Wednesday 28 August 2024

पेब किल्ला थरारक अनुभव

पेब किल्ला 
जिल्हा - रायगड 
उंची - २१०० फूट 
दिनांक २५ ऑगस्ट २०२४ 
ग्रुप-माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे 

पेब किल्ला हा रायगड जिल्ह्यात माथेरान डोंगररांगेत आहे. पेब किल्याला विकटगडदेखील म्हणतात. समुद्रसपाटीपासून  जवळपास २१०० फूट इतकी पेब गडाची उंची आहे. नेरळ रेल्वेस्टेशनला उतरून जिप्सीने माथेरानकडे जाता येते. जर धुके पाऊस नसेल आभाळ निरभ्र असेल तर पेब किल्ल्यावरून आजूबाजूचे चंदेरी, श्री मलंगगड, प्रबळगड असे बरेच गडकिल्ले दिसतात. गडावर राहण्याची सोय शिवाजी शिडी वाटेने गेलात तर त्या  गुहेत पन्नास ते शंभर माणसे राहू शकतात  परंतु जेवणाची सोय नाही. जेवण आपले आपण न्यावे लागते 
बापरे किती वर्षांनी ट्रेक लेख लिहितेय मी आठवत पण नाही. लेख कसा लिहायचा??? हे पण विसरले की काय? तर नाही विसरले. लिहिणे मी कधी हि विसरू शकत नाही. "अलंग मदन कुलंग ट्रेक"नंतर मी ट्रेकिंगचा सविस्तर असा ब्लॉग लिहिलाच नाही. हो, ४ वर्षे झाली असतील. हात दुखतो का दुखतो?? कसा दुखतो देवास ठाऊक. हात अजून बरा होतोच आहे तोवर पावले सुजायची पावले सुजायची कमी झाली मग काय तर गुढग्यात वात  येतो. कसला वात आणि कसलं  काय एकंदरीत काय तर ट्रेकला न जाण्याची नाटकं असतील हिची असे लोकांना वाटत असेल परंतु तसे अज्जीबात नाही बरे. खरे तर ट्रेक माझा आत्मा आहे मग मी मृत्यू शय्येवर असले आणि जर कोणी म्हटलं की "जयु ट्रेक लावलाय येतेस का" तर मी मृत्यू शय्येवरून तडक उठून ट्रेकला तयार असेन. लंगडा पाय लंगडा हात घेऊन मी असे कित्येक ट्रेक केलेत तेदेखील माझ्यासाठी कठीण असणारे . हिमालयात दोन्ही पाय नसलेले लोक जातानाचे व्हिडीओ मी पहाते आणि प्रेरणा घेते.मित्र हो, परमेश्वराने आपल्याला तर सर्व अवयव दिलेत ते फिट ठेवायचे असतील तर माझ्यासाठी ट्रेक हा भन्नाट पर्याय आहे. 

