Monday 16 July 2018

"धुव्वाधार मढेघाट ट्रेक"



मढेघाट ट्रेक
ठिकाण- पुणे-रायगड हद्द
चढाईश्रेणी- मध्यम
उंची- ८५० मीटर
दिनांक - १५ जूलै २०१८

मढेघाट इतिहास-   आधी लगीन कोंढाण्याचे मगच रायबाचे हे वाक्य शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून वाचत आलोय. तलवारिशी लगीन लागलं हे ब्रीद सार्थ ठरावं असा निष्ठावान शूरवीर म्हणजे तानाजी मालुसरेकोंढांणा म्हणजेच सिहंगडच्या लढाईत तानाजी मालुसरे अमर झाले. त्यावेळी शिवाजी महाराज दुःखी होऊन उद्गारले, गड आला पण सिंह गेला अंतिम विधीसाठी तानाजींचे मढे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पोलादपूर जवळील उमरठ गावी ज्या घाटमार्गाने नेण्यात आले त्या मार्गाला स्वतः शिवाजी महाराजांनी मढेघाट नाव दिले. मढे हा शब्द ऐकिवात होता. परंतु घाटाला असे नाव जरा वेगळे वाटत होते.मढे म्हणजे आजचा प्रचलित शब्द आहे,मृतशरीर,मृतदेह शव, प्रेत.  कदाचित त्यावेळचा बोलीभाषेतील शब्द मढे हा असेल.शिवाजी महाराजांचे निष्ठावान, शूर लढवय्ये तानाजींची अंतिमयात्रा ह्या घाटमार्गाने नेण्यात आली ही अभिमानाची गोष्ट आहे.
पावसाळी ट्रेक म्हणजे आम्हा ट्रेकर्सना पर्वणीच असते. खवय्ये जसे त्यांच्यासाठी खवय्येगिरीची ठिकाणे शोधत असतात तसेच पावसात कोणता नवीन आणि भन्नाट ट्रेक करावयास मिळेल याची आम्ही वाट पाहत असतो आणि आमचे ट्रेक लीडर्स वेगळ्या पावसाळी ट्रेकची पंगत आमच्या पुढ्यात ठेवतात.दिनांक १५ जुलै २०१८ माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे ग्रुप आयोजित  ८६वा मढेघाट ट्रेकचा दिवस उजाडला. आमची ३१ जणांची ट्रेकबस तळेगाव-निगडी-बिजलीनगर - डांगे चौक- वाकड-चांदणी चौक-न्यू टनेल कात्रज ब्रिज-नसरापूर-वेल्हे-गुंजवणे-केळद मार्गे मढेघाट कडे निघाली. पावसाचा जोर सकाळपासूनच होता त्यामुळे खूप धमाल येणार हे पक्के होते. सगळे ट्रेकमेम्बर्स बसमध्ये आल्यावर नारळ फोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.
नऊच्या सुमारास हॉटेल चैतन्य येथे नास्ता केला आणि फक्कड चहा घेतला. धनंजय भोराडे आणि विनोद भोरांडे(९९२१०६२६१२/९४०४७२३७९२) यांचे ते छोटे हॉटेल आहे. इथे व्हेज नॉन-व्हेज जेवण, स्नॅक्स आणि उत्तम चहाची सोय होते. आजूबाजूचे डोंगर हिरवाईने नटले होते. ओढे,नद्या दुथडी वाहत होत्या.त्यात बस मध्ये ऐकलेले  "हिरवा निसर्ग हा भवतीने  जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद व्हा रे... "हे गाणे सार्थ ठरत होते. जाताना त्या हिरव्या गर्द डोंगरांच्या कुशीत गुंजवणेचा  प्रशस्त   जलाशय मनाला मोहवीत होता. 

मढेघाटाची कठीण वळणे पार करीत सुमारे ११च्या सुमारास आमची बस घाटावर पोहोचली.सावित्री नदीने आमचे स्वागत केले. ट्रेकर्सची आणि सहलीला येणाऱ्यांची तुफान गर्दी दिसत होती. चहा आणि गरम भजी आणि मक्याची भाजलेली कणसे यासाठी साठी छोटे छोटे टपरी-तंबू दिसत होते. कोसळणाऱ्या पावसात त्या भजीचा खमंग सुगंध आमच्या आतड्यांपर्यंत पोहोचत होता परंतु आमचे आजचे लक्ष म्हणजे वरून न दिसणारा तो धबधबा खालून दरीतून कसा दिसेल या कडे होते. बस मधून उतरून लगेच ट्रेकदरम्यान पाळावयाचे नियम याविषयी सुचना देऊन आणि शिवगर्जना करून ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेकमेम्बर सलोनी हिने घरून सिडबॉल्स आणले होते त्याची माहिती देऊन जाताना सगळ्यांनी ते घाटावर सर्वत्र मातीत रुतवले. पावसाळी ट्रेकदरम्यान अश्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज होत असतात आणि झाल्याचं पाहिजे.माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स. 


नेहमीप्रमाणे यावेळी मी कारले, भाकरी आणि पुरणपोळीचा टिफिन आणला होता. परंतु यावेळी दुपारचे जेवण देखील ट्रेकग्रुप देणार आहे हे माझ्या नजरचुकीने वाचले नाही. दुपारच्या जेवणाची सोय तेथील गिरीराज या छोट्या खानावळीत सांगून ट्रेक सुरु झाला. २० पावलांवरचे पुढचे काहीही दिसत नव्हते इतके धुके होते. "घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ...." हे गीत ओठी आल्याशिवाय राहत नाही.

किलोमीटर चालत जाताना मध्ये ओढे,  छोटे धबधबे लागले. माती लाल आणि मऊ होती.  मढेघाट परिसरात दोन प्रचंड मोठे धबधबे आहेत,लक्ष्मी आणि केळेश्वर.  आम्ही घाटावर जेव्हा  पोहोचलो तेव्हा प्रचंड प्रमाणात धुके होते. धबधबा वरून तर अजिबातच दिसत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर काही भाग कॅमेऱ्यात कैद करता आला. 
खाली बघितलं तर फक्त धुक्याचा पांढरा रंग दूध सांडल्याप्रमाणे दिसत होता.  त्या दुधाळ रंगातून आरपार काहीही दिसत नव्हतं. थोडा वेळ वाऱ्याच्या वेगाने ढग बाजूला झाले की घाट आणि धबधबे स्पष्ट दिसायचे.पुन्हा पाऊस,पुन्हा धुके असा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता. इथून कोकणात महाडला रस्ता करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. आकाश नीरभ्र  असेल तर या ठीकाणाहून दूरवर कोकण नजरेत भरतो. फोटोग्राफीसाठी अगदी योग्य जागा आहे.

मढे घाट पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. निगडीपासून सुमारे किलोमीटर ९३ कि. मी. अंतरावर असून पावसाळ्यात इथे पोहोचवयास तीन ते साडेतीन तास लागतात. मढे घाट हा ट्रेक रूट नेहमीच ट्रेकर्सना साद घालत आलेला आहे. या वाटेने शिवथरघळ, वरंध, कावळा, रायगड ट्रेक करणारे ट्रेकर्स आढळतात. आकाश निरभ्र असेल तर इथून लिंगाणा, रायरेश्वर, केंजळगड, रायगड दिसतात. मनमोहक कारवीची फुले जी सात किंवा आठ वर्षातून एकदाच फुलतात ती मढे घाटात पाहायला मिळतात समुद्रसपाटीपासून सतराशे फुटावरून कोसळणारा धबधबा ही मढे घाटाची शान आहे.
आम्ही लक्ष्मी धबधब्याच्या दिशेने उतरण्यास सुरुवात केली. जिथून पाणी खाली कोसळते त्या छोट्या घळीतून आम्ही उतरू लागलो.वाहत्या पाण्यात अचूक पाऊल टाकणे गरजेचे असते नाहीतर जरा पाय चुकला की एकतर घसरू शकतो एकतर लचकू शकतो. ट्रेक ची कितीही हौस असली तरी जीवाला जपून सावधगिरीने उतरले तर सगळ्यांच्याच सोयीचे आणि हिताचे ठरते. पावसात कधीही झाडाझुडपांना धरून उतरू नये. चापड्या अश्या झाडाझुडपांवर, फांद्यांवरच बसलेला असतो. सुमारे १०० फुटांवर पोचचल्यावर लक्ष्मी  धबधब्याचे रौद्र रूप दिसू लागले आणि हायसे वाटू लागले. कातळधार ट्रेकची आठवण झाली. अगदी असाच मोठा पाण्याचा प्रवाह कातळधारचा आहे.


तोरणा आणि राजगड परिसरातून कोकणात उतरणारे बरेच घाट आहेत परंतु शिवथर परिसरात उतरणारे आणि महाड, बिरवाडी बंदरामुळे प्राचीन काळापासून वाहते असणारे मढे आणि उपांड्या हे घाट ह्या घाटवाटांपैकी प्रमुख. त्यात तानाजी मालुसरे यांच्या घटनेमुळे ह्या घाटाला अधिकच महत्व प्राप्त झाले. तसा मढे घाट हा त्याहून प्राचीन आहे. पूर्वापार कोकणच्या बंदरातून देशात  होत असलेल्या व्यापारात ह्या घाटवाटांना अनन्यसाधारण महत्व आहे. नाणे घाट आणि मढेघाट अश्या काहीच घाटवाटांवर असलेल्या बांधीव पायर्यांच्या खुणा मढे घाटात आहेत यावरून हा घाट तेवढाच प्राचीन असला पाहिजे हे लक्षात येते. 
घाटावरचे केळद गाव आणि कोकणातले कर्णवाडी गाव हे ह्या दोन्ही घाटांना जोडणारे असल्याने पुण्याहून एका दिवसात हे दोन्ही घाट सहज शक्य आहेत.
अजून १०० फूट खाली उतरल्यार डावीकडे आम्ही धबधब्याच्या बाजूने उतरून आमच्या सॅक बाजूला सारून त्या कोसळणाऱ्या दुधी प्रवाहात बसून मनमुराद आंनद लुटू लागलो. एक मोठा खडक जणू आमच्या संरक्षणासाठी  तिथे पाण्याची वाट अडवून बसला होता.तरीही सावधगिरीने आम्ही मनसोक्त पाण्यात भिजण्याचा आंनद लुटला मनसोक्त फोटोग्राफी केली.त्यात तिथे केलेली शिवगर्जना दुमदुमून गेली. 




या ठिकाणाहून लक्ष्मी धबधब्याचे सुंदर रूप काही वेळा स्पष्ट दिसत होते. जवळपास एक तास त्या पाण्यात खेळून बॅनर फोटो काढून परतीच्या वाटेला निघालो. पावसाचा जोर वाढल्याने प्रवाहाचा जोर वाढून आपण पाण्यात खेचल्याची जाणीव होते.  जाताना उतरताना भर्रकन उतरलो तसेच चढताना भूक लागली होती तरी भराभर सगळे चढत होते. मढेघाटावरची लाल माती आता पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याने ते पाणी अगदी चहाच्या रंगाप्रमाणे भासत होते.



पुन्हा कि.मी चे अंतर वर चढून दुपारी दीडच्या सुमारास तेथील गिरीराज खाणावळीमध्ये भाकरी भाजीचे साधे जेवण केले आणि बसजवळ येऊन कपडे बदलून सावित्री  नदीजवळील  भातखाचरे तसेच तेथील निसर्गात ढग, धुके आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ यांच्यासोबाबत फोटोग्राफी करून परतीच्या वाटेला निघालो.







जाताना अंताक्षरी खेळलेले सगळेच्या सगळे ट्रेकर्स आता अंताक्षरीमध्ये रमून गेले होते. दोन्ही टीम छान बरोबरीने गाण्यात रममाण झाल्या होत्या. आमचे लीडर रोहित सर आणि वैशाली, तसेच प्रतीक पेंढारे आणि माझी वर्गमैत्रिण ममता, कविता, दिनेश,राहुल, निलेश, प्रतीक-आकाश टीम  हे या ट्रेकला येणारे मेंबर्स आले असते तर अजून आमच्या ट्रेकला चार चाँद लागले असते.मधुर आवाजाच्या  सायली, जुई, गीता, स्मिता,इरा, श्रावणी, ऋतुजा, सलोनी,सरीता. ढमढेरे मॅडम सोबत बॉइज गॅंग सुमित,दीपक, संपन्न,प्रशांत, निलेश, भूषण,डॉ. श्रीकांत राव, प्रकाश, मंदार सर, राणे सर,थानावाला सर, दीक्षित सर, पाफाळे सर, ढमढेरे सर, अतुल,हर्षद, फोटोग्राफीसाठी आळशी संकेत,  सगळ्यांनीच उत्तम रंगत आणली.(ओळख परेड झाली नाही त्यामुळे सगळ्यांची नावे समजली नाहीत)लीडर्स मंदारसर, राणे सर,सर्पमित्र  निकाळजे उत्तम नियोजन आणि  नवीन जुन्या सगळ्या ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य यामुळे पुन्हा एकदा अविस्मरणीय अनुभव घेऊन मढेघाट वॉटरफॉल ट्रेक सुफळ संपूर्ण जाहला. ओम वॉटरफॉलाय नमः उत्तम फोटोग्राफीसाठी सगळ्यांना धन्यवाद.  माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स...





19 comments:

  1. खुप सुंदर लेखण. मी या trek ला येउ शकलो नाही पण तुमचा blog वाचून झाल्यानंतर ती उणीव भरून निघाली. :-)

    ReplyDelete
    Replies
    1. वजनदार झालाय एकदम...मस्त

      Delete
    2. Thank you vivekanand ...☺️

      Delete
  2. Awesome Blog Jayuu Tai...Keep Writing...Very nicely described...

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर, आपलं घरटं सांभाळून आपण मुक्तपणे निसर्गात संचार करत असता सुंदर, लेखन ,फोटो आणि मांडणी. आपलं पुस्तक प्रकाशित करा या वयात अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी काम आपणास आणि सहकाऱ्यांना धन्यवाद

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लिखाण.. ����

    ReplyDelete
  5. Khup Chhan blog, Surekh photos

    ReplyDelete
  6. lucky ahes g he swargiy drushya pavsalyache ani paus sudar ghat darya ............tu enjoy kartes ani ya blog madhun amhi hi te pahato.thank you jayude.....god bless you ♥

    ReplyDelete
  7. Nice description...jayuu...keep it up

    ReplyDelete
  8. Kiti Sundar lihilay ha blog...Proper combination of Information, History, Pictures & humour...👌🏻💐😊👏🏻Mi khup miss tumha lokana😔

    ReplyDelete
  9. Thank you so much pratik ...amhi pan saglyani mis kela tula ...khup majaa aali trek madhe ..it was just awesome trek .....👌👌👌

    ReplyDelete
  10. मढेघाटाचे वातावरण डोळ्यासमोर ऊभे राहीले एवढे छान वर्णन केले आहे

    ReplyDelete