Monday, 28 January 2019

धोडप किल्ला-नासिक जिल्हा...


ट्रेक - धोडप किल्ला
ठिकाण -नाशिक जिल्हा
श्रेणी - मध्यम कठीण
दिनांक - २६-२७ जानेवारी २०१९
उंची - ४३१९फूट

धोडप किल्ल्याचा थोडक्यात इतिहास-धोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला पुरातन किल्ला असून नासिक जिल्ह्यातील सातमाळा पर्वत रांगेतील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४३१९ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याचा उल्लेख प्रथम ६ व्या शतकात धरब या नावाने येतो. त्यावेळी हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांचा सरदार अलावर्दीखानाने निजामांच्या किल्लेदारास १ लाख रुपयांच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये अलावर्दीखानाने किल्ला ताब्यात घेतला इ.स १६७०-७१मध्ये शिवाजीमहाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला परंतु त्यांना किल्ला ताब्यात घेता आला नाही. नानासाहेब पेशवे आणि हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या मालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून झाला. इ.स. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड राघोबांनी(रघुनाथराव पेशवे)धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला आणि मोठी लूट माधवराव पेशव्यांना मिळाली. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. असा उल्लेख संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हट्टी गाव, चांदवड यांनी गावात प्रस्थापित केलेल्या बोर्डवर आढळला.
माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ९२ वा धोडप किल्ला ट्रेक दिनांक २६-२७ जानेवारी २०१९ या दिवशी आयोजित केला होता. २०१९ या नव्या वर्षातील हा पहिला ट्रेक होता. धोडप किल्ला नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात आहे. पुण्यापासून सुमारे २६० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. इथे पोहोचावयास जवळपास ६ तास लागतात.२६ जानेवारीला आमची ३२ ट्रेकर्सची बस रात्री ११च्या सुमारास निगडीहुन निघून प्रवासाची सुरुवात नेहमीप्रमाणे श्रीफळ फोडून करून तळेगाव-चाकण-नासिक मार्गे निघाली. बसमध्ये पांघरून घेऊन देखील प्रचंड थंडी जाणवत असल्याने नासिकमध्ये किती थंडी असेल याचा अंदाज येत होता.लीडर्सच्या आणि यावेळीचे आमचे गाईड विनोद मुळे(कारण ते या ठिकाणी आधी जाऊन आले होते) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या उत्तम ड्रायविंगमुळे आम्ही आग्रारोड मार्गे पहाटे साडेपाचच्या सुमारास धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावाजवळ उतरलो. थंडी मी म्हणत होती.बसचे दार उघडले की बर्फाचा डोंगर कोसळावा इतका चिल्लम चिल गारवा होता. ब्रश करून फ्रेश होऊन यावे तर मला तर हुडहुडी भरली होती. तरीही सगळ्यांनी पटापट आवरुन शेकोटी पेटवून थोडे शेकून घेतले.थोड़ा उजेड आल्याने धोडप किल्ल्याचे दर्शन झाले. सकाळची निरामय शांतता मन प्रसन्न करून गेली. साडेसहावाजता पुण्याहून आणलेला इडलीचा नास्ता करून थंडीच्या नशेत चहाच्या आशेवर हट्टी गावात गेलो. गरम चहा पोटात गेल्याने थोडे हायसे वाटले. ट्रेक लीडर राणे सर आणि मंदार यांनी ट्रेक संदर्भातील सूचना करून लगेच ट्रेकला सुरुवात झाली.

एरवी हवाहवासा वाटणारा गार वारा आता क्रूर वाटत होता.  क्रूर गार वारा अंगाला बोचत असल्याने जवळजवळ सगळ्यांनीच जॅकेट्स-स्वेटर-कानटोपी, परिधान केले होते. माझे तर हात गोठून त्याचा रंग बदलत होता. थोडे हातावर हात घासून घर्षण केले की बरे वाटत होते.जवळपास २कि.मी. अंतर चालून गेल्यावर धोडपच्या पायथ्याला सेंदूर लावलेली हनुमानाची भगवी मूर्ती आढळली.
इथून किल्ला चढाई सुरु झाली.  नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलाढ्य किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दुरूनदेखील उठून दिसतो.. जाताना उजव्या हाताला निसर्ग पर्यटन केंद्र हट्टी(धोडप) असे लिहिलेली एक कमान दिसली. इथे थोड्या प्रमाणात का होईना त्या कंपाउंडच्या आत छोटी छोटी  झाडे लावलेली आढळली. सातमाळ रांगेतील जे किल्ले दिसत होते ते चमन केल्यासारखेच भासत होते म्हणजे त्यावर अति कमी प्रमाणात झाडे दिसत होती किंबहुना थोडीफार झुडुपेच दिसत होती. वृक्षांचे प्रमाण फारच कमी असल्याने सरासरी पाऊस कमी पडल्याने या भागात पाण्याची फार टंचाई भासते.
छोटी छोटी शेततळी दिसली त्यात अगदी कमी प्रमाणात पाणी आढळले. थंडी मात्र अतिप्रमाणात जाणवत होती. पावसाच्या ट्रेकमध्ये डोंगररांगामधून ढग चालताना किंवा विरघळताना नेहमी पाहतो परंतु जानेवारी महिन्यात धुक्याचे ढग चालताना मी पहिल्यांदाच पाहिले इतकी थंडी तिथे होती. जवळपास पाऊणतासात एक टप्पा पार केला. दुसऱ्या बाजूने धोडपचा आकार अजून वेगळा दिसू लागला. दुसरा टप्पा सुरु झाला तिथे थोडीशी रुंद दगडी पायवाट तयार केलेली दिसली पावसात ही वाट उपयोगात येत असावी. पहिल्या कमानी जवळून इराकी सुळका स्पष्ट दिसत होता. कमानीतून आत प्रवेश केल्यावर किल्ल्यावरील ऐतिहासिक दगडी वस्तू आढळून आल्या जसे विहिरी, दगडी पसरट भांडे,तसेच सोनार वाडी वस्ती, जेवण नाविन्याची मोठी  लोखंडी हंडी असे एक ना अनेक अवशेष इथे आढळून आले. इथे ऐतिहासिक विहिरीची बांधणी वेगळी आणि अप्रतिम होती. चरायला आलेली गुरे, तिथे रहाणारे ते बोबडे महाराज "म्हणे पुणेरी महाराज" किल्यावर जिवंतपणा आणत होते. ते कोणालाही खरे नाव आणि गाव सांगत नाहीत तरीही आम्ही पुण्याचे आहोत म्हंटल्यावर आम्हाला म्हणाले “माझे नाव बोबडे बाबा आणि म्हणे मी पण पुण्याचा भामटा आहे.”


जसजसे किल्ल्यावर जात होतो तसतसे पायथ्याची गावे चित्रातील घरांप्रमाणे भासत होती. सूर्य डोंगरातून केव्हाचाच पूर्णपणे बाहेर आल्याने कोवळे ऊन हवेहवेसे वाटत होते. परंतु थंड वारा तरीही बोचत होता. पुढचा टप्पा थोडा कठीण असल्याने बरेच ठिकाणी लोखंडी जिने लावले आहेत. प्रत्येक टप्प्यावरचे किल्ल्याचे सौन्दर्य वेगळे आणि विलोभनीय होते. 
दुसरा टप्पा पार केल्यावर दगडी पायऱ्यांचा जिना सोडला की दरवाज्याच्या डाव्या बाजूला खडकावर मोठा एक शिलालेख आढळला. हा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख पारसी लिपी व भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणि “दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. येथील चौदा किल्ल्यात धोडप,चांदोर(चांदवड),इंद्राई,राजदेहर,कोळदेहर,कांचना,मांचनाकण्हेरा,जोला(जवळ्या),रोला(रवळ्या),मार्कांड्या,अहिवंत,अचलगड,रामसेज यांचा समावेश आहे. या शिलालेखाविषयी श्री आनंद  पाळंदें सरांच्या लेखात वाचले आहे.

दुसरा दरवाजा पार केल्यावर आपण चढाई करून प्रथम वरील पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीमध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात. आम्ही ८-९ ट्रेकर्स त्या सुळक्यावरील थोडे उंचावर असलेल्या गुहेत जाऊन आलो इथे एक टप्पा थोड़ा कठीण आहे तरीही लीडर राणे सरांच्या मार्गदर्शनाने आणि एकमेका साह्य करूच्या नियमाने आम्ही काही ट्रेकर्स त्या गुहेत जाऊन आलो. इथे लपून बसण्यासाठी या गुहेचा वापर होत असावा असे दिसते. इथून उतरताना घसारा करीत उतरून पुढच्या गुहेच्या दिशेने निघालो. इथे माकडांचा प्रचंड वावर आहे. खाण्याच्या वस्तू  त्यांच्यासमोर आपण काढल्या की ते आपल्या हातातून ओढून घेऊन जातात त्यामुळे सावध असावे.
हा सुळका यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसऱ्या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. इथे बारामहिने पिण्याचे पाणी उपलब्ध असते. एका गुहेत २०ते २५ लोक आरामात राहू शकतात. किल्ल्यावर तंबू लावून आपण राहू शकतो परंतु जेवणाची सोय आपली आपल्याला करावी लागेल.फक्त किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये किल्ल्याची हानी करू नये.हा नियम सर्व ट्रेकर्सने पाळला की झाले. सगळ्या गुहांमध्ये दगडी भिंतीवर मुलामुलींची नावे लिहून त्या गुहा जणू त्यांच्या नावावर केल्यात असे वाटत होते. असे काही पहिले की चीड येते आणि खंत वाटते. आपल्याला लाभलेला  हा गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा कसा जपला पाहिजे हे कोणालाही सांगायला लागू नये. असो  १०-१२ जणांचा छोटा ग्रुप असेल तर काही ट्रेकर्स इथे एकावेळी सलग २दिवसात २ते तीन किल्ले सहज करतात.जून ते मार्च महिन्याचा कालावधी इथे जाण्यास योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे.अंदाजे पन्नास फूट खोली आणि पस्तीस ते चाळीस फुटांची लांबी असलेला मधला भाग नैसर्गिकरित्या तुटून अथवा झिजून पडला आहे वाटते परंतु एका बाजूने असेही वाटते की त्याबाजूने शत्रूने प्रवेश करू नये त्यासाठी ही दगडी भिंत तोडून काढली असावी. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो.
येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात.थोडे धूसर वातावरण असल्याने हे किल्ले पुसट दिसत होते. वरील सुळक्याच्या मागील बाजूस एक मोठी मानवनिर्मित गुहा व काही पाण्याची टाकी आहेत.सुळक्याला फेरी देखील मारता येते.

धोडपचा हा शेवटचा टप्पा पहिला की लोहगडाचा विंचूकडा आणि रायगडचे टकमक टोक यामध्ये बरेच साम्य आहे असे आढळून आले. इथे बॅनर फोटो घेऊन वेगवेगळ्या दिशेने मनसोक्त फोटोग्राफी केली. आजूबाजूचा गडकिल्ले, परिसर न्याहाळून त्याची माहिती घेऊन आम्ही तेथील गुहेतील मंदिरात जेवण केले.
जेवण करताना आम्हाला  माकडांनी खूप त्रास दिला. दोन वेळा आमच्या पुढ्यातील चपाती आमच्या समोर उचलून नेली. कारण त्यांना समजले होते की हे लोक ओरडण्याशिवाय काही करणार नाहीत. त्यांना तिथे काहीही खायला मिळत नाही त्यामुळे ते प्राणी असे करत असावे.

आम्ही १२ च्या सुमारास किल्ला उतराईस सुरुवात केली. चढाई करताना एक टप्पा थोडा वळसा घालून गेलो होतो. उतरताना थोड़ा घसरडा परंतु थोडा जवळचा मार्ग निवडला.

त्यामुळे २ तासात आम्ही खाली उतरून हट्टी गावात पोहोचलॊ. सगळ्यांचे  चेहरे थकलेले दिसत होते तरीही ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.गावातील एका घराच्या अंगणात  १० मिनिटांची विश्रांती घेऊन आम्ही धोडांबे गावात जाऊन हेमाडपंथीय शिवमंदिराचे दर्शन घेतले. अप्रतिम कलाकुसर पाहावयास मिळाली.


त्यानंतर इथून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.हे मंदिर म्हणजे पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना असून १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे.  पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यावर  बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. मंदिरात गाभाऱ्यात रेखीव शिवपिंड आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो. 


गोंदेश्वर मंदिराच्या आवारात अर्धा तास थांबून मंदिराचे अप्रतिम सौन्दर्य न्याहाळून परतीच्या वाटेल निघालो. मी आणलेला शेंगदाणा तिळाचा लाडू, राणे सरांनी आणलेली भाकरवाडी आणि इतर स्नॅक्स प्रसादासारखा खाऊन पुण्याकडे निघालो. चहाच्या प्रतीक्षेत बरेच थकलेले चेहरे डुलक्या घेऊ लागले. चारपाच बडबडे लोकच हॉटेलचे बोर्ड बघत बसलो होतो. नगरच्या हद्दीत आल्यावर एका ठिकाणी चहा-नास्ताचा आस्वाद घेतल्यावर सगळे तरतरीत झाले.
त्यानंतर मात्र न राहवून अंताक्षरी सुरु झाली.अंताक्षरी असो की दम शेराज असो सगळे किती आत्मीयतेने सहभाग घेतात त्यावर त्या खेळाचा आनंद महत्वाचा असतो. अन्ताक्षरीमध्ये मराठी हिंदी गाणी, लहानमुलांची गाणी, सहलीची गाणी, मेहबूबची गाणी, विरहाची गाणी, धांगडधिंगा गाणी अगदी ९०च्या दशकाआधीपासूनची गाणी ते आताच्या डीजेपर्यंतची गाणी सर्व ट्रेकर्संनी सहभाग घेऊन सादर केल्याने पाच तासाच्या प्रवासाला चार चाँद लागले. महत्वाचे काय तर आपण थकलेले असताना वेदना विसरण्यासाठी त्या अंताक्षरीमध्ये किती रमून जातो आणि किती आनंदून जातो इतरांना किती आनंद देतो त्यात किती समरस होतो हे महत्वाचे आहे,असे माझे मत आहे. काहींना वाटत असेल नेहमी अन्ताक्षरीमध्ये तीच तीच गाणी गाण्यात काय मजा येत असेल या लोकांना?? नुसती गाणी गाणारे वेगळे असतात आणि गाणी गाऊन समा बांधणारे महफिल रंगवणारे वेगळे असतात. आम्ही गाणी गाऊन समा बांधून महफिल रंगवणारे आहोतच परंतु प्रत्येक गाण्याचा कस लावून किस पाडणारे आहोत.  काही गाण्यांचे रिमिक्स करून त्यात पण वेगळेपण आणून धुवा उडवणारे हुरहुन्नरी गायक देखील आमच्यात आहेत. नुसता ट्रेक करून बसमध्ये गप्प झोपून जाणारे ते ट्रेकर्स आम्ही नव्हेतच. जे आले नाहीत त्यांच्यासाठीच हे धमालचे वर्णन ईत्यंभूतरित्या करणे अत्यंत गरजेचे आहे बरे. हाहाहा रोहित, वैशाली,प्रतीक, विवेक,कविता, दिनेश, ऋतुजा, सलोनी, स्मिता, गीता, स्नेहल-अस्मिता,तुम्ही अप्रतिम अफलातून मजेशीर ट्रेक चुकवलात. अश्या प्रकारे   माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांचा ९२ वा धोडप किल्ला ट्रेक लीडर्सच्या उत्तम नियोजांमुळे आणि सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे अतिउत्तम असा झाला. लीडर्स राणे सर, मंदार सर, न आलेले रोहित सर, निकाळजे, विनोद मुळे, DSLR फोटोग्राफर जय थरवळ,राहुल, मंजुळ जावळे, विनोद आणि इतर सर्व बेस्ट फोटोग्राफर्स मंदार सर, राणे सर,पवन, निकाळजें,महेश, निलेश,आकाश, संपन्न,शेवाळकरसर,माधवरावसर,सर्वेश,अक्षदा,कैलास,नेहा,गुरुप्रसाद,सुरेखा,शुभांगी कुलकर्णी 
संपदा,यश यांचे सर्व फोटोग्राफ़र्सचे आणि छोटा ट्रेकर आदित्य याचे विशेष कौतुक. माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स रॉक्स. 




Thursday, 29 November 2018

"पिंक सिटी गजक जैसी मिठी"



"पिंक सिटी गजक जैसी मिठी" 

जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जातेया शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये महाराजा जयसिंग-दुसरा यांनी केली. महाराजा जयसिंगदुसरा यांच्या नावावरून या शहराला जयपूर हे नावपडले आहे. येथील लोकसंख्या इ.स२००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती.जयपूर शहरयेथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच जयपूर हे शहर समृद्धी परंपरा,संस्कृती परंपरा, ऐतिहासिक परंपरा यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे.
जयपूर हे शहर उत्तम आधुनिक शहर तसेच सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहर म्हणून ओळखले जाते. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या सुमारे १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरवर,वस्त्र-छपाई,हस्तकला रत्न व दागिन्यांची आयात निर्यात, आणि पर्यटन व्यवसाय इत्यादी आहेत. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे.भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात जयपूर शहर मोडते. या त्रिकोणात जयपूर-आग्रा-दिल्ली ही शहरे येतात. सवाई जयसिंग-दुसरा यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबरहे शहरआजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे.इ. स. १८७६ मध्ये त्या काळातील महाराजा सवाई रामसिंग यांनी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट यांच्या स्वागतार्थ संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला होता तेव्हापासून या शहराला गुलाबी शहर असे नाव पडले आहे. खरंतर हा गेरू रंग आहे परंतु गेरू रंगाला इंग्रजीत असे काही खास नाव नाही.  हा रंग गुलाबी रंगाशी मिळताजुळता असल्याने या रंगाला पिंक रंग संबोधून जयपूर शहराला पिंकसिटी म्हणतात.


माऊंटन एड्ज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे या ग्रुपची जयपूर टूर दिनांक १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८ या दरम्यान होती.आम्हा ट्रेकर्ससाठी वर्षातून एखादी छोटी टूर असली म्हणजे जरा थकलेल्या जीवाला बरं वाटतं. दिनांक १८ नोव्हेंबरला आम्ही सगळे टूरकर आपापल्या घरातून निघून कोणी कॅबने तर कोणी लोकल ट्रेननेयेऊन पुणेस्टेशनला पोहोचलो. रविवारी दुपारी ४च्या सुमारास आमची पुणे-जयपूर एक्सप्रेस जयपूर कडे निघाली. काही लोक वातानुकूलित बोगीमध्ये बसले आणि आम्ही काही लोक बिनवातानुकूलित बोगीमध्ये बसलो.प्रवासाची सुरुवात अर्थात सोबत असलेल्यांची ओळख परेड आणि अन्ताक्षरीने आणि फोटोग्राफीने झाली.
पुणे स्टेशनहून निघालेली ट्रेन लोणावळ्यातील आमचे काही प्रवासी घेऊन निघाली आणि खंडाळा घाटात पोहोचल्यावर ते संध्याकाळचे कोवळे ऊन, थंडगार वारा आणि सूर्य अस्ताला निघाल्यावरची निरामय शांतता त्या झुकझुक आवाज करणाऱ्या ट्रेनमध्येदेखील जाणवत होती. कारण सह्याद्रीची अनेक छटांची रांग समोर असली, सूर्य सोबत असला,खोल दर्यांचे अप्रतिम दृश्य समोर असले की मला आजूबाजूला काय आहे? कोण आहे याचा देखील विसर पडतो. डोंगरदर्यांच्या मधोमध एखादे कौलारू घरांचे गाव पाहायला मिळणे म्हणजे पंचामृत मिळाल्यासारखेच आहे. पळसदरीमधल्या सूर्यदेवाला टाटा करून आम्ही हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट अशी अनेक गाणी गात खंडाळा घाट उतरत होतो. आमची एक्सप्रेस पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-भिवंडी रोड-वसई रोड-आणि मग पुढे गुजरात सुरत असे करत जयपूरच्या वाटेला निघाली. आम्ही आपले आम्ही आणलेला दिवाळीचा फराळ आणि घरून आणलेला रात्रीचा जेवणाचा डबा संपवून गप्पा करीत झोपून गेलो. 

राजस्थानच्या हद्दीत सकाळ उजाडली. आपल्यासारखा तिकडे प्रत्येक स्टेशनवर चहा मिळत नाही. कोटा जंक्शनवर सकाळच्या चहाचा आस्वाद घेतला, पुढे मधुर पेरूचा आस्वाद घेतला, सवाईमाधोपूरवर थोडावेळ उतरून फोटोग्राफ़ी करून आम्ही १९ तारखेला दुपारी दोनच्या सुमारास जयपूर स्टेशनला उतरलो. माऊंटन एज ग्रुपचे नियोजनच भारी असते. आम्ही पोहोचण्याच्या आधीच एक भारी बस आम्हा पाहुण्यांना घ्यायला आली होती. आमच्या आगमनाने जयपूरचे गाल आनंदाने गुलाबी गुलाबी झाले असावेत असे भासत होते. आम्हाला  भूक लागल्याने आम्ही राजस्थानच्या प्रसिद्ध दाल-बाटीचा आस्वाद घेऊन मगच आम्ही ४दिवसाच्या पाहुण्या घरी गेलो.(हॉटेलवर). 


चोवीस तासाच्या प्रवासानंतर हॉटेल राजप्लाझामध्ये प्रवेश करून  खांद्यावरची वजन सॅक उतरवून फ्रेश होऊन वेळ वाया न घालवता ५च्या सुमारास संध्याकाळच्या शहर भेटीला निघालो. हॉटेलच्या बाहेर लगेचच विवेकविहार हे मेट्रो स्टेशन आहे तिथे आम्ही रोज फोटो काढू लागलो आणिमी मी एकदा तरी मेट्रोत बसेन असे वाटले परंतु यावेळी मेट्रोमध्ये बसण्याची संधी मिळाली नाही. 


संध्याकाळी सर्वात आधी जलमहलला भेट दिली पाण्यात खालून तीन मजली असे हे जलमहलआहे.  जयपूर शहराच्या मानसागरझिलच्या मधोमध हे ऐतिहासिक महल आहे. अरवली पर्वताच्या कुशीतआणि मधोमध असल्याने याला आयबॉल असेही म्हणतात. सवाई जयसिंग यांनी हे दोन मजली महल बांधले असून छत्रीच्या आकाराचे बुरुज आणि शिड्यांचेजिने अशी याची बांधणी आहे.हे जलमहल आता पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा विकसित होत आहे. इथल्या नर्सरीतएक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत तसेच राजस्थानातील सर्वात उंच झाडे इथे पाहावयासमिळतात. राजे लोकांनी स्नानासाठी तसेच राण्यांसोबत खास वेळ घालवण्यासाठी हे महल बनवले गेले असे म्हणतात. आम्ही रात्रीच्या वेळी हे महल पाहिल्याने रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशामुळे पाण्यात त्याचेप्रतिबिंबदिसत होते.


इथून लगेच आम्ही अमेर किल्याकडे रवाना झालो. जयपूरच्या हद्दीतच अमेर हे शहर आहे. राजा आलनसिंह यांनी आमेर शहराची स्थापना केली. येथील मंदिर आणि शहर,किल्ला राजपुती कलेचे उत्तम उदाहरण आहे. सुप्रसिद्ध निर्माता फिल्मच्या शूटिंगसाठी इथे येत असतात. चाळीसखांबवाला शीशमहल इथेच आहे, इथे माचीसची काडी किंवा मेणबत्ती  पेटवली असता पूर्ण शीशमहल दिपावलीसारखे उजळून निघते. स्थानिक पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांचे हे खास आकर्षण आहे. आंबेर देवीच्या मंदिरामुळे हे शहर देशभरात प्रसिद्ध आहे तसेच येथील  हत्तीची सवारी खास आकर्षण आहे. आम्ही अमेर किल्यावर एक तासाचा संगीतमय लाईट शो अनुभवलाआकाशात चांदणे, अचूक माहिती, अप्रतिम प्रकाशयोजना, मधुर संगीत आणि  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा भारदस्त आवाज या सर्वामुळे आमेर किल्यावरील लाईट शो आम्हा सगळ्यांनाच आवडला.
अमेर किल्यावरून प्रसन्न मनाने निघालो आणि बाहेरच रात्रीचे जेवण आटोपून हॉटेलवर जाऊन ओळख परेड करून आपापल्या रूममध्येगप्पा मारीत गुडूप झालो. सकाळी पहाटे ६वाजता झालना लेपर्ड सफारी साठी तयार होऊन निघालो खरे.आम्ही २० लोक असल्याने ३जिप्सी केल्या होत्या, दोन जिप्सी पुढे गेल्या आणि आमच्या जिप्सीचा चालक हॉटेलजवळच चकरा मारत होता आणि असं दाखवत होता कीजणू याला सगळं माहिती आहे. नंतर आम्हीच म्हटलं," भैया यही पे चक्कर क्यू काट रहे हो?"तेव्हा लेकाचा सांगतो मै नया हूं रास्ता नहीं मिल रहा. त्यापुढे पुढेगेलेली एक जिप्सी पुन्हामागे बोलवून मग सोबत गेलो तेव्हा अचूक रस्त्यावरपोहोचलो. 


त्या गुलाबी शहरात गुलाबी थंडीमध्ये खुल्या जिप्सीमध्ये भन्नाट अनुभव घेता आला. अर्धा तेपाऊण तास अंतर आम्ही तेथील प्रसिद्ध पंडितजीची  गरम चहा आणि खुल्यारोड वर खुली जिप्सी सफारी खुल्या मनाने अनुभवली आणि जाल्हनाच्या जंगलात पोहोचलो. पोहोचताच मोर, निल गाय, हरीण, माकडे, ट्री-पाय पक्षी यांनी आमचे स्वागत केले. त्या नवीन चालकाला शहरातला रस्ता माहित नव्हता परंतु जंगलातील रस्ता चूक माहित होता आणि प्राणि पक्षांबद्दलची अचूक माहिती तो देत होता.शिवाय रिव्हर्स एक्स्पर्ट होता. इतका एक्स्पर्ट होता की आम्हाला जीव मुठीत धरून बसावा लागे. या जंगलात ३०ते ३५ बिबटे आहेत असे तेथील जंगल अधिकारी आणि गाईड चालक यांनी सांगितले परंतु सकाळच्या २ तास सफारीमध्ये  आम्हाला एकही बिबटे महाराज दिसले नाही. परंतु आम्ही जंगलातील खुली सफारी, शांतात, त्यात पक्षांचे मधुर आवाज ऐकले आणि फोटोग्राफ़ीचा आनंद घेतला आणि आमच्या ३ जीप्सचे समोरासमोर आल्या की आम्ही एकमेकाला विचारात असू, "तुम्हाला किती बिबटे दिसले रे ?"आम्हाला ३ बिबटे दिसले. नंतर समजले आम्ही एकमेकाला खोटे सांगत होतो. 
सफारीहून निघताना आता सपाटून भूक लागली होती हॉटेलवर परतत असताना बिकानेरवाला इथे आम्ही आपापल्या आवडीचा नास्ता केला. या ठिकाणी असंख्य प्रकारची मिठाई आम्हाला पहावयास मिळाली. 


पुन्हा हॉटेलवर जाऊन मस्त आवरून दुपारचे जेवण करून संध्याकाळच्या सफारीला निघालो यावेळी आमचा जिप्सी चालक बदलला होता. आम्ही सफारी साठी गेलो असता तिथे कडक नियम आहे की जिप्सीच्या खाली कोणीही उतरू नये परंतु तेथील जंगल खात्यातील जंगलात काम करणाऱ्या बायका जिगरीने बिबट्याचा वावर असेल तिथे काम करत होत्या चहा बनवत होत्या
त्यांना सलाम.
सकाळी बिबटे महाराज दिसले नाही आता तरी दर्शन देतील अशी आशा हॊती.जंगलातप्रवेश केल्यावर साडेतीनच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिलेआणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या जिप्सीना बोलावण्यासाठी आमच्या चा लकाने काय जोरदार शिट्टी वाजवली. सगळ्या जिप्सी बिबट्या पाहावयास एका जागी जमा झाल्या. खचाखच-खचखच-खचाखच नुसता कॅमेऱ्यांचा आवाज येत होता. खरंतर ती ज्युलिएट नावाची बिबटिन होती. पाणी प्यायला आली होती ती. त्यानंतर तिला भूक लागली असावी ती एका मोराच्या मागे चालू लागली मोर झाडावर चढल्यावर ती त्याला खाली ये म्हणून अशा अर्थाने गुरुगुरु लागली.त्यानंतर तो मोर काही झाडावरून उतरला नाही त्यामुळे ती एक सशाच्या मागे लागली त्यानेही तिचा डोळा चुकवला आणि तो ससा बचावला.  आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेल्यावर पुन्हा दुसऱ्या बाजूने आमच्या समोरून नीलगाईकडे चालत होती.  नीलगाय घाबरून जिवाच्या आकांताने पळत होती. इथे जंगलात बिबट्या दिसला तर सगळे प्राणी एकमेकांना विशिष्ट आवाज काढून सावध करत असतात हे विशेष आहे त्याला कॉल आला म्हंटले जाते. माकड, नीलगाय,खारुताई, मोर  यांचे घाबरत ओरडणे म्हणजे बिबट्या जवळपास कुठेतरी आहे असे अचूक ओळखणे म्हणजे चालकाचे कौशल्यच म्हणता येईल. बिबट्याचे आगमन झाल्यावर मात्र टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतात सगळेच बाळगतात त्यामुळे आपण बिबट्याचे नीट दर्शन घेऊन शकतो फोटोग्राफी करू शकतो. मनसोक्त फोटोग्राफी व्हिडीओ क्लिप्स केल्या गेल्या.एक वेळेला इतक्या जिप्सी आजूबाजूला असताना ती मात्र राणीसारखी रुबाबाबतच चालत होती. पुन्हा ती नीलगायीला शोधत जंगलात गायब झाली.

सफारीची वेळ अजून संपली नव्हती त्यामुळे चालक आम्हाला अचूक फिरवीत होता. संध्याकाळीनिघायच्या वेळी पुन्हा एकदा ज्युलिएटचे आम्हाला दर्शन झाले. ती एका झाडीत उलटी करत होती त्याचा आवाज आमच्या चालकाने ऐकला  होता. आमची जिप्सी उभी होती त्यामुळे ती बाहेर येत नव्हती. आम्ही थोडे बाजूला झाल्यावर मोठ्या भिंतीवरून उडी मारून आमच्या समोरून जाऊ लागली. त्यावेळी तिने आमच्याकडे अतिशय रुबाबी कटाक्ष टाकला. आम्ही पुन्हा दुसऱ्या बाजूने तिला पाहायला गेलो तेव्हा मात्र ती झाडीमध्ये अदृश्य झाली. एका दिवसात इतक्या वेळा मिसेस बिबटीण दिसल्यामुळे दिल खुश हो गया था पैसा वसूल सफारी झाली. सूर्याला टाटा करून येताना चहा घेऊन रोड सफारीचा आंनद घेत पुन्हा राहत्या हॉटेलवर आलो-जेवलो. त्यादिवशी माझी पुण्यातली मैत्रीण जोना आणि शैलेशभाई जयपूरची प्रसिद्ध मिठाई गजक आणि माझी आवडती सोनपापडी घेऊन मला भेटायला आले. २तास मस्त गप्पा मारल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 


दिनांक २० नोव्हेंबर सकाळी पुन्हा एक सफारी होती. आम्ही काही लोकांनी रूमवर आराम केला २जण आमेर किल्ला पाहण्यास गेले आणि सफारीवाले आल्यावर आम्ही नास्ता करून जयपूरमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहावयास गेलो. हवामहल,सिटी पॅलेस, अल्बर्ट मुझियम,जंतर-मंतर-वेधशाळा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये भरपूर वेळ गेला परंतु आमचे गाईड संदीप जैन यांनी अचूकमाहिती देत आम्हाला महाराज सवाई मानसिंग-दुसरा मुझियम, सिटी पॅलेस फिरवले. युद्धात वापरले जाणारे अंगरखे, तलवारी-भाले, बंदुका, जे पाहावे ते अवर्णनीय असे होते.


जंतर-मंतर ही जगप्रसिद्ध वेधशाळा आहे असे म्हणतात. जंतर-मंतर किंवा यंत्र मंदिर ह्या खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बांधल्या गेलेल्या वास्तू आहेतइ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान जयपूरचे महाराजा जयसिंग ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये ह्या वेधशाळा बांधल्या. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित वभाकित करणे हा होता. सवाई जयसिंगने अतिशय सूक्ष्मपणे ज्योतिविषयक वेध घेण्यासाठी जयपूर मध्ये वेधशाळा निर्मिली आहे ती आम्हाला पाहावयास मिळाली.


त्यानंतर आम्ही दुपारचे जेवण करून जयपूरमधील प्रसिद्ध बापू बाजारला भेट देऊन थोडीशी खरेदी केली. साच्यांनी कापडयावर फळांचे नैसर्गिक रंगाचे ठसे उमटवून पेंटिंग कसे करतात याचेप्रात्यक्षिकदेखील आम्ही पहिले. बापू बाजारमध्ये असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी  कपडे दागिने आम्ही पाहत होतो घेत होतो. परंतु घेण्यापेक्षा पाहण्यात जास्त मजा होती. परंतु इतक्या मोठ्याबाजारात फिरून आम्ही लेडीजने जर खरेदी नाही केली तर नवलच. जमेल तेवढी खरेदी करूनआम्ही रात्री आठच्या सुमारास तेथील गणेश मंदिर आणि बिर्ला मंदिरला भेट दिली आणि हॉटेलला जाऊन जेवण करून आमच्या दोन दिवसात विस्कटलेल्या बॅगा पुन्हा भरून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही राजप्लाझा हॉटेलला टाटा करून अजमेरकडे निघालो. 
जाताना बसमध्ये माफिया खेळाने रंगत आणली. मध्ये एका ठिकाणी नास्ता करून पुन्हा अजमेरकडे निघालो. अजमेरच्या दर्गाला भेट दिली तेथील कपड्याचा आणि दागिन्यांचा बाजार खूपछान होता. जमेल त्यांनी इथे पुन्हा खरेदी केली. या दर्ग्याला भेट देण्यासाठी देशभरातून भक्तजन येत असतात.मन्नतचा धागा बांधून जातात अल्लाच्या दुवा घेऊन जातात.  दर्ग्याच्या अफाट गर्दीतून कसेबसे निघालॊ. येताना आनासागर लेक चौपाटीवॉर थांबू वाटत होते परंतु आम्हाला अजमेरचा जगप्रसिद्ध पुष्कर मेळा पाहायचा होता.


अजमेरपासून सुमारे १४ कि.मी अंतरावर पुष्कर गाव आहे. इथे कार्तिक पौर्णिमाला हा मेळा सुरु होतो हा मेळा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात असतो. या ठिकाणी देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने हजरअसतात. इथे जगातील ब्रह्माचे एकमेव मंदिर आहे शिवाय हे तिर्थक्षेत्र असल्याने हजारो हिंदू भाविक इथे पवित्र स्नानासाठी येतात आणि पुष्कर झिलमध्ये स्नान करून पवित्र होतात. स्थानिक नगरपालिका या मेळ्याची व्यवस्था पहाते. सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते.
यावेळी इथे म्हैस, घोडा, अशा प्राण्यांचे प्रदर्शनअसते.. यावेळी जवळजवळ १३००किलो वजनाची,१.३ करोड किमतीची रोज २५ लिटरहून अधिक दूध देणारी जोधपूरची म्हैस प्रदर्शनात असणे हेमेळ्याचे आकर्षण होते.  दोन उंटांना ट्रकमध्ये घालून नेत  होते  तर तो उंट जिवाच्या आकांताने हंबरत  होता. मुक्या प्राण्यांनासर्वात आधी कळते. त्यांना आता दुसऱ्या गावी नेत  आहेत  याची जाणीव होऊन तो रडत असावा. जातिवंत घोडे देखील प्रदर्शनात होते. उंटांना सजवून ज्याचा उंट देखणा दिसेल  त्यांना बक्षीस देखील दिले जाते.
आम्हाला जेवढे जमेल तेवढेच आम्ही फिरलो. कारण इतका प्रशस्त मेळा फिरायला वेळ आणि ताकद भरपूर हवी. टूरचाशेवटचा दिवस असल्याने आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. या मेळ्याला इथे खास महत्व आहे. कपडे-दागिने-आपापले प्राणी घेऊन स्थानिक लोक इथे मेळ्यामधे येतात . प्राण्यांसाठी खेळ देखील आयोजित केलेले असतात. प्राण्यांना बक्षीस दिले जाते. अनेक प्रकारची खाण्याची दुकाने, सर्कस, उंच झुलणारे पाळणे, उंट सवारी अशी अनेक प्रकारची दुकाने इथे एका ठिकाणी पहावयास मिळतातपुष्कर मेळ्यामधे प्रवेश केल्यावर आधी कुठे जाऊ हा प्रश्न पडला होता मेळ्यामधे आमच्या ग्रुपचे लोक वेगवेगळी विखरली गेली होती. नम्रता, बुदगे सर कुटुंब, अंजली आणि मी असे ५ जण सोबत फिरत होतो.   राजस्थानी वेषभूषा करून फोटोग्राफी केली. वाळवंटामध्ये उंट सवारी केली. त्यावेळी करण-अर्जुन चित्रपटाचे शूटिंग झालेले मंदिर एका डोंगरावर पहिले आणि त्यात असलेली हवेली आम्हाला पहावयास मिळाली.
आवळ्याच्या झाडांची बाग पहिली. लोकगीते ऐकली. विकावयास आलेले सैंधव मिठाचे मोठमोठेखडकांसारखे खडे पहिले. पहावं ते आमच्यासाठी अद्भुत आणि नवल होते. आणि हेच वेगळेपण पाहण्यासाठी आपण दुसऱ्याराज्यात जातो. त्यादिवशी  दुपारचे जेवण म्हणजे फलाहारच केला. काहींनी दालबाटीचा आस्वाद घेतला.  त्यानंतर फिरफिरफिरलो  आणि तेथील  पवित्र समजला जाणाऱ्या ब्रह्मा घाटावर  जाऊन आलो व  ब्रह्ममंदिराला भेट दिली. त्यानंतर मात्र वेळ संपत आली आणि आम्ही तिथला रिक्षा पकडून आमच्या बसजवळआलो. आमची एक्सप्रेस  अजमेरहून असल्याने आम्हाला पुन्हा १४ कि.मी  आमच्या बसने अजमेरला यावे लागले. रात्री ८च्या सुमारास आम्ही अजमेर-बांद्रा एक्सप्रेसमध्ये बसून पुन्हा मुंबईमध्ये आलो आणि मुंबईतून पुण्यामध्ये आलो. अश्याप्रकारेगुलाबी शहराची (जयपूरटूर) करून सगळ्यांचे चेहरे आंनदाने गुलाबी होऊन आले. आमचे टूर लीडर श्री रोहित सर यांना टूर उत्तम रित्या आयोजित करून उत्तम रित्या पार पाडल्याने आणि उत्तम फोटोग्राफी केल्याने त्यांना मनाचा मुजरा.टूरसाठी न आलेले आमचे लीडर्स श्री मंदार सर आणि श्री  राणे सर पुढच्यावेळी संपूर्ण राजस्थान ट्रिप आयोजित करावी ही विनंती आहे.  सागर धुमाळ कुटुंब. बांदल कुटुंब,सविता कुटुंब, रोहितसर-वैशाली आणि त्यांचे आईवडील, नम्रता, बुदगे सर, अंजली या  सर्व टूरकरांचे  उत्तम सहकार्याबद्दल विशेष कौतुक.