच कठीण पॉईंट आमच्या लीडर्सनी ट्रेक करून चढून आलेत आणि टाळ्यांची दाद मिळवळीये तो अनुभव ऐकून आम्हाला आमच्या माउंटन एज ग्रुपचा आणि ग्रुप लीडर्सचा अभिमान वाटतो.   

मधू सुळक्यावरील वाट तशी निमुळती आहे शिवाय दोन्ही बाजूला घसरड्या उतरणी आहेत कोणी अचानक घसरला तर दरीतच पडणार. त्यामुळे ६० जणांचा मोठा ग्रुप घेऊन मधू सुळक्यावर जाण्याचे आमच्या लीडर्सने टाळले. ११ च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली आता आम्ही दुसऱ्या बाजूने उतरू लागलो. वाट घसरडीच होती. रिस्क घेणे आपला छंद आहे म्हणा. इतके अनुभवी लीडर्स आणि  ट्रेकर्स सोबत असताना कसले आले भय आणि धास्ती कर लो थोडी मस्ती.
उतरताना सोबत आणलेल्या पिशवीमध्ये गडावर  थोडाफार प्लास्टिकचा कचरा होता तो भरून आणण्याचे उत्तम कार्य आमच्यातील ट्रेकर्सने केले. तसा गड बऱ्यापैकी स्वच्छ होता.गावकरी या बाबतीत जागरूक असलेले दिसले.

१२ च्या सुमारास गडाच्या मध्यभागी आल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये क्षणभर विश्रांतीसाठी बसले असताना इतिहाप्रेमी सारंग याने जाणता राजा नाटकातील संवादाचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. साडेबाराच्या सुमारास गड उत्तराईस सुरुवात केली. लगेच हरणटोळ या सापाने आम्हाला झाडावर उभे राहून सलामी दिली. चाललात का शूरवीर ट्रेकर्स हो ? शांततेत जावा. सर्पमित्र निकाळजेंनी सापाला पकडून सापांविषयी माहिती देऊन साप पुन्हा जंगलात त्याच्या घरात सोडला. जो गड चढताना जितका कठीण वाटत होता तोच गड  आता पायाला भिंगरी लावल्यासारखे  आम्ही उतरत होतो. झाडांचा पाला तुडवीत उतरत होतो. सपसपसप आवाज होत होता. येथील घनदाट अरण्यात हिंस्र श्वापदांची वस्ती आहे. झाडांची छोटी मोठी मुळे जमिनीतून  वर आल्याने पाय अडकवून काहीजण पडत होते. याच वाटेने आपण गेलो यावर विश्वासच बसत नव्हता. जो गड चढताना  ३ तास लागले तोच गड  आम्ही एक ते दीड तासात उतरलो. उतरताना मला असे वाटत होते की तोच पालापाचोळा, झाडांची मुळे, झाडांची सावली, पानांची सळसळ, गार वारा पिशवीत भरून आणावा.  उतरल्यानांतर बाकीचे ट्रेकर्स येईपर्यंत  जाताना भेटलेल्या अनुसया आणि सुमन या दोघींसोबत आम्ही गप्पा मारल्या त्यांचा निरोप घेऊन बसजवळ आलो. आता मात्र पोटात कावळे नाहीतर डोमकावळे  ओरडायला लागले होते.  
पाणी पिऊन पिऊन पोटाची विहीर झाली होती. सगळे ट्रेकर्स आल्यावर आमच्या बस ४-५ कि.मी वर असलेल्या जंगल व्हॅली रिसॉर्टकडे निघाल्या. जावळी खोऱ्याच्या घाट वळणाच्या रस्त्यावर उतारावर एका ठिकाणी बस मागे जाऊ लागली तेव्हा सगळ्यांचे धाबे दणाणले होते. सगळे जण खाली उतरून चाकाखाली दगड लावण्याचा पराक्रम करून मग बस एका झटक्यात पुढे गेली तेवढाच १० मिनिटे आम्हाला जंगल सफारीचा आनंद घेता आला. 

सकाळी ज्या रिसॉर्टला उतरलो होतो त्याच ठिकाणी लीडर्सने आमची जेवणाची उत्तम सोय केली होती. इतक्या घनदाट जंगलात रहाण्याची,जेवणाची उत्तम रीतीची सोय असणारे रिसॉर्ट असणे हीच एक किमया आणि नवल होते. अप्रतिम चविष्ट जेवण, झाडाला बांधलेला झोपाळा, भाज्या आणि स्ट्रॉबेरीचा छोटा मळा, वाहता एक पाण्याचा पाट असे सगळे  भारी आंनंददायी  वातावरण असल्याने सगळे ट्रेकर्स थोडावेळ तिथेच विसावले आणि प्रतापगडाची  धावती भेट कॅन्सल केली. 

आमच्यासाठी उत्तम जेवण बनवणाऱ्या त्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही दुपारी ४ वाजता इथून निघालो आणि ४०० वर्षांपूर्वीच्या शिवकालीन शिवाजी पुलाच्या भेटीस निघालो. ह्या पुलाचे बांधकाम अतिउत्कृष्ट आहे आणि वेगळे आहे. इतक्या वर्षानंतर अजूनदेखील हा पूल जसाच्या तसा आहे.वरून पाषाण हृदयी दिसणारी एखादी व्यक्ती मनाने फार हळवी असते त्याप्रमाणे वरून साधा डांबरी दिसणाऱ्या रस्त्याच्या खाली इतका मजबूत दगडी पूल आहे.  यावर पुलाखाली गेल्यावर विश्वास बसला. उत्कृष्ठ बांधकामाचा उत्तम नमुना म्हणजे हा शिवाजी पूल आहे. शक्ती आणि युक्तीसाठी ग्रेट शिवरायांना सलाम.

वेळेअभावी प्रतापगडाची धावती भेट कॅन्सल केल्याने मी मनोमन खर तर नाराज झाले होते.  परंतु चेक कोस्टच्या थांब्यावर दुसऱ्या  बसमधले महान गायक आमच्या धावत्या भेटीला आले आणि दुसरी बस चालू झाल्याने आमच्याच बसमध्ये बसले त्यामुळे तालासुरात अंताक्षरी, जुगलबंदी, मग दम शेराज आणि मग नेहमीप्रमाणे हमरीतुमरी शिवाय मजाच नाही रे. असल्या संगीतमय वातावरणात प्रतापगडची धावती भेट मी कधी विसरले मला समजलेच नाही. त्यानंतर मॅप्रो गार्डनला १५ मिनिटांची भेट दिली आणि आमच्या प्रतीक दादाला शहर आणि जॉब बदलीचा छोटासा आईस क्रिमचा सेंड ऑफ दिला(अजून मोठा सेंड ऑफ बाकी आहे काळजी नसावी)  आणि आम्ही पुन्हा त्याच घाटमार्गे पुणेकडे रवाना झालो. लीडर्सचे उत्तम नियोजन, सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य, सर्वांचा वातावरण उत्तम ठेवण्यास सहभाग, या सर्वामुळे माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुपचा ८३ वा मधुमकरंदगड ट्रेक उत्तमरीत्या पार पडला. मंदार सर, राणे सर, अनिल सर, सर्पमित्र निकाळजे (रोहित मिसिंग )यांना मनापासून धन्यवाद. नवीन ट्रेकर्सचे स्वागत, सर्व फोटोग्राफर्सचे खूप खूप कौतुक. लिटिल चॅम्प्स कृष्णा आणि आदित्यचे कौतुक. माऊंटन एज ऍडव्हेंचर ट्रेक ग्रुप रॉक्स