Monday 21 March 2016

"महासागरात भिंगरी"

महासागरात भिंगरी"


२१ मार्च हा दिवस केव्हाही विसरणार नाही.कारण मी आत्ताच लिहिलेल्या "ध्यास के२एस चा" या माझ्या ब्लॉग चे आर्टिकल दैनिक महासागर या बातमीपत्रात छापून आले होते. पालघरचे श्री. संतोष पाटील यांनी मला ही बातमी  whats app च्या ग्रुप ला दिली.खरं तर आधी माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. संतोष पाटील यांनी मला बातमी आलेल्या बातमीपत्राच्या कात्रणाचा फोटो पाठवला होता परंतु मला काहीही सुचत नव्हते.  सगळ्यात आधी मी माझ्या घरच्यांना ही बातमी सांगितली आणि त्यानंतर माझ्या मित्रपरिवाराला whats app वरून  पाठविण्यास सुरुवात केली. २-३ ग्रुप वर टाकली. हा शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण मी ब्लॉग लिहिण्यास सुरु करून एक वर्ष झाले. परंतु गेल्या २-३ महिन्यांपासून ब्लॉग लवकर लिहा madam असा वाचकांचा आग्रह येवू लागला. आणि मलाही ब्लॉग लिहिणे आता बऱ्यापैकी जमू लागलेय असे वाटू लागले आहे. मला स्वतःला ब्लॉग लिहिण्याचे समाधान मिळत आहे.


 

    असेही मला मी आवडते तसेच इतरांनाही आवडते. काहींना माझे लिखाण आवडते, काहींना माझा सर्किट स्वभाव आवडतो. काहींना आवडत नाही. असो. आत्ताचा विषय आहे तो माझ्या आर्टिकल चा. तर मला स्वतःला माझे फोटोज आणि लिखाण माझ्या मित्रपरिवाराला शेयर करायला आवडते आणि कौतुक करवून घ्यायला ही आवडते. कारण सध्या ट्रेक आणि लिखाण ह्या दोनच माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत की मी त्या मनापासून करते.
     मी त्या कात्रणाचा एक चांगला फोटो नेटवर शोधू  लागले. मी घरातल्यांना कामाला लावले. जरा चिडचिड देखील केली मी. पण आजचा आनंद आजच साजरा करायला मला आवडते. तो आनंद  शिळा  झाल्यावर काही मजा नाही बुवा. आपला स्वभाव असाच आहे. संतोष पाटील यांनी स्वत:हून माझे आर्टिकल छापून आणले होते. आधी त्यांना मनापासून धन्यवाद दिले आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली एकीकडे फेसबुकवर तो कात्रणाचा फोटो अपलोड केला आणि शुभेच्छा घेवू लागले. एकीकडे शुभेच्छांचे मेसेजेस येतच होते. तनयाने माझी परवानगी घेवून ती बातमी फोनाग्रूप ला टाकली. सग्गळ्या ग्रुप मधून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
     मी त्या दिवशी जेवणच विसरले होते,तहानभूक हरपली माझी. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या परंतु एक व्यक्ती राहिली होती आणि मला मात्र तिचा प्रचंड राग आला होता. ती व्यक्ती बिझी असेल पण माझा मेसेज वाचला नाही अजुन याचे वाईट वाटले होते.  फोनवर बोलून आणि मेसेजेस ला रिप्लाय करून माझा हात दुखला होता पण तरीही आनंद किती होता हे मात्र विचारूच नका. माझे एफ बी खाते शुभेच्छांनी ओसंडून वाहत होते. घरातले सगळे झोपले तेव्हा मी माझे जेवण केले. त्यानंतर रात्रीचा १ वाजला तरीही मी जागीच होते.  काहीजण विचार करत असतील एव्हढा काय आरडओरडा करतेय ही? एव्हढे मोट्ठे काय काय झालेय असे आंनदाने नाचायला?
    संतोष पाटील यांना माझा ब्लॉग छापवासा वाटला आणि त्यांनी तो छापला देखील. हेच माझ्यासाठी खूप आहे. संतोष पाटील यांचे खूप आभार  त्यांनी जवळपास अर्धे पान माझ्या ब्लॉग विषयीच्या लेखाला दिले होते. केव्हढी मोठ्ठी शाबासकीची थाप आहे ही माझ्यासाठी ते मलाच ठावूक. माझ्या ब्लॉगला त्यांच्या दैनिक महासागर या बातमी पत्रात केव्हढे मोट्ठेस्थान दिले आहे याची जाणीव मला आहे. आणि ती बातमी वाचून बरीच मंडळी जे ट्रेक ला जात नाहीत ते  ट्रेक ला सुरुवात तरी करतील आणि पालघर या ठिकाणी माझे खूप नातेवाईक आहेत त्यांना भिंगरी चा ब्लॉग देखील आवडेल. 
माझा स्कूलमेट प्रदीप जाधव याने माझ्या या आर्टिकल वर एक टिपण्णी केली ती मला मनोमन आवडली. महासागरात भिंगरी. वाह क्या बात है प्रदीप जियो प्रदीप.
रात्रीचा एक वाजला मी आपली आंनदाने भुतासारखी जागीच कारण एका व्यक्तीचा रिप्लाय अजून आलाच नव्हता आणि त्या व्यक्तीशिवाय माझा आनंद पूर्ण कसा होणार काय सुजी, सूची,अंजी,अंजली, हेमा, उज्जू, गीतांजली, सुषमा, खरय ना
     कधी एकदाचा दिवस उजाडतो अस मला झाले होते.उजाडला एकदाचा २२ मार्च आणि मी जाग आल्या आल्या आधी माझे  एफ फी खाते तपासले  त्या व्यक्तीची कॉमेंट पाहिल्यावरच डोके शांत झाले. नाहीतर मग मी थयथयाटच केला असता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शालिनी होती.
तिला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. माझा ब्लॉग छापून येणे हे तिचे स्वप्न होते. नेमके दुसर्या दिवशी जागतिक कविता दिवस होता आणि माझा ब्लॉग ही  बातमीपत्रात छापून आल्याने तिने माझ्यावर एक सुंदर कविता केली. माझे गिफ्ट मला मिळाले. याहून वेगळा आनंद तो काय असतो. माझ्या सगळ्या मैत्रिणी अश्याच आहेत.  एकेकीवर स्पष्टीकरण देत बसले तर आख्खी बातमीपत्र कमी पडतील. शालिनीने माझ्यावर केलेली कविता खाली देत आहे.
     ही कविता मला आणि सगळ्यांनाच खूप आवडली. तुम्हालाही आवडेल. माझ्या एका फोटोवर तिने ती फेसबुकवर पोस्ट देखील केली. वाचकहो ज्यांना ती कविता वाचायला मिळाली नसेल त्याच्यासाठी खास इथे मी पोस्ट करत आहे.

