Tuesday 14 June 2016

"पहिल्या पावसातला भन्नाट ट्रेक "


कोरीगड आणि ड्युक्स नोज ट्रेक
दिनांक- १२ जून २०१६
चढाई श्रेणी- मध्यम
ठिकाण- लोणावळा 

११ मार्च पासून ट्रेक नाही झाला त्यामुळे मी ट्रेक ची आणि पावसाची सोबतच वाट  पाहत होते आणि १२ जून ला एकदाचा ट्रेक चा दिवस उजाडला. आंनद तर खूप झाला होता ट्रेक ला जायचा परंतु ट्रेक च्या आधी मला काहीतरी दुखापत झालेली असतेच. हे काही नवीन नाही. यावेळी activa पायावर पाडून घेतली होती. पण मी गुढघ्यासाठी ट्रीटमेंट घेतली आणि ट्रेक ला जायचे ठरवले.पहिल्या पावसाच्या ट्रेक ची ओढ काही वेगळीच असते. पुण्यात पावसाची एक सर येवून गेली होतीच त्यामुळे लोणावळ्यात हलकासा दिलासा देणारा पाउस हा असणारच अशी अशा होती आम्हा सर्वांना. यावेळी पाण्याची उणीव खूपच जाणवते आहे. याविषयावर बोलावे तेव्हढे कमीच आहे. आमच्या ग्रुप ने कोरीगड आणि ड्युक्स नोज असा दोन गडांचा ट्रेक आयोजित केला.मी ऐकले होते की मध्यम चढाई श्रेणीतले हे गड आहेत.  मी स्वतः या गडांवर पहिल्यांदा जाणार होते त्यामुळे मला दोन गड काय नि मध्यम श्रेणीतले काय नि कठीण श्रेणीतले गड काय. "फोना"सोबत ट्रेक ला जाणे आणि "ट्रेक' चा निसर्गाचा फोटोग्राफीचा मनमुराद आनंद घेणे एव्हढेच कळते बरे. मग तिकडे १० ट्रेकर्स असो किंव्वा २० ट्रेकर्स असोत किंव्वा ५० ट्रेकर्स असोत.

आमची बस निगडीहून सकाळी ६:३० ला निगडीहून निघाली. यावेळी नवीन मेंबर दिसत होते. बस ने लोणावळ्याचा रस्ता  धरला. आम्ही तळेगावकरांना घेवून बस मध्ये बसलो आणि मनोज राणे खालीच राहिले होते. चुकून विसरलो होतो त्यांना. आले नंतर एका बाईक वर. उत्साहाच्या भरात होते असे कधी कधी. त्यांना घेवून श्रीफळ फोडून ग्रुप फोटो काढून बस कोरीगड च्या दिशेने निघाली. एक मिनिट वाया न घालवता आम्ही आमचा  गाण्याचा खजाना बाहेर काढला. नवीन लोकांनी सुद्धा आमच्या सुरात सूर मिसळला. आणि  मला जास्त आवडला ते प्रशांत भावसार चा मुलगा सुमित आणि विवेक रामायणे चा मुलगा कौस्तुभ यांनी अप्रतीम गाणी गायली. पटकन लोणावळा आले. काही अंतर गेल्यावर ते पावसाने दाटून आलेले ढग कोसळायला सुरुवात झाली. वाह काय वातावरण होते ते. तिथेच खाली उतरून नाचावेसे वाटत होते. आमची गाण्याची महफ़िल सुरूच होती त्यात.त्यात पावसाची भर पडली. माझं  लक्ष सगळं बाहेर होतं कारण कापसासारखे ढग दिसत होते मधेच पाउस पडत होता. थंडगार हवा सुटली होती. अतिशय रम्य आल्हाददायक  वातावरण झाले होते. मे महिन्याच्या उन्हाने हैराण झालेल्या जीवांना आता थोडावेळ का होईना दिलासा मिळाला होता. आम्ही ९ वाजता आंबवणे गावाच्या जवळ आमची बस लावली आणि पोह्याचा नास्ता करून लगेच चढाई सुरु केली. बारीक पाउस पडून सुखावीत होता.

