Friday 26 February 2021

व्हॅलेंटाईन डे स्पेशल ट्रेक"

"व्हॅलेंटाईन डे स्पेशल ट्रेक"

रोहिडा,कमळगड,केंजळगड,रायरेश्वर रेंजट्रेक

दिनांक १३-१४ फेब्रुवारी २०२१

ट्रेकग्रुप- “डोंगरयात्रा”

२०२१ हे वर्ष रेंज ट्रेकची सुरुवात करून देणारे ठरले आहे. एखादी चांगली गोष्ट मनात शिरली की मग त्यासाठी आपण हावरे होतो. मला वाटते अशा चांगल्या गोष्टीची हाव असलेली केव्हाही चांगली.आयुष्यात एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे असतात त्यातला सुखाचा धागा तुटू देणे आपल्या हातात असते. शंभर धागे एकात एक गुंतून जातात त्यापेक्षा एक धागा कशातही गुंतत नाही आणि आपण जतन करू तेवढा मोकळा आणि मजबूत होतो.

जानेवारीतील बागलाण रेंजट्रेक एक वेगळा अनुभव होता. आताचा फेब्रुवारीतील रेंजट्रेक तसा मध्यम चढाई असणारा होता परंतु "व्हॅलेंटाईनडे"ला जो ट्रेकला जातो तोच सिंगल असतो हा मोठा टास्क आहे.अरे,सिंगल असणे आणि डब्बल असणे हा फक्त आणि फक्त एक गैरसमज आहे बरं का. हाहाहाहाहाहा. १३-१४ फेब्रुवारी २०२१ हे दोन दिवस मध्यम चढाईचे चार गड करायचे होते. परंतु आमच्या टीम मधील फक्त सहा मेंबर तयार होऊन निघालो. लग्नकार्य कसे लॉकडाऊन मध्ये केले तरी लग्न केल्याचा फील लोकांना आला नाही. धामधूम, गाजावाजा बँडबाज आले तरच मजा. तसेच सगळी टीम असली की ट्रेकला असते मजा. नवनवीन ट्रेकर्सना भेटण्याचा आनंद देखील निराळा असतो. ट्रेक छोटा हो या मोठा हर एक ट्रेक का नशा वेगळा होता है.

आपण आयुष्य कुंपणापलीकडे जगून पहायला शिकले पाहिजे. कुंपणापलीकडे जगलो की आपली आपल्याला किंमत कळते. आपल्या आवाक्याबाहेर काही चांगल्या गोष्टी करून पहिल्या की मग आपल्यात किती दम आहे ते आपल्यालाच समजते. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. परंतु पुनर्जन्म पुण्यवान माणसाला मिळतो असे म्हणतात. पुढचा जन्म कोणी पाहिलाय आपण पापी माणूस आहोत. माणसाचे आयुष्य एकदाच मिळते ते कसे आनंदाने जगावे हे आपणच ठरवू शकतो. आपला आनंद आपले चांगले विचार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. मी आयुष्यात खूप काही गोष्टी गमावल्या खूप गोष्टीना मुकले असेन परंतु सह्याद्रीने मला खरे आयुष्य जगायला शिकवले. सह्याद्रीने मला जे दिलंय ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ट्रेक करताना माझी खूप दमछाक होते परंतु त्याच सह्याद्रीत मित्रमैत्रिणींच्या सानिध्यात मी इतकी रमते की मला घरी परत यावेसे वाटत नाही. आयुष्य जागून झाल्यावर मरण यावे तर या सह्याद्रीतच्या कुशीतच. सह्याद्रीत जाऊन लोक किती मोलचे कार्य करत आहेत गड संवर्धन, वृक्ष संवर्धन, गडकिल्ल्यांचा अभ्यास करून शिलालेखाचा अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहून ती अमूल्य माहिती आपल्यासारख्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवत आहेत. सह्याद्रीत अडकलेल्यांचा जीव वाचवत आहेत. दरीखोऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य पुरवत आहेत खरंच अभिमान वाटतो अशा सगळ्यांचा. जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. कोरोनाकाळात आपण आयुष्याचा धडाच शिकलोय. आपले आयुष्य किमान आपल्याला तरी आनंदाने जगता आले पाहिजे. सह्याद्रीत फिरतानाच्या या सगळ्या आठवणी मनात, हृदयात, फोटोरूपात, व्हिडिओरूपात, लेखरूपात आपल्या सोबत राहणार आहेत. जर चुकून म्हातारे झालोच तर ह्याच आठवणी म्हातारपणी आपल्याला तरुणपणाचा आभास देणाऱ्या ठरणार आहेत. 

चला तर मग आयुष्य जगूयात. फेब्रुवारीला सगळीकडे एकच चर्चा असते जो व्हॅलेंटाईन डे दिवशी एकटा ट्रेकला जातो तो सिंगल असतो म्हणे. अरे, मित्रांनो या जगाच्या पसाऱ्यात सगळे आपण कायम सिंगलच असतो रे. येतो एकटे जातो एकटे. नुसतंच आपलं हा माझा तो माझा हे माझे ते माझे करत आपण जगत असतो परंतु प्रत्यक्षात असतो मात्र एकटेच. फक्त आपल्या बोलण्यातून वागण्यातून लोकांना हसवता आले तरी खूप झाले. आपली दुनिया फार छोटी आहे फक्त मी आणि माझा सह्याद्री परंतु आपलं मन मात्र मोठे असले की त्यात सगळे सामावून घेता येते.

