"कातळधारा
ट्रेक"
ठिकाण-पुणे
जिल्हा (लोणावळा)
चढाई
श्रेणी-मध्यम कठीण
दिनांक
- २० ऑगस्ट २०१७
जुलै
महिन्यातील अंधारबनच्या अतिशय सुंदर,अप्रतिम, थरारक पावसाळी ट्रेकनंतर मी ट्रेकर् दुसऱ्या थरारक ट्रेकची वाट पाहत
होते ."फोना" फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन ने ७६ वा कातळधारा हा ट्रेक
आयोजित केला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण कातळधारा ट्रेक हा तसा रिस्की
आणि कठीण ट्रेक आहे. परंतु "रिस्क इज माय पॅशन" या नियमानुसार मी मनातून
जायचे ठरवले होते खरे परंतु शरीरात जरा तांत्रिक बिघाड झाल्याने डॉक्टरांनी यावेळी
ट्रेकला न जाण्याचा चांगला सल्ला दिला होता. तरीही पंधरा दिवस दवाखान्याच्या
वाऱ्या पूर्ण करून मनाची तयारी करून ट्रेकच्या वारीसाठी सज्ज झाले. मी या गोष्टीचा
उल्लेख अशासाठी करते की आपल्या मनाने आपण एखादी चांगली गोष्ट करण्याचा पक्का
निर्धार आणि निश्चय केला सर्व काही साध्य होते. इच्छाशक्ती प्रबळ असली की आपला
मार्ग सोप्पा होतो.
माझ्या
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात "कातळधारा" हे ठिकाण आहे.पुण्यापासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर
आणि चिंचवड पासून ५२ कि.मी.लोणावळा-खंडाळा हे थंड हवेचे नावाजलेले ठिकाण आणि चिक्कीसाठी प्रसिद्ध असे उत्तम सगळ्यांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.लोणावळ्यापासून
एक ते दीड कि.मी. च्या अंतरावर कातळधारा आहे. ठरल्याप्रमाणे आमची बस दिनांक २० ऑगस्ट ला
सकाळी ७ वाजता निगडी-तळेगाव-लोणावळा मार्गे निघाली. बसमध्येच
पोह्याचा नास्ता करत आणि एका ठिकाणी थांबून चहाचा आस्वाद घेत श्री. सचिन दीक्षित यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने छोटा केक कापून त्यांच्याच हस्ते नारळ फोडून पुढच्या
प्रवासाला सुरुवात केली. "हिरव्या
हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट.. " अशी
अनेक उल्हासित करणारी गाणी गात(तालासुरात गाणे गाणाऱ्या आणि जल्लोषात शिवगर्जना करणाऱ्या मस्तीखोर प्रतिकदादाची आठवण काढत) कातळधारा धबधब्याकडे जाणाऱ्या घनदाट जंगलाच्या
वाटेजवळ थांबली.
इथून
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जाणारा राजमाची हा किल्ला सुमारे १४ कि.
मी. वर आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. खंडाळा घाटातून समोर नजर टाकल्यावर
एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला होय.परंतु आम्हाला आज
राजमाचीला न जाता कातळधाराचा ट्रेक करावयाचा असल्याने आम्ही इथेच थांबलो. आधीपासूनच
ट्रेक लीडर्स ट्रेकसाठीच्या दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या होत्याच. म्हणजे एक छोटी
कमी वजनाची सॅक त्यात किमान एक लिटर पाण्याची बाटली,चॉकलेट्स गोळ्या(टाईमपास)दुपारच्या जेवणाचा
भुकेपुरता टिफिन, प्रॉपर ट्रेकिंगचे शूज,कॅप,जॅकेट, जरुरीप्रमाणे लागणारी स्वतःसाठीची औषधे,पूर्ण हात आणि पाय झाकले जाणारे कपडे घालून तयारीत आलोच होतो. तिथे
गेल्यावर घनदाट जंगलात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ओडोमास लावून घेतले.
