Monday 21 October 2019

"उन्हात पाऊस सुधागडची भारी हौस"



"उन्हात पाऊस सुधागडची भारी हौस"
सुधागड ट्रेक
ठिकाण- रायगड जिल्हा
उंची -सुमारे २०३०फूट
चढाई श्रेणी- मध्यम
दिनांक - १३ ऑक्टोबर २०१९
सुधागडच्या थोडक्यात इतिहास-सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी,ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तांतराखाली या दुर्गाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. .. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.याबाबत असा उल्लेख आढळतो की, साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले.
रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ चा माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा १०१वा सुधागड ट्रेक म्हणजे जणू शंभरी पार केलेल्या अनुभवी व्यक्तींसोबतच्या आठवणींचा खास खजिन्यातील ट्रेक होय. सुधागड हा रायगड जिल्ह्यातील एक प्राचीनदुर्ग आहे. दुर्गप्रेमींची जास्त वाटचाल असलेला असा दुर्ग आहे. सुधागड समुद्रसपाटीपासूनसुमारे २०३० फूट उंचीवर वसला आहे.
सुधागडला जाण्यासाठी मुख्य तीन वाटा आहेत.
सवाष्णीचा घाटमार्गे तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावात यायचे किंवा पालीगाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी आले की तिथून गडावर जाण्यासाठी किमान अडीच ते तीन तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात पोहोचू शकतो.दुसरी वाट एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळतीकडे निघून पुढे पाऊण तासाने नाणदांडघाटात पोहोचतो. पुढे एक बावधान गाव आहे. तेथून पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग सुधागडावर अवघ्या दोन ते तीन तासात पोहोचता येते.आम्ही निगडीहून ३२ ट्रेकर्स सकाळी ६च्या सुमारास मध्ये एका ठिकाणी नास्ता-चहा आवरून पालीहून पाच्छापूरमार्गे ठाकूरवाडीत साडेदहाच्या सुमारास पोहोचलो. वेळेअभावी पाली गणपतीला जाता आले नाही परंतु दुरूनच बाप्पाचा आशीर्वाद घेऊन कारने आलेले आमच्याच टीमचे काही ट्रेकर्स सोबत घेऊन निघालो. जाताना सरसगड सर्व दिशांनी खुणावत होता. ऑक्टोबर महिना असला तरी अजूनदेखील पाऊस पडतोच आहे त्यामुळे श्रावणातील वातावरणाप्रमाणे ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. आजूबाजूची गोल फिरणारी झाडे, हिरवागार निसर्ग जीवनाचा सफर मस्तीत सरगम गात जगायला मजबूर करीत आहे. इतके सुंदर आल्हाददायक वातावरण होते. पुणे ते ठाकूरवाडीचा रस्ता पिवळ्या सोनकीच्या फुलांनी बहरून गेला होता.
सुधागडचा कातळकडा दिसू लागला होता. ठाकूरवाडीत पोहोचताच कडक उन्हाने आमचे स्वागत करून हे सांगू लागला की गड्यांनो टोपी, रुमाल, पाणी, सरबत, गॉगल घेऊन सज्ज व्हा. कारण ऑक्टोबरच्या उन्हाचा सर्वानांच नेहमीच त्रास होतो. ट्रेकलीडर्सने ट्रेकविषयी महत्वाच्या सूचना देऊन साडेदहाच्या सुमारास ट्रेक सुरु केला. ट्रेकच्या सुरुवातीलाच तेलबैलाची भिंत आणि सुधागडच्या कातळभिंती स्पष्ट दिसत होत्या.
ठाकूरवाडीत गावातील काही घरे कौलारू,काही मातीची, काही शेणाने सारवलेल्या कुडाची, तर काही सिमेंटची देखील होती. दिवाळी जवळ आल्याने गावकऱ्यांनी अंगणे खणून एकसारखी सपाट करून सारवलेली दिसली. घराची कंपाउंड छान कारवींनी सजवली होती. पाऊस पडत असल्याने सारवलेले एकसारखे केलेले अंगण खराब होऊ नये यासाठी अंगणात ताडपत्रीने, सागाच्या मोठ्या पानांनी,मोठ्या प्लास्टिकने  तसेच सिमेंटच्या पिशव्यांनी झाकून ठेऊन अंगणेदेखील सुरक्षित ठेवली होती.
इकडे रानवाटेवर गरीबाचा शेतकऱ्याचा हाच तो खजिना आम्हाला पाहावयास मिळतो.  एका शेतकऱ्याला त्याचे घर, अंगण, शेत, गुरेढोरे,शेतीची अवजारे,आवारातील झाडे. घरातील माणसे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नसतात.त्याचीच जपणूक होताना दिसली. सुधागड ट्रेकची सुरुवात ठाकूरवाडी गावातून झाली.

