Thursday 22 June 2017

ट्रेकर

खरंच 'ट्रेकर्स' म्हणजे जगाहून वेगळी पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात. हाताची नखे वाढवायची हौस असली तरी त्यातली एक दोन नखे ट्रेकमध्ये कायम तुटलेली असणारी.
मान आणि कानाच्या पाळ्याच काय तर चेहरा कायम टॅन झालेला असणारी मी  कारण ट्रेक कारण गडावरचं कडक ऊन खाल्ल्याशिवाय ट्रेक केल्याचा आंनद कसा मिळणार या मताची असणारी मी.
आम्ही मुली असल्याने पावडर फेसक्रिम याचा संबंध थोडाफार आलाच पण भपका नसणारी.
मला तर अर्थ्ररायटिस, मणक्यात ग्याप, मस्क्युलर पेन असे अनेक आजार आहेत त्यामुळे सुरुवातीला ट्रेक ला जाताना डॉक्टर अडवायचे. आता डॉक्टर स्वतःच म्हणतात ट्रेकला गेलात की तुम्ही तुमची सगळी दुखणी विसरता जावा जावा. म्हणजे डॉक्टर चा सल्ला थोडक्यात धुडकावणारीच.
समारंभामध्ये सोबर साडी,सोबर दागिने घालून जाणारी आणि बेंजो च्या तालावर दोन पावले थिरकवणारी मी आणि सॅक पाठीवर टाकून ट्रॅकपॅन्ट, टोपी घालून  डोंगर चढणारी मी घरातल्यांना आणि सगळ्यांनाच आवडते तरीही ट्रेकर म्हणून मिळालेली पाठीवरची थाप मला मोलाची वाटणारी मी. 
खरेदी करताना कायम एखादा ती शर्ट/टॉप,एखादी मळखाऊ पॅंट ट्रेकसाठी  जास्त उपयुक्त कशी पडेल या निकषावरच खरेदी करते. दुकानदार एकतर वैतागतो किंवा मनातल्या मनात हसतो. ट्रेकर्स ऐसे ही होते है.
ट्रेकसाठी वेगळे तीन बुटाचे जोड बाळगणारी मी, किंबहुना खाण्यापिण्यावर पैसे घालवण्याऐवजी त्याच पैशात ट्रेकसाठी चांगला लाईटवेट बुटाचा जोड, एखादी टोपी किंवा जॅकेट घेता येईल का हे पाहणारी मी.
वुडलँड चे ४ हजाराचे बूट ग्रीप गेल्यावर गडावर आपट्या खाल्ल्यावर ऍक्शन आणि ट्रेकर शूज चांगले आहेत  हे मानणारी मी.
घेतानाच शर्ट फुल बाह्यांचे पाहून घेणारी आणि टॉप शिवतानाच फुल बाहीचा शिवणारी मी. किंवा एखादे लाईट वेट जॅकेट कायम कमरेला अडकवणारी मी. ढगळ ट्रॅक पॅन्ट घालून मग गड उतरताना मस्त गुढग्यापर्यंत घेणारी मी. "अरे बस झाले आता झाली त्या ट्रॅक पॅन्टची थ्री फ़ोर्थ' अशी मंदार सरांची बोलणी खाणारी मी.
२-३ चष्म्याच्या फ्रेम्स फायबरच्याच बाळगणारी मी. फोटो च्या नादात कुठे चष्मा विसरले तर कायम गाडीमध्ये स्पेयर चष्मा ठेवणारी मी,
प्रवासात मात्र बॅगा माझ्या कायम दोन असतात सगळ्यांसाठी भरपूर खाऊंनी भरलेल्या आणि स्पेअर कपडे कायम बाळगणारी मी मग तो वन डे ट्रेक का असेना. परंतु गडावर मात्र छोटी आणि कमी वजनाची सॅक नेणारी मी.
बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे जरी मानत नसले तरी स्वतःजवळ शहरी सरबत (tang) असताना गडावरच्या लहान सरबत वाल्या मुलांना मदत म्हणून सरबत विकत घेणारी मी.
मिळेल ते जेवण आणि जागा किती सही आहे हे मानणारी एकदा घराबाहेर पडले की काहीही साधे चालवून घेणारी मी.
कुणीही सोबत असले तरी कितीही वेळा गड  पहिला तरी पुन्हा पुन्हा फिरणारी मी.
ट्रेकर्स चा थकवा घालवण्यासाठी नवीन ट्रेकर्स ना उत्साहित करण्यासाठी कितीही ठाकले तरी बसमध्ये जाता येता न झोपता अन्ताक्षरीचा धिंगाणा घालणारी मी.