आम्ही ट्रेकला सुरु करण्यापूर्वी इतर कोणा ग्रुपचे ५ मेंबर्स त्यांचा ग्रुप
त्यांना उशीर झाल्याने पुढे गेला असल्याने आम्हाला सामील होऊ पाहत होते. त्यांच्या
विनंतीवरून आमच्या लीडर्सनी त्यांना "दिलेल्या सर्व सूचना ऐकणार"या अटीवरच आमच्यात
सामील करून घेतले “अर्थात जो ट्रेकर सूचनांचे पालन करेल साथ
देईल त्यालाच फोना ग्रुप मदतीचा हात पुढे करेल.” ही ग्रुपची
खासियत आहे.
घनदाट
जंगलात जाण्यापूर्वी पुन्हा सूचना दिल्या गेल्या आणि शिवगर्जना करत सकाळी ९:३० ला
ट्रेकची सुरुवात झाली. दुसऱ्या वाहनाने आलेले ५ मेंबर्स आम्ही आमच्यात सामील करून
घेतले आणि एकूण ५३ ट्रेकर्सने ट्रेकिंग सुरु केले. पाऊस सतत सुरु असल्याने ओढे,धबधबे भरून वाहत होते. सर्वत्र हिरहिरवे गालिचे होतेच परंतु एखादा ढग
वितळला की सुरुवातीला डाव्या बाजूची दरी एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव आणि अतिशय
सुंदर दिसत होती. सुरुवातीलाच छोटासाच परंतु घसरून पाडणारा ओढा ओलांडताना थोडी रांग लावूनच पार केला. त्यांनतर पुन्हा एक छोटा ओढा आला आणि आता पायातले बूट पूर्ण भिजवून पार
करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण भारतीय आहोत आणि श्रद्धाळू आहोत. कोणतेही कार्य
पार पाडताना शुभ सुरुवात व्हावी म्हणून देवाचा आशीर्वाद घेतो. तसेच घनदाट जंगलाची सुरुवात
करताना एका दगडावर शेंदूर लावला होता शेंदूर लावलेला दगड म्हणजे श्रद्धाळू लोक त्याला देव म्हणतात.आज आपण त्याला दिशादर्शक समजू. देव दगडात नाही तर आपल्या मनात असतो त्यामुळे
त्याला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.
कातळधारा ट्रेक ला जाताना असे काही मोजमाप केले नाहीकी नेमके किती फूट खोलदरीत उतरलो आहोत. फक्त हे जंगल खूप रिस्की
आहे हे मात्र खरे. माहित नसलेल्या लोकांनी कातळधाराचा नाद करूच नये कारण एक वाट
चुकली की माणूस भरकटत जातो आणि घाबरतोच.या जंगलातुन सहीसलामत परत यायचे असेल तर
अनुभवी ट्रेकर्स सोबतच अशा कठीण ट्रेकला जाण्याची हिंमत करावी. "उगाच मस्ती नहीं पडती सस्ती"
कातळधारा
ट्रेक कठीण असल्याने कमी लोक इकडे जातात त्यामुळे जंगलात नेमक्या कोणत्या वाटेने
कातळधारकडे निघावे हा संभ्रम नव्यांना तसे जुन्यांना देखील पडतो. परंतु अचूक वाट
दाखवणारा तोच खरा लीडर असतो. लीडर्स च्या मागोमाग आम्ही निघालो होतो. मधेच कुठेतरी
एखाद्या झाडाच्या फांदीला भगव्या रंगाच्या छोट्या पट्ट्या लावल्या होत्या की
जेणेकरून वाट सापडावी. आमचे एक लीडर राणे सर पुढे होते मागोमाग आम्ही सगळेच होतो.
काही लीडर्स मध्ये तर काही लीडर्स सर्वात शेवटी होते. ग्रुप मध्ये सगळ्यांचा
चालण्याचा वेग एकसारखा नसतो त्यामुळे अधून मधून थोडेसे अंतर राहतेच राहते.
त्यासाठी मागच्या मेंबर्सना वाट अचूक सापडण्याची आमचे लीडर खूण म्हणून एकावर एक तीन दगड ठेवून पुढे जात होते. तसेच झाडा
झुडपांना पटकन न बघता आधार म्हणून हात लावू नका. चापड्या हा हिरव्या रंगाचा विषारी
साप असला तरी कळणार नाही आणि चावला तर पळता भुई थोडी होईल. अश्या सूचना वारंवार देत होते. काळजी घेत आम्ही जंगल
उतरत होतो. किती अंतर चालतो किती खोल उतरतोय काय थरार असतो हे प्रत्त्यक्ष
अनुभवानेच समजते.
सगळ्या वाटा एकसारख्याच दिसत होत्या. मधेच एका बाजूला राजमाचीची
शिखरे डोकावत होती. जणू लटक्या रागाने खुणावत होती, निमंत्रण देत होती की,"अस्सं काय ??कातळधारालाच जात काय?? आमच्याकडे तुमची पावले केव्हा वळतील." अप्रतिम असा नजारा होता तो. मधेच खळखळ असा
आवाज येऊ लागला एक मोठ्ठा ओढा होता तो. आम्ही कितिदा वाट चुकता-चुकता रहायचो. त्या खळ्खळ्णाऱ्या ओढ्याजवळ पोहोचलो तिथे मनसोक्त भिजून घेतले आणि मनसोक्त छायाचित्रण
केले आणि पुढच्या वाटेला निघालो. एक तास होऊन गेला होता आम्ही जवळ जवळ अर्धे अंतर
पार केले होते.एक मोट्ठे झाड नैसर्गिकरित्या आडवे पडले होते ते जणू एखाद्या
वाटाड्या प्रमाणे सांगायलाच थांबले होते की "बाबांनो जरा संभाळून जा रे पुढे धोका
आहे." आता पुढे अजून घनदाट जंगल आणि रिस्की पॅच होता. तिथे ५ मिनिटे थांबून लीडर्सने पुन्हा महत्वाच्या सूचना केल्या आणि निघालो.
घनदाट जंगल आणि अंधार ओढा गेल्यावर पुन्हा किर्र... शांतता असायची परंतु बडबडे ट्रेकर्स आणि लिडर्स सोबत असताना भीती कुठच्या कुठे पळून जायची. मुसळधार पाऊस असल्याने दगडावर
खूप शेवाळ साठून सगळेच दगड घसरडे झाले होते. मी या मताची आहे की कायम आपल्या पुढे
दांडगा आत्मविश्वास असलेला ट्रेकर हवा.त्याचा वेग जास्त आपला वेग जास्त, त्याचा
आत्मविश्वास दांडगा तर आपला आत्मविश्वास दांडगा, तोच जिथे त्याची काळजी घेतो आणि
मागच्याला म्हणजे आपल्याला काळजी घ्या म्हणतो तिथे आपण आपली काळजी घेतो आणि मागच्याला
काळजी घे म्हणतो म्हणजे आपोआप ही चांगुलपणाची आणि टीम वर्कची साखळी तयार होते. आणि टीमवर्क यालाच
म्हणतात. जे कार्य आपण एकटे करू शकत नाही ते फक्त ग्रुपनेच साध्य होते.
एक तास
अंतर चालून गेल्यावर आता उतरलेले जंगल चढायचे होते. भूक लागल्यावर कसे आपण पहिले
मला-पहिले मला हावरेपणा करतो तसे झाले. कारण कातळधारा ची ती उंचावरून कोसळणारी धबधब्याची धार भयानक मोट्ठी मोट्ठी परंतु तरीही
नयनरम्य, अप्रतिम दिसत होती. तिथे जायला अजून अवकाश होता परंतु या ठिकाणाहून फोटो घेण्याची
मजा देखील वेगळीच.
मी तर फोटोसाठी हावरीच आहे हे सगळ्यांना आणि मला स्वतःला माहित
आहे. मी आणि सर्वच ट्रेकर्स हावऱ्यासारखी फोटोग्राफी करून ती कोसळणारी कातळधार
आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागले. परंतु ती जागा फारच निमुळती असल्याने क्रमानुसार
आपापल्या जीवाची काळजी घेत संयम ठेवून सगळे फोटोग्राफी करीत होते. तिथे अजून
एक गृप आल्याने थोडी जास्त गर्दी झाली होती.लिडर्सच्या सूचनेनुसार आम्ही पुढचा
टप्पा पार करण्यास सुरुवात केली.एक कठीण पॅच पार केल्यावर ती कातळधार आम्हाला समोरून दिसली. अहाहा.... ते वर्णन शब्दात
सांगणे कठीण आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या. पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आणि त्या कातळधारेजवळील गुहेत
जाण्यासाठी खोल दरीत उतरवायचे होते. परंतु प्रचंड घसरडे खडक त्यात त्या कोसळणाऱ्या
धबधब्याचा मारा सर्व ट्रेकर्सना सहन होईल किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी
स्वतः लीडर्स आणि अजून २-३ ट्रेकर्स पुढे गेले आणि बाकीच्यांना आधीच्या गुहेजवळ
थांबवयास सांगितले. तोपर्यंतआम्ही आणलेले जेवणाचे डबे काढून उभ्या उभ्या जेवण
उरकून घेतले.कारण गुहेत आम्ही ५३ ट्रेकर्स आणि इतर ग्रुपचे मेंबर्स जास्त असल्याने जागा
तशी कमी होती त्यामुळे कोणी गुहेत कोणी पावसाच्या धारेत थांबून जेवण केले पोट भरले परंतु ट्रेक
पूर्ण व्हायचा होता त्यामुळे अजून आमचे मन भरायचे बाकी होते.
अर्ध्या
तासाने लीडर्स म्हणाले सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे ज्याला आत्मविश्वास आहे
त्यांनीच चला. ५३ मधले आम्ही किमान ३० ट्रेकर्स दरीत उतरू लागलो. एकीकडे त्या
कातळधारेचा मारा, वाऱ्याचा मारा आणि घसरडे खडक असल्याने खूप भीती वाटत होती. त्यात
छोटे छोटे दगड सैल झाले होते. एखाद दुसरा दगड निसटतदेखील होता. रोप लावला होता त्याला धरून काही ठीकाणी रॅपलिंग
करून उतरलो खरे परंतु उंचावरून ती कातळधार कोसळत असल्याने आणि पाऊस जोरदार
असल्याने तोंडावर आणि डोळ्यावर ते पाणी
चापट्या मारल्यासारखे लागत होते. खडकाचा आधार घेत आम्ही खाली बसत होतो. त्या
कातळधारेकडे पाहिल्यामुळे उत्तम खडपला चक्करच आली. इतके असून एकीकडे आमच्यातले
हौशी फोटोग्राफर प्रशांत, विवेक यांनी त्या ठिकाणी त्या थराराचे फोटोज काढले आणि
व्हिडीओ शूटिंग केले. तुम्हाला सलाम आणि धन्यवाद.
समोरचा राजमाची किल्ला जणू ट्रेकर्सचा पाठीराखा
असल्यासारखा उभा होता. राजमाचीवरून कातळधारचे दृश्य अतिशय विहंगम दिसते. (खालील फोटो राजमाची गडावरून दुसऱ्याने काढला आहे राजमाचीवरून कातळधार कशी दिसते हे समजण्यासाठी मी इथे दिला आहे.)
राणे सर
आणि ४ मेंबर्स त्या दरीतून त्या भयानक रौद्र रूप असलेल्या धबधब्याखालून गुहेत
पोहोचले होते परंतु ते आम्हाला न्यायला येईपर्यंत बराच वेळ झाला होता त्यामुळे आमचे धाबे दणाणले होते आणि मला
तर खूप काळजी वाटत होती.आता गुहा फक्त १० मिनिटांच्या अंतरावर होती परंतु सॉल्लिड
रिस्क होती शिवाय जायला जाऊ परंतु सुखरूप
परत येणे महत्वाचे होते.अशावेळी हेल्मेट आणि पोहताना वापरतो तो गॉगल हवा होता.
पुढच्या कातळधारा ट्रेकला रॅपलिंग चे हेल्मेट आणि पाण्यातला गॉगल नेऊयात.
"रिस्क इज अवर पॅशन" असले तरी तिथून
पुढे जाणे सगळ्यांनाच शक्य नाही असे समजल्यावर त्या दरीतून आम्ही काही जण लिडर्स
च्या आदेशावरून पुन्हा रोपच्या सहाय्याने दरी चढू लागलो. त्यावेळी "फोना' गृप सोबत
केव्हातरी ट्रेकला येणारे किरण टेकवडे आणि प्रदीप अडागळे, रोहन स्टोरीटेलर, रघुनंदन पाटील असे काही मेंबर
वेगळा मोठा गृप घेऊन आले होते ते त्या दरीत उतरत होते आणि आम्ही काही मेंबर्स दरी
चढत होतो.असाही मी या आधी मी एकदा त्या रौद्र धारेखालुन गुहेत जाण्याचा थरार
अनुभवला होता. तरीही १० मिनिटांच्या अंतरावर जाऊन
माघारी येणे माझ्या पचनी पडत नव्हते. अशी हाव प्रत्येकामध्ये असणे खऱ्या ट्रेकर्सचे लक्षण आहे. मला यावेळी ठीक नसल्याने आणि पाऊस असल्यायाने पाणी प्यायलेच नाही पाणी कमी पडल्याने पायात चांगलीच चमक येत होती माझ्यामुळे इतरांचा ट्रेक का खराब करा. असा विचार करून मी दरी चढू
लागले. या अवाढव्य निसर्गापुढे आपण किती क्षुद्र प्राणी आहोत आणि आपल्या अडचणी
किती क्षुल्लक आहेत याची प्रचिती येते.कोणी कितीही अनुभवी ट्रेकर असला तरीही त्या भयानक पाण्याच्या
प्रवाहात रोप सैल होऊ शकतो आपण घसरू शकतो. दैव बलवत्तर, ट्रेकिंगचे तंत्र आणि जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली तरच आपण मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो हे ट्रेकमध्ये आलेल्या थरारक अनुभवाने शिकलो.
सगळेच
पाठीमागून येतात असे समजून आम्ही १५ जण वरच्या गुहेजवळ आलो परंतु तरीही आमच्यातील
३० ट्रेकर्सनी त्या कातळधारेचा थरार अनुभवला आणि सुरक्षितरित्या दरीतून आणि त्या
कातळधारेतून जणू स्वतःची सुटका करून आले यातच त्या ३० ट्रेकर्सचे खूप कौतुक. (खालील फोटोमध्ये जे झाड दिसते आहे त्याच झाडावर चापड्या बसला होता.)
सगळे ट्रेकर्स
आल्यावर "फोना बॅनर गृप फोटो" काढून आम्ही दुपारी २ वाजता परतीच्या वाटेला निघालो.
उतरताना २-३ गृप एकत्र निघाल्यामुळे आणि आमचेच ५३ ट्रेकर्स असल्याने एका ठिकाणी
ट्राफिक जॅम झाला होता आणि नेमका त्याच ठिकाणी चापड्या (पिट बांबू वायपर)आमच्या
वाटेतच एका झाडावरच्या फांदीवर अगदी डोक्यावर वेटोळे करून बसला होता तो एकाने
पहिला आणि आम्हाला पण सांगितले. तो जणू सांगत होता की चुपचाप जा नाहीतर मग माझ्याशी
गाठ आहे. त्यात आमचे सर्प मित्र निकाळजे सर देखील नव्हते. त्यामुळे जरा
घाबरगुंडी उडाली. परंतु दुसरा पर्याय नसल्याने त्या चापड्याच्या भीतीने
आमच्यासारखे बडबड करणारे बडबडेवीर थोडा वेळ तरी गप्प बसले. त्याठिकाणी रोप लावल्याने आणि
घसरडे असल्याने इतरांना डावलून जाता येत नव्हते. थोड्या वेळाने तो रोप-पॅच मोकळा
झाला आणि आम्ही सपासप ते जंगल पार करू लागलो. लिडर्स मागेपुढे झाले होते पण आता
आलो तश्या मार्गानेच निघालो होतो परंतु त्या झाडाला लावलेल्या भगव्या रंगाच्या छोट्या रिबिनींमुळे वाट थोडी सोप्पी वाटत होती. अधून
मधून दुसरे गृप विचारीत होते फोना गृपची ट्रेकिंग फी काय आहे.त्यांनी त्यांची फी
सांगितल्यावर समजले की फोना गृपची ट्रेकिंग फी ट्रेक दरम्यान मिळणार्या आनंदाच्या,समाधानाच्या मानाने खूपच कमी आहे." "फोना रॉक्स"असाही एक अनुभव.
झाडांच्या फांद्यांच्या भगव्या रिबिनी लावलेल्या दिसल्या नाही की आम्ही नव्हतो
चुकत तर वाट चुकत होती.
ट्रेक एकदम वेळेत होता त्यामुळे जातांना एका मोट्ठ्या
ओढ्यात बॅनर फोटो काढायचा राहिला होता तो काढून घेतला आणि चिखलाने भरलेले कपडे
त्या ओढ्यात बसल्याने मस्त आयते धुवून निघाले. ह्या
कातळधारेचा प्रशस्त प्रवाह आणि इतर मोठमोठ्या ओढ्यांचा प्रवाह सर्व दऱ्यांमधून
एकत्र येऊन जी नदी उगम पावते तिला उल्हास
नदी म्हणतात.सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगांमुळे
निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो.
ओढा
पार करून निघालो की सकाळी उतरलेलो ते घनदाट जंगल अंधार व्हायच्या आत चढून वर यायचे
होते. कातळधारेच्या ओढीने हसत हसत सपसप पार केलेले जंगल आता चढताना मात्र पाय भरून येत
होते. एका ठिकाणी आम्ही बडबडे ट्रेकर्स गप्पा टाकत निघालो आणि अनावधानाने एक टर्न चुकलो आणि
दुसऱ्या बाजूने क्षणात उतरायला लागलो.
पायांना आराम वाटला परंतु रस्ता चुकलो होतो हे १५ मिनिटांच्या आत लीडर्सच्या लक्षात
आले म्हणून बरे आणि त्यात ग्रुप मध्ये जास्त अंतर नव्हते म्हणून बरे नाहीतरी काही
ट्रेकर्स तर कुठच्या कुठे भलत्याच दरीत उतरले असते. परंतु अनुभवी आणि चाणाक्ष लिडर्स असलेल्या गृपसोबत जाण्याचा हा मोठ्ठा हितकारक फायदा आहे. म्हणून आम्ही
"फोना" सोबतच जातो. तरीही एक
चिंता राहिली होती की मोरे सरांसोबत ४-५ मेंबर्स पुढे गेलेत ते वाट चुकले नसावेत
म्हणजे झाले. तिथून फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.
२ वर्षांपूर्वी
४-५ मुले कातळधाराच्या ओढीने कोणतीही माहिती नसताना फक्त थोडेसे पाणी सोबत घेऊन
अंदाजाने गेले आणि वाट चुकले, रस्ता भरकटले आणि खोल दरीत उतरले. कोणाशीही संपर्क
होत नव्हता. अखेरीस २ दिवसांनंतर पोलिसच अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधू शकले.
परंतु त्यांना मच्छरांनी चावून हैराण केले होते शिवाय २ दिवस अन्न पाण्यावाचून आणि
भीतीने भेदरले होते ते वेगळेच. असे
विचित्र प्रसंग येऊ नये यासाठी माहिती असणाऱ्या ग्रुप सोबत सर्व तयारीनिशी ट्रेकला
जावे.
शेवटचा
टप्पा धापा टाकत पार केला कारण ट्रेक संपताना जर चढाव असेल तर मला तरी जास्तच जीवावर
येते. म्हणता-म्हणता जाताना दिसलेला दगडातला देव दिसला आणि ते घनदाट जंगल संपले आणि हायसे वाटले. संध्याकाळी ५ वाजता बसजवळ आलो तेव्हा समजले की पुढे गेलेले मोरे सर आणि इतर काही मेंबर्स
सुरक्षित पोहोचले होते. एकट्याने जाऊन सुरक्षित पोहोचणे हा देखील एक मोठा सपोर्टच असतो धन्यवाद मोरे सर आणि इतर. ट्रेक
संपला आणि कपडे बदलून मस्त चहा घेतला तेव्हा हायसे वाटले. सकाळी वेळेवर आम्हाला
सामील झालेल्या अनोळखी पाच ट्रेकर्सना सुरक्षित आणल्याबद्दल पूर्ण फोना टीमला त्यांनी चहाची ट्रीट दिली. धन्यवाद अनोळखी ट्रेकर्स. पावसाळी ट्रेकला खूपदा नवीन मेंबर्सची ओळख करून घेण्याचे राहून
जाते. त्यासाठी सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा ट्रेकला यावे. तसेच अंताक्षरी खेळताना आम्ही आधी
नवीन ट्रेकर्सना संधी देतो पण कोणी जागचे हालले नाही की मग आम्हीच सगळॆ बस
हालवतो. संधी मिळाली की मग सगळ्या कला आणि भडास बाहेर काढतो. जुने नवीन असे काही नसते हो. मी तर प्रत्येक
ट्रेकला नव्याने जाते. कारण प्रत्येक ट्रेकच्या वेळी आपली मनस्थिती आणि
शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. आपली शारीरिक क्षमता तपासून ती वाढवण्यासाठी आणि
मानसिक बळ वाढवण्यासाठी महिन्यातून किमान
एक ट्रेक हे एक उत्तम औषध आहे. लग्न ठरलेले २ जण फक्त बाहेर बाईकवर न फिरता
आपापल्या पार्टनरला घेऊन ट्रेकला आले होते.जसे स्नेहल खोल्लम(इंजिनियर,ट्रेकर,योगा चॅम्पियन,सायकलिस्ट,) आणि ज्ञानराजे (इंजिनियर,ट्रेकर,सायकलिस्ट).आताची पिढी देखील आरोग्यासाठी खूप जागरूक आहे असे दिसते. असाच चालू ठेवा रे ट्रेक.(खालील फोटो हा कातळधारची आतली गुहा आणि त्यात पोहोचलेले आमचे ३० ट्रेकर्स)
सगळ्यात आधी माझ्या फॅमिलीला(श्री.दीपक साने,चेतन,प्रभा) खूप सारे थँक्स ज्यांनी मला बरं नसताना माझ्यावर विश्वास टाकून माझा आत्मविश्वास वाढवून मला ट्रेकची परवानगी दिली. इतका
चांगला आणि सुरक्षित ट्रेक घडवून आणलात ट्रेकलिडर राणे सर, मंदार सर, रोहित
सर अनिल जाधव सर मनापासून धन्यवाद.
फोन फुटल्यामुळे मला स्वतःला या ट्रेकला जास्त फोटोग्राफी करता आली नाही त्यामुळे
कविता,दिनेश,स्नेहल,सुरेखा,अस्मिता, निकिता,ऋजुता
दिनेश, निलेश, रोहित, आनंंद,प्रशांत गुंड, विवेक,
दीक्षित सर सुपेकर सर, अभिजित आणि ज्यांनी फोटोग्राफीसाठी आणि इतरही सपोर्ट केला
त्यासाठी त्यांंचे खूप कौतुक आणि सर्वच ट्रेकर्सचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन."फोना"सोबत आते रहो और बढीया ट्रेक करते रहो....
x











