आजोबा पर्वत ट्रेक
ठिकाण ठाणे जिल्हा
चढाई मध्यम श्रेणी
दिनांक 13 डिसेंबर 2025
ट्रेक टीम Mountain edge Trek group
आजोबा पर्वत Trek Mountain edge आणि adventure pune यांच्या सोबत...🚩
शनिवारी रात्री दहा च्या सुमारास निघालेलो आम्ही पहाटे साडेपाच च्या सुमारास डेहेणे गावात पोहोचलो. त्याठिकाणी बाळकृष्ण दादा यांच्या घरी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आम्ही गेल्या गेल्या त्यांच्या वठाणात म्हणजे घराच्या मधल्या दालनात आम्हाला सतरंज्या अंथरूण ठेवल्या होत्या. काही जणांनी वामकुक्षी घेतली. काही जणांनी तर वाघाची डरकाळी फोडली. 😂😂 आम्ही फक्त विस मिनिटे पाठ सरळ केली. ब्रश करून लगेच आवरून तयार झालो.चहा नास्ता तयार झाला. थोडं खाऊन लगेच बसमध्ये बसलो. कारण ट्रेकच्या सुरूवातीच्या जागेपर्यंत बस जाते.तिथून पुढे कच्चा रस्ता आहे. या ठिकाणी एक ग्रुप फोटो घेवून ट्रेक सुरु झाला. कोवळ्या उन्हात शांततेत हसत हसत सगळे जण फोटो काढत काढत निघालो होतो.तीन किलो मीटरची पायपीट करून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आम्ही पोहोचलो. जाताना सोबत उगवता सूर्य शांत, स्वच्छ, सुंदर वातावरण होते. आकाश निरभ्र असल्याने डावीकडे अलंग मदन आणि कुलंगची डोंगररांग तसेच रतनगड कळसूबाई रांग साद घालत होती. माझ्या ट्रेक न केलेल्या मैत्रीणी आणि मी पहिल्यांदाच सह्याद्रीत सोबत ट्रेक करीत होतो. माझ्या मनात ट्रेक पूर्ण होईपर्यंत धाकधूक होती की यातल्या एकीने जरी ट्रेक पूर्ण नाही केला तर मला वाईट वाटेल. त्यामुळे मी मुद्दामच सुरूवातीच्या टप्प्यात कोणाच्याही सोबत राहिले नाही. जसा ज्याचा वेग तसं चालत राहिलो. अधेमधे सोबत होतोच.बरेचसे नविन ट्रेकर्स होते. माझ्या पायाची शिर जणू फाटली होती इतकी वेदना मला होत होती. माझ्या मनात एकच विचार होता नैसर्गिक रित्या त्या नसा ताणल्या गेल्या की वेदना वाढून दुखणं पुर्ण बरे होते.
ट्रेक सुरु केल्यावर साधारण दिड तासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचलो येथील वातावरण अतिशय शांत आणि मनाला समाधान देणारे होते. घनदाट जंगल आणि उंच उंच झाडे यामुळे आश्रमात सावली होती. सितामाई न्हाणीघराकडे लवकुश पाळण्याकडे असे सुचना फलक नजरेस पडले. रामायण महाभारतातील प्रसंग आपण पुस्तकात वाचले आणि दुरदर्शनवर आपण हे प्रसंग मालिकांमध्ये पाहिलेत परंतु प्रत्यक्षात सितामाता या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होत्या अशी आख्यायिका आहे.सितामाता यांचा पादस्पर्श झालेल्या जागी आपण आलोय यात खूप मोठे समाधान आहे. वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली ते स्थळ येथे आहे. मदीराच्या आवारात विरगळी आहेत. थोडा वेळ थांबून आम्ही आजोबा पर्वत च्या वरच्या बाजूला निघालो. पायवाट होती पण ती कशी? तर जिथून धबधबा पडतो तशी दगडधोंड्यांची वाट. खडा चढ होता आणि माझ्या पायाच्या वेदनेने मी अक्षरशः रेटत रेटत तो पाय ओढत तो खडा चढ चढत होते. अधे मधे माझ्या मैत्रिणींच्याकडे माझं लक्ष होतेच.
आजोबा पर्वत हे महाराष्ट्रातील माझ्या माहेरच्या ठाणे जिल्ह्यात, शहापूरजवळ बालाघाट रांगेत असलेले एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे, जे लव-कुशचे जन्मस्थान मानले जाते, याठिकाणी सीतेने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत. या ठिकाणी वाल्मिकी ऋषी यांचे वास्तव्य होते. येथे वाल्मिकी आश्रम देखील आहे.त्यामुळे या गडाला आजोबा पर्वत असे म्हणतात अशी आख्यायिका आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असून, याच्या ३००० फुटांच्या उंच भिंतीमुळे तो साहसी गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहे आणि येथे लव-कुशच्या पादुका असलेली गुहा व पाण्याचे टाके आहेत, ज्यामुळे याला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.