गाव छोटे आणि स्वच्छ होते.तेथील साधी माणसे आमच्याकडे कुतूहलाने पाहत होती काही त्यांच्या-त्यांच्या दिवाळीच्या शेतीच्या कामात व्यस्त होती.कोकणात बऱ्याच ठिकाणी दिवाळी जवळ आली की भातकापणीची कामे चालू होतात. परंतु सतत अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात पिकणाऱ्या पिकाची कायम नासाडी होतेय.
ट्रेक सुरु झाला वळणावळणाच्या फोटोग्राफीसाठी सगळ्यांचे कॅमेरे बाहेर निघाले. सेल्फी, ग्रुप फोटो, सोलो फोटो, सर्व काही उत्साहात सुरु झाले. त्यावेळी ट्रेक किती मोठा आहे याचे कोणालाही भान नसते. लीडर्सची शिट्टी वाजली की मग मात्र पळापळ होत असते. लीडर्सच्या प्रेमळ भीतीपोटी कॅमेरे आपोआप लपले जातात. सुरुवातीला वॉर्म अप होईपर्यँत थॊडा चढ आला की दमछाक होणे स्वाभाविक असते. जिथे कठीण चढ आहे तिथे शिड्या लावलेल्या आहेत त्यामुळे चढाई करण्यास सोपे जाते. परंतु खूप ट्रेकर्सने एकावेळी त्या हलणाऱ्या शिडीवर गर्दी करून चढू नये.  त्या शिड्या तात्पुरत्या आधारापुरत्या लावलेल्या आहेत. आपण बेधडक त्यावरून जावून त्याचे नुकसान  करू नये.विचार करा ट्रेक करताना आपली छोटी सॅक आपल्याला नको वाटते तर एक लोखंडी गज वरती गडावर नेण्यास आपल्याला किती त्रास होईल.  त्याचप्रमाणे या मोठ्या शिड्या नेणाऱ्यांची काय हालत होत असेल. शिवाय आजूबाजूला दरी असते त्यामुळे प्रत्येक ट्रेकरने शिड्यांवरून सावधगिरीने सावकाश गेले तर सर्वांच्या सोयीचे होईल आणि शिड्या शाबूत राहतील. 

जसजशी चढाई करीत होतो तसतसा आजूबाजूचा घाटमाथा मोहवीत होता. उन्हाचा तडाखा वाढला होता. मग पी पाणी, पी पाणी, पी सरबत हे असे होत राहते. शिवाय एनर्जीसाठी फोटोग्राफ़ी चालू ठेवली, आजूबाजूची गडाची, परिसराची, जवळपासच्या घाटमाथ्यांची माहिती घेत राहिली की कसलीही दमछाक जाणवत नाही. ट्रेक दरम्यान खूप ठिकाणी गडाचे पावित्र्य राखण्यासाठी माहितीफलक लावले होते. चढाई करताना डावीकडे सरसगड दिमाखात उभा दिसला. उजवीकडे अंबा नदी नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो. अजून एखादी लोखंडी शिडी, कुठे घसारा असेल तिथे लोखंडी रेलिंग लावलेले होते. गवत वाढलेले असल्याने ट्रेकर्सना गवताचा तेवढाच आधार वाटतो. घनदाट झाडी असल्याने कुठेही आपण पटकन बसतो परंतु या जंगलात सापांचा वावर जास्त आहे हे लक्षात असावे. जसजसे आम्ही चढ चढत होतो तसतसे झाडांवर असलेल्या काळ्या रंगाच्या पावसात येणाऱ्या पैशा प्रमाणे फास्ट चालणाऱ्या काळ्या आळ्या अंगावर, बॅगवर, पॅन्टवर पडत होत्या. त्या अळ्यांनी बऱ्याचशा झाडांची पाने पूर्णपणे जाळीदार करून टाकली होती. ऊन लागल्याने त्या तडफडून मरत असाव्यात परंतु मला मात्र त्या वळवळीने भीतीदायक फीलिंग येत होते.

