Wednesday 28 August 2024

पेब किल्ला थरारक अनुभव

पेब किल्ला 
जिल्हा - रायगड 
उंची - २१०० फूट 
दिनांक २५ ऑगस्ट २०२४ 
ग्रुप-माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे 

पेब किल्ला हा रायगड जिल्ह्यात माथेरान डोंगररांगेत आहे. पेब किल्याला विकटगडदेखील म्हणतात. समुद्रसपाटीपासून  जवळपास २१०० फूट इतकी पेब गडाची उंची आहे. नेरळ रेल्वेस्टेशनला उतरून जिप्सीने माथेरानकडे जाता येते. जर धुके पाऊस नसेल आभाळ निरभ्र असेल तर पेब किल्ल्यावरून आजूबाजूचे चंदेरी, श्री मलंगगड, प्रबळगड असे बरेच गडकिल्ले दिसतात. गडावर राहण्याची सोय शिवाजी शिडी वाटेने गेलात तर त्या  गुहेत पन्नास ते शंभर माणसे राहू शकतात  परंतु जेवणाची सोय नाही. जेवण आपले आपण न्यावे लागते 
बापरे किती वर्षांनी ट्रेक लेख लिहितेय मी आठवत पण नाही. लेख कसा लिहायचा??? हे पण विसरले की काय? तर नाही विसरले. लिहिणे मी कधी हि विसरू शकत नाही. "अलंग मदन कुलंग ट्रेक"नंतर मी ट्रेकिंगचा सविस्तर असा ब्लॉग लिहिलाच नाही. हो, ४ वर्षे झाली असतील. हात दुखतो का दुखतो?? कसा दुखतो देवास ठाऊक. हात अजून बरा होतोच आहे तोवर पावले सुजायची पावले सुजायची कमी झाली मग काय तर गुढग्यात वात  येतो. कसला वात आणि कसलं  काय एकंदरीत काय तर ट्रेकला न जाण्याची नाटकं असतील हिची असे लोकांना वाटत असेल परंतु तसे अज्जीबात नाही बरे. खरे तर ट्रेक माझा आत्मा आहे मग मी मृत्यू शय्येवर असले आणि जर कोणी म्हटलं की "जयु ट्रेक लावलाय येतेस का" तर मी मृत्यू शय्येवरून तडक उठून ट्रेकला तयार असेन. लंगडा पाय लंगडा हात घेऊन मी असे कित्येक ट्रेक केलेत तेदेखील माझ्यासाठी कठीण असणारे . हिमालयात दोन्ही पाय नसलेले लोक जातानाचे व्हिडीओ मी पहाते आणि प्रेरणा घेते.मित्र हो, परमेश्वराने आपल्याला तर सर्व अवयव दिलेत ते फिट ठेवायचे असतील तर माझ्यासाठी ट्रेक हा भन्नाट पर्याय आहे. 

डिसेंबर २०२३ मध्ये चक्रम हायकर्स ट्रेकग्रुपसोबत २ दिवसांचा आंबिवली -पर्वत-चकदेव-महीमंडणगड-आंबिवली असा जवळपास ४५ किलोमीटर्सचा  रूट केला होता त्यानंतर २०२४ मध्ये एप्रिलमध्ये कोथळे भैरवगडमार्गे कारकाई ट्रेक केला. मग एका गुढग्यात वात येऊ लागला त्याने माझा आत्मविश्वास कमी झाला. काही वैद्य बोलू लागले मॅडम खूप झाले ट्रेक आता बंद करा. काही वैद्य म्हणाले काही नाही गुढगा बरा झाला की जावा ट्रेकला. मागच्या महिन्यात म्हणजे जुलैला पुन्हा तोच लंगडा गुडघा घेऊन चक्रेश्वर ते तासूबाई एका दिवसात जवळपास २२तें २५ किलोमीटरचा ट्रेक केला. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात एखादा मध्यम चढाईचा ट्रेक करावा आणि शांत रहावे  असा विचार केला होता." माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे" यांनी पेब किल्ला ट्रेक लावला होता. मी आतापर्यंत एकदाही पेब किल्ला ट्रेक केला नाही फक्त ऐकलं होतं की ट्रेक मध्यम चढाईचा आहे. म्हणून शेवटच्या ३ दिवस आधी जागा बुक केली. 
२५ ऑगस्ट रविवारी सकाळी निगडीहून निघालेली बस ट्रेकर्सना गोळा करत लोणावळ्याच्या दिशेने निघाली. सोबत  धुवाधार पाऊस होता. पाऊस असावा परंतु आमच्या ट्रेकमध्ये अडथळा नको येउदे रे महाराजा असे मी म्हणत होते  परंतु निसर्गापुढे आपले काहीही चालत नाही. नेमका बसचा वायपर बंद पडला आणि मुसळधार पावसामुळे ड्रायव्हरला काहीही दिसत नव्हते त्यामुळे वायपर दुरुस्तीसाठी आम्ही मनशक्ती केंद्राजवळ नाश्त्यासाठी थांबलो तोपर्यंत बसचालकाने फिटर बोलवून वायपर दुरुस्त केला. तब्बल दोन तास उशीर झाल्याने त्यानंतर मात्र बस कुठेही न थांबवता अंताक्षरी चालू ठेवली आणि आम्ही सकाळी साडेदहाच्या सुमारास नेरळला पोहोचलो. तेथून  ओमनीच्या सहाय्याने १५ मिनिटात माथेरान रोडवर पोहोचलो तेथून पेब किल्ल्याकडे जाण्यासाठी जवळपास ४-५ किलोमीटरचा रेल्वेरुळाच्या रस्त्यावरून वळसा घालून आम्ही मालडुंगे येथे पोहोचलो. हा रेल्वे रुळावरचा प्रवास इतका जादुई होता की इथून माझी पावले निघत नव्हती, 

पाऊस पडून गेला ते धबधबे वाहताना सुंदर मोत्याच्या धारांप्रमाणे भासत होते. धुक्याचे ढग हिरव्यागार डोंगरांवर चित्रात रंगवल्याप्रमाणे सफेद छटा काढताना भासत होते. सगळल्याचं मैत्रिणी माझ्यासाठी नवीन होत्या कारण २ वर्षांनी माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे"सोबत ट्रेक ला आले होते. मी जमतील तसे व्हिडीओ फोटो माझ्या इन्स्टा ३६० मध्ये लॉक केले.बरेच ट्रेकर्स निसर्ग फोटोग्राफी करताना पाहून मला आनंद झाला शिवाय माझा दुसर्याने काढलेला एक तरी फोटो येणार याचा मनोमन आनंद दुसरे काहींनाही. 

रेल्वे आली असती तर अजून भारी विडिओ क्लिप मिळाली असती . रेल्वे रुळावरून चालण्याचा अनुभव भन्नाट होता. इथे थोड्याच अंतरावर चालत गेले की रेल्वे रुळावरून दिसणारा कड्याचा गणपती आहे. त्या ठिकाणी  माथेरान परिसर फिरणारी किंवा  फक्त कड्याच्या गणपतीकडे जाणारी मंडळी गर्दी करून उभी होती. कड्याच्या गणपतीकडे जायला घनदाट जंगलातुन जावे लागते शिवाय  छोटी वाट आहे परंतु  पाऊस असल्याने किमान पूर्ण कपडे घालणे आवश्यक आहे परंतु सहलीला आलेलं निम्मे लोक अध्या कपड्यातच होते. खंत वाटली. असो.

कड्याच्या गणपतीकडे जाणारी वाट इथून जाते. 
लीडर्सने ट्रेकविषयी आवश्यक सूचना केल्या आणि आम्ही पेब किल्ल्याकडे निघालो. आधी कड्याच्या गणपतीला भेट दिली नमस्कार केला एक बॅनर फोटो घेतला आणि पुन्हा थोडे माघारी येऊन पेब किल्याकडे प्रस्थान केले. पाऊस सतत सुरु होता. एका बाजूला दरी एका बाजूला डोंगर अशी ती छोटीशी घसरडी वाट होती. जपून चालले नाही तर डावीकडे थेट दरीत प्रस्थान होईल. लीडर्सने सूचना देऊनदेखील कित्येक ट्रेकर्सचे बूट ट्रेकबूट नव्हते. फुल बाहीचे टीशर्ट फुल ट्रॅकपँट न घसरणारे बूट ऊन पावसापासून संरक्षण म्हणून टोपी, रुमाल ,थंडी लागू नये म्हणून किमान वरचा रेनकोट किंवा थंडी लागणार नाही असे जाकीट सोबत हवेच. ट्रेक उन्हाळी असो किंवा पावसाळी असो एक दिवसाच्या ट्रेकला किमान २-३ लिटर पाणी हवे. एनर्जी म्हणून चिप्स, शेव, अशा चटपटीत पदार्थांऐवजी खजूर, गुळ, शेंगदाणा राजगिरा चिकी,खारे किंवा भाजलेले  शेंगदाणे,  सफरचंद, काकडी लिंबू सरबत हे कायम जवळ हवेच. कोणती वेळ कधी येईल सांगू शकत नाही. मध्यात पाणी मिळेल न मिळेल ज्यादाचे पाणी जवळ हवेच, पाणी बाटली ऐवजी ते डी कथेलान ला मिळते ते पाण्याचे ब्लॅडर असले तर उत्तमच. यामुळे घोट घोट पाणी पिता येते आणि आपले शरीर डिहायड्रेड होत नाही. बघा पटते का ते ?