डिसेंबर २०२३ मध्ये चक्रम हायकर्स ट्रेकग्रुपसोबत २ दिवसांचा आंबिवली -पर्वत-चकदेव-महीमंडणगड-आंबिवली असा जवळपास ४५ किलोमीटर्सचा  रूट केला होता त्यानंतर २०२४ मध्ये एप्रिलमध्ये कोथळे भैरवगडमार्गे कारकाई ट्रेक केला. मग एका गुढग्यात वात येऊ लागला त्याने माझा आत्मविश्वास कमी झाला. काही वैद्य बोलू लागले मॅडम खूप झाले ट्रेक आता बंद करा. काही वैद्य म्हणाले काही नाही गुढगा बरा झाला की जावा ट्रेकला. मागच्या महिन्यात म्हणजे जुलैला पुन्हा तोच लंगडा गुडघा घेऊन चक्रेश्वर ते तासूबाई एका दिवसात जवळपास २२तें २५ किलोमीटरचा ट्रेक केला. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात एखादा मध्यम चढाईचा ट्रेक करावा आणि शांत रहावे  असा विचार केला होता." माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे" यांनी पेब किल्ला ट्रेक लावला होता. मी आतापर्यंत एकदाही पेब किल्ला ट्रेक केला नाही फक्त ऐकलं होतं की ट्रेक मध्यम चढाईचा आहे. म्हणून शेवटच्या ३ दिवस आधी जागा बुक केली. 
२५ ऑगस्ट रविवारी सकाळी निगडीहून निघालेली बस ट्रेकर्सना गोळा करत लोणावळ्याच्या दिशेने निघाली. सोबत  धुवाधार पाऊस होता. पाऊस असावा परंतु आमच्या ट्रेकमध्ये अडथळा नको येउदे रे महाराजा असे मी म्हणत होते  परंतु निसर्गापुढे आपले काहीही चालत नाही. नेमका बसचा वायपर बंद पडला आणि मुसळधार पावसामुळे ड्रायव्हरला काहीही दिसत नव्हते त्यामुळे वायपर दुरुस्तीसाठी आम्ही मनशक्ती केंद्राजवळ नाश्त्यासाठी थांबलो तोपर्यंत बसचालकाने फिटर बोलवून वायपर दुरुस्त केला. तब्बल दोन तास उशीर झाल्याने त्यानंतर मात्र बस कुठेही न थांबवता अंताक्षरी चालू ठेवली आणि आम्ही सकाळी साडेदहाच्या सुमारास नेरळला पोहोचलो. तेथून  ओमनीच्या सहाय्याने १५ मिनिटात माथेरान रोडवर पोहोचलो तेथून पेब किल्ल्याकडे जाण्यासाठी जवळपास ४-५ किलोमीटरचा रेल्वेरुळाच्या रस्त्यावरून वळसा घालून आम्ही मालडुंगे येथे पोहोचलो. हा रेल्वे रुळावरचा प्रवास इतका जादुई होता की इथून माझी पावले निघत नव्हती, 

पाऊस पडून गेला ते धबधबे वाहताना सुंदर मोत्याच्या धारांप्रमाणे भासत होते. धुक्याचे ढग हिरव्यागार डोंगरांवर चित्रात रंगवल्याप्रमाणे सफेद छटा काढताना भासत होते. सगळल्याचं मैत्रिणी माझ्यासाठी नवीन होत्या कारण २ वर्षांनी माऊंटन एज अँड ऍडव्हेंचर पुणे"सोबत ट्रेक ला आले होते. मी जमतील तसे व्हिडीओ फोटो माझ्या इन्स्टा ३६० मध्ये लॉक केले.बरेच ट्रेकर्स निसर्ग फोटोग्राफी करताना पाहून मला आनंद झाला शिवाय माझा दुसर्याने काढलेला एक तरी फोटो येणार याचा मनोमन आनंद दुसरे काहींनाही. 

रेल्वे आली असती तर अजून भारी विडिओ क्लिप मिळाली असती . रेल्वे रुळावरून चालण्याचा अनुभव भन्नाट होता. इथे थोड्याच अंतरावर चालत गेले की रेल्वे रुळावरून दिसणारा कड्याचा गणपती आहे. त्या ठिकाणी  माथेरान परिसर फिरणारी किंवा  फक्त कड्याच्या गणपतीकडे जाणारी मंडळी गर्दी करून उभी होती. कड्याच्या गणपतीकडे जायला घनदाट जंगलातुन जावे लागते शिवाय  छोटी वाट आहे परंतु  पाऊस असल्याने किमान पूर्ण कपडे घालणे आवश्यक आहे परंतु सहलीला आलेलं निम्मे लोक अध्या कपड्यातच होते. खंत वाटली. असो.

कड्याच्या गणपतीकडे जाणारी वाट इथून जाते. 
लीडर्सने ट्रेकविषयी आवश्यक सूचना केल्या आणि आम्ही पेब किल्ल्याकडे निघालो. आधी कड्याच्या गणपतीला भेट दिली नमस्कार केला एक बॅनर फोटो घेतला आणि पुन्हा थोडे माघारी येऊन पेब किल्याकडे प्रस्थान केले. पाऊस सतत सुरु होता. एका बाजूला दरी एका बाजूला डोंगर अशी ती छोटीशी घसरडी वाट होती. जपून चालले नाही तर डावीकडे थेट दरीत प्रस्थान होईल. लीडर्सने सूचना देऊनदेखील कित्येक ट्रेकर्सचे बूट ट्रेकबूट नव्हते. फुल बाहीचे टीशर्ट फुल ट्रॅकपँट न घसरणारे बूट ऊन पावसापासून संरक्षण म्हणून टोपी, रुमाल ,थंडी लागू नये म्हणून किमान वरचा रेनकोट किंवा थंडी लागणार नाही असे जाकीट सोबत हवेच. ट्रेक उन्हाळी असो किंवा पावसाळी असो एक दिवसाच्या ट्रेकला किमान २-३ लिटर पाणी हवे. एनर्जी म्हणून चिप्स, शेव, अशा चटपटीत पदार्थांऐवजी खजूर, गुळ, शेंगदाणा राजगिरा चिकी,खारे किंवा भाजलेले  शेंगदाणे,  सफरचंद, काकडी लिंबू सरबत हे कायम जवळ हवेच. कोणती वेळ कधी येईल सांगू शकत नाही. मध्यात पाणी मिळेल न मिळेल ज्यादाचे पाणी जवळ हवेच, पाणी बाटली ऐवजी ते डी कथेलान ला मिळते ते पाण्याचे ब्लॅडर असले तर उत्तमच. यामुळे घोट घोट पाणी पिता येते आणि आपले शरीर डिहायड्रेड होत नाही. बघा पटते का ते ?

कोरोना काळात मी काही आडवाटेवरचे ट्रेक केले त्यात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी शिकले त्या इथे सांगाव्या वाटतात म्हणून सांगते. पुढच्या ट्रेक ला त्या किती आत्मसात करायच्या त्या आपल्या आपण ठरवाव्या. आजूबाजूचे सुंदर निसर्ग नजरे कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत आम्ही एका शिडीजवळ पोहोचलो. या लोखंडी शिड्या भागाभागातून जरी आणून लावल्या असल्या तरी त्या लावताना त्यांना किती कठीण वाटले असेल. या शिड्या ज्यांनी लावल्या त्यांना मनापासून धन्यवाद . जिथे जिथे कठीण चढाई/उतराई आहे तिथे शिड्या असल्याने आपण ट्रेकर सहज जाऊ शकलो. त्या शिड्यावरील मधल्या काही पायऱ्या थोड्या सैल झाल्या आहेत त्यामुळे जपून आणि बसून गेले तर उत्तमच. एक शिडी पार केल्यावर पुन्हा वळसा घालून पुढे पेब माथ्याकडे आम्ही निघालो.चढाई मध्यम होती परंतु पाऊस सारखा पडतच असल्याने आम्ही चालतच राहिलो. 

एक मोठा शिडीटप्पा आम्हाला पार करायचा होता. लोखंडी शिड्या आणि त्यात काही शिड्यांचे स्क्रू ढिले झाल्याने पुन्हा जपून जायचे होते. जपून जायचे त्यात तो पाऊस म्हणतो मी. आणि मला हे सगळं माझ्या कॅमेऱ्यात कैद करायची हौस भारी.कोणतीही घाईगडबड न करता मी स्वतःला सुरक्षितपणे करून निर्सग आणि ट्रेकर्सच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपत असते. दुसऱ्याला मदत करायची म्हटली तरी आधी आपण एक स्टेबल पोज घ्यायची मग दुसऱ्याला हात द्यायला हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे. दुपारी दीडच्या सुमारास एल आकाराची मोठी शिडी पार केल्यावर पंधरा वीस मिनिटात आम्ही पेब माथ्यावरील शिडीजवळ पोहोचलो.
त्या शिडीवरून तोल जाऊन पडले कुणी तर जबर जखमी होऊन माणूस मारू शकतो. बेफिकीरपणा केला की अंगास येतो. असे अपघात इथे झालेत. परंतु आमचे ट्रेक लीडर यांचे एकदम  बारीक लक्ष असते. एकूण एक ट्रेकर ट्रेक पूर्ण करून घरी सुखरूप कसा पोहोचेल याची ते तंतोतंत पाहणी करून काळजी घेतात. शेवटच्या शिडीच्या पायऱ्या आणि बाजूला हात धरण्याचे बार देखील सैल झाले आहेत त्यात तो सोसाट्याचा वारा. टोपी कॅमेरा आणि मी उडून जात होतो. या ठिकाणी किरण मध्ये थांबून एकेकाला त्या शिडीवरून सावकाशपणे वर घेत होता.दुपारी दोन वाजता आम्ही पेब किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. 

इथे कमीत कमी जागेवर अधांतरी बांधलेले दत्तमंदिर म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतक्या वरती इतकं जड सामान नेऊन मंदिर बांधणे खूप कष्टाचे काम आहे. आपल्याला नुसते चालणे कठीण वाटते. मंदिरात दत्तमूर्तीला नमस्कार करून गडमाथ्यावर एक बॅनर फोटो घेऊन आम्ही लगेच उत्तरेला सुरुवात केली कारण आमचे जेवण गडाच्या पायथ्याशी ठाकरवाडी वस्तीवर होते. 
आमच्याजवळ थोडे पाणी आणि थोडा वरचा खाऊ होता तोच आम्ही अधून मधून खात होतो कारण भूक तर खूप लागली होती. आता थोडेसेच अंतर राहिले बरं का या आशेवर आम्ही उतरत होतो. चढाईपेक्षा पावसात उतरायची रिस्क जास्त असते. घसरडे दगड निमुळती वाट दगडगोट्यातून धबधबे पडतात की ज्या वाटेने पावसात फार कोणी जात नाही. पावसाचा जोर वाढला की या वाटा पाण्याने तुडुंब भरून धोधो वाहू लागतात त्यातून पावले टाकणे फारच जिकरीचे काम असते आणि आम्ही ते करीत होतो. गडमाथ्यावर २-३ वर्षांपूर्वी इथे अपघात झाल्याने मंदिराच्या एक टप्पा खाली तारेचे कुपन लावले आहे आम्ही त्या तारेच्या कुंपणाखालून बसून घुसून शिवाजी शिडीमार्गे आनंदवाडीकडे उतराई करू लागलो. तेथे काही ग्रुप होते. 
आमचा मोठा ग्रुप आणि लहानथोर वयाची मंडळी पाहून ते म्हणाले ही वाट कठीण आहे इथून जाऊ नका. परंतु आमच्या ट्रेकलिडरना  ती वाट माहित होती त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो आहे. खाली उतरताना पहिल्याच वाटेवर काहींना हात टेकल्याने मुंग्या चावल्याने बोटाना लाली आणि सूज आली. माणूस घाबरून जातो काय चावले असेल बरे ?? सोबत डॉक्टर आणि प्रथोमपचार बॉक्स असल्याने चिंतेचे कारण नव्हते.  इंजेक्टबल मेडिसिन सुद्धा होती. डॉ राजेंद्र यांनी लगेच मेडीसिन दिल्याने मुंगी दाह कमी झाला.घनदाट जंगल निमुळती वाट पोटात कावळे नाहीतर डोमकावळे ओरडत होते. वाटेत ट्रेकर्सने केलेले मार्किंग शोधावे लागे. आम्ही काही ट्रेकर्स पुढे होतो बरेचदा किरण एक टप्पा खाली जाऊन मार्किंग पाहून येई आणि लीडर्सना आणि मागच्यांना सांगत असे अरे, हीच वाट आहे. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या अती घसरडे तुटलेले वेडे वाकडे दगड काय ती बेक्कार वाट होती. आठवले तरी जीव घाबरतो. लढताना लढणारे कसे आले गेले असतील हा विचार खरोखर विचार करायला लावतो. 


पेब गडाला नुसते वळसे घालत आम्ही उतराई करत होतो. सुरपारंब्याचा  खेळ खेळत होतो जणू. आम्ही दिसतो का बघा बरे?? घसरून पडण्यापेक्षा अगदी लहानमुलांसारखे रांगत उतरत होतो आम्ही. दुपारी सव्वातीनच्या सुमारास आम्ही श्री. छत्रपती शिवाजी शिडीजवळ आलो. खाली तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी जुनी लोखंडी शिडी होती परंतु खाली दरी आणि वरून धोधो पाऊस असल्याने सगळ्यांना सुरक्षित खाली जाण्यासाठी लीडरने सोबत आणलेला  मोठा रोप आजूबाजूच्या झाडांना  घट्ट रोवून एकेक ट्रेकर्सला सुरक्षितरित्या खाली सोडीत होते. शिडी उतरताना उलटा  वॉटरफॉल डोळ्यावर फटकारे मारत होता आणि म्हणत होता, "भर पावसात कोणी तुम्हाला या कठीण वाटेने येण्याचा सल्ला दिला ?आम्हाला बाबा थ्रिल हवे होते म्हणून आम्ही या वाटेने आलोय. "या ठिकाणी थांबल्यावर थोडे सरबत थोडे पाणी पिऊन थोडा सुका मेवा खाऊन घेतला. घोट घोट सरबत पित असताना कुणीतरी मैत्रीण म्हणाली तयारी बघा हिची. हो एक दिवसाच्या ट्रेकला जेवणाची सोय जरी असली तरीही गरजेचा खाऊ पाणी सरबत हे जास्तीचे आपल्याजवळ असावे खूप उपयोगी पडते.  

तीन ट्रेकर्स गेल्यावर मी शिडी उतरले कारण इथले विडिओ तर केलेच पाहीजेत.छानपैकी शिडीवाट कॅमेऱ्यात कैद केली आणि मी ती शिडी उतरले. ३ ट्रेकर्सच्या नंतर मी चौथा ट्रेकर आम्ही खाली असलेली अतिघसरडी वाट एकमेकांच्या मदतीने सावकाशपणे पार करून पेब किल्ल्याच्या मुख्य गुहेजवळ  पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफेसोबतच्या भल्यामोठ्या पुतळ्याला मुजरा करून आम्ही गुहेत पोहोचलो. खूप भिजल्याने थंडी भरली होती. गुहा प्रचंड मोठी आणि कोरडी होती. शंभर लोक आराम करू शकतील इतकी मोठी गुहा इथे आहे. आतमध्ये स्वामी समर्थांची प्रतिमा रेखाटली आहे. 



गुहेत गेल्यावर थंडी उडाली. स्मिता मॅडमकडे बराच चखणा खाऊ होता. मी शक्यतो ट्रेक दरम्यान तेलकट खायचा टाळते. परंतु भूकच इतकी लागली होती की चिप्स,भुजिया एक सफरचंद होता ते सगळं आम्ही वाटून खाल्लं. सर्व ट्रेकर्स शिडी उतरल्यावर आम्ही गुहेजवळून निघालो आणि कारवीच्या जंगलात शिरून चालू लागलो. चालत राहिलो चालत राहिलो आणि एका तासात साडेचार वाजता एका मोठ्या रॉक पॅच जवळ येऊन थांबलो. इथे थांबलो असता स्मिता म्हणाली जयू बस झाले फोटो चला पटापट अंधार होईल आता.  रॉक पॅच आला म्हणून थांबलो होतो आपण. लीडर्सने रॉक पॅच उतरण्यासाठी पुन्हा रोप बांधला आणि एकेका  ट्रेकरला सुरक्षितरित्या रॉक पॅच पार करवला. या ठिकाणी थंडी भरलेली एक भुभू होती तीला बिस्कीट दिलं की तिची थंडी उडाली आणि ती शेवटपर्यंत आमच्या सोबत होती. चालताना पायात मध्ये मध्ये येतात हे भुभू परंतु वेळ प्रसंगी आपली सोबत देखील करतात.
इथे लाईन लावून आम्ही बसलो होतो तोपर्यंत माझी मात्र बसल्याबसल्या फोटोग्राफी सुरु होती. जर धुके नसते तर आजूबाजूच्या दऱ्या स्पष्ट दिसल्या असत्या आणि माझा इन्स्टा ३६० शांत झाला असता. २९ जणांना तोच मोठा रॉकपॅच पार करायला जवळपास दीड तास लागला. आता मात्र पोटाला आग लागली होती. सहाच्या सुमारास खाली उतरणाऱ्या दोन वाट दिसल्या. यातली कोणती वाट असेल असा आम्ही अंदाज लावत होतो. मी आणि अजून काहींनी अंदाजे ओळखलेली वाट अचूक होती परंतु कसली बिकट वाट होती ती. माझा वात येणारा गुडघा आता जागा झाला. जणू काय मला म्हणू लागला.,"सोपा ट्रेक सांगून आणलेस मला आणि सकाळपासून लै दमवलास आता तुला बघतो मी " ती रडू आणणारी वाट इतकी बेक्कार होती आणि आम्ही इतके थकलेलो, इतके भुकेलेलो होतो की कोणाला बोलावे ?? कळेना झाले होते. मी चालू शकत नाही  सगळेच थकलेले, कोणी नवीन, पहिल्यांदाच ट्रेकला आलेले, प्रत्येकजण हिरमुसलेल्या होता. माझे पाय तर एखादा बेवडा चालवा तसे ते एकमेकात गुंतत होते. किरण मी आर्याची मम्मी, पोलिस अश्विनी मॅडम आणि त्यांचे सहकारी मित्र गोरे सर असे आम्ही पुढे होतो.  किरण मार्किंग बघत बघत चाले आणि किरण म्हणे," चला या रे " अशा वेळी किरणला एखादी त्याची कविता ऐकवायला सांगायला मला सुचले नाही . कारण नुसते चालण्यापेक्षा फोटो काढले काहीतरी वेगळी चबरचबर केली, गमती काढत चालत राहिलो की थकवा कमी जाणवतो. एक तासात मोबाईल कॅमेरा काढायची आठवणदेखील मला राहिली नाही.किंबहुना मी आवर्जून मोबाईल बाहेर काढला नाही कारण दुपारी चारच्या आत पोहोचणार म्हंटल्यावर मी माझा हेड टॉर्च बसमध्ये ठेवण्याचा मूर्खपणा केला होता त्यामुळे अंधार झाला तर त्या घनदाट जंगलात मोबाईल फ्लॅशलाईट उपयोगात येईल. एका तासात आम्ही एका ओढ्याजवळ पोहोचलो आणि वाटेवरच एक छोटी दरड कोसळलेली होती त्यामुळे वाट दिसेना गड्या वाट दिसेना. मंदारसर मागून आलेच. 
कोरोना काळात डोंगरयात्रा सोबत आडवाटेवरची भटकंती सुरू केली. मग दोन दिवसीय मोठा म्हणण्यापेक्षा गर्दी नसलेल्या ठिकाणी जायची सवय लागली.त्यामुळे mountain edge Pune सोबत काही वर्षांत कमी ट्रेक झाले म्हणून काय कोणी माहेराला विसरते का?? तर अजिबात नाही.मी हल्ली हल्ली आमचा तुषार भाऊ अनुभवी ट्रेकर आहे त्यांचेसोबाबत  काही ऑफबीट ट्रेक केलेत  त्यामुळे  कुठून वाट असू शकते याचा थोडासा अंदाज येतो. किरण ओढ्यात जाऊन बघ ही वाट असू शकते बघ. आणि देवाची करणी आणि नारळात पाणी तसेच आम्हाला वाटेचे मार्किंग सापडले आणि जीव भांड्यात पडला. मागचे सगळे आले आणि आम्ही ओढा क्रॉस करून पुढे गेलो आणि एका झाडाजवळ थांबलो. 


संध्याकाळचे सात वाजले होते. आता मात्र आमच्यात आपसात थोडेही अंतर पडले तर वाट चुकायची दाट शक्यता होती. सगळॆ एकत्र आले आणि चालू लागलो. मंदारसर अजून किती आहे ओ ???आता मात्र होती नव्हती तेवढी ताकद हिम्मत संपायला आली होती. परंतु एकजण म्हणेल तर शप्पथ. एका ठिकाणी थोडा उजेड दिसला आणि असं वाटलं जंगल संपलं असं वाटलं आणि आम्ही रिलॅक्स झालो आणि गवतावर घसरून धपाधप पडलो. सकाळपासून न घेतलेला सुसुचा हॉल्ट सगळ्यांनी घेतला आणि पुन्हा बेवड्याची चाल चालत राहिलो. जंगलातून बाहेर पडलो जंगल संपले असे वाटले की पुन्हा ते जंगल यायचे पुन्हा आम्ही चालायचो. आता मात्र किर्रर्र अंधार पडला होता. सगळ्यांचे मोबाइल फ्लॅशलाईट, हेड टॉर्च टॉर्च बाहेर निघाले. परंतु तरीही अति थकव्यामुळे आणि भुकेमुळे धपाधप घसरत होतो आणि पडत होतो. डि. पी. सरांकडे हेड टोर्च होता तो मला फार उपयोगी पडला मनापासून धन्यवाद सर. रात्रीच्या  साडेआठ वाजताच्या सुमारास आमच्या लाईटचा उजेड पाहून पायथ्याच्या गावातील अनोळखी तीनचार पोरं माणुसकीखातर मोठ्या बॅटऱ्या घेऊन आम्हाला घ्याल आली.  शेवटचा  अर्धा तास कसा उतरलो आमचा आम्हाला ठाऊक. गावातल्या लाईट दिसत होत्या आणि आमची चिखलमय वाट संपत नव्हती. माय आठवली. रात्री नऊच्या सुमारास आम्ही आनंदवाडीत आम्ही उतरलो पुन्हा एक ते दीड किलोमीटर चालून फणसवाडीत पोहोचलो. दुपारचे २ वाजताचे जेवण आम्ही रात्री ९-१० दरम्यान जेवलो. बिचारे दुपारपासून जेवण बनवून आमची आतुरतेने वाट पहात होते. आम्ही जवळ आलोय हे समजल्लेयावर अंगणात टेबल खुर्च्या टाकून पटापट जेवण वाढले आम्पही काही जणांनी घरात बसून जेवण केले.गुलाबजामून दोन भाज्या चपाती तांदळाची भाकरी पापड वरण भात अशी संपूर्ण थाळी पाहून पोट भरलं. अन्नदाता सुखी भव.
आम्ही आमचे ओले कपडे बदलले आणि बसमध्ये बसून पुणेकडे रवाना झालो. रात्री २ वाजता घरी पोहोचलो. मध्यम म्हणता म्हणता असा अतिकठीण घडलेला ट्रेक अनुभवला. ट्रेकमध्ये सहभागी झालेले डॉक्टर्स, पोलीस,लहानथोर मंडळींचं कौतुक करावे तेवढे कमी आहे . किरण खूप मेहनत घेतलीस असाच सुरक्षितपणे सह्याद्रीत भटकत रहा. मी फोटो काढायचे बंद केलेत म्हणणारे सगळ्यात जास्त पोज देत होते हाहाहाहा ही गोष्ट गंमतीची आहे परंतु महत्वाची देखील आहे. फोटोच्या  नादात पाय घसरून तोल जाऊन जीव जाऊ शकतो तर स्वतःला आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेऊन निसर्गाचा आनंद लूटा आणि निसर्ग कॅमेऱ्यात कैद करा. सर्व ट्रेकर्सना कळकळीची विनंती आहे कोणत्याही ट्रेकला साधा समजू नका,  ट्रेकच्या पूर्ण तयारीतच ट्रेकला जावा. 
पेब ट्रेक दरम्यान डॉ काशिद झोपे सर, दिक्षित सर, शिल्पा, जय, मीनल, कस्तुरी गोरे सर, रोहिणी मॅडम आणि सर्वांनीच  उत्तम फोटोग्राफी केलीये. डॉ. काशिद सर आणि कस्तुरी यांनी अप्रतिम लिहिले आहे. खरंच कमी शब्दात सुंदर वर्णन केलय. मला खूप आवडले. ओळखी झाल्या नाही त्यामुळे मला सगळ्यांची नावे ठाऊक नाहीत. ग्रेट मंदार सर आणि राणे सर ट्रेक कितीही मोठा असो दमवणारा असो आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून ट्रेकसाठी येतो आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवता. मनापासून धन्यवाद आणि साक्षात दंडवत. आम्ही ट्रेक पूर्ण करू शकत नाही असा चकार शब्द एकही ट्रेकरने काढला नाही. एकमेकांना सहकार्य केले आणि कोणालाही मोठी दुखापत न होता सुरक्षिरित्या आपण घरी पोहोचलो. हा ट्रेक सोनेरी क्षण म्हणून आठवणीत राहील असा जवळपास चौदा ते सोळा किलोमीटरचा भन्नाट ट्रेक होता. गर्ल Gang संख्या वाखाणण्याजोगी होती. Girls and Boys Guys Keep Trekking. मी कुठेही गेले तरीMountain Edge माझ्यासाठी माहेरघर आहे.  
Mountain Edge Pune,Maharashtra, India.
गर्ल पॉवर 



No comments:

Post a Comment