कोरीगडाविषयी माहिती-मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे मावळ आहे,त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. कोरीगड समुद्र सपाटीपासून ३००० फुट उंचीवर आहे. निगडीपासून साधारण ४३-४५ किलोमीटर अंतरावर  हा गड आहे. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या  सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला 'कोरीगड',"कोराईगड' या नावानेही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला "शहागड" या नावानेही ओळखतात.

आम्ही आंबवणे गावाजवळून सकाळी ९ वाजता कोरीगड ची चढाई सुरु केली. गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. आम्ही आमची बस ज्या ठिकाणी थांबवली होती त्या ठिकाणाहून गडाला पूर्ण वळसा घालून जावे लागले.किमान २ कि. मि. अंतर चालून गेल्यावर गडाचा पायथा आला. परंतु जास्त पायऱ्या आहेत. ट्रेकर्सना पायऱ्या नको असतात त्याने अजून कंटाळा येतो. परंतु पर्याय नव्हता आम्ही चढाई सुरु केली. वाटेने वर येताना एक पाण्याचे टाके आणि श्री गणेश मंदिर लागते. या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य आहे परंतु हे पाणी पिताना मात्र त्यावरील वरचा थर बाजूला करावा. माकडे किवा इतर प्राणी सुद्धा हे पाणी पितात त्यांची लाळ त्यावर तरंगत असते त्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते ही मोलाची माहिती आम्हाला मंदार सरांनी दिली थांकू सर. आम्ही तिथे थांबून थोडी फोटोग्राफी केली. कारण इथून सहारा सिटीचा नजारा खूप छान दिसत होता. तो आम्ही सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात जास्त मजा येईल.

गणेशदरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. गडावर गेल्या-गेल्या जांभळे खायला मिळाली.

गडाला फेरा मारताना मंदार सरांच्या अंगात थोडावेळ "सैराट" आला होता. याड लागलं या गाण्यावर नाचायचा मनमुराद आनंद त्यांनी आणि प्रशांत भावसारचे कुटुंब यांनी घेतला.
गडाच्या माथ्यावरूनचालत असताना खाली सहारा सिटीचे अप्रतिम दृश्य मनमोहून घेत होते. असे वाटत होते तिथून च उडी मारून खाली लेक वर फिरत असलेल्या बोट चा राईड  घ्यावा. सहारा सिटीच्या वर एक छोटे विमान फिरत होते. खेळण्यातील विमान फिरावे तसा तो खेळत होता जो कोणी होता तो. "सहारा सिटी" हे "लवासा सीटी" सारखे सुंदर भासले परंतु बऱ्याच ठिकाणी झाडे न तोडता, निसर्गाला हानी न पोहोचवता तिथे सहारा सिटी उभे केलेय असे दिसते. वरून गर्द झाडी दिसत होती. मी त्या छबी टिपून घेतल्या आहेत.
 
त्याठिकाणी आम्ही भगव्या सोबत आणि फोना ग्रुप च्या ब्यानर सोबत फोटो काढले आणि मंदार सरांनी आमची वरात काढली. "अरे चला रे दुसरा गड करायचा आहे अजून." गडाचा फेरा पूर्ण झाला त्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे तिथे आम्ही थोडावेळ थांबलो.


त्या मंदिरात छोटे कॅन्टीन होते तिथे भजी, म्यागी बनवणारे एक जोडपे होते.आमच्या आधीच आलेल्या ठाणावाला madam नी एक भजी प्लेट घेतली होती ती मस्त होती झणझणीत लगेच फस्त केली. गडावर जेवणाची सोय नाही आपण आपली सोय करावी.पठारावर  कोराईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी लक्ष्मी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे.


याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत.परंतु ती फक्त पावसाच्या पाण्यात भरतात आणि काही महिनेच त्यात पाणी असते हे पाणी पिण्यायोग्य नाही.  गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो.. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठारच आहे. गडाची तटबंदी साधारणत:… दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. आम्ही फेरा घातला. आणि ११ वाजता गड उतरायला सुरुवात केली कारण आम्हाला अजून ड्युक्सनोजगड सुद्धा करायचा होता. कोरीगड उतरताना आवाजवाला फोटो काढला आणि निघालो. अर्ध्या तासात गड उतरलो आणि बसमध्ये बसलो.

धुव्वाधार पाउस सुरु झाला होता. आम्ही ड्युक्स नोज कडे निघालो. मधेच वाटेत आम्हाला टायगर point लागला तिथे आम्ही १० मिनिटे थांबलो. पाउस छान चालू होता परंतु गर्दी ही तेव्हढीच आणि पर्यटकांनी त्या ठिकाणी एवढा कचरा घाण करून ठेवली आहे की  विचारू नका. आम्ही गडावर जातो तेव्हा चोकलेटस चे कव्हर सुधा टाकत नाही. उलट तिथे काही कचरा असेल तो आम्ही उचलून आणतो. त्या ठिकाणी एका छोट्या झाडावर हिरव्या रंगाचा विषारी साप होता तो आमच्या ग्रुप चे सर्पमित्र संजय निकाळजे यांनी तिथून पडकून पुन्हा जंगलात सोडून दिला. संजय निकाळजे यांनी २०,००० हून जास्त साप पकडून सुखरूप पणे जंगलात सोडून दिले आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे.

टायगर पोईंट च्या इथून निघाल्यावर कुरवंडे गावात आलो.कुरवंडे  गावाच्या मध्यभागी श्री कोराई मारुतीदेव प्रसन्न प्रतिष्ठान चे एक मंदिर आहे. तिथे आमची बस थांबली. पोटात कावळे ओरडत होते आणि एक गड देखिल अजून बाकी होता. पावूस पडत असल्याने आम्ही त्या मंदिरात थांबून जेवण केले. जेवण केले आणि आमचा छोटा मित्र सुमित त्याचे बूट हरवले होते. तिथे काम करणारी २ मुले खेळत होती त्यांचा पिच्छा पुरवला आम्ही. त्यांनीच घेतले होते ते बूट. मिळवले एकदाचे बूट बिचाऱ्या सुमित चे. नाहीतर सुमित सोबत आईबाबाचे चेहरे सुद्धा रडवेले झाले होते.जेवण केल्याकेल्या लगेच आम्ही ड्युक्स नोज कडे निघालो.  २ कि.मी अंतर चालून गेल्यावर चढाई सुरु झाली.
ड्युक्स नोज हा समुद्रसपाटीपासून २००० फुट उंचीवर आहे. हा गड नाकाच्या आकाराचा आहे म्हणून त्याला ड्युक्स नोज हे नाव आहे. नागफणी point सुधा म्हणतात याला. हा अतिशय सुंदर असा ट्रेकिंग गड आहे. मी मुंबई ला जाताना कायम याचा दुरून फोटो काढत असे. प्रत्यक्ष इथे कधी येईन असे वाटले नाही मला. परंतु आज मी खराखुरा गड चढत होते यावर माझाच विश्वास बसत नव्हता. इथे जवळच आय. एन. आय. शिवाजी ह्या संस्थेचा.मोठ्ठा आणि सुन्दर परिसर आहे. गड छोटा असला तरी तसा चढ भरपूर आहे. परंतु जर हा चढ चढून स्वर्ग दिसणार असला तर कोणाला नकोय. मी तर या स्वर्गरूपी निसर्गाच्या छब्या टिपण्यासाठीच जात असते. ३ वाजता आम्ही गडावर पोहोचलो. तिथे एक छोटे शंकराचे छान मंदिर दिसले. आणि आजूबाजूला खरोखर स्वर्ग दिसत होता. ते पांढरे शुभ्र कापसासारखे ढग डोळ्यासमोरून धावत होते. कधी आम्हाला स्पर्श करून जात होते. दूरवर माझा तो एक्सप्रेस हायवे दिसत होता.

