Friday 29 October 2021

सह्याद्री के सर का "ताज"

"ताज"

सह्याद्रीचा मुकुट "AMK" ट्रेक

चढाई श्रेणी ,- अतिकठीण

ठिकाण - इगतपुरी

ग्रुप- डोंगरयात्रा ट्रेकग्रुप पुणेl

दिनांक - २३-२४ ऑक्टोबर २०२१

डोंगरयात्रा बॅनर फोटो 

अलंग मदन आणि कुलंगगड म्हणजे महाराष्ट्रातील माउंट एवरेस्ट आहेत. हे तीन गड सह्याद्रीचा मुकुट आहेत. हे तीन गड करायचे म्हणजे ट्रेकरला थोड्या कठीण ट्रेकचा किंवा रेंज ट्रेकचा सराव पाहिजे. रॉक क्लायंबिंग आणि रॅपलिंगचा अनुभव असेल तरच हे गड आपण सर करू शकतो. कोरोनाकाळातील डोंगरयात्राचे ट्रेक म्हणजे जणू या त्रिकुटासाठीचा सरावच होता. एकदिवसीय ट्रेक करणारी मी कोरोनाकाळात ट्रेकगृपचे ट्रेक बंद असल्याने कुठे वेगळा ट्रेक असेल का? कोणता गृप ट्रेकसाठी मिळेल? या शोधात असताना डोंगरयात्रा ग्रुपसोबत एखादा रेंज ट्रेक करू असा विचार करून जीवाटचाल सुरु केली ती थांबलीच नाही. कारण या ग्रुपचे ट्रेक वेगळे असतात शिवाय आठवड्याला ट्रेक असल्याने चारपैकी एक ट्रेक तरी जमवून करत गेले. आयुष्यात “AMK”हा ट्रेक करायचा होताच परंतु या त्रिकुटाविषयी फार काही ऐकले होते. रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग करायला लागणार होते. त्याची माहिती आणि सराव काही नव्हता. आमची रेंजट्रेकची कुवत पाहून डोंगरयात्राचे लीडर मनोज सरांनी विश्वास दाखवला की मॅडम तुम्हाला जमेल. सर म्हणतात म्हणजे जमेल आणि आपली कुवत तपासायची असेल तर एकदा परीक्षा दिल्याशिवाय कसे कळेल?? त्यामुळे कोणालाही जोडीला न घेता मी एकटीने हिम्मत करून AMK ट्रेक बुक तर केला परंतु पूर्ण होईल तेव्हाच सगळ्यांना सांगणार असे मनोमन ठरवले. हा ट्रेक बुक केला आणि एक आठवडा आधी अचानक डोंगरयात्राने भैरवगड ट्रेक लावला कुठून आग डोक्यात आग लागली आणि तो बुक करून आधी तो करून आलो. तो कसाबसा पूर्ण केला. आणि पावसामुळे अलंग- मदन-कुलंग ट्रेक थोडा पुढे घेतला ते माझ्यासाठी फार चांगले झाले.

शुक्रवार दिनांक २२ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास निगडीहून निघून नाशिकफाटा-मंचर-खेड-बोटा-ब्राह्मणवाडा-कोतुळ-राजूर-बारीमार्गे पहाटे साडेचारच्या सुमारास AMKचे पायथ्याचे गाव आंबेवाडीत पोहोचलो.ट्रेकग्रुप लोगोचे बॅच,हेल्मेट,हार्नेस,ओआरएस प्रत्येकाला दिले आणि नेहमीप्रमाणे फॉर्म भरून घेतले.लीडर्सने ट्रेकविषयक आवश्यक सूचना दिल्या. डोक्याला बॅटरी आणि हातात ट्रेक स्टिक आणि पाठीवर दोन दिवसाचे सॅकचे ओझे घेऊन ट्रेकला पहाटेच सुरुवात केली.

पहाटेच्या अंधारात माझ्या कॅमेऱ्याने टिपलेले ट्रेकर्सचे ताजे चेहरे 

यावेळी आमच्यासोबत डॉक्युमेंटरी करणारी ३ मुलांची टीमदेखील होती. भल्यापहाटे तो ड्रोन डोक्यावरून फिरताना भारी वाटत होते. प्रत्येकाला वाटत असेल आपलाच त्यात क्लोजअप येईल अशा जोमात ट्रेकर पोज देऊन चालत होते. पाऊस आत्ताशी कमी झाल्याने ओढे अजून वाहत होते त्याचा झुळूझुळू आवाज येत होता. सुरुवातीलाच बिबट्याने दर्शन दिले. पण तो फक्त लीडर मनोज सर आणि फार थोड्या लोकांनाच दिसला. त्याचे डोळे चमकले थांबला आणि त्याच्या वाटेला शांतपणे निघून गेला. जंगलातील प्राणि कधीही आपण त्यांना त्रास दिल्याशिवाय आपल्यावर हल्ला करीत नाहीत. आता आपण त्यांच्या राज्यात जातो त्यामुळे आपण गप्प निसर्गाचे, जंगलाचे नियम पाळत चालत राहायचे. रात्रीच्या शांततेत उगाच ओरडणे,गाणी गाणे टाळावे. वाट चुकू नये यासाठी आम्ही एकमेकांमध्ये तीनचार फुटाचे अंतर ठेवूनच चालत होतो.
सूर्योदय होताना 

सकाळी सहाच्या सुमारास आम्ही एकमेकाला बिनबॅटरीचे दिसू लागलो होतो कारणही तसेच होते. सूर्य उगवत होता आणि कोवळा प्रकाश पडू लागला. त्याठिकाणी पहिला थांबा आणि थोडक्यात ओळख परेड झाली.सूर्यदेव उगवला आणि सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये अलंग,मदन,आणि कुलंग हे त्रिकूट जणू न्हाउन निघाले आणि सोनेरी दिसू लागले.