कोरोना काळात मी काही आडवाटेवरचे ट्रेक केले त्यात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी शिकले त्या इथे सांगाव्या वाटतात म्हणून सांगते. पुढच्या ट्रेक ला त्या किती आत्मसात करायच्या त्या आपल्या आपण ठरवाव्या. आजूबाजूचे सुंदर निसर्ग नजरे कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत आम्ही एका शिडीजवळ पोहोचलो. या लोखंडी शिड्या भागाभागातून जरी आणून लावल्या असल्या तरी त्या लावताना त्यांना किती कठीण वाटले असेल. या शिड्या ज्यांनी लावल्या त्यांना मनापासून धन्यवाद . जिथे जिथे कठीण चढाई/उतराई आहे तिथे शिड्या असल्याने आपण ट्रेकर सहज जाऊ शकलो. त्या शिड्यावरील मधल्या काही पायऱ्या थोड्या सैल झाल्या आहेत त्यामुळे जपून आणि बसून गेले तर उत्तमच. एक शिडी पार केल्यावर पुन्हा वळसा घालून पुढे पेब माथ्याकडे आम्ही निघालो.चढाई मध्यम होती परंतु पाऊस सारखा पडतच असल्याने आम्ही चालतच राहिलो. 

एक मोठा शिडीटप्पा आम्हाला पार करायचा होता. लोखंडी शिड्या आणि त्यात काही शिड्यांचे स्क्रू ढिले झाल्याने पुन्हा जपून जायचे होते. जपून जायचे त्यात तो पाऊस म्हणतो मी. आणि मला हे सगळं माझ्या कॅमेऱ्यात कैद करायची हौस भारी.कोणतीही घाईगडबड न करता मी स्वतःला सुरक्षितपणे करून निर्सग आणि ट्रेकर्सच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपत असते. दुसऱ्याला मदत करायची म्हटली तरी आधी आपण एक स्टेबल पोज घ्यायची मग दुसऱ्याला हात द्यायला हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे. दुपारी दीडच्या सुमारास एल आकाराची मोठी शिडी पार केल्यावर पंधरा वीस मिनिटात आम्ही पेब माथ्यावरील शिडीजवळ पोहोचलो.
त्या शिडीवरून तोल जाऊन पडले कुणी तर जबर जखमी होऊन माणूस मारू शकतो. बेफिकीरपणा केला की अंगास येतो. असे अपघात इथे झालेत. परंतु आमचे ट्रेक लीडर यांचे एकदम  बारीक लक्ष असते. एकूण एक ट्रेकर ट्रेक पूर्ण करून घरी सुखरूप कसा पोहोचेल याची ते तंतोतंत पाहणी करून काळजी घेतात. शेवटच्या शिडीच्या पायऱ्या आणि बाजूला हात धरण्याचे बार देखील सैल झाले आहेत त्यात तो सोसाट्याचा वारा. टोपी कॅमेरा आणि मी उडून जात होतो. या ठिकाणी किरण मध्ये थांबून एकेकाला त्या शिडीवरून सावकाशपणे वर घेत होता.दुपारी दोन वाजता आम्ही पेब किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. 

इथे कमीत कमी जागेवर अधांतरी बांधलेले दत्तमंदिर म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतक्या वरती इतकं जड सामान नेऊन मंदिर बांधणे खूप कष्टाचे काम आहे. आपल्याला नुसते चालणे कठीण वाटते. मंदिरात दत्तमूर्तीला नमस्कार करून गडमाथ्यावर एक बॅनर फोटो घेऊन आम्ही लगेच उत्तरेला सुरुवात केली कारण आमचे जेवण गडाच्या पायथ्याशी ठाकरवाडी वस्तीवर होते. 
आमच्याजवळ थोडे पाणी आणि थोडा वरचा खाऊ होता तोच आम्ही अधून मधून खात होतो कारण भूक तर खूप लागली होती. आता थोडेसेच अंतर राहिले बरं का या आशेवर आम्ही उतरत होतो. चढाईपेक्षा पावसात उतरायची रिस्क जास्त असते. घसरडे दगड निमुळती वाट दगडगोट्यातून धबधबे पडतात की ज्या वाटेने पावसात फार कोणी जात नाही. पावसाचा जोर वाढला की या वाटा पाण्याने तुडुंब भरून धोधो वाहू लागतात त्यातून पावले टाकणे फारच जिकरीचे काम असते आणि आम्ही ते करीत होतो. गडमाथ्यावर २-३ वर्षांपूर्वी इथे अपघात झाल्याने मंदिराच्या एक टप्पा खाली तारेचे कुपन लावले आहे आम्ही त्या तारेच्या कुंपणाखालून बसून घुसून शिवाजी शिडीमार्गे आनंदवाडीकडे उतराई करू लागलो. तेथे काही ग्रुप होते. 
आमचा मोठा ग्रुप आणि लहानथोर वयाची मंडळी पाहून ते म्हणाले ही वाट कठीण आहे इथून जाऊ नका. परंतु आमच्या ट्रेकलिडरना  ती वाट माहित होती त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो आहे. खाली उतरताना पहिल्याच वाटेवर काहींना हात टेकल्याने मुंग्या चावल्याने बोटाना लाली आणि सूज आली. माणूस घाबरून जातो काय चावले असेल बरे ?? सोबत डॉक्टर आणि प्रथोमपचार बॉक्स असल्याने चिंतेचे कारण नव्हते.  इंजेक्टबल मेडिसिन सुद्धा होती. डॉ राजेंद्र यांनी लगेच मेडीसिन दिल्याने मुंगी दाह कमी झाला.घनदाट जंगल निमुळती वाट पोटात कावळे नाहीतर डोमकावळे ओरडत होते. वाटेत ट्रेकर्सने केलेले मार्किंग शोधावे लागे. आम्ही काही ट्रेकर्स पुढे होतो बरेचदा किरण एक टप्पा खाली जाऊन मार्किंग पाहून येई आणि लीडर्सना आणि मागच्यांना सांगत असे अरे, हीच वाट आहे. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या अती घसरडे तुटलेले वेडे वाकडे दगड काय ती बेक्कार वाट होती. आठवले तरी जीव घाबरतो. लढताना लढणारे कसे आले गेले असतील हा विचार खरोखर विचार करायला लावतो. 


पेब गडाला नुसते वळसे घालत आम्ही उतराई करत होतो. सुरपारंब्याचा  खेळ खेळत होतो जणू. आम्ही दिसतो का बघा बरे?? घसरून पडण्यापेक्षा अगदी लहानमुलांसारखे रांगत उतरत होतो आम्ही. दुपारी सव्वातीनच्या सुमारास आम्ही श्री. छत्रपती शिवाजी शिडीजवळ आलो. खाली तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी जुनी लोखंडी शिडी होती परंतु खाली दरी आणि वरून धोधो पाऊस असल्याने सगळ्यांना सुरक्षित खाली जाण्यासाठी लीडरने सोबत आणलेला  मोठा रोप आजूबाजूच्या झाडांना  घट्ट रोवून एकेक ट्रेकर्सला सुरक्षितरित्या खाली सोडीत होते. शिडी उतरताना उलटा  वॉटरफॉल डोळ्यावर फटकारे मारत होता आणि म्हणत होता, "भर पावसात कोणी तुम्हाला या कठीण वाटेने येण्याचा सल्ला दिला ?आम्हाला बाबा थ्रिल हवे होते म्हणून आम्ही या वाटेने आलोय. "या ठिकाणी थांबल्यावर थोडे सरबत थोडे पाणी पिऊन थोडा सुका मेवा खाऊन घेतला. घोट घोट सरबत पित असताना कुणीतरी मैत्रीण म्हणाली तयारी बघा हिची. हो एक दिवसाच्या ट्रेकला जेवणाची सोय जरी असली तरीही गरजेचा खाऊ पाणी सरबत हे जास्तीचे आपल्याजवळ असावे खूप उपयोगी पडते.  

तीन ट्रेकर्स गेल्यावर मी शिडी उतरले कारण इथले विडिओ तर केलेच पाहीजेत.छानपैकी शिडीवाट कॅमेऱ्यात कैद केली आणि मी ती शिडी उतरले. ३ ट्रेकर्सच्या नंतर मी चौथा ट्रेकर आम्ही खाली असलेली अतिघसरडी वाट एकमेकांच्या मदतीने सावकाशपणे पार करून पेब किल्ल्याच्या मुख्य गुहेजवळ  पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफेसोबतच्या भल्यामोठ्या पुतळ्याला मुजरा करून आम्ही गुहेत पोहोचलो. खूप भिजल्याने थंडी भरली होती. गुहा प्रचंड मोठी आणि कोरडी होती. शंभर लोक आराम करू शकतील इतकी मोठी गुहा इथे आहे. आतमध्ये स्वामी समर्थांची प्रतिमा रेखाटली आहे. 



गुहेत गेल्यावर थंडी उडाली. स्मिता मॅडमकडे बराच चखणा खाऊ होता. मी शक्यतो ट्रेक दरम्यान तेलकट खायचा टाळते. परंतु भूकच इतकी लागली होती की चिप्स,भुजिया एक सफरचंद होता ते सगळं आम्ही वाटून खाल्लं. सर्व ट्रेकर्स शिडी उतरल्यावर आम्ही गुहेजवळून निघालो आणि कारवीच्या जंगलात शिरून चालू लागलो. चालत राहिलो चालत राहिलो आणि एका तासात साडेचार वाजता एका मोठ्या रॉक पॅच जवळ येऊन थांबलो. इथे थांबलो असता स्मिता म्हणाली जयू बस झाले फोटो चला पटापट अंधार होईल आता.  रॉक पॅच आला म्हणून थांबलो होतो आपण. लीडर्सने रॉक पॅच उतरण्यासाठी पुन्हा रोप बांधला आणि एकेका  ट्रेकरला सुरक्षितरित्या रॉक पॅच पार करवला. या ठिकाणी थंडी भरलेली एक भुभू होती तीला बिस्कीट दिलं की तिची थंडी उडाली आणि ती शेवटपर्यंत आमच्या सोबत होती. चालताना पायात मध्ये मध्ये येतात हे भुभू परंतु वेळ प्रसंगी आपली सोबत देखील करतात.
इथे लाईन लावून आम्ही बसलो होतो तोपर्यंत माझी मात्र बसल्याबसल्या फोटोग्राफी सुरु होती. जर धुके नसते तर आजूबाजूच्या दऱ्या स्पष्ट दिसल्या असत्या आणि माझा इन्स्टा ३६० शांत झाला असता. २९ जणांना तोच मोठा रॉकपॅच पार करायला जवळपास दीड तास लागला. आता मात्र पोटाला आग लागली होती. सहाच्या सुमारास खाली उतरणाऱ्या दोन वाट दिसल्या. यातली कोणती वाट असेल असा आम्ही अंदाज लावत होतो. मी आणि अजून काहींनी अंदाजे ओळखलेली वाट अचूक होती परंतु कसली बिकट वाट होती ती. माझा वात येणारा गुडघा आता जागा झाला. जणू काय मला म्हणू लागला.,"सोपा ट्रेक सांगून आणलेस मला आणि सकाळपासून लै दमवलास आता तुला बघतो मी " ती रडू आणणारी वाट इतकी बेक्कार होती आणि आम्ही इतके थकलेलो, इतके भुकेलेलो होतो की कोणाला बोलावे ?? कळेना झाले होते. मी चालू शकत नाही  सगळेच थकलेले, कोणी नवीन, पहिल्यांदाच ट्रेकला आलेले, प्रत्येकजण हिरमुसलेल्या होता. माझे पाय तर एखादा बेवडा चालवा तसे ते एकमेकात गुंतत होते. किरण मी आर्याची मम्मी, पोलिस अश्विनी मॅडम आणि त्यांचे सहकारी मित्र गोरे सर असे आम्ही पुढे होतो.  किरण मार्किंग बघत बघत चाले आणि किरण म्हणे," चला या रे " अशा वेळी किरणला एखादी त्याची कविता ऐकवायला सांगायला मला सुचले नाही . कारण नुसते चालण्यापेक्षा फोटो काढले काहीतरी वेगळी चबरचबर केली, गमती काढत चालत राहिलो की थकवा कमी जाणवतो. एक तासात मोबाईल कॅमेरा काढायची आठवणदेखील मला राहिली नाही.किंबहुना मी आवर्जून मोबाईल बाहेर काढला नाही कारण दुपारी चारच्या आत पोहोचणार म्हंटल्यावर मी माझा हेड टॉर्च बसमध्ये ठेवण्याचा मूर्खपणा केला होता त्यामुळे अंधार झाला तर त्या घनदाट जंगलात मोबाईल फ्लॅशलाईट उपयोगात येईल. एका तासात आम्ही एका ओढ्याजवळ पोहोचलो आणि वाटेवरच एक छोटी दरड कोसळलेली होती त्यामुळे वाट दिसेना गड्या वाट दिसेना. मंदारसर मागून आलेच. 
कोरोना काळात डोंगरयात्रा सोबत आडवाटेवरची भटकंती सुरू केली. मग दोन दिवसीय मोठा म्हणण्यापेक्षा गर्दी नसलेल्या ठिकाणी जायची सवय लागली.त्यामुळे mountain edge Pune सोबत काही वर्षांत कमी ट्रेक झाले म्हणून काय कोणी माहेराला विसरते का?? तर अजिबात नाही.मी हल्ली हल्ली आमचा तुषार भाऊ अनुभवी ट्रेकर आहे त्यांचेसोबाबत  काही ऑफबीट ट्रेक केलेत  त्यामुळे  कुठून वाट असू शकते याचा थोडासा अंदाज येतो. किरण ओढ्यात जाऊन बघ ही वाट असू शकते बघ. आणि देवाची करणी आणि नारळात पाणी तसेच आम्हाला वाटेचे मार्किंग सापडले आणि जीव भांड्यात पडला. मागचे सगळे आले आणि आम्ही ओढा क्रॉस करून पुढे गेलो आणि एका झाडाजवळ थांबलो. 


संध्याकाळचे सात वाजले होते. आता मात्र आमच्यात आपसात थोडेही अंतर पडले तर वाट चुकायची दाट शक्यता होती. सगळॆ एकत्र आले आणि चालू लागलो. मंदारसर अजून किती आहे ओ ???आता मात्र होती नव्हती तेवढी ताकद हिम्मत संपायला आली होती. परंतु एकजण म्हणेल तर शप्पथ. एका ठिकाणी थोडा उजेड दिसला आणि असं वाटलं जंगल संपलं असं वाटलं आणि आम्ही रिलॅक्स झालो आणि गवतावर घसरून धपाधप पडलो. सकाळपासून न घेतलेला सुसुचा हॉल्ट सगळ्यांनी घेतला आणि पुन्हा बेवड्याची चाल चालत राहिलो. जंगलातून बाहेर पडलो जंगल संपले असे वाटले की पुन्हा ते जंगल यायचे पुन्हा आम्ही चालायचो. आता मात्र किर्रर्र अंधार पडला होता. सगळ्यांचे मोबाइल फ्लॅशलाईट, हेड टॉर्च टॉर्च बाहेर निघाले. परंतु तरीही अति थकव्यामुळे आणि भुकेमुळे धपाधप घसरत होतो आणि पडत होतो. डि. पी. सरांकडे हेड टोर्च होता तो मला फार उपयोगी पडला मनापासून धन्यवाद सर. रात्रीच्या  साडेआठ वाजताच्या सुमारास आमच्या लाईटचा उजेड पाहून पायथ्याच्या गावातील अनोळखी तीनचार पोरं माणुसकीखातर मोठ्या बॅटऱ्या घेऊन आम्हाला घ्याल आली.  शेवटचा  अर्धा तास कसा उतरलो आमचा आम्हाला ठाऊक. गावातल्या लाईट दिसत होत्या आणि आमची चिखलमय वाट संपत नव्हती. माय आठवली. रात्री नऊच्या सुमारास आम्ही आनंदवाडीत आम्ही उतरलो पुन्हा एक ते दीड किलोमीटर चालून फणसवाडीत पोहोचलो. दुपारचे २ वाजताचे जेवण आम्ही रात्री ९-१० दरम्यान जेवलो. बिचारे दुपारपासून जेवण बनवून आमची आतुरतेने वाट पहात होते. आम्ही जवळ आलोय हे समजल्लेयावर अंगणात टेबल खुर्च्या टाकून पटापट जेवण वाढले आम्पही काही जणांनी घरात बसून जेवण केले.गुलाबजामून दोन भाज्या चपाती तांदळाची भाकरी पापड वरण भात अशी संपूर्ण थाळी पाहून पोट भरलं. अन्नदाता सुखी भव.
आम्ही आमचे ओले कपडे बदलले आणि बसमध्ये बसून पुणेकडे रवाना झालो. रात्री २ वाजता घरी पोहोचलो. मध्यम म्हणता म्हणता असा अतिकठीण घडलेला ट्रेक अनुभवला. ट्रेकमध्ये सहभागी झालेले डॉक्टर्स, पोलीस,लहानथोर मंडळींचं कौतुक करावे तेवढे कमी आहे . किरण खूप मेहनत घेतलीस असाच सुरक्षितपणे सह्याद्रीत भटकत रहा. मी फोटो काढायचे बंद केलेत म्हणणारे सगळ्यात जास्त पोज देत होते हाहाहाहा ही गोष्ट गंमतीची आहे परंतु महत्वाची देखील आहे. फोटोच्या  नादात पाय घसरून तोल जाऊन जीव जाऊ शकतो तर स्वतःला आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेऊन निसर्गाचा आनंद लूटा आणि निसर्ग कॅमेऱ्यात कैद करा. सर्व ट्रेकर्सना कळकळीची विनंती आहे कोणत्याही ट्रेकला साधा समजू नका,  ट्रेकच्या पूर्ण तयारीतच ट्रेकला जावा. 
पेब ट्रेक दरम्यान डॉ काशिद झोपे सर, दिक्षित सर, शिल्पा, जय, मीनल, कस्तुरी गोरे सर, रोहिणी मॅडम आणि सर्वांनीच  उत्तम फोटोग्राफी केलीये. डॉ. काशिद सर आणि कस्तुरी यांनी अप्रतिम लिहिले आहे. खरंच कमी शब्दात सुंदर वर्णन केलय. मला खूप आवडले. ओळखी झाल्या नाही त्यामुळे मला सगळ्यांची नावे ठाऊक नाहीत. ग्रेट मंदार सर आणि राणे सर ट्रेक कितीही मोठा असो दमवणारा असो आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून ट्रेकसाठी येतो आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवता. मनापासून धन्यवाद आणि साक्षात दंडवत. आम्ही ट्रेक पूर्ण करू शकत नाही असा चकार शब्द एकही ट्रेकरने काढला नाही. एकमेकांना सहकार्य केले आणि कोणालाही मोठी दुखापत न होता सुरक्षिरित्या आपण घरी पोहोचलो. हा ट्रेक सोनेरी क्षण म्हणून आठवणीत राहील असा जवळपास चौदा ते सोळा किलोमीटरचा भन्नाट ट्रेक होता. गर्ल Gang संख्या वाखाणण्याजोगी होती. Girls and Boys Guys Keep Trekking. मी कुठेही गेले तरीMountain Edge माझ्यासाठी माहेरघर आहे.  
Mountain Edge Pune,Maharashtra, India.
गर्ल पॉवर 



Friday 21 June 2024

स्वप्नांशी खेळणारा माणूस



माणूस वयाने म्हातारा होतो त्याची कला आणि ट्यालेंट कायम तरुणच रहातात...
माणूस जन्माला आल्यापासून वयाच्या प्रत्येक वळणावर पावलोपावली काही ना काही चांगले वाईट शिकत असतो. कधी तो गरज म्हणून शिकतो क एकधी तो पर्याय म्हणून शिकतो कधी तो मनातील वेदना यातना कमी करण्यासाठी विसरण्यासाठी शिकतो.कधी कला विकसित करण्यासाठी शिकतो, कधी प्रसिद्धीसाठी शिकतो,कधी तो पैसा कमवण्याचं साधन म्हणून काहीतरी शिकतो.
वाईटाला धडा शिकविण्यासाठी वाईट गोष्टी शिकतो. किंवा जगाचा एखाद्या व्यक्ती चा बदला घेण्यासाठी वाईट गोष्टी देखील शिकतो.त्यातून काही निष्पन्न होत नाही ते वेगळे.😅😅
शिकलो तर चांगल्या गोष्टी शिकूयात...
आजच्या कलियुगात सोशल मिडिया म्हणजे आपला आरसा आहे. जसं इथे वाईट अनुभव येतात तसेच चांगले अनुभवदेखील येतात.प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यात एक चांगला वाईट धडा शिकवून जाते. चांगले लोक चांगले विचार देतात वाईट लोक देखील आपल्यातील चांगले गुण विकसित करतात. 
अनुभवावरून सांगते की मला ना जेवण बनवायला येतं होतं ना अजून काही येत होतं.
लग्न झालं,मुलं झाली संसार कधी घडला बिघडला कधी आयुष्य बिघडलं पुन्हा घडलं.या सगळ्यात मी त्या त्या वेळेला बर्याच कला शिकून घेतल्या.बरीच लोक मला फालतू सल्ला द्यायची आता तूला काय करायचं आहे हे शिकून?आता ट्रेक करून काय करणार?आता चांगलं दिसून काय करणार??का???आपण मरेपर्यंत इतरांसाठी जगतो घरच्यांसाठी नातेवाईक आईवडील सगळ्यासाठी सगळं करतो मग स्वतःसाठी जगलो तर त्यात चूक काय आहे??? प्रत्येकाच्या घरातील वातावरण वेगळं असतं. कधी बंधनं असतात कधी जबाबदारी असते, कधी सुख असते कधी नसते पण तरी आपण जगतोच मग स्वतःसाठी जगलो तर काय बिघडले???वयाची पन्नाशी आली तरी मी रोज नवनवीन गोष्टी शिकते, अजून शिकतेयच, फुडी ग्रुपमुळे फुड पोस्ट विडीओज चांगल्या पद्धतीने सादर करायला शिकले.
ट्रेकींगमध्ये फोटोग्राफी विकसित केली. ब्लॉग लिहायला शिकले. हातात लिहायची कला होती ती ब्लॉग मुळे थोडी विकसित झाली. घरात स्वयंपाकघरात हजारो अन्नपदार्थ बनवायला शिकून आवडीने खायला घालायला शिकले त्यांच फार कौतुक झालं नाही कधी कारण ग्रुहीणीला कायम ग्रुहीत धरलं जातं परंतु त्यामुळे माझ्या मुलांना बाहेरचं जेवण फारसं आवडत नाही. आम्ही कंटाळा आला की बाहेर जेवायला जातो परंतु मुलांना फक्त माझ्या हातचेच पदार्थ जास्त आवडतात. हीच मी माझ्या अन्नपदार्थ बनवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची, तुफान वेळ घालवून चांगले पदार्थ बनवून कुणाला आवडल्याची कष्टाची पावती समजते. 
कधी आपण एकटे पडतो तेव्हा आपण मित्र मैत्रिणींना सहज शेअर करतो काहीवेळा त्याचा गैरफायदा घेतला जातो आयुष्याची वाताहत होते.पुन्हा त्या सगळ्यातून बाहेर यायला आपण ज्योतिषी बितीशी कडे पुन्हा काही तरी आयुष्याची वाट लागते पुन्हा एकदा आयुष्य पणाला लागते. त्यापेक्षा जेव्हा जेव्हा मनाला स्ट्रेस पासून वाचण्यासाठी मी एखादी कला शिकते. मग ते चित्र काढणे असो. किंवा विडीओ एडीटींग असो.पेटी वाजविणे असो की गायन शिकणं असो की गाणं गाणं असो. आयुष्याचं गाणं गाऊन वाजवायला मात्र मला कधी जमलंच नाही 😂😂😅😅त्याचे स्वर कायम बिघडलेलेच रहातात..😂😅😅मी सतत मला कशात तरी मग्न ठेवून त्यातून चांगले काहीतरी करत रहाते. त्यावर माझं You Tube channel चालायला मदत होते. मध्येच त्या चॅनेल ला पण वात येतो माझ्यासारखाच पण पुन्हा चालतं 😂😅😅
आपलं दुःख कहाणी सहज शेअर करतो ते इतरांना मानसिक आजार ठरवून मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचा सल्ला देतात काही मंदबुद्धी लोक. आपल्या आयुष्यातले संघर्ष आपणच सहन करून सोडवू शकतो. आपल्याला स्वातंत्र्य नसेल तर आपला स्ट्रेस वाढतो आणि आपलं शरीर संतुलन बिघडते. आणि मग दवाखान्याच्या फेरीत वाढ होते ते नको असेल तर आपल्या आवडीनुसार आपल्याला सगळं करायला मिळाले की आपण निश्चिंत राहून शारीरिक व मानसिक संतुलन उत्तम रहाते. एखाद्याशी मनमोकळेपणाने बोललो की आपलं मन शांत रहातं पण ती एखादीच व्यक्ती असते आपण कुणाशीही बोलू शकत नाही कारण सगळे विश्वासू नसतात..
सोशल मिडिया जसा वाईट तसा चांगला देखील आहे. असंच होतं लिहीता लिहीता भरकटतो आपण😅😂
मनातलं चित्र कागदावर असं उतरतं कधी कधी 😅😂
आयुष्य असंही घडतं कधी बिघडतं हे असं चालूच रहाणार...
पण मी मरेपर्यंत काही ना काही शिकत रहाणार आणि उड्या मारत रहाणार कोणाला काही अडचण असेल तर सांगा बरे....😅
.
.
.
Patil Jayuu 
30 March Year Ending चा ज्ञानी स्टेटस....😅😅
बुरा ना मानो भाई होली हैं 😂

