Saturday 4 July 2020

"फुलपाखरू"


फुलपाखरू 
--२०२०
आपले आयुष्य हे फुलपाखराप्रमाणे कसे बनवावे हे आपल्याच हातात असते. परवा माझ्या मुलीने एकादशीचा उपवास केला आणि माझे लाड करणाऱ्या आईची,आजीची,आत्याची आठवण आली.संपूर्ण जीवनप्रवास डोळ्यासमोरउभा राहिला.आपण माहेरामध्ये जितके लाडात असतो तितके सासरात असूच असे नाही. मुलगी लग्न होऊन सासरी गेली की म्हणे तिला दोन घरं मिळतात. हे साफ खोटं आहे.  आमचे माहेर कधीच मागे रहाते तुटते तिथे जाता येते ते फक्त पाहुणी म्हणूनच. आम्ही मुली सासरलाच आपलं सर्वस्व मानू लागतो माहेरच्या पाहुणी बनून जातो. आपली परंपरा देखील तशीच आहेअसा नियम असावा ह्याची  गरज  वाटत नाहीअर्थात ज्यांचे माहेर जवळ आहे त्या रोज माहेरी जाऊ शकतात.  सासरी नविन असताना फारतर एखादे वर्ष लाड (लाड कसले ??तिने जर व्यवस्थित घरात कामे केली तर तिला जमवून घेतलं जाते इतकेच)  तीदेखील ह्या सगळ्यांसाठी जिवाचा आटापिटा करून सगळं शिकून घेत असतेएक ते दोन टक्के मुलींना मुलीसारखी चांगली वागणूक मिळत असेल, कधीतरी कोणीतरी माहेराप्रमाणे लाड करत असेल. परंतु कामाची कसरत केल्याशिवाय तिला साधा एक कप चहादेखील मिळत नाही,कितीही नोकरचाकर असोत तिची कशातूनही सुटका नसतेसासरची दिवसभराची कामे,सततचा पाहुणचार,सणवार,इ.  माझ्या माहेरात हा असा माझा त्रास कोणाला होवू नये म्हणून मी सारखंसारखं माहेरात यावे लागू नये अशा दूरच्या स्थळाला हो म्हंटलं होतं. एखाद्या वळणावर आई-वडिलांकडे एक महिना जाऊन रहावे तर आई-वडिलांना समाजाची काळजी जास्त असते आणि जे लेकरं रडत राहतात त्यांची काळजी जास्त असते. जे लेकरू हसत-खेळत रहाते  त्याची आईवडिलांना जास्त काळजी नसते. परंतु त्या लेकराला आयुष्यात काही त्रासच नाही असे नसते ना? लोकांना वाटेल की मुलगी इतके दिवस राहिलिये म्हणजे तिला नवऱ्याने टाकले की काय?? अरे,टाकायला ती काय वस्तू आहे काय??भंगारातील वस्तू टाकताना देखील तिच्यात आपला इतका जीव अडकलेला असतो की टाकायची वस्तू दहा वर्षे तरी आधी अडगळीत रहाते मग आपण टाकतो. सून तर एक जीवंत माणूस आहे. माझ्या मते पैसा असणे म्हणजे सर्वसुख नव्हे.एकवेळ गरीब असलो तरी चालेल परंतु सामान्य सुख आपल्या झोळीत पाहिजे तरच माणूस कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतो आईकडे असताना उपवास असला की मला काहीही काम लावत नसत,माझी आजी आईला आधीच सांगत असेअगं पोरीने काही खाल्लं नाही. तिला काम सांगू नको.”.


सासरात कसं असतं उपवास असला तरी सकाळी उठल्यापासून ती राबराब राबणार. बिना उपवासवाल्यांचा स्वयंपाक करणार उपवासाचे पदार्थ करणार इतर कामे करणार नोकरीवालीची तर याहून तारांबळ असते.होपण ती नोकरी करते म्हणून तिचे थोडं तरी कौतुक असतंमलाही नोकरी करणाऱ्या मुलींचे खूप कौतुक आहे आणि ज्या घरात राहून अभ्यासाच्या शिकवण्या घेतात किंवा घरबसल्या बरेच व्यवसाय करतात, यांचेदेखील खूप कौतुक आहे . परंतु गृहिणी कमालच असतात.  
माझ्या सासरात माझे दोन जुळे दीर आणि मी अशा तीन सुना,एक नोकरी करणारी का?तर तिच्या नवऱ्याला नोकरीवालीच बायको हवी होती म्हणून, एक सून बिझनेस सांभाळणारी आणि माझ्या नवऱ्याला तर म्हणे शिकलेली बायको हवी परंतु घर सांभाळणारी हवीयेअरे शिकलेली मुलगी सुद्धा उत्तम घर सांभाळून दाखवते आणि नोकरी करणाऱ्या मुली सुद्धा उत्तम घर सांभाळतात.. माझी मावशी, काकी,माझ्या मामेबहिणी,काकांच्या मुली सगळ्या MERIT वर MBBS,MD झालेल्या, कोणी इंजीनियर,कोणी अमेरीकेत स्थायिक असलेल्या अशा सगळ्या आहेत आणि घर देखील उत्तम सांभाळतात.कुठेच कोणाचं अडलं नाहीये.माझी एक नणंद सुद्धा CID नोकरी करते व सगळं नीट मॅनेज करते मग अडते कुठे???परंतु प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा नजरीया वेगळा असतो. 
