Monday 12 December 2016

"वर्षाअखेरचा धमाका"

चावंडगड आणि शिवनेरी गड ट्रेक

शिवनेरीगड उंची-३५०० फूट
दुर्ग प्रकार- गिरिदुर्ग
चढाई श्रेणी- मध्यम
ठिकाण- पुणे जिल्हा, महाराष्ट्र
डोंगररांग   - नाणेघाट
दिनांक- ११ डिसेंबर २०१६ 

चावंडगड आणि ‘शिवनेरीगड असे एकत्रित दोन्ही किल्ले एकाच दिवशी करायचे असल्याने मी माझ्या लेखाच्या सुरुवातीला दोन्ही किल्ल्यांची माहिती देणार आणि मग ट्रेकविषयी लिहिणार आहे.
चावंड” - “चावंड” हा किल्ला पुणे पासून  तासाच्या तर जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.गडावर जेवणाची सोय नाही मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय- गडावर अनेक पाण्याची टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे. चावंड गावापासून गडावरजायला एक तास लागतो.

चावंड किल्ल्याचा इतिहास” 
पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन,चावंडहडसर आणि शिवनेरी. चामुंडगडहरिश्चंद्रगडमहिषगड आणि हडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. त्यापैकी चावंड हा एक गड होय. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंडचाऊंडचावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. 

जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन. असे इतिहासात म्हटले आहे. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास लोकसाहित्यात नक्की सापडतो.


शिवनेरी किल्ला- पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती  यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. 

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास-‘जीर्णनगर’,‘जुन्नेरम्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरवल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इ.स.अ १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले.शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्धा येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरीत करण्यात आला.
१६ ऑक्टोबर २०१६ चा कलावंतीण गड ट्रेक केला तो अजून डोळ्यासमोर येतोय कारण तो ट्रेक कठीण होता परंतु भन्नाट होता.  त्यानंतर नोव्हेंबर  २०१६ चा हरिशचंद्र गड ट्रेक काही कारणाने नाही करता आला. तसा हरिश्चंद्र गड ट्रेक मी दोनदा केला आहे. ११ डिसेंबर २०१६ चा चावंड-शिवनेरी हा फोना चा ७० वा ट्रेक आणि या वर्षीचा शेवटचा ट्रेक होता.

पुण्याहून सकाळी ७ ला निघून मध्ये एका ठिकाणी नास्ता करून निघालेलो आम्ही १०-४५ ला चावंड गावाजवळ बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. पाषाण पाहून पाळीच्या सरसगड ची आठवण झाली.चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. गड चढत असताना खाली चावंडवाडी गाव आणि समोर विस्तीर्ण परंतु अतिशय सुंदर दिसणारा माणिकडोह सारखा सारखा त्याचे फोटो काढण्यास मजबूर करत होता. तसेच हे चावंड गाव मला एखाद्या चित्राप्रमाणे भासत होते.


माणिकडोह च्या पाण्याच्या पलीकडे कितीतरी गड दिमाखात उभे असलेले दिसत होते. गडाच्या काही  पायऱ्या चढून गेल्यावर कोणीतरी  या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोत्या तोफेची नळी जमिनीत पुरली आहे असे दिसले फोटो काढायचा राहून गेला माझ्याकडून.  साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ अडीच फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते.


येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत दुपारची वेळ असूनही गडाच्या पश्चिम बाजूने आम्ही चढत असल्याने उन्हाचा तडाखा एवढा जाणवत नव्हता. नवीन मेम्बर्स ना थोडासा कठीण वाटत होता हा गड परंतु त्यांनीदेखील ट्रेक पूर्ण केला. खर तर इथे रॉक प्याच चा थरार होता मस्तपैकी परंतु सध्या तिथे बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर काही ठिकाणी लोखंडी रेलिंग लावले आहे. त्यामुळे पटकन १ तासात  चावंड गडावर पोहोचलो.


गेल्या गेल्या गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर जीवधनगड च्या कल्याण दरवाज्याची आठवण झाली मागच्या वर्षी याच दरम्यान अगदी तशीच ठेवण. जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. सध्या इथे खूप गवत वाढलेले आहे.चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे.
मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८  पाण्याची टाकी आहेत.  ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे तिथे दगड रचून ठेवलेले आढळतात. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे.
जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात.
इथून आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो.म्हणजेच गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे.यावरून असे दिसते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, किमान त्यांना भेट द्यायला एखादा ट्रेक तर नक्कीच करू शकतो. इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून आपल्याला अनेक दंतकथा ऐकायला मिळतात.





