Sunday, 25 February 2018

"ट्रेकर्सची चंदेरी दुनिया.."

दिनांक २५ फेब्रुवारी २०१८....

फोना ट्रेकींग ग्रुपचा Blog मुंबईच्या दैनिक महासागर या बातमीपत्रात छापून आला. ⛳⛳⛳

Wednesday, 21 February 2018

सोनेरी क्षणांचा सोबती "चंदेरी".



ट्रेक - चंदेरी किल्ला
उंची- २३००फूट
प्रकार - गिरिदुर्ग
ठिकाण- ठाणे जिल्हा
डोंगररांग- माथेरान
दिनांक- १८ फेब्रुवारी २०१८


'चंदेरी किल्ला"-माहिती- चंदेरी किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील माथेरानच्या डोंगररांगेत आहे. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे २३०० फूट इतकी आहे.पुण्यापासून सुमारे १२० कि. मी. अंतरावर चंदेरी हा किल्ला आहे. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख ताब्यात घेतला तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा असा अंदाज बांधता येतो. ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते. अतिशय अवघड वाट आणि किल्ल्याच्या माथ्यावर गुहेच्या अगोदर पडक्या अवस्थेत तटबंधी दिसते हे पाहून ह्या किल्ल्याचा इतर किल्ल्यावर आजूबाजूच्या परिसरावर देखरेखीसाठी वापर होत असावा.

“चंदेरी” हा म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक आहे तसेच  पनवेलचे जवळील  कर्नाळा, प्रबळगड, इर्शाळगड , माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक देखणा गड म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाटआणि मुरबाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीमधील  एक आव्हानच आहे. तामसई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग म्हणजे ट्रेकिंगची आवड असणाऱ्या ट्रेकर्सचे खास आकर्षण आहे.
फेब्रुवारी महिना म्हणजे माझ्यासाठी "सोनेरी क्षणांचा सोबती" असतो कारण याच महिन्यात “व्हॅलेंटाईन्स डे” चा एक आठवडा साजरा करता येतो शिवाय माझ्या पार्टनरचा वाढदिवस असतो त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो. यावेळी त्यात भर म्हणून चंदेरी किल्याची ट्रेकची सोनेरी संधी मला मिळाली होती.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी “फोना” टीमचा ८० वा ट्रेक आयोजित केला होता. १८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता आमची बस निगडीहुन निघून  तळेगाव-लोणावळा- खोपोली -नेरळ-चारफाटा-मार्गे-  उमरोली- चिंचवली येथे ९ च्या सुमारास पोहोचली.अर्थात मध्ये प्रवास चांगला होण्यासाठी नारळ फोडून आणि चारफाटा कर्जत येथे ठाकरे हॉटेल जवळ थोडा वेळ थांबून नास्ता करून आणि चहा घेऊनच. 😊घाटामधून जाताना ड्युक्स नोज नेहमीच स्मित हास्य करतो. कर्जत फाटा सोडले की एन.डी स्टुडिओ जवळ पाठीमागे मोरबे धरणाचे प्रशस्थ दरवाजे दिसतात.👌

चिंचवली येथे पोहोचल्यावर तिथे एक लग्न असल्याने स्पीकरवर गावाकडच्या लग्नाच्या गाण्याचा आवाज कानाला सुखावून गेला. आमची बस बघून गावातील मंडळी जरा पुढे आली जणू वर्हाड आलं असं समजून😊😊. बस अजून थोडी पुढे नेऊन लगेचच ट्रेकला सुरुवात केली. गावातील गणेश नावाचा वाट दाखवणारा आम्ही सोबत घेतला कारण चंदेरी किल्ला तसा  चढाईस कठीण असल्याने आणि सध्या उन्हाचे दिवस असल्याने इकडे कमी ट्रेकर्स फिरकतात.

बसमधून जाताना माथेरानची डोंगर रांग अप्रतिम दिसत होती. दुरून चंदेरी कोणता हे ओळखू येत नव्हते परंतु जसजसे जवळ जात होतो तसतसा चंदेरी चमकू लागला होता👌. आमच्या ट्रेक लीडर्सने(मंदार सर आणि राणे सर, रोहित) बरोबर सांगितले होते. मोठा सुळका आणि जवळच एक छोटा सुळका दिसतो (नवरा-नवरी) तो चंदेरी आहे.  ट्रेकसाठी बरेचसे नवीन चेहरे होते परंतु पुणे ते चंदेरी प्रवासात ते आपलेसे आणि जुने झाले होते. 
शिवगर्जनेने ट्रेकला सुरुवात झाली आमच्यातील एका ट्रेकरने २ ओळी ऐकवल्या,
"ओळखलंत का मॅडम मला? “फोना”मध्ये आला कोणी,
कपडे होते सुपरमॅनचे आणि डोक्यावरती टोपी निळी, 
संधन व्हॅली रॅपलिंग ट्रेक नंतर भेटलात तुम्ही  
ताज्या झाल्या ट्रेकच्या आठवणी" 
वळून पहिले तर "ओळखले मी त्या क्षणी, अरे हे तर अविनाश आणि दिनेश, 
संधन व्हॅलीच्या ट्रेकदरम्यान इनोवेटिव्ह फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर खास" 
हास्यकल्लोळ करून जल्लोषात ट्रेक सुरूच राहिला. चंदेरी किल्ला आणि शेजारचा म्हसमाळ सुळका हे दोन्ही सुळके इंग्रजी व्ही अक्षराने जोडले गेलेत. एक डोंगर पार करताना अर्धातासभर चांगलाच चढाव असल्याने सगळ्यांनाच जरा दम लागत होता. यावेळी माझ्यासाठी खास व्यक्ती माझ्यासोबत होती माझा पार्टनर डीपी. 😊😊त्यामुळे मी मनोमन जास्त खुश आणि बिनधास्त होते.
आमचा वाट दाखवणारा मार्गदर्शक आम्हाला अचूक वाट दाखवीत होता. कारण घनदाट जंगल असल्याने एकट्याला वाट सापडणे तसे कठीण वाटत होते. चंदेरी आणि म्हसमाळच्या मध्ये जिथून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो आणि नदीला जाऊन मिळतो त्या दगडी घळीतून आम्हाला वाट काढत जायचे होते. हळूहळू ऊन वाढायला लागले होते. वाटेत डोंगराला वणवे लावून जंगल जाळून लाकूडतोड केलेली दिसली. लाकडाच्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या. मधेच एक मोठे मध काढलेले मधाचे पोळे आम्हाला दिसले.