लग्न ठरवताना मला  नोकरी करू देणार नाही  म्हंटल्यावर  माझे,बाबा,मामा,मावशी  या स्थळावर नाराज होते. परंतु मुलगा निर्व्यसनी,पर्मनंट नोकरी, पुण्यात स्वत:चं घर, माणसं चांगली आहेत म्हटल्यावर मीच विचार केला माझं माहेर लांब असल्याने मला दुरावेल परंतु वडीलांची चिंता जाईल.मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात जाईल. असा विचार करून मी मुंबईतून पुण्यात येण्यास होकार दिला. माझे ठाण्याचे मामा भारतबिजली या कंपनीमध्ये jobकरीत होतेते एका विवाह मंडळाचे अध्यक्ष होते विवाह मंडळाचे अध्यक्ष होण्याआधीच त्यांना मुलींची मुलांची स्थळ जमवण्यात खूप आवड होती आणि खूप लोकांचे त्यांनी भले केले आहे. ओळखी खूप असल्याने खूप लग्न जमवली आणि सगळे आज  सुखात नांदतायतत्यांनीच माझं लग्न जमवलं.हा देवमाणूस आज हयातीत नाहीये. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आज असते तर माझा आयुष्याचा चढता क्रम पाहून खूप खुश झाले असते
मित्रहोमी तर मनापासून सांगते मला कधीतरी नोकरी करायला मिळेल या आशेवर मी दूरच्या स्थळाला होकार दिला होता परंतु तसं काही घडलंच नाही. त्याबाबतीत माझी कायम निराशा झालीलग्नाआधी फार स्वयंपाक जमणारी मी, लग्नानंतर स्वयंपाक आणि इतर कामं करण्याची माझी पद्धत पाहून सगळ्यांना वाटे मला ती कामे आधीपासूनच येतात.  जणू हॉटेलच्या शेफ सारखी. हाहाहा. परंतु तसं बिलकुल नव्हतं.मुलीला काही येत नाही हे आई-वडिलांना ऐकावे लागू नये म्हणून मी प्रत्येक गोष्ट शिकायची मेहनत घेत होते.त्यात सगळ्यात जास्त कहर म्हणजे नॉनव्हेज बिलकुल आवडणारी मी कसं काय नॉनव्हेज बनवायला शिकू लागले आणि हळूहळू उत्तम बनवू लागले. बरं घरात सासूने मुलांचे इतके लाड केलेले की पाण्याचा ग्लास देखील आई हातात आणून देत होती. घरातले अति पसारे आवरणे आठवड्यातून तीनचारदा nonveg चा घाटनुसतं जेवणावळ जेवणावळ करून मी एक वर्षात पकून गेले होते. मी सगळं मनापासून करायचे पण एखादी गोष्ट अती झाली की माणूस थकून जातो. त्या सवयी बदलायला खूप वेळ लागला. परंतु आम्ही मुली आमच्या सगळ्या सवयी लाड,लग्न झालं की विसरत नाहीत तर आपसूकच बाजूला ठेवतो ( मी तर माझ्या जेवणाच्या आवडीनिवडी चुलीतच घातल्यात) आणि सासरच्यांच्या आवडीप्रमाणे स्वत:ला सवयी लावून घेतो. लग्न झालं तेव्हा माझी PG (मराठी)ची परीक्षा बाकी होती ती मी दिली त्यात मला फर्स्ट क्लास मिळाला तेव्हा मला नोकरी करू देतील याची आशा वाढली होती शिवाय लग्नानंतर चारच महिन्यांत मला Thane जिल्हा employment office मधून ठाण्याच्या एका ज्युनिअर college वर प्राध्यापकाच्या पदाच्या इंटरव्ह्यूसाठी call आला तेव्हा बाबांची कळकळ होती की किमान इ़टरव्हू तरी दे बाकीचं नंतर बघू परंतु मला कोणीच जावू दिले नाही. तूला जायचं तर इंटरव्ह्यूला जा परंतु तुझी निवड झाली तर मी काय तुझ्या मागे मुंबईत येणार नाही. हे मिस्टरांचं वाक्य आजही कानात थोडं टोचतंय मला. (म्हणजे माझा इंटरव्ह्यू चांगला होवून माझी निवड होणार याची खात्री होती तर हाहाहा जर आम्ही मुली तुमच्या बदल्या होत असल्यावर तर राज्य सोडून यायला तयार असतो, देश सोडून यायला तयार असतो तर मग तुम्ही आमच्यासाठी साधं शहर सोडू शकत नाही??.ही नुसती कारणं होती मला नोकरी करू देण्याचीपरंतु मी तरीही आशासोडली नाही. वडीलांना कसलीही तक्रार करता मी माझं कर्म करत राहिले .सासरच्या कामात आणि माझ्या परीक्षेत इतकी मग्न होते की कुटूंब नियोजनचं काही साधन वापरायची असतात ही अक्कल पण आली नाहीएक वर्षाआत मूल पदरात पडलं. सगळे खुश होते पण मी तर अर्धमेली झाले होते आता तर हे मूल वाढवण्यात माझी वर्षे वाया जाणार. लादलेले आईपण होते पण त्या मुलाची काय चूक होती त्यामुळे मी ते मूल प्रेमानेच वाढवलेमाझी नणंद माझ्याच वेळी प्रेग्नंट असून तिला काही अडचण असल्याने आमच्याकडेच रहायला होत्या. मला कामाचा लोड खरंच झेपत नव्हताकामाच्या लोडपेक्षा सासूचा तिच्या मुलींवर इतका अती जीव होता की सतत काहीतरी खायला देत रहायची आणि माझे थोडे जरी चुकले तरी जरा जास्तच बोलायची.  ती हे विसरली होती की माझं मुल पण लहान आहे,मी पण थकत असेल, कंटाळत असेल. मी पण कोणाची तरी मुलगीच आहे.त्यात माझी सासू माझ्या लेकराला नीट प्रेमसुद्धा करू देत नव्हतीतू दे ते बाळ इकडे आणि कामं कर. त्या बाळाचं मात्र व्यवस्थित सगळं करायच्या. ते पोरगं पण इतकं दणकट होतं की १० महिन्यातच चालायला लागलं, एक वर्षातच स्वतःच्या हाताने वरणभात जेवण करू लागलेकुटुंबात सगळॆ लाड करायचे त्या बाळाचे.  त्यामुळे मी आपली नुसती कामे करत राहायचे. माझ्या आईचा तर तिच्या सुनांवर जास्त जीव आहे. जो तो आपले नशीब लिहूनच येतो हे अगदी खरे आहे. माझ्या डिलीव्हरीच्या एक महिन्यात माझी रवानगी सासरी झाली कारण नणंदेची डिलीव्हरी केव्हाही होवू शकते. मी लहान बाळासहीत पुन्हा स्वयंपाकाच्या गाडायला जुंपायला पुण्यात आले. नणंदेची डिलीव्हरी झाली ती दोन तीन महिन्यांत तीच्या घरी गेली . ( नणंदा स्वभावाने चांगल्या आहेत पण सगळ्यांची एकच रट लावलेली की तुला बोली करूनच आणलंय की नोकरी करायची नाही ) फक्त तेव्हाच सगळ्यांचा राग येत होता.बाकी काही अडचण नव्हती.  एकीकडे एका दीराचं लग्न झालं लहान लेकराला घेवून आख्खी लग्नाची तयारी एकटीवर होती ती उत्तम पेलली ही इतकी अफाट ताकद कुठून येते देवच जाणो..