परंतु आजूबाजूचे सुंदर, नयनरम्य, हिरवेगार नजारे आकर्षित करणाऱ्या प्रेयसीच्या सौन्दर्याप्रमाणे लोभसवाणे होते.नुसते पाहत बसावे आणि डोळ्यात,मनात साठवीत रहावे असातो सुंदर नजारा असतो. प्रत्येक ट्रेकर ते दृश्य आपापल्या कॅमेऱ्यात साठवीत असतो. साडेबारा वाजून गेले होते. आता मात्र असे झाले होते की कधी एकदा सुधागडचा माथायेतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठे झाडाखाली थांबावे तर त्या काळ्या रंगाच्या जलद पळणाऱ्या आळ्या पिछा सोडीत नव्हत्या. एक सेकंद खाली गवतावर बसलो तरी आपल्यावर खूप प्रेम असल्यासारख्या गळाभेट घेऊ पाहत होत्या.


कोकणातील गर्मी म्हणजे नुसती चिकचिक घाम गाळू गर्मी असते. एकवेळ ऊन लागलेले परवडते परंतु दमट वातावरणातील ट्रेक नको वाटतो. परंतु ट्रेक हा ट्रेक असतो तो आपल्या सोयीनुसार थोडीच असणार. सध्या निसर्गाच्या तालावर निसर्ग आपल्याला नाचवतोय आणि आपण नाचतोय. हे असंच चालायचं. राणेसरांनी सादर केलेल्या गमतीशीर कवितेप्रमाणे प्रेयसीचं लग्न होऊन ती सासरी जाणार, कालांतराने तिचा प्रियकर तिला चुकून भेटणार, तो तिच्या लहान पोराला कडेवर घेणार,हे असेच चालायचे.त्या पोराने तिच्या जुन्या प्रियकराला मामा म्हणायचे. हे असेच चालायचे हे असेच चालायचे.तसेच ट्रेकचे आहे. सह्याद्रीचे ट्रेक कधीही सोपे नसायचे हे असेच चालायचे, हे असेच चालायचे. 

थोड्यावेळात प्रशस्त पायऱ्या लागतात. वाट पुर्ण १८० अंशात वळून पायऱ्या चढुन हा बुरुज चिलखतीबुरुज या प्रकारचा आहे. बाहेरच्या तटबंदीत उतरता यावे यासाठी आतून छोटा जिनाही केलेला आहे.याठीकाणी मात्र ट्रेकर्सची खूप गर्दी होती. जो तो फोटोग्राफीमध्ये गर्क होता. इथे सर्वात वरच्या पायऱ्यांवर बसून मागोमाग येणारे ट्रेकर्स आणि तो जंगलचा सुखद गारवा अनुभवणे खूप आनंददायी होते. इथे आवर्जून थोडा वेळ काढून ह्या अर्ध्या कोरीव आणि अर्ध्या बांधीव बुरुजाची रचना पहावी.