अलंग, मदन, कुलंग रांगेचे पहिले दर्शन 

त्या तीन त्रिकुटाचा अवाढव्य पसारा पाहून मला तर धडकीच भरली होती कारण AMK ट्रेकसाठी मी पहिल्यांदा आलेय आणि ती दोन दिवसाचे सामान आणि पाणी असलेली नेहमीपेक्षा थोडी वजन सॅक घेऊन दोन दिवस कसा मी गड चढणार आणि ते रॉक क्लायम्बिंग आणि रॅपलिंग करणार देवालाच ठाऊक. जो होगा वो तबका तब देखा जायेगा. चालताना पानाच्या फांद्या सटासट तोंडावर लागत होत्या त्यामुळे टोपी आणि तोंडावर एखादा पातळ रुमाल बांधलेला बरा. एक तास पुढे गेल्यावर एका मोठ्या शिळेवर योध्याची मूर्ती आणि शस्रास्रे कोरलेली आहेत.
शिळेवर कोरलेले योध्याचे चित्र आणि शस्रास्रे 
आपण ती शिळा अलंगगुहेकडे जाण्याची एक मोठी खूण म्हणून वापरू शकतो. त्या शिळेकडे तोंड केले असता उजव्या हाताला चालत राहिले आणि थोड्या अंतरावर खडा चढ चढत गेले की वरती काही ठिकाणी छोट्या छोट्या तुटलेल्या आणि काही चांगल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आणि झाडी पार केली की आपण वरती एका गुहेत पोहोचतो. उजव्या बाजूला नजर टाकताच हिरव्यागार डोंगररांगा खुणावत होत्या. हरिहर किल्ला आणि नाशिकमधल्या बऱ्याच डोंगररांगा पुसटशा दिसत होत्या.

फ्रेममध्ये प्रमोद, चेतन, अक्षयसर 

सकाळी आठच्या सुमारास त्या गुहेत पोहोचलो. ही अलंगवरची मुख्य गुहा आहे. इथून पुढे एक रॉकपॅच आणि नंतर मोठा नव्वद अंशाचा रॉक पॅच पार करून अलंग गडाच्या माथ्यावर क्यालम्बिंग करून जायचे असल्याने सगळ्यांनी सॅक तिथेच ठेवल्या.त्यातील महत्वाच्या वस्तू,पाणी, मोबाईल घेऊन आम्ही पुढे निघालो. मी माझी सॅक घेतली कारण मी यावेळी माझा नवा गो प्रो-९ ट्रायलसाठी आणला होता तो मला  सांभाळून न्यायचा होता.  गुहेत आमच्याशिवाय फार ग्रुप नव्हते एक जोडपे होते जे आपल्या २वर्षाच्या मुलीला घेऊन आले होते. ती छोटी मुलगी झोप आल्यामुळे रडत होती. तिच्या बाबांना तिला अलंगगडावर न्यायचे होते. घरी आल्यावर इंस्टावर त्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडीओ पहिला ते त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन अलंगगडावर गेलेच.

अलंग  गडावरील गुहा 

आम्ही त्या गुहेतून निघालो आणि सुरक्षितता म्हणून एक रॉकपॅच पार करून नव्वद अंशाच्या रॉकपॅचजवळ गेल्यावर मात्र मला तर धडकीच भरली. विडिओमध्ये पाहिलेल्या रॉकपॅचपेक्षा प्रत्यक्ष सरळसोट मोठाच्या मोठा दिसणारा खडक काही करून चढून जाणे म्हणजे मोठी परीक्षा होती. मनात भीती होती परंतु डोंगरयात्रा ट्रेकग्रुप सोबत आलोय शिवाय तांत्रिक साहित्य सोबत आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही. लीडरने अशा कठीण ट्रेकला आम्हाला सोबत आणताना आमच्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी आम्हा ट्रेकर्सना प्रयत्न तरी केले पाहिजेत. एकेक ट्रेकर हार्नेस,हेल्मेट घालून मोबाईल दुसऱ्याच्या हातात देऊन चढाई करत होता.


अलंगगडावरील पहिला रॉकपॅच 

आमच्यातील खूप लोक पहिल्यांदाच AMK ट्रेकसाठी आले होते त्यामुळे प्रत्येकाला चढाईचा व्हिडीओ करायची उत्सुकता होती. लीडर्सने स्वतः रॉकपॅच कसा चढायचा ते सांगितले आणि प्रात्यक्षिकदेखील दाखविले मग मात्र हिम्मत आली. दोन लीडर रॉकपॅचच्या पायथ्याला थांबून एकेक ट्रेकर्सना सोडत होते. दोन तीन लीडर आणि तांत्रिक मंडळ रॉकपॅचच्या वरच्या बाजूला थांबून दोर हार्नेसचा कारभार सांभाळून हार्नेस,दोर,हेल्मेट खाली सोडत होते. आणि वर चढाई करून गेलेले आमचे ट्रेकर्स मोबाईलने फोटोशूट आणि विडिओशूटिंग करत होते.
नव्वद अंशाचा रॉकपॅच 

आमच्यासोबत रामसर आणि भावेश,अभिजित, सागर यांची टीम ड्रोन घेऊन सज्ज होती. डॉक्युमेंटरीसाठी लागणारे सामान शिवाय ट्रेकिंगचे दोन दिवसाचे सामान अस सगळं सोबत घेऊन फिरणारी माणसे म्हणजे खूप ग्रेट आहेत. पण जिथे जिद्द आणि पॅशन आहे तेच लोक असे कार्य करू शकतात. नव्वद अंशाचा रॉकपॅच पार केल्यावर वर अगदी थोडी जागा आणि छोटीशी गुहा आहे. ती गुहा जणू एक छोटे स्वयंपाकघर आहे असे वाटते. हेल्मेट हार्नेस इथे बसून घालण्यासाठीच जणू ही खास खोली आहे असे वाटले. या मोठ्या खडकातील गुहा बनवताना काय मेहनत लागली असेल याची आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो. 
अलंगगडावरील पाण्याचे टाके 

भग्नावस्थितीतील मंदिर 

अलंग गडावरील शिलालेख 

माझ्या आणि सगळ्यांच्याच दृष्टीने मोठा कठीण रॉकपॅच पार केला आणि एक परीक्षा पास केल्याचे समाधान मिळाले. वरचे पायऱ्यांचे थोडेसे कठीण पॅच पार करत-करत अलंग गडावरच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. अवाढव्य पसारा असलेला अलंगगड डोळ्यात मावत नव्हता. त्यात आजूबाजूच्या हिरव्या डोंगररांगा, निळेशार आकाश, दूरवर पसरलेली अथांग जलाशये काय सुंदर चित्रात रेखाटल्याप्रमाणे दिसत होती. गडावर पोह्याचा नास्ता केला आणि गडावरील पाण्याची टाकी, वर असलेली गुहा, एका ठिकाणी उभी असलेली कातळ भिंत, शिलालेख असं सगळं सगळं लीडर्सने दाखवून इत्यंभूत माहिती दिली. कठीण ट्रेकला पुन्हा येऊ न येऊ तेथील ऐतिहासिक वस्तू, वास्तू म्हणजे आपल्या लढवय्यांच्या पाऊलखुणा आहेत त्यांना नमन करून आलेच पाहिजे, गडकिल्ले फिरताना कोपरांकोपरा मी कॅमेऱ्यात टिपत असते. हे क्षण परत मला मिळतील न मिळतील म्हणून मी वर्तमानात मनसोक्त जगत असते. सोबत असणाऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात ह्या मॅडम प्रत्येक ट्रेकमध्ये इतके फोटो आणि विडिओ शूट करतात तर इतकं सगळं कुठे ठेवत असतील?? किती जागा लागत असेल या सगळ्यासाठी?? संगणक भरला की काही पेन ड्राइव्ह आहेत. आता तर दोन मोठ्या हार्टडिस्क आणल्यात कारण मला मी लिहीत असलेल्या लेखासाठी या सगळ्या गोष्टी हव्या असतात. युट्युबच्या व्हिडिओसाठी हव्या असतात आणि आठवण म्हणून साठवायला आवडते. प्रत्येक गोष्ट उपयोगाची असली तरच आपल्याकडे ठेवायची असा माझा समज आणि स्वभाव नाही. घरातील जुने व्यक्ती आपण टाकून नाही देत ना?? ते आपल्याला हवेच असतात उलट त्यांना आपण जास्त जपतो कारण ते जर गेले तर पुन्हा कधीही मिळत नाहीत. तसेच जुने फोटोग्राफ्स मला हवे असतात. एखाद दिवस वेळ असला की मी फक्त दोनदा क्लिक केलेले फोटो व्हिडीओ फक्त डिलीट करते ठराविक ऐतिहासिक पाऊलखुणा मात्र सांभाळून ठेवते.

मी 

अलंग महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.अलंगगडची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फुट इतकी आहे. चढाईची श्रेणी अत्यंत अवघड आहे ठिकाण अहमदनगर जिल्हा,जवळचे गाव इगतपुरी आहे डोंगररांग कळसुबाई सध्याची अवस्था ठीक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे.परंतु ट्रेकर्स आणि क्लायंबर्सच्या दृष्टीने कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत. गडावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. गडावर अकरा पाण्याची टाकी आहेत. या टाक्यातील पाणी स्वच्छ आहे ते आपण पिऊ शकतो.  किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाईचा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा निवांत फिरण्यास ४ तास पुरे होतात . वरती जेवणाची सोय नाही. आपण आपले सामान घेऊन जाऊन स्वतः जेवण बनवू शकतो. झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग किंवा शाल,चादर घेऊन जाऊन गुहेत झोपू शकतो परंतु या तीन ठिकाणी इतर ट्रेकिंग ठिकाणासारखी फार रहदारी नसल्याने गुहेत साप असतात त्यापासून सावधानता बाळगलेली चांगली. कारण इथला विषारी साप चावल्यास माणूस वाचवायला पायथ्याला जायला किमान ४-५ तास लागतात. एकतर सोबत सर्पमित्र, डॉक्टर, आणि प्रोफेशनल क्लायम्बर्स, तांत्रिक सामान आणि तांत्रिक मंडळ असलेले उत्तम. 

फ्रेममध्ये शिवम 

फ्रेममध्ये रुपाली मॅडम 

फ्रेममध्ये सपोर्टिव्ह टीम विवेक 

गडमाथा फिरून झाल्यावर आम्ही गड उतरायला सुरु केले. चढतानाच रॉकपॅच पार करताना कोणी विडिओ काढला असेल नसेल पण आता रॅपलिंगचा व्हिडीओ तरी काढू असा विचार करून नंबर येईपर्यंत छोट्या गुहेत तयारीत थांबलो. प्रमोदसरांच्या हातात मोबाइलला देऊन रॅपलिंग सुरु केले आणि आता मात्र आत्मविश्वास आला. म्हटलं जरा ते रॅपलिंग करताना उड्या मारत उतरता येते का ते पहावे. असं म्हणत प्रयत्न केला आणि जमलेच. खरंच मला स्वतःला खूप भारी वाटले. कारण याच महिन्यात भैरवगड ट्रेक केला होता परंतु रॅपलिंग करताना माझा हात मागे जात नव्हता त्यामुळे बकेट रॅपलिंगने मी उतरले होते त्यामुळे उड्या मारत उतरण्याचा आत्मविश्वास नव्हता. तो उड्या मारत उतरण्याचा आत्मविश्वास अलंगगडावर रॅपलिंग करताना आला असे मी म्हणेन. त्यानंतर अजून एक रॉकपॅच उतरून दुपारी बाराच्या सुमारास पहिल्या गुहेजवळ आलो. सगळे ट्रेकर्स उतरेपर्यंत दुपारचा एक वाजला. रात्री घरून आणलेला आमचा डबा काढून जेवून घेतले आणि मदनगडाकडे वाटचाल सुरु केली.

टेक्निकल टीम एकनाथ सर 

अलंगगडाला वळसा घालून जाताना ट्रेकर्स 

गोड मुलगी गीत 

महाराष्ट्र रेंजर्सचे लीडर जयेश हरड वाटेत भेटले. 
जाताना त्या गुहेत ठेवलेले इतर सामान घेऊन सर्व ट्रेकर्स निघालो. डॉक्युमेंटरी करणाऱ्या टीममधील एकाला ते अतिजड सामान घेऊन चालणे शक्य होत नव्हते. सवय नसेल आणि थकल्यावर असे होणे स्वाभाविक आहे. पण थोड्या वेळाने त्याने पुन्हा बेरिंग घेतले आणि चालू लागला. एकमेकांच्या संगतीने असे शक्य होते नाहीतर असे कठीण ट्रेक करणे सामान्य माणसाचे एकट्याचे काम नाही. माझ्या माहितीतील स्वर्गीय अरुण सावंत सर आणि सोलो ट्रेल करणारे त्यांचे शिष्य सुरज, डोंगरयात्राचे लीडर्स, सह्याद्रीतील शिवदुर्ग टीम,महाराष्ट्र रेंजर्स,पुणे ट्रेकर्स, चक्रम हायकर्स सारख्या असंख्य एक्स्पर्ट लोकांचेच काम आहे ते. यासारख्यांनीच ते करावे. यासर्वांकडूनच आम्हाला असे कठीण ट्रेक पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते.
फ्रेममध्ये रुपाली,प्रमोद,करन,भूषण,अजिंक्य, अक्षय,डॉक्टर सिंद्धांत,ओंकार आणि मी 

फ्रेममध्ये लीडर रवी सर,चेतन, रुपाली, मी  


मदनगडावरील रॉकपॅचजवळ रोप लावताना एकनाथ दादा 

मदनगडाकडे जाताना अलंगच्या कडेकडेने कारवीच्या जंगलातून छोट्या वाटेने चालत राहिलो. सध्या कारवी हिरव्यागार असल्याने किमान आधाराला तरी होत्या. पण म्हणून त्यांच्या फांद्यांना धरून उतरणे म्हणजे वेडेपणा ठरतो. आपल्या हातातील ट्रेकस्टिकदेखील कधीकधी कामा येत नाही. AMK ची वाटच फार खडतर आहे म्हणून तर तो कठीण श्रेणीत मोडतो. अलंगला ट्रॅव्हर्स मारत-मारत म्हणता-म्हणता मदनच्या कुशीत बसत-बसत साडेचार ते पाचच्या सुमारास मदनच्या रॉकक्लाइंबिंग पॅचजवळ पोहोचलो कारण त्या पॅचला फार थोडी आणि निमुळती जागा असल्याने आणि खाली दरी असल्याने ट्रेकर्सना क्लाइंब करून वर सोडायला थोडा वेळ लागत होता. पेशन्स फक्त लीडर्सचेच असावेत. लीडर्स हो सलाम तुम्हाला. कुठेही रेलिंग नसलेले,कसलाही आधार नसलेले जिने पार करत मदनगडाच्या माथ्यावर पोहोचायचा प्रयत्न करीत होतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास मदन गडाला ट्रॅव्हर्स मारत-मारत अलंगचे स्मितहास्य न्याहाळत मदनगडाच्या माथ्यावर पोहोचलो. मदनगडावर जेवण बनवणारी एकनाथ दादाची टीम जमेल तिथून जेवणासाठी लाकडे जमा करून ते रॉक क्लायंबिंग करूनच जात होते. सर्व टिमच कमाल होती.

मदनगड चढताना मी 

मामा द हिरो 

वरती एकही झाड नाही की झोपडी नाही. फक्त पाण्याचे टाके आणि एक गुहा आहे. आम्ही वर पोहोचताच त्या गुहेत आमच्या बॅगा मधोमध ठेवल्या आणि मदनगडाच्या एकदम वरच्या ठिकाणी जाऊन सूर्यास्ताची वाट पाहत बसलो. या ठिकाणाहून अलंग आणि कुलंग दोन्ही गड दिसत होते.

मदनगडावरून दिसणारा सूर्यास्त आणि कुलंगगड 

गर्ल्स गॅंग 

फ्रेममध्ये डॉक्टर सिद्धांत , प्रमोद, मनोज सर आणि सूर्या 

अलंग गडाचा विस्तीर्ण पसारा पाहून विश्वास बसत नव्हता की सकाळी आम्ही त्या गडावर जाऊन आलोय. सध्या आम्ही मदनगडाच्या सगळ्यात उंच ठिकाणी बसून मनसोक्त फोटोग्राफी करण्यात मग्न होतो. आजूबाजूला दूरवर अनेक छोटी मोठी धरणे, तलाव नजरेस पडत होते. एका ठिकाणी जास्त पाणी होते तो भातसा डॅम असावा. जवळ दिसत होते ते भावली डॅम, गव्हांडे डॅम. सूर्यास्त होताना सूर्याचा गोळा लाल भडक होऊन अस्ताला गेला. सूर्य उगवताना आणि मावळताना आपण त्याच्याकडे एक टक पाहात बसतो दोन्ही वेळेला तो इतका सुंदर दिसत असतो. अस्ताला जाताना उद्या पुन्हा उगवून सारे जग प्रकाशमान कारेन अशी ग्वाही देऊन जातो जणू. याठिकाणी बॅनरफोटो व्हायला हवा होता. कठीण ट्रेकदरम्यान हाच काय तो विश्रांतीचा क्षण अनुभवून हृदयात साठवून संध्याकाळचा चहा पिण्यासाठी गुहेजवळ गेलो. गडावर गुलाबी शर्टवाल्या मामांनी पेटवलेली ती चूल, चुलीवर ठेवलेले ते पातेले, त्या चुलीतून निघणारा धुराचा लोट,चहाचा मंद सुवास सगळं काही जादुई होते. चुलीवरचा चहा,गडावरचा चहा पंचतारांकित हॉटेलच्या चहाला सुद्धा लाजवेल.

मामा 

मदनगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४९०० फूट इतकी आहे.  गडावर जाण्याच्या मुख वाटा दोन आहेत. एक आंबेवाडीमार्गे आहे आणि दुसरी घाटघर मार्गे एक वाट आहे. त्यासाठी घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. या वाटांनी किल्ला गाठण्यास जवळपास पाचसहा लागतात. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या डोंगररांगांमध्ये अलंग आणि कुलंग गडांच्या मधोमध मदनगड स्थित आहे.ह्या गडाचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा असे या गडाच्या स्थितीवरुन वाटते.

मुंबईकर अक्षय 

फ्रेममध्ये लीडर रवी सर, चेतन, आणि मी 

गडावर जेवणाची सोय नाही. पायथ्याच्या गावातील जेवण बनवणारे दादा आपण घेऊ जाऊ शकतो किंवा आपले आपण साहित्य नेऊन जेवण बनवू शकतो.गडावर दोन पाण्याची टाकी आहेत. एक मोठी गुरूही आहे. त्या गुहेत एकावेळी तीस ते चाळीस माणसे विश्रांती करू शकतात. परंतु या गुहेत प्रवेश करताना आणि गुहेत गेल्यावर गुहेचे सगळे कोपरे तपासून घ्यावेत. संध्याकाळच्या वेळी इथे विषारी साप आढळतात त्यामुळे सॅक उघड्या टाकून गडमाथा फिरायला जाऊ नये शिवाय गुहेच्या कडेला सॅक ठेवू नये आणि आपण देखील गुहेच्या कडेला झोपू नये. इथे जास्त रहदारी नसल्याने सापांची वस्ती आहे. डोक्यावर बॅटरी हवीच आणि हातातील काठी आपटतच जावे. असलेला साप थोडा बाजूला तरी होईल. गुहेच्या दारातच साप येऊन बसतात ते आपल्याला काही करीत नाही. परंतु आपला पाय त्यांच्यावर पडला तर ते त्यांच्या सुरक्षेसाठी दंश करू शकतात. नजर हटी दुर्घटना घटी.  मामांच्या हातचा चवदार चहा पिऊन तिथेच एका खडकावर बसून गप्पा मारल्या. आम्ही लेडीज गॅंग डोक्यावरची बॅटरी लावून हातात काठी घेऊन गुहेकडे निघालो. हातातली बॅटरी किंवा मोबाईलची बॅटरी नकोच. कठीण ट्रेक असो किंवा एकदिवसीय ट्रेक असतो रात्रीच्या ट्रेकवेळी डोक्याला अडकवता येणारी बॅटरीच हवी. लीडर्स दहादा सांगतात पण काही लोक ऐकत नाहीत. या बॅटरीमुळे आपले हात कठीण पायऱ्या उतरताना मोकळे राहतात. आणि उजेड आपल्या पायात पडतो शिवाय पुढाच्यालादेखील त्याचा फायदा होतो. गुहेच्या दारात पोहोचताच तिथे दारात साप पाहुणे बसलेलेच होते.  त्यांचे ते आरामासाठी आले असावेत. लीडर्स आणि टेक्निकल टीम एकनाथ दादाने त्यांना बाजूला सोडून आले. कसे असते ना ??लीडर्स जेव्हा इतके कठीण ट्रेक करतात आणि सह्याद्रीत इतक्या ठिकाणी फिरतात की त्यांना सापांविषयी आणि साप कसा पकडावा?? कोणता साफ विषारी? कोणता साप बिनविषारी? इतकी माहिती असतेच आणि आहेच. त्यामुळे आपल्याला फार घाबरून चालत नाही आणि लीडर्सवर विश्वास ठेवावा आणि त्यांचे म्हणणे तंतोतंत ऐकले पाहिजे. अशा खडतर परिस्थिती तर लीडर्स आणि अनुभवी ट्रेकर्स जे सांगतील ते सगळं ऐकावे आपल्याला फायदाच होतो. एकीकडे मामांचे चुलीवर जेवण बनविणे चालू होते. गुहेत जाऊन सगळ्या बॅगा मधोमध एका मॅटवर ठेवून आम्ही पुन्हा त्या खडकावर जेवण करावयास बसलो. आता मात्र अंधार झाल्याने थोडी सावधानता बाळगून बॅटऱ्या चालू ठेवून गरमागरम जेवण करून घेतले.मामांनी घरून बनवून आणलेल्या चपात्या,शेवभाजी,गरमभात,लोणचे असा फक्कड बेत झाल्याने पोट आणि आत्मा शांत झाला.

AMK चा खडानखडा माहित असलेले एकनाथ दादा "द हिरो" 

आता गरज होती दिवसभर थकलेल्या शरीराला विश्रांतीची. कारण सकाळी पुन्हा पहाटे उठून कुलंग गडाकडे निघायचे होते.   पुन्हा एकदा सगळ्या बॅगा मॅट तपासून आपापल्या स्लीपिंग बॅग उघडून पायातले बूट न काढता आम्ही आडवे झालो. मुलींना मधोमध झोपायला सांगितले आजूबाजूला मुलांना स्लिपपिंग बॅग काढून झोपा म्हणून सांगितले. इतके थकलो होतो तरी झोप येत नव्हती. आम्ही किमान आमच्या मॅटवर आडवे तरी झालो होतो.सगळे लीडर्स आणि एकनाथ दादा बिचारे आमच्यासाठी रात्रभर पहारा देत जागेच होते. एकदोन साप पकडून बाटलीत भरून ठेवले आणि सकाळी त्यामुळे आमची काही तास तरी झोप झाली. आमच्याशिवाय दोनचार मुलांचा एक ग्रुप आणि डॉक्युमेंटरी टीमने बाहेरच एक टेन्ट लावला होता. बिचारे झोपले नाही झोपले त्यांनाच ठाऊक. ट्रेकदरम्यानची अशी खडतर रात्र पहिलीच असेल असे लीडर्स म्हणाले. खरंतर पाऊस आत्ताच संपला आणि इथे ट्रेकर्स रहदारी जास्त नसल्याने असा अनुभव येतो. परंतु एक्सपर्ट लीडर्सना सोबत घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे. मला माझ्या दुखऱ्या हाताने सॉलिड दमवले होते परंतु जे रॉकपॅच चढून गेलो ते उतरणे भाग असते. त्यामुळे सर, मला चक्कर येते हे दुखते ते दुखते या सगळ्याला कोणी विचारत नाही. हाहाहा. गुमान सॅक घ्या हार्नेस, हेल्मेट अडकवा आणि उड्या मारत रॅपलिंग करत उतरा तरच पुन्हा ट्रेकला आणणार नाहीतर घरीच बसा.
इन्स्टा, फेसबुकला धुमकुळ घालायचा असेल तर कॅमेऱ्याकडे हसत हसत बघा.हा नियम फिक्स आहे. फोटो काढतात सगळे पण जयु मात्र पडद्यावर दिसते. बाकी सगळे छुपे रुस्तम आहेत बर का?? पण आपण पण कोणाच्या बापाला घाबरत नाही. कॅमेरा आपला हात आपले. कितीही फोटो काढा, विडिओ करा ट्रेकमध्ये कायम पुढे थांबा म्हणजे कोणाचा बोलायचा सवाल येत नाही. तरीही काही लोक बोलणार त्यांच्या बायकोचं जेवणच अळणी होणार, लोणचं पांचट होणार. हाहाहाहाहाहाहा.

पहाटे साडेचारला उठून पाण्याने फक्त चूळ भरून गुहेतून आमचे सामान जमा करून हार्नेस आणि हेल्मेट घालून मदनगडवरून निघालो. अंधार असल्याने थोडी दिक्कत होत होती. पुन्हा तेच दगडी जिने उतरून त्या रॅपलिंग पॅचजवळ नंबर लावून थांबलो होतो. एकीकडे सूर्योदय होत असल्याने कळसूबाईची डोंगररांग सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाली होती. अतिशय सुंदर,प्रसन्न वातावरण होते.

कळसुबाई रांग आणि सूर्योदय 


रॅपलिंगसाठी तयारी 


पहाटे अंधारात मदनगड उतरताना 

सॅक घेऊन रॅपलिंग पॅच पार करून पुन्हा ते रेलिंग नसलेले दगडी जिने, छोटी पाऊलवाट पार करून मदनगडला वळसा घेत मदन आणि अलंगच्या खिंडीत येऊन थांबलो. मामानी चूल पेटवून मॅगीची तयारी सुरु केली. आमच्याकडचे एकेक बाटली पाणी आम्ही मागणीसाठी दिले कारण त्या ठिकाणी पाणी नव्हते आणि आम्ही मदनगडावरून पाणी भरून आणले होते. शिवाय पुढच्या कुलंग गडावर पाण्याच्या टाक्या होत्या.

अलंग-मदन खिंडीतील मॅगी आणि चहा 

मस्त अनलिमिटेड मॅगी गरम-गरम चहा फस्त करून ड्रोनने बॅनरफोटो घेतला आणि त्या खिंडीतून कुलंगगडाकडे निघालो. मदनला पश्चिमेकडून वळसा घालत-घालत मदन आणि कुलंगच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीतून कारवीच्या जंगलातून छोट्या पाऊलवाटेवरून कुलंगकडे चालत राहिलो.
दोन गड केल्याने सगळेच थकले होते. काहींचा चालण्याचा वेग कमी काहींचा जास्त होता. म्हणता-म्हणता सकाळी दहाच्या सुमारास कुलंगच्या पायऱ्यांजवळ येऊन पोहोचलो.
कुलंगगडावरील पायऱ्या 

आमच्यातील चारपाच जणांना ज्यांना यायचे नव्हते ते एका लीडरसोबत गडाच्या पायथ्याकडे निघाले. आम्ही कुलंगच्या पायऱ्यांजवळ आमच्या सॅक ठेऊन कुलंगमाथ्याकडे निघालो. आमच्या सॅकजवळ रवी सर थांबले. सॅक थोडा वेळ का होईना खाली ठेवल्याने हलके वाटले परंतु खडा चढ असल्याने सॉल्लिड जीवावर आले होते. परंतु कुलंगवर जायचेच होते त्यामुळे हळूहळू का होईना चालत राहिलो. प्रमोदसर बारामती आम्हाला घेऊन कुलंग माथ्यावर निघाले. अर्ध्या तासात कुलंगच्या पहिल्या कमानीजवळ पोहोचलो. या कमानीचा आकार घुबडाच्या आकाराचा असल्याने त्याला घुबड दरवाजा असे म्हणतात.
कुलंगगडावरील पहिली कमान (आकारामुळे या कमानीला घुबड खिडकी म्हणतात )

कुलंग गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४८२२ फूट इतकी आहे.घुबड खिडकीतुन पुढे चढत राहिले की कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून दारातून गडप्रवेश होतो. कुलंगगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.गडावर जाण्यासाठी दगडातून कोरलेले जिने आहेत. काही सुस्थितीत आहेत तर काही तुटलेले आहेत. काही ठिकाणी दगडातून कोरलेल्या गुहा आहेत. त्या सैनिकांच्या देवडया असाव्यात. या कमानीतून वर गेल्यावर एक गोमुखी दरवाजा लागतो हा गडाचा मुख्य दरवाजा आहे.येथून गडावर पोहोचल्यावर पूर्वेकडे खाली गेल्यावर अनेक पाण्याची टाकी लागतात.

कुलंगगडवरील पाण्याची टाकी 
यातील काही टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर एक मोठी टेकडी आहे. हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. त्याखाली गेल्यावर एक दगडी बांध घातला असून त्याच्या शेजारी दोन पाण्याची टाकी कोरलेली असून हा भाग पाहण्यासाठी खूप छान आहे. येथे असलेल्या दगडी बांधावर एक खिडकी काढलेली असून त्याच्या बाहेरच्या बाजूला एक भग्न अवस्थेतले एक शिल्प आहे. कदाचित ते एक गोमुख असावे. हा भाग म्हणजे गडावरील जलव्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण आहे.मुख्य दरवाजातून पश्चिमेला गेल्यावर एक मोठी गुहा आहे. त्याच्या बाजूने दगडात कोरलेल्या पायऱ्या असून त्यांच्यावरुन वर गेल्यावर अनेक वास्तूंचे अवशेष दिसतात. हा गडाचा बालेकिल्ला असावा. याठिकाणी एक मोठा चौथरा आढळतो 
हा गडावरील मुख्य वाडा असावा. या वाड्याचे प्रवेशद्वार उत्तरेला असून मध्ये एक ओसरी आहे. या ओसरीमुळे वाड्याचे दोन भाग पडतात.येथून पुढे गेल्यावर एक खालच्या बाजूला एक माची आहे.या गडावर इतिहासातील भरपूर खुणा आजही सुस्थितीत आहेत.गडाच्या एका बाजूने अलंग आणि मदन गडाचा माथा दिसतो तर एका बाजूला गेल्यास छोटा कुलंग दिसतो.
छोटा कुलंग आणि टीम 

सुकून 

कुलंग गडाचा थोडक्यात इतिहास-छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्याने हा किल्ला सन १६७२ साली जिंकून घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, पण इतर तीन तोफांचे काय झाले ते माहीत नाही.शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे.

महाराष्ट्र रेंजर्स लीडर्स 

कुलंगगड उतरताना ट्रेकर्स 

दुपारी पावणेबाराच्या सुमारास कुलंग उतरायला सुरु केले. कुलंगच्या दगडी जिन्याच्या पायऱ्या उंच आणि काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. उतरताना तर पायावर जास्त लोड येत असतो पण सांगणार कोणाला. तीन गड सर करताना महाराष्ट्र रेंजर्सचे लीडर्स जयेश हरड आणि मेंबर्स अधून मधून गाठ पडत होते. दोन दिवसात डोंगरयात्रा, महाराष्ट्र रेंजर्स आणि सह्याद्री रॉक अडव्हेंचर्स इतके तिनच ग्रुप दिसत होते. यावरून समजते की “AMK” हा कठीण श्रेणीतील ट्रेक असल्याने इकडे खूप कमी ट्रेकर्स येतात. कुलंगच्या दगडी अर्धवट तुटलेल्या पायऱ्या संपतात त्या ठिकाणाहून आमच्या सॅक घेतल्या आणि गड उतरायला सुरुवात केली. एखाद्या पक्षाने मला उचलून घ्यावे आणि खाली नेऊन आपटले तरी चालेल अशी मनोमन इच्छा इच्छा होती. जंगल अजून ओले असल्याने ज्यांच्याजवळ काठी नव्हती ते घसरत होते. ज्यांच्याजवळ काठी होती तेपण घसरत होते बरका. म्हणता-म्हणता एका ओढ्याजवळ येऊन पोहोचलो सकाळपासून न धुतलेले तोंड धुतले. क्षणभर थांबलो, पुन्हा मागचे ट्रेकर्स आले की लगेच रपेट सुरु केली. मला तर त्या झुळूझुळू वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ आवाज ऐकत ओढ्यात पाय टाकून बसावे वाटत होते. किती चालतोय काय चालतोय समजत नव्हते. पोटात कावळे ओरडत होते. थोडे पुढे गेल्यावर गुरे चरताना दिसली म्हणजे पायथा जवळ आला असे वाटले आणि मग हायसे वाटले.दुपारी दोनच्या सुमारास पायथ्याला पोहोचलो. रस्त्यावरून अलंग-मदन-कुलंगची रांग उठून दिसत होती. आपण हे तिन्ही गड सर केलेत यावर माझाच विश्वास बसत नव्हता. दोन दिवसात जवळपास २४-२५ किलोमीटरचा खडतर ट्रेक पूर्ण केला. आमच्या दोन्ही बस आल्या. बसमध्ये बसलो आणि जेवणासाठी निघालो. मस्तपैकी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणावर ताव मारला आणि एकमेकांचा निरोप घेऊन मुंबईवाले मुंबईकडे आणि पुणेवाले पुणेकडे रवाना झालो. ट्रेकसाठी औरंगाबादहून आलेले विवेक,शिवम,शुभम गॅंग खरंच ग्रेट आहात. डोंगरयात्राच्या ओढीने ट्रेकर्स कुठून कुठून येतात. कमाल कमाल कमाल. डोंगरयात्रा लीडर्स मनोज सर तुमच्यामुळे मी ट्रेकला येऊ शकले आणि ट्रेक पूर्ण करण्याचे प्रोत्साहन मिळाले. शिवाय गोप्रो लीडर रवी सर, महेश सर, सहाय्यक टीम प्रमोद सर मनापासून धन्यवाद.  ट्रेकदरम्यान सपोर्ट केलेले विवेक आणि मंडळी, दोन अक्षय,अक्षयसर,चेतन,ड्रोनवाले रामसर, डॉक्युमेंटरी करणारी टीम, टेक्निकल टीम एकनाथ दादा, जेवण बनवणारे मामा, लेडीज गॅंग,( रुपाली-गीता- नंदिनी), डॉक्टर्स, भूषण,ओंकार, नंदिनी,अजिंक्य,करण, फोटोग्राफर्स, चिक्की आणि दोन लहान ट्रेकर्स या सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे माझा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

टीम औरंगाबाद 
माझ्या नजरेत "डोंगरयात्रा" हा ट्रेकिंग ग्रुपचा कोहिनूर आहे. सर्टीफाफाईड बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स केलेले लीडर्स, आठवड्याला वेगळा उत्तम ट्रेक, एकावेळी दोन किंवा तीन ठिकाणी ट्रेक, सोबत ट्रेकिंगचा आणि ट्रेक लिडिंगचा उत्तम अनुभव असलेले लीडर्स, तांत्रिकदृष्टया उपयुक्त असलेली साधने कायम सोबत असलेला ग्रुप, प्रत्येक ट्रेकरला कठीण ट्रेक पूर्ण करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. उत्तम नियोजन, वेळप्रसंगी ऐकलं नाही की ओरडा मिळतो. शाकाहारी आणि मांसाहारी उत्तम जेवण असे सगळळे एकत्र पंचपक्वान्न असलेले ताट समोर असले की दुसऱ्या ताटाकडे बघण्याची गरजच नाही. ट्रेक, अभ्यासू सहल, ट्रेक दरम्यान मूर्त्या, स्थापत्यशास्र, गडकिल्ल्यांची छोट्या छोट्या गोष्टींची इत्यंभूत माहिती देणे यात तरबेज लीडर्स, डोंगरयात्राचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक श्री. प्रमोद भाऊ मांडे (२००० पेक्षा जास्त किल्ल्यांना भेट देणारे इतिहास संशोधक, क्रांतिकारकवर सखोल अभ्यास असणारेकेतन पुरी(तरुण इतिहास अभ्यासक आणि पुरातनशास्राचे  पदवीधर)  अनिल दुधाने सर,(इतिहास संशोधक आणि वीरगळ अभ्यासक) श्री. अमर साळुंखे सर असे ऐतिहासिक सखोल अभ्यास असणारे पाहुणे ट्रेकदरम्यान आणि ऐतिहासिक अभ्यासुसहलीदरम्यान बोलविले जातात. कोरोना काळात कोरोना लसीआधी डोंगरयात्राचे ट्रेक सुरु होते म्हणून वाचलो कारण ट्रेक आपला आत्मा आहे. फिटनेस चांगला राहिला. स्वप्नात पाहिलेला सह्याद्रीचा माउंट एव्हरेस्ट समजला जाणारा "AMK" आणि भैरवगड केवळ डोंगरयात्रामुळे पूर्ण झाला आणि शक्य झाला. रॉक क्लायंबिंग आणि रॅपलिंग तंत्र शिकायला मिळाले. आता सराव करू आणि जमतील ते कठीण ट्रेक करू. धन्यवाद टीम डोंगरयात्रा.   डोंगरयात्रा रॉक्स. 



संदर्भ-डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर

किल्ले - गो. नी. दांडेकर

दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर

सह्याद्री - स. आ. जोगळेकर

दुर्गकथा - निनाद बेडेकर

दुर्गवैभव - निनाद बेडेकर

इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर

महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर

गडसंच - बाबासाहेब पुरंदरे

किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर

गडदर्शन - प्र. के. घाणेकर

गड आणि कोट - प्र. के. घाणेकर

इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर

चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर

साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर

सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर

मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर

दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर

गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर

ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर

ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर

ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर