Thursday 22 June 2017

ट्रेकर

खरंच 'ट्रेकर्स' म्हणजे जगाहून वेगळी पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात. हाताची नखे वाढवायची हौस असली तरी त्यातली एक दोन नखे ट्रेकमध्ये कायम तुटलेली असणारी.
मान आणि कानाच्या पाळ्याच काय तर चेहरा कायम टॅन झालेला असणारी मी  कारण ट्रेक कारण गडावरचं कडक ऊन खाल्ल्याशिवाय ट्रेक केल्याचा आंनद कसा मिळणार या मताची असणारी मी.
आम्ही मुली असल्याने पावडर फेसक्रिम याचा संबंध थोडाफार आलाच पण भपका नसणारी.
मला तर अर्थ्ररायटिस, मणक्यात ग्याप, मस्क्युलर पेन असे अनेक आजार आहेत त्यामुळे सुरुवातीला ट्रेक ला जाताना डॉक्टर अडवायचे. आता डॉक्टर स्वतःच म्हणतात ट्रेकला गेलात की तुम्ही तुमची सगळी दुखणी विसरता जावा जावा. म्हणजे डॉक्टर चा सल्ला थोडक्यात धुडकावणारीच.
समारंभामध्ये सोबर साडी,सोबर दागिने घालून जाणारी आणि बेंजो च्या तालावर दोन पावले थिरकवणारी मी आणि सॅक पाठीवर टाकून ट्रॅकपॅन्ट, टोपी घालून  डोंगर चढणारी मी घरातल्यांना आणि सगळ्यांनाच आवडते तरीही ट्रेकर म्हणून मिळालेली पाठीवरची थाप मला मोलाची वाटणारी मी. 
खरेदी करताना कायम एखादा ती शर्ट/टॉप,एखादी मळखाऊ पॅंट ट्रेकसाठी  जास्त उपयुक्त कशी पडेल या निकषावरच खरेदी करते. दुकानदार एकतर वैतागतो किंवा मनातल्या मनात हसतो. ट्रेकर्स ऐसे ही होते है.
ट्रेकसाठी वेगळे तीन बुटाचे जोड बाळगणारी मी, किंबहुना खाण्यापिण्यावर पैसे घालवण्याऐवजी त्याच पैशात ट्रेकसाठी चांगला लाईटवेट बुटाचा जोड, एखादी टोपी किंवा जॅकेट घेता येईल का हे पाहणारी मी.
वुडलँड चे ४ हजाराचे बूट ग्रीप गेल्यावर गडावर आपट्या खाल्ल्यावर ऍक्शन आणि ट्रेकर शूज चांगले आहेत  हे मानणारी मी.
घेतानाच शर्ट फुल बाह्यांचे पाहून घेणारी आणि टॉप शिवतानाच फुल बाहीचा शिवणारी मी. किंवा एखादे लाईट वेट जॅकेट कायम कमरेला अडकवणारी मी. ढगळ ट्रॅक पॅन्ट घालून मग गड उतरताना मस्त गुढग्यापर्यंत घेणारी मी. "अरे बस झाले आता झाली त्या ट्रॅक पॅन्टची थ्री फ़ोर्थ' अशी मंदार सरांची बोलणी खाणारी मी.
२-३ चष्म्याच्या फ्रेम्स फायबरच्याच बाळगणारी मी. फोटो च्या नादात कुठे चष्मा विसरले तर कायम गाडीमध्ये स्पेयर चष्मा ठेवणारी मी,
प्रवासात मात्र बॅगा माझ्या कायम दोन असतात सगळ्यांसाठी भरपूर खाऊंनी भरलेल्या आणि स्पेअर कपडे कायम बाळगणारी मी मग तो वन डे ट्रेक का असेना. परंतु गडावर मात्र छोटी आणि कमी वजनाची सॅक नेणारी मी.
बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे जरी मानत नसले तरी स्वतःजवळ शहरी सरबत (tang) असताना गडावरच्या लहान सरबत वाल्या मुलांना मदत म्हणून सरबत विकत घेणारी मी.
मिळेल ते जेवण आणि जागा किती सही आहे हे मानणारी एकदा घराबाहेर पडले की काहीही साधे चालवून घेणारी मी.
कुणीही सोबत असले तरी कितीही वेळा गड  पहिला तरी पुन्हा पुन्हा फिरणारी मी.
ट्रेकर्स चा थकवा घालवण्यासाठी नवीन ट्रेकर्स ना उत्साहित करण्यासाठी कितीही ठाकले तरी बसमध्ये जाता येता न झोपता अन्ताक्षरीचा धिंगाणा घालणारी मी.
गडकिल्ल्यांचे माहितीचे व्हिडीओज दाखवीत असलेले चॅनेल चालू कर असे मैत्रिणीने भावाने सुचवल्यावर रिमोटवरून भांडणारी मी,
शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या गेट-टू-गेदर साठी पुण्याहून मुंबईला मुलीला भावाला घेऊन ट्रेक ला जाणारी आणि आईवडिलांचा ओरडा खात वज्रेश्वरीजवळच्या घोटगावचा गुमतारा सर करणारी मी.
मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे जायला वेळ नाही आणि ट्रेक ला कशी जाते या कारणावरून सगळ्यांचाच ओरडा खाणारी मी.
गडावरचे आणि ४-५ शहरातले सुद्धा रस्ते बऱ्यापैकी माहित असलेली आणि कालवणापासून मालवण घरात बनवता येणारी आणि पालथं घालणारी मी.
शहरात activa वर हेल्मेट कमी वापरणारी आणि कधीतरी सिग्नल तोडणारी, खूप गडबडीत असताना नेमकी ट्राफिक पोलिसाकडून पकडली जाणारी मी परंतु पळून न जाता चूक झाली म्हणून पावती फाडून दंड भरणारी मी.
गाडीच्या अनेक प्रकारच्या किचेन बाळगणारी मी संगीताची आवड म्हणून तबला असलेली किचेन अडकवणारी मी.
चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणारी आणि दुसर्यालाही रॅपर खिशातच ठेवून घरातल्या डस्टबिन मधेच टाकणारी आणि टाकायला लावणारी मी.
हो उघडे नळ स्वतःच बंद करणारी मी,
मोबाइल घेतानाच जिपीएस वालाच घेणारी मी आणि रेंज असणारेच सिमकार्ड बाळगणारी मी आणि खास उत्तम फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेणारी मी.
रोज नवनवीन ठिकाणे शोधणारी मी. ट्रेकिंग चा ब्लॉग लिहून त्याच्या पोस्ट फेसबुकला टाकून त्याचा स्वतः  आंनद घेणारी आणि दुसऱ्याला आंनद देणारी मी आणि दुसरा ट्रेक येईस्तोवर त्याचे फोटोज अपलोड करून मानसोक्त आनंद घेणारी-देणारी मी.
दिवसातून कितीदा ट्रेकचाच विषय बोलणारी. फोनवर कोणी ट्रेकविषयी विचारल्यावर भरभरून बोलणारी,माहिती देणारी मी.
आपल्यासोबत ट्रेकसाठी चांगले ट्रेकर्स जमा करणारी मी.
रविवारच्या ट्रेकनंतर सोमवारी भयानक पाय दुखत असताना एका दिवसात फोटोज अपलोड करून अर्ध्या दिवसात ब्लॉग लिहून शेअर करणारी मी.
परदेशातील मैत्रिणींना ट्रेकचा ब्लॉग पाठवून त्यांच्यातही ट्रेकची आवड निर्माण करणारी मी. अनोळखी व्यक्तीला दादा, काका, मित्र म्हणायला न लाजणारी मी.
देवाला कमी जाणारी परंतु ट्रेक कधीही न चुकवणारी मी.
रायगडावर जाण्याचा योग अजून आला नाही अशी अभागी मी.
सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी मी.
गडकिल्ला बस मधून पहिला तरी लागेचच फोटो क्लिक करून माहिती विचारणारी आणि अभिमान बाळगणारी मी.
गडावर गेल्यावर  तिथून दिसणाऱ्या गडाविषयी चौकशी करून तिथे जाण्याची इच्छा बाळगणारी मी.
ट्रेकिंग च्या प्रत्येक वळणावर फोटो काढणारी तरीही आघाडीवर असणारी मी.
ट्रेक ला जाताना बजेट चा विचार न करणारी मी.
ब्लॉग मधून ट्रेकिंग चा प्रसार करणारी आणि ट्रेकिंग बद्दल आवड निर्माण करणारी मी.
काय माहिती आम्ही खरे ट्रेकर आहोत की नाही ते. किती गुण जुळतील आणि किती गुण  मिळतील यासाठी आम्हा ट्रेकरला..?

Monday 19 June 2017

"रानपाखरं"


"कोथळीगड” ट्रेक
जिल्हा - रायगड,
श्रेणी - मध्यम,
उंची - ३१०० फूट, 
दि. - १८ जून २०१७

माझ्या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आंबिवली गावापासून ३ कि. मी. अंतरावर कोथळीगड आहे. कोथळीगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट इतकी आहे. 
कोथळीगडचा इतिहास थोडक्यात-शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार दारुगोळा जवळील गावातून मिळविण्याकरीत गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी मांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक दारुगोळा घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला व त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला ज्यात तो व त्याचे सैन्य मारले गेले. कर्जतहून खेड-कडूस कडे जाणाऱ्या कोलिंबा व सावट घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.
दिनांक १८ जून २०१७ चा 'फोना' चा ७३ वा आणि पावसातील पहिला ट्रेक आयोजित केला. पुण्यापासून कोथळीगड सुमारे ११७ कि. मी . अंतरावर आहे. इथे बसने पोहोचण्यास किमान अडीच ते तीन तास लागतात. १८ जून ला सकाळी ६:१५ वाजता आमची बस निगडीहून तळेगाव, लोणावळा, खोपोली मार्गे ३ तासात म्हणजे ९:१५ आंबिवली गावाजवळ पोहोचली. अर्थात बसमध्येच इडली चा नास्ता करून आणि मध्ये एका ठिकाणी थांबून चहा घेतच. खोपोली सोडल्यावर कर्जत फाट्यापासून उजव्या हाताला वळून ७-८ कि. मी. अंतरावर आंबिवली हे गाव आहे. तिथून ३ कि.मी. अंतरावर कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ हे गाव आहे. बस आंबिवली गावच्या स्टॉप वर लावून लीडर ने ट्रेक विषयी सूचना देऊन लगेच९:३० ला  ट्रेक ला सुरुवात केली. दीड कि. मी. अंतर चालून गेल्यावर कोथळीगडचा नजारा डोळ्यांना सुखावणारा होता. कारण बस मधून जाताना फक्त एका वळणावर च कोथळीगड क्षणभर दिसला त्यानंतर त्याच्या जवळ गेल्यावरच त्याने खरे दर्शन दिले. एकीकडे प्रचंड खोल दरी तर एकीकडे आभाळाला भिडणारा कोथळीगड असे ते सुंदर दृश्य होते.फोटो काढताना खूप सांभाळून काढावे लागतात कारण जरा पाय घसरला तर थेट दरी तुम्हाला कवेत घ्यायला तयारच असते. लिंबू सरबत पिऊन पुन्हा गडाची वाट धरली पुढे दीड कि. मी. चा चढाच्या कच्या रस्त्याने आम्ही पेठ गावात पोहोचलो. जाताना सगळ्यांसोबत माझी देखील दमछाक झालीच होती. कारण एप्रिल च्या संधन व्हॅलीच्या ट्रेक नंतर १ महिन्याच्या गॅप नंतर चा हा माझा ट्रेक होता. पहिल्यांदा ट्रेक ला येणारे मेम्बर्स केव्हा एकदाचा गड येतो याचीच वाट पाहत होते. गडाच्या पायथ्याशी पेठ गावात सामानाची ने-आण  करण्यासाठी दोन चाकी गाडी आणि बैलगाडीचा वापर होताना दिसला.पेठ गावाजवळ गेल्यावर कोथळीगड आणि पायथ्याशी पेठ गाव अतिशय सुंदर दिसत होते.