बालेकिल्यावर प्रशस्त दिसणारा महिणकडोह डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून आणि चावंड देवीच्या मंदिराजवळ फोना ब्यानर फोटो काढून आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि गडाच्या उत्तरेला असलेल्या ६-७ एकत्रित असलेल्या आणि पाण्याने पूर्ण भरलेल्या पाण्याच्या टाक्यांजवळ खूप सारी फोटोग्राफी करून चावंडगड उतरण्यास सुरुवात केली कारण शिवनेरीगडदेखील आम्हाला पूर्ण करायचा होता.
गडाच्या पायथ्याशी येऊन एका झाडाखाली आम्ही दुपारी जेवण केले तिथेच नव्या जुन्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली आणि शिवनेरी कडे रवाना झालो. खरं तर इतर किल्ल्यांवर ट्रेक ला जाताना शिवनेरी बरेचदा वाटेत दिसायचाच मला आणि जणू खुणावून मनातून म्हणत असायचा की जयू तू जवळून जा पण माझ्याकडे येऊ नकोस हा. आज मात्र मी त्याच्याकडे निघाले होते. मनोमन मीच जास्त खुश होते. कारण शिवनेरी म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. आम्ही ट्रेकर्स असल्याने गडावर साखळी मार्गाने जाणार होतो परंतु संध्याकाळ होत आल्याने आम्ही मुख्य दरवाज्याने च निघालो. रविवार असल्याने शाळेच्या खूप सहली आल्या होत्या त्यामुळे एक कि.मी. चा रास्ता वाहनाने खचून भरला होता आणि वर्दळ देखील प्रचंड होती. आम्ही त्यातून वाट काढत सूर्यास्तापूर्वी शिवनेरी गडावर पोहोचून शिवाजी राजेंच्या पाळण्याचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले. शिवजन्मस्थळाची वस्तू अतिशय सुंदर रित्या बांधली आहे. आणि जतण केली आहे तसेच पाण्याचे बदामी तळे,कडेलोट पॉईंट,अंबरखाना साखळी मार्गाच्या बाजूने असलेली कमान, जिजाऊ आणि शिवरायांचे मंदिर याचे दर्शन घेऊन आम्ही गडावरून निघालो.


गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत,शिवाई देवीचे मंदिर आहे,अतिशय सुंदर अशी बाग आहे. आणि अजून काही ठिकाणी बांधकाम सुरु असलेले दिसले. एकेक कमानीतून जातांना राजेंचा इतिहास आठवला की अभिमानाने उर भरून येतोच येतो. इतकी वर्दळ असून शिवनेरी गाद मला स्वच्छ दिसला.गडावरून खाली जी शेती केली होती ती खूप सुंदर अशी दिसत होती. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला शिवनेरी वर सूर्यास्त मिळाला.

त्यावेळी तो सूर्यअतिशय सुंदर सोन्याचा गोळा भासत होता. अंधार होत आला आणि एकीकडे चंद्रदेखील उगवला होता त्यामुळे आम्ही त्या थोड्या उजेडात आमच्या बसपाशी आलो आणि तिथे चहा पिऊन घराकडे रवाना झालो. चहा पिताना एका मेम्बरने आणलेले बाजरीचे कुरकुरे छान लक्षात राहिलेत. ७ वाजता घराकडे बस निघाली परंतु सकाळी जाताना अंताक्षरी झालीच नाही इतके दमलेले असतानाही आमच्यातले छोटे ट्रेकर्स सुमित, मिहीर आणि अद्वैत यांनी बस मध्ये पोवाडे,रामरक्षा मराठी हिंदी अंताक्षरी अतिशय उत्तम रित्या सादर केले. तसेच सर्वच जुन्या-नवीन मेम्बर्स ने अंताक्षरी खेळून खूप छान धमाल आणली. यावेळी ट्रेकसाठी वेळेवर काही लोक कॅन्सल झाल्याने कमी लोक होते तरीही यावेळी चावंड-शिवनेरी ट्रेक हा "छोटा पॅकेट बडा धमका झाला." आणि छोट्या ट्रेकर्संनी त्यात  चार चाँद लगा दिये.  नवीन मेम्बर प्रकाश ने इनोवेटिव्ह,हटके  फोटोग्राफी केली ती सगळ्यांनाच आवडली. धन्यवाद मंदार सर, राणे सर,आणि२० हजाराहून जास्त साप पकडून सुरक्षितपणे त्या सापांना जंगलात सोडणारे सर्पमित्र निकाळजे काका.  ट्रेक ला आलेले सुशील-सुरेखा,प्रशांत-रेखा, दीक्षित सर, संकेत, हर्षद, निलेश,कल्याणी,सुमित, मिहीर,अद्वैत आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या ट्रेक साठी अचूक मार्ग दाखवणारे गणेश गोसावी यांना खास धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ट्रेक उत्तम आणि सुरक्षितपाणे  पार पडला.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी इतर व्यायामसोबत महिन्यातून एखादा ट्रेक आणि भटकंती हा सर्वात उत्तम उपाय आहे. कोणतीही गोष्ट सुरु करायला वयाचे बंधन नसते.आपल्या पुण्यातलेच गोपाळ लेले यांनी वयाच्या ६१व्या वर्षी पहिला ट्रेक केला आणि त्यांनतर देखील ते ट्रेक करत राहिले. ट्रेकिंग या विषयवार त्यांनी मोट्ठे पुस्तक देखील लिहिले आहे.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता आपण तर खूप लहान आहोत आणि खूप ट्रेक करू शकतो असे समजायचे आणि ट्रेक सुरु करायचा. मी तरी कुठे लहानपणापासून ट्रेकिंग करतेय आटा २ वर्षे झाली ट्रेक सुरु केला आणि मला माझ्या आरोग्यास खूप सकारात्मक निकाल मिळाला. मी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक करतेच. महिन्यातला एक ट्रेक हा पुढल्या महिन्याच्या ट्रेक पर्यंत शरीराची आणि मनाची शक्ती वाढवतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नसतो तो आवर्जून काढावा लागतो. मित्र हो..! चला आपला सह्याद्री अतिशय प्रेमात पडायला लावणारा आहे. ट्रेक जरूर करा परंतु सुरक्षितपणे करा.  गड किल्ल्यांची कोणतीही नासधूस न करता ट्रेक करुयात आणि गड किल्ले स्वच्छ ठेवूयात. नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धन करूयात.