Monday 17 July 2017

"अंधारबन धुवाधार ट्रेक"

"अंधारबन पावसाळी ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (ताम्हिणी घाट)
दिनांक -१६ जुलै २०१७


पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटामध्ये "अंधारबन" हे घनदाट जंगल आहे. हे पुण्यापासून सुमारे ६६ कि.मी. अंतरावर आणि तळेगावपासून जवळ जवळ ८० कि. मी. अंतरावर आहे. "अंधारबन ते भिरा डॅम" हा "फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन" (फोना)चा एका बाजूने सुमारे १३ कि. मी. चा  ७४वा ट्रेक आयोजित केला. यावेळी माझे  ट्रेकला जाणे पक्के नव्हते परंतु माझ्या कुटुंबाने ट्रेकला येणाची मनापासून तयारी दाखवल्याने मलाही ट्रेकला येणे जास्त गरजेचे आणि आनंदाचे वाटले.  
रविवार दिनांक १६ जुलै २०१७ या दिवशी आमच्या दोन बसेस सकाळी ६ वाजता तळेगाव-निगडी-वाकड-चांदणीचौक-पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. पावसाची संततधार आधीपासूनच सुरु होती. यावेळी "फोना' टीम च्या ५०-५० सीट्स च्या २ बसेस होत्या. १ बस पुढे गेली परंतु आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या बसचा ड्रायवर नेमका गाडीचे परमिट घरी विसरला. तिथे १ तास थांबावे लागले. असे एखाद्या वेळेस फार क्वचित घडते. परंतु त्या वेळात आम्ही बसमध्येच सोबत आणलेला पोह्याचा नास्ता केला आणि तिथे निसर्गात थोडी फोटोग्राफी केली.परमिट आल्यावर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला.
जाताना रस्त्यालागत भातखाचरे पाण्याने आणि भाताच्या रोपाने भरलेली दिसली आणि शेतकरीण कुटुंबासोबत  भाताची रोपे घेऊन भातलावणीच्या लगबगीत दिसली.  ताम्हिणी घाटामधील ट्रेक ला जाताना इथल्या रस्त्यालगत असलेल्या छोट्या साध्या शिवसागर हॉटेल आहे तिथे आम्ही चहा घेतला. त्या परमिट च्या गडबडीमुळे बस थोड्या मागेपुढे झाल्या होत्या आणि नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा करायचा राहून गेला होता. यावेळी माझे मिस्टर श्री. दीपक सानेंच्या हस्ते नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा केला आणि प्रतीक पेंढारे याने राजे श्री.छत्रपतीं शिवरायांची आणि संभाजी राजेंची स्फुर्तीपूर्ण गर्जना करून पुढील प्रवास सुरु झाला.
प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावतंस,राजणिती धुरंधर,शास्त्रास्तशास्त्र पारंगत,महाराज,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर संभाजी महाराज की जय...राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय...हर हर महादेव...जय भवानी, जय शिवाजी..
१०० ट्रेकर्स मधील ८० टक्के ट्रेकर्स आम्हाला नवीन होते त्यामुळे आत्तापर्यंत बसमध्ये सगळेच शांत होतो.कदाचित पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या काहींच्या मनात १३ कि.मी. चा इतका मोठा ट्रेक पूर्ण करू शकू की नाही अशी भीतीही असेल.चहा घेताना लीडर च्या परवानगीने आम्ही काही मेंबर्स अंताक्षरीसाठी दुसऱ्या बस मध्ये गेलो आणि तास भर अंधारबन येईपर्यंत गाण्याने सगळ्यांचे मनोरंजन करून(अंताक्षरीचा कल्ला) करून अंधारबन च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो."आपल्याला आनंद हवा असेल तर आपणच आंनदाजवळ गेले पाहिजे,आनंद आपोआप पाय चालत आपल्या पायाशी येणार नाही मी या तत्वाची आहे. इतरांचे माहित नाही परंतु मी हा आनंद मिळवण्यासाठी ट्रेक करीत असते. शारीरिक आरोग्य आणि मनाचे आरोग्य चांगले हवे असेल तर त्यासाठी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक हवाच हवा.
मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि.मी.आहे भांबर्डे गावातून घनगडला जाता येते.इथून आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तसेच तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी.वर आहे. सकाळी ११:३० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली. मोबाइल पाण्यामुळे खराब होऊ नये आणि इतक्या सुंदर अंधारबन मध्ये फोटोग्राफी सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी मी खास amazon.in वरून एक मोबाइल कव्हर आणले होते ते मी यावेळी वापरले कारण एका पावसाच्या ट्रेकमध्ये माझा मोबाईल आणि डिजिटल कॅमेरा दोन्ही खराब झाले होते त्यामुळे मी पावसात माझ्या मोबाईलची जरा जास्तच काळजी घेते आणि तुम्ही देखील स्वतःच्या फोन आणि कॅमेऱ्याची काळजी घ्यावी असे मला वाटते.  ताम्हिणी घाट न्याहळत होते,बसमधून सुद्धा फोटोग्राफी सुरूच होती परंतु तिथे उतरल्यावर त्याहून अतिशय सुंदर निसर्गाचा अद्भुत मनमोहक नजारा पहावयास मिळाला. अश्यावेळी ओठांवर अनेक काव्यपंक्ती आणि गाणी सहज येतात,
"हिरवे-हिरवेगार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
"हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो  ताम्हिणीचो  घाट.... हिरव्या हिरव्या.."

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळली. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटली.
निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरी नका करू.”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.
सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात असभ्य वर्तन करताना दिसतात. निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील आठवड्यात कर्जत जवळील पेब किल्ला(विकत गड)आणि ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली आहे. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त आहे आणि या अपघाताची घटना अजून ताजी असल्याने कोणाही पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना भिराधरणाकडे जाऊ दिले नाही. हे तिथे जवळ गेल्यानंतर समजल्यामुळे अंधारबन ते भिराडॅम च्या ऐवजी "अंधारबन ते हिरडी गाव" जाऊन परत येणे असा हा सुमारे १०ते११ कि.मी. असा ट्रेक करण्याचे ठरले.

अंधारबन ट्रेक च्या सुरुवातीलाच तेथील पिंपरी हे छोटे गाव आहे त्या गावचा हा पाझर तलाव दुथडी भरून वाहत होता आणि मुसळधार पावसामुळे चिखलमय झाला होता.  ट्रेक प्रमुखांनी यात उतरू नये अशी सूचना आधीच दिली असल्यामुळे आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली.दर वर्षी पावसाळी ट्रेकला जरा जास्त गर्दी असते त्याप्रमाणेच यावेळीदेखील गर्दी होतीच. "फोना"ग्रुपचे जरी १०० ट्रेकर्स होते तरी २५-२५ चे ४ ग्रुप करून एका ग्रुप सोबत किमान ३ लीडर होते. संपूर्ण ट्रेक विषयी आणि घावयाच्या दक्षतेविषयी सूचना दिल्या गेल्या. रघुनंदन पाटील याने त्याच्या ग्रुपकडून खूप सारे सीड बॉल्स बनवून आणले होते त्याचे वाटप करून ते ट्रेक दरम्यान जमिनीत कसे लावता येतील याची माहिती त्याने दिली.  जगामध्ये जैवविविधता असलेले एकूण ७ जैवविविधता हॉट-स्पॉट आहेत त्यातील आपल्या भारतामध्ये  २ आहेत.  त्या २ मधील ताम्हिणी घाट हा एक आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण जैविविधता असलेल्या आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्य असलेल्या ताम्हिणी घाटाच्या इतक्या जवळ आहोत आणि बरेचदा इथे आपण ट्रेक करत असतो, इथल्या निसर्गाचा आनंद लुटत असतो. जर आपण निसर्गाकडून इतकं काही घेत असतो तर मग याच निसर्गाचे आपण देणे सुद्धा लागतो. "एक हाथ से ले और एक हाथ से दे" ही म्हण  सार्थ ठरवण्यासाठी असे सीड बॉल्स लावणे किंवा किमान बिया लावणे,अशी निसर्गसंवर्धनाची कार्ये आपण करू शकतो.  या अगोदर ताम्हिणी घाटाचा हा स्पॉट फक्त ट्रेकर्स च्या गर्दीचा असायचा परंतु आता इथे सहलीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा लोकांची तुडुंब गर्दी असते. कारण पुण्यातील लोणावळ्यातील भुशी धरण आणि तिथले सगळेच पॉईँट तुफान गर्दीने आणि दुर्दैवाने कचऱ्याच्या साम्राज्याने व्यापले आहेत.आम्ही ट्रेकर्स कोणत्याही गडावर कचरा करीत नाही.थर्माकोलच्या प्लेट चा वापर करीत नाही आणि जंगलात किंवा गडावर त्याचा कचरा टाकून येत नाही.  सहलीला गेलेल्या पर्यटकांनी आणि सर्वच ट्रेकिंग ग्रुपनेसुद्धा हा नियम पाळला तर आपला निसर्ग आपणच आपल्यासाठी स्वच्छ ठेवू शकू.