ट्रेन चा बोगदा दिसत होता. काय आणि कसं, किती वर्णन करू मी. गडाचा पसारा फार मोठ्ठा नाही. लावलेले बार जरा सैल झालेले आहेत. आम्ही त्या बारच्याही पलीकडे बसलो होतो स्नेहल खोल्लम आणि मी. मी  भरपूर फोटोग्राफी केली. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. दूर एक धबधबा आत्ताच सुरु झालेला उठून दिसत होता. जय थरवळ आमच्या सोबत होता गमतीदार पोर आहे हो. म्हणतो मी पण माणूस आहे माझे पण फोटो आले पाहिजेत की राव.  काही ट्रेकर्स यायचे होते ते आले. सगळे ट्रेकर्स आम्ही एक तासभर ड्युक्स नोज् वर होतो. त्या ठिकाणी मंदार सरांनी गडाचा इतिहास थोडक्यात सांगितला आणि नव्या जुन्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली. त्यांनतर ४ वाजता ड्युक्स नोज् वरून उतरताना डचेस नोज आहे तिथे ही एक फेरी मारली तिथून दिसणारा ड्युक्स नोज गड काय भयानक दिसत होता आणि या भयानक दिसणाऱ्या भिंतीवरून ट्रेकर्स रयापलिंग करतात. त्यात आमचे मंदार थरवळ, विवेक रामायणे रोहित सर आणि मनोज सर आणि बरेच लोक देखील आहेत बरे.


एकेक ग्रेट माणूस आहे आमच्या फोना ग्रुप मध्ये. आम्ही काही ट्रेकर्स अर्ध्या तासात गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सगळे येईस्तोवर पाउस आला. आम्ही आता मात्र खूप थकलो होतो. ५ वाजता ट्रेक संपवून निघालो. एव्हढ्या लवकर निघालो असा हा पहिला ट्रेक असावा. बसमध्ये राहुलने आणलेले खमंग खारे शेंगदाणे आणि बाहेर पाउस पडत होता त्यांने खूप मजा आली. लोणावळ्यात ट्रेन च्या फाटकाजवळ जरा वेळ गेला परंतु आम्ही सुरु केलेल्या अंताक्षरी ने आणि मनोज राणे सरांनी विचारलेल्या कोड्यांनी रमलो आम्ही. मध्ये थांबून एक गरमागरम चहा घेतला आणि घरचा रस्ता धरला बसने परंतु माझे मन अजून गडावरच होते. ट्रेक दरम्यान मंदार सर आणि मनोज राणे सर यांनी त्यांच्या ऑफिस प्रमोशन ची छोटी स्वीट पार्टी दिली. बालुशाही आणि मोतीचूरचे लाडू खूपच चवदार होते तेपाणी आले ना  न आलेल्या लोकांनो ?? धन्यवाद मंदार सर आणि राणे सर. पुन्हा पुन्हा प्रमोशन होवो आणि पुन्हा पुन्हा पार्टी मिळो आम्हा गरीब ट्रेकर्स ना. यावेळी कोणीही धडपडले,पडले नाही हे महत्वाचे. चहा पिताना मात्र छान गाणे गाणाऱ्या कौस्तुभ ला चहाने भाजवले खूप रडला बिचारा. तरीही त्याने खूपच छान गाणे गायले याचे कौतुक वाटते सगळ्यांना. अशाप्रकारे आमचा हा ट्रेक छान, गमतीदार आणि यशस्वी असा ट्रेक झाला. सुफळ संपूर्ण…… सगळ्यांचे आभार.