Wednesday 14 February 2024

अग्निकर्म आणि विध्दकर्म संशोधन केंद्र


आज वसंत पंचमी आहे.आज सरस्वती देवीची आराधना, पूजा केली जाते. सरस्वती देवीला आज आपण जे मागू ते ज्ञान, ती कला देवी आपल्याला आशिर्वाद म्हणून नक्की देते.अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्ताने थोडंसं लिहावं वाटलं म्हणून मी हे लिहितेय.
मी एक सामान्य ट्रेकर आहे आणि कधीतरी मराठी ट्रेक लेख लिहिते.
परंतु माझी ट्रेकिंगची सुरुवात मला दहा वर्षांपुर्वी संधीवात सुरू झाल्यानंतर झाली हे वाचून वाचणार्यांना आश्चर्य वाटेल.परंतु ते सत्य आहे.विषय असा आहे की मला RA Factor positive वगैरे काय असतं ते काहीही माहिती नव्हते. या दुखण्यामध्ये सांधेदुखी असते असे ऐकले परंतु मला फक्त हाताचे पंजे आणि माझी पावलं इतकंच दुखत असे फक्त ते वेदनेचे प्रमाण फार जास्त होते आणि मी तेव्हा चालू शकत नसल्याने मला पुढील काळात कंबर दुखी किंवा इतर दुखणी सुरू होवू नये या भितिने मी त्वरित उपचार म्हणून Alopathy चं औषध सुरू केले आणि त्यामुळे मी काही दिवसांनी चालू शकले. परंतु रोजचा medicine चा Heavy Dose आणि पंधरा दिवसांनी Steroid injections शिवाय माझ्याकडे पर्याय नसे‌. परंतु जास्त चालणे करावयास सुद्धा भिती वाटे. हातापायाची बोटं सुजायची आणि प्रचंड वेदना व्हायच्या त्या औषधं घेवूनदेखील सहन कराव्या लागल्या. पाण्यातील कामं केली की वेदना तिप्पट होत असे.तेव्हा एका गोळीची मला Alergy होऊन द्रुष्टी जाण्याइतपत साईड इफेक्ट झाले होते‌.
माझ्या डोळ्यांवर त्वरित उपचार केले म्हणून माझी द्रुष्टी जाताजाता राहिली आणि परमेश्वर क्रुपेने सुदैवाने आजही मी हे जग पाहू शकते‌. Alopathy औषधं खाऊन पोटात दुखत असे कारण माझं जेवण/रोजचा आहार फार कमी असल्याने ती औषधं माझ्या आतड्यांना सहन होत नव्हती‌. Alopathy चे Doctor medicine चा Dose बदलून कमी करून द्यायचे आणि आश्चर्यचकीत व्हायचे की या व्यक्तीचं दुखणं बरं होत नाही तरी ही व्यक्ती ट्रेकिंग कशी करत असेल‌.
ही औषधे चालू असताना एकीकडे महिन्याला/तीन महिन्यांनी किडणी लिवरचे चेकअप असतेच‌‌. Steroid च्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ होणे, किडणी लिवर खराब होणे हे ऐकून मी घाबरून Dipression मध्ये जाऊन मला काही काळ निद्रानाश झाला.पुन्हा ती झोप लागली नाही म्हणून त्यावर औषधोपचार, मग केसगळती झाली त्यावर औषधोपचार असं सगळं भयानक होतं ते सगळं.मग शांत झोप लागली जावी यासाठी mild Dose म्हणून एक गोळी घेतली की मी आख्खा दिवस ग्लानीत असे मला सतत झोप येई. मुलं लहान,मुलांंचा अभ्यास आणि घरातील कामे कशी होणार ? भविष्यात माझं कसं होणार??या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता मी एक छंद म्हणून ट्रेकिंग चालू केले आणि हळूहळू मला महिन्यात एक दिवस का होईना वेदनेचा विसर पडू लागला‌. हळूहळू मी steroid injections बंद करून वेदना सहन केली‌.गोळयांचे डोस कमी केले‌. एका बाजूला आयुर्वेदिक औषधे सुरू होतीच आणि ट्रेक सुरुच ठेवला‌. कोरोना काळात बाहेर पडलो तर कोरोना होईल या भितिने Doctor कडे गेलेच नाही‌.😊😂त्यावेळी बिल्डिंगमध्ये एक योगाशिक्षक असल्याने मी योगा सुरू केला. सुरूवातीला कमालीचा त्रास झाला परंतु हळूहळू योगा सवयीचं होऊन दुखणं कमी झालं. तेव्हापासून Alopathy औषधोपचार बंद केलत.एकतर वेदना सहन करायची नाहीतर कधीतरी आयुर्वेदिक औषधे घेत असे. मागच्या वर्षी माझा मनगटात हात मुरगळला आणि बरेच उपचार घेवून त्याची सूज आणि वेदना काही केल्या कमी होत नव्हती‌.मी हैराण होवून वेदनांनी रोज रडत असे.  Doctor शुभम राजाराम जानकर यांचं नाव एका मैत्रिणीकडून ऐकलं‌. परंतु मला इंजेक्शनचा Fobiya असल्याने सुई टोचून घेण्याची हिम्मत माझ्यात नव्हती.तरी म्हटलं एकदा जाऊन तरी बघावं काय आणि कशी उपचार पद्धती आहे ते म्हणून फोन करून Appointment घेतली आणि अग्निकर्म आणि विध्दकर्म ही उपचार पद्धती सुरू केली. दोन आठवड्यात थोडा फरक जाणवला आता आठवड्याला ही उपचार पद्धती सुरू आहे.हाताची सूज कमी झाली आणि वेदना कमी झाली.त्यात भर म्हणून मला मध्येच कमरेत लचकले होते. काही केल्या चालता येत नव्हते माझ्या hectic schedule मुळे बरे व्हायला बारा दिवस लागले परंतु सरांच्या अग्निकर्म आणि विध्दकर्म या उपचार पद्धतीमुळे आता पुर्ण बरी झाली. माझं संधीवाताचं दुखणं मध्येच वाढलं होतं ते नुसत्या अग्निकर्म आणि विद्यकर्म यानेच बरं होतंय.कमीत कमी औषधं किंबहुना औषध नाही आणि फरक हा आहेच‌. मला स्नायुदुखीचा त्रास आहे तोही कमी होतोय‌.मनापासून धन्यवाद Doctor. तिथे येणारे पेशंट पहाता माझं दुखणं काहीच नाही असं वाटतं. केमो केलेले पेशंट,लकवा मारलेले पेशंट, Special मुलं, एक वर्ष मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत सर्व आजारांवर औषधोपचार करणारे असे हे Doctor आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले‌. टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवण्यासाठी देखील इथे उपचार केले जातात आणि उपचार पद्धतीने डोक्यावर उगवलेले केस पेशंट इतरांना दाखवतात.
पेशंट चा प्रश्न असतो Docter, "माझं दुखणं कधी बरं होणार ??" सर म्हणणार, "तुम्ही लवकरच बरे होणार" हा कमालीचा सकारात्मक दृष्टिकोन पेशंटची निम्मे वेदना कमी करतो. आमच्या एका ओळखीच्या पेशंटला अचानक पाच वर्षे झाली निद्रानाशाची समस्या होती‌. ती पेशंट इतर ठिकाणी लाखो रूपये खर्च करून अनेक औषधोपचार करून काहीच फरक नाही म्हणून Doctor जानकर सरांकडे आल्यावर सरांच्या औषधोपचार पद्धतीने दोन महिन्यांतच फरक पडला. ज्या व्यक्तीला पाच वर्षे रात्री झोप लागली नाही त्या व्यक्तीला आता रात्री किमान दोन तास झोप लागते. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. नेपाळची एक पेशंट सरांकडे येवून बरी होतेय.असे कितीतरी पेशंट लाखो रुपये खर्च करून इतर Doctor नी सांगितले की आता यापेक्षा वेगळे उपचार नाहीत असे पेशंट सरांकडे येवून बरे होतांना दिसत आहेत.
Doctor सर, तुमच्या हातात आणि मुखात सरस्वतीचा वरदहस्त आहे. सर तु्मची प्रकृती कायम उत्तम राहो. तुमच्याकडून सदैव असेच करोडो व्यक्ती वेदनेतून बाहेर येवोत. 
.
.
.
संपर्क -
Doctor शुभम राजाराम जानकर
श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय अग्निकर्म आणि विध्दकर्म
+91 95884 12914
.
.
.
Jayuu Patil-Sane
१४ फेब्रुवारी २०२४

Monday 4 December 2023

हेअर कट

साधी गोष्ट पण खटकणारी गोष्ट.....
हो आपल्या आवडीनिवडी वयानुसार बदलत जातात.
एखाद्याला वयानुसार वर्षानुवर्षे एकाच साच्यात बसवलेल्या नियमात रहायला आवडतं विशेषता जग काय म्हणेल या चिंतेने..
एखाद्याला वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे परिधान करून मिरवायला आवडते..
एखाद्याला चालू घडामोडींवरील वर्तमानातील ट्रेंडनुसार सतत बदलत रहायला आवडते.
एखाद्याला नुसतंच साधं आयुष्य जगायचे म्हणून जगायला आवडते.
एखाद्याला जगाची चिंता करत कुढत रहायला आवडते.
एखाद्याला सतत दुसऱ्यांना नावे ठेवायला आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला आवडते.
एखाद्याला नुसतंच टक्कल आवडते.
एखाद्याला केसांचा टोप लावायला आवडते.
एखाद्याला शरीर मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करायला आवडते.
एखाद्याला चांगुलपणाचा नुसता देखावा करायला आवडते.
एखाद्याला मैत्रीसाठी सर्वस्व पणाला लावून स्वतःची वाट लावून घ्यायला आवडते.
एखाद्याला एकटे रहायला आवडते.‌
एखाद्याला फक्त संसार नोकरी इतकंच मर्यादित रहायला आवडते.
एखाद्याला घर नोकरी सांभाळून अनेक छंद जोपासला आवडते.
एखाद्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडते.सतत नवनवीन गोष्टी शिकणे आणि त्यातून इतरांना प्रोत्साहन देणे हे आवडते.
एखाद्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते.
एखाद्याला स्वतःसाठी वस्तू खरेदी करायला आवडते..
एखाद्याला दुसऱ्यांसाठी वस्तू खरेदी करायला आवडते.
एखाद्याला गडकिल्ले फिरून त्यांचा अभ्यास करायला आवडते.
एखाद्याला फक्त गडकिल्ले फिरून फोटो काढायला आवडते.
एखाद्याला फक्त रिलसाठी फिरायला आवडते..
एखाद्याला जगाचा इतिहास किंवा तेथील निसर्गसौंदर्य रिल बनवून त्यात माहिती टाकून जगासमोर आणावी वाटते..
एखाद्याला नुसतंच मनसोक्त फिरणं आवडते..
एखाद्याला फक्त फोटोग्राफी करायला आवडते..
आता या वयात हे का ??
या वयात ते का?
या वयात असंच रहावं असा अट्टाहास का असतो??
अरे स्त्री असो वा पुरुष असो आपण मरेपर्यंत मरमर मरत कामं करत रहातो.आईवडील मुलांसाठी नातेवाईकांसाठी सगळं करत रहातो.मग जर आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टी केल्या तर फरक काय पडतो??
आपल्या शोभतील असे कपडे शोभतील अशी केशरचना केली टक्कल केलं काय फरक पडतो??
इतकं वय झालंय का आपलं?
इतके कमकुवत विचार करणारे आहोत का आपण???
खूप कमी लोक असतात आपल्याला प्रोत्साहन देणारे..
आपण आपल्या आवडी जपतो याला पैसा उडवणं म्हणत नाही.
माझा खाण्यापिण्याचा खर्च इतरांच्या मानाने कमी आहे.मी पाच दिवस न जेवता उपाशी राहून फक्त पाणी सटरफटर खाऊन खूप कामं करू शकते. मला वर्तमान जगायला आवडते.
जे आवडते तेच मी खाते न आवडणारी एकही गोष्ट मी उगाचच ताटात वाढून त्याचा नास करत नाही. .
आपण दुःखी असल्यावर सहानुभूती देणारे खूप असतात ते मनोमन मात्र खुश असतात.
आपण आपल्याला खुश ठेवण्यासाठी जे आवडेल ते करावे.
चांगले रहा, योग्य व्यायाम करायला आवडते तो करा फिटनेसकडे लक्ष द्या.आवडीची गाणी ऐका, चित्रपट बघा, पैसा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरावा.
चणे आहेत तर दात नाही असं होवू नये...
मला एक हेअर कट आवडला तो हेअर कट केला तर किती लोकांनी नावं ठेवली.तोंडं वाकडी केली.‌
बापरे..
नंगे पुंगे कपडे घालून मिरवण्यापेक्षा आवडलेला आणि शोभणारा हेअर कट कधीही चांगला.‌😅😂बरं ज्यांना अंगप्रदर्शन करायला आवडते त्यांनी ते पण करावं, खुशाल करावं, शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.😅
आम्ही पण Shorts,half प्यांटी घालतोय. आणि जोवर पोटावर अजून फोटोसाठी जिरवायची बारी आली नाही तोवर शोभतील असे कपडे घालून मिरवणार.‌
पण ट्रेक आला की तो मी नव्हेच...😂😍😅
तर एका हेअर कट वरून हे सुचलं.
हो मी उच्च शिक्षित असून एक होममेकर आहे.
मुलांवर चांगले संस्कार केलेत.
मी Trekking करते‌.
मी Traveler आहे.
मी ब्लॉगर आहे.
मी You Tuber आहे.
मी Photography करते,शिकते.
मी calligraphy शिकते.
मी बाईक राईड करते,शिकते.
मी कार चालवते, शिकते.
मी हार्मोनियम शिकते.जराशी वाजवते‌.😂😅
मी विनोदी लिहिते‌. 
फक्त मी रागीट आणि रोखठोक आहे त्यामुळे आपला मित्र मंडळ कमी आहे.
.
.
.
यात कोणालाही टोमणा नाही की कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. तुमची शपथ 💯🙏😅
.
.
.
Patil Jayuu 
४डिसेंबर २०२३

Tuesday 28 November 2023

रवळ्या जवळ्या ट्रेक

रवळ्या जवळ्या ट्रेक
ठिकाण-नासिक
चढाई श्रेणी -मध्यम कठीण
दिनांक २६नोव्हेंबर२०२३
डोंगरयात्रा ट्रेकग्रुप, पुणे
रवळ्यागड उंची -४३६९फूट
जवळ्या गडाची उंची -४०५५फूट
सप्टेंबर २०२३ च्या केदारनाथ ट्रेकयात्रेनंतर माझा ट्रेक झाला नाही मग मला जरा कोमात गेल्यासारखे वाटत होते.२६ नोव्हेंबर २०२३ ला डोंगरयात्रा ट्रेकग्रुप पुणे यांच्या सोबत नासिकमधील रवळ्या जवळ्या आडवाटेवरची भटकंती केली आणि मला कोमातून बाहेर आल्यासारखे वाटले.


नासिक मधील सातमाळा रांग
१.अचला 
२.अहिवंत 
३.सप्तशृंग
४. मार्कांड्या 
५. रवळ्या
६. जवळ्या
७.धोडप
८.कांचना
९.इंद्राई
१०.राजधेर
११. कोळधेर
१२.चांदवड
यालाच अजंठा सातमाळ रांग असेही म्हणतात.नासिकमधील अजंठा सातमाळ रांगेतील रवळ्या जवळ्या हे दोन उंच गड एकाच प्रशस्त पठारावर वसलेले आहेत.गुगलवर सापडलेली रवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४०५५ फूट इतकी आहे.तर जवळ्या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४३६९फूट इतकी आहे.गड तसे दुर्लक्षित आहेत. अजिबात गर्दी नसते.❣️परंतु लिडरच्या भाषेत म्हणायचं तर दर्दी ofbeat Trekers ना गर्दी नकोच असते.😊❣️

जवळ्याच्या गडमाथ्यावर तुटलेल्या अवस्थेत पायऱ्यांची वाट खडतर होती परंतु डोंगरयात्रा ( Dongaryatra Adventure Club) चे ट्रेकलिडर आणि त्या दिवसाचे ट्रेकगाईड Doctor भोजराज गायकवाड यांच्या सहाय्याने आणि ट्रेकर्सच्या सहायाने आम्ही बिनादोरानेच सर केली आणि गडमाथ्यावर पोहोचलो.


गडावर जाऊन सोबत नेलेले जेवण थेपला चटणी खाऊन गडमाथ्यावर एक फेरी टाकली. गडमाथ्यावर चार मोठी पाण्याची टाकी आहेत त्यातले पाणी पिण्यासाठी योग्य आणि स्वच्छ दिसले.


अखंड पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांचा तो सुंदर जिना चढताना उतरताना कोथळी गडाच्या पाषाणात कोरलेल्या जिन्याची आठवण येते.जिना चढताना उजव्या हाताला एक शिलालेख कोरलेला आहे.
उतरताना आम्ही जवळ्या गडाला फेरी मारून पठारावर उतरलो तेव्हा त्या बाजूला कोरीव खांब असलेली एक छोटी गुहा आढळून आली.
पठारावर फक्त कारवींच्या तीन घरांची तिवारी कुटुंबांची वस्ती. एक स्वच्छ पाण्याने भरलेले टाके आहे.मी त्या टाकीतील एक ओंजळ पाणी पिऊन घेतले कारण त्या नितळ पाण्याची चव आपल्या बिसलेरीच्या पाण्याला नसते.

दगडी रांजण, भग्नावस्थेत असलेली शंकराची पिंडी, नंदी आणि मंदिरांचे तुटलेल्या अवस्थेत दगड वगैरे आहेत.एका ठिकाणी एक ढासळलेली कबर आढळली. या ठिकाणी जेवणाची सोय नाही आपलं आपण जेवण बनवून खाऊ शकतो.

अगदीच इथे मुक्काम करायचा असेल तर पठारावरील या तीन घरामध्ये तीन चार माणसांची रहाण्याची सोय होते किंवा आपण आपला तंबू नेऊन तिथे राहू शकतो.


रवळ्या गडावर जाताना देखील तेथे रोप लावावा लागतो. सह्याद्रीतील फार एक्स्पर्ट ट्रेकर्स बिनादोरानेच जाऊ शकतात.

रवळ्या गडावर जाताना एक छोटा चिमणी क्लाइंब patch आहे त्याठिकाणी सर्वजण रोप न लावताच चढून गेले.सर्वांचे कौतुक.
गडावर दोन तीन पाण्याची टाकी आहेत परंतु त्यात शेवाळ होते ते पाणी पिण्यासाठी योग्य वाटले नाही. 
उन्हाळ्यात जाताना आपले पाणी छोटा चिरीमिरी खाऊ खजूर, गुळ चिक्की फळं,काकडी, लिंबू सरबत असं सोबत असावं.किंवा आपला साधा चपाती भाजीचा डबा जरूर न्यावा. रवळ्या गडावर सगळ्यांना जाता यावे यासाठी लिडरनी एका कठीण Rock patch होता तिथे रोप लावला होता त्यामुळे सर्वजण गडावर सुखरूप पोहोचले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते त्यामुळे पाणी कमी लागले.
शेवटी पावसाने आपली गंमत सुरू केल्याने आम्ही काही ट्रेकर्सच रवळ्या माथ्यावर पोहोचून अक्षरशः त्या रचलेल्या दगडांना शिवून धूम ठोकत पळतच उतरलो.
गडावर प्रचंड प्रमाणात टोचणार्या काट्यांची झुडपे होती.ते काटे घरी आलेत हातात टोचून.पुढे नासिक ते पुणे जवळपास २५०-५४ की. मी चा प्रवास करायचा होता.त्यामुळे ट्रेक संपल्यावर लगेचच की मुंबईकरांचा निरोप घेऊन पुणे कडे रवाना झालो.एका दिवसात सकाळी आठच्या सुमारास सुरू केलेला ट्रेक संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास संपला.रवळ्या जवळ्या असा जवळपास १६_१८कि.मी.चा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.
येताना नासिककडील प्रसिद्ध पाववडा खाण्यासाठी एक दुकानात वळालो पाचच्या सुमारास जो धुवाधार पाऊस लागला त्या पावसाने रात्रीच्या बारापर्यंत अक्षरशः झोडपून काढले.परंतु खूप दिवसांनी ट्रेकला शरीराचा धुर निघाल्याने मन प्रसन्न व प्रफुल्लीत झाले व भाऊ खुश झाला.💃✌️😍
धन्यवाद Team Dongaryatra / डोंगरयात्रा
Manoj Vitthal Bhaleghare
Ravindra Shrirang Shedge
Pune Mumbai Trekers... 
"बास झालं हे जगणं, असेच ट्रेक करताना आयुष्याची अचानक exit व्हावी..
कुणाला आपला त्रास नको. कुणाशी आपलं वैर नको.आपल्यावर कुणाचं कणभर जरी प्रेम असेल ते असंच अनंत रहावं आणि आपण कसलंही ओझं न ठेवता आपण हसत हसत विलिन व्हावं.‌..."

@jayuuPatil

28-11-2023

Friday 24 February 2023

"हिम्मत है तो आ गले लग जा"

"हिम्मत है तो आ गले लग जा" 

@जयू 

२३-०२-२०२३

मी व. पु. काळे यांचे एक वाक्य वाचले.माणसाच्या आयुष्यात अपार परिश्रमानंतर, सत्कर्माचं पुण्य पदरात घेवून,कुकर्माचे अनेक घणाघात सोसून येणारी शांत निद्रा म्हणजे म्रुत्यु होय. मृत्यूचे भय कधीही बाळगू नये. 

आपण म्रुत्युला का घाबरतो?जे घडायचे ते घडते.जन्म म्रुत्युचा फेरा असाच असतो. जर म्रुत्युला हसत शांतपणे सामोरे गेलो तरच नविन जन्म मिळेल.प्रत्येक नवीन गोष्टींसाठी आपण सदैव तयार असायला हवे परंतु त्याचबरोबर आपण आयुष्यात सतत सावध राहून नव्याचं स्वागत करायचं मग तो म्रुत्यु का असेना. चांगल्या गोष्टी, चांगल्या आठवणी, चांगल्या व्यक्ती, चांगल्या संधी जशा आपल्याला हव्या असतात,तसंच वाट्याला आलेल्या वाईट गोष्टी,संकटं,वाईट प्रसंग,व्यक्तीनुरूप वाईट वागणूक, द्वेष, हेवा,मत्सर,राग,चिड,फसवणूक,अबोला,कटू आठवणी या सगळ्याचं देखील आपण स्वागत करून त्यादेखील स्मरणात ठेवल्या तर आपण आयुष्यात सावध राहून पुढील आयुष्यात होणाऱ्या चुका टाळू शकतो. प्रत्येक वळणावर आपल्याला बरेच अनुभव येतात,बरंच काही सहन करावं लागतं ज्याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नसते असे प्रसंग आपल्या वाट्याला येतात.मग आपण सैरभैर होतो.सगळ्यांना नकळतपणे आपली मनातील गुपिते सांगत सुटतो. काही जण ते मनात ठेवतात.काही जण त्याचा फायदा घेऊन गैरवापर करतात,काहीजण गैरसमज करून घेतात,काहीजण आपल्यातली क्षमता ओळखून आपल्याला सोबत करतात,सपोर्ट करतात,काही आपला फायदा घेतात. आपण मग सैरभैर होऊन सगळ्यांचे ऐकत रहातो आणि मनाला पटेल पटेल तेही करत रहातो. मन आणि आपलं भवितव्य दुसऱ्यांच्या हवाली करून वाहवत जातो. त्यापेक्षा आपणच आयुष्यात सावध राहून आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून,सावध राहून रोज मेडीटेशन,योगा, परमेश्वराने नामस्मरण, सत्कर्म करणे, कोणाविषयीही वाईट बोलणे, वाईट करणे, कोणी आपले वाईट केले तरी त्यापासून दूर जाऊन त्याला माफ करणे,सतत सकारात्मक बोलणे,वागणे,सतत नवनवीन गोष्टी चांगल्या गोष्टी शिकणे, सातत्याने सकारात्मक विचार कृती करणे इतरांना प्रेरणा देणे हे रोजच्या जीवनात रोजच्या जेवणाप्रमाणे एकदा तरी केलं की सगळं निभावून जातं. आपल्याला मानवजन्म देणारा परमेश्वर सतत आपल्या सोबत असतो.त्यामुळे त्या देवावर  आणि स्वतःवर विश्वास ठेवला की आपोआप सकारात्मक गोष्टी घडतात.परमेश्वराने दिलेले आपले आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याच प्रमाणे ते क्षणभंगुरही आहे. आपण आज आहोत आणि उद्या नाही. हे नकारात्मक बोलणे नाही तर हे सत्य आहे. आयुष्यात पळवाट अवलंबता सत्याला सामोरे गेले की परमेश्वर आपली कायम सोबत करतो. पुढच्या क्षणाला आपले काय होईल? हे आपल्याला आत्ता या क्षणी सांगता येत नाही तरीही आपण खूप सारी स्वप्न उराशी घेऊन ती पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट करतो. मी स्वतःव विश्वास ठेवून माझी स्वप्न पूर्ण करायला खूप मेहनत घेते. मी खूप मेहनती, कष्टाळू, अतरंगी आहे. सतत सातत्य ठेवणारी मी आहे. माझे हातपाय मोडले, वाकडे झाले,कोणी मला बांधून जरी ठेवले तरीही मी घरात बसून इतर काहीतरी नवीन प्रेरणादायी गोष्टी करत रहाते, काही कारणाने मी तीनचार महिने घराबाहेर पडू शकत नव्हते, मला चालता येत नव्हते, पायावर उभे रहाता येत नव्हते तरीही मी त्यातून परमेश्वरकृपेने बाहेर पडून हळूहळू चालू लागले. घरबसल्या शांत राहणे, मेडिटेशन करणे, आरोग्य सांभाळणे, योगासने करणे, प्राणायाम करणे असं सगळं जमेल तसं चालू ठेवले. टाईमपास म्हणून कोरोनामध्ये चालू केलेले माझे you tube channel थोडे ऍक्टिव्ह केले अपार मेहनत घेऊन चॅनेलचे subscribers वाढवण्याचा प्रयत्न केला. 😅💃काही नवनवीन गोष्टी शिकले त्या प्रत्यक्ष भेटाल तेव्हा बघालच. बाईक शिकताना मी जोरदार आपटले तरीही फूटगियरवली गाडी शिकणारच हे एकदा मनाशी ठरवलं की गाडी आलीच म्हणून समजा. बुलेट, रॉयल एन्फिल्ड एका दमात चालवली आणि  जमली देखील.💃😍 आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. त्यात चांगले प्रसंग मनाला समाधान,आनंद देतात डोकं शांत ठेवतात आणि वाईट प्रसंग आयुष्यात खूप मोठा धडा शिकवतात. मी तर म्हणते आपण वाईट प्रसंगातूनच आपल्या आयुष्याच गणित सोडवायला शिकतो