ट्रेक ला सुरुवात झाली आणि छोटे छोटे धबधबे घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे तसे आमचे पाय धुवून स्वागत करू लागले.धबधब्यांच्या रूपाने ते प्रेम ओसंडून वाहत होते. आमच्यासोबाबत अजून काही ट्रेकिंग ग्रुपदेखील होते. डाव्या हाताला खोल दरी होती तिला "कुंडलिका व्हॅली" म्हणतात. पावसाचे ढग असले तर ती व्हॅली बिलकुल दिसत नाही. परंतु ढग दाटून आला आणि पाऊस पडल्यावर एक-दोनदा कुंडलिका व्हॅलीने दर्शन दिले. त्या व्हॅलीतून दिसणाऱ्या  भिरा धरणाने आमच्याकडे वाकून पहिले तेव्हाचे दृश्य अप्रतिम होते. एका बाजूला व्हॅली एका बाजूला धुक्याने भरलेले उंच डोंगर आणि  विरघळल्यावर मुसळधार पावसाने धुथडी भरून वाहणारे धबधबे.अश्यावेळी डोळे तृप्त झाले होते प्रश्न पडतो की ट्रेक करू की फोटोग्राफी करू की ते दाटलेले ढग विरघळेपर्यंत पाहत राहू. छोटे छोटे धबधबे ओलांडल्यावर एक मोठा ओढा-धबधबा पार करण्यासाठी ग्रुप लीडर्सने साखळी करून एकेकाला सुरक्षितरित्या दुसऱ्या बाजूला पाठवले. त्यानंतर पुढचे २ धबधबे असेच हाताची साखळी करून आणि काही ठिकाणी दोर बांधून ट्रेकर्सना पुढे पाठवून त्यांच्या मागून लीडर्स येत असत.  ढगांचा धुके-पावसाचा खेळ सतत सुरु होता.  अंधारबनचे घनदाट जंगल आम्ही चालत होतो. दिवसा चालत असून रात्रीचे जंगल पार करीत आहोत की काय असा भास होत होता इतका अंधार होता. एक तास जंगल पार करून गेल्यावर एक मोठा धबधबा पार करताना पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने जरा अवघड वाटत होते  परंतु रोप लावून हाताची साखळी केल्याने कठीण गोष्ट थोडी सोप्पी जात होती.   ट्रेकलीडर्स आणि सगळेच मेंबर्स तुम्ही उत्तम कामगिरी केलीत. अंधारबनची वाट चालताना मधेच धबधबे, मधेच चिखलमय वाट, मधेच जोरदार पाऊस मधेच लक्ख उजेड आणि उंच हिरव्या डोंगरांवरून फेसाळणारे दिसणारे पांढरे स्वच्छ धबधबे. अवर्णनीय असे ते रम्य देखावे डोळ्यात आणि मनात कॅमेऱ्यात साठवून घेतले.

उन्हाळी ट्रेक असल्यावर पाणी खूप जास्त प्यावे लागते आणि सोबत न्यावे लागते. पावसाच्या ट्रेकचा हा एक फायदा आहे की पाणी कमी असले तरी चालते. हिरडी गावाच्या जवळपास गेल्यावर दुपारी २:३० च्या सुमारास अंधारबन मधेच थांबून आम्ही जेवण केले. "फोना" बॅनर फोटो घेतला आणि अंधारबन मध्ये थांबलो असल्याने १०० ट्रेकर्स च्या समूहाने एका ट्रेकला प्रदीप अडागळे यांनी गायलेला शाहीर राजू राऊत यांचा  एक पोवाडा सादर केला, "अंधार फार झाला,एक दिवा पाहिजे.. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे."  त्यावेळी त्या अंधारबनात त्या पोवाड्याचा सूर खूप छान लागला होता.