११ वाजून गेल्यावर ती दगडी घळ चढताना चांगलीच दमछाक होऊन आम्ही थोडे थोडे थांबून थांबून चढत होतो. आमच्यातील ४-५ ट्रेकर(दिनेश,प्रतीक,दिगू,अविनाश, बनसोडे) थोडे पुढे गेले. मी माझ्या पार्टनरसोबत आणि इतर ट्रेकर सोबत थांबून थांबून चढाई करीत होते.


१२ वाजल्यानंतर मात्र उन्हाचे चटके जाणवू लागले आणि अतिशय घसरडा मुरबाड चढ आम्हाला कठीण जात होता.फासफूस करीत आणि पोहोचायचंच आहे असा निर्धार करून घळीच्या डाव्या बाजूने झाडांच्या मुळांना धरीत घसरड्या मातीशी सामना करीत चढत जाऊन त्या व्ही आकाराच्या जोडाजवळ पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला चंदेरी तर उजव्या बाजूला म्हसमाळ फोटोला पोज दिल्यासारखा दिमाखात उभा दिसतो.
चंदेरीचा सुळका अतिशय देखणा दिसत होता. परंतु तरीही तो अजून खूप दूर होता. आणि त्या घसरड्या छोट्या निमुळत्या वाटेवर कुठेही रेलिंग वगैरे काहीही लावलेले नाही. फार फार तर दगडाला धरून चढाई करीत होतो. भूक लागल्याने आणि दुपारी १२चे फेब्रुवारीतील कडक ऊन असह्य झाल्याने ४ पावले टाकली की अक्षरशः बसावे लागत होते. तरीदेखील त्या तशा दमलेल्या अवस्थेत देखील माझी फोटोग्राफ़ी सुरु होती. त्यामुळे मला एनर्जी मिळते.
चंदेरी सुळक्याजवळ चढाई करत असताना पलीकडे दूर मोरबे धरणाचा जलाशय नजरेस पडला. तिथूनच पुढे कलावंतींण आणि प्रबळगड पुसटसे दिसत होते. त्यांच्या आकारावरून मला ते ओळखता आले. या ठीकाणी आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने शांतपणे चढाई केलेली बरी नाहीतर जरा जरी घाई केली तर दरी आपल्याला कुशीत घ्यायला तयारच असते.

पुढे जाणारा प्रत्येक जण सतत थांबताना दिसत होता.पुढच्याला अजून किती वेळ आहे?? असे विचारल्यावर अजून पाचच मिनिटे आहेत असे आमच्या लीडर्सच्या शब्दात सांगून समजूत काढत असे.   असे करत करत एकमेकाला धीर देत  दुपारच्या एक वाजता आम्ही चंदेरीच्या सुळक्याजवळ पोहोचलो. परंतु गुहा काय अजून दिसता दिसेना. त्याठिकाणी आधी ५ मिनिटे बसून मग आम्ही गुहेकडे निघालो. अमोल, प्रवीण म्हणाले मॅडम तुमचा स्टॅमिना चांगला आहे.थँक यु ट्रेकर्स.  परंतु खरे तर माझे हाल काय होतात ते फक्त मला माहित असते. महत्वाचे म्हणजे  हा स्टॅमिना ट्रेकच्या सातत्यामुळे येतो. आपला निर्धार आणि फोना टीम आणि लीडर्सच्या सहकार्यामुळे कठीणातील कठीण ट्रेक देखील आपण सहज करू शकतो फक्त आपण लीडर्सच्या नियमांचे वेळोवेळी पालन केले पाहिजे.


जवळपास दीडच्या सुमारास आम्ही गुहेत पोहोचलॊ. गुहेत जाताना तिथे एक पाण्याचे टाके आहे त्यात रंगीबेरंगी मासे पहावयास मिळाले. यात कायम पाणी असते असे गणेश गाईड म्हणाला. आम्ही तोंडावर ते गार पाणी मारून गुहेकडे रवाना झालो. गुहेजवळ छोट्या घंटा असलेली कमान आहे. पुढे गेल्यावर गणपतीची मूर्ती आणि शंकराचे छोटे संगमरवरी मंदिर बांधलेले दिसले. इथे पूजा होत असावी असा अंदाज येतो कारण हळदकुंकू पसरलेले दिसले.  तसेच त्या छोट्या मंदिराजवळ लाद्या मारलेल्या दिसल्या. इतक्या वर हे सामान नेऊन हे बांधकाम कसे केले असावे हा मला आणि सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही फक्त पाणी आणि जेवणाचा डबा असलेली छोटी सॅक घेऊन जातो तरी थकून जातो.