आयुष्याची स्वप्न पूर्ण करताना आपण कधी वाहवत जातो, कधी फक्त स्वतःपुरता विचार करतो.  मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कधी आपल्याकडे पैसे असतात, कधी पैसे नसतात तर वेळ असते, कधी पैसाही असतो पण वेळ नसतो, कधी पैसे नसताट पण माणसे सोबत असतात, कधी आपण एकटे असतो, कधी माणसे आजूबाजूला असून आपण एकटे असतो. परंतु आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा जास्त चांगला आणि स्वतंत्र विचार करू शकतो. परंतु संसार असेल, मुलं असतील आणि आपली त्यांच्याशी मनापासून नाळ जोडलेली असेल तर आपल्याला एकटे रहाणे म्हणावे तेवढे सोपे नसते कारण खूप साऱ्या जाबदाऱ्या असतात. अनेक नाती असतात ती आपण दूर ठेवू शकतो परंतु मी जन्म दिलेली मुलं ही माझी जबादारी आहे. माझी स्वप्नं ही जबाबदारीपेक्षा  मोठी नाहीयेत हे स्वतःला समजवायला लागते.आयुष्यात जवाबदारी पार पाडता-पाडता माणूस स्वप्न पूर्ण करू शकतो. आयुष्यातील स्वप्न पूर्ण करता करता अनेक अडचणी येतात. आयुष्यात काहीही सहज मिळत नाही.सगळी नातीगोती, संसार,स्वतःची तब्बेत,सगळ्यांची मने,घरचे सगळे मॅनेजमेंट,विरोध हे सगळे पत्करून वेळ प्रसंगी सगळं काही काळ सोडून स्वप्नांच्या मागे धावावे लागते. आपल्याजवळ कधी पैसे असतात, कधी एखाददुसरी व्यक्ती सोबत असते, कधी सोबत प्रेम असते, कधी एखादा चकवा असतो,कधी नियतीच्या चक्रात अडकतो आपण. जेव्हा अडकतो तेव्हा मात्र आपण फक्त एकटे असतो. तेव्हा ना आईवडील, ना भाऊबहीण, ना मित्रमैत्रिणी कोणी नसते. कोणी आपल्यासोबत असतेच असे नाही. तेव्हा एकट्याने शांत राहून विचार केला, मन एकाग्र करून शांत डोक्याने विचार करून काही गोष्टींचा त्याग केला की आपले आपल्यालाच कळते आपण मानव जन्मात केलेल्या चुका ह्या इथे पृथ्वीवरच भोगाव्या लागतात. चुकीला माफी नाही चूक ही चूकच असते. जेव्हा आपण शंभरवेळा बरोबर असतो, योग्य असतो, समाजाच्या नियमांना धरून वागत असतो तेव्हा मात्र आपली कोणी पाठ थोपटायला येत नाही किंवा शाबासकी द्यायला येत नाही. पण एकदा का आपण चुका करू लागलो की आपल्याला खूप गोष्टींचा सामना एकट्याने करावा लागतो. मन खंबीर, एकाग्र, शांत राहून हे सर्व सहन करून, सकारात्मक विचार करून पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करतो. नव्याने आयुष्य सुरु करताना जुन्या चुका करण्याची स्वतःशी एकदा शपथ घेतली की आपले कोणीही वाकडे करू शकत नाही. सगळ्यांनी लाथाडले तरी स्वतःशी प्रामाणिक रहायचे आणि खरे  सत्याने वागायचे, तसेच आपले नॉर्मल आयुष्य जगणे चालू करायचे परंतु स्वप्नपूर्ती कधीच थांबवायची नाही. जर एकदादोनदा आपण गाडीवरून पडलो जोरदार मार लागला तरी पुन्हा गाडी शिकायचीच असे जेव्हा आपण स्वतःशी ठरवतो तसंच ठरवले तर आपण आपल्या आयुष्याची गाडी सकारात्मकतेने चालवू शकतो. हे सगळं करताना माणसाला प्रेम, माया, साथ, सोबत हवी असते.ती मिळते देखील परंतु ती कायम टिकेलच असे अज्जीबात नाही. आपण जन्माला आलोय एकटे, जाणार एकटे मग आपली स्वप्न पूर्ण करायला कोणाच्या सोबतीची अपेक्षा का करतो आपण? ज्यांना सोबत राहायचे ते कसेही सोबत रहातात.  ज्यांना सोबत सोडायला निमित्त हवे ते आपल्या आयुष्यातून पळवाट काढतात. दुसरे सोबती शोधतात. माझ्याशी जो मैत्री करतो आणि टिकवतो तोच जो मला पूर्णपणे ओळखतो. काही जण त्यांना वेळ दिला नाही म्हणून निघून जातात, काही जण आपल्याकडे फक्त पैसे असले तरच सोबत असतात. काही गैरसमज करून घेतात. काही जण आपल्याला समजून घेऊन  शांतपणे कायम आपल्या सोबत असतात. काही समोर असून बोलत नाहीत, काही दूर सातासमुद्रापलीकडे राहून सोबत करतात आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात आणि आयुष्यात खूप काही शिकवून जातात. आपण कोणाचे बोलणे, वागणे, चिडणे, फार मनावर घ्यायचे नाही. प्रत्येकाचे बोलणे, म्हणणे मनावर घेतले तर मला वेड लागेल. 😅हे वेड लागण्यापेक्षा मला माझ्या स्वप्नपूर्तीचे वेड लागलेले आवडेल.  त्यातच मी माझे आयुष्य पणाला लावेन. आयुष्य एकेकदा अशा खडतर वळणावर येऊन थांबते की पृथ्वी थांबल्यासारखी वाटते. ना आपण चालू शकत, ना कोणाशी बोलू शकत, ना कुठे बाहेर जाऊ शकत, ना ट्रेक करू शकत,ना लिहिणारे हात काही लिहू शकत. पण आपण शांत राहून मन एकाग्र करू शकतो, देवाचे नामस्मरण करू शकतो. कारण कोणी आपल्या सोबत नसले तरी परमेश्वर कायम आपल्या सोबत असतो, तोच जन्म देणारा, तोच अडचणी देणारा, तोच संकटे देणारा आणि तोच संकटातून बाहेर काढणारा. त्याचा धावा करायला मंदिरातच गेले पाहिजे असे काही नाही. फक्त शांत बसा आणि देवाचे नामस्मरण करा.  जर आपण खरे वागत असू, आपली कर्म चांगली असतील तर आपण अडकलेल्या चकव्यातून, चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तोच परमेश्वर मार्ग दाखवतो. फक्त आपण खऱ्याची कास धरली तरच आणि सत्याने वागलो तरच. देव एकदोन माणसे अशी देतो जी आपल्याला मार्ग दाखवतात. तो चांगला मार्ग अवलंबणे आपल्या मनावर असते. मन शांत एकाग्र असेल तर हे कार्य आपण सहज करू शकतो. मी वेड्या जातकुळीच्या माणसात मोडते. 😅😃 मी भटकंती करणारी व्यक्ती आहे. मला एका जागेवर बसून करमत नाही, जमत नाही. परंतु खूप शांत राहिले की आपोआप मन एकाग्र होते आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो. काय चूक, काय बरोबर हे आपल्याला कळायला लागते. परंतु म्हणून काय घडलेल्या घटना आपण पटकन विसरत नाही. या आधी मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्या सर्व मानवजातीचा बदल घेणारी मी या वर्षीपासून मला अनावधानाने दुखावलेल्या,मला त्रास दिलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना मी माफ करतेय. मन शांत असले की बदला, राग, द्वेष, मत्सर, हेवा असा विचारही मनात येत नाही. तो परमेश्वर मला आणि सर्वांना बघत असतो आणि सर्व न्याय करत असतो. प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कर्माची फळे तो आपल्याला इथे जमिनीवरच देतो. आपण आपलं कर्म चांगलं  ठेऊन त्या परमेश्वरावर विश्वास ठेवला तरच हे शक्य होते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला ते देव देव मंदिरात जाणे अजिबात आवडत नाही,पटत नाही. कारण देव हा चराचरात आणि त्याचे अस्तित्व मानणाऱ्याच्या मनामनात आहे. देव प्राणीमात्रात आहे,देव गरीबात आहे, देव श्रीमंतात आहे, देव ज्याला गरज आहे त्याच्या सदैव पाठीशी आहे.गेल्या काही महिन्यांत मला कुठे जाता येत नव्हते म्हणून मी जवळपासच्या काही मंदिरांना भेटी दिल्या. काहींच्या अंगी कला असते, व्यक्ती चांगली असते, सुंदर असते, परंतु प्रत्येकात काहीतरी दोषही असतातच. त्यामुळे पूर्णपणे निर्दोष, सर्वगुणसंपन्न व्यक्ती या पृथ्वीवर शोधत बसलो तर वेड लागेल. त्यापेक्षा आपण आपल्यालाच कणखर, तटस्थ,खंबीर बनवा, आपल्यात असा बदल घडवा की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत अशा तत्वावर चाललो तर आपण उत्तम आयुष्य जगू आणि इतरांचीही प्रेरणा बनू. आपण एखाद्यासाठी काही चांगली गोष्ट केली तर आपण ती बोलून दाखवू नये. चांगले करा आणि सोडून द्या. आपण कोणासाठी चांगले केले तर ते कुठून ना कुठून आपल्यापर्यंत पोहोचतेच. कधीतरी आपल्यासाठी कोणीतरी चांगले करते. आपण ज्यांना मित्र मानतो ते आपल्याला त्यांची सगळी गुपिते सांगतीलच अशी अपेक्षा आपण कधीच करू नये. जर एखादं गुपित किंवा एखादी गोष्ट त्याने आपल्याला सांगण्याचे काही कारण असू शकेल. मी तर आडपडदा ठेवता समोरच्याला सगळं मनातलं सांगून टाकते. अर्थात समोरच्यावर माझा विश्वास असेल आणि समोरचा त्या लायक असेल तरच. बरेचदा आपल्याला काही गोष्टी, काही व्यक्ती कायमच्या सोडाव्या लागतात. त्यामागे अनेक करणे असतात. त्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होऊ नये, कधी  त्या व्यक्तीला आपल्यापासून त्रास होऊ नये असेही असू शकते. कारण भविष्यात काय वाढलेले असेल हे आपल्याला माहित नाही. सगळ्यात प्रिय हवीहवीशी वाटणारी व्यक्ती आपल्याशी कालांतराने बोलेल किंवा नाही हे आपण आज सांगू शकत नाही. आपली लाडकी व्यक्ती आपल्याला पुन्हा दिसेल की नाही हेदेखील आपल्याला माहित नसते. म्हातारपणी हे करू ते करू असे सांगणारे अचानक बोलेनासे होतात आणि ज्यांची अपेक्षा देखील नसते ते आपली वेळोवेळी सोबत करतात सांगता आपली विचारपूस करतात. काही आपल्यावर मनापासून प्रेम करतात काही निरपेक्ष प्रेम करतात.

. पु. काळे म्हणतात की वासनेविना प्रेम असेल तर ते नशिबानेच मिळते.त्याची अनुभूती माणसाने एकदातरी घ्यावीच ही गोष्ट अगदी खरी आहे. पण म्हणून जिथे वासना असते तिथे प्रेम नसते असे बिलकुल नाही. प्रेमाच्या मैत्रीच्या व्याख्या प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलतात. मी म्हणते इतरांकडून कसलीही अपेक्षा करता माणसाने स्वतःवर प्रेम करावे स्वतःला वेळ द्यावा, स्वतःला घडवावे स्वतःची कला जोपासावी. एखादी गोष्ट आवडत असेल ती मनापासून करावी. आपल्याला आवडत असलेली गोष्ट इतरांना आवडेलच असे नाही. परंतु आपल्याला आवडते म्हणून आपण ती करावी. प्रत्येक वळणावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. काहींना आपण कमी वेळात ओळखायला लागतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो,जन्मोजन्माचे नाते असल्यासारखे वागतो परंतु समोरचा तसाच असेल असे काही नाही. समोरची व्यक्ती कामात व्यस्त असू शकते, कधी कामात व्यस्त असल्यासारखे भासवु शकते. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी असू शकतात. आपण उगाच मनात अनेक गैरसमज करून समोरच्या व्यक्तीचे मनातल्या मनात मूल्यमापन करतो. कशाला हा सर्व आटापिटा?? त्यापेक्षा कोणाकडून काही अपेक्षा ठेवता, कोणाचा कोणत्याही गोष्टीसाठी बदला घेण्याची भावना ठेवता निरपेक्षपणे जगलो की जगणे सहज आणि शांत होते. समोरच्या व्यक्तीला ओळखून, सतत सावध राहून आपण आपले आयुष्य साधेपणाने शांतपणे आपल्या मस्तीत व्यस्त राहणे मी पसंद करते. दुसरा व्यक्ती आपल्याला हे शिकवेल ते शिकवेल याची वाट पाहता आपले आपण रोज नवनवीन गोष्टी शिकत रहाणे मी पसंद करते. मला ही व्यक्ती आवडते म्हणून ती मला मिळालीच पाहिजे असा अट्टाहास नको . मृगजळाच्या मागे कधीही धावू नये. आपल्याजवळ जे आहे ते जपायला आपल्याला जमले पाहिजे. आपली कला वुद्धीगंत करायची असेल तर रोज मेहनत करू, रोज नवनवीन गोष्टी शिकू, रोज एक छोटे पण चांगले सकारात्मक काम करू, कोणालाही वाईट बोलता आपल्याला अनावधानाने कोणी दुखावले असेल कोणी आपले वाईट केले असेल तरीही कोणाचाही बदला घेता सर्व गोष्टी परमेश्वरावर, नियतीवर सोडून आपण आपले शांत समाधानी आयुष्य जगणे हेच सध्या मला समजते. कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करणे, कोणालाही विनाकारण नावे ठेवणे, सतत सकारात्मक विचार करणे हेच मी सध्या करते. आयुष्याची उलथापालथ झाली की ओहोटी आल्याप्रमाणे मन आणि डोकं शांत ठेवायला जमले की आयुष्यात पुन्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा गुन्हा करत नाही आणि येणाऱ्या मृत्युकडेदेखील आपण सकारात्मकतेने पाहू लागतो आणि हसतहसत मृत्यूलाही  म्हणतो,"हिम्मत है तो आ गले लग जा" 

-@जयु 

२३-०२-२०२३