इथे या बुरजावर एकदम निमुळती चोरवाटदेखील आहे. लीडर्सने खाली उतरून त्या वाटेची पाहणी केली. शिवाजी राजांच्या काळात काय अक्कल आणि शक्कल लढवून चोरवाटा, बुरुज, मोठमोठे दगडी जिने,मोठमोठे दगडी दरवाजे कसे बनवले असतील याचा आपण विचार देखील करू शकत नाही.स्वराज्यासाठी लढणारा प्रत्येक योद्धा, माणूस खूप ग्रेट होता.नेहमी आपण त्यांना मुजरा करूनच पुढे जातो. अश्या या पावनभूमीत जन्माला आलो आणि आज ट्रेकर्स म्हणून ही पावनभूमी,दुर्ग किमान पाहावयास मिळते हे आपले अहोभाग्यच आहे. या चोरवाटेमधे दुर्मिळ जंगली पाल आम्हाला पाहावयास मिळाली. 
याला चिकटून पाच्छापुरकडून येणार्या वाटेवर नजर ठेवलेला दुसरा बुरुज आहे.इथे आम्ही पाच-सहा जणांनी प्रतीकने सांगितलेल्या कल्पनेने एका झाडावर वेगळी फोटोग्राफी केली ती फारच कौतुकास्पद ठरली.

दमल्यामुळे गवतावर बसण्याची इच्छा असून देखील काळ्या अळ्यांच्या भीतीने कुठेही बसता आम्ही झपाझप चालत राहिलो शेवटच्या टप्प्यात घळीतून पडणाऱ्या बारीक धारेतून पाणीभरून घेऊन थोड़े गार पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर मारून स्वतःला गार करून घेतले. त्या घळीत क्षणभर थांबून दहा मिनिटांमध्ये आम्ही सुधागडच्या माथ्यावर पोहोचलो. सुधागडचे ते प्रशस्त पठार पाहून डोळे तृप्त झाले. तेथे असलेले मोठमोठाले खडक जणू फोटोग्राफीसाठीच ठेवले असावे असे वाटू लागले.

पठारावरून एकीकडे तैलबैलाच्या दोन भिंती, एकीकडे ढगांनी आच्छादलेला घनगड दुर्ग, एकीकडे दुर्ग रायगडचे टकमक टोक, आणि मध्ये दरीखोरे, असे ते डोळ्यांना सुखावणारे रमणीय दृश्य पाहून जणू डोळ्यांची तहान शमत होती. कोकणात उतरणाऱ्या सवाष्ण घाटाचा पहारेकरी म्हणून आणि येथीलप्रशस्त पठारामुळे राजगडानंतर आणि रायगडापूर्वी शिवाजी महाराजांच्या मनात राजधानीम्हणून सुधागडचा विचार होता. परंतु राजधानी वसवण्यासाठी रायगडचे पठार याहून प्रशस्त असल्याने त्यामुळे राजेंनी राजधानी म्हणून रायगडची निवड केली.
सुधागडचा तळाकडील घेर जवळपास पंधरा किलोमीटर आकाराचा आहे. सुधागडाच्या जंगलात आढळणारे वैशिष्ठ्यपुर्ण झाड म्हणजे पांढरीची काठी.सुधागड पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचेमंदिर तर उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. सिद्धेश्वरमंदिराबाहेर दगडी नंदी तर आतल्या गाभाऱ्यात शंकराची पिंडी आहे. सिद्धेश्वराच्या मंदिराजवळपाठीमागे एक मोठे तळे आहे त्यासकमलतळे" असे म्हणतात. 

शिवाय थोडी तटबंदी देखील आहे. शेजारीच काही मित्र त्या तळ्यामध्ये एका खडकावर पाय सोडून निवांत गप्पा मारताना पाहून प्रसन्न वाटले. ट्रेक दरम्यान माझा मोबाईल फक्त फोटोपुरता वापरला जातो. ते वॉट्सअँप फेसबुक एक मोहमाया आहे. माणूस त्यात पार गाडला आणि गुरफटला जातो.निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर एक दिवस तरी या मोबाइलपासून दूर रहातो त्यामुळे डोक्याला शांती आणि निसर्गात रममाण झाल्याने आत्मिक समाधान मिळते. इथेही मित्र-मैत्रिणी असतात त्यांच्याशी आपण मोबाईलशिवाय गप्पा मारत जाणे ही देखील आजच्या युगात एक वेगळी चांगली अनुभूती आहे. इथे या ठिकाणी शांत कितीही बसावेसे वाटले तरी गड पूर्ण पहायचा असल्याने आम्ही नाईलाजाने येथून पंतसचिव वाडयाच्या,(सरकारवाड्याच्या)दिशेने निघालो. वाटेत धान्य कोठार,भांड्यांचे टाके,हवालदार तळे,हत्तीमाळ लागले.




सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा .. १७०५ साली बांधलेलाआहे. चौकोनी आकाराच्या या मजबूत भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती ती श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची पुनर्बांधणी केली. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस व्हरांडा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. अगदीच वेळ आली तर पंत सचिवांच्या वाड्यात पन्नास तर भोराईदेवीच्या मंदिरात २५ जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. वाड्याच्या बाजूस एका छोट्या घरात राहणाऱ्या वयस्कर काकू पूर्ण वाडा शेणाने सारवून स्वच्छ ठेवतात. या वाड्यासमोर नव्याने बांधलेली एक धर्मशाळा आहे. सिद्धेश्वर मंदिराकडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष आणि ज्योती दिसतात.डावीकडच्या टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर कर्नाळा देखील दिसतो. पठाराच्या प्रत्येक ठिकाणावरून टकमक टोक सारखे खुणावत रहातेटकमक टोकाच्या वाटेवर मोठ्या संख्येने साप दिसतात अशी माहिती मिळाली.सरकारवाड्यात धोंडसे गावातील संतोष खंडागळे यांचे कुटुंब येणाऱ्या जाणाऱ्यांची नास्ता जेवणाची सोय करतात. संतोष गोपाळ खंडागळे हे सुधागडावरच्या भोराई देवळाचे गुरव आहेत. ते ट्रेकर्सची जेवणाची, रात्रीला गडावर वस्तीची व्यवस्था करतात.
आम्ही पंत सचिव वाड्यात पोहोचलॊ आणि वाड्याचा पोटमाळा फिरून इथेच जेवणाचे डब्बे काढून जेवण करून घेतले. याला सरकारवाडादेखील म्हणतात. इथे पोहोचल्यानंतर इतका वेळ दाटून आलेले, तग धरून राहिलेले ढग विजा चमकून धुव्वाधाररीतीने कोसळू लागले. वाड्याला पत्र्याचे शेड असल्याने आम्ही भिजण्यापासून वाचलो. इथेच बॅनर फोटो घेऊन आम्ही परतीच्या वाटेला निघालो. आलो त्या सोप्या बाजूनेच उतरता धोंडसे गावाच्या बाजूने कठीण वाटेने उतराई करणार होतो.दुपारी तीनच्या सुमारास आम्ही वाड्यातून प्रस्थान करून शेजारच्या भोराईश्वर मंदिरला भेट दिली.पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना उजवीकडे छान रंगरंगोटी केलेले भोराईश्वर मंदिर आहे.बाहेरपांढरा शुभ्र रंगाचा नंदी तर आत गाभाऱ्यात  शंकराची पिंडी आणि अनेक देवदेवतांच्या अनेक दगडी मूर्ती पहावयास मिळाल्या.या मंदिराच्या आसपास जंगलातही काही अवशेष आढळून येतात.
येथून निघून भोराईमंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो.त्यास चोर दिंडी तटबंदी असे म्हणतात. ही पायवाट उतरून गेलो की स्वच्छ पाण्याचे टाके आहे. आमच्याकडील पाणी संपल्याने आम्ही बऱ्याच पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. इथून दरीतून धोंडसे बाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता. येथील जंगल बऱ्यापैकी  घनदाट आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीआढळतात. आम्ही पुन्हा ती पायवाट चढल्यावर भोराईमंदिराकडे निघालो.
जाताना पुन्हाएक मोठे तळे दिसले इथे मात्र म्हैशी (भैसनवा) पोहताना दिसल्या. इथे पुन्हा टकमक टोक खुणावू लागले. इथला उजव्या बाजूचा रस्ता टकमकटोक दारुगोळा कोठाराकडे जाताना दिसला. वाड्यापासून आपण पायऱ्यांच्या सहाय्याने वर गेले की उजवीकडची वाट हत्तीपागांमधून जाऊन, सरळ एका टोकावर पोहचते. रायगडावरील 'टकमक' टोकासारखेच हे टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड स्पष्ट दिसतो. यांच्यामधील दरीत प्रतिध्वनी येतो म्हणून याला बोलते कडे असेही म्हणतात. येथे भन्नाट वारा वाहतो.  इथे दहा मिनिटे थांबून भोराई मंदिराकडे गेलो.त्यादिवशी दुपारची वेळ असल्याने मंदिर बंद होते.मंदिराबाहेर मोठा स्तंभ आमच्या स्वागताला उभा होता.भोराई देवीच्या मंदिराच्या मागीलबाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे.

मंदिराच्या आवारात जवळजवळ ३५ वीरगळी आहेत. येथील मंदिरामध्ये मध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. मंदिरात भली मोठी घंटा आहे. या भोराई मंदिरात चिनी मातीचा एका जुना रांजण होता. एका पावसाळ्यात झाड पडल्याने देवळाची भिंत पडली. त्यात रांजण फुटून त्याचे तुकडे झाले. काही तुकडे गावकर्यांनी आठवण म्हणून त्यांच्या घरात ठेवलेत. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे, जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे. भोराई देवी ही तत्कालिन औंध संस्थानाचे पंत सचिव यांचे कुलदैवत आहे. नवरात्रच्या काळात गडावर भाविकांची गर्दी होते.सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात.
भोराईदेवीच्या मंदिरातून आता थेट उतराईचा मार्ग धरला. कारण ट्रेकप्रमुख म्हणाले की आता जर आपण अजून उशीर केला तर धोंडसे गावात पोहोचायला अंधार होईल.  याबाजूच्या घसरड्या आणि पडझड झालेल्या आणि पूर्णपणे मातीत रुतून बसलेल्या पायऱ्यामधून आम्ही कसेबसे घसरत वाट काढीत दिंडी दरवाज्यापर्यंत येऊन पोहोचलॊ. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.या दरवाज्याला कोरा दरवाजाही म्हणतात.या दरवाज्यावरदोन्हीकडे शरभ शिल्प आहेत. त्यावर नक्षीकाम आढळते. दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपल्यामुळे त्या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. दरवाजामध्ये बंदुकीसाठी जंग्या आहेत.दरवाजात दोन देवड्या असून चौकटीखालून पाणी वाहून जाण्यासाठी जागा आहे.आज हादरवाजा पूर्ण मोकळा झाला आहे. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची  जणू प्रतिकृतीच आहे.
पायऱ्यांची पूर्ण पडझड झाल्याने जिथून धबधबा पडतो त्यापेक्षा खतरनाक घळ निर्माण झाली आहे. नेमका  कोणत्या दगडावर   पाय ठेवावा हे समजत नव्हते. त्यातून आता थकलेले असताना वाट काढणे म्हणजे थोडे अवघडच  जाते.अशावेळी आपोआपच - ट्रेकर्सचे गट पडून जातात. काही ट्रेकर्स खूप पुढे गेले होते  यावेळी मी नवीन बूट घातल्याने उतरताना तो माझ्या पायाची दही नखे उचकटून काढतो की काय असे मला जाणवत होते आणि माझी पावले आपोआप हळू पडत होती. त्यातही अधून मधून सहकाऱ्यांसोबत फोटोग्राफी सुरु होती त्यामुळे थकवा पळून जात होता. पाच सहा ट्रेकर्सशिवाय आणि घनदाट जंगलाशिवाय चिटपाखरू देखील दिसत नव्हते. साडेचारच्या सुमारास उतरताना उजव्या हाताला अजून एक सातवाहनकालीन टाके लागते त्याला हनुमान टाके म्हणतात. या टाक्याशेजारी एक ढाल-तलवार घेतलेली योद्धयाची मूर्ती आहे. म्हणून याला तानाजी टाके म्हणतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे. मात्र ही मुर्ती तानाजीची आहे याला कसलाही आधार नाही. तानाजी मालुसरेंच्या या किल्ल्याशी असा काही संबध आल्याचे वाचनात नाही.
उतरताना एका ठिकाणी उजवीकडची वाट सोडून घळीतून मोठमोठ्या खडकातून उतरणे अवघड वाटू लागले होते. १५-२० मिनिटे तसेच उतरत राहिलो. मला वाटलेच होते की आपण वाट सोडून थोडे बाजूला चालतोय. आमच्यातील अजून दोन ट्रेकर्सदेखील वाट चुकले होते ते देखील त्याठिकाणी आम्हाला सामील झाले. त्यानंतर सर्वजण सावधानीने उजवीकडे चालत राहिलो तेवढ्यात आमच्यातील हर्षदाला दिशादर्शक फलक दिसला त्यामुळे हायसे वाटले आणि पुन्हा योग्य वाटेवरून चालू लागलो.
पाच वाजताच्या सुमारास मात्र पूर्ण सात वाजल्यासारखा अंधार झाला. ढगांचा गडगडाट विजांचा थयथयाट सुरु झाला. आम्ही नेमके एका पडक्या मारुती मंदिराजवळ आसऱ्यासाठी उभे राहिलो. येथे जे मारुतीचे पडके मंदिर होते ह्याला स्थानिक लोक कासारपेठ मारुती म्हणतात.तिथे कसलेही छप्पर नव्हते झाडाच्या चार लाकडांवर, काही रचलेल्या दगडांच्या आधारावर प्लास्टिक लावले होते तेदेखील फाटले होते त्याचा आधार घेऊन आम्ही उभे राहिलो. परंतु घनदाट जंगल असल्याने वीज कुठेही कशीही पडू शकते याची प्रत्येकाला सॉल्लिड भीती होती. तरीही एकदोघांनी खूप गर्मी होत असल्याने पावसात भिजण्याचा आनंद घेतला. आम्हाला तर थांबावे की जावे हे काही कळेना. पाऊस तर वाढतच होता. आम्ही आमचे मोबाइल तेवढे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून ट्रेकप्रमुख येताना दिसले आणि आम्ही त्या धुव्वाधार पावसात न थांबता चालू लागलो. इतका वेळ कोरड्या घळीतून उतरत होतो तेच अवघड वाटत होते त्यात भरीत भर हा पाऊस पडला आता पाण्याच्या वाहणाऱ्या प्रवाहातून अंदाजे पावले टाकत धडपडत चालत राहिलो. मागच्यांना आवाज देत-देत आत्ताच्या पडणाऱ्या पाण्याने भरलेले -ओढे पार करीत चालत होतो. अधूनमधून दिशादर्शक फलक नजरेस पडला की योग्य दिशेने चालल्याचा दिलासा मिळत होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास शेवटचा ओढा दिसला आणि हायसे वाटले. वाटेत या वाटेमध्ये तीन वेळा ओढा ओलांडावा लागतो. मुळात हा ओढा म्हणजे सह्याद्रीत उगम पावणारी दातपाडी नदी आहे. पावसाळ्यात ती दुथडी भरून वहात असते. काळजी घेतली नाही तर नदीचे नाव आपल्या बाबतीत खरे होण्याचा धोका संभवतो.
जसजसे खाली पोहोचत होतो तसतसे वरती सुधागडकडे पहिले की चहाची तलप आली असताना जणू असंख्य मोठमोठाले चहाचे ओढे वाहताना दिसत होते परंतु ते पिता येतनव्हते हे आमचे दुर्दैव होते. शेवटच्या ओढ्याजवळ पोहोचलॊ तेव्हा असे वाटले की आमचे आधी आलेले ट्रेकर्स इथे थांबले असावेत परंतु इथे तर कोणीही नव्हते. आणि ओढा तर दुथडी भरून वाहत होता. फक्त १५ ट्रेकर्स होतो आणि त्या वाहत्या प्रवाहातून आम्हाला बिनारोप जाणे अवघड वाटत होते. पुढच्या लीडर्सना फोन लावायला तर कोणाच्याही सिमकार्डला रेंज नव्हती. मग थोडावेळ वाट पाहिली तर आमच्या समोर एका भूभू ने स्वतः पोहोत जाऊन दाखवून दिले की चला या आता अश्या प्रकारे तुम्हीयेऊ शकता. तो भूभू जाताजाता एका ठिकाणी वाहून जात होता परंतु नंतर तो एका मोठ्याखडकामुळे वाचला आणि पलीकडे सुरक्षितरित्या गेला.नंतर आम्ही गावात पोहोचलो तेव्हा त्याचे नाव रस्की आहे  असे समजले. तो तर एकटा त्या वाहत्या प्रवाहातून पार झाला. मग आम्ही तर १५ ट्रेकर्स असू. सर्व ट्रेकर्सने रोप नसताना हाताची साखळी करून ओढा पार करण्याचे ठरवले.  म्हणता म्हणता सर्वजण सुरक्षितरित्या ओढा पार करून चालू लागले
अचानक पाऊस पडल्याने पाऊलवाटेवरून खूप सारे खेकडे पळापळ करू लागले होते आणि ते पकडण्यासाठी स्थानिक ठाकरमाणूस  बांबूचे जाळे घेऊन लगबगीने जात होता. आमच्यातील संपन्न या ट्रेकरला खेकडे मासे पकडणारा वाटेत भेटला त्याच्याकडे बांबूपासून बनवलेले एक उत्तम जाळे होते त्याची वीण अप्रतिम होती
ओढ्यानंतर पुन्हा २कि.मी अंतर चालून जायचे होते. ज्या वाटेने गुरे जातात त्या वाटेने आम्ही चालू लागलो. ते दीड किमी चालून गेल्यावर एक छोटा पूल दिसला आणि हायसे वाटले इथून धोंडसे गाव फक्त एक कि.मी.वर होते. त्या छोट्या पूलावून सुधागडची दुसरी बाजूदेखील भव्य आणि सुंदर दिसत होती. भर उन्हात तीन तासांची उतराई धुव्वाधार पावसामुळे चांगलीच आठवणीत राहिली. सातच्या सुमारास भूषण चौधरीने मोजलेल्या अंतरानुसार जवळपास १५ कि.मी.चा भन्नाट ट्रेक संपला. धोंडसेगावात खंडागळे यांच्याकडे फक्कड चहा तयारच होता. त्याचा आस्वाद घेऊन भिजलेले कपडे बदलून पुणेकडे रवाना झालो. निघताना गावातच बसखाली घोणस नावाचा विषारी साप वाटेत आला. बसड्रायव्हरला बस मागे घ्यायला लावून आमचातील सर्पमित्र निकाळजे यांनी त्या घोणसला उचलून शेतात सोडले आणि आम्ही पुणेकडे सुरक्षितरित्या पोहोचलॊ.

यावेळी सर्व ट्रेकलिडर्स सोबत असल्याने खूप धमाल आली. मंदार सर, राणे सर, रोहित सर, निकाळजे सर, अनिल जाधव  लीडर्स हो,सुधागडसारखा प्रशस्थ,सुंदर भन्नाटट्रेक तुम्ही  आयोजित केला त्यासाठी मनापासून धन्यवाद. सर्व ट्रेकर्सच्या सहकार्यामुळे माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा १०१वा ट्रेक उत्तमरीत्या पार पडला त्यामुळे ट्रेकर्सचे मनापासून कौतुक आणि मनापासून अभिनंदन.राहुल दर्गुडे,दिनेश,शेवाळकर सर, रोहित सर, सलोनी, प्रतीक, काळोखे-भेगडे टीम, श्रीपाद जोडी, मंदार सर, राणे सर,हर्षदा आणि टीम आणि सर्व नवीन जुन्या फोटोग्राफेर्सचे विशेष कौतुक. माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स.

(संदर्भ ग्रंथ-
डोंगरयात्रा - लेखक आनंद पाळंदे,
रायगड जिल्हा गॅझेटियर - के. बी. मोहनराव,
साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची -लेखक प्र.  के.  घाणेकर .)