शंकराची पिंड, नंदी  यांची पूजा करीत असतानाची पार्वतीची मध्यम आकाराची मूर्ती हसरी,अतिशय रेखीव देखणी होती. जे आधी पोहोचले ते ३-४ जण  जण इतर ग्रुपचे २ एक्सपर्ट ट्रेकर्स सोबत असल्याने सुळक्यावर गेले. खरंतर लीडर्सचा आदेशच होता की वरच्या कठीण सुळक्यावर यावेळी आपण जाणार नाही आहोत फक्त २००० फुटापर्यंत जाऊन गडाची माहिती घेऊन उतराई करणार होतो. टप्प्या-टप्प्याने ट्रेकर्स येत होते.चंदेरी  गुहेत पोहोचल्याचा आनंद स्वर्गसुखाइतकाच होता. त्या गुहेत ३०-४० जण आराम करू शकतील इतकी जागा आहे. पूर्ण गुहेला आतून चंदेरी रंगाचा स्प्रे केल्यासारखा वाटत होता. आम्ही आमचे जेवणाचे डबे काढून जेवण केले.
३०० फूट वर सुळक्यावर गेलेले आमचे दोघे ट्रेकर्स परत आले आणि आमच्यातील बनसोडे काकांना डिहायड्रेशन होऊन त्रास झालेला ऐकला त्यावेळी लीडर्ससहित सगळे फर्स्ट एड् चे सामान घेऊन सुळक्याकडे रवाना झाले त्यांना कसेबसे करून गुहेपर्यंत आणण्यात आले. ट्रेकिंग करताना आपले वय, आपणच आपली क्षमता ओळखून वेळोवेळी थोडेथोडे पाणी पिणे गरजेचे आहे.  गरजेप्रमाणे पाणी शरीरात गेले नाही तर पायात कळा येतात चालणे अशक्य होते आणि त्याचा त्रास स्वतःबरोबर सर्व ट्रेकर्सना देेखील होतो, वेळ वाया जातो. कृपा करून सर्व ट्रेकर्सनी याची नोंद घ्यावी.जेवण झाल्यावर  ट्रेकर्स ची ओळख करून घेतली. फोनासोबत प्रत्येक वेळी हुरहुन्नरी ट्रेकर्स असतातच. यावेळी रोहितचा मित्र प्रवीण हरपळे हा एक त्यातला होता. "महाराष्ट्रातील गढी" यावर तो पुस्तक लिहितो आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी उत्कृष्ट  कला असते त्याचे ज्ञान पुस्तकरूपाने तोच आपल्यासमोर आणणार आहे.प्रवीणला शुभेच्छा दिल्या. 


ट्रेकिंगचे सातत्य आणि ब्लॉगचे सातत्य यासाठी मला, माझ्या पार्टनरला तसेच फोनाचे ८० ट्रेक उत्कृष्टरित्या(बेष्टंम बेष्ट) पार पाडले यासाठी ट्रेक लीडर्स राणे सर आणि मंदार सर यांना रोहितने फोना ट्रेकर्स ग्रुप आणि  फोनाच्या सेक्रेटरी निर्मला मॅडम, निकाळजे काका  यांच्या कडून "शौर्यगाथा मावळ्या शक्तिपीठांची" हे प्रमोद बोराडे आणि प्रिया बोराडे लिखित पुस्तक बक्षीस देण्यात आले. लीडर्सचा सत्कार म्हणजे सगळ्या ट्रेकर्सचे आणि फोना टीमचे कौतुक. 'अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे" या राजू राऊतांच्या पोवाड्याने गुहा दणाणून गेली. आमच्यातील ३ ट्रेकर्स चंदेरी सुळक्यावर गेले होते ते म्हणाले की गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. छोटी अरुंद वाट, खाली दरी त्यामुळे हल्ली सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. वर  शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा एका मोठ्या शिळेवर भगव्यासोबत विराजमान आहे
सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरखगड, पेठचा किल्ला इ. दिसतात.बाकी काही असो वेळेअभावी मला त्या तिन ट्रेकर सोबत चंदेरी सुळक्यावर जाता आले नाही त्यामुळे अजूनही जीवाची अतिशय घालमेल होतेय.😢 तब्बेत बिघडलेल्या ट्रेकरला बरे वाटल्यावर बॅनर फोटो काढून ४ वाजता चंदेरी किल्ला उतराईस सुरुवात केली. उतरताना आजूबाजूचे गड, किल्ले, घनदाट जंगल डोळ्यात आणि  कॅमेऱ्यात साठवून घेतले आणि उतराईला सुरुवात केली. आजूबाजूला कसलाही आधार नसल्याने आणि घसरडे असल्याने चढताना जितके कठीण वाटत होते त्यापेक्षा जास्त उरताना पाय लटपट करीत होते.


यावेळी ट्रेक मध्ये मी आणि निर्मला अश्या दोघीच लेडी ट्रेकर्स  असल्याने मला आमचा दोघींचा अभिमान वाटत होता तरीही मी कविता, ऋतुजा, बाकीच्या सर्व लेडी ट्रेकर्सना मिस करीत होते. कारण त्यांनी हा चंदेरीचा अप्रतिम सोनेरी ट्रेक मिस केला.उन्हामुळे चढताना साडेतीन ते ४ तास लागलेला चंदेरी दोन ते ३ तासात उतरलो. उतरताना ६ नंतर सावली असल्याने थोडा गारवा होता. एकीकडे सूर्य मावळत होता परंतु आम्ही चंदेरीच्या एकदम पायथ्याशी चालत असल्याने आम्हाला तो दिसत नव्हता परंतु त्या संधीप्रकाशात सह्याद्रीच्या डोंगररांगा अतिशय गडद दिसत होत्या. अंधार होऊ लागल्याने सकाळी न दिसलेले घोस्ट ट्री आता उठून दिसू लागले होते.

शेवटचा टप्पा पार करताना पायातले बळ नेहमीच संपते. परंतु इतका मोठा गड सर केल्याचा परमानंद असतो.यावेळी पार्टनर सोबत असल्याने आणि त्यात लग्नाचा वाढदिवस असल्याने मला हा ट्रेक कायम स्मरणात राहील असा होता. ७ च्या सुमारास पूर्ण अंधार झाल्यावर मोबाईल बॅटरीच्या उजेडात चिंचवली गावात आम्ही पोहोचलो. आमचा गाईड गणेश याने शेवट पर्यंत सर्व ट्रेकर्स येईस्तोवर आमची साथ सोडली नाही. त्याचा आणि चंदेरीचा समाधानी मनाने आणि जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही अंताक्षरीच्या तालात पुन्हा त्याच मार्गाने पुणे गाठले. फोना लीडर्सचे उत्तम-योग्य नियोजन आणि सर्व ट्रेकर्सचे उत्तम सहकार्य यामुळे फोना टीमचा ८० ट्रेक उत्तमरीत्या पार पडला. या ट्रेकचे बेस्ट फोटोग्राफर दीपक, रोहित, जय, प्रतीक,दिगू, दिनेश,अविनाश, शेवाळकर सर, प्रवीण लष्करी  सर आणि सगळ्यांचेच विशेष कौतुक. "फोना रॉक्स."   


गणेश ढुमणा-चंदेरी ट्रेक गाईड मोबाईल नंबर-७०३०९७६७८०)

Tuesday, 23 January 2018

ओढ हरीहरची सुरुवात नव्या वर्षाची...।


हरिहर किल्ला
ठिकाण-नासिक जिल्हा
उंची- ११२० मीटर
चढाई श्रेणी-मध्यम
प्रकार- गिरिदुर्ग
दिनांक- २१ जानेवारी २०१८
हरिहरगड विषयी माहिती- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर  हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे ट्रेकर्स च्या  परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा एका बाजूने त्रिकोणी तर एका बाजूने आयताकृती आकाराचा किल्ला, कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्या बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही.या दगडी जिन्याच्या तो प्रेमात पडला आणि आपण ज्याच्या प्रेमात पडतो त्याला उध्वस्थ करण्याची इच्छा कधीच होत नाही.  यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन म्हणजेच "फोना"या ट्रेकिंग ग्रुपने आतापर्यंत पुणे,रायगड, नगर,ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवरील अनेक गड-किल्ल्यांचे ट्रेकिंग केले आहे. यावेळी आम्हा ट्रेकर्सच्या आग्रहाखातर म्हणा किंवा दूरच्या पाहुण्याला भेटायला जायच्या ओढीने म्हणा देवीदेवतांचे शहर नासिक शहर याठिकाणी ट्रेकिंगची वारी वळवली. नासिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या हरिहर किल्ल्याचे नाव ऐकताच झटपट ट्रेकिंगसीट बुक झाल्या कारण २ वर्षे झाली आम्ही सर्व  ट्रेकर्स हरिहर किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी आतुर होतो.या वर्षातील हा पहिलाच ट्रेक असल्याने सगळेच ट्रेकर्स उल्हासीत होते. दिनांक २०जानेवारीला शनिवारी रात्री ११च्या दरम्यान आमची बस निगडी-तळेगांव-चाकण-नारायणगाव-नासिक-त्र्यंबक रोड मार्गे निरगुडपाडा या ठीकाणी पहाटे ५ वाजता पोहोचली.प्रवासातच यावेळी फोना ग्रुपच्या नावाच्या निळया रंगाच्या टोप्या वाटप करण्यात आल्या त्यामुळे आमचे चेहरे प्रफुल्लित झाले होते."आज ब्लु है पानी पानी आणि आम्ही आनंदी साऱ्या जणी असे झाले होते.' 

पुणे ते हरिहरकिल्ला हे अंतर सुमारे २४५ कि. मी. इतके आहे.इथे पोहोचण्यास  सुमारे ५ ते साडेपाच तास लागले. पोहोचल्यावर तिथले वातावरण झुंजुमुंजूच होते. त्या १५ ते २० घरांच्या गावात गायी दावणीला बांधलेल्या होत्या. कडाक्याची थंडी आणि धुकेही पसरलेले होते.परंतु ट्रेकिंगसाठी खूप वाहने थांबलेली दिसली त्यामुळे सारे गाव जागेच होते. चहाचा सुगंध येत होता. पोहोचल्यावर आधी शेकोटी पेटवली आणि लगेचच फ्रेश होऊन चहा घेऊन  हलका नास्ता केला. आमच्या अगोदर तिथे बरेच ट्रेकिंग ग्रुप हरिहरची चढाई करण्यास तयारीत होते. लीडर्सने किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती दिली आणि ट्रेकिंग विषयी सूचना करून लगेच ट्रेकला सुरुवात झाली.
सकाळचे वातावरण अतिशय रम्य होते. एकदा का वॉर्म अप झाला की थंडी हळूहळू कमी होते त्यामुळे आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या असलेली सॅक पाठीवर अडकवली आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत निघालो.  हरिहर गडाची उंची पाहून जरा हबकलोच परंतु फोना ट्रेकर्स ४० जणांचा मोठा ग्रुप घेऊन मस्त पैकी मजा मस्ती करीत निघाल्यावर कसली आली भीती आणि धास्ती. त्या ठिकाणी छोटे छोटे पाडे असल्याने आणि भात शेती असल्याने अनेक वाटा शेताकडे विहिरीकडे जात होत्या त्यातून नेमकी पाऊलवाट पकडून आम्ही हरिहरच्या चढावावर येऊ लागलो. सागाच्या वृक्षांची पानांची छाटणी केलेली होती तरीही ती हेअर कट केल्यासारखी देखणी दिसत होती.
उजेड येऊ लागला होता आणि थंडी कमी झाली होती परंतु जसजसे वर जात होतो तसतशी थंडी लागत होतीच. इतरही ट्रेकिंग ग्रुपची जणू जत्राच होती. २ तासांचे अंतर कापून गेल्यावर हरिहरचा तो डोळ्यांचे पारणे फेडणारा दगडात कोरलेला जिना समोर येऊन स्वागताला जणू उभा होता. एक ग्रुप उतरत असताना दुसरा मोठा ग्रुप चढाई करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तिथे मनसोक्त फोटोग्राफी केली. गडाच्या उजव्या बाजूला वैतरणा धरणाचा जलाशय आणि सर्वत्र पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगा डोळ्यांना सुखवीत होत्या.
हरिहरगडचा तो दगडी प्रशस्त जिना एखाद्या पहाडी मित्रासारखा आमची वाट पाहत आमच्या स्वागतासाठी आपले बाहू पसरून उभा होता. "आ जावो मुझमें  समाँ जावो" असा म्हणत होता जणू. जितके त्याला न्याहाळत होतो तितके त्याचे सौंदर्य खुलून दिसत होते. एक ग्रुप पुढे गेल्यानंतर आम्ही चढाईस सुरुवात केली. कॅमेरा मोबाईल सगळं आवरून सॅक मध्ये टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्या जिन्याच्या पायऱ्यांना पकडण्यासाठी खोबण्या केलेल्या होत्या. परंतु चढाई करताना मागे पहिले की डोळे गरगर फिरत होते. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. आम्ही एकामागून एक हळूहळू त्या पायऱ्या चढत होतो.
९० पायऱ्यांचा जिना चढल्यावर ती भगवी सुंदर कमान ओलांडून एक टप्पा पार केला आणि मागून येणाऱ्या ट्रेकर्सची रांग न्याहाळत राहिलो. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वाराशेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल.  या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर  एक नेढे दिसते. 


त्यानंतर परत साधारण ३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी  आम्हाला दिसला.

 
एक मोठा रॉक प्याच पार करून प्रतीक आणि दिगूच्या मार्गदर्शनाखाली सावल्यांच्या खेळाची वेगळी फोटोग्राफी केली. दिनेश सरांच्या डी एस एल आर ने खूप छान सोबत केली.या ठिकाणाहून वैतरणाचा जलाशय आणि गडाच्या पायथ्याची गावे एखाद्या  चित्राप्रमाणे भासत होती. 
पुढच्या पायवाटेने निघालो तेव्हा उजव्या हातास ३०ते ४० फूट उंचीची एक कोणतीही लोखंडी रेलिंग नसलेली एक टेकडी आम्हाला दिसली. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी शेवटचा कातळटप्पा चढून पार करावी लागते.आम्ही त्या टेकडीला बालेकिल्ला म्हणालो. कलावंतीण गडाची देखील वरच्या माथ्याची अगदी अशीच रचना आहे. त्या बालेकिल्ल्यावर इतर ग्रुपची प्रचंड गर्दी होती त्यामुळे आम्ही पूर्वेकडील समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत गेलो मी आत उतरून प्रवेश केला तिथे खूपच अंधार होता. कोपऱ्यात एक दिवा होता यावरून तेलाचा दिवा रात्री तिथे लावीत असावेत.  प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. कोठारातून बाहेर आल्यावर आम्ही ब्रह्मा आणि ब्रह्मगिरी मनसोक्त न्याहाळला आणि बालेकिल्ल्याकडे निघालो.
बालेकिल्ल्यावरून २ ग्रुप उतरल्यानंतर आमचा ग्रुप झपाझप वर माथ्यावर जाऊन पोहोचला. कसलाही आधार न घेता चढणे तसे कठीणच आहे परंतु फोना असल्यावर कसली भीती आणि भय. बघता बघता आमच्यातले काही ट्रेकर्स आमच्यापुढे माथ्यावर पोहोचलेले पाहून मला खूप कौतुक वाटले. कीप इट अप ट्रेकर्स. 
येथे माथ्यावर पोहोचताच  या टेकडीच्या माथ्यावरून सभोवतालचे दृश्य मात्र अप्रतिम दिसते. इतर ट्रेकिंग ग्रुपची तिथल्या गडांविषयीची चर्चा मी ऐकत होते. गडाच्या डावीकडे नजर फेकताच वाघेरा तर  उंजवीकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. एकीकडे कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.

एकामागोमाग एक फोना टीमचे सगळे ट्रेकर्स हरिहरच्या माथ्यावर पोहोचले आणि एकच जल्लोष झाला. फक्त या सगळ्यात उंच भागावर लोखंडी रेलिंग नसल्याने अतिशय सावधगिरीने वावरलेले चांगले. फोना बॅनर फोटो आणि सोलो फोटोग्राफी  करून प्रतीकने भगव्यासोबत शिवगर्जना करून गड दणाणून सोडला होता. उतरताना नुसता कात्रज ते सिह्गडच्या ट्रेकसारखा घसारा होत होता.हरिहरच्या पूर्ण पठारावर खूप ट्रेकर्स मावळ्याप्रमाणे  भासत होते.
यावेळी थ्रिल्लिंग ट्रेक असूनदेखील मुलींची संख्या जास्त असल्याने खूप छान वाटत होते.  १२ च्या सुमारास हरिहर गड उतरण्यास सुरु केले पोटात मात्र आता कावळे नाही तर डोमकावळे ओरडायला लागले होते इतकी भूक लागली होती. गड उतरताना तर खरी कसरत करावी लागली. चढाई करताना त्या पायऱ्या चढणे थोडे तरी सोपे वाटत होते परंतु उरताना मात्र उलटे वळून उतरावे लागत होते. जरा अंदाज चुकला तर दरीत पडण्याचा संभव होताच. परंतु योग्य अंतर ठेवून एकमेकांच्या सोबतीने पायर्यांचा अंदाज घेऊन उतरले गेल्याने ती गोष्ट देखील जरा सोपी जाऊ लागली. जस जसे खाली उतरू लागलो तसतसे हायसे वाटू लागले. आता ९० पायऱ्यांचा पाषाणी जिना चढताना खरी कसरत करावी लागली पाय थोडे लटपटत होते पण एकमेका साहाय्य करू एवढे धरू सुपंथ. एकमेकांचे पाय मात्र धरू नये नाहीतर एका रांगेत सगळे ट्रेकर्स खाली सरकण्यास वेळ लागणार नाही.
जाताना ३ ते साडेतीन तास लागले परंतु उतरताना मात्र २ ते सव्वादोन तासातच आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्ही ५-७ ट्रेकर्स थोडा १ कि. मी चा जास्तीचा फेरा मारून निर्गुडीपाडा मध्ये पोहोचलो. गडावरील पाण्याचा तलाव आणि पाण्याचे टाके स्वच्छ होते. परंतु काही ठिकाणी चॉकलेट्सच्या रॅपर्सचा कचरा होता तो येताना प्रतीक गोळा करून घेऊन आला.कीप इट अप प्रतीक. 

तेथील खेडेगावात आल्यावर तिथे एका घरात जातानाच साध्या जेवणाची सोय केली होती परंतु ते जेवण अपेक्षेपेक्षा अतिशय उत्तम होते. वाखाणण्याजोगे होते. जेवण आटोपल्यावर लगेच पुण्याच्या दिशेने निघालो. हरिहरचा निरोप घेताना जरा मन जड झाले होते. वेळेअभावी येताना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वळता आले नाही तेथील सगळे गड एका माळेत मणी ओवावेत तसे एकसारखे माळेप्रमाणे भासत होते.बसमधून तेथील सातमाळाचे उत्तम दर्शन झाले.
शेवाळकर सरांचा वाढदिवस असल्याने "फिरसे कहो कहते रहो"  या गाण्याने अन्ताक्षरीला चार चाँद लगा दिए.सगळ्यांनीच अन्ताक्षरीमध्ये उत्तम सहभाग घेऊन रंगत आणली. फोनाचा ७९ वा ट्रेक लीडर्स आणि सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे बेस्टम बेस्ट रीतीने पार पडला. फोना रॉक्स. 


Monday, 25 December 2017

अखेरचा दंडवत....२०१७

अखेरचा दंडवत
“नाणेघाट ट्रेक”
उंची - २७२४ फूट
ठिकाण - पुणे जिल्हा
चढाई श्रेणी- मध्यम
दिनांक – २४ डिसेंबर २०१७ 

नाणेघाट इतिहास-नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला.प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचेराज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते.नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अंदाजे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.
पुणे ते नाणेघाट अंतर सुमारे ११० कि. मी आहे. मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे यावे.पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो.
"फोना" टीमचा ७८ वा  ट्रेक नाणेघाट आणि नानाचा अंगठा हा आयोजित केला गेला. या वर्षीचा हा अखेरचा ट्रेक होता. रविवार दिनांक २४ डिसेंबर २०१७ या दिवशी फोना टीमची ३४ ट्रेकर्सची बस तळेगांव-निगडी-चिंचवड-नाशिकफाटा-राजगुरू मार्गे नाणेघाटाकडे निघाली. आमचे २-३ ट्रेक मेंबर येईस्तोवर नाशिकफाटा येथे नारळ फोडून ग्रुप फोटो घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. एका ठिकाणी आकाश प्युअर व्हेजचा चहा येईस्तोवर आम्ही  येथे एक छानशी बैलगाडी सजवून तयार ठेवली होती तिथे आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली.


अश्या अनेक बैलगाड्या असत्या आजच्या काळात तर त्यातूनच ट्रेकचा प्रवास केला असता की जेणेकरून प्रदूषणाला आळा बसला असता. परंतु वेळेअभावी आणि सोयीअभावी साईनाथ ट्रॅव्हल्स जिंदाबाद.

चहा नास्ता कमी वेळात आटोपून आम्ही अंताक्षरीच्या तालावर पुढच्या प्रवासाला निघालो त्यामुळे  प्रवास कसा भर्रकन झाला कळलेच नाही. बसमधून सह्याद्रीच्या रांगांचे नजारे पाहावे तेवढे थोडे आणि आणि डोळ्यात साठवावे तेवढे थोडे. कितीही अन्ताक्षरीमध्ये गुंग असले तरी मी सह्याद्रीची चालती फोटोग्राफी केव्हाही चुकवली नाही. जाताना पावसाळ्यात अतिशय सुंदर मनमोहक दिसणारा आणि धबधब्यांनी ओथंबून वाहणारा माळशेज आज बिनपावसाचा सुद्धा अप्रतिम भासत होता. सहलीला आल्यासारखे आम्ही खास फोटोग्राफीसाठी केव्हाही मध्ये बस थांबवत नाही कारण एका दिवसाचा ट्रेक असल्याने वेळेत आणि सुखरूप पार पाडणे हा फोना टीमचा नियमच आहे. परंतु नवीन मेंबर्स मधील एका लहान मुलाला  बसचा थोडा त्रास होत असल्याने ५मिनिटे बस  थांबली असल्याने आम्ही  माळशेजघाटाचे सौंदर्य न्याहाळले आणि पुढच्या प्रवासाला निघालो.  जाताना आमचे लीडर मंदार सरांनी भैरव गडाची ओळख करून दिली भैरवगडचा सुळका भयानक तितकाच मनमोहक दिसत होता. लीडर्स आम्हाला भैरव गडाचा ट्रेक एकदा तरी घडवा.
(वरील  फोटोमध्ये  पाठीमागे तारामतीचे शिखर दिसत आहे.)
सकाळी ६ वाजता निघालेलो आम्ही नाणेघाटाच्या पायथ्याशी ११:३० च्या सुमारास पोहोचलो. लीडर्सने नाणेघाटाविषयी थोडक्यात माहिती देऊन ट्रेकविषयी सूचना करून आणि मेंबर्स नुसार ट्रेक  लीडर्सची विभागणी करून १२ वाजता ट्रेकची सुरुवात झाली.

त्या रणरणत्या उन्हात ट्रेक सुरु झाल्याने  उन्हाचे चटके सोसावे लागणार याचा अंदाज आला. मला आधी वाटले होते इतके उंच नसावे परतून टोकवडे येथील कमानीजवळून थोडे पुढे गेल्यावर नाणेघाटातील नानाचा अंगठा अक्षरशः छोट्या अंगठ्यासारखा दिसत होता म्हणजे तो किती उंच असावा याची कल्पना करा. प्रचंड ऊन आणि लगेच चढाव असल्याने सगळ्यांनाच एक तासभर वॉर्म अप होईस्तोवर खूप जड जात होते.  त्यानंतर मग आपोआप क्षमतेनुसार ग्रुप पडत जातात.

नवीन ट्रेकरची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत लीडर्स थांबून त्यांना शिवकालीन इतिहासातील गोष्टी सांगून त्यांचा उत्साह वाढवून स्वतः घेऊन येतात. ही फोना टीमची खासियत आहे. लेमन गोळी, tang,फ्रुटस, काकडी त्या उन्हात चांगलीच उपयोगात येत होती. नाणेघाटात जाताना २ ओढे लागले त्यातील पाणी मात्र आता आटलेले होते. अधेमध्ये कुठेही पाण्याची खाण्याची सोय नाही. टोकवडे पासून घाटामध्ये अंदाजे १ कि.मी अंतरावर एक विहीर आहे फक्त तिथेच पाणी मिळू शकते. त्यामुळे आमच्याजवळील पाणी वाचवणे गरजेचे होते. आम्ही १०-१२ मेंबर्स सोडलो तर बाकीचे कोणीही आम्हाला आमच्यासोबत दिसत नव्हते.



जसजसे वर जाऊ लागलो तसतसे नाणेघाट आणि नानाचा अंगठा यांना जोडणारी छोटी खिंड आम्हाला दिसू लागली आणि हायसे वाटले. तेथील बरेचसे लोक ह्या नाणेघाटातील कठीण रस्त्याचा खाली उतरण्यासाठी वापर करताना दिसले ४वर्षाच्या मुलांपासून ते म्हाताऱ्या आज्जीबाईपर्यंत तो ३-४ तास लागणारा कठीण घाट उतरत होते. मला खूप नवल वाटले कारण इतकी वाहनांची सोय असताना इतका त्रास करून उतरणारे म्हणजे राजेंच्या राज्यातच असू शकतात.


दुपारी २ च्या सुमारास मात्र पोटामध्ये कावळे नाही तर डोमकावळे ओरडू लागले परंतु  समोर गड चढाईअजून  बाकी असल्याने आम्ही गडावर जाऊन जेवावे असे ठरवले. अजून अर्ध्या तासाने एक पाण्याचे टाके दिसले रिकाम्या बाटल्या भरून ते स्वच्छ गार पाणी थोडे तोंडावर मारल्याने थकवा लगेच कमी झाला. अश्या पाण्याच्या टाक्या जेव्हा गडावर असतात तेव्हा त्यातील पाणी दिसताना गडद रंगाचे दिसते परंतु ते पिण्यालायक असते त्यात कृपा करून हात पाय धुवू नयेत.जवळचे पाणी संपल्यावर हेच पाणी खूप ट्रेकर्स पिण्यासाठी वापरतात. आपल्या जवळील रिकामी बाटली काढून ती भरून घेऊन बाजूला घेऊन त्याचा वापर करावा.


म्हणता म्हणता कितीही थकलो तरीही फोटोग्राफी करत ३च्या सुमारास आम्ही नाणेघाटावर असणाऱ्या गुहेजवळ पोहोचलो. त्या ठिकाणी सहलीला आलेले पर्यटक खूप होते. आम्ही हा घाट चढून आलोय हे सांगितल्यावर खूप लोक आश्चर्याने आमच्याकडे पाहत होते त्यावेळी फिलिंग लईच proud. नाणेघाटावर पोहोचल्यावर तिथे खूप मोठ्या संख्येने स्वागत केले ते वानरसेनेने. आम्ही चुकून जरी काही खाऊ बाहेर काढला तर आमची खैर नव्हती. पर्यटक देखील मोठ्या संख्येने असल्याने ती वानरसेना जरा जास्त मस्ती करत होती. खूप लोक दिसल्यावर त्या वानरसेनेलासुद्धा असुरक्षित वाटत असावे. नाणेघाट चढून गेल्यावर दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.

हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाके आढळतात.
तिथेही २-३ टाके थोडे अस्वच्छ दिसले. 1 टाके स्वच्छ होते. त्याच ठिकाणी लोखंडी रेलिंग लावले आहे परंतु जरा सांभाळून राहिलेले बरे. कारण हे रेलिंग आधार म्हणून लावलेले असतात. इथे रॅपलिंग साठी योग्य पॅच आहे असे दिसले आणि रॅपलिंगसाठी हुक फिक्स केलेले देखील दिसले.मला संधन व्हॅलीच्या रॅपलिंगची आठवण झाली.हळूहळू २-२ ट्रेकर्स येताना दिसत होते तरीही आमच्यातील २लीडर्स आणि ४-५ ट्रेकर्सचा अजून पत्ताच नव्हता त्यावेळी असे समजले की एका नवीन ट्रेकरला उन्हामुळे जरा जास्तच त्रास होत होता.
न रहावून ३:०० च्या सुमारास आम्ही बाहेरच जेवणाचे डबे काढून जेवायला बसणार इतक्यात त्या छोट्या खिंडीमध्ये वरून छोटे छोटे दगड पडताना दिसले वर पाहतो तर ३०-४० माकडे चारी बाजूने आमच्याकडे रोखून पाहत होती. आम्ही लगेच उठून तेथील जाळी असलेल्या गुहेत अक्षरशः दार लावून जेवायला बसलो.



नंतर बाहेर थोडी विश्रान्ती घेतली तोपर्यंत हळूहळू बाकीचे ट्रेकर्स येऊ लागले. ४ च्या सुमारास सर्व ट्रेकर्सने जेवण आटोपून उशिरा आलेल्या ट्रेकर्सची झालेली हालत कथन केल्यावर नानाच्या अंगठ्यावर आम्ही निघालो. तिथून गुहेच्यावर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो. जाताना तो मोठा रांजण दिसला की ज्यात टोल म्हणून नाणे टाकले जायचे त्यात पाणी भरलेले होते. आम्ही देखील खरी नाणी त्यात टाकली.आणि नानाच्या अंगठ्यावर चढाई सुरुवात केली.
येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते.काही मेंबर्स आता पार दमले होते. मी एक वर्षांपूर्वी जीवधन गड केला होता तेव्हा नानाच्या अंगठ्यावर ५मिनिटे जाता आले होते त्यावेळी तो सूर्यास्त अप्रतिम असा होता.  आम्ही ७-८ मेंबर्स फक्त नानाच्या अंगठ्यावर गेलो असू. त्यामुळे मला वाटले की सर्व ट्रेकर्स  इतक्या उंचीवर आलेत तर हा नानाचा अंगठा अर्ध्या तासाचा गड सर करूनच जावे.नानाच्या अंगठ्यावर चढताना तसा  खूप चढ असल्याने थोडे कठीण जात होते.
परंतु ती वेळ आता संध्याकाळची असल्याने गार हवा सुटली होती. उन्हाचा तडाखा पूर्ण कमी झाला होता. तिथे गेल्यावर भगव्या सोबत समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात. नानाच्या अंगठ्यावर पोहोचल्यावर खाली वाकून चहूबाजूने पाहिले असता माझा स्वतःचा माझ्यावर विश्वास बसत नाही की इतक्या अडीच हजार फूटाहून अधिक उंचीवर आपण आहोत.कुठून येतं इतकं बळ?ही फोना टीमची जादू आहे हो😊😊.फोना टीम Rocks👌👌 भगव्यासोबत ग्रुप फोटो बॅनर फोटो आणि सोलो फोटो घेतले आणि नानाच्या अंगठ्याचा निरोप घेऊन आम्ही नाणेघाटावरून निघालो. जाताना तेथील पाठमोरा  सूर्यास्त अप्रतिम असा होता.





नाणेघाटातून निघाल्यावर मी आणलेला गाजराचा हलवा प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाल्ला असेल कारण तो थोडाच होता. त्यानंतर आमची बस पुन्हा पुण्याच्या वाटेला निघाली.  संध्याकाळी ६ वाजता नाणेघाटातून निघालेली बस मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबली. तेव्हा रात्रीचे ८ वाजून गेले होते. यावेळी सुद्धा वेळेअभावी नवीन ट्रेकर्सची ओळख करून घ्यायचा कार्यक्रम राहून गेला. चहाच्या वेळेत बसच्या जवळच फोनाच्या पुढच्या सहली आणि ट्रेकचा अहवाल लीडर्सनी थोडक्यात सांगितला. फोना ट्रेकर्स मध्ये नेहमीच हुरहुन्नरी कलाकार आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्ती हजेरी लावीत असतात. यावेळी सगळ्याच चांगल्या ट्रेकर्स सोबत लिम्का बुक आणि गिनीज बुक या दोन्ही मध्ये त्यांच्या नावाचा रेकॉर्ड केलेले संतोष होली आमच्या सोबत आले होते. त्यांनी १११ दिवसांमध्ये १५५०० कि. मी. सायकलिंग करून २२ राज्ये ते फिरले आहेत. शिवाय हा भरभक्कम  रेकॉर्ड त्यांनी BSA च्या साध्या सायकल वर केला आहे हे मात्र नवल. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा. या कार्यासाठी फोना टीमची त्यांना ३७००० रूपयांची मदत झाली हे त्यांनी स्वतः सांगून फोनाची शान अजूनच वाढवली आहे.संतोष होली यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन आम्ही आमच्या घरच्या प्रवासाला निघालो. चहा  घेतल्यानंतर आता सगळे ताजेतवाने झाले होते. त्यामुळे लीडर्स सहित सगळे पुन्हा अंताक्षरीच्या नादात रात्री ११च्या दरम्यान घरी पोहोचलो. फोना टीम चा ७८ वा नाणेघाट आणि नानाचा अंगठा हा ट्रेक सगळ्या ट्रेकरच्या सहकार्याने पार पडला. सुखरूप ट्रेक घडवून आणल्याबद्दल ग्रेट लीडर्स मंदार सर, निकाळजे काका, रोहित, यांना धन्यवाद. आणि ट्रेक दरम्यान उत्तम सहकार्य केल्याबद्दल सर्व  ट्रेकर्सना धन्यवाद. टीम फोना रॉक्स.