१३-१४ फेब्रुवारी २०२१ डोंगरयात्रा ट्रेक ग्रुपसोबत पुन्हा एकदा एक रेंज करण्याचे ठरवून शुक्रवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास प्रवासाला निघालो. फेब्रुवारीच्या थंडीत रात्री एखाद्या टपरीवरची कॉफी घेत रोहीडागडाकडे निघालो. रात्री बसमध्ये निलेशच्या मोबाईलमधील साठवणीतली छान गाणी ऐकत साडेबाराच्या सुमारास भोरमधील सरस्वती मंगलकार्यालयात पोहोचलो कारण तेथे विठ्ठल यादव काका आणि काकी यांनी जेवणाची आणि रहाण्याची उत्तम सोय केली होती. लेडीजगॅंग वधूपक्षाच्या रूममध्ये तर जेन्टसगॅंग वरपक्षाच्या रूममध्ये विसावलो. लग्नाला आल्यागतच वाटत होते. सकाळी लवकर उठायचे असल्याने सगळ्यांनीच स्लिपिंग बॅग, चादरी शाली काढून झोपण्याचा प्रयत्न केला. मुंबईहुन येणारे काही ट्रेकर्स,लीडर्स पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास आले त्यावेळी आम्हीदेखील उठून लगेचच आवरून घेतले.

बड्डे  बॉय रवी सर 

लिडर रवीसरांचा वाढदिवस असल्याने मनोज सरांनी आणलेला केक रवीसरांनी स्टेजवर नवरदेवाच्या सिंहासनावर बसूनच कापला तेव्हा मात्र आम्ही खरोखर वऱ्हाडमंडळी आहोत असेच वाटले,केक खायच्या नादात टाळ्यांचे सिंक्रोनायझेशन लयच बेक्कार होते बरका.पहाटे गरमागरम घरच्यासारख्या पोह्याचा नास्ता करून गरमागरम चहा घेऊन डोंगरयात्राचे बॅच वाटप, थोडक्यात ओळख परेड, ट्रेकविषयी सूचना देऊन अंधार असतानाच रोहिडागडाकडे निघालो. अंधार असल्याने बसमधून एका टेकडीवरील एका रांगेत असलेले दिवे आकर्षक होते. डोळे उघडे ठेवले की खूप सुंदर गोष्टी डोळ्यात साठविता येतात.

रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी बस लावून सकाळच्या गारव्यात ट्रेक सुरु करताना खूपच छान वाटते. एक टप्पा पार करेपर्यंत वॉर्मअप होईपर्यँत सगळ्यांनाच दम लागतो. दम लागणे हे नैसर्गिक आहे. एक टप्पा पार केल्यावर सूर्य हळूच डोंगररांगातून डोकावू लागला आणि दुधात साखर पडल्यासारखे झाले. त्या थंड हवेची रंगत अजूनच वाढली. सूर्योदय-सूर्यास्ताचे फोटो घ्यायला डीएसएलआरच हवा असतो. डीएसएलआर वाले आमचे फोटोग्राफर राहुल दर्गुडे त्यावेळी नव्हते.त्यामुळे गॉगल गँगची जबाबदारी वाढली होती. कारण ट्रेकमधील एखादा भाग कॅप्चर करायचा राहिला तर तो त्यांच्या कॅमेऱ्यात सापडतोच. रोहिडागड चढाईसाठी सोपा आहे. गडावर आणि आजूबाजूच्या डोंगररांगेवर वणवा लागून संपूर्ण डोंगर काळाकाळा झालेला बघताना डोळ्यांना आनंद होत नव्हता


रोहिडा किल्ल्याकडे जाताना 

सह्याद्रीच्या डोंगररांगेत पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीनचार किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडेश्वर. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्याच्या हद्दीत येतात.  रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेदेखील संबोधले जाते. रोहिडा गडाची समुद्रसपाटीपासून उंची जवळपास ३६६० फूट इतकी आहे.

रोहिडा किल्ल्याचा थोडक्यात इतिहास- .. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून .. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. पुढे किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडे होता.

गडावर जाण्याच्या वाटा-या गडावर जाण्यासाठी दोन बाजूंनी मार्ग आहेत: एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडेकडून जाताना दोन मार्ग आहेत हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करता येईल.आम्ही बाजारवाडीमार्गे चढाई केली. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटीसेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो.चिखलावडे खुर्द येथून टप्याचे नाकाडमार्गे किवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडा कठीण आहे. चिखलावडे येथे जाण्यासाठी पुढील मार्ग आहे. भोर -चौपाटी (महाड रोड)-वेनवडी-शिरवली-आंबेघर-चिखलावडे फाटा-चिखलावडे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे-पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते.हे पाणी पिण्यासाठी वापरता येते. या टाक्यांची रचना अतिशय सुंदर रीतीने केली आहे.

रोहीडावरील पिण्याच्या पाण्याचे टाके 

रोहिडा गडावरील शिलालेख 

पाणी दिसण्यासाठी उजेड येईल अशा छोट्या खिडक्या ठेवल्या आहेत त्या आजही तशाच आहेत. हे सगळं पाहून नवल वाटते.येथून - पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीवकाम आढळते. दोन्ही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे.


प्रवेशद्वारावर कोरलेले हत्तीचे शिर आणि शिलालेख   
येथून आत शिरल्यावर समोरच दोन पडझड झालेल्या वास्तू दिसतात. पहिली गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज सदरेचा बुरूज असे एकूण बुरूज आहेत. गडाची तटबंदी बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी आणि साठण्यासाठी अशाप्रकारे पाण्याच्या टाक्यांची रचना केलेली आढळते. सगळं कसं जादुई दुनियेतील असल्यासारखे वाटत होते. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती शिवपिंडी आहे.किल्ल्याच्या बांधकामात दगडांमध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गिलावाही केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोलाकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे हे चुन्याचे घाणे बहुतेक किल्ल्यांवर पाहायला मिळतात.या किल्ल्यावरदेखील आहेत.


लीडरनी गडाविषयी उत्तमरीत्या माहिती देऊन एक ब्यानरफोटो घेऊन लवकरच गड उतरून पुन्हा यादवकाकांच्या मंगलकार्यालयात दुपारच्या जेवणासाठी गेलो. जेवण इतके चविष्ट होते की आता आमच्याच्याने ट्रेक होईल असे वाटत नव्हते. १२च्या आत जेवण आटोपून थोडीशी विश्रांती घेऊन आमची बस कमळगडाकडे निघाली. अजून एका ट्रेकरचा वाढदिवस आहे असे समजल्याने अजून एका केकची मेजवानी सगळ्यांना मिळाली. एका झाडाखाली बड्डेबॉयला केक कापायला लावून त्याला डोंगरभर शुभेच्छा दिल्या आणि सुमधुर गाणी ऐकत वाटेत भेटलेल्या रायरेश्वर-केंजळगडाला स्मित हास्य करत धोमधरणाचा जलाशय डोळ्यात साठवीत कमळगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

जेवून ट्रेक करायचा म्हणजे माझ्या तर सॉल्लिड जीवावर येते पण ट्रेकला गेलोय आणि ट्रेक पूर्ण करायचा आहे हे विसरून चालत नाही.पायथ्याचे गाव तुपेवाडी येथून थोड्या अंतरावरून दुपारी अडीचच्या सुमारास ट्रेक चढाई सुरु केली. सुरुवातीला दाट हिरवीगार झाडी असल्याने छान गार गार वाटत होते. परंतु जसजसा खडा चढ येत गेला तशी माझी हवा जात होती. डाव्या हाताला प्रशस्त कमळगडचा पसारा दिसत होता परंतु ती गेरूची विहीर किती अंतरावर होती याची काहीच कल्पना नव्हती. दुपारी पावणेचारच्या सुमारास कमळगडाच्या पठारावर पोहोचलो.येथील बोर्डवरून समजले की इथे दोनतीन वाटा येऊन मिळतात. कमळगडचे नाव काहीजण कमालगड असेदेखील उच्चारतात. महाबळेश्वरच्या डोंगररांगा अनेक ऐतिहासिक गडांनी नटलेल्या आहेत.



वाई भागातील कमळगड हा एक उंच असा गिरिदुर्ग आहे. कमळगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची जवळपास ४२०० इतकी आहे. जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे समजते. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही बाजूंनी प्रशस्त पाण्याचा वेढा आणि मधोमध हा अनोखा वेगळा असा किल्ला उभा आहे.  एकीकडे कृष्णा नदीचे खोरे आणि एकीकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.दुपारी बसने प्रवास करताना कितीतरी नागमोडी वळणे पार करताना या किल्ल्याच्या नावाच्या मी प्रेमात पडले. कमळफुल जसे पाण्यात असते त्याप्रमाणे आजूबाजूने धोम धरणाच्या पाण्याने हा गड वेढलाय म्हणून कमळगड नाव असेल का याचे?? कमळाच्या आकाराचा असेल का?? एखाद्या व्यक्तीला भेटण्याआधी आपण अनेक निष्कर्ष,अनुमान लावतो तसे काहीसे काहूर कमळगडाविषयी माझ्या मनात माजले होते.
कमळगडावरील  गोरक्षनाथ मंदिर 

पठारावर पोहोचल्यावर एक टप्पा चढून गेल्यावर अजून पुढे घनदाट जंगल होते. गडावर एक भैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे तेथे सप्ताह असल्याने तेथील स्थानिक गडावरून खाली उतरत असताना त्यांच्याकडून समजले की वाघ सिंह असे प्राणी या जंगलात सध्या नाहीत. बाकी इतर छोटे प्राणि आहेत जसे की ससे,माकडे . पक्षी आहेत. येथून थोडे पुढे - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते.जाताना एक पक्षी तर इतका मंजुळ आवाज काढून जणू वाट दाखवीत होता. घनदाट जंगलात चुकू नये यासाठी मागचे ट्रेकर्स येईपर्यंत थांबावे लागत होते. परंतु अंधार पडत आल्याने मला तर गडमाथ्यावर पोहोचायची फारच घाई झाली होती. आम्ही कधी एकदा तो शेवटचा टप्पा चढून जातो आणि माथ्यावरील ती गेरूची विहीर पहातो असे झाले होते. जिथे वाट चुकू असे वाटेल तिथे आम्ही थांबू असे लीडरना सांगून त्या पठारावरील जंगलातून आम्ही चालत राहिलो. जंगल संपून पुन्हा एक पठार लागले तिथे दोन तीन घरांची धनगरांची वस्ती आहे. शेती केलेली आढळली. तेथील गुरे राखणाऱ्याला वाट विचारून आम्ही पुढे निघालो तर दोन भूभू सोबत आले आणि आमच्या पुढयात चालू लागले. चला आम्ही वाट दाखवतो असे सांगत होते जणू ते. या भुभुचे आपल्याशी काय नाते आहे हे माहित नाही. प्रत्येक ट्रेक दरम्यान यांची सोबत असते.  अंधार पडत आल्याने सगळेच अक्षरशः धावत सुटले होते.


पंधरा वीस मिनिटांच्या चालीनंतर गडाच्या जवळ पोहचता येते. सगळ्यात वरच्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यावर रॉकपॅच आहे यापूर्वी तिथे रोप लावावा लागत असे. सध्या इथे लोखंडी शिडी बसवल्याने सहज चढाई करता येते.  वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर नजारा नजरेस पडतो. किल्ल्यावर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. दाताप्रमाणे आकार आणि त्या दातांमध्ये अंतर असल्याने त्या डोंगररांगेला म्हातारीचे दात देखील म्हणतात. थोडेपुढे गेल्यावर जमीन खोल चिरत गेलेले जवळपास ४०-५० फुल खोल विहिरीसारखे भूयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत.
कमळगडावरील गेरूची विहीर 

या विहिरीला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. येथील उंचीने मोठ्या असलेल्या जवळपास ५०-५५ खोलखोल पायऱ्या उतरत जाताना आपण जमिनीच्या पोटात शिरत जात असल्यासारखे भासते. विहिरीतील हवेतील गारवाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.उतरताना तळहात, मोबाईल,ट्रॅकपँट मस्त लाल झाली होती.माझ्या तोंडून तर सारखे रंग दे तू मोहें गेरुआ हे गाणे येत होते. गडावर एकीकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कुठेही पाण्याचे टाके नाही. गडमाथ्यावर विहिरीतून वर आल्यावर एका ठिकाणी गवतात लपलेले चौथऱ्याचे अवशेष दिसतात.एका बाजूला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोमधरण अशी सुंदर साथसोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे असे वाचलेय.वेळेअभावी इथे आम्ही भेट दिली नाही. पुन्हा त्या बाजूला गेलो की नक्की भेट देऊ.


कमळगडावर जाण्याचे मार्ग अनेक आहेत ते सर्वच ट्रेकिंगचा भारी आनंद देणारेच आहेत. महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून खाली येणार्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावी पोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर आले की दोन अडीच तासांत आपण कमळगडावर पोहचतो.वाईहून नांदगणे गावी येण्यास एस.टी. बस सेवा आहे. इतर गावांतून उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावी वाईहून एस.टी.ने येता येते.वासोळ्याहून जाताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढण्यास सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उंच कडा डोंगरमाथा आहे, दुसर्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात. जेवणाची सोय आणि पाण्याची सोय गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे तिथे थोडे पाणी मिळेल.

गेरूची विहीर खरंच कमाल आहे. इतक्या उंचावर ही विहीर त्यातही सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपण कमळगडावर गेलो तर विहिरीत थोडे पाणी असते. मला विहिरीची बांधणी खूप आवडली. विहिरीत उतरण्यासाठी मजबूत रोप लावला आहे तरीही ओलसरपणा असल्याने हात घसरतो. आपल्याला आपला जीव प्यारा असेल तर सांभाळून गेलेले बरे.विहिरीत वरून भिंतीवरील शेवाळावर पडणारा सूर्यप्रकाश अनेक रंगछटा निर्माण करीत होता. खरंच त्या विहिरीतून निघावेसे वाटत नव्हते. विहिरीत लालेलाल फोटोग्राफ़ी करून आम्ही गडावरचा बाकीचा परिसर न्याहाळून सूर्य अस्ताला निघालेला पाहून सहयाद्रीचे सर्व रंग डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून परतीच्या वाटेल निघालो. धोम धरणाच्या जलाशयाचा मोह मला काही केल्या सुटेना झाला होता. सह्याद्रीचा कप्पा कप्पा हृदयाच्या कप्प्यात कसा साठवावा कळत नाही.अंधार होईल म्हणून उतरताना आमच्यासोबत ते दोन भूभू देखील धावत सुटले होते. त्यांना कुठे जायचे होते कोणास ठाऊक?उगाच आपला आम्ही पळतोय म्हणून आमच्या पायात येऊन मला तर एका कुत्र्याने पाडता पाडता ठेवले.


पायाला भिगरी लावल्याप्रमाणे सुस्साट वेगाने उतरू लागलो. चढताना दम लागतो उतरताना मात्र गुढग्यावर प्रेशर येत असतो. हेडटॉर्च सोबत होत्या तरीही उजेड असताना उतरणे कधीही चांगले.म्हणता म्हणता आम्ही काही ट्रेकर्स पुढे आलो. उतरताना अंधार झालाच होता परंतु टॉर्च असल्याने काही अडचण आली नाही. काही ट्रेकर्स मागे राहिल्याने आणि मुक्कामी जागा थोडी दूर असल्याने पायथ्याला थोडा वेळ थांबलो आणि समोरच्या जंगलात मोठाच्या मोठा वणवा लागलेला पाहून अवाक झालो. किती ते जंगलाचे नुकसान, प्राण्यापक्षांची किती जीवित हानी होत असेल.लागलेला वणवा कसा आणि कोण विझवत असेल हा मला कायम प्रश्न पडलेला असतो. सगळे ट्रेकर्स आल्यावर आम्ही तुपेवाडी गावात मुक्काम होता तिथे प्रस्थान केले.नॉनवेजवाल्यांनी नॉन वेज आणि वेज वाल्यांनी वेज जेवणावर ताव मारला. रात्रीचे जेवण आटोपून एका आजीच्या घरात आम्हाला - खोल्या झोपण्यासाठी दिल्या होत्या. आमच्या लेडीज रूममध्ये तर आजींनी चुलशेकोटी पेटवून खोली उबदार केली होती. आजी दहा वर्ष जास्तच जगो आणि ठणठणीत राहो.

पहाटे साडेचारला उठल्यावर मी आधी तो वणवा विझला असेल का ते पाहिले. वणवा काही विझला नव्हता. त्या आगीची धग किंचित कमी वाटत होती. सकाळचं सगळं आवरून आजींचा निरोप घेऊन आम्ही केंजळगडाकडे प्रस्थान केले. पुन्हा धोमधरणाचा जलाशय खुणावित होताच. बसमधून टिपलेल्या केंजळगडाच्या छब्या भारी आल्यात. केंजळगड आणि रायरेश्वराच्या खिंडीत पोहोचल्यावर सूर्यदेवाने दर्शन दिले. मी तर वाटच पाहात होते कधी एकदा बस थांबते आणि मी खाली उतरून फोटोशूट करते.

बसमधून वळणावरून  दिसणारा केंजळगड 

 सकाळच्या शांत रम्य वातावरणात सूर्यदेव केंजळगडाच्या डोंगररांगेतूनच उगवतोय असा भास होत होता. खूपच सुंदर दृश्य होते ते.एखाद्या कवीला कविता कशा सुचत असतील ते यावरून समजते. नाहीतर आमच्यासारख्याला यमक जुळवताना नाकी नऊ येतात. केंजळगडाच्या पायथ्याशी बस थांबून लीडरनी ट्रेकविषयी सूचना देऊन गडचढाई सुरु केली.वॉर्म करायला तर चालणे झालेच नाही. डायरेक्ट खडा चढ आल्याने सगळ्यांची फुप्पुसे फासफूस करायला लागली होती. दाट झाडीतून वाट काढीत थांबत थांबत फोटो काढता गड चढत होतो आमच्यासोबत एक कुत्री आणि तिची छोटी छोटी तीन पिल्ले कुईकुई करीत आमच्यासोबत केंजळगडावर आली.काय पुरस्कार मिळणार होता त्यांना काय माहित.काही अंतर चढून गेल्यावर केंजळगडाचा बांधा काय रेखीव दिसत होता. त्यावर एक मोठे मधमाशांचे पोळे दिसत होते. परंतु गडाचे प्रवेशद्वार काही केल्या अजून दिसत नव्हते. प्रवेशद्वाराची बांधणीच इतकी डोके चालवून केलीये की विचारू नका प्रत्यक्ष जाऊन बघा.


केंजळगडाच्या प्रशस्त पायऱ्या चढून गेल्यावर पहिले दर्शन भगव्याचे होते. मला हा फडकणारा भगवा खूप रुबाबदार दिसतो. केंजळगडमाथा फिरताना पुन्हा तो धोम धरणाचा जलाशय मोहात पाडतो. गडमाथ्यावर चुन्याचे घाणे आहेत. धान्यकोठार आहे. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण जवळच रायरेश्वराचे प्रशस्त पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे. गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा आहेत आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा आहेत.  मी काय या सगळ्या वाटांनी कधी गेले नाही फक्त नेटवर वाचनात आले म्हणून इथे सांगावेसे वाटले इतकेच.सह्याद्रीशी नाते जोडलेच आहे तर कधी ना कधी या अनोख्या वाटांनी गड चढाई करणे आवडेल.


केंजळगड 

केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड असे आहे. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे. वडतुंबीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपर्यंत चालत जाता येते. इथे कालभैरवाच्या देवळात मुक्कामाला जागा आहे. आम्ही कमळगडावरून आल्याने रायरेश्वर केंजळगड खिंडीतून एक रस्ता जातो. त्या रस्त्याने जाऊन केंजळगडाच्या पायथ्याला बस लावून मग गडचढाई केली.  इथूनच गडावर जाण्यास पायवाट आहे परंतु ती फारच घसरडी आहे याच वाटेने गडावर जाता येते. गडावर रहाण्यास जागा आहे परंतु राहण्याखाण्याची सोय नाही आणि तंबू लावून राहण्याचे ठरवले तर प्रचंड हवा असते. गडावर एक मोठे पाण्याचे टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आपण स्वतःकडे पाणी नेलेले उत्तम राहील. गडाच्या एका बाजूची तटबंदी शिल्लक आहे बाकीच्या बाजूने सर्व तटबंदी शिल्लक राहिली नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात जवळपास ५४ प्रशस्त पायऱ्या खोदून काढल्या आहेत. हा एक अतिशय उत्तम जिना कोरला आहे.

केंजळगडाचे प्रवेशद्वार आणि गॉगल गॅंग 

डाव्या
बाजूला आधार असलेली भिंतही मजबूत आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. पण केंजळगड केवळ ह्या पायऱ्यासाठी पाहायला जायला हवा .या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला बरेच वर्षे कडवी झुंज दिली.या दुर्गांच्या आश्रयाने मराठे लढले. गडावर लीडरनी गडावरील असलेला चुन्याचा घाणा, पडझड झालेले महिषासुरमर्दिनी मंदिर आणि संपूर्ण गडाविषयी माहिती दिली. आणि रायरेश्वरवर जायचे असल्याने आम्ही ग्रुप फोटो घेऊन लगेचच केंजळगड उतरलो. उतरताना तर खरी कसरत होती.



घसरगुंडीला तरी स्टॉप असतो इथे झाडांच्या फांद्यांचा काय तेवढा आधार होता. आम्ही काही जण तर हाताची साखळी करून उतरलो. खाली उतरल्यावर क्षणभर विश्रांती घेतली. त्या विश्रांतीच्या वेळेला आमचे ट्रेकर्स जो खाऊ खात होते ना ते काही बरोबर नाही बरं का. तो चखणावाला खाऊ बसमध्ये खायला ठेवायचा, चिवडा, बिस्कीट जे असते त्याने तहान लागते रे. खजूर, आवळाक्यांडी, फळे, सुकामेवा, गुळ-शेंगदाणा चिक्की, काकडी वैगेरे असा खाऊ खायचा असतो तो आपल्याकडे असतो पण आम्ही कोणाला देत नसतो. हाहाहा. गडाच्या पायथ्याला केंजळाई माता मंदिर आहे परंतु ते सध्या बंद होते. इथे छोटी वस्ती आहे.एक मोठी पाण्याची टाकी आहे. इथे गायी-म्हैशी गुरांची येजा,खेड्यातला शेणाचा वास, लहान मुलं क्रिकेट खेळताना पाहून मला माझे लहानपण आठवले. पोरांना क्रिकेट खेळताना पाहून एक दोन चेंडूचा खेळ मी खेळणारच.
आम्ही द गॅंग 

केंजळगडावरून लवकरच निघून आम्ही रायरेश्वरकडे निघालो. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य दिसते.जर आकाश निरभ्र असेल तर त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर,तोरणा,पाचगणी,पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात.



गडावर जाण्याच्या वाटा-रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. रायरेश्वर एकंदरीत या परिसरात येण्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणजे भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पुण्याहून सकाळी .०० वाजल्यापासून दर तासाला भोरसाठी बस आहेत. तर साताऱ्याकडून यावयाचे असेल तर दोन मार्ग आहेत. एक पुणे बंगळुरू महामार्गावरील शिरवळवरून भोरसाठी थेट बससेवा आहे तसेच खाजगी जीप वहातुकही आहे. तर दुसरा मार्ग सातारा-वाई-मांढरदेवी-अंबाड खिंड- भोर असा लांबचा आहे. रमतगमत फोटोग्राफी करत गेले तर वरती पठारावर पोहोचवावयास किमान तास पुरे होतो.  स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार किल्ले रायरेश्वर होय. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे ठिकाण आहे. दाट झाडी,खोल दऱ्या,उंचच्या उंच सुळके,नजर पोहोचत नाही अशी दूरवर पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे तरीही प्रेक्षणीय आहे. 'रायरेश्वर' वर महादेवाचे मंदिर आहे. सह्याद्री पर्वतरांगामधील हे एक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ आहे.किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती त्यामुळे या मंदिराला मराठा इतिहासात खूप पवित्र स्थान आहे.रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. येथे - विविध रंगाची माती आढळते.


आम्ही बसमधून उतरताच रायरेश्वर जणू प्रेयसीसाठी त्याचे आभाळाएवढे अजाण बाहू पसरून स्टाईलमध्ये उभा होता. आजूबाजूच्या खोल दऱ्या खोल मनाच्या गाभाऱ्यासारख्या भासत होत्या. दऱ्यांचा फोटो घेताना त्यांची अनेक वलये मला समुद्रावरील लाटांप्रमाणे भासत होती. काय ते सगळे दुर्ग आणि निसर्गाचे सुंदर रूप. उन्हातदेखील हे रूप मोत्याप्रमाणे चमकत होते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. लोखंडी शिड्या पार करताना तेथील स्थानिक साध्या चप्पलमध्ये सामानाची नेआण करण्यास सहज,जलद गतीने उतरत असतात. दुर्गावर राहणारे नशिबवानच म्हणायचे. आपण एक दिवस ट्रेक करतो तर इतका आनंद पाठीशी बांधून घेऊन येतो.येथील जनता तर आनंदाच्या डोहात रोजच डुबत असेल. भले इथे फाईव्ह स्टार सेवा नसेल परंतु शुद्ध प्राणवायूने व्यापलेला निसर्ग हा स्वर्गाहून कमी नव्हे.

जसे आम्ही रायरेश्वराच्या पठारावर पोहोचलॊ तिथे सर्वात आधी डावीकडे उंच भगवा फडकताना दिसतो. अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुले या सप्टेंबर महिन्यात येथे डोळ्यांना सुखच सुख देतात. सध्या उन्हाळा सुरु झाल्याने ती हिरवळ नव्हती परंतु निसर्गाचे सुंदर अविष्कार दाखविणारा श्रावण महिना संपतो पाउस जवळजवळ सरत आलेला असतो, त्यावेळी मात्र निसर्ग नवे रुप घेऊन उधाणलेला असतो. हा काळ खास गवतफुले पहाण्याचा असतो. साताऱ्याच्या नैसर्गिक फुलांनी बहरलेल्या कास पठारावर सध्या पर्यटकांची अतिशय गर्दी असते. परंतु ज्यांना ट्रेक करून निसर्गाचे मनमोहक रुप, उंचावरून दिसणारी अथांग जलाशये, रंगीबेरंगी फुले पहावयाची आहेत त्यांनी शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वरला सप्टेंबर महिन्यात आवर्जून भेट द्यावी. रायरेश्वर पठारावर दिसणारी पिवळ्या रंगाची फुले कौला किंवा बरका म्हणजे स्मिथीया, त्यावर लाल ठिपके असणारी मिकी माउस म्हणून ओळखली जाणारी गैसापसिस, तेरड्याची गुलाबी जांभळट फुले आणि कुरडूचे गुलाबी पांढरट तुरे आपला कॅमेरा आपोआप वळवून घेतात.

 


 रायरेश्वरवर जातानाची शिडी 

खरंच निसर्ग हा एकमेव सखा आहे की तो कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला भरभरून देतो. आपल्यावर सुखाची बरसात करीत असतो.  परंतु आपण त्याच्या हद्दीत जाऊन त्याचे खरे रूप नष्ट करू लागलो तर तो तितकाच रौद्र देखील होतो.निसर्गरम्य रायरेश्वरदुर्ग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटगड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड . दुर्ग दिसतात.रायरेश्वर पठाराची लांबी सुमारे ११.४४० कि.मी. असून, रुंदी . २०० कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे रहातात.

छत्रपती  शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ  घेतली ते  शिवमंदिर 

सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. शिवमंदिरात गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंडीजवळची प्रतिमा पाहून तेथून निघावेसे वाटत नाही. पुजारी नित्यनियमाने येथे येऊन पूजा करीत असतात. मंदिरात हातपाय धुवून आणि मोजेदेखील काढूनच जावे. शिवरायांचे नाव घेतले तरी अभिमानाने उर भरून येतो आणि शिवबांच्या पावनभूमीत जन्माला आल्याचा सार्थ अभिमान वाटतो.

गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले रायरेश्वराच्या शिवमंदिराशिवाय जननी देवीचे मंदिर पाण्याची शिवकालीन टाकी आहेत.गडावर असलेल्या सुमारे ५०० लोकसंख्येपैकी जवळपास दीडशे लोकच गडावर राहत आहेत. त्यांच्यातील काही लोक उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी रहातात. या गडावर जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे राहतात दुर्गभ्रमंती करणाऱ्यांची या गडावर राहण्याचीही व्यवस्था होऊ शकते.रायरेश्वर,केंजळगड,कमळगड अशी एक दिवसाची मोहीम केल्यास तीनही दुर्ग एका दिवसात आपण सर करू शकतो.


छत्रपती शिवरायांनी वयाच्या केवळ १६व्या वर्षीच स्वराज्याचे तोरण बांधले. अगदी थोड्या मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची कल्पना समोर मांडली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक-एक प्रदेश जिंकला. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले.

रायरेश्वरवरील मुसळधार पावसापासून संरक्षण म्हणून घरांना असा  आधार दिला जातो 

रायरेश्वरवरील सात रंगाची माती  


वरच्या
पठारावर कौलारू घरे, काहींना पत्र्याचे छत आहे तर काहींना गवताने तयार केलेल्या गवती भिंती पावसापासून घरे वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या आहेत.  कारण इथे खूप पाऊस पडत असतो, वाराही जोराचा असतो त्यामुळे पावसाच्या मुसळधार सरींपासून त्या गवती भिंती घराचे संरक्षण करतात. रायरेश्वरवर रायरेश्वर मंदिर,गोमुखतळे,नाखिंदा खिंड,पांडवलेणी, शिडीपासून सूर्योदय सूर्यास्त, गडावरून नीरा देवघरधरण या गोष्टी प्रामुख्याने पाहण्यासारख्या आहेत.

मागच्या वर्षी थोडेसे हिरवेगार असताना रायरेश्वर फिरलो होतो.त्यावेळची ती रंगीबेरंगी फुले, वाहते झरे,धबधबे,हिरवेगार डोंगर,गार हवा,ऊनसावलीचा खेळ ते वातावरणच वेगळे असते.हे सर्व अनुभवले होते परंतु या ठिकाणी असलेली सात प्रकारची माती मात्र अजून एकदाही प्रत्यक्षरित्या पाहिली नव्हती. शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आज आम्ही पाहिली हातात घेतली आणि पुड्या बांधून घरी देखील आणली. खरंच ही अशी निसर्गाची किमया सह्याद्रीत पहावयास मिळते त्यासाठी आमच्यासोबत ट्रेक करावा लागतो बर का? सात प्रकराची माती ही रायरेश्वरमंदिरापासून किमान  किमी अंतरावर आहे. माती घेऊन आलो आणि दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

रायरेश्वरवरून  घरी आणलेली सात  रंगांची माती 

खरोखर ट्रेक दरम्यान मिळालेल्या गरमागरम आणि चविष्ट जेवणाची किंमत तुम क्या जाणो घरी बसणाऱ्या बाबू. जेवणानंतर क्षणभर विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. ट्रेकचे दोन दिवस भर्रकन कसे गेले समजलेदेखील नाही. परतीच्या वाटेला लागल्यावर भोर येथील झुलता पूल आणि तेथील नागेश्वर मंदिर पाहूनच निघालो. आंबवडे गावातल्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय आहे. ओढा ओलांडण्यासाठी 'सर जिजीसाहेब सस्पेन्शन ब्रिज' नावाचा पूल आहे. १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली. याची रुंदी फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे. पुलाच्या दोन्ही अंगास अर्धवर्तुळाकार कमानी आहेत. कमानीच्या माथ्यावर आणि शेजारी पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे फलक आहेत.
झुलता पूल 


वीरगळीविषयी माहिती  देताना लिडर मनोजसर 

हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजीसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.पलीकडच्या तीरावर एका मोठ्या इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजीसाहेब यांचा शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला अर्धपुतळा आहे.समाधी असलेल्या इमारतीशेजारून नागेश्वर मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच वळणावळणाच्या पायर्या उतरून गेले की नागेेश्वराचे मंदिर येते. मंदिराच्या भोवती फरसबंदी प्रांगण, तट, ओवर्या, पाण्याची कुंडेे पाण्याचे वाहते प्रवाह आहेत.पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे.

आंबवडे गावाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उड्या घेत धावत असतो. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना असल्याने पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत.या ठिकाणी वीरगळी पाहावयास मिळाल्या लीडर मनोज सरानी वीरगळीविषयी माहिती दिली आणि झुलत्या फुलावरून धावत धावत झुलत झुलत जाऊन गप्प बसमध्ये बसलो आणि पुणेकडे रवाना झालो. पुण्यात पोहोचताना एक-एकाला स्टॉप सोडताना तर गंमतच होती. व्हॅलेंटाईन डे असल्याने खुश होऊन ट्रेकर आनंदाने काहीही म्हणत होते. सर मला इथे टाका सर मला तिथे टाका. अरे टाका काय? मला या स्टॉपला उतरवा म्हणा की. फिरंगीयोने व्हॅलेंटाईन डे सणाची वाट दाखवली पण आपण त्या "प्रियजन डे"ची  पार वाट लावलीये. व्हॅलेंटाईन डे स्पेशल उत्तम रेंज ट्रेक आयोजित केल्याबद्दल चारही लीडर्सचे धन्यवाद आणि सर्व ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्सचे बेस्ट फोटोग्राफीसाठी कौतुक. परवा सुचलेला काल लिहिलेला ताजा उखाणा, नसिबवालों को लाईफ पार्टनर ट्रेकवालेच मिळत्यात. पण जेव्हा एकसाथ ट्रेकला जात्यात तेव्हा एकमेकांना नजरेनेच गिळत्यात. आणि घरी जाऊन एकमेकांना तुफानी छळत्यात, कारण एकमेकांच्या डोळ्यात त्यांचे फ्रेंडमंडळी सलत्यात. भयंकर डोकं दुखत असताना मला असले गोडविंचू उखाणे सुचत्यात. भेटू सह्याद्रीत शानदार ट्रेकसाठी.