पहाटेच्या सोनेरी किरणांनी जागी होणारी मुग्ध कळी तू…….
हवेच्या गार झुळुकीने हळूच स्वतःला उलगडणारी कोमल पाकळी तू
दरीखोरीतून घुमणारी डोंगर कपारी बागडणारी एक स्वच्छंद शीळ तू
खळखळून हसणारा झरा कधी तर कधी उदास दिसणारी संध्या सावली तू
भरभरून प्रेम देणारी पाउसधारा तू तर कधी लहरी मेघासारखी रंग बंदलणारी तू
कधी हसणारी तर कधी रडणारी, क्षणात बदलती भाव तू
कधी ग्रीष्म, कधी शिशिर तर कधी फुलून जाणारा वसंत तू
घरातल्या मेंबर बरोबरच आईवडील, भाऊ-वहिनी माझे स्कुलमेटस  ममता, निता, वनिता,अनुराधा, तुषार, प्रदीप, सुनील, मनोज,दत्तू, धनी, दत्ता,भूपेंद्र, विलास जीजू, तसेच शेजार- पाजार, फोनाचे मेम्बर्स महेश आणि रुपा  पाठक,मंदार सर, राणे सर, रोहित, प्रथमेश,तनया, सुपर्णा, शैलजा, सुरेखा, आभा, रश्मी, शुभांगी, रोहिणी,राहुल, प्रशांत, रेखा, प्रदीप, किरण,मुनोत, पियुष, सोरभ, सारंग, संतोष होली, माझे फेसबुक फ्रेंड्स, सुजी, सूची, अंजी, हेमलता, गीतांजली, उज्जू,मिताली, रश्मी, आणि अंजली शालिनी, सुषमा,राहिलेले सर्व मित्र परिवारचे शतश: आभार. माझा आनंद द्विगुणीत केलात, माझ्या आनंदात सहभागी झालात. इथून पुढेही असे लेख छापून येतील न येतील परंतु पहिला लेख छापून आला आणि माझी  बातमीपत्रात चांगली बातमी आली हेच माझ्यासाठी नवीन आणि कौतुकास्पद आहे. पहिल्या पहिल्या आनंदाची मजा काही औरच……

      माझे आर्टिकल छापून आल्याचा आनंद आणि मैत्रिणीने केलेल्या कवितेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ब्लॉग शिवाय पर्याय नव्हता. मलाही हा आनंद कायम स्मरणात राहील. धन्यवाद संतोष पाटील आणि धन्यवाद शालिनी आणि  सर्व मित्र-मैत्रिणींनो  ………

Wednesday 16 March 2016

"भिंगरी"

भिंगरी


नमस्कार मित्र हो… 
योग आला की सगळं होतं असं  म्हणतात ना  तसं झालं. सप्टेंबर २०१२ ला "फोना' सोबत महेश पाठक आणि रूपा पाठक यांच्यासोबत आम्ही ट्रेक ला जायचे ठरवले.  माझ्या मिस्टरांनी याआधी खूप  ट्रेक्स केलेत त्यामुळे त्यांना सवय होती. परंतु मला हे सग्गळे झेपेल  नाही यात शंका होती. तरीही आम्ही जरा  रिस्क घेवून  १ सप्टेंबर २०१२ च्या फोनाच्या कर्जत तालुक्यातल्या "कोथळीगड" ट्रेक ला जायचे ठरवले आणि गेलो. माझा पहिला ट्रेक होता तो. मला आजही आठवते माझी काय हालत झाली होती त्या ट्रेक ला ते. पण मी हिम्मत करून पुन्हा पुढच्या महिन्यात दुसरा ट्रेक हरिश्चंद्रगड हा केला. आणि मग माझा आत्मविश्वास वाढला आणि एकामागून एक ट्रेक ट्रेक करत च गेले. महिन्याला एकाच ट्रेक करते मी. परंतु त्या ट्रेक मध्ये माझी फिरायची हौस होते. फोटोग्राफीची हौस होतेगाण्यांची आवड आहे ती पूर्ण होतेमला नवनवीन लोकांशी मैत्री करायला आवडते ती आवड पूर्ण होते.आणि एक वर्षापासून मी माझे मिस्टर दीपक आणि त्यांचा मित्र महेश  पाठक यांच्या आग्रहाखातर आणि मार्गदर्शनाखाली ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे लिखाणाची हौस देखील पूर्ण होते.
"फोना" म्हणजे फ्रेंड्स ऑफ नेचर असोशियेशन. हा पुणे जिल्ह्यातील तळेगावचा ट्रेकिंग ग्रुप आहे. १७ वर्षे पूर्ण झाली या ग्रुप ला. ट्रेकिंग सोबत इतरही चांगले उपक्रम हा ग्रुप राबवत असतो. माझे या ग्रुप शी नाते फक्त ट्रेकिंग पुरते मर्यादित नाही आहे तर "फोना" हे आमचे एक कुटुंब आहे. असे मी मानते. कारण त्यात कुटुंबाची जशी काळजी घेतात तशीच काळजी घेतात. हसी - मजाक हि तसाच चालतो. ट्रेकिंग साठी नवनवीन मेम्बर्स येतात ते सगळे खूप लवकर मिक्स होवून जातात हे फोना ग्रुप चे वैशिष्ट्य आहे. कोणा एकट्याला हे लोक सोडत नाहीत. फोना ग्रुप श्री. महेश महाजन यांनी निर्माण केला आहे. महेश महाजन,मंदार थरवळमनोज राणेरोहित नागलगावसंजय  निकाळजेअशी अजून बरीच मंडळी या ग्रुप मागे कार्यरत असतात.
सांगायचा मुद्दा हा आहे की मला माझ्या घरातून एकटीला जायला परवानगी मिळते ती या ग्रुप च्या सहकार्यामुळे आणि त्यांच्यावरच्या विश्वासामुळेच. कधी मी माझी मुलगी प्रभा असे मिळून ट्रेक ला जातो. कधी माझा मुलगा चेतन  ही येतो ट्रेक ला. या आधी आम्ही चौघे च्या चौघे फोनासोबत ट्रेकिंग करायचो परंतु हल्ली माझी एकटीचीच दुर्ग  भ्रमंती चालू असते. घरातून सपोर्ट मिळतो परंतु मला खूप साऱ्या तयाऱ्या करून जाव्या लागतात. जसे घरात तीन माणसे असतात त्यांचे जेवण बनवून जाते. परीक्षा असतील तेव्हा आधीच अभ्यास पूर्ण करून घेणे आणि इतर जबाबदार्या असतात त्या मी टाळू शकत नाही. पण मनात हौस असली की शरीरात बळ हे आपोआपच येते. मला माझे मिस्टर आणि मुले खूप सपोर्ट करतात म्हणून मी जावू शकते. आणि माझ्या कुटुंबाला तसे तयार केले आहे.  मी नसताना माझ्या मुलांना अभ्यासासोबत घर कसे सांभाळायचे ते मी शिकविले आहे.  त्यामुळे माझी मुले तेवढा एक दिवस सांभाळून घेतात. 
माझा माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना एक सल्ला आहे की आपण इतरांसाठीकुटुंबासाठीसमाजासाठी  जगतोच तसेच स्वतःसाठी पण जगुयात. एक ना एक दिवस आपण मरणार आहोतच  परंतु मरायच्या आधी जगायला शिकूया. आपल्या आरोग्यासाठी चालणे,खेळणेयाच बरोबर महिन्यातून एक तरी ट्रेक चालू ठेवा. स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच फिरवून आणा. फार दूरचा ट्रेक शक्य नसेल तर जवळची एखादी टेकडी तरी सर करा. झाडांमध्ये जा प्राणवायू घ्या आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.  
मी "भिंगरी" या नावाने मराठीमध्ये ब्लॉग लिहिते. या ब्लॉग मध्ये मी फक्त ट्रेकिंग चे वर्णन लिहित नाही तर इतरही बऱ्याचइतरही बऱ्याच विषयांवर लिहित असते आणि लिहित राहणार आहे.  वाचकांना वाचनाचा आनंद देत असते देत राहणार आहे. माझा "भिंगरी' चा ट्रेकिंग चा प्रवास जमेल तोवर आणि लिखाणाचा प्रवास असाच अखंड चालू राहणार आहे.
आतापर्यंत मी कोथळीगडगोरखगडसरसगडसुधागडघनगडजीवधनगडनानाचा अंगठाकळसुबाईशिखरहरिश्चंद्रगडवासोटाकिल्लाविसापूरकिल्ला, गुमतारा किल्लाकल्याणगडलेण्याद्री रतनगड, संधानvalley, प्लसvalley,कात्रज ते सिंहगडसिंहगडअसे अनेक ट्रेक केले आहेत.  माझी ही भ्रमंती जोवर जमेल तोवर अशीच चालू राहील आणि माझे जे “भिंगरी ब्लॉग चे लिखाण आहे ते अखंड चालू राहील. मला या ट्रेक साठी आणि लिखाणासाठी घरातून जसे प्रोत्साहन मिळते तसेच माझ्या मित्र परिवाराचाही यात मोलाचा वाटा आहे. धन्यवाद मित्र हो.  


Tuesday 15 March 2016

"ध्यास k2s चा"

"ध्यास के टू एस चा"


कात्रज ते सिंहगड ट्रेक
चढाई श्रेणी - कठीण
दिनांक - ११ मार्च २०१६ 

खरे तर आजच्या ब्लॉग चा विषय "कात्रज ते सिंहगड ट्रेक" हा आहे परंतु वाचक हो,आपण ज्या पुण्यात राहतो त्या पुण्याचा अभिमान असलेल्या सिंहगडाची माहिती ही हवीच.पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता.[दादोजी कोंडदेव] हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [इ.स. १६४९] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे  उदयभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
दोन वर्षांपासून मला के टू एस चा जणू ध्यास च लागला होता. काहीही झाले तरी जायचेच हा माझा स्वत:चा ठाम निर्णय होता. का? तर मी काय मोठ्ठी ट्रेकर्स वैगेरे काही नाहीये. महिन्याला आपला एखादा गड जेमतेम करतेय.  तब्बेत बरी नसते तर काही जण म्हणतात कशाला जातेयस जयू?? मग माझे उत्तर असते की "मला मरायच्या आधी जगायला आवडते म्हणून मी हे ट्रेक करते" आणि जीवघेणे ट्रेक देखील करणार आहे जीवात जीव असेल तोवर तरी. या महिन्याचा ट्रेक कुठला असेल याची उत्सुकता होतीच. कारण उन्हाळा सुरु होतो आणि मुलांच्या परीक्षा चालू असतात त्यामुळे सगळ्यांचा विचार करून आमचे F.O.N.A. चे मेम्बर्स ट्रेक आयोजित करतात. त्यांनी हुशारीने के टू एस ची तयारी केली की जेणे करून मुलींना न सांगता गपचूप जाता येईल आणि परीक्षा असल्यामुळे तशा मुली, लेडीज कमीच येतील आणि त्यांना कळवले नाही तर येणारच नाहीत. खरं तर मोठ्ठ्या ग्रुप मध्ये लेच्यापेच्याला नेणे खायचे काम नाही. आम्ही लेचेपेचे नाहीच आहोत. पण "के टू एस" असा ट्रेक आहे ज्यात एखादा घाबरला किंवा मधेच मागे फिरायचं म्हंटल तरी शक्य नाही. एकतर जायचेच नाही या ट्रेक ला नाही तर आर या पार. म्हणून खूप मोठ्ठी जोखीम असते म्हणून आमचे मंदारसर, महेश पाठक, रोहित, राणे सर, विवेक  आणि इतर सगळेच सारासार विचार करूनच हा निर्णय घेतात. पण पण मला काही करून जायचे होते त्यामुळे मी मेल आल्याआल्या पहिले तनयाला सांगितले आपल्याला जायचे आहे. आणि मग मंदार सर ना फोन केला, आणि मंदार सरांनी  काचकूच करत आम्हाला सोबत नेणे फ़िक्स करून घेतले.आणि मी तर घरात उडीच मारली. आणि माझ्यामुळे अजून ही काही मुलींना यायला मिळाले याचा मला मनोमन आनंद झाला.
पहिले घरातून परवानगी घेतली आणि माझा वर्गमित्र तुषार की जो अनुभवी ट्रेकर आहे, आणि आमचे फोनाचालक मंदार सर,रोहित, यांना  विचारले मी के टू एस करू शकते ना?? कारण या लोकांना माहित आहे माझी क्षमता आणि के टू एस ची कठीणता. सगळ्यांनी हो म्हंटले मग माझी तयारी झाली. पण मधेच कोणी कोणी भीती पोटी विचारायचे अरे करू शकाल न हा ट्रेक नक्की?? मग काय नेहमीचच उत्तर जयू ने एक बार ठाण ली के ठाण ली उसे कोई नही रोक सकता

११ मार्च च्या शनिवारी रात्रीचा ट्रेक होता हा. नेहमीप्रमाणे माझी तब्बेत नरमच होती आणि मनातून मला भीती होती की मी जर ट्रेक पूर्ण नाही करू शकले तर माझ्यामुळे ग्रुप मधल्यांना त्रास नको तरीही माझी हौस म्हणा किंवा माज म्हणा लवकर जाणार नाही हे मात्र खरे.घरातली बरीचशी कामे आटोपून संध्याकाळी ७:०० वाजता घर सोडले ७:३० च्या निगडी ते कात्रज डेपो च्या बस ने राहुल दर्गुडे, गणेश गोसावी, आणि मुनोत यांच्यासोबत मी कात्रज पोलिस चौकी जवळ च्या थांब्यावर उतरलो तिथेच आम्ही रोहिणी, राधिका, खोल्लम, शिरीष सर यांनाही भेटलो आणि एका भारी मिनी बस ने(२०- २० रुपये देवून) कात्रज बोगद्या जवळ पोहोचलो. आम्ही जुन्या पुणे-सातारा रस्त्याने कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे उतरलो. बाकीचे लोक पण आम्हाला तिथेच येवून भेटले.
आम्ही १०:३० ला कात्रज बोगद्याजवळ वरती वाघजाई देवीचे मंदिर आहे तिथे एकत्र जमलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते. डोंगरधारेवरची ही वाट, झाडीतली. यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या.  तिथे मात्र सगळ्यात शेवटी आढाव सर आणि त्यांच्या पत्नी आलेल्या पाहिल्यावर आम्हाला वाटले की या अशाच आल्यात इथे आढाव सरांना, आम्हाला टाटा करायला. पण आम्हाला धक्का बसला एक क्षण. कारण त्यांनी साडी घातली होती आणि  साडीमध्ये ट्रेक करणे किती अवघड आहे हे काय नव्याने सांगायला नको. परंतु त्या आढाव madam ने भारीतला भारी ट्रेक केला. सलाम त्यांना.

ट्रेकिंगच्या विश्वात काही स्थळांभोवतीच्या वाटा या दिवसापेक्षा रात्रीच  जास्त शोभून दिसतात. आमच्या पुण्यातील कात्रज ते सिंहगड ही वाट अशीच आम्हा ट्रेकर्स च्या  पावलांना जागवणारी. मी आतापर्यंत बरेच ट्रेक केलेत परंतु मित्र हो,पूर्ण रात्र आम्ही ट्रेकर्स वेड्यासारखे चालत राहिलोय असा हा आमचा एकमेव "के टू एस"असणार होता. मी दुपारी थोडे जेवण केले होते तेव्हढेच. त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा डब्बा घेवून निघालो होतो. काही जण जेवण करून आले होते. रात्रीचे चालणे आणि रस्त्यात एकही गाव नसल्यामुळे भरपूर पाणी, टॉर्च, हेड टॉर्च, नीकॅप, जेवणाचा डब्बा, फ्रुट्स, सरबते, अशी जय्यत तयारी करून आम्ही या डोंगरवाटेवर निघालो.

मंदार सरांनी आम्हा ट्रेकर्सना जागरूकतेसाठी  माहिती दिली कारण आम्ही एकूण ३१ ट्रेकर्स होतो. आणि रात्रभर आम्हाला चालायचे होते. छत्रपतीं श्री शिवाजी राजेंची घोषणा केल्याशिवाय ट्रेक ची सुरुवात कशी होणार? घोषणा केली आणि  निघालो आम्ही रात्र असून काय  जोश आणि उत्साह होता प्रत्येकात वाह.  पहिली टेकडी चढतानाचेच पहिले वळण चुकले कारण वाटा सगळ्या सारख्याच दिसत होत्या. आणि आम्ही पुढे असलेले लोक आता मागे पडलो कारण जशी रांग  चालली होती तशीच्या तशी उलट्या वाटेने वळली म्हणजे डावीकडच्या ऐवजी उजव्या बाजूने. टेकडी म्हणजे डोंगरच समजा रे. सध्या सुध्या टेकड्या नाहीत त्या.
दोन टेकड्या पार केल्यावर सिंहगडावरच्या tower चा लाल लाईट दिसला आणि हायसे वाटले. हायसे कसले धूर निघणार याची कल्पना आली पण सांगणार कोणाला तिथे. सांगितले तर परत जायची सोय नाही. आणि पुन्हा पावले चालू लागली सिंहगडची वाट. आता मात्र खरच भीती वाटली आम्हाला समोर काय दिसले तर मोट्ठे वणवे पेटलेले दिसले ते ही आमच्या वाटेलाच होते. तरीही जवळ गेल्यावर पाहू काय व्हायचे ते होईल. आगीच्या ज्वाळा पाहिल्यावर सगळ्याच्या तोंडातून "पिंजरा" चे गाणे आलेच. निघालो पुन्हा. त्या दोन डोंगरातच माझी ताकद संपली होती यावेळी. समोर वणवे आणि घसरड्या डोंगरांना सुरुवात झाली आता. तिसरी टेकडी पार केली आणि वणव्याच्या जवळून जाताना चटके लागत होते. परंतु एका बाजूने थंडगार वारेही अंगाला लागत होते. छान आल्हाददायक वाटत होते ते वातावरण. परंतु बाहेरून वणवा आणि आतून पोटात आग पडली होती. भुकेने जीव व्याकूळ झाला होता पण आता जेवत बसलो तर ट्रेक करू शकणार नाही हे मंदार सरांना पक्के माहित असते. बारा वाजता जेवू पुढच्या डोंगरावर. अस गोड बोलत बोलत १२ कधी वाजून गेले कळले नाही. आम्ही आपले एक डोंगर चढलो की सरबत प्यायचो पाणी प्यायचो. असे करत करत त्या जीवघेण्या घसरड्या टेकड्यांचा  थरार अनुभवत हळूहळू सरकत होतो. डोळ्यावर झोप येत होती. पण थांबला तो संपला असे समीकरण लागू होत होते. आम्हाला त्या वणव्यांमध्ये सुद्धा उलटे हृदय  दिसत होते. म्हणजे त्याचा तसा आकार आला होता. एक टेकडी चढलो की असे वाटायचे इथेच झोपून घ्यावे पण कसलीच सोय नव्हती.
आता रात्रीचे १:३० वाजले होते. आणि माझे तर अवसान गळाले होते, शक्तीच संपली. आणि मंदार सरांनी आम्हाला इथे बसुयात रे. आणि जेवून झोपुयात म्हणे थोडावेळ. आणि हो नाही म्हणता आम्ही बसलो आणि लगेच जेवणाचे डब्बे काढले आणि रात्री २ च्या सुमारास आम्ही जेवण केलेयावेळी मला मात्र मंदार सरांच्या डब्यातली मटकी ची भाजी मिळाली आणि फ्राईड राइस सुद्धा. वाह काय बनवला होता. आणि रोहित ने स्वीट डिश दिली आम्हाला चिक्की. छान होती. आणी राहुल दर्गुडे द्राक्षे आणतो हल्ली नेहमीच. भारी काम करतोयस राहुल तू.  धन्यवाद सगळ्यांना. मला दुसर्याच्या हातचे जेवण फार आवडते. जेवलो आणि १५ मिनिटे विश्रांती घेतली. आम्हाला वाटले होते खरच झोप मिळणार आहे पण तसं काहीही नसत रे. झोपले की उठल्यावर खूप थंडी लागते आणि मग ट्रेक कसा करणार उजेडाच्या आधी ?? आणि आम्ही आता फक्त अर्धा ट्रेक पूर्ण केला होता अजून अर्धा ट्रेक बाकी होता विचार करा कुठून आणायची इतकी शक्ती? १५ मिनिटां मधेच पुन्हा युद्धाला तयार झालो. रात्रीचे २ वाजून १५ मिनिटांनी मंदार सरांनी हसी-मजाक करत आम्हाला चला म्हंटले आणि आम्ही निघालो मला मात्र एव्हढी थंडी भरली की विचारू नका मी तनयाचे जाकेट घातले माझी कानटोपी घातली,स्कार्फ ने तोंड बांधले आणि निघालो मग १५ मिनिटांचे चालणे झाल्यावरथंडी गेली. पण थरार अनुभवत होतो रे.

सिंहगडचा tower दिसायचा अधून मधून. जीव भांड्यात पडायच्या ऐवजी घाबरत होता. यावेळी मला सोल्लिड भीती वाटत होती. पण मी कोणाला दाखवत नव्हते. डोंगर इतके घसरडे होते काहीच पर्याय नव्हता. पण बसून चाललो तर ट्रेकर्स कसले आम्ही. पण काही ठिकाणी आम्ही घसरगुंडी केलीच. आणि त्यावेळी माझ्या पुढे असलेल्या राहुल दर्गुडे ला आणि मुनोत ला मी बरेचदा ढकलता ढकलता राहिले.. हात धरायला काही आधार नव्हता जो हात बाजूला असेल कोणाचा तो हात किव्वा पाय धरून त्या माणसाला घेवून मी तर घसारा करत होते.  समोर किर्र -काळोख आणि एका  हातात ती टोर्च पाठीवर वजनदार  bag. असे वाटत होते कोणीतरी bag घ्या रे. पण प्रत्येकाजवळ वजन होते त्यामुळे मी च माझा सांगाती.दरी,काळोख आणि  खडतर वाट असेच होते सगळीकडे. समोर पहिले की गडाचे अंतर आणि अंधाऱ्या भयानक टेकड्या पाहून अजून भीती वाटत होती. फक्त फोना सोबत असल्याने ती भीती पळून जात होती. काहीकाही वेळा तर मागे पुढे कोणीच नसायचे तरी एव्हढ्या रात्री कुठून माझ्यात बळ येत मलाही ठावून नव्हते. प्रत्येक ट्रेकला माझे  काहीतरी रहातेच मागे पुढे. यावेळी तनयाने दिलेले जाकेट मी कमरेला बांधले परंतु ते सुळसुळीत असल्या कारणाने आणि थकल्या कारणाने माझे मलाच भान नसल्या कारणाने कुठे पडले कळालेच नाही. राहुल दर्गुडेने ते नंतर आणून दिले. धन्यवाद राहुल.

अंगाला गार  वारा झोंबू लागला. चालायला सुरुवात केली. आता अजून ३ मोट्ठे डोंगर बाकी होते एखादा डोंगर चढणे सोपे होते परंतु उतरणे खूपच कठीण जात होते. कारण उतारावरील माती सैल  व कोरडी असल्यामुळे पाय रोवून उभे राहणेही शक्य होत नव्हते. काय काय विचार येत होते मनात न सांगितलेले बरे. फोटो काढायची पण ताकद नव्हती. आमच्या सोबत असलेला राहुल दर्गुडे हा एकमेव ट्रेकर फोटो काढताना दिसत होता. आम्ही सुरुवातीला जे फोटोज काढले तेव्हढेच नंतर फोन जो bag मध्ये ठेवला तो सकाळीच बाहेर काढला.
आणि माझ्या पायात मात्र शेवटचे २ डोंगर चढताना कळा (cramps) यायला लागल्या होत्या कारण आज मी जे सरबत बनवून नेले होते ते लिंबू चे नव्हते. लिंबू सरबत असले की ही  अडचण येतच नाही. परंतु ट्रेक देखील तितकाच कठीण होता. आणि शेवटी मी असह्य होवून रडलेच त्यावेळी माझ्यासोबत आढावा सर होते त्यांनी मला मदत केली माझी bag घेतली आणि चालू लागले. त्या आढाव madam घसरत होत्या तरी गप्प डोंगर चढत उतरत होत्या. मला त्यांचे खूप कौतुक वाटत होते. या सगळ्यामध्ये प्रशांत भावसार सोबत आमचे मंदार सर पाठीमागे कुठे घसारा करत राहिले होते ते नंतर कळाले. ट्रेक दरम्यान घसरून घसरून निलेश यादव आणि प्रशांतची अवस्था काय झाली होती ते मंदार सर भारी   गंमतीने सांगत होते. ट्रेकच्या शेवटी शेवटी जशी मी रडकुंडीला आले होते तशीच अवस्था त्यांची देखील झाली होती. माझ्या जोडीला कोणीतरी होते म्हणायचे बरे वाटले. खरे तर थोड्याफार फरकाने सगळेच खूप दमले होते पण आम्ही बोलून दाखवतो काही लोक गप्प राहतात हा फरक आहे. थोडीशी  गम्मत हो. पण ट्रेक ची मजा वेगळीच. पहाटे ५ वाजता आम्ही शेवटच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा हायसे वाटले. आता तिथून एक वाट सिंहगडावर जात होती आणि एक वाट कोंढणपूर फाट्याकडे जाते म्हणजेच गडाच्या डांबरी रस्त्याकडे.

आम्ही तिथे जरा विश्रांतीसाठी थांबलो तेव्हा मस्त आमचा नेहमीचा "शाहीर राजू राउत' यांचा  पोवाडा गायलो "अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला जीजाऊचा शिवा पाहिजे." की जो आम्हाला किरण टेकवडे आणि प्रदीप अडागळे यांनी सुधागड ट्रेक दरम्यान शिकवला. यावेळी आम्ही आदित्य, सुमित,प्रभा ,ख़ुशी, रक्षा, जुई , कौस्तुभ  ह्या छोटे मंडळीला तसेच जे येवू शकले नाहीत त्या सगळ्यांनाच खूप मिस केले.  आमच्यात पुन्हा उत्साह आला परंतु सगळ्यांच्यात गडावर जायची ताकद नव्हती मग आम्ही पक्क्या रस्त्याची वाट  धरली आणि सकाळी ६ वाजता कोंढणपूर फाट्यावर पोहोचलो त्यावेळी आम्हाला गडावर एक लाईटने भरलेला रस्ता दिसला. रविवार असल्याने ट्रेकर्स पहाटेचे चढ उतार करत होते. विलोभनीय दृश्य होते ते. आम्ही कात्रज बोग्द्यापासून १४ कि.मि. अंतर कापून आलो होतो. हे १४ कि.मि. आम्हाला ५० कि.मि. चालल्यासारखे भासले रे. आता तिथून सिंहगडावर जायला ३ कि मि. अंतर होते. आणि पायथा ४ कि. मि. वर होता. गडावर जायचे आमच्यात त्राण  नव्हते आम्ही आपले डोणजे गावचा रस्ता धरला आणि हा ४ की.मी. चा रस्ता कसा बसा पार केला त्यावेळी आम्हाला खूप सारे ट्रेकर्स गडाकडे जाताना दिसत होते. काही सायकलिंग करत होते काही चालत होते.

सुर्य उगवायची वेळ झाली होती. राहुल दर्गुडे, रोहिणी आणि राधिका ते सूर्योदयाची वाट पाहत थांबले फोटोग्राफीसाठी.आम्ही सुरुवातीला सोबत असलेले रोहित, आकाश, पियुष, विवेक नंतर कुठे गायब झाले कळलेच नाही. मी तनया आम्ही आपले लिफ्ट मिळते का पाहत होतो पण मंदार सरांनी सांगितले होते की फक्त मुलींनी लिफ्ट मागू नका, सोबत आपल्या ग्रुप चे कोणी असले तरच जा आणि आमच्या सोबत कोणीच नव्हते त्यावेळी,  त्यामुळे आम्ही एव्हढे पाय दुखत असताना गपगुमान दोघीच गप्पा करत चाललो होतो.पण आमची एका पण गाडीवाल्याला दया आली नाही असो. डोणजे गावच्या वेशीपाशी पोहोचणार तोच एक बस भर वेगाने जाताना दिसली ती बस राणेंनी हात करून थांबवली आणि आम्ही एकदाचे बसमध्ये बसलो राणेंना सांगून मी, तनया, पियुष, शिरोळे, आकाश, शिरीष सर, आढाव सर आणि madam आणि अजून काही मुले शनिवार वाड्याच्या बसने आलो आणि  तळेगावकर ट्रेन ने गेले आम्ही  म. न. पा. च्या बसने निगडी गाठली. घरी पोहोचायला सकाळचे ९ वाजले होते. पण तो के टू एस चा थरार अजूनही डोळ्यासमोरून जात नाही आणि "के टू एस ट्रेक" पूर्ण केल्याचा आनंदही कधी विसरणार नाही हे मात्र खरे खरे तर हा ट्रेक इतरांसाठी खूप कठीण नसावा परंतु ठरलेल्या  वेळेच्या आत तो सुखरूपपणे पूर्ण करणे हे जास्त महत्वाचे आहे त्यामुळे ह्या थराराला कोणी घाबरू नका रे. लिंगाणा आणि इतर कठीण चढाई चे गड डोळ्यासमोर आणले तर हाच ks सोप्पा वाटेल. माझा "के टू एस" चा ध्यास पूर्ण झाला. यावेळी नवीन मेम्बर्स जास्त होते तरीही सगळ्यांनी उत्तमरीत्या ट्रेक केला हे कौतुकास्पद आहे.असेही मी ब्लॉग लिहायचा नाही म्हंटले तरी यावेळी महेश पाठक सर नसल्याने ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी माझ्यावरच आली. त्यामुळे हा ब्लॉग खास तुमच्यासाठी. ट्रेक ची हौस सुद्धा माझी पूर्ण झाली आहे त्यामुळे ट्रेक पण मी करेन की नाही देव जाणो. धन्यवाद फोना टीम ला. फोना रॉक्स.

Tuesday 1 March 2016

"समुद्र"

केळवा - माहीमचा समुद्र  आणि किल्ला  
ठिकाण- ठाणे जिल्हा
अंतर - पुणे पासून  231 कि.मी. 

समुद्र
उन्हाळ्यात एखाद्या तरी समुद्रावर गेलंच पाहिजे आणि सर्वानुमते एखाद्या बीचला जायचं असं ठरतं पण नक्की कोणत्या बीचवर जायचं हे ठरत नाही.  कारण जुहु समुद्र हा एकमेव मुंबईतला समुद्र बऱ्याचजणांना माहीत असतो. गोराई बीच, केळवे माहिम बीच, शिरगाव बीच असे मुंबईतले आणि मुंबईच्या जवळचे समुद्रकिनारे वन डे पिकनिकसाठी चांगला ऑप्शन आहे. जेवणाची व्यवस्था आधी ऑर्डर दिली असता तिथल्या स्थानिक लोकांकडून केली जाते.  कोकणातले अलिबाग आणि त्या किनारपट्टीवरील सगळे समुद्र किनारे माहित आहेत आपल्याला. किमान अलिबाग तर प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. परंतु पश्चिम किनारपट्टीवरील समुद्र किनारे सगळ्यांनाच जास्त माहितीचे नाहीत.
ठाणे जिल्ह्य़ातला केळवे माहीम बीच हा किनारपट्टीवरील एक मोठा बीच आहे. पालघर आणि सफाळे  हे जवळचं रेल्वेस्थानक आहे. पालघर तालुक्यात असलेल्या केळवा बीच येथे मुंबई, ठाणे ,तसेच राज्याच्या काना कोप-यातुन  पर्यटक  हजेरी लावत असतात. पश्चिम रेल्वेच्या केळवे स्टेशन पासून ९ कि. मि. पालघर स्टेशन पासून १७ कि.मी. अंतरावर आहे बोरिवली, विरार स्थानकातून पालघरला जाण्यासाठी शटल सेवाआहेत. पालघरवरून बीचला जाण्यासाठी टमटम आहेत. स्वतःच्या वाहनाने मुंबई-अहमदाबाद हायवे वरील वरई फाट्यापासून ३२ कि. मि. अंतर आहे. मुंबईपासून हे अंतर ८० कि.मी. आहे सध्या या परिसरात रिसोर्ट असल्याने राहण्याची जेवणाची उत्तम सोय होते. सुरुच्या झाडांमुळे हा बीच खूपच सुंदर दिसतो. शहरापासून दुर असल्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळही कमी असते. जवळच केळव्याचा किल्ला आहे. या परिसरला ऐतिहासिक किनार ही आहे. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रुंवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराज या किल्ल्याचा उपयोग करत असत. थेट गगनाला गवसणी घालणाऱ्या सुरुच्या झाडांची लागलेली रांगच रांग, बाजूला पसरलेला अथांग स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, सितलादेवीचे मंदिर, दात झाडांनी बहरलेल्या वाड्या, आणि सुखद अल्हाददायक वातावरण अश्या एक न अनेक खुबी असलेल्या केळवा-माहीम बीच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.


