Monday 23 January 2017

"कळसूबाई शिखर" ट्रेक

कळसुबाई शिखर ट्रेक
दिनांक - २१-२२ जानेवारी २०१७
ठिकाण - अहमदनगर जिल्हा
उंची- ५४०० फूट
चढाई श्रेणी कठीण


कळसुबाईचे शिखरहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखराची उंची ५४०० फूट म्हणजेच एक हजार १६०० मीटर. सह्याद्रीच्यां रांगेत पाचहजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर तर दुस-या क्रमांकावर ‘साल्हेरवर असलेले ‘परशुराम मंदिराचे शिखर (१५६७ मीटर) आहे त्यानंतर ‘घनचक्करच्या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. कळसुबाई शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ किलोमीटरवर असलेल्या बारी गावापासून सुरू होतो. कळसुबाई पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे असे ऐकले आहे.
कळसूबाईच्या पायथ्याशी असलेले बारी हे गाव महादेव कोळी या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासूनच  कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी अख्याइका सांगितली जाते की कळसुबाई ही तेथील गावातील सून होती.  तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतीचे ज्ञान होते. त्यामुळे ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने कळसूबाईच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.

शिखरावर कळसुबाईचे मंदिर आहे. त्याचा आकार एकावेळी तीन व्यक्तीे मावतील एवढा छोटा आहे. शिखरावर मंदिराशेजारी खडकात रोवलेला त्रिशुळ आणि शेजारी खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा दिसतात. मंदिरात स्थाुनिक पुजा-याकडून दर मंगळवार-गुरुवार पूजा केली जाते. नवरात्रीत शिखरावर उत्सव साजरा केला जातो. उत्सवकाळात देवीच्या मूर्तीची सजावट केली जाते. या शिखराविषयीची अजून एक दंतकथा प्रचलित आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. काही दंतकथांमध्ये कळसूने शिखरावर देहत्याग केला त्यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्यात आले असा उल्लेख आढळतो. त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्या दृश्याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असे म्हटले. 
याच भागात कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य आहे. तेथे बिबट्या, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू, रानमांजर, चिंकारा, तरस असे अनेक प्राणी आढळतात. सोबत मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरूड, धोबी, शिंपी, खाटीक, सुगरणी, बगळे, करकोचे, रंगीत करकोचे, खंड्या, बंड्या. स्थानिक आणि स्थलांतरित असे शंभर प्रकारचे पक्षीही पाहण्यासस मिळतात. नोव्हेंबर ते मे हा तेथे फिरायला जाण्याचा योग्य काळ आहे.
दिनांक २१आणि २२ जानेवारी २०१७ या वर्षातील "फोना" चा पहिला ट्रेक आणि तसा ट्रेकिंग च्या मोजणीनुसार "फोना" ग्रुप चा ७१ वा ट्रेक होता. दोन वर्षांपूर्वी कळसुबाई शिखर हा ट्रेक मी केला होता तरीही दुसऱ्यांदा शिखर सर करण्याचा उत्साह तेवढाच होता. २१ जानेवारीच्या शनिवारी रात्रीचा प्रवास असल्याने आमची बस शनिवारी रात्री ११ वाजता पुणे-चाकण-संगमनेर-अकोले-राजूर मार्गे बारी गावाकडे निघाली आणि पहाटे ५ वाजता बारी गावात आम्ही पोहोचलो. बस मध्ये जी काही आम्ही हलतडुलत झोप घेतली असेल तेवढीच.बारी गावातील बायका आम्ही पोहोचलो तेव्हापासूनच एवढ्या थंडीमध्ये सुद्धा पहाटे बोअरवेलचे  पाणी भरताना दिसल्या. अजून अंधार असल्याने आकाशात सुंदर चांदणे पाहावयास मिळाले.  तिथे पोहोचल्यावर लगेच फ्रेश होऊन चहा नास्ता करून सकाळी ७ वाजता ट्रेक ला सुरुवात केली. प्रदूषणविरहित वातावरण आणि अजूनही थंडी आहे त्यामुळे वातावरण अल्हाददायक आणि प्रसन्न होते. बारी गावातूनच चढाईची वाट आहे. चढाई  करताना सुरुवातीलाच सुंदर अशी भात शेती दिसते.तेथील शेतकरी बैल घेऊन सकाळीच शेतात जाताना दिसत होते. एक शेतकरींण  बाई शेतात शेणाच्या छोट्या छोट्या गोवऱ्या थापताना दिसली. मला स्वतःला हे वातावरण कायम माझ्या माहेरची आठवण करून देते त्यामुळे मी खेडेगावच्या कायम प्रेमात असते.  

चढाईला सुरुवात केली आणि चालत चालत सुंदर असा सूर्योदय मला टिपता आला.
काही वर्षांपूर्वी काही ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत त्या ज्यांनी लावल्या त्यांना सलाम. कारण इतक्या उंचावर नुसते चालणे देखील खूप अवघड आहे तिथे या वजनदार शिड्या नेऊन लावणे हिची खूप कौतुकाची गोष्ट आहे. परंतु त्यामुळे आता चढाई करणे थोडे सोपे होतेय. जसजसे शिखर सर करत होतो तसतस उत्साह वाढतच होता. आणि खाली वळून पहिले की शिखराच्या पायथ्याचे गाव आणि भातशेती आणि समोरच्या डोंगर रांगा अतिशय सुंदर भासत होत्या. शिवाय ट्रेकर्सच्या देखील रांगा छान दिसत होत्या. सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी डोंगरांच्या कधी गडद तर कधी फिक्या छटा दिसत होत्या. आम्ही आपले फोटोग्राफी करत निसर्गाचा आनंद घेत त्या प्रदूषण विरहित वातावरणात रमून गेलो होतो. 



शिखरमाथ्यावर पोचायला साधारण तीन तास पुरतात. थेट शेवटच्या टप्प्यात विहीर आहे प्यायचे पाणी फक्त तिथेच मिळते. इतक्या उंच ह्या विहिरीत पाणी येते कुठून याचे आश्चर्य वाटते. "देवाची करणी आणि नारळात पाणी दुसरे काय." ती विहिर फक्त ७-८ फूट खोल असेल तरीही त्यातले पाणी आटत नाही हे नवलच.  शिखरावर २-३ ठिकाणी लिंबू सरबत विकणारे आणि तिथे नास्ता जेवण बनवून विकणारे तिथले लोक ह्याच विहिरीचे पाणी वापरतात शिवाय ट्रेकर्स आणि इतर कळसुबाई मंदिरात जाणारे लोक देखील या विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. आम्हाला सुद्धा त्या विहिरीतून पाणी काढण्याचा मोह आवरला नाही. 
त्याच्याही आधी अनेक लोक ट्रेकच्या निमित्ताने किंवा कळसुबाई देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने शिखरावर जात तो प्रवास किती कठीण होताकिती कसरत करावी लागत असेल याची कल्पना येते शिड्यांच्या पायऱ्या काहीशा अरुंद असल्याने गर्दी न करता त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्या व उतराव्या लागतात. वाटेत आंबाकरवंद आणि जांभूळ यांची अनेक झाडे लागतात. आता आंबा करवंदांचा ऋतू नसल्याने आम्हाला त्याचा आस्वाद घेता आला नाही एवढेच अवघड ठिकाणी किंवा वळणावर रेलिंगतर काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चढाई अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत होते.



शिखराच्या मधल्या भागात माकडे आहेत त्यांच्यासमोर खाऊ काढला तर ती माकडे आपल्या बॅगा ओढून घ्यायला कमी करत नाहीत त्यामुळे तिथे जपूनच जावे लागते. कधीकधी रिकामी बॅग सुद्धा ओढतात त्यामुळे जाणाऱ्यांनी जरा सावधगिरीनेच जावे. याच टप्प्यामध्ये प्लास्टिक च्या बाटल्या आणि प्लास्टिक चा कचरा खूप आढळला अश्या अवघड ठिकाणी कचरा होता की तो  सहज उचलणे शक्य नव्हते. त्यापेक्षा प्रत्येक ट्रेकर्सने आणि प्रत्येक पर्यटकाने ठरवले की कोणत्याही गडावर किव्वा कुठेही असा न विरघळणारा कचरा फेकूच नये तर सह्याद्री अतिशय स्वच्छ आणि सुंदर राहील. 

अगदी शेवटचा टप्पा पार करताना थोडा कंटाळा आला होता परंतु तिथे शिखरावर पोहोचलो आणि सगळा शीणच निघून गेला.
कळसूबाईच्या मंदिराचे जाऊन देवीचे दर्शन घेतले. आजूबाजूचा अतिशय सुंदर असा नजारा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतला. एका बाजूला घाटघर धरणाचे दूरवर पसरलेले पाणी आणि एका बाजूला अलंग, मदन, कुलंग ची रांग, एका बाजूला दूर हरिश्चंद्रगड. तर एका बाजूला अंजनेरी, आजोबा,कात्राबाई हरिहरची रांग पुसटशी दिसत होती. काय काय डोळ्यात साठवून घ्यावे ते सुचत नव्हते.  कळसुबाई शिखराचा माथा म्हणजे एक मोठा खडक आहे त्यावर ते मंदिर बांधले आहे. तिथे एक लोखंडी साखळी आहे मनात एक इच्छा धरून ती साखळी जर आपण एका दमात खेचली तर म्हणे मनातली इच्छा पूर्ण होते असा समज आहे.  आमच्यातल्या काही ट्रेकर्स नी ती हौस देखील पूर्ण केली. 



शिखरावर खडकाच्या कडेला लोखंडी कुंपण केले आहे त्यामुळे फोटोग्राफी करताना आणि तिथे फिरताना थोडा आधार मिळतो परंतु तरीही सावधगिरी बाळगलेली चांगली असते. शिखरावर गेल्यावर अतिशय थंड वारा मनाला सुखवीत होता. डावीकडे बघू की उजवीकडे बघू असे झाले होते. चारीबाजूने डोंगर दर्या साद घालत होते. परंतु वाऱ्याचा जोर इतका होता की उडून जाऊ की काय अशी भीती देखील वाटत होती. आम्ही ट्रेकर्सना शिखर गाठायला दोन ते अडीच तास लागले

मनसोक्त फोटोग्राफी करून तिथून दिसणाऱ्या गडांवर जाण्याची इच्छा मनात घेऊन थोड्याच वेळात आम्ही परतीच्या वाटेल निघालो आणि आम्ही एक टप्पा खाली येऊन जिथे विहीर होती तिथे भजी बनवणाऱ्याच्या टपरीत थांबून जेवणाचे डबे आणले होते ते काढून जेवण संपवले आणि अर्धा तास विश्रांती घेऊन लगेच शिखर उतरण्यास सुरुवात केली. २ च्या सुमारास कळसुबाई शिखर उतरून बारी गावातील मंदिरात थोडी विश्रांती घेतली.  

गावचा रस्ता  एकेरी असल्याने आणि इतरही खूप ग्रुप च्या बसेस असल्याने आमची बस गावाच्या वेशीपाशी एक कि.मी. अंतरावर उभी केली होती तिथे आम्ही चालत गेलो आणि बस मध्ये बसून हुश्श केले. कारण एकदा ट्रेक संपला की तोच शेवटचा वॉर्म-अप सुद्धा नको वाटतो. पण तेवढे अंतर चालत जाण्याची मजा पण काही और च. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. कळसुबाई शिखर ट्रेक पूर्ण झाल्यांनतर या ठीकाणी वळण्याचा आमचा विचार होता परंतु जर तिथे पाणी पडत नसेल तर तिथे जाण्याची मजा नाही त्यामुळे वहा जाना कॅन्सल किया.
ट्रेकिंग करणारे सोडले तर तेथील लोक आणि अजून काही नाशिक घोटी च्या बाजूने आलेले लोकमंदिरात जाणारे बरेचसे लोक मला अनवाणी शिखर चढताना दिसले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी बोअर वेलविहिरी आहेत. तसेच टॉयलेट ची सोय दिसली. बारी गावाच्या वेशीपाशी एक शाळा देखील आहे. डोंगराच्या पायथ्याशी खेड्यापाड्यात देखील अश्या सोयी पाहून चांगले वाटते. आमची बस बारी-राजूर-कोतुळ-ब्राह्मणवाडा-बोटा-चाकण-पुणे अश्या मार्गाने निघाली. 
बस निघाल्यावर मात्र सगळे मेल्यासारखे बसमध्ये झोपून गेले होते. २ तासानंतर चहाचा ब्रेक झाला त्यांनतर अंताक्षरी सुरु झाल्यावर मात्र सगळ्यांच्या अंगात शांताबाई आली आणि सगळे पुणे येईस्तोवर गाण्याच्या तालावर झिंगाट झाले. यावेळी नवीन ट्रेकर्स जास्त होते त्यामुळे जुन्या नव्या मेम्बर्सनी मिळून धमाल आणली. बारी गावातून दुपारी ३ वाजता निघालेलो आम्ही ट्रेकर्स रात्री ९:३० पर्यंत घरी पोहोचलो. "फोना'चा  ७१ वा ट्रेक नेहमीप्रमाणे यशस्वीपणे सुखरूप पार पडला.




21 comments:

  1. nehmipramane uttam varnan ani utkrusht photography

    ReplyDelete
  2. khup chan varnan ani shabdanchi rachna manala bhavnari ek netke likhan karnari gad chadhnari lekhika

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर ताई...👌🏻

    ReplyDelete
  4. Very nice and descriptive blog....keep it up madam.

    ReplyDelete
  5. as usual super varnan..................jioooooooo jayudiiiiiii

    ReplyDelete