पेठ हे गाव २०-२५ कौलारू घरांचेच आहे. मुख्य व्यवसाय भातशेती,विजेची, पाण्याची सोय असलेले. ५वी-६ वी पर्यंत शाळा आहे. ऊन म्हणते मी. त्यामुळे  घामाने जणू आम्ही न्हाऊनच निघालो होतो.  पावसाचे दिवस असून वरून राजाने अजून तरी आम्हाला सुखावले नव्हते. काहीजणांचे पाणी संपत आले होते. आम्ही गावातून घरामधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुन्हा गड चढाईस सुरुवात केली. काही ठिकाणी भात पेरणी केलेली दिसली.१२ चे ऊन होते आणि गड चढण्याची मजा आत्ता तर खरी होती. मधेच गावातील लहान मुले पिकलेले गावरान आंबे घेऊन विकताना  दिसली तसेच गावातील स्त्रिया आणि पुरुष लिंबू -सरबत विकताना दिसली. तेवढाच ट्रेकर्सना थंडाई आणि तिथल्या शेती करणारी लोकांना पोटापाण्याची सोय. आपण २०० रुपयाची कोक ची बाटली घेताना जराही विचार करीत नाही तर  मग १०-१५ रुपयांच्या नैसर्गिक लिंबू-सरबताला का विचार करावा. मी गड चढताना माझ्याकडे आपले शहरी सरबत (tang)असताना देखील २वेळा तरी लिंबू सरबत घेतले. आमच्या सोबत अजून २-४ ट्रेकिंग ग्रुप गड चढताना दिसले. चढाईची वाट खूप छोटी असल्याने अधून मधून दाटी होत होती. परंतु जस जसे उंचीवर जात होतो तसतसा जमिनीवरचा आणि आजूबाजूच्या डोंगररांगांचा,गावाचा नजारा अप्रतिम दिसत होता. आम्ही ६-७ ट्रेकर सगळ्यात पुढे पोहोचलो.
त्यात सगळ्यांच्या आधी पोहोचले ते श्री. संजय मोरे वय वर्षे ५५. त्यांचे सगळ्यांनी खूप कौतुक केले. गडावर पोहोचताच भैरोबाचे मंदिर आणि मोट्ठी गुहा दिसली. जर रात्रीचा ट्रेक असेल तर त्या गुहेत १०० पेक्षा अधिक लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. शिवाय अजून २-३ खोल्या वेगळ्या आहेत. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरले आहेत. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसले. बाकीचे ट्रेकर्स येईस्तोवर क्षणभर विश्रान्ती घेऊन आम्ही कोथळीगडाच्या माथ्यावर जावयास निघालो. कोथळीगडाचे वैशिष्टय हेच आहे की एका भव्य पाषाणाच्या आतून त्या पाषाणाचा कोथळा पाडून सुंदर पायऱ्या कोरल्या आहेत.म्हणूनच या गडाला कोथळीगड हे नाव असावे.  ते कोरीव काम पाहावे की पायऱ्या चढाव्यात की फोटोग्राफी करावी असा आपल्याला संभ्रम पडतो. कोरीव काम करणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अप्रतिम असा तो रस्ता बनवला आहे. शिवाय त्या दगडी जिन्यामध्ये व्हेंटिलेशन साठी मोठ मोठे होल देखील ठेवले आहेत शिवाय एकीकडे एक मोट्ठेच्या मोठे दार ही आहे.एखाद्याच्या काळजातून सपासप अनेक बाण जावेत  तसे आम्ही त्या पाषाणाच्या कोथळ्यातून एकाच वेळी अनेक ट्रेकर्स गडाच्या माथ्यावर जात होतो.  तो मोठ्ठा आणि सुंदर जिना पार केल्यावर जरा अवघड पॅच येतो तिथे थोडे सांभाळून गेलेलेच बरे. कारण कोथळीगडावर आधारासाठी कुठेही लोखंडी पट्ट्या,खांब लोखंडी रेलिंग असे लावलेले आढळले नाही. फक्त दगड आणि पाषाण हाच एकमेव तिथे आपला आधार आहे हे ट्रेकर्सच्या लक्षात असू द्यावे.



