Monday 4 December 2023

हेअर कट

साधी गोष्ट पण खटकणारी गोष्ट.....
हो आपल्या आवडीनिवडी वयानुसार बदलत जातात.
एखाद्याला वयानुसार वर्षानुवर्षे एकाच साच्यात बसवलेल्या नियमात रहायला आवडतं विशेषता जग काय म्हणेल या चिंतेने..
एखाद्याला वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे परिधान करून मिरवायला आवडते..
एखाद्याला चालू घडामोडींवरील वर्तमानातील ट्रेंडनुसार सतत बदलत रहायला आवडते.
एखाद्याला नुसतंच साधं आयुष्य जगायचे म्हणून जगायला आवडते.
एखाद्याला जगाची चिंता करत कुढत रहायला आवडते.
एखाद्याला सतत दुसऱ्यांना नावे ठेवायला आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला आवडते.
एखाद्याला नुसतंच टक्कल आवडते.
एखाद्याला केसांचा टोप लावायला आवडते.
एखाद्याला शरीर मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करायला आवडते.
एखाद्याला चांगुलपणाचा नुसता देखावा करायला आवडते.
एखाद्याला मैत्रीसाठी सर्वस्व पणाला लावून स्वतःची वाट लावून घ्यायला आवडते.
एखाद्याला एकटे रहायला आवडते.‌
एखाद्याला फक्त संसार नोकरी इतकंच मर्यादित रहायला आवडते.
एखाद्याला घर नोकरी सांभाळून अनेक छंद जोपासला आवडते.
एखाद्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडते.सतत नवनवीन गोष्टी शिकणे आणि त्यातून इतरांना प्रोत्साहन देणे हे आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.
एखाद्याला स्वतःसाठी वस्तू खरेदी करायला आवडते..
एखाद्याला दुसऱ्यांसाठी वस्तू खरेदी करायला आवडते.
एखाद्याला गडकिल्ले फिरून त्यांचा अभ्यास करायला आवडते.
एखाद्याला फक्त गडकिल्ले फिरून फोटो काढायला आवडते.
एखाद्याला फक्त रिलसाठी फिरायला आवडते..
एखाद्याला जगाचा इतिहास किंवा तेथील निसर्गसौंदर्य रिल बनवून त्यात माहिती टाकून जगासमोर आणावी वाटते..
एखाद्याला नुसतंच मनसोक्त फिरणं आवडते..
एखाद्याला फक्त फोटोग्राफी करायला आवडते..
आता या वयात हे का ??
या वयात ते का?
या वयात असंच रहावं असा अट्टाहास का असतो??
अरे स्त्री असो वा पुरुष असो आपण मरेपर्यंत मरमर मरत कामं करत रहातो.आईवडील मुलांसाठी नातेवाईकांसाठी सगळं करत रहातो.मग जर आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टी केल्या तर फरक काय पडतो??
आपल्या शोभतील असे कपडे शोभतील अशी केशरचना केली टक्कल केलं काय फरक पडतो??
इतकं वय झालंय का आपलं?
इतके कमकुवत विचार करणारे आहोत का आपण???
खूप कमी लोक असतात आपल्याला प्रोत्साहन देणारे..
आपण आपल्या आवडी जपतो याला पैसा उडवणं म्हणत नाही.
माझा खाण्यापिण्याचा खर्च इतरांच्या मानाने कमी आहे.मी पाच दिवस न जेवता उपाशी राहून फक्त पाणी सटरफटर खाऊन खूप कामं करू शकते. मला वर्तमान जगायला आवडते.
जे आवडते तेच मी खाते न आवडणारी एकही गोष्ट मी उगाचच ताटात वाढून त्याचा नास करत नाही. .
आपण दुःखी असल्यावर सहानुभूती देणारे खूप असतात ते मनोमन मात्र खुश असतात.
आपण आपल्याला खुश ठेवण्यासाठी जे आवडेल ते करावे.
चांगले रहा, योग्य व्यायाम करायला आवडते तो करा फिटनेसकडे लक्ष द्या.आवडीची गाणी ऐका, चित्रपट बघा, पैसा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरावा.
चणे आहेत तर दात नाही असं होवू नये...
मला एक हेअर कट आवडला तो हेअर कट केला तर किती लोकांनी नावं ठेवली.तोंडं वाकडी केली.‌
बापरे..
नंगे पुंगे कपडे घालून मिरवण्यापेक्षा आवडलेला आणि शोभणारा हेअर कट कधीही चांगला.‌😅😂बरं ज्यांना अंगप्रदर्शन करायला आवडते त्यांनी ते पण करावं, खुशाल करावं, शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.😅
आम्ही पण Shorts,half प्यांटी घालतोय. आणि जोवर पोटावर अजून फोटोसाठी जिरवायची बारी आली नाही तोवर शोभतील असे कपडे घालून मिरवणार.‌
पण ट्रेक आला की तो मी नव्हेच...😂😍😅
तर एका हेअर कट वरून हे सुचलं.
हो मी उच्च शिक्षित असून एक होममेकर आहे.
मुलांवर चांगले संस्कार केलेत.
मी Trekking करते‌.
मी Traveler आहे.
मी ब्लॉगर आहे.
मी You Tuber आहे.
मी Photography करते,शिकते.
मी calligraphy शिकते.
मी बाईक राईड करते,शिकते.
मी कार चालवते, शिकते.
मी हार्मोनियम शिकते.जराशी वाजवते‌.😂😅
मी विनोदी लिहिते‌. 
फक्त मी रागीट आणि रोखठोक आहे त्यामुळे आपला मित्र मंडळ कमी आहे.
.
.
.
यात कोणालाही टोमणा नाही की कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. तुमची शपथ 💯🙏😅
.
.
.
Patil Jayuu 
४डिसेंबर २०२३

Tuesday 28 November 2023

रवळ्या जवळ्या ट्रेक

रवळ्या जवळ्या ट्रेक
ठिकाण-नासिक
चढाई श्रेणी -मध्यम कठीण
दिनांक २६नोव्हेंबर२०२३
डोंगरयात्रा ट्रेकग्रुप, पुणे
रवळ्यागड उंची -४३६९फूट
जवळ्या गडाची उंची -४०५५फूट
सप्टेंबर २०२३ च्या केदारनाथ ट्रेकयात्रेनंतर माझा ट्रेक झाला नाही मग मला जरा कोमात गेल्यासारखे वाटत होते.२६ नोव्हेंबर २०२३ ला डोंगरयात्रा ट्रेकग्रुप पुणे यांच्या सोबत नासिकमधील रवळ्या जवळ्या आडवाटेवरची भटकंती केली आणि मला कोमातून बाहेर आल्यासारखे वाटले.


नासिक मधील सातमाळा रांग
१.अचला 
२.अहिवंत 
३.सप्तशृंग
४. मार्कांड्या 
५. रवळ्या
६. जवळ्या
७.धोडप
८.कांचना
९.इंद्राई
१०.राजधेर
११. कोळधेर
१२.चांदवड
यालाच अजंठा सातमाळ रांग असेही म्हणतात.नासिकमधील अजंठा सातमाळ रांगेतील रवळ्या जवळ्या हे दोन उंच गड एकाच प्रशस्त पठारावर वसलेले आहेत.गुगलवर सापडलेली रवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४०५५ फूट इतकी आहे.तर जवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४३६९फूट इतकी आहे.गड तसे दुर्लक्षित आहेत. अजिबात गर्दी नसते.❣️परंतु लिडरच्या भाषेत म्हणायचं तर दर्दी ofbeat Trekers ना गर्दी नकोच असते.😊❣️

जवळ्याच्या गडमाथ्यावर तुटलेल्या अवस्थेत पायऱ्यांची वाट खडतर होती परंतु डोंगरयात्रा ( Dongaryatra Adventure Club) चे ट्रेकलिडर आणि त्या दिवसाचे ट्रेकगाईड Doctor भोजराज गायकवाड यांच्या सहाय्याने आणि ट्रेकर्सच्या सहायाने आम्ही बिनादोरानेच सर केली आणि गडमाथ्यावर पोहोचलो.


गडावर जाऊन सोबत नेलेले जेवण थेपला चटणी खाऊन गडमाथ्यावर एक फेरी टाकली. गडमाथ्यावर चार मोठी पाण्याची टाकी आहेत त्यातले पाणी पिण्यासाठी योग्य आणि स्वच्छ दिसले.


अखंड पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांचा तो सुंदर जिना चढताना उतरताना कोथळी गडाच्या पाषाणात कोरलेल्या जिन्याची आठवण येते.जिना चढताना उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे.
उतरताना आम्ही जवळ्या गडाला फेरी मारून पठारावर उतरलो तेव्हा त्या बाजूला कोरीव खांब असलेली एक छोटी गुहा आढळून आली.
पठारावर फक्त कारवींच्या तीन घरांची तिवारी कुटुंबांची वस्ती. एक स्वच्छ पाण्याने भरलेले टाके आहे.मी त्या टाकीतील एक ओंजळ पाणी पिऊन घेतले कारण त्या नितळ पाण्याची चव आपल्या बिसलेरीच्या पाण्याला नसते.

दगडी रांजण, भग्नावस्थेत असलेली शंकराची पिंडी, नंदी आणि मंदिरांचे तुटलेल्या अवस्थेत दगड वगैरे आहेत.एका ठिकाणी एक ढासळलेली कबर आढळली. या ठिकाणी जेवणाची सोय नाही आपलं आपण जेवण बनवून खाऊ शकतो.

अगदीच इथे मुक्काम करायचा असेल तर पठारावरील या तीन घरामध्ये तीन चार माणसांची रहाण्याची सोय होते किंवा आपण आपला तंबू नेऊन तिथे राहू शकतो.


रवळ्या गडावर जाताना देखील तेथे रोप लावावा लागतो. सह्याद्रीतील फार एक्स्पर्ट ट्रेकर्स बिनादोरानेच जाऊ शकतात.

रवळ्या गडावर जाताना एक छोटा चिमणी क्लाइंब patch आहे त्याठिकाणी सर्वजण रोप न लावताच चढून गेले.सर्वांचे कौतुक.
गडावर दोन तीन पाण्याची टाकी आहेत परंतु त्यात शेवाळ होते ते पाणी पिण्यासाठी योग्य वाटले नाही. 
उन्हाळ्यात जाताना आपले पाणी छोटा चिरीमिरी खाऊ खजूर, गुळ चिक्की फळं,काकडी, लिंबू सरबत असं सोबत असावं.किंवा आपला साधा चपाती भाजीचा डबा जरूर न्यावा. रवळ्या गडावर सगळ्यांना जाता यावे यासाठी लिडरनी एका कठीण Rock patch होता तिथे रोप लावला होता त्यामुळे सर्वजण गडावर सुखरूप पोहोचले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते त्यामुळे पाणी कमी लागले.
शेवटी पावसाने आपली गंमत सुरू केल्याने आम्ही काही ट्रेकर्सच रवळ्या माथ्यावर पोहोचून अक्षरशः त्या रचलेल्या दगडांना शिवून धूम ठोकत पळतच उतरलो.
गडावर प्रचंड प्रमाणात टोचणार्या काट्यांची झुडपे होती.ते काटे घरी आलेत हातात टोचून.पुढे नासिक ते पुणे जवळपास २५०-५४ की. मी चा प्रवास करायचा होता.त्यामुळे ट्रेक संपल्यावर लगेचच की मुंबईकरांचा निरोप घेऊन पुणे कडे रवाना झालो.एका दिवसात सकाळी आठच्या सुमारास सुरू केलेला ट्रेक संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास संपला.रवळ्या जवळ्या असा जवळपास १६_१८कि.मी.चा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.
येताना नासिककडील प्रसिद्ध पाववडा खाण्यासाठी एक दुकानात वळालो पाचच्या सुमारास जो धुवाधार पाऊस लागला त्या पावसाने रात्रीच्या बारापर्यंत अक्षरशः झोडपून काढले.परंतु खूप दिवसांनी ट्रेकला शरीराचा धुर निघाल्याने मन प्रसन्न व प्रफुल्लीत झाले व भाऊ खुश झाला.💃✌️😍
धन्यवाद Team Dongaryatra / डोंगरयात्रा
Manoj Vitthal Bhaleghare
Ravindra Shrirang Shedge
Pune Mumbai Trekers... 
"बास झालं हे जगणं, असेच ट्रेक करताना आयुष्याची अचानक exit व्हावी..
कुणाला आपला त्रास नको. कुणाशी आपलं वैर नको.आपल्यावर कुणाचं कणभर जरी प्रेम असेल ते असंच अनंत रहावं आणि आपण कसलंही ओझं न ठेवता आपण हसत हसत विलिन व्हावं.‌..."

@jayuuPatil

28-11-2023

Friday 24 February 2023

"हिम्मत है तो आ गले लग जा"

"हिम्मत है तो आ गले लग जा" 

@जयू 

२३-०२-२०२३

मी व. पु. काळे यांचे एक वाक्य वाचले.माणसाच्या आयुष्यात अपार परिश्रमानंतर, सत्कर्माचं पुण्य पदरात घेवून,कुकर्माचे अनेक घणाघात सोसून येणारी शांत निद्रा म्हणजे म्रुत्यु होय. मृत्यूचे भय कधीही बाळगू नये. 

आपण म्रुत्युला का घाबरतो?जे घडायचे ते घडते.जन्म म्रुत्युचा फेरा असाच असतो. जर म्रुत्युला हसत शांतपणे सामोरे गेलो तरच नविन जन्म मिळेल.प्रत्येक नवीन गोष्टींसाठी आपण सदैव तयार असायला हवे परंतु त्याचबरोबर आपण आयुष्यात सतत सावध राहून नव्याचं स्वागत करायचं मग तो म्रुत्यु का असेना. चांगल्या गोष्टी, चांगल्या आठवणी, चांगल्या व्यक्ती, चांगल्या संधी जशा आपल्याला हव्या असतात,तसंच वाट्याला आलेल्या वाईट गोष्टी,संकटं,वाईट प्रसंग,व्यक्तीनुरूप वाईट वागणूक, द्वेष, हेवा,मत्सर,राग,चिड,फसवणूक,अबोला,कटू आठवणी या सगळ्याचं देखील आपण स्वागत करून त्यादेखील स्मरणात ठेवल्या तर आपण आयुष्यात सावध राहून पुढील आयुष्यात होणाऱ्या चुका टाळू शकतो. प्रत्येक वळणावर आपल्याला बरेच अनुभव येतात,बरंच काही सहन करावं लागतं ज्याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नसते असे प्रसंग आपल्या वाट्याला येतात.मग आपण सैरभैर होतो.सगळ्यांना नकळतपणे आपली मनातील गुपिते सांगत सुटतो. काही जण ते मनात ठेवतात.काही जण त्याचा फायदा घेऊन गैरवापर करतात,काहीजण गैरसमज करून घेतात,काहीजण आपल्यातली क्षमता ओळखून आपल्याला सोबत करतात,सपोर्ट करतात,काही आपला फायदा घेतात. आपण मग सैरभैर होऊन सगळ्यांचे ऐकत रहातो आणि मनाला पटेल पटेल तेही करत रहातो. मन आणि आपलं भवितव्य दुसऱ्यांच्या हवाली करून वाहवत जातो. त्यापेक्षा आपणच आयुष्यात सावध राहून आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून,सावध राहून रोज मेडीटेशन,योगा, परमेश्वराने नामस्मरण, सत्कर्म करणे, कोणाविषयीही वाईट बोलणे, वाईट करणे, कोणी आपले वाईट केले तरी त्यापासून दूर जाऊन त्याला माफ करणे,सतत सकारात्मक बोलणे,वागणे,सतत नवनवीन गोष्टी चांगल्या गोष्टी शिकणे, सातत्याने सकारात्मक विचार कृती करणे इतरांना प्रेरणा देणे हे रोजच्या जीवनात रोजच्या जेवणाप्रमाणे एकदा तरी केलं की सगळं निभावून जातं. आपल्याला मानवजन्म देणारा परमेश्वर सतत आपल्या सोबत असतो.त्यामुळे त्या देवावर  आणि स्वतःवर विश्वास ठेवला की आपोआप सकारात्मक गोष्टी घडतात.परमेश्वराने दिलेले आपले आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याच प्रमाणे ते क्षणभंगुरही आहे. आपण आज आहोत आणि उद्या नाही. हे नकारात्मक बोलणे नाही तर हे सत्य आहे. आयुष्यात पळवाट अवलंबता सत्याला सामोरे गेले की परमेश्वर आपली कायम सोबत करतो. पुढच्या क्षणाला आपले काय होईल? हे आपल्याला आत्ता या क्षणी सांगता येत नाही तरीही आपण खूप सारी स्वप्न उराशी घेऊन ती पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करतो. मी स्वतःव विश्वास ठेवून माझी स्वप्न पूर्ण करायला खूप मेहनत घेते. मी खूप मेहनती, कष्टाळू, अतरंगी आहे. सतत सातत्य ठेवणारी मी आहे. माझे हातपाय मोडले, वाकडे झाले,कोणी मला बांधून जरी ठेवले तरीही मी घरात बसून इतर काहीतरी नवीन प्रेरणादायी गोष्टी करत रहाते, काही कारणाने मी तीनचार महिने घराबाहेर पडू शकत नव्हते, मला चालता येत नव्हते, पायावर उभे रहाता येत नव्हते तरीही मी त्यातून परमेश्वरकृपेने बाहेर पडून हळूहळू चालू लागले. घरबसल्या शांत राहणे, मेडिटेशन करणे, आरोग्य सांभाळणे, योगासने करणे, प्राणायाम करणे असं सगळं जमेल तसं चालू ठेवले. टाईमपास म्हणून कोरोनामध्ये चालू केलेले माझे you tube channel थोडे ऍक्टिव्ह केले अपार मेहनत घेऊन चॅनेलचे subscribers वाढवण्याचा प्रयत्न केला. 😅💃काही नवनवीन गोष्टी शिकले त्या प्रत्यक्ष भेटाल तेव्हा बघालच. बाईक शिकताना मी जोरदार आपटले तरीही फूटगियरवली गाडी शिकणारच हे एकदा मनाशी ठरवलं की गाडी आलीच म्हणून समजा. बुलेट, रॉयल एन्फिल्ड एका दमात चालवली आणि  जमली देखील.💃😍 आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. त्यात चांगले प्रसंग मनाला समाधान,आनंद देतात डोकं शांत ठेवतात आणि वाईट प्रसंग आयुष्यात खूप मोठा धडा शिकवतात. मी तर म्हणते आपण वाईट प्रसंगातूनच आपल्या आयुष्याच गणित सोडवायला शिकतो

आयुष्याची स्वप्न पूर्ण करताना आपण कधी वाहवत जातो, कधी फक्त स्वतःपुरता विचार करतो.  मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कधी आपल्याकडे पैसे असतात, कधी पैसे नसतात तर वेळ असते, कधी पैसाही असतो पण वेळ नसतो, कधी पैसे नसताट पण माणसे सोबत असतात, कधी आपण एकटे असतो, कधी माणसे आजूबाजूला असून आपण एकटे असतो. परंतु आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा जास्त चांगला आणि स्वतंत्र विचार करू शकतो. परंतु संसार असेल, मुलं असतील आणि आपली त्यांच्याशी मनापासून नाळ जोडलेली असेल तर आपल्याला एकटे रहाणे म्हणावे तेवढे सोपे नसते कारण खूप साऱ्या जाबदाऱ्या असतात. अनेक नाती असतात ती आपण दूर ठेवू शकतो परंतु मी जन्म दिलेली मुलं ही माझी जबादारी आहे. माझी स्वप्नं ही जबाबदारीपेक्षा  मोठी नाहीयेत हे स्वतःला समजवायला लागते.आयुष्यात जवाबदारी पार पाडता-पाडता माणूस स्वप्न पूर्ण करू शकतो. आयुष्यातील स्वप्न पूर्ण करता करता अनेक अडचणी येतात. आयुष्यात काहीही सहज मिळत नाही.सगळी नातीगोती, संसार,स्वतःची तब्बेत,सगळ्यांची मने,घरचे सगळे मॅनेजमेंट,विरोध हे सगळे पत्करून वेळ प्रसंगी सगळं काही काळ सोडून स्वप्नांच्या मागे धावावे लागते. आपल्याजवळ कधी पैसे असतात, कधी एखाददुसरी व्यक्ती सोबत असते, कधी सोबत प्रेम असते, कधी एखादा चकवा असतो,कधी नियतीच्या चक्रात अडकतो आपण. जेव्हा अडकतो तेव्हा मात्र आपण फक्त एकटे असतो. तेव्हा ना आईवडील, ना भाऊबहीण, ना मित्रमैत्रिणी कोणी नसते. कोणी आपल्यासोबत असतेच असे नाही. तेव्हा एकट्याने शांत राहून विचार केला, मन एकाग्र करून शांत डोक्याने विचार करून काही गोष्टींचा त्याग केला की आपले आपल्यालाच कळते आपण मानव जन्मात केलेल्या चुका ह्या इथे पृथ्वीवरच भोगाव्या लागतात. चुकीला माफी नाही चूक ही चूकच असते. जेव्हा आपण शंभरवेळा बरोबर असतो, योग्य असतो, समाजाच्या नियमांना धरून वागत असतो तेव्हा मात्र आपली कोणी पाठ थोपटायला येत नाही किंवा शाबासकी द्यायला येत नाही. पण एकदा का आपण चुका करू लागलो की आपल्याला खूप गोष्टींचा सामना एकट्याने करावा लागतो. मन खंबीर, एकाग्र, शांत राहून हे सर्व सहन करून, सकारात्मक विचार करून पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करतो. नव्याने आयुष्य सुरु करताना जुन्या चुका करण्याची स्वतःशी एकदा शपथ घेतली की आपले कोणीही वाकडे करू शकत नाही. सगळ्यांनी लाथाडले तरी स्वतःशी प्रामाणिक रहायचे आणि खरे  सत्याने वागायचे, तसेच आपले नॉर्मल आयुष्य जगणे चालू करायचे परंतु स्वप्नपूर्ती कधीच थांबवायची नाही. जर एकदादोनदा आपण गाडीवरून पडलो जोरदार मार लागला तरी पुन्हा गाडी शिकायचीच असे जेव्हा आपण स्वतःशी ठरवतो तसंच ठरवले तर आपण आपल्या आयुष्याची गाडी सकारात्मकतेने चालवू शकतो. हे सगळं करताना माणसाला प्रेम, माया, साथ, सोबत हवी असते.ती मिळते देखील परंतु ती कायम टिकेलच असे अज्जीबात नाही. आपण जन्माला आलोय एकटे, जाणार एकटे मग आपली स्वप्न पूर्ण करायला कोणाच्या सोबतीची अपेक्षा का करतो आपण? ज्यांना सोबत राहायचे ते कसेही सोबत रहातात.  ज्यांना सोबत सोडायला निमित्त हवे ते आपल्या आयुष्यातून पळवाट काढतात. दुसरे सोबती शोधतात. माझ्याशी जो मैत्री करतो आणि टिकवतो तोच जो मला पूर्णपणे ओळखतो. काही जण त्यांना वेळ दिला नाही म्हणून निघून जातात, काही जण आपल्याकडे फक्त पैसे असले तरच सोबत असतात. काही गैरसमज करून घेतात. काही जण आपल्याला समजून घेऊन  शांतपणे कायम आपल्या सोबत असतात. काही समोर असून बोलत नाहीत, काही दूर सातासमुद्रापलीकडे राहून सोबत करतात आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात आणि आयुष्यात खूप काही शिकवून जातात. आपण कोणाचे बोलणे, वागणे, चिडणे, फार मनावर घ्यायचे नाही. प्रत्येकाचे बोलणे, म्हणणे मनावर घेतले तर मला वेड लागेल. 😅हे वेड लागण्यापेक्षा मला माझ्या स्वप्नपूर्तीचे वेड लागलेले आवडेल.  त्यातच मी माझे आयुष्य पणाला लावेन. आयुष्य एकेकदा अशा खडतर वळणावर येऊन थांबते की पृथ्वी थांबल्यासारखी वाटते. ना आपण चालू शकत, ना कोणाशी बोलू शकत, ना कुठे बाहेर जाऊ शकत, ना ट्रेक करू शकत,ना लिहिणारे हात काही लिहू शकत. पण आपण शांत राहून मन एकाग्र करू शकतो, देवाचे नामस्मरण करू शकतो. कारण कोणी आपल्या सोबत नसले तरी परमेश्वर कायम आपल्या सोबत असतो, तोच जन्म देणारा, तोच अडचणी देणारा, तोच संकटे देणारा आणि तोच संकटातून बाहेर काढणारा. त्याचा धावा करायला मंदिरातच गेले पाहिजे असे काही नाही. फक्त शांत बसा आणि देवाचे नामस्मरण करा.  जर आपण खरे वागत असू, आपली कर्म चांगली असतील तर आपण अडकलेल्या चकव्यातून, चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तोच परमेश्वर मार्ग दाखवतो. फक्त आपण खऱ्याची कास धरली तरच आणि सत्याने वागलो तरच. देव एकदोन माणसे अशी देतो जी आपल्याला मार्ग दाखवतात. तो चांगला मार्ग अवलंबणे आपल्या मनावर असते. मन शांत एकाग्र असेल तर हे कार्य आपण सहज करू शकतो. मी वेड्या जातकुळीच्या माणसात मोडते. 😅😃 मी भटकंती करणारी व्यक्ती आहे. मला एका जागेवर बसून करमत नाही, जमत नाही. परंतु खूप शांत राहिले की आपोआप मन एकाग्र होते आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो. काय चूक, काय बरोबर हे आपल्याला कळायला लागते. परंतु म्हणून काय घडलेल्या घटना आपण पटकन विसरत नाही. या आधी मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्या सर्व मानवजातीचा बदल घेणारी मी या वर्षीपासून मला अनावधानाने दुखावलेल्या,मला त्रास दिलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना मी माफ करतेय. मन शांत असले की बदला, राग, द्वेष, मत्सर, हेवा असा विचारही मनात येत नाही. तो परमेश्वर मला आणि सर्वांना बघत असतो आणि सर्व न्याय करत असतो. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कर्माची फळे तो आपल्याला इथे जमिनीवरच देतो. आपण आपलं कर्म चांगलं  ठेऊन त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला तरच हे शक्य होते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला ते देव देव मंदिरात जाणे अजिबात आवडत नाही,पटत नाही. कारण देव हा चराचरात आणि त्याचे अस्तित्व मानणाऱ्याच्या मनामनात आहे. देव प्राणीमात्रात आहे,देव गरीबात आहे, देव श्रीमंतात आहे, देव ज्याला गरज आहे त्याच्या सदैव पाठीशी आहे.गेल्या काही महिन्यांत मला कुठे जाता येत नव्हते म्हणून मी जवळपासच्या काही मंदिरांना भेटी दिल्या. काहींच्या अंगी कला असते, व्यक्ती चांगली असते, सुंदर असते, परंतु प्रत्येकात काहीतरी दोषही असतातच. त्यामुळे पूर्णपणे निर्दोष, सर्वगुणसंपन्न व्यक्ती या पृथ्वीवर शोधत बसलो तर वेड लागेल. त्यापेक्षा आपण आपल्यालाच कणखर, तटस्थ,खंबीर बनवा, आपल्यात असा बदल घडवा की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत अशा तत्वावर चाललो तर आपण उत्तम आयुष्य जगू आणि इतरांचीही प्रेरणा बनू. आपण एखाद्यासाठी काही चांगली गोष्ट केली तर आपण ती बोलून दाखवू नये. चांगले करा आणि सोडून द्या. आपण कोणासाठी चांगले केले तर ते कुठून ना कुठून आपल्यापर्यंत पोहोचतेच. कधीतरी आपल्यासाठी कोणीतरी चांगले करते. आपण ज्यांना मित्र मानतो ते आपल्याला त्यांची सगळी गुपिते सांगतीलच अशी अपेक्षा आपण कधीच करू नये. जर एखादं गुपित किंवा एखादी गोष्ट त्याने आपल्याला सांगण्याचे काही कारण असू शकेल. मी तर आडपडदा ठेवता समोरच्याला सगळं मनातलं सांगून टाकते. अर्थात समोरच्यावर माझा विश्वास असेल आणि समोरचा त्या लायक असेल तरच. बरेचदा आपल्याला काही गोष्टी, काही व्यक्ती कायमच्या सोडाव्या लागतात. त्यामागे अनेक करणे असतात. त्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होऊ नये, कधी  त्या व्यक्तीला आपल्यापासून त्रास होऊ नये असेही असू शकते. कारण भविष्यात काय वाढलेले असेल हे आपल्याला माहित नाही. सगळ्यात प्रिय हवीहवीशी वाटणारी व्यक्ती आपल्याशी कालांतराने बोलेल किंवा नाही हे आपण आज सांगू शकत नाही. आपली लाडकी व्यक्ती आपल्याला पुन्हा दिसेल की नाही हेदेखील आपल्याला माहित नसते. म्हातारपणी हे करू ते करू असे सांगणारे अचानक बोलेनासे होतात आणि ज्यांची अपेक्षा देखील नसते ते आपली वेळोवेळी सोबत करतात सांगता आपली विचारपूस करतात. काही आपल्यावर मनापासून प्रेम करतात काही निरपेक्ष प्रेम करतात.

. पु. काळे म्हणतात की वासनेविना प्रेम असेल तर ते नशिबानेच मिळते.त्याची अनुभूती माणसाने एकदातरी घ्यावीच ही गोष्ट अगदी खरी आहे. पण म्हणून जिथे वासना असते तिथे प्रेम नसते असे बिलकुल नाही. प्रेमाच्या मैत्रीच्या व्याख्या प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलतात. मी म्हणते इतरांकडून कसलीही अपेक्षा करता माणसाने स्वतःवर प्रेम करावे स्वतःला वेळ द्यावा, स्वतःला घडवावे स्वतःची कला जोपासावी. एखादी गोष्ट आवडत असेल ती मनापासून करावी. आपल्याला आवडत असलेली गोष्ट इतरांना आवडेलच असे नाही. परंतु आपल्याला आवडते म्हणून आपण ती करावी. प्रत्येक वळणावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. काहींना आपण कमी वेळात ओळखायला लागतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो,जन्मोजन्माचे नाते असल्यासारखे वागतो परंतु समोरचा तसाच असेल असे काही नाही. समोरची व्यक्ती कामात व्यस्त असू शकते, कधी कामात व्यस्त असल्यासारखे भासवु शकते. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी असू शकतात. आपण उगाच मनात अनेक गैरसमज करून समोरच्या व्यक्तीचे मनातल्या मनात मूल्यमापन करतो. कशाला हा सर्व आटापिटा?? त्यापेक्षा कोणाकडून काही अपेक्षा ठेवता, कोणाचा कोणत्याही गोष्टीसाठी बदला घेण्याची भावना ठेवता निरपेक्षपणे जगलो की जगणे सहज आणि शांत होते. समोरच्या व्यक्तीला ओळखून, सतत सावध राहून आपण आपले आयुष्य साधेपणाने शांतपणे आपल्या मस्तीत व्यस्त राहणे मी पसंद करते. दुसरा व्यक्ती आपल्याला हे शिकवेल ते शिकवेल याची वाट पाहता आपले आपण रोज नवनवीन गोष्टी शिकत रहाणे मी पसंद करते. मला ही व्यक्ती आवडते म्हणून ती मला मिळालीच पाहिजे असा अट्टाहास नको . मृगजळाच्या मागे कधीही धावू नये. आपल्याजवळ जे आहे ते जपायला आपल्याला जमले पाहिजे. आपली कला वुद्धीगंत करायची असेल तर रोज मेहनत करू, रोज नवनवीन गोष्टी शिकू, रोज एक छोटे पण चांगले सकारात्मक काम करू, कोणालाही वाईट बोलता आपल्याला अनावधानाने कोणी दुखावले असेल कोणी आपले वाईट केले असेल तरीही कोणाचाही बदला घेता सर्व गोष्टी परमेश्वरावर, नियतीवर सोडून आपण आपले शांत समाधानी आयुष्य जगणे हेच सध्या मला समजते. कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करणे, कोणालाही विनाकारण नावे ठेवणे, सतत सकारात्मक विचार करणे हेच मी सध्या करते. आयुष्याची उलथापालथ झाली की ओहोटी आल्याप्रमाणे मन आणि डोकं शांत ठेवायला जमले की आयुष्यात पुन्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा गुन्हा करत नाही आणि येणाऱ्या मृत्युकडेदेखील आपण सकारात्मकतेने पाहू लागतो आणि हसतहसत मृत्यूलाही  म्हणतो,"हिम्मत है तो आ गले लग जा" 

-@जयु 

२३-०२-२०२३