शितळादेवीच्या मंदिरामुळे हा बिच प्रसिद्ध आहे. केली,पानवेली,नारळी-पोफळी, याच बरोबर मोगरा, जाई-जूई, सायली अश्या विविध झाडा-फुलांनी बहरलेल्या वाड्यांनी केळवा-माहीम परिसर अगदी न्हावून गेलाय. निसर्गाने भरभरून दिलेल्या परीसरातून थेट समुद्रकिनारा गाठला की सुरुच्या लांबसडक रांगा आणि त्यापलीकडचा अथांग सागर नजरेस पडतो. इथे प्रत्येकासाठी मनोरंजन आहे. खेळा, भटका, फिरा, देवीच्या  मंदिरात नतमस्तक व्हा. सुरुच्या बागेत आणि समुद्रात दोन किल्ले आहेत. समोरच रामकुंड आहे. इथे श्री राम येवून गेल्याची आख्यायिका आहे. 
माहीम ते केळवे अंतर फक्त ३ किमी आहे.  हॉटेल तसेच रिसोर्ट यांची येथे कमी नाही. बीचवर जाणाऱ्या दिशेने उजवीकडे थोड्या अंतरावर चालत गेल्यास केळव्याचा चौकीवजा किल्ला तुम्हास दिसतो.  सध्या किल्ला हा अर्धवट वाळूत गाडला गेला आहे. त्यामुळे त्याच्या प्रवेशद्वारात प्रवेश करताना वाकूनच शिरावे लागते. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत.हा किल्ला गतकाळी मोठा असावा तसेच लष्करीदृष्ट्याहि त्याला खूप महत्व असावे हे दिसून येते. किल्ल्याचा इतिहास फक्त एवढाच की इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर जानेवारी १७३९ केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठ्यांनी पोर्तुगीजांकडील उत्तरेकडील गड कमी दिवसात जिंकून घेतल्याचे दिसून येते. १०-१५ मिनिटात गड पाहून होतो. दांडा खाडीच्या बरोबर मध्यभागी हा पाणकोट किल्ला पोर्तुगीजांनी जकात वसुलीसाठी तसेच टेहळणीसाठी बांधला होता. केळवे किल्ल्यासोबत हा पाणकोट किल्लादेखील मराठ्यांनी फेब्रुवारी १७३९ मध्ये जिंकून घेतला असा उल्लेख आढळतो.ऐतिहासिक आणि निसर्गाची जाण  असलेल्या पर्यटकांसाठी हा किल्ला महत्वाचा ठरतो.
समुद्र मला मनापासून आवडतो लहानपणापासूनच आणि फिरणे त्याहून जास्त आवडते. काही दिवस झाले माझी तब्बेत जरा मला साथ देत नाहीये मला तरी मी मिळालेल्या संधीचे सोने करते हे काही तुम्हाला सांगायला नको. ट्रेक निमित्त महिन्यातून एकदा का होईना गड फिरून येते. पण कित्त्येक नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याकडे माझे जाणे होत नाहीये. त्यामुळे बरीच लोक माझ्यावर रागवून आहेत. मी ट्रेक ला जाते आणि आमच्याकडे येत येत नाही का अशी विचारणा करतात. मला पण चेंज हवाच आहे रे पण पूर्वीसारखे गावाला सुद्धा मला जाता येत नाही खूप दिवसांसाठी. गावची मज काही वेगळीच असते. गावचे साधे जेवण आणि साधी, साधी माणसं, राहणीमाण  मला कायम आवडते. माझ्यावर मनापासून मनापासून प्रेम करणारी माणसे गावचीच. न सांगता माझ्यासाठी स्वत:हून काही करणारी माणसें ही गावीच मिलतत. मग ते गाव कोकण असो की कराड, सांगली असो की  नासिक असो.

या महिन्यात कुठे प्रवास करावा एव्हढी टाकत च नव्हती शरीरात. तो माझ्या हाताला चावलेला कीटक त्याने मला खूप दमवले यावेळी. डॉक्टर ने दिलेली भरमसाट इंजेक्शन्स,उगाच ओव्हर डोस झाला गोळ्या औषधांचा आणि मी बोर झाले.  त्यामुळे कुठे फिरायला जायची इच्छा नव्हती, खावे दोन घास नि आराम करावा एवढेच ठरवून होते. परंतु माझ्या  एका मैत्रिणीचे (शीतल)सासूसासरे आणि मित्राचे(हेमंत)आईवडील ४ दिवसाच्या अंतरात वारले. मला ऐकून धक्का बसला होता. पण लगेचच जाणे शक्य नव्हते. मी मुंबईत जाते तेव्हा काही आमचे भेटणे होत नाही.एखाद दिवस एशियाड ने जावून यावे मुंबईत आणि गावी पटकन असं  ठरवलंच  त्याच वेळी कुटुंबातील एका लग्नाच्या कार्यासाठी मला जाण्याचे निमंत्रण आले. आमच्याकडे नवर्याची उष्टी हळद आणि उंबरमेढ घेवून जायची पद्धत आहे. त्यामुळे हे काम माझ्याच कडे देतात शक्यतोवर. पण दोन्ही कार्यक्रम परस्पर विरोधी आले. त्यामुळे एक दिवस विचार करून मग आम्ही हो म्हंटले. पण माझ्यासाठी दोन्ही कामे महत्वाची होती. पण मुलांचे शाळेचे काही प्रोजेक्ट करायचे असल्या कारणाने ते येवू शकत नव्हते त्यामुळे पुन्हा सगळी तयारी करून जाणे  आले. मग शनिवारी सकाळी  पहाटे उठून सगळे जेवण ते बनवून आम्ही सकाळी ६ वाजता घर सोडले. त्या लग्नघरी जावून ती उंबरमेढ आणि नवरीची साडी ओटी घेवून ६:३० ला पुणे सोडले. त्यांनी आमच्यासाठी इको गाडी ड्रायवर आणि बोनस म्हणजे त्या ड्रायवर ची बायको आणि दोन लहान मुले दिली ते खूप छान केले. गाडी सुटली आणि ती लहान मुले एकदम चिडीचूप होती. 

मी आपले नेहमी प्रमाणे विचारलं अरे पोरांनो नवे सांगा तुमची. असे गप्प का रे ? तर त्यांची आई म्हणते ते दोघे खूप बोलतात त्यामुळे त्यांना त्यांच्या बाबांनी गप्प बसायला सांगितले आहे. कारण का तर ती ड्रायवर ची मुले होती न असा त्यांचा समज असावा. ह्या मालकाच्या लोकांना काही आवडलं  नाही  तर घरी जावून त्या ड्रायवर च्या बायको ला आणि मुलांना ओरडा खावा लागायचा अशा अर्थाने ती शीतल (ड्रायवर ची बायको)मला सांगत होती. मला राग पण आला आणि नवल ही वाटले की मी गप्प बसू शकत नाही तर या लहान मुलांनी का गप्प बसायचे? मी म्हंटल असला काही नियम आज तरी पाळायचा नाही. भरपूर बोलु, गप्पा मारू आणि जे गप्प आहेत त्यांना बोलायला लावू. ती मुले बोलू लागली. मस्त रमली माझ्यासोबत. पुणे पासून विरार ७० कि. मी. आहे आणि विरार ते केळवा बीच ७० कि. मी. आहे म्हणजे किमान १४० कि.मी. अंतर होतेच. आम्हाला जवळजवळ ५-६ तासाचा प्रवास करायचा होता आणि असे गप्प राहून मला तरी जमणार नाही. एक्स्प्रेस वे ने आम्ही जाताना मस्त गरम गरम वडापाव चा नास्ता केला आणि निघालो मुंबईकडे. लोणावळा घाटात आम्हाला घाट  जाम असल्याचे दिसले. जर भीती वाटली आधी कारण आम्हाला दोन तीन कामे करून घरी परत यायचे होते. आणि सध्या घाटात दुरुस्ती कामे चालू असल्याने ट्राफिक जाम होत आहे चार-चार पाच- पाच तास. पण सुदैवाने आम्हाला त्यावेळी घाट मोकळा मिळाला पण पुण्याकडे येण्याचा रस्ता मात्र जाम होता कारण घाटात एक ट्रक बंद पडला होता नेमका अमृतांजन पुलाजवळच. आणि त्या बाजूची मोठ्ठी मोठ्ठी वाहने या बाजूने, उलट्या बाजूने म्हणजे आम्ही जात होतो त्या बाजूने यायला सुरु झाले. धन्य ते लोक जे अशा चार पदरी रस्त्यावर उलटे येत होते.
आम्ही मुंबईतून जाताना माझ्या भावाला येताना पाच मिनिटे भेटू असे आश्वासन देवून मुंबई सोडली आणि तिथून पुढे सफाळे कडे रवाना जाहलो. आणि सफाळे हून आम्हाला उसरणी या गावी जायचे होते. केळवा बीच पासून उसरणी हे गाव ३-४ की.मी अंतरावर आहे त्या समुद्रावर आम्हाला जाण्याचा योग आला. परंतु केळवा बीच ची सफर या आधी आम्ही खूपदा केली आहे आणि मनसोक्त फोटोग्राफी सुद्धा केली आहे. उसरणीला आम्ही ११ वाजता पोहोचलो. तिथला तो उंबर मेढीचा कार्यक्रम आवरला जेवलो आणि निघणार. तेव्हढ्यात तिथली मंडळी आम्हाला म्हणाली की अरे समुद्र पाठीमागेच आहे जावून या न थोडा वेळ. मग आम्ही कशाला कोणाची वाट बघतो. दुपारचे २ वाजले होते. आम्ही तसल्या कडक उन्हात समुद्राकडे निघालो. ड्रायवर ने गाडी लावली आणि आम्ही सुसाट धावत च समुद्र गाठला. दुपारची वेळ असल्याने ओहोटीची वेळ होती त्यामुळे पायाला पाणी लावण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी जरा जास्त चालावे लागले.


पण त्या भर उन्हात सुधा समुद्र हवा हवासा वाटत होता. कशाचे भान नव्हते. त्यात त्या ड्रायवर च्या मुलीने समुद्र पहिलाच नव्हता. ती खूप खुश होती. मग आम्ही आपल्या उड्या मारून फोटो काढायचा आनंद लुटला. मुले माझ्यासोबत खूप रमली. आम्ही पहिल्यांदा भेटलो असे वाटलेच नाही.




आणि मग अर्ध्या तासाने तिथून बळजबरीने निघालो. कारण अजून दोन कामे करून पुणे गाठायचे होते. तिथे गाडी लावली होती त्या घरात जावून आम्ही मिठाच्या पाण्याचे हात पाय धुतले आणि ३ वाजता निघालो. खरे तर इकडे इतके नातेवाईक आहेत की नेहमीच वेळ कमी पडतो. यावेळी फक्त एका मामांकडे १० मिनिटांसाठी जावून आलो की तितक्या दुरून आम्हाला भेटायला पुण्यात येतात. तिथून निघाल्यावर विरार ला वळलो की ज्यासाठी मी हा सगळा प्रोग्राम आखला होता. त्या फ्रेंड्स ना चार दिवसाच्या अंतरावर आईवडील दोघेही गेल्यामुळे घर रिकामे रिकामे जाहले होते.  भेटलो बोलो त्यांच्याशी तेव्हा त्यांना आणि आम्हाला बरे वाटले. नंतर माझा भाऊ की जो मला भेटायला त्याच्या ऑफिस पासून ८ कि.मी. अंतरावर येवून थांबला होता नालासोपारा फाट्यावर त्याला भेटलो १५ मिनिटे आणि मग निघालो पुण्याच्या वाटेला. घोडबंदर रस्त्याला ट्राफिक लागला आम्हाला. गाडीत ती छोटी मुले कंटाळून गेली होती आता.  मग आम्ही जरा  गाण्यांच्या भेंड्या खेळलो मग जरा रमली ती मुले आणि इतका वेळ गप्प असलेली त्या ड्रायवरची बायको शीतल आपल्यासारखीच छान छान गाणी म्हणून लागली तिच्या छान आवाजातच. मला आवडला तिचा आवाज. आणि ती सुद्धा.  आम्हाला सारखे फोन मेसेजेस आले की अरे घाट जाम असणार आहे तुम्ही अडकाल. आणि घाटाच्या सुरुवातीला ट्राफिक लागलाच होता पण तो एका ट्रक चा अपघात झाल्यामुळे. त्यानंतर मात्र आम्हला रस्ता मोकळा मिळाला आणि आम्ही रात्री १० वाजता त्या लग्नघरी पोहोचलो तिथे आमचे बाकीचे मेम्बर्स उपस्थित होते. आणि ब्यान्जो च्या आवाजाने अंगात नाच येत होता पण मुले घरी वाट पाहून थकली होती. त्यामुळे तिथून निघालो बाहेरून वेज फ्राईड राइस पार्सल घेतला आणि मुलांसोबत जेवण केले. आणि संपला तो  धावपळीचा  दिवस. पण यात लक्षात राहिली ती म्हणजे मैत्रिणीची, भावाची, मामींची भेट आणि त्या समुद्रावर छोट्या मुलांसोबत घालवलेली दुपार........
.........