मला वेडीला आशा होती की एक जाऊ आली तर मला नोकरी करता येईल पुन्हा पाच महिन्यांत दुसऱ्या जुळ्या दिराचं लग्न झालं. माझं वजन पंचेचाळीस वरून ३५वर आलं होतं.अवेळी जेवण कमी झोप,माहेरी जाणं सतत काम, आठवड्यातून दोन-तीन वेळा किमान तीस लोकांचं जेवण बनवून हात आणि मन थकले होते. दीराच्या लग्नात मीच बस्ता बांधून आणलेल्या मानाच्या साड्यामधील एक  तीनशे रूपयांची साडी गहाळ झाली तर सासू डायरेक्ट बोलली तू गपचूप तुझ्या पाहुण्यांना दिली.हाहाहा माझे पाहुणे असल्या साड्या घालतही नव्हते.स्वत: कमवून खाणारे बादशाही थाटात रहाणारे माझे सगळे नातेवाईक आहेतकाही असो माझ्याच घरात मी का चोरी करू?? माझ्याकडे हजारो साड्या,ड्रेसेस,मला त्यात फार रस देखील नव्हता.काहीतरी विचित्र गैरसमजाने त्या असं बोलत असाव्यातना आई-वडिलांकडे मला भौतिक सुखाची कमी ना नवऱ्याकडे कमी सगळं भरभरून होतं, आणि आजही  आहे.त्याबद्दल माझी कधीच कोणालाच तक्रार नाही
माझा जीव नोकरी करायला मिळेल का ?? यातच अडकलेला होता. लहानपणापासूनच प्रत्येक विद्यार्थ्याचे एक  स्वप्न असते की मी मोठेपणी शिकून काहीतरी बनणार आहे. परंतु इथे सासरच्यांनी माझ्या विचारांना  तर मोठे भगदाडच पाडून ठेवले होते. आपल्याच घरात आपण चोरी कशाला करणार? खरंच चोरी करायची असती तर ३५० रुपयाच्या साडीची का केली असेल??एवढा  साधा विचार देखील केला नाही. आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधीच अश्या चोऱ्यामाऱ्या  करायला शिकवले नाही संस्कार तेवढे चांगले केले आहेत.  हे कोणालाच कळाले नाही चोरीसारखा आरोप कोण सहन करणार?? ही गोष्टदेखील मी आई-वडीलांना लगेच सांगितली नव्हती. सासूच्या मनात कोणीतरी माझ्याबद्दल चुकीचे सांगितले असेल. त्यामुळे त्या एक वर्ष उलटलं तरी एकच रट लावली साडी तूच घेतली. आणि तुझ्या पाहुण्यांना दिलीसगैरसमज फार वाईट असतो. कदाचित मी हो म्हंटले असते तर विषय तिथेच संपला असता. माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले तरी म्हणतात बघूच. मग मला ते काय आवडले नाही. म्हणजे मी जर घेतली असेल तर तुझ्या मुलाला काहीतरी होईलच अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या. एखाद्याला चांगली माणसे ओळखता आली नाही की ती माणसे अशी सैरभैर वागतात. आपण यात काहीच  करू शकत नाही. दोघी नविन जाऊ आल्यावर वाटले मला थोडातरी आराम मिळेल आरोग्य तरी चांगले राहील पण झालं उलटंच. फालतू गोष्टीत आयुष्य वाया चाललंय या विचाराने मन शरीर खंगत गेलं..मणक्याचा त्रास सुरु झाला आख्या मणक्यात ग्याप आली..चालण्या सारखा सुद्धा व्यायाम नाही कुठे फिरणे नाही मिस्टरांनी लग्न झाल्यावर उटीला जाऊ सांगून चार दिवस महाबळेश्वरला नेले. त्यातही ते होमसिक झाले ( आजही कुठे बाहेर गेलो चुकून तर आजही ते होमसिक होतात )बरं होमसिक व्हायला आम्ही सगळे सोबत असतो त्याचे आई-वडील तर वैकुंठाला गेले.) पण मी आता ते सहजतेने घेते एखाद्याचा स्वभाव असतोआपण एखाद्याचा स्वभाव बदलू शकत नाही  हे खरेआम्ही मुलींनी काय करावं. इच्छा नसताना आमचे आई-वडील कायमचे सोडून येतो मनावर दगड ठेवून राहतो ना आम्ही? आम्ही तर कितीदा होमसिक व्हायला पाहिजे.???
नविन जावांचे सासू लाड करू लागली.मी तर घरची कामवालीच बनलेकामवाली तरी घरी जाते. मी तर चोवीस तास राबणारी यंत्रच जणू. कोणाला वाटेल घरात काय इतकं काम असतं?? हो माझ्या घरात होतं आणि माझी इतकी क्षमता असून मला ते झेपत नव्हतंरडून जीव थकून जायचा  परंतु इथे माझं  रडगाणं ऐकायला कोणाला वेळ होता
आपुलकीसाठी, प्रेमासाठी जीव तडफडायचा.  मला एक अंधाराची आणि मला इंजेक्शनची पहिल्यापासून भीती वाटते तरी मणक्यासाठी मी एक दिवस आड जाऊन असा २२ इंजेक्शनचा कोर्स केला. मला इंजेक्शन घ्यायची सुद्धा ताकद नसायची. इंजेकशनची भीती वाटते म्हणून मिस्टर डॉक्टरकडे तेवढे सोबत असायचे. त्यांना वाटायचे कधीतरी सगळे गैरसमज दूर झाले की सगळं ठीक होईल परंतु सगळं वाढतच गेलं. माझे एकच मत होते की नवरा असो नाहीतर आईचा मुलगा असो त्याने जो खरा आहे त्याचीच बाजू घ्यावी. तो फक्त खऱ्याची बाजू घेत होता. काही असह्य झालं की माझा आवाज वाढत असे तेव्हा तो मलाही समजावीत असे. मी गप्प बसले तरी आई काही गप्प बसायला तयार नसायची आणि तिन्ही मुली हाकेच्या अंतरावर असल्याने त्यांच्या बाजूने बोलायला होत्याचपण माझी बाजू घ्यायला फक्त माझे मिस्टर ही एकमेव व्यक्ती होतीदिरांची लग्न झाल्यामुळे तेदेखील आता मध्ये पडत नव्हते परंतु नंतर मी घर सोडून गेले तेव्हा असाच त्रास त्यांच्या बायकांना झाला तेव्हा मात्र मलाच सांगू लागले. कसे असते ना?? कोणतीही वेळ स्वतःवर आल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याचं दुःख कधीच समजत नाही.  .
आज लिहिताना आठवले तरी डोळ्यात पाणी येते..माझ्या हातचं जेवण चांगलं बनत होतं त्यामुळे ते मलाच करावं लागे.सगळा स्वयंपाक माझ्या जावांना मीच शिकवला.जावा चांगल्या होत्या. मला बहीण नसल्याने मी नणंद जावांमध्ये बहिण शोधत होते.. परंतु आपल्या नशिबात नसते ते आपल्याला कधीच मिळत नसते. सासूला आमचे एकत्रित मिळून रहाणे आवडले नाही. तुम्ही माझ्याविषयीच काहीतरी कट रचता असे त्या उगाच गैरसमजाने म्हणत नंतर मला खूप मानसिक त्रास होऊ लागला. झुरुन झुरुन मला डबल टायफाईड झाला.
मुलींनो,मैत्रिणींनो लक्षात ठेवा कधीच कसला स्ट्रेस घेवू नका आणि अन्याय सहन करू नकाआपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. मला टायफाईडमुळे काहीही खाल्लं की मोशनला व्हायची. त्यात मुल लहान होती शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने बीपी लो व्हायला लागला..मला झोपून रहावं लागे.मुलाला नर्सरीत सोडायला जावे लागे.कोणावर अवलंबून नको रहायला म्हणून मी तेवढया त्रासात स्कुटी शिकून घेतली,.शिवणक्लासचा कोर्स केला,.मशिन घेतली.ड्रेसब्लाऊज शिवता येवू लागला होता, काय शिक्षण होता माझं आणि काय करत होते मी. पण कोणतेही काम छोटे नसते हा विचार करून मी सगळं शिकत राहिलेपैसा कमवण्यासाठी आणि माझ्या मनाच्या समाधानासाठी घरच्याघरी काही तरी व्यवसाय करावा म्हणून पैसे गुंतवून सोनाराकडून order घेवून एक टेलर मी त्या मोठ्या ब्याग्ज, पर्सेस शिवू लागलो.त्यातही घरच्यांची सारखी कटकट ऐकावी लागत होती.नवरा म्हणे तू फक्त उलट उत्तर देवू नको .जातील हे दिवस सरतील, सासूचा गैरसमज दूर झाला की चांगलं होईल पण तसं काही होत नव्हतं .ब्याग्जच्या व्यवसायात माझी एक नणंद मी पार्टनर होतो गुंतवणूक केली माझ्या मिस्टरांनीमेहनत करत होते मी आणि माझे मिस्टर देखील स्क्रीन प्रिंटींग स्वतः शिकून घेतले आणि ऑफिस मधून आल्यावर स्वतः ते स्क्रीन प्रिंटिंग करीत असतत्यासाठी त्यांनी स्वतःचा लग्नाआधीपासूनच सुरु असलेला खेळ बॅटमिंटन बंद केलामेहनत किती आणि कशी करावी आणि संयम कसा ठेवावा हे मी त्यांच्याकडूनच  शिकलेआजही हा माणूस अफाट मेहनत करतो. बाकी त्यांच्या आवडी वेगळ्या आहेत परंतु मी मेहनतीच्या बाबतीत आणि आईवडील आणि भावंडांवर असलेल्या प्रेमाबाबतीत सलाम करते माझ्या मिस्टरांना. त्यांचा एकेक किस्सादेखील प्रेरक आहे, सांगण्यासारखा आहे. त्या बॅगच्या व्यवसायात माझ्या नणंदेने सगळा नफा लाटला मला फक्त एक सोन्याची अंगठी देऊ म्हणे. माझ्याकडे त्यावेळी लग्नात आलेल्या वीस अंगठ्या तरी असतील. मला कामाच्या मोबदल्यात  ती अंगठी घेण्यात अजिबात रस नव्हता. मला कामाचा प्रॉपर मोबदला हवा होता की जो पगार रूपात असेल.  मी घरात राहून इतकी मेहनत करते त्याचा पगार घेऊन मला चुकीचं समजणाऱ्या सासूच्या हातात देऊन तिला ह्या घरात माझी पण काहीतरी किंमत आहे हे दाखवायचे होते. मी ती अंगठी घेतली नाही आणि बॅगचा व्यवसायच बंद केला. इतका त्रास सहन करून केलेल्या कामाचे चीज होत नसेल आणि जर गुंतवलेले भांडवल जमा होत नसेल तर काही उपयोग नाही.
माझी सासू सारखं आपलं नोकरी करणाऱ्या दुसऱ्या सुनेचं कौतुक मला सांगायची आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे लाड करायची मग मला वाईट वाटणारच. मग जर नोकरी करणाऱ्या सुनेचं इतकं कौतुक आहे तर मला का नोकरी करू नाही दिली मग????.
दोघी जावा घराबाहेर जात होत्या एक बिर्ला हॉस्पिटलमध्ये सिस्टर इन्चार्ज होती तर एक आमचं स्वतःचं जनरल स्टोअर्स बेकरी आहे तिथे जायची..मी मात्र राबायला घरातच. मला कामाचा कंटाळा कधीच नव्हता. दोघी जावा आल्यानंतर माझे म्हणणे इतकेच होते की सगळ्यांना सासूने सामान वागणूक द्यावी..
ते बॅग्ज चं शिवण काम करताना मशीनचा आवाज व्हायचा तरी घरात दुपारी कोणी झोपलेले असताना टेलर आणि मी कपड्याचे कटिंग करून घेत असू. तरी नवरा नसला की सासूसासरे मला खूप बडबड करायचे मुलांसमोर गोड बोलायचे. आजारी असताना देखील काम तर मीच सगळं करत होते  खरंच मला त्यावेळी जीव देवू वाटत होता. मिस्टरांचा आधार नसता तर मी तेव्हाच मेले असते परंतु त्यांच्या आधारामुळे मी जिवंत आहे. मिस्टरांना म्हटलं, "मला चाळीत एक खोली घेवून द्या आणि तुम्ही तुमच्या आई-वडिलांजवळ रहा."मला काय मुलाला आईबापापासून वेगळे करायचे नव्हते.परंतु रोज तोच त्रास चालू होता आणि आपण अन्याय सहन करणे हा देखील एक गुन्हाच आहे. कोणी काही आमच्यामध्ये पडत नव्हते.  मी रात्री एक वाजेपर्यंत घराबाहेर बसत असे. मिस्टर officeमधून सेकंडवरून आले की मी घरात जात असे. वाईट हाल होते. एक कराडची मैत्रिण सोडली तर कोणालाही मी सांगत नसे. तेही घरात मला फोन करायची चोरी होती मैत्रिणीशी बोलायचं म्हणजे सासूने ऐकलं तर पुन्हा वाद वाढणार. मग बाहेर जावून एस टी डी वरून मैत्रिणीशी बोलत असे.ती खूप धीर देत असे. जातील हे दिवस जयु धीर नको सोडू..
जेव्हा आपले म्हणणे ऐकणारे कोणीच नसते तेव्हा कोणी ना कोणी देवाच्या रूपात येतो म्हणतात ना तसे झाले सासरचेच  family Doctor माझ्या मिस्टरांना म्हणाले अरे, “तू दुसरं घर घेवू शकत नाही का??तुझ्या बायकोला प्रेमाची आरामाची गरज आहे नाहीतर मरेल ती, लक्ष दे.”.तेव्हा मिस्टरांचे डोळे उघडले. खरंतर लगेच दुसरं घर घेण्याइतकी परिस्थिती तेव्हा नव्हती. आणि मला कुठे चाळीत घर घेऊन देऊन ते आईवडिलांजवळ राहतील हे त्यांना स्वतःलादेखील पटत नव्हते. त्यांचीच खरी परीक्षा चालू होती. मला चाळीत, साध्या  घरात, सगळीकडे आवडते आणि माझी सगळीकडे राहण्याची तयारी असते. मी कुठेही अड्जस्ट करणारी आहे म्हणून तर नवऱ्याने माझी साथ दिली असेल. दुसऱ्याचं लेकरू अरेंज मॅरेज करून आणलंय असं वाऱ्यावर सोडून चालणार नाहीमाझी नजर आणि निवड योग्य होती आणि आहे याचा आजही मला अभिमान आहे.  कसंबसं घर शोधू लागलो तर इतका छळ होवू लागला की विचारू नका त्यांचा एक मुलगा घर सोडून जाणार याची नुसती भिती वाटून पझेसिव्ह व्हायला लागले रडू लागले पण सुनेला चांगलं बोलायला मन मोठं नाही केलं..कसंबसं साधंच घर घेतलं. फक्त कपड्यांची बोचकी बांधून दुसरीकडे शिफ्ट झालो.चार वर्षात सगळ्यांपासून वेगळे राहिला गेलो परंतु दुसर्या दिवसांपासून माझे मिस्टर सासू सासरे यांना रोज भेटायला जाऊ लागले. मला मात्र एक महिन्यांनी सासर्यांनी स्वतः बोलवले की जयूची फार आठवण येते तिला घेऊन ये  तेव्हा मी गेलेआपल्यालादेखील  थोडेफार  स्वार्थी रहावे लागते  थोडे स्वाभिमानी पण असावेच.  दोन वर्षात मीच हळूहळू पुन्हा सगळं निट जुळवून आणलं कारण मला माणसात रहायची सवय होती. सासूला दूर गेल्यावर आमची किंमत कळाली. म्हणतात ना माणूस मेल्यावर कर्म दिसत तस्संच थोडंसं.  आपल्याला आपली किंमत स्वतः वाढवता आली पाहिजे.   मी पण माझ्या कोणत्याच कर्तव्यात कधी कमी पडले नाही. दोन नणंदा,दोन दीर,दोन जावा आज सगळे आपापले वेगळे राहून एकत्र आलो तर प्रेमानेच बोलतो, रहातो
परंतु त्यावेळी मी बाहेर राहून सासूसासऱ्यांना भेटायला गेले की जावांना माझा हेवा वाटू लागला मग मी सासरी जाणे कमी केले. फक्त काही कार्यक्रम असला तरच सासरी जायचं असं ठरवलं. मला सहा आत्या चार मामा,एक मावशी एक काका असं मोठ्ठं गोतावळं असल्याने असं कुटुंबापासून सासूसासर्यांपासून वेगळं रहायची अजिबात इच्छा नव्हती परंतु अन्याय किती दिवस सहन करणार मी??आईवडीलांकडे पण जायची सोय नाही ते चिंतेनेच खचतील. म्हणून कोणाला काही सांगितलं नाही. नविन घरात संसार उभा करायला वेळ लागला परंतु नवर्याचे अगदी गरज असताना ऑफिसमधे प्रमोशन होत गेले, पैशाची अडचण दूर होत गेली. तेव्हापासून देवावर आणि आपल्या चांगल्या कर्मावर विश्वास बसत गेलाचांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळते परंतु मिळते हे नक्की.
