Monday 25 December 2017

अखेरचा दंडवत....२०१७

अखेरचा दंडवत
नाणेघाट ट्रेक
उंची - २७२४ फूट
ठिकाण - पुणे जिल्हा
चढाई श्रेणी- मध्यम
दिनांक – २४ डिसेंबर २०१७ 

नाणेघाट इतिहास-नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला.प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचेराज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते.नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अंदाजे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन कर्षापणनावाची नाणी टाकली जात असत.
पुणे ते नाणेघाट अंतर सुमारे ११० कि. मी आहे. मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे यावे.पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो.
"फोना" टीमचा ७८ वा  ट्रेक नाणेघाट आणि नानाचा अंगठा हा आयोजित केला गेला. या वर्षीचा हा अखेरचा ट्रेक होता. रविवार दिनांक २४ डिसेंबर २०१७ या दिवशी फोना टीमची ३४ ट्रेकर्सची बस तळेगांव-निगडी-चिंचवड-नाशिकफाटा-राजगुरू मार्गे नाणेघाटाकडे निघाली. आमचे २-३ ट्रेक मेंबर येईस्तोवर नाशिकफाटा येथे नारळ फोडून ग्रुप फोटो घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. एका ठिकाणी आकाश प्युअर व्हेजचा चहा येईस्तोवर आम्ही  येथे एक छानशी बैलगाडी सजवून तयार ठेवली होती तिथे आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली.


अश्या अनेक बैलगाड्या असत्या आजच्या काळात तर त्यातूनच ट्रेकचा प्रवास केला असता की जेणेकरून प्रदूषणाला आळा बसला असता. परंतु वेळेअभावी आणि सोयीअभावी साईनाथ ट्रॅव्हल्स जिंदाबाद.

चहा नास्ता कमी वेळात आटोपून आम्ही अंताक्षरीच्या तालावर पुढच्या प्रवासाला निघालो त्यामुळे  प्रवास कसा भर्रकन झाला कळलेच नाही. बसमधून सह्याद्रीच्या रांगांचे नजारे पाहावे तेवढे थोडे आणि आणि डोळ्यात साठवावे तेवढे थोडे. कितीही अन्ताक्षरीमध्ये गुंग असले तरी मी सह्याद्रीची चालती फोटोग्राफी केव्हाही चुकवली नाही. जाताना पावसाळ्यात अतिशय सुंदर मनमोहक दिसणारा आणि धबधब्यांनी ओथंबून वाहणारा माळशेज आज बिनपावसाचा सुद्धा अप्रतिम भासत होता. सहलीला आल्यासारखे आम्ही खास फोटोग्राफीसाठी केव्हाही मध्ये बस थांबवत नाही कारण एका दिवसाचा ट्रेक असल्याने वेळेत आणि सुखरूप पार पाडणे हा फोना टीमचा नियमच आहे. परंतु नवीन मेंबर्स मधील एका लहान मुलाला  बसचा थोडा त्रास होत असल्याने ५मिनिटे बस  थांबली असल्याने आम्ही  माळशेजघाटाचे सौंदर्य न्याहाळले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  जाताना आमचे लीडर मंदार सरांनी भैरव गडाची ओळख करून दिली भैरवगडचा सुळका भयानक तितकाच मनमोहक दिसत होता. लीडर्स आम्हाला भैरव गडाचा ट्रेक एकदा तरी घडवा.
(वरील  फोटोमध्ये  पाठीमागे तारामतीचे शिखर दिसत आहे.)
सकाळी ६ वाजता निघालेलो आम्ही नाणेघाटाच्या पायथ्याशी ११:३० च्या सुमारास पोहोचलो. लीडर्सने नाणेघाटाविषयी थोडक्यात माहिती देऊन ट्रेकविषयी सूचना करून आणि मेंबर्स नुसार ट्रेक  लीडर्सची विभागणी करून १२ वाजता ट्रेकची सुरुवात झाली.

त्या रणरणत्या उन्हात ट्रेक सुरु झाल्याने  उन्हाचे चटके सोसावे लागणार याचा अंदाज आला. मला आधी वाटले होते इतके उंच नसावे परतून टोकवडे येथील कमानीजवळून थोडे पुढे गेल्यावर नाणेघाटातील नानाचा अंगठा अक्षरशः छोट्या अंगठ्यासारखा दिसत होता म्हणजे तो किती उंच असावा याची कल्पना करा. प्रचंड ऊन आणि लगेच चढाव असल्याने सगळ्यांनाच एक तासभर वॉर्म अप होईस्तोवर खूप जड जात होते.  त्यानंतर मग आपोआप क्षमतेनुसार ग्रुप पडत जातात.