पावसाचा जोर वाढल्याने तिथून परतीची वाट धरली कारण अंधार व्हायच्या आत १०० ट्रेकर्स ना इतके सारे धबधबे सुरक्षितरित्या पार करून सुरक्षितरित्या घेऊन जाणे काही खाऊ नाहीये.  परत येताना पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जंगलाची वाट पाण्याने भरून वाहत होती आणि जास्त चिखलमय झाली होती. ट्रेकर्स देखील एक माणूसच आहे तो  देखील थकतो. पाण्यात चालल्याने माझे तर पाय दुखतातच. पण तरीही ट्रेक पूर्ण झाल्याशिवाय थांबणे नाही. जाताना वाटेत लागली धबधबे आता प्रचंड वेगाने वाहू लागले होते. चॉकलेटच्या नद्या वाहताना दिसत होत्या. अचानक वाहत्या पाण्याचा रंग बदलला की समजावे पाण्याचा वेग वाढला आहे. एका ओढ्याजवळ पाणी इतके वाढले होते की जाताना सहज पार केलेला तोच ओढा पार करणे सहज शक्य नव्हते. थोडा वेळ रांगेत थांबून पाण्याचा वेग थोडा कमी झाल्यावर पुन्हा रोप लावून हाताची मजबूत साखळी करून हळूहळू एकेक, दोनदोन मेम्बर्सना ओढ्यातून बाहेर काढणे शक्य झाले. असे ३ मोठे ओढे पार केल्यावर जरा हायसे वाटले. आता ५ वाजून गेले होते अंधारबन अंधार पडायच्या आत पार करणे गरजेचे होते. त्यात पुन्हा पाऊस सुरुच होता आणि इतका उशीर होत असताना आम्ही अंधारबनातून बाहेर येऊ पाहत होतो आणि इतर लोक फक्त धबधब्याखाली भिजणारे लोक दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, चखणा घेऊन जाताना दिसली, पिताना दिसली ट्रेक च्या वाटेत पाण्यात शुद्ध हरपून लोळताना दिसली. अशीच मग तोल जाऊन पाण्यात पडतात आणि दुसऱ्या दिवशी बुडून मेला म्हणून बातमीपत्रात झळकतात. अश्या लोकांना तिथेच तुडवावे वाटत होते आणि पोलिसांकडे द्यावे वाटत होते. अशा लोकांमुळेच ट्रेकर्स बदनाम झाले आहेत.
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची" हे ज्याला समजले तो जिंकला. 

अंधारबन ट्रेक दरम्यान रघुनंदन याने आणलेले जवळवळ १५० सीड-बॉल्स सगळ्यांनी मिळून अख्या अंधारबनात ट्रेकच्या वाटेजवळ थांबून छोटे छोटे खडे करून लावले. आणि येताना अंधारबन मधला प्लास्टिक कचरा,प्लास्टिक बाटल्या आम्ही उचलून आणल्या. मागच्या वर्षी अंधारबन ते भिरा डॅम हा एका बाजूने १३.की. मी. चा ट्रेक पूर्ण करता आला होता तो आनंद काही वेगळाच आणि आत्ताच्या ट्रेकचा अनुभव त्याहून वेगळा आणि आनंद देखील वेगळाच होता. मुसळधार पावसामुळे यावेळी सुमारे १०-११ की. मी. चा ट्रेक करता आला. हाताची पाची बोटे सारखी नसतात, नाटकातील सगळीच पात्रे सारखी नसतात त्याचप्रमाणे आलेले  ट्रेकर्स हे सगळे काही एकसारखे वागतील याची गॅरेंटी देता येत नाही. एखादा न ऐकणारा असतो, एखादा जास्त मस्ती करणारा असतो, काही एकदम शिस्तीत चालणारे असतात. अश्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या १०० लोकांचा ट्रेकिंगचा ग्रुप घेऊन जाणे, उत्तम ट्रेक घडवणे आणि कोणताही अपघात न होता त्या सर्व ट्रेकर्सना सुरक्षितरित्या बसजवळ परत आणणे हे खूप जिगरीचे कार्य आहे आणि ते लीडर्सच्या युक्ती-क्लुप्ती आणि कौशल्याचे, संयमाचे काम आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे आलेल्या सर्व ट्रेकर्सच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. 