सासरे थोडे आजारी पडू लागले होते. रोज भेटायला गेलं की त्यांच्या आवडीचं मी काहीतरी बनवून नेणारच किंवा मिस्टरांकडे द्यायचे. माझ्या प्रत्येक पदार्थाचे मनापासून कौतुक करायचेमी फक्त प्रेमाची आणि चांगल्या शब्दाची भुकेली आहे हे सासरच्यांना नंतर कळाले सासूसासर्यांची फार इच्छा होती आपली स्वतःची कार असावी मी माझ्यासाठी कधी कोणती वस्तू मागतली नाही मला मागताच वस्तू मिळत होत्या परंतु सासूसासऱ्यांसाठी माझ्या मिस्टरांना ती कार घ्यायला लावली. ते हयातीत आहेत तोवर कारचा आनंद तरी घेतील. थोडं सेटल झाल्यावर कार आली घरात.आमच्या घरात अपार्टमेंटमध्ये माझी पहिली कार आली.तो आनंद जगावेगळा होता. माझी कार आल्यावर आमच्या घरातदेखील प्रत्येकाची कार आली अपार्टमेंटमध्ये पण सगळ्यांच्या कार आल्या. भारी वाटलं तेव्हासुखाचे दिवस येऊ लागले होते.
त्यानंतर आधी बिघडलेली तब्बेत आयुर्वेदिक औषधाने व्यायामाच्या सरावाने थोडी निट केली परंतु नोकरीचं वेड डोक्यातून जात नव्हतं. पण मग माझ्या मुलाला कोण पहाणार?? म्हणून घरबसल्या डेटा एंट्रीचं काम शिकून घेतलं केलं. महाविद्यालयात असताना मराठी, इंग्रजी टाईपिंग शिकले होते त्यामुळे माझा स्पिड खूप छान होता. मिस्टरांच्या एका मित्राचा कम्प्युटर त्याच्या घरात जागा नव्हती म्हणून माझ्याघरात ठेवला होता त्याचा मी योग्य वापर केला. दोनवर्षात भरपूर पैसा कमावला. मनाला समाधान मिळालं परंतु काही तरी करण्याच्या जिद्दीने दिवसातून पंधरा तास कम्प्युटरवर बसून मानेचं दुखणं माझ्या मागे लागले. फक्त अतिकाम करण्यामुळे हे सगळं घडत होतं. कसलाही व्यायाम केल्याने आपल्याला शरीरपिडा लागते मग पंधरा दिवसाला आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन स्टीम घ्यायची की बरं वाटायचं. Doctor ने सांगितलेले गरजेपुरते व्यायाम शिकून घेवून घरीच स्वतचं स्वत: तिळाचं तेल लावून कूकरला पाईप लावून स्टीम घेवू लागले. मानेला कमरेला पट्टा लावल्याशिवाय टू व्हीलर चालवता येत नव्हती तरीही पट्टे लावून बाहेरची सगळी कामे करण्याची जिद्द होती..घरातही तेव्हा कामवाली नव्हतीच..वर्षातून एकदा माहेरी गेलं तर जायचे तेवढाच चार-पाच दिवस काय तो आराम मिळत असे.
त्यात माझ्याकडे श्रावणातील सत्यनारायण पूजा, भाऊबीज सारखे दोन मोठ्ठे कार्यक्रम असायचे.किमान चाळीस माणसांचा स्वयंपाक एकटीने आवरून हसाखिदळायळा मी तयार असायचे हौसेला मोल नसते म्हणतात ते खरं आहे..




माझी शरीर पिडा पाहून असंच एकदा एका मैत्रिणीने एका ज्योतीषी मैत्रिणीचा नंबर देवून तिच्याकडे जाऊन बघ म्हंटलं..माझा काय त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. तरी एकदा जाऊन भेटले तर तीने काही मेडीटेशन सांगितले ते केले. काही उपासना सांगितल्या त्या केल्या रिझल्ट खूप चांगला आला. आयुष्य चांगले वळण घ्यायला लागले होते. 
कुठूनतरी मानेच्या दुखण्यावर माझ्या भावाने एक जालीम उपाय शोधला पण ती वस्तू खूप महाग असल्याने आम्ही जुगाड करून पैसे गोळा केले ते अमेगा ग्लोबल नावाच्या नावाच्या कंपनीचे पेंडंट,ब्रेसलेट, एक पेन असा सेटच घेतला.आणि त्या हिलिंगने मेडीटेशनने माझे मानेचे कमरेचे बेल्ट बाजूला जायला लागले.शिवाय Docter च्या सल्ल्याने पुन्हा बंद पडलेले चालणे सुरू केले काही व्यायाम सुरू केले..
पण पुन्हा आपण घरीच बसून आयतं खातोय या विचाराने मन स्वस्थ बसून देईना. मानेच्या दुखण्यावर मला उपाय सापडलेला इतरांना सांगून त्याचा आरोग्यासाठी कसा उपयोग आहे याचे मी सेशन घेवून प्रात्यक्षिक करून दाखवत असे लोकांना ते आवडू लागले आणि पटू लागले लोकं त्याची डिमांड करू लागले.. नंतर त्या मेटलच्या पेंडंडचादेखील बिझनेस होता तोदेखील केला (body हिलिंग) प्राणिक हीलिंग म्हणतात त्याला ते शिकून घेतलं स्वत: बरी झाले अशी दुखणी असणारे अनेक पेशंट बरे केले.बरे झालेले पेशंट जादूची कांडी फिरवणारे डॉक्टर जयु असे गंमतीने म्हणत असत. हा व्यवसाय दोन वर्षे चांगला चालला पुन्हा मिस्टर हळूच बोलू लागले बाहेर जाणं वाढलं तुझं घराकडे दुर्लक्ष होतंय. .बाहेर काय नुसतीच उंडगत नव्हते आणि एकटी पण नव्हते सोबत दोन बिझनेस पार्टनर मैत्रिणी होत्या. लोकं जास्त ओळखू लागल्याने हिलींगसाठी बोलायचे, पेशंट बरा व्हायचा पण तेव्हा एक धडा घेतला फुकट कोणासाठी काही केलेल्याला किंमत नसते. घराकडे काही दुर्लक्ष होत नव्हतं सगळं निट चाललं होतं परंतु मिस्टरांनी माझ्या पडत्या काळात मला इतकी सोबत केली त्यामुळे त्यांचे मी ऐकले, बंद केला तो व्यवसाय. चलो आगे बढते है.