गडकिल्ल्यांचे माहितीचे व्हिडीओज दाखवीत असलेले चॅनेल चालू कर असे मैत्रिणीने भावाने सुचवल्यावर रिमोटवरून भांडणारी मी,
शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या गेट-टू-गेदर साठी पुण्याहून मुंबईला मुलीला भावाला घेऊन ट्रेक ला जाणारी आणि आईवडिलांचा ओरडा खात वज्रेश्वरीजवळच्या घोटगावचा गुमतारा सर करणारी मी.
मैत्रिणींकडे आणि नातेवाईकांकडे जायला वेळ नाही आणि ट्रेक ला कशी जाते या कारणावरून सगळ्यांचाच ओरडा खाणारी मी.
गडावरचे आणि ४-५ शहरातले सुद्धा रस्ते बऱ्यापैकी माहित असलेली आणि कालवणापासून मालवण घरात बनवता येणारी आणि पालथं घालणारी मी.
शहरात activa वर हेल्मेट कमी वापरणारी आणि कधीतरी सिग्नल तोडणारी, खूप गडबडीत असताना नेमकी ट्राफिक पोलिसाकडून पकडली जाणारी मी परंतु पळून न जाता चूक झाली म्हणून पावती फाडून दंड भरणारी मी.
गाडीच्या अनेक प्रकारच्या किचेन बाळगणारी मी संगीताची आवड म्हणून तबला असलेली किचेन अडकवणारी मी.
चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणारी आणि दुसर्यालाही रॅपर खिशातच ठेवून घरातल्या डस्टबिन मधेच टाकणारी आणि टाकायला लावणारी मी.
हो उघडे नळ स्वतःच बंद करणारी मी,
मोबाइल घेतानाच जिपीएस वालाच घेणारी मी आणि रेंज असणारेच सिमकार्ड बाळगणारी मी आणि खास उत्तम फोटोग्राफीसाठी चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेणारी मी.
रोज नवनवीन ठिकाणे शोधणारी मी. ट्रेकिंग चा ब्लॉग लिहून त्याच्या पोस्ट फेसबुकला टाकून त्याचा स्वतः  आंनद घेणारी आणि दुसऱ्याला आंनद देणारी मी आणि दुसरा ट्रेक येईस्तोवर त्याचे फोटोज अपलोड करून मानसोक्त आनंद घेणारी-देणारी मी.
दिवसातून कितीदा ट्रेकचाच विषय बोलणारी. फोनवर कोणी ट्रेकविषयी विचारल्यावर भरभरून बोलणारी,माहिती देणारी मी.
आपल्यासोबत ट्रेकसाठी चांगले ट्रेकर्स जमा करणारी मी.
रविवारच्या ट्रेकनंतर सोमवारी भयानक पाय दुखत असताना एका दिवसात फोटोज अपलोड करून अर्ध्या दिवसात ब्लॉग लिहून शेअर करणारी मी.
परदेशातील मैत्रिणींना ट्रेकचा ब्लॉग पाठवून त्यांच्यातही ट्रेकची आवड निर्माण करणारी मी. अनोळखी व्यक्तीला दादा, काका, मित्र म्हणायला न लाजणारी मी.
देवाला कमी जाणारी परंतु ट्रेक कधीही न चुकवणारी मी.
रायगडावर जाण्याचा योग अजून आला नाही अशी अभागी मी.
सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी मी.
गडकिल्ला बस मधून पहिला तरी लागेचच फोटो क्लिक करून माहिती विचारणारी आणि अभिमान बाळगणारी मी.
गडावर गेल्यावर  तिथून दिसणाऱ्या गडाविषयी चौकशी करून तिथे जाण्याची इच्छा बाळगणारी मी.
ट्रेकिंग च्या प्रत्येक वळणावर फोटो काढणारी तरीही आघाडीवर असणारी मी.
ट्रेक ला जाताना बजेट चा विचार न करणारी मी.
ब्लॉग मधून ट्रेकिंग चा प्रसार करणारी आणि ट्रेकिंग बद्दल आवड निर्माण करणारी मी.
काय माहिती आम्ही खरे ट्रेकर आहोत की नाही ते. किती गुण जुळतील आणि किती गुण  मिळतील यासाठी आम्हा ट्रेकरला..?

No comments:

Post a Comment