नवीन ट्रेकरची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत लीडर्स थांबून त्यांना शिवकालीन इतिहासातील गोष्टी सांगून त्यांचा उत्साह वाढवून स्वतः घेऊन येतात. ही फोना टीमची खासियत आहे. लेमन गोळी, tang,फ्रुटस, काकडी त्या उन्हात चांगलीच उपयोगात येत होती. नाणेघाटात जाताना २ ओढे लागले त्यातील पाणी मात्र आता आटलेले होते. अधेमध्ये कुठेही पाण्याची खाण्याची सोय नाही. टोकवडे पासून घाटामध्ये अंदाजे १ कि.मी अंतरावर एक विहीर आहे फक्त तिथेच पाणी मिळू शकते. त्यामुळे आमच्याजवळील पाणी वाचवणे गरजेचे होते. आम्ही १०-१२ मेंबर्स सोडलो तर बाकीचे कोणीही आम्हाला आमच्यासोबत दिसत नव्हते.



जसजसे वर जाऊ लागलो तसतसे नाणेघाट आणि नानाचा अंगठा यांना जोडणारी छोटी खिंड आम्हाला दिसू लागली आणि हायसे वाटले. तेथील बरेचसे लोक ह्या नाणेघाटातील कठीण रस्त्याचा खाली उतरण्यासाठी वापर करताना दिसले ४वर्षाच्या मुलांपासून ते म्हाताऱ्या आज्जीबाईपर्यंत तो ३-४ तास लागणारा कठीण घाट उतरत होते. मला खूप नवल वाटले कारण इतकी वाहनांची सोय असताना इतका त्रास करून उतरणारे म्हणजे राजेंच्या राज्यातच असू शकतात.


दुपारी २ च्या सुमारास मात्र पोटामध्ये कावळे नाही तर डोमकावळे ओरडू लागले परंतु  समोर गड चढाईअजून  बाकी असल्याने आम्ही गडावर जाऊन जेवावे असे ठरवले. अजून अर्ध्या तासाने एक पाण्याचे टाके दिसले रिकाम्या बाटल्या भरून ते स्वच्छ गार पाणी थोडे तोंडावर मारल्याने थकवा लगेच कमी झाला. अश्या पाण्याच्या टाक्या जेव्हा गडावर असतात तेव्हा त्यातील पाणी दिसताना गडद रंगाचे दिसते परंतु ते पिण्यालायक असते त्यात कृपा करून हात पाय धुवू नयेत.जवळचे पाणी संपल्यावर हेच पाणी खूप ट्रेकर्स पिण्यासाठी वापरतात. आपल्या जवळील रिकामी बाटली काढून ती भरून घेऊन बाजूला घेऊन त्याचा वापर करावा.


म्हणता म्हणता कितीही थकलो तरीही फोटोग्राफी करत ३च्या सुमारास आम्ही नाणेघाटावर असणाऱ्या गुहेजवळ पोहोचलो. त्या ठिकाणी सहलीला आलेले पर्यटक खूप होते. आम्ही हा घाट चढून आलोय हे सांगितल्यावर खूप लोक आश्चर्याने आमच्याकडे पाहत होते त्यावेळी फिलिंग लईच proud. नाणेघाटावर पोहोचल्यावर तिथे खूप मोठ्या संख्येने स्वागत केले ते वानरसेनेने. आम्ही चुकून जरी काही खाऊ बाहेर काढला तर आमची खैर नव्हती. पर्यटक देखील मोठ्या संख्येने असल्याने ती वानरसेना जरा जास्त मस्ती करत होती. खूप लोक दिसल्यावर त्या वानरसेनेलासुद्धा असुरक्षित वाटत असावे. नाणेघाट चढून गेल्यावर दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.

हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागतिकाहिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाके आढळतात.
तिथेही २-३ टाके थोडे अस्वच्छ दिसले. 1 टाके स्वच्छ होते. त्याच ठिकाणी लोखंडी रेलिंग लावले आहे परंतु जरा सांभाळून राहिलेले बरे. कारण हे रेलिंग आधार म्हणून लावलेले असतात. इथे रॅपलिंग साठी योग्य पॅच आहे असे दिसले आणि रॅपलिंगसाठी हुक फिक्स केलेले देखील दिसले.मला संधन व्हॅलीच्या रॅपलिंगची आठवण झाली.हळूहळू २-२ ट्रेकर्स येताना दिसत होते तरीही आमच्यातील २लीडर्स आणि ४-५ ट्रेकर्सचा अजून पत्ताच नव्हता त्यावेळी असे समजले की एका नवीन ट्रेकरला उन्हामुळे जरा जास्तच त्रास होत होता.
न रहावून ३:०० च्या सुमारास आम्ही बाहेरच जेवणाचे डबे काढून जेवायला बसणार इतक्यात त्या छोट्या खिंडीमध्ये वरून छोटे छोटे दगड पडताना दिसले वर पाहतो तर ३०-४० माकडे चारी बाजूने आमच्याकडे रोखून पाहत होती. आम्ही लगेच उठून तेथील जाळी असलेल्या गुहेत अक्षरशः दार लावून जेवायला बसलो.