इतके शारीरिक श्रम घेऊन गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मनातील आंनद अवर्णनीय होता. परंतु आम्ही नुसती एक छोटी बॅग त्यात एक जेवणाचा डब्बा आणि प्यायचे पाणी घेऊन गड चढतो तर इतके दमतो. शिवकाळातील लोक त्यावेळी वजन सामान कसे चढत असावेत आणि कसे लढत असावेत हा विचार माझ्या मनात कायम येतो. गडावर पोहोचल्यावर लक्षात आले की वर एक पाण्याचे टाके आहे. २-३ झाडे आणि निवडुंग आणि छोटी झुडपे आहेत. एका बाजूला भीमाशंकर चे पठार, सिद्धगड, पदरगड, एका बाजूला दूर माणिकगड चंदेरी, प्रबळगड दिसतात. बाकी सगळे गड एकमेकाला जोडलेले सक्ख्या-चुलत भावांसारखे एका डोंगर रांगेत दिसतात. कोथळीगड मात्र मूळ डोंगररांगेतून तुटून बाजूला एकटा सावत्र भावासारखा बाजूला आढळतो.भीमाशंकरच्या पठारावर खूप साऱ्या पवनचक्क्या एका रांगेत सवाष्णी उभ्या असल्यासारख्या भासत होत्या. गडाच्या माथ्यावरच आम्ही दीड च्या सुमारास आपापले जेवणाचे डब्बे काढून छोटे छोटे ग्रुप करून ऊन सावलीच्या खेळात जेवण करून घेतले. कारण खूप गृप एकावेळी माथ्यावर पोहोचल्याने प्रत्येकासाठी तशी सावलीची जागा नव्हतीच शिवाय गडाच्या माथ्यावर जेवण करण्याचा आनंद काही आगळाच. 
गडावर दुपारी पाऊस नसला तरी थंडगार वारा अंगाला सुखवीत होता त्यावेळी या ओळी ओठांवर नक्की येत होत्या,
”भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली.. रानच्या पाखरांची रानात भेट झाली.” 
जेवण आटोपून भगव्यासहित एक गृप फोटो काढून परतीच्या उतराईच्या वाटेला निघालो. उतराई करतानाच अनुभव अजूनच वेगळा होता. कारण तोच आतून कोरलेला जिना आता पाण्यातील भोवऱ्यासारखा भासत होता. आम्ही एका भोवर्यातून सुरक्षित खाली उतरलो. गडमाथ्यावरून आम्हाला एक तोफ दिसली होती त्या तोफेजवळ गेल्याशिवाय आम्हाला राहवले नाही. त्या ठिकाणी अजून २ पाण्याची टाकी आहेत. तिथल्या एका पाण्याच्या टाकीत स्वच्छ पाणी होते तेच पाणी उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पेठ गावच्या विहिरी आटतात तेव्हा त्या विहीरीमध्ये पाईपने हे पाणी सोडले जाते आणि पिण्यासाठी वापरले जाते.  