मुलांचा अभ्यास मीच घेत असल्याने कसलीही अभ्यासाची तरी शिकवणी नव्हती. त्यामुळे त्यांना खेळायला भरपूर वेळ मिळे मग आपल्याला जे वेगळं खेळायला शिकायला मिळाले नाही ते मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला.स्केटींग,कराटे,क्रिकेट,डान्स,गाणं, basketball, त्यांचे drawing चांगले होते आणि त्यांना आवड होती म्हणून जवळपास असलेले drawing क्लास लावले त्यांनी अभ्यासात आणि सगळ्या खेळात प्राविण्य मिळवले.मला खूप समाधान मिळाले. कधी कधी हे मिळालेले समाधानदेखील आपल्या जगण्यासाठी आपली ताकद बनते..
मी जर नोकरी करत असते तर मला मुलांना इतकं सारं शिकवता आलं नसतं.मी हळूहळू असा सकारात्मक विचार करू लागले.आपल्या नशिबात नोकरी करणे लिहिलेले नाही असे दिसते.पण मग सगळ्यांचं सगळं करून सकाळ ते दुपार थोडा वेळ शिल्लक रहात होता‌. एक दिवस अचानक नणंद आली आणि एका दुप्पट पैसै कमवणाऱ्या कंपनीबद्दल सांगू लागली..घरातलेच एक-दोन मेंबर्स त्यात आहेत म्हटल्यावर मी मनाची तयारी केली.कारण आधी गुतवलेल्यांचे पैसे डबल होवून मिळाले होते.अगदीच फायदा नाही झाला तरी मुद्दल परत मिळेलच या आशेवर मी या बिझनेसला जोडले गेलेत्यात एक नणंनदच असल्याने माझ्या ओळखीने दोन महिन्यांत दहा-बारा लाख जमवून कंपनीला दिले पण वेळेत पैसे मिळाले नाही म्हणून नंतर त्याची भिती वाटू लागली पाच महिन्यांत मिळणारे पैसे एक दोन वर्षे गेले तरी मिळेना मग टेंशन येवून मला आर्थराईटीज झाला.तेच बाकी होतं.पैसा कमवणे दूर राहिले हे भलतंच सुरू झालं.आर..फ्याक्टर positive मला तर कशातलं काही कळत नव्हतं. यात सगळी हाडं दुखून त्यांना सूज येते.पाऊल जमिनीवर टेकता येत नव्हते की चपातीचं पिठ मळता येईना की toilet बसता येईना.मग इकडच्या बिर्ला hospital la arthritis MD doctor कडून चांगली ट्रिटमेंट सुरू केली. आपलं आपल्या मुलांचं करायला कोणी नाही.treatment सुरू केली आणि औषध घेवून चार दिवस आईकडे गावी गेले. तर एका गोळीची मला काहीतरी विचित्र allergyझाली डोळ्यांना ड्रायनेस, दिसेनासं झालं, ओठ जळाले, कानाच्या पाळ्या जळाल्या. गावाला दोन दिवस काढले सगळं बिर्हाड गुंडाळून पुणे गाठले.आधी Doctor ला जाऊन भेटले. Doctor जाम घाबरला.म्हणाले उशीर केला असता तुम्ही तर द्रुष्टी गेली असती.त्यांनी लगेच डोळ्यांच्या doctor कडे पाठवून डोळे चेक करून त्यावर एक वर्ष उपचार केले तेव्हा डोळे निट झाले पण चष्मा लागला ना कायमचा. नशिब बलवत्तर म्हणून मी दृष्टीहीन  नाही झाले ..या सगळ्यांचा कोणाला काही थांगपत्ता नव्हता.फक्त घरातच माझं मी सहन करत होते आणि मिस्टर दवाखान्याला पैसे देत होते दवाखान्यात जात होते मी माझी एकटीचमिस्टरांनीच  मला आपली कामं एकट्याने कशी करायची ते शिकवले. त्यांच्यावर मी अवलंबून राहावे असे कोणतेच काम बाकी ठेवले नाही. ते नेहमी म्हणतात मी नसताना कसे करणार तू ??  या सकारात्मक दृष्टीने मी बऱ्याच गॊष्टी शिकून घेतल्या.
कितीही दुखलं खुपलं तरी तेव्हा मुलांसाठी सतत सतर्क राहावं लागे. ज्या टेंशनने मला आर्थरायटीज सारखा आजार शरीराला लागला ते टेंशन तर अजून बाकी होते.मला लोकांचे इतके पैसे द्यायचे होतेकुठून आणणार आपण इतके पैसे?? लाखोपती नाही आहोत. मग थोडं लोन काढलं एक जमिनीचा तुकडा विकला लोकांचे कंपनीत इनव्हेस्ट केलेले पैसे बारा लाख मी परत दिले..लोकांना वाटले यांना दुप्पट पैसे मिळाले पण यांनी फक्त मुद्दलच आपल्याला दिली मग लोनचे पेपर लोकांना दाखवले.तेव्हा ते पैशाचं प्रकरण शांत झालं परंतु.मनात एक खंत कायम राहीली की मी कमवायला गेले आणि इतके नुकसान माझ्यामुळे झालेय. खूप ओझं राहिलं उरावर. मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणून माझ्या मिस्टरांसारखा देवमाणूस माझ्या वाट्याला आला असेल किंवा मी पण चांगली सोबत केली मोठ्या कुटुंबाला सांभाळून संसारात छोटे योगदान दिले म्हणून त्यांनी पण माझ्यासाठी हे केलं असेल.
आता मात्र काही बिझनेस नको पैसा नको आपलं स्वास्थ आरोग्य ठिक असलं तरी बास. आता इथून पुढे कोणताच व्यवसाय नाही करायचा की कसल्या भानगडीत नाही पडायचे असे ठरवले.
आयुष्यात इतके धडे घेतल्यावर मग मात्र  सामान्य गृहिणीचे आयुष्य जगू लागले. तरीही मी  धडपडणारा प्राणी एका जागी स्थिर कसा बसेल..मग कंप्युटरवर काहीतरी करमणुक म्हणून ते फेसबुक चालू कसं करायचं ते मिस्टरांनीच दाखवलं. मग व्यवसाय आणि नोकरीचा विचार बाजूला ठेवून थोडं करमणूक म्हणून फेसबुककडे वळले इथे शाळेतल्या, college च्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या काय आनंद झाला म्हणून सांगू. सुरूवातीला फेसबुक वर कुणीही add झालेले होते. माझा प्रोफाईल फोटो जास्त नसे.मग नुसत्या आवडलेल्या पोस्ट,शायरी शेअर करायचो. माधुरीचे फोटो टाकून कमेंटवरच खेळत बसायचो. तेव्हा भेटलेल्या,अनु,गितु,सुजी,सुची,अंजी,शैलू,उजू,लिना, हेमू  अशा छानमैत्रिणी आहेत..