इतका अप्रतिम,मनोरंजक आणि आठवणीत राहणारा असा ट्रेक घडवून आणल्याबद्दल सर्व प्रथम माझे मिस्टर श्री. दीपक साने यांचे आणि माझ्या दोन्ही मुलांचे (चेतन,प्रभा)मनापासून आभार कारण या ट्रेकसाठी माझी सिस्टीम ठीक नसल्याने मला हे तिघे मला घेऊन आले होते. त्यांनतर ट्रेक प्रमुख श्री. मंदार सर श्री. राणे सर, श्री. निकाळजे सर, रोहित सर आणि विशेष आभार श्री माजगावकर काका, गोलांडे सर, सोनार सर, मंगेश, विनोद मुळे आणि खास आभार सीड बॉल्स आणणारा रघुनंदन पाटील (तू माझा बाप निघालास सोलापूरची सोलापुरी आणि तुमची कोल्हापुरी भाषा मला नेहमीच आवडते) गंमतीचा भाग सोडला तर सारखे रघु पाटील रघु पाटील असे ऐकायला मिळाल्याने मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली कारण माझ्या वडिलांचे नाव श्री.रघुनाथ पाटील असे आहे) त्यांनतर आलेले सर्व नवीन ट्रेक मेंबर तुमच्या सहकार्यामुळे ट्रेक यशस्वी होणे अशक्य होते. वेळेअभावी आणि जोरदार पावसामुळे यावेळी ट्रेक मेंबर्सची ओळख करून घेणे शक्य झाले नाही त्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ट्रेकला यावे. तसेच माझे ट्रेकफ्रेंड्स,हिरल राणे,ऋतुजा,सुरेखा,अबोली,कविता,पूर्णिमा,तनया,प्रतीक पेंढारे,विवेकानंद,आनंद,प्रशांत भावसार, उमाकांत पोतदार, मंदार चिंचलीकर, नितीन वाकुलकर,संदीप गोरे, गायक शेवकर सर,मिताली, प्रज्ञा, ज्वाला, स्नेहा, स्नेहल,डॉ गिरीश, डॉ.आकाश, यशल आणि जय तसेच सगळे जुने नवे ट्रेक फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.. संध्याकाळी ५:३० वाजता ट्रेक संपवून ६:३० अंधारबनमधील  त्या फेसाळलेल्या धबधब्यांचा, त्या हिरव्या गालिच्यांचा, धुक्याच्या शालीचा जड अंतःकरणाने निरोप  घेऊन आम्ही पुन्हा त्याच रस्त्याने पुण्याची वाट धरली.  रविवार असल्याने वर्षासहलीला जाणारे पर्यटक, तसेच ट्रेकर्स अश्या सगळ्यांच्या गाड्यांच्या  ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅफिकमुळे रांगाच रांगा लागल्या होत्या तरीही एका बाजूला मावळत्या दिवसाचा हलकासा संधिप्रकाश आणि एकीकडे मुळशी धरणाचे दुरून शांत दिसणारे पाणी  एकीकडे वाहनांचा प्रकाश असे सुंदर दृश्य होते.  आमच्या बसच्या मागेपुढे प्रकाशाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत असे भासत होते. मुसळधार पावसात येताना चांदणी चौकातून ट्रेकमेम्बर्सना सोडत सोडत आम्ही घरी रात्री ११:३० वाजता पोहोचलो. असा हा पावसाळी अंधारबन चा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्तमोत्तमरित्या पूर्ण झाला. खरे तर नेहमीप्रमाणे मला अजून ब्लॉगला अनुसरून काही स्नॅप्स या ब्लॉगमध्ये टाकायचे होते परंतु ब्लॉग मोठा झाल्याने जागा उरली नाहीये त्यामुळे बाकीचे स्नॅप्स आपल्या सगळ्यांकडे आहेतच शिवाय फेसबुकवर सापडतील. तसेच ब्लॉग लगेच पूर्ण झाल्यामुळे आश्चर्यचकित होऊ नये. माझे असे मत आहे की कोणतीही गोष्ट करावी तर पॅशनने करावी नाही तर केव्हाही करूच नये. मग तो ट्रेक असो अथवा ब्लॉग असो. हे पॅशन सगळ्यांकडे आहे आणि असावे. मित्र हो.. धन्यवाद.!