नंतर बाहेर थोडी विश्रान्ती घेतली तोपर्यंत हळूहळू बाकीचे ट्रेकर्स येऊ लागले. ४ च्या सुमारास सर्व ट्रेकर्सने जेवण आटोपून उशिरा आलेल्या ट्रेकर्सची झालेली हालत कथन केल्यावर नानाच्या अंगठ्यावर आम्ही निघालो. तिथून गुहेच्यावर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच नानाचा अंगठाअसे म्हणतात. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो. जाताना तो मोठा रांजण दिसला की ज्यात टोल म्हणून नाणे टाकले जायचे त्यात पाणी भरलेले होते. आम्ही देखील खरी नाणी त्यात टाकली.आणि नानाच्या अंगठ्यावर चढाई सुरुवात केली.
येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते.काही मेंबर्स आता पार दमले होते. मी एक वर्षांपूर्वी जीवधन गड केला होता तेव्हा नानाच्या अंगठ्यावर ५मिनिटे जाता आले होते त्यावेळी तो सूर्यास्त अप्रतिम असा होता.  आम्ही ७-८ मेंबर्स फक्त नानाच्या अंगठ्यावर गेलो असू. त्यामुळे मला वाटले की सर्व ट्रेकर्स  इतक्या उंचीवर आलेत तर हा नानाचा अंगठा अर्ध्या तासाचा गड सर करूनच जावे.नानाच्या अंगठ्यावर चढताना तसा  खूप चढ असल्याने थोडे कठीण जात होते.
परंतु ती वेळ आता संध्याकाळची असल्याने गार हवा सुटली होती. उन्हाचा तडाखा पूर्ण कमी झाला होता. तिथे गेल्यावर भगव्या सोबत समोर दिसणारे गोरखगडमच्छिंद्रगडसिद्धगडहरिश्चंद्रगडभैरवकडाकोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात. नानाच्या अंगठ्यावर पोहोचल्यावर खाली वाकून चहूबाजूने पाहिले असता माझा स्वतःचा माझ्यावर विश्वास बसत नाही की इतक्या अडीच हजार फूटाहून अधिक उंचीवर आपण आहोत.कुठून येतं इतकं बळ?ही फोना टीमची जादू आहे हो😊😊.फोना टीम Rocks👌👌 भगव्यासोबत ग्रुप फोटो बॅनर फोटो आणि सोलो फोटो घेतले आणि नानाच्या अंगठ्याचा निरोप घेऊन आम्ही नाणेघाटावरून निघालो. जाताना तेथील पाठमोरा  सूर्यास्त अप्रतिम असा होता.





नाणेघाटातून निघाल्यावर मी आणलेला गाजराचा हलवा प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाल्ला असेल कारण तो थोडाच होता. त्यानंतर आमची बस पुन्हा पुण्याच्या वाटेला निघाली.  संध्याकाळी ६ वाजता नाणेघाटातून निघालेली बस मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबली. तेव्हा रात्रीचे ८ वाजून गेले होते. यावेळी सुद्धा वेळेअभावी नवीन ट्रेकर्सची ओळख करून घ्यायचा कार्यक्रम राहून गेला. चहाच्या वेळेत बसच्या जवळच फोनाच्या पुढच्या सहली आणि ट्रेकचा अहवाल लीडर्सनी थोडक्यात सांगितला. फोना ट्रेकर्स मध्ये नेहमीच हुरहुन्नरी कलाकार आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्ती हजेरी लावीत असतात. यावेळी सगळ्याच चांगल्या ट्रेकर्स सोबत लिम्का बुक आणि गिनीज बुक या दोन्ही मध्ये त्यांच्या नावाचा रेकॉर्ड केलेले संतोष होली आमच्या सोबत आले होते. त्यांनी १११ दिवसांमध्ये १५५०० कि. मी. सायकलिंग करून २२ राज्ये ते फिरले आहेत. शिवाय हा भरभक्कम  रेकॉर्ड त्यांनी BSA च्या साध्या सायकल वर केला आहे हे मात्र नवल. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा. या कार्यासाठी फोना टीमची त्यांना ३७००० रूपयांची मदत झाली हे त्यांनी स्वतः सांगून फोनाची शान अजूनच वाढवली आहे.संतोष होली यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या घरच्या प्रवासाला निघालो. चहा  घेतल्यानंतर आता सगळे ताजेतवाने झाले होते. त्यामुळे लीडर्स सहित सगळे पुन्हा अंताक्षरीच्या नादात रात्री ११च्या दरम्यान घरी पोहोचलो. फोना टीम चा ७८ वा नाणेघाट आणि नानाचा अंगठा हा ट्रेक सगळ्या ट्रेकरच्या सहकार्याने पार पडला. सुखरूप ट्रेक घडवून आणल्याबद्दल ग्रेट लीडर्स मंदार सरनिकाळजे काकारोहितयांना धन्यवाद. आणि ट्रेक दरम्यान उत्तम सहकार्य केल्याबद्दल सर्व  ट्रेकर्सना धन्यवाद. टीम फोना रॉक्स.