निसर्गाची ओढ तेव्हाही होती. सामाजिक भान तेव्हाही होते.अनेक पोस्ट लिखाण वाचता वाचता ट्रेकच्या पोस्ट आवडू लागल्या.शेअर लाईक कमेंट करू लागले आणि सह्याद्रीची ओढ लागली.हे मला करायला मिळाले तर ???तर काय मजा येईल.असा विचार डोक्यात येवू लागला. एकदा एका ट्रेकर फ्रेंडला ट्रेकविषयी फेसबुक वरच विचारले कसं असतं हे ट्रेक वगैरे ??तर तो म्हणाला की ट्रेक म्हणजे तुमच्यासारख्या लेच्यापेच्यांचे काम नाही. तुम्ही त्याचा विचार पण नका करू. अरे बापरे, आपल्याला हा माणूस लेचापेचा म्हणतो. आता तर गड्या आपण हा ट्रेक करूनच दाखवणार.जरा सटकलीच होती. पण ट्रेक काय भाजीपाला आहे का?? की पैसे दिली आणि आणली. आपल्याला स्वतःला गड चढावा लागेल त्यासाठी आपले  मोडके शरीर आपल्याला आधी धड करावे लागणार आहे
मग पुण्यात कोणकोणते ग्रुप आहेत त्याचा मीच शोध सुरु केला पण घरात बोलायचे कसे??? इतक्या उचापती केल्यात कशात यश मिळाले तर कशात अपयश आले पण नंतर विचार केला की हा कुठे बिझिनेस आहे एकदा जाऊन बघू आणि नाही जमलं तर पुन्हा नाही जायचे हे मी एकटीच स्वतःशी बोलत असे..मैत्रिणींनादेखील सांगितले की असा विचार आहे. तेव्हा त्या नेहमी प्रोत्साहनच देत असत अनु म्हणाली जा हे पण एकदा करून बघ फिरून तरी येशील. मग रोज डोक्यात घोळणारा विचार घरात बोलून दाखवला. तर तर मिस्टर पहिले हसले आणि म्हणाले, अरे जयु, आता हे काय नवीन खुळ???
आधीच तुला इतकी औषधं सुरु आहेत.तुला धड चालताही येत नाही.गोळ्या औषधं खाऊन  जगतेयस  तेव्हा पंधरा दिवसाला मला steroidsचे इंजेक्शन घ्यावे लागे तेव्हा कुठे मला धड चालता येई. घरातल्या कामाचा लोड कसाबसा पेलता येतो हा ट्रेक कसा जमेल तुला???? मिस्टरांनी आधी भरपूर ट्रेक केलेत.आणि office मधले लोक पण ट्रेकला जातात आणि यांना पण विचारतात. मग हा माणूस आम्हाला का नेत नाही तर म्हणे तुला नाही जमनार ट्रेक वैगेरे म्हणून नको म्हणतो. अरे बापरे,आपल्या स्वाभिमानाला धक्का बसतो की असे म्हंटल्यावर.  मी घरात काहीच जमत नसताना इतकी कामे शिकले इतकी कामे करते मग हे पण जमेल की आपण एकदा तरी जाऊन बघू ना.???अशी रोज कानामागे फुणकी लावली होतीट्रेक ग्रुपचा महिन्याचा ट्रेक आल्यावर बघू असे म्हणत दोनतीन महिने निघून गेले.एकीकडे मेडीटेशन, उपासना,आयुर्वेदिक औषध, थोडं चालणे सुरूच ठेवले. मनात इच्छा आणि जिद्द असली आणि मेहनत केली की असाध्य गोष्ट देखील साध्य होते. माझा वाढदिवस जवळ आलाच होता मला गिफ्ट ऑफर केल्यावर चान्स आहे काही मागण्याचा.मला त्या भौतिक गोष्टींमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये पण तरी ते दिलेले पण मला आवडतेमी कोणत्याही गिफ्टला ना कधीच म्हणत नसते. मी वेळ आल्यावर स्वतःहून मागत असते.  ड्रेस ,साडी, घड्याळ हे असंच काहीतरी घेणार हे मला माहित आहे.त्यापेक्षा  मी बाहेर फिरायला जाणे किंवा मराठी नाटकाला जाणे असा काहीतरी हट्ट धरत असते मिळाले तर मिळाले नाही मिळाले तरी काही दुःख नाही.. आयुष्यात इतक्या वेदना सहन केल्यात तर आता ह्या छोट्या वेदना अंगवळणी पडल्या आहेत. मोठमोठ्या आघाताची सवय झालीये आता. परंतु छोटासा अपमान मात्र सहन होत नाही. एक दिवस मला विचारले तुला वाढदिवसाला काय गिफ्ट हवय??? मी तर कधीची बॅट घेऊन तयार होते आणि बॉल टाकायचीच वाट बघत होते आणि एका क्षणाचा विलंब करता मला दुसरेतिसरे काही नको मला फक्त एक ट्रेक हवाय असा सिक्सर मारला. आता तर त्यांना नाही बोलायला चान्सच नव्हता. मग नवीन शूज आणले बॅग वैगेरे घरात होती तीच घेतली आणि विद फॅमिली कोथळीगड ट्रेकला गेलो आणि ट्रेक पूर्ण करून आले. परंतु ट्रेक करताना वाट लागली होती. शूज नवीन असल्याने पायाला बोचले होते. माझ्याकडे एकही बॅग नसताना मी कशीबशी चढत होते बस. शूज पायाला बोचले मग सॅंडल घातली तिच्यात पण चालत येईना मग शेवटचे २कि..मीअनवाणीच चालत आले. तो पहिल्या ट्रेकचा आनंद मी आजही विसरले नाही. मिस्टर विचारतात करशील का परत ट्रेक ?????
आणि खोडकरपणे माझ्याकडे हसून बघायला लागले. म्हंटलं येस्स्स करणार पुन्हा असा ट्रेक,आवडलाय हा ट्रेक. आता त्यानुसार प्रॅक्टिस सुरु ठेवेन मग मला पाय दुखणे वैगेरेचा त्रास कमी होईल. घरी गेल्यावर दोन दिवस हालत खराब होती. डॉक्टर बोलले अरे हा ट्रेक वैगेरे तुम्ही नाही करायचंय तुम्हाला जडलेले आजार डेंजर आहेत. एखादे हाड तुटले तर दुरुस्त होणार नाही. डॉक्टरांनी खूप जास्त भीती दाखवली तरीही दुसरा ट्रेक खिरेश्वरमार्गे हरिश्चंद्रगड होता तो पूर्ण केला. त्यानंतर तर जी ट्रेकवारी सुरूच झाली ती आतापर्यंत तरी सुरूच आहे.  जोपर्यंत जमेल तोपर्यँत ट्रेक करायचा असा निश्चय केला. चमत्कार व्हायला लागले हळूहळू स्टिरॉइड घेणे बंद झाले औषधे घेणे बंद झाले. त्या स्टिरॉइडने माझी नख ठिसूळ झाली, हाडे ठिसूळ झाली असतील पण मी त्याचा विचार सोडून दिला. निसर्गासारखा आणि व्यायामासारखा सोबती या जगात नाही हे मला काही वर्षात उलगडले.फेसबुकवर टाईमपास म्हणून छोटया पोस्ट लिहीत होते. एका ट्रेकफ्रेंडने सहज सुचवलं  की तू ब्लॉग लिहू शकते. आता हा ब्लॉग काय असतो. तो कसा लिहायचा आपला ब्लॉगर आयडी कसा बनवायचा हे सगळं त्यांनी एकदा दाखवले मग माझे मी शिकत गेले, लिहीत गेले, त्यात सुधारणा करत गेले.म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. त्या फेसबुकवरच्या मित्राने मला उचकवले नसते तर मी हा ट्रेक कधीच केला नसताइतक्या सुंदर छंदाला मुकले असते. ट्रेक, फोटोग्राफी, लेख लिहिणे हे सगळे एकावेळी साध्य होते. निसर्गाशी घट्ट नाते त्याची ओढ,सतत त्याच्या सानिध्यात जाण्याची आस,गडकिल्ल्यांची सविस्तर माहिती मिळवणे, आपल्या मराठ्यांचा, मराठी महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्याची सवय ह्या सगळ्या गोष्टीने युष्य समृद्ध होते.  आपल्यात कायम सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. आयुष्य निरामय होऊन जाते. एकटे असलो तरी निसर्गात गेले की सगळ्याचा विसर पडतो. ही जादुई दुनिया माझ्यासाठी एक जीन-आका प्रमाणे आहे.ट्रेक सुरु केल्यानंतर मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लोकांची बोलणी, टोमणे, घरातले मॅनेज कसे करते?? वैगेरे वैगेरे. जयु मॅडम,सर येत नाही ट्रेकला तुम्ही एकट्याच येत ट्रेकला?? असं बोलणाऱ्यांना तुमच्या बापाचं काय खपतंय असं बोलून देखील तोंड बंद करावे लागले. आधी मला खूप मानसिक त्रास व्हायचा पण नंतर विचार केला च्यायला मला जेव्हा जीवघेणा त्रास होत होता तेव्हा माझा एक भाऊ सोडला तर कोणी माझी सोबत केली नाही. मग आता मी या मला नावे ठेवणाऱ्या लोकांचा का इतका विचार करू???
उलट मी माझी लाइफस्टाइल बदलली आणि लग्नाआधी जशी दादा होते पुन्हा तशीच झाले.कार शिकले, हार्मोनियम शिकतेय, चारकोल पेटिंग शिकतेय, योगा शिकतेय,फूडी ग्रुपमुळे नवीन पदार्थ बनवायला शिकतेय.अशा नवनवीन कला अवगत करण्याचा प्रयत्न करतेय. आणि माझा एकही प्रयत्न आता फसत नाही. ट्रेकिंगमध्ये देखील वेगळे काही करण्याचा प्रयत्न आहे. परंतु कोरोनामुळे सगळेच  थांबले आहे तरीही त्यातून कसे बाहेर पडायचे कसे जगायचे हा विचार मी करत असते त्याचे नमुने तुम्ही पाहत असतातच.मनात कायम एक खदखद होती की मी लग्नानंतर फार संपत्ती काही कमवली नाही Business मध्ये झालेल्या नुकसानामुळे माझे मन खूप नाराज होते परंतु आपण निर्मळ मनाने चांगले कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. आजकाल पैसा आला की कोणी कोणाचा नसतो परंतु मला माझ्या भावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा छोटा तुकडा मिळाला आणि माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. जे मी गमावलं असेल ते चांगल्या कर्माने आणि नशिबाने परत माझ्याजवळ कोणत्या ना कोणत्या रूपाने आले. आयुष्यात अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार देखील आला, घरातून निघून जाण्याचा विचार देखील आला परंतु मी कष्टाने उभे केलेले माझे हक्काचे घर का सोडून जाऊ??  माझी मुलं,माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. देवाने मानव जन्म दिलाय त्याचा पुरेपूर आस्वाद घेतल्याशिवाय ह्या पृथ्वीवरून निघायचे नाही. वाटल्यास राग आल्यावर इथेच एकमेकाला लाथाबुक्क्या मारू आणि आयुष्याचा गाडा नव्याने ओढू.हाहाहा 




हे सगळं लिहिण्यामगे एकच उद्देश आहेआपल्याला नशिबापुढे आणि वेळेआधी कधीच काही मिळत नाहीअनेक संकटे येतील, अनेक लोक तुमचे  पाय ओढत राहतील,तुम्हाला कमी लेखत राहतील,. तुमची निंदा करीत राहतील,. परंतु ठेवलेल्या नावाचा आपल्याला ब्रँड करता आला पाहिजे.प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने घेता आली पाहिजे.एखादी व्यक्ती आपल्याशी खराब वागत असेल तर ईश्वरच ते तसे घडवत असतो. आपल्याला सक्षम बनवण्यासाठी परमेश्वर पटावरील सोंगट्यांप्रमाणे आपल्याशी खेळत असतो. आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आपल्या आयुष्यात अनेक चांगलीवाइट माणसे येतात. वाईट माणसे जशी आपण दूर करतो तशी चांगली माणसे आपल्याला जपता आली पाहिजेत. कोणाला राग आला तर त्याच्याशी अबोला धरा परंतु वाईट बोलून त्याच्याशी नाते तोडू नका
या कोरोनाच्या महामारीत तर आपण माणूस किती क्षुद्र प्राणी आहोत हे आपल्याला एका सूक्ष्म व्हायरसने दाखवून दिले हे आपणास समजले नाही तर मग आपण काय शिकलो??? निसर्गापुढे  मानव प्राणी कवडीमोल  आहे निसर्गाने  मनात आणले  तर फक्त टिचकी वाजवायची खोटी आहे  आपली ही सृष्टी ही खेळातील पत्याच्या  बंगल्याप्रमाणे नाही ना कोसळली तर बघाच. आजपर्यंत दुनियेमध्ये खूप मोठे मोठे शास्रज्ञ होऊन गेले आणि आताही आहेत त्यांना हेच वाटत होते की आपण निसर्गाच्या पुढे जाऊन खूप research करू शकतो. आपले  अस्तिव हे लाख मोलाचे आहे परंतु  ते ह्या निसर्गापुढे नाही . जेव्हा जेव्हा आपण निसर्गावरती आघात करणार तेव्हा तेव्हा निसर्ग त्याच्या ताकदीने तो कोण आहे हे दाखवून देणारमाणूस किरकोळपणे मरेल तो फक्त आपल्या स्वतःच्या चुकांमुळे. अजून पण वेळ वाया गेली नाहीये.  वेळीच सावध व्हायाच्यापुढे  गाडीतुन हात बाहेर काढून कचरा रस्त्यावरती टाकताना १००० वेळा विचार करा. निसर्गाशी गद्दारी केलीत तर तुम्ही तर मरून जाल पण तुमचे घरातले जे मागे राहतील त्यांना याच्या अनंत वेदना सहन कराव्या लागतील हे पक्के  लक्षात  ठेवा.   ये तो सिर्फ ट्रेलर है  पिक्चर तो अभि बाकी है मेरे दोस्त"


मला त्रास देणाऱ्या, माझी निंदा करणाऱ्या, मला कमी लेखणाऱ्या, मला अडवणाऱ्या सर्व व्यक्तींचे मी मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे मी आयुष्यात इतकी पुढे जाऊ शकले. तसेच चांगल्या वाईट काळात मला प्रोत्साहन देणाऱ्या, माझ्या सोबत असणाऱ्या, माझे वेळोवेळी कौतुक करणाऱ्या, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या, वेळेला चांगला सल्ला देणाऱ्या, शाबासकी देणाऱ्या, मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना मनापासून शतशः धन्यवाद आणि मानाचा मुजरा......