आता या ठिकाणाहून कोथळीगड एका नरसाळ्याच्या आकाराचा भासत होता. इथे जरा वेगळ्याप्रकारची(innovative)फोटोग्राफी केली आणि ३च्या सुमारास गड उतरायला सुरुवात केली. कितीही ट्रेक केले तरी उतरताना माझे पाय भरून येतात. तरीही पावले सपासप आणि आपोआप वेगाने पडून आपण पळू लागतो. आणि आम्ही अक्षरशः पळत च होतो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही पेठ गावात आलो आणि बाकीच्या मेम्बर्सची वाट पाहत थोडी विश्रांती घेतली.आमच्या सोबत आमच्यातले काही मेंबर्स लग्न करून त्यांच्या पार्टनर ला सुद्धा ट्रेकिंग ला घेऊन आले होते. त्यांचे कौतुकच.




४:१५ च्या सुमारास आम्ही पेठ गाव सोडले आम्हाला ३ कि. मी. अंतर पार करायचे होते. आणि उन्हाने आणि दमट वातावरणाने हैराण झालो होतो. तितक्यात आजूबाजूच्या डोगर रांगा धूसर दिसू लागल्या. डावीकडे ऊन तर उजवीकडे पाऊस भरला होता. आम्ही सकाळपासून पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. वरून राजाला आमची कीव आली आणि त्याने आमच्यावर पावसाच्या सरींची हलकी बरसात सुरु केली. हवेत अचानक खूप गारवा आला आणि "दिल खुश हो गया." हलकी हलकी बारिश म्हणता म्हणता चांगला जोरदार पाऊस सुरु झाला हे चॉकलेटचे दुधाचे धबधबे सुरु झाले कारण कंसाच्या रस्त्यावर माती टाकली होती ती वाहून जात होती आणि चॉकलेटच्या नद्या वाहताहेत असे भासत होते. पाऊस पडल्याने एकीकडे पक्षांचा मंजुळ आवाज येत होता.
 आम्ही ७-८ बडबडे ट्रेकर्सनी ३ की. मी. चे अंतर केव्हा कापले आमचे आम्हालाच समजले नाही. आंबिवली गावाजवळ बस लावली होती त्या ठिकाणी येऊन एका ठिकाणी पोहा नास्ता आणि चहा ची सोय केली होती. ते खाऊन सूर्यास्ताच्या वेळी आम्ही परतीची वाट धरली आणि अन्ताक्षरीच्या तालावर रात्री ९:३० वाजता पुणे गाठले. अंताक्षरी किंग राणे सर यांच्या सोबत अविनाश याने देखील अंताक्षरी मध्ये खूप छान रंग भरले. काय गातोस अविनाश तू. "तुसी ग्रेट हो अविनाश." तू गाणे एकदम सुरात गायलेस.  गाण्याचा लईच खजिना आहे तुझ्याकडे.पाठीमागच्या सीट वरची मंडळी अन्ताक्षरीमध्ये "फाडलं हो तुम्ही".   
ट्रेक लिडर राणेसर, मंदारसर, सर्पमित्र निकाळजे सर, राहुल-आदित्य, विनोद-दीपिका, डॉ.श्रीकांत, अविनाश, सुरेखा, मृणालिनी-तिचे बाबा,भावना,हिरल,ऋतुजा, चेतन, प्रीतम,हर्षनी,संजय मोरे, निलेश,उत्तम खडप-फ्रेंड (उत्तम छायाचित्रण कौशल्य) मला नावे माहित नसलेल्या सर्व जुन्या-नवीन ट्रेकर्स चे अभिनंदन. बॅनर नसल्याने रोहित सर तुमची रागाने आठवण काढली. तसेच भाऊबली,(प्रतीक दादा)स्नेहल खोल्लम आणि "संधान व्हॅली ची न आलेली टीम" लोकहो खूप मिस केलात तुम्ही कोथळीगडचा पावसाळी-भन्नाट-तुफानी ट्रेक.  एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने आपला ट्रेक यशस्वी झाला. अश्या प्रकारे "फोना" ग्रुप चा १८ जून चा कोथळीगड ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला.