Monday 11 June 2018

१९ कि.मी.चा अँडवेंचर्स अफलातून ट्रेक..



माणिकगड ट्रेक
दिनांक - १० जून २०१८
ठिकाण- रायगड जिल्हा,
डोंगररांग -पनवेल
चढाईश्रेणी = मध्यम-कठीण
उंची - समुद्रसपाटीपासून २५०० फूट

"माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" आयोजित माणिकगड ट्रेक दिनांक १० जून २०१८ चा रविवार उजाडला आणि आम्हा ट्रेकर्सच्या आनंदाला पारावार उरला नाही. खरेतर जून महिना म्हणजे पावसाळी ट्रेक नव्हेच. कारण पाऊस म्हणावा तसा जोरदार सुरु झालेलानसतो. डोंगररांगांमध्ये चंदेरी धबधबे कोसळताना दिसू लागले की मगच पावसाळी ट्रेकची संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरते.एप्रिल मधील मधुमकरंदगडट्रेक नंतर कडक असह्य उन्हाचा मे महिन्याचा एकच  ट्रेक चुकला तरी आम्हाला असे वाटले की बरेच महिने ट्रेक झाला नाही आणि अस्वस्थ वाटू लागते. परंतु ती एका ट्रेकची कसर मी कौटुंबिक सहलीतून भरून काढली. कोणत्या ना कोणत्या रीतीने निसर्गाशी जडलेले नाते कायम ठेवायचे इतकेच आम्हा ट्रेकर्सना समजते.

रविवार दिनांक १० जून २०१८ या दिवशी सकाळी आम्ही माउंटन एड्जच्या १७ ट्रेकर्सची बस सकाळी ६:३० वाजता निगडी-तळेगाव-खांडगे पेट्रोलपम्प- लोणावळा- खोपोली-रसायनी-चावणे मार्गे रोडलगत असलेल्या स्वराज फॅमिली रेस्टोरंट मध्ये चहा नास्ता करून अन्ताक्षरीच्या तालावर सावणे गावात पोहोचली. पुण्यापासून माणिकगड मोबाइल नकाशाच्या अंतरानुसार सुमारे ११४ कि.मी. असून अडीच तासांच्या अंतरावर आहे तर निगडीहून सुमारे ९७ कि.मी, अंतरावर असून २ तासाच्या अंतरावर आहे. बसमध्ये बसल्यापासूनच पावसाने हजेरी लावली होती. तसेच लोणावळा खंडाळा घाटामध्ये देखील अविरत ढग दाटून पाऊस पडत असल्याने नेहमी दुरून हॅलो करणारा ड्युक्स नोज त्या दिवशी मात्र दिसला नाही. पाऊस सतत पडत असल्याने ट्रेक करायला जास्त मजा येईल असे मनोमन वाटत होते. सावणे गावात गेल्यावर देखील पावसाने आमचे स्वागत केले. इथे आपली लाल परी (एस. टी.बस)येण्याची सोय आहे. तसेच इतर वाहनांची देखील सोय आहे. ट्रेक लिडर्सने महत्वाच्या सूचना दिल्यानंतर साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष ट्रेक सुरु झाला.
सावणे गावातून वाट दाखवणारा वाटाड्या घ्यावा असा विचार केला परंतु त्यावेळी कोणी मिळेना मग लिडर्सने गावकर्यांना माणिकगडची वाट विचारून घेतली आणि आम्ही चालू लागलो. त्यातला एक गावकरी म्हणे आता माणिकगडावर चाललात ??? माशा तुम्हाला खूप त्रास देणार हो.  आम्हाला एक क्षण वाटले की मधमाश्याच त्रास देणार असे त्याला म्हणायचे आहे. पाऊस सुरु झाल्यावर माशा कुठेही जास्त प्रमाणात आढळून येतात त्या माशा जास्त आढळतील असे त्याचे म्हणणे होते.त्यानंतर आम्ही थोडे निश्चिन्त होऊन चालू लागलो.
पावसाळ्यात एका गावातून दुसऱ्या छोट्या पाड्यात जाण्यासाठी ओढ्यावर अतिशय सुंदर असा लाकडी पूल तयार करून ठेवला होता आम्ही सर्व ट्रेकर्सने हावडाब्रिजवर असल्यासारखी हावऱ्यासारखी फोटोग्राफी केली.त्या छोट्या पाड्यात छोटी छोटी कुडाची,(कारवीची)कौलारू घरे उठून दिसत होती. 

 जरा पूढे गेल्यावर स्वप्नात नसतानादेखील जांभूळ आणि करवंदाच्या रानमेवा आम्हाला आयताच मिळाला. त्याचा चालता चालता आस्वाद घेत आम्ही पुढे चालू लागलो त्यावेळी ढगांची शाल पांघरलेला माणिकगड अधून मधून ऊन पडल्याने आम्हाला वाकून पाहत होता. जणू काही तो आमची वाट पाहत होता असे  भासत होते. 

लीडर राणे सर एकाला सोबत घेऊन पुढे जाऊन स्वतः  वाट पाहून आम्हाला येण्याचा इशारा करीत नंतरच आम्ही चालत असू. आपण लहानपणी निसर्गचित्र म्हंटलं की जे डोंगराचे  चित्र काढायचो त्याप्रमाणे माणिकगड दुरून दिसत होता. अर्धा तास पुढे गेल्यावर पायथ्याच्या गावकऱ्यांच्या जंगलात जाणाऱ्या पाऊलवाटा दिसत होत्या परंतु गडाची नेमकी वाट ठरत नव्हती. गावातला एक माणूस जंगलात भेटला तो अर्ध्या तासाने येतो म्हणाला आम्हाला त्याची वाट पाहण्या इतका वेळ नसल्याने आमची आम्ही वाट शोधत राहिलो.त्या घनदाट जंगलातून एक-दोन छोटे डोंगर पार केल्यानंतर मात्र दमट वातावरण असल्याने घामाच्या धारा मात्र पावसात नाहल्यासारख्या दिसू लागल्या.काही ट्रेकर्स मागे राहिल्याने आम्ही घळीमध्ये थांबून शिट्यांद्वारे इशारे करून पुन्हा एकत्र आलो.आमचे लाडके लीडर रोहित यांच्या लाडक्या सहचारिणीचा वाढदिवस आहे असे समजल्याने  आमच्यातील ट्रेकर पाफाळे यांनी अतिशय उत्तम काव्यातून वैशाली रोहित नागलगाव हिला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
अर्धा तास धापा टाकत पुढे गेल्यानंतर पुन्हा लीडर्स वाट शोधत असताना ५-६ फूट लांबीच्या सापाने दर्शन दिल्यावर सर्वांना काठी घेऊन सावधगिरीने डोंगर चढाव करण्याची सूचना दिली. तसे आमच्यामध्ये हजारो साप पकडून सुरक्षित रित्या जंगलात सोडणारे सर्पमित्र  निकाळजे सर असताना असताना आम्हाला कसले आले भय आणि कसली आलीये भीती.
तिसरा डोंगर पार केल्यावर एका ठिकाणी पठारावर माणिकगडाचं जे काही दर्शन आम्हाला घडलं ते शब्दात वर्णन करणं खरोखरच कठीण आहे.  माणिकगड एखाद्या रत्नाप्रमाणे चमकू लागला होता कारण दाटलेले ढग सारखेच बरसत होते आणि मधेच ऊन पडत होते त्यामुळे त्या माणिकरत्नाचा तो पाषाण पॉलिश केल्याप्रमाणे चमकताना अतिशय देखणा दिसत होता.माणिकगडचा आकार आयताकृती आहे शिवाय दोन्ही बाजूला दोन सुळके एखाद्या सोबत्याप्रमाणे सोबतीला उभे आहेत. गडावर जाण्याच्या मुख्य वाटा तश्या दोन आहेत पहिली वाट माणिकची लिंगी मार्गे आणि दुसरी खिंडीतून जाते ती वाट. तेथील वाटाड्या घेतल्या शिवाय जाऊ नये.
या जंगलातून जाताना किल्ल्याचा कातळकडा नेहमी आपल्या डावीकडे राहतो एवढं लक्षात ठेवलं तरी वाट चुकणार नाही. माणिकगड या किल्ल्याला प्रदक्षिणा केल्याप्रमाणे मोठा घेरा पूर्ण करून जावे लागते त्यामुळे याला घेऱ्याकिल्ला देखील नाव आहे असे वाटते.  पाऊस एका आठवड्यापासून सुरु झाल्याने अधे मध्ये जंगलातून छोटे झरे वाहू लागले आहेत. संपूर्ण जंगल हिरव्यागार गालिच्याने आच्छादले आहे त्यामुळे चालताना सुखद गारवा जाणवत होता.जंगलातुन वाट काढताना घामाने भिजत होतो तरी पठारावर आल्यावर फिरता कुलर जसा मधेच गार वारा सोडतो तसा वेगाने गार वारा अंगाला झोंबत होता त्यामुळे थकवा कुठच्याकुठे पळून जात होता.
माणिकगडाच्या पायथ्याजवळ गेल्यावर अजून एक दुसऱ्या बाजूने येणारी वाट आमच्या वाटेला मिळाली परंतु आमच्यासोबत इतर ४-५ ट्रेकर्स सोडले तर कोणीही आम्हाला दिसत नव्हते. माणिकगडाचे  दोन्ही सुळके आता स्पष्ट दिसत होते.राजाचे २ वजीर असल्याप्रमाणे भासत होते.इथून थोड्या अंतरावर पायपीट केल्यावर दुपारी पावणेबाराच्या सुमारास वाटेमध्ये आम्हाला एक हनुमानाची मूर्ती दिमाखात उभी असलेली दिसली.  तिथेच गडावर जाण्याच्या पुढच्या वाटेविषयीचा बॅनर नेचर फ्रेंड सोसायटी पनवेल या ट्रेकग्रुप उत्तमरीत्या बांधलेला आढळला. आता इथून पुढे खरा गडाचा कातळमाथा चढाई होती त्यामुळे सर्व ट्रेकर्स थोडा वेळ थांबून पुन्हा एकत्र  निघालो त्यावेळी मात्र पावसाने चिंब भिजवले. काहींंनी छत्री काढून पावसाला पळून लावले.


पाऊस पडल्याने आता तो मातीचा चढ मात्र घसरडा झाला होता. परंतु गडाचा माथा अजून एक-दीड तासावर असेल असा अंदाज बांधून आम्ही चढाई सुरु केली. भुकेची वेळ आणि कठीण चढाईची वेळ एकच झाली. आमच्यातील एखाद दुसर्याने घसराईचा आनंददेखील घेतला असे ऐकले. आधीच मोबाइल फुटल्याने मी मोबाइल सॅकमध्ये सुरक्षित ठेवला होता परंतु संपन्न मोबाइल सेफ्टी कव्हर घेऊन सोबत असल्याने आमची अधून मधून हवी ती कातळमाथा सोबत फोटोग्राफी सुरु होती.
राणे सर, दीपक, सुप्रिया, पाफाळे सर विनोद, संपन्न, सलोनी आम्ही पुढे रवाना झालोय हे लक्षात आले परंतु पुन्हा घनदाट जंगातून वाट असल्याने त्यातदेखील २ ग्रुप झाले. सगळ्या फसव्या वाटा असल्याने ट्रेक ग्रुप मोठा ग्रुप असो वा छोटा ग्रुपसोबतच चाललेलं योग्य ठरते.  वेळ आणि श्रम वाचवल्याने फायद्याचे ठरते. 
माणिकगडाला अजून किती मोठा घेरा आहे हेच समजत नव्हते. घनदाट जंगलातून वाट काढून थोडे पुढे गेल्यावर मात्र आता खरा चढ लागला. पावसाने माती भुसभुशीत झाली होती त्यामुळे सावधगिरीने आम्ही ५-६ जण चढत होतो. त्यात इतर ४ ट्रेकर्स सोबत आमच्यातील दीपक सरसर घोरपडीसारखा सारखा गडावरील एका टप्प्यावर पोहोचल्याने तो वरून आम्हाला समोर वाट दिसत असून अजून आमच्या उजव्या हाताच्या बाजूने घेरा  करून येण्याचा इशारा करीत होता. मनात विचार आला हा तर इथून सरसर गेला आणि आम्ही का दुसरीकडून जायचे ?? तरी एका ट्रेकरचा सल्ला ऐकावा म्हणून आम्ही त्याचे ऐकून विनोद, मी, सुप्रिया थोडी रिस्क घेऊन त्याच्या इशाऱ्यावर नाचत होतो. १५ मिनिटांच्या चढाईनंतर मात्र आम्हाला अजून इतर ट्रेक ग्रुप दिसू लागले ते वडगावच्या वाटेने चढाई करीत आले होते. आम्ही एक टप्पा पार केल्यावर वरून पहिले तर तो कठीण चढ आम्ही तिघे नक्कीच चढू शकलो असतो याची खात्री पटली  कारण १००हुन अधिक ट्रेक करणारा विनोद, आणि सगळ्यात पुढे माझ्यासोबत आघाडीवर असणारी आणि दूधसागरसारखा मोठा ट्रेक करून आलेली सुप्रिया असे आम्ही सोबत होतो. वर आल्यानंतर वाटले आता चढाई संपली आहे. परंतु अजून एक मुख्य टप्पा बाकी होता. आम्ही खाली असलेल्याना वाटेचा इशारा केला आणि एका ठिकाणी बारीक धार असलेल्या झऱ्याचे पाणी रिकाम्या बाटल्यांमध्ये भरले आणि चेहऱ्यावर मारले.


माणिकगडाचं एक वैशिष्टय म्हणजे चारही बाजूने कडे असताना किल्ल्याला ठराविक अंतरावर दुहेरी स्तरातील तटबंदी दिसते. आपण ज्या खालच्या बाजूच्या तटबंदीवर पोहोचतो तिथे सुरुवातीलाच पाण्याचे टाके आहे. राणे सर, रोहित सर सर्व ट्रेकर्सना घेऊन मागोमाग आलेच. सगळेच ट्रेकर्स अफलातून थकले होते. हनुमान मंदिरापासून गडमाथ्यावर पोहोचायला दिड तास लागला. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र गुलाब पाणी शिंपडावे तसे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आमचे स्वागत केले.दाटलेले ढग आपल्याला कवेत घेतात की काय असे वाटत होते. इथून किल्ल्याच्या वरच्या भागातील तटबंदीचे दोन बुरुज स्पष्ट दिसतात. आपण चालत आलेल्या पायवाटेवरून गडाचा माथा उजवीकडे ठेवत पुढे जायचं आणि गडाच्या  माथ्याला एक डावीकडून छोटा वळसा घालून आपण माणिकगडाच्या माथ्यावर पोहोचतो सकाळी साडेनऊला सुरु केलेली पायपीट दुपारी दीडच्या सुमारास थोडा वेळ थांबली.
गडाच्या माथ्यावर समोरच स्वागताला मोठा चुन्याचा घाणा आहे या चुन्याच्या घाण्याच्या समोरच माणिकगडाचं  चौकोनी आकाराचं छोटंसं प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या पट्टीवर कोरलेली गणपतीची मूर्ती अतिशय रेखीव व सुंदर आहे.
दरवाज्याच्या शेजारीच एक छोटेखानी घुमटी आहे.
दरवाज्यातून आपण सरळ पुढे गेलो की माणिकगडाच्या सर्वोच्च माथ्यावर आपण येऊन पोहोचतो. त्यानंतर मात्र चहूबाजूस नजर फिरवली असता डोळ्याचे पारणे फिटता फिटत नव्हते. कुठून आलो, किती चाललो, किती दमलो, किती घसरलो, हे सगळे एका क्षणात विसरलो. हेच तर ट्रेकिंगचे खरे स्वर्गसुख आहे. ट्रेकिंग का करता हे विचारणाऱ्यांनी एकदा तरी हे ट्रेकसुख घेऊन बघा मगच समजेल.
गडाच्या माथ्यावरून कर्नाळा किल्ला स्पष्ट दिसत होता. दमट वातावरण असल्याने आजूबाजूचे किल्ले स्पष्ट दिसत नव्हते. नाहीतर ऊन असेल आणि आकाश निरभ्र असेल तर आणि डीएसएलआर असेल तर कलावंतीण, प्रबळगड, चंदेरी-म्हैसमाळ, साकशी किल्ला, मिऱ्या डोंगर आपण सहज पाहू शकतो. गडावरून जांभिवली धरण दिसते.
गडावर इतर ग्रुप मोठ्या संख्येने दिसले. गडाच्या एका टोकाला मोट्ठेच्या मोठे खडक उभे आहेत. पाफाळे यांनी कडक आवाजात  शिवस्तुतीचे काव्य ऐकवले आणि शिवगर्जना करून बॅनर फोटो घेऊन २च्या सुमारास जेवण करून घेतले. गडावर ऐकून ३-४ पाण्याची टाकी आहेत. वाचनात आले की गडावर एका ठिकाणी शिवलिंग आहे आणि इथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तेव्हा पूर्ण वडगाव आणि जवळची गावे किल्ल्यावर येतात. हा एक छोटा भाग आमच्याकडून मिस झाला. जेवण झाल्यावर प्रत्येक नवीन ट्रेकरची ओळख करून घेतली. लिडर्सने गडाविषयी थोडक्यात माहिती दिली.माणिकगड शिवाजी महाराजांनी बांधला नसून कान्होजी आंग्रे यांनी १७०६ मध्ये बांधला आणि १८१८ मध्ये इंग्रजांनी पाडला. हा किल्ला आजूबाजूच्या किल्यांवर देखरेखीसाठी, टेहळणीसाठी  वापरला जात असे. गडावर राहण्याची जेवणाची कोणतीही सोय नाही. ती आपली आपण करावी. तसेच स्थानिक लोकांकडून समजले की गडावर नोव्हेंबर पर्यंत टाक्यांमध्ये पाणी असते. त्यामुळे उन्हाळी ट्रेकदरम्यान किमान तीन लिटर पाणी सोबत ठेवावे.
जेवणानंतर  आजच्या ट्रेकची पाहुणी बर्थडे गर्ल सौ. वैशाली रोहित नागलगावकर हिच्या वाढदिवसाचा घरून आणलेला केक कापला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हे नवीन दाम्पत्य असल्याने दोघांनीही मस्त उखाणा घेतला. ट्रेकदरम्यान इतक्या उंचावर वाढदिवस साजरा होणे खूप भाग्याची आणि आंनदाची गोष्ट आहे. महत्वाचे म्हणजे पहिला ट्रेक असून तिने उत्तमरीत्या पूर्ण केला थकलेल्याचा लावलेशदेखील तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही. प्रिय वैशाली, एका उत्तम लीडरची उत्तम ट्रेकर पार्टनर, लाईफ पार्टनर शोभता आपण.  सलोनी हिने मेंदू जागृत ठेवण्याचे तंत्र आणि त्याचे प्रात्यक्षिक सादर केले, त्या रम्य वातावरणात सायली हजार असताना सायलीचे गाणे नाही झाले तर काय मजा मग. आपल्या मधुर खणखणीत आवाजात सायलीचे शास्त्रीय गाणे चार चाँद लावून गेले. खरंच मंत्रमुग्ध करणारं वातावरण आम्ही त्या दिवशी माणिकगडावर  अनुभवले.
गडावरून उठावेसे तर वाटत नव्हते तरीही ३च्या सुमारास परतीची वाट धरली आणि पाऊस कोसळायला लागला आम्ही पुन्हा मस्त त्या गार वाऱ्यासोबत गार पाण्यात चिंब न्हाहून निघालो परंतु उतरताना मात्र वाट चिकट आणि घसरडी झाल्याने घसारा होत होता कारण खूप ट्रेकर्स एका वेळी उतराई करीत होते. माझे गुढगे आज आवाज करीत होते आणि दुखत होते परंतु उतरणे तर भाग होते. पाऊण तास उतराई केल्यावर दीपक याने तेथील एका ठिकाणी  उंचावर जाऊन छोट्याश्या झऱ्यातून पाण्याच्या बाटल्या भरून आणून मी लिंबूचे सरबत बनवले त्याचा आस्वाद ७-८ जणांनी घेतला आणि पुन्हा उतराई सुरु केली. चढताना हनुमान मंदिराजवळून सुमारे दीड तास लागला होता तर उतरताना पायाला भिंगरी लागल्यासारखे आपोआप उतरतो त्यामुळे एका तासाआधीच हनुमान मंदिर गाठले. निसर्गमित्र ट्रेकिंग ग्रुप पनवेल यांचा ६५ ट्रेकर्स चा मोठा ग्रुप होता.
माउंटन एड्ज ग्रुप मध्ये नेहमी जसे सगळ्या एज ग्रुपचे ट्रेकर्स असतात तसे ते होते. एक तासाच्या अंतरावर गेल्यावर चालताना गप्पांच्या नादात त्यांच्यातील एक ट्रेकर आमच्यात मिक्स होऊ गेली आणि म्हणते ओह माय गॉड मी एकटीच तुमच्या ग्रुपमध्ये आहे रस्ता चुकले मी. त्यानंतर चेक केल्यावर समजले की आम्हीच आमची सकाळची सावणे गावाची पायवाट नकळतपणे सोडून वडगावच्या वाटेने त्या निसर्गमित्र पनवेल ग्रुप सोबत चाललो होतो. १८ मधील ७-८ जण पुढे होतो आणि बाकीचे खूपच मागे होते. वेळेवर फोनला रेंज मिळाल्याने संभाषण झाले. आता पुन्हा मागे जाण्यात काही अर्थ नव्हता खूप अंधार झाला असता त्यापेक्षा निसर्गमित्रच्या सोबत त्यांनी वाडगावमधील एक गाईड आणला होता त्याने वाशिवली गावात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर आमचे सर्व ट्रेकर्स एकत्र आल्यावर ६ वाजता वाशिवली गावाच्या दिशेने चालू लागलो. आता माणिकगडचा आकार त्रिकोणी पर्वतासारखा दिसू लागला होता. इतक्या वेगळ्या अंशाच्या कोनामध्ये आम्ही कुठून कुठे पायपीट केली होती. फसव्या वाटा असल्याने आपला वेळ वाचवायचा असेल तर गावातील वाट दाखवणारा वाटाड्या नक्की घ्यावा नाहीतर थकलेलो असताना  ३-४ कि. मी. ची. जादाची पायपीट करावी लागते आणि ती फार कंटाळवाणी, असह्य होते. एखादा गुराखी दिसला की आम्ही विचारले असता ठाकरवाडी अर्धा तास आहे असेच म्हणत असे. अर्धा तास पुढे गेल्यावर शेतात काम करणाऱ्या बायका दिसल्या त्या पुन्हा तसेच म्हणायच्या अर्धा तास बाकी आहे. ठाकरवाडी मधले लोक देखील तसेच म्हणाले अजून फक्त अर्धा तास बाकी आहे. तो अर्धा तास काय लवकर संपेना झाला होता. 
यावेळी आमच्यासोबत आमच्या बसचे ड्राइवर दादा देखील श ट्रेकला आले आणि ट्रेक पूर्ण केला. (शिल्पकार मुंडे बंधू -०८८८८९२०८४३,०८४२१६०१६२९)  ठाकरवाडी गावातून पाणी पिऊन तिथून दोन टू व्हिलर घेऊन ड्राइवर आणि आमचे लीडर राणे सर सावणे  गावाकडे रवाना झाले.

ठाकरवाडीतून वाशिवली गावात जाण्यासाठी लोहगड उतरताना जो कठीण उतार आहे अगदी तसाच होता. थकलेल्या पायाला तो शेवटचा एक तास फार मोठा आणि आठवणारा होता. ठाकरवाडीमधून उतरताना पहिल्यांदाच लालपिवळी छटा नसलेला पांढऱ्या रंगाचा सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करून वाशिवली गाव गाठले.  दुपारी ३  वाजता सुरु केलेली उतराईची पायपीट १९ कि. मी अंतर कापून साडेसातच्या सुमारास थांबली. राणे सर  ४-५ कि.मी. अंतर जाऊन आमची ट्रेक बस घेऊन येईस्तोवर आम्ही वाशिवली गावात शिवाजी देशमुख यांच्याकडे चविष्ट वडापाव आणि लज्जतदार चहाचा आस्वाद घेतला. शिवाजी देशमुख यांच्याकडे चहा, नास्ता, जेवणाची उत्तम सोय होते. मोठा ग्रुप असला तरीही त्याच्याशी संपर्क साधून उत्तम जेवणाची सोय तो करतो तसेच गडावर जाण्यासाठी गाईड देखील देतो. (शिवाजी देशमुख -८६९८७२६१११-वाशिवली गाव).
एकोणीस कि.मी ची थकवणारी पायपीट म्हणजे सेमी हार्ड ट्रेकसाठी अडव्हेंचर्सच झाली. ड्राइवर धरून १८ ट्रेकर्सचा माऊंटन एड्जचा ८५ वा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडला. रात्री ८ वाजता वाशिवली गावातून निघून अन्ताक्षरीच्या तालावर पुणे गाठले. लिडर्सची ऍडव्हेंचर्स  मेहनत,(दिडशेेेहून अधिक कठीण ट्रेक करणारे राणे सर, रोहित सर, निकाळजे सर) ट्रेकर्सचा संयम, आणि ड्राइवर सहित सगळ्यां नवीन जुन्या ट्रेकर्सचे सहकार्य आणि फोटोग्राफी, कविता, गाणी, मदत, यासाठी सहभाग खूप मोलाचा आहे. ट्रेकर्स ८० असोत की १८ असोत तीच मजा, तोच उत्साह, तोच जल्लोष.नवीन ट्रेकर्स सलोनी, दीपक,वैशाली, भूषण, संपन्न यांचे विशेष कौतुक आणि स्वागत आणि रेगुलर ट्रेकर्सचे मनापासून अभिनंदन.(सरिता, सायली,सुप्रिया,अपूर्वा,पफाळे सर,विनोद,शेवाळकर सर, हर्षद मित्र हो,फँटास्टिक जॉब)  
माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" रॉक्स.