Monday 17 October 2016

"कलावंतीणगड ट्रेक"एक अविस्मरणीय अनुभव..

कलावंतीण दुर्ग ट्रेक
ठिकाण- रायगड जिल्हा
उंची- २३०० फूट
चढाई श्रेणी- कठीण
दिनांक-१६ ऑक्टोबर २०१६.

गडाची माहिती आणि इतिहास-रायगड जिल्ह्यात पनवेल पासून १५ कि. मी.अंतरावर माथेरानच्या डोंगर रांगेत कलावंतीण हा गड आहे  मुंबई पुणे महामार्गावरून जाताना डाव्या बाजूला आपणास एक डोंगररंग दिसते या डोंगर रांगेत अनेक किल्ले आपल्याला खुणावत असतात पण  "प्रबळगड" आणि "कलावंतीण सुळका" हे दोन जोड किल्ले आपले खास लक्ष वेधून घेणारे आहेत. प्रबळगड त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आहे. तसेच गडाचा पसारा देखील विस्तीर्ण आहे. इतिहासात कलावंतीण दुर्ग नावाने नोंद असणारा हा बुरुज समुद्र सपाटीपासून २३०० फुट उंचीवर आहे. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये हा किल्ला घेतला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये याचाही समावेश होता. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्व देखील आहे. कलावंतीण या नावाचा अर्थ "नर्तिका" होतो. मूळ अर्थ कला सदर करणारी. पण सर्रास पणे नर्तिकेसाठी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे असे समजले जाते की इथे एका नर्तिकेचे वास्तव्य होते ज्यामुळे यास "कलावंतीण" हे नाव पडले. तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की  एका राजाचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राजाने कलावंती राणीच्या नावाने हा किल्ला बांधला असावा.
कलावंतीण गडाच्या नावामुळे आणि प्रबळगडावरून घेतलेल्या छायाचित्रांमुळे कलावंतीण गड मला नेहमी आवडत असे. आज प्रत्यक्ष तिथे मी जाणार म्हटल्यावर मनातून मी जास्त खुश होते. 

फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन(फोना) चा ६८ वा कलावंतीण गड ट्रेक दि.१६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी आम्ही पूर्ण केला. मागच्या वेळेस "फोना"चा प्रबळगड ट्रेक माझ्याकडून मिस झाला होता त्यामुळे कलावंतीण गड मिस नाही करायचा असे ठरवले होते. परंतु १५ दिवसात ट्रेक करणे म्हणजे माझ्यासाठी जरा अवघड होते कारण मी सुद्धा माणूसच आहे. महिन्यातला एक ट्रेक म्हणजे माझ्यासाठी खूप झाला. परंतु एकदा ट्रेक ला गेले की कितीही असह्य झाले तरी फोनासोबत ट्रेक असला की माघार घेणे नाही मी तो पूर्ण करतेच आणि  "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ." ह्या म्हणीनुसार गड चढताना कितीही कठीण टप्पा आला तरी एकमेकांच्या मदतीने ट्रेक पूर्ण होतोच होतो. मी ट्रेक करते म्हणजे मी काय फार मोट्ठी ट्रेकर नाही आणि ब्लॉग लिहिते म्हणजे मी काय खूप मोट्ठी लेखिका नाही. एक ट्रेक केला आणि  ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आणि एक ब्लॉग लिहिला आणि लिहिण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे सगळ्यांनी एक ब्रीदवाक्य लक्ष ठेवा "कोणालाही कोणत्याही वयात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये." आवड असली की सवड आपोआप मिळते. 
सकाळी ६:३० ला निघालेली आमची बस "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट" आणि अजून अश्या कितीतरी गाण्याच्या सुरात, नादात १० वाजता गडाच्या पायथ्याशी केव्हा पोहोचली तेदेखील समजले नाही. गडाच्या पायथ्याशी बस लावून ट्रेक ला सुरुवात केली. इथे जाण्याआधी कलावंतीण गडाचे फोटोज पाहिले होते ते दृश्य तिथून तरी दिसत नव्हते.


सुरुवातीला थोडेसे चालल्यावर आम्ही काहींनी शॉर्ट कट चा रास्ता निवडला सॉलिड दमछाक झाली. मला तर असे वाटले की मी आजचा ट्रेक पूर्ण करूच शकणार नाही. खरे कारण होते दमट वातावरण आणि गडाचा चढ जास्त होता. सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आम्हाला वाटले की गडाच्या शेंड्यावर एवढे ऊन नसेल परंतु तसे काही घडले नाही. जाईसतोवर ज्याला चरबी नाही त्याची सुद्धा चरबी वितळली असेल. 


परंतु सोबत्यांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने पुन्हा चढाई सुरु ठेवली  दीड तासांनंतर पहिली १० मिनिटांची विश्रांती झाली आणि खडकावर उंच हवेत फोटो काढल्याने आणि लिंबू सरबत प्यायल्याने पुन्हा उत्साह आला. थोड्या वेळाने मात्र कलावंतीण आणि प्रबळगड दिसू लागले. परंतु दोन्ही गड आपल्या अंगावर येत आहेत की काय असे भासत होते.



इथे दगडात कोरलेली गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती रेखीव दिसत होती. 


आधी असे ठरले की या ठिकाणी जेवण करून थोडी विश्रांती घ्यावी आणि मग चढाई सुरु करावी परंतु जेवल्यावर गड चढणे जाम जीवावर येते आणि एकदाचा कलावंतीण गड फत्ते करावा आणि मगच काळजाला ठंडक मिळेल असे वाटले. माची प्रबळ या तिथल्या आदिवासी लोकांच्या वस्तीतील गावातून अर्ध्या-पाऊण तासात प्रबळगड आणि कलावंतीण गड च्या खिंडीत आम्ही पोहोचलो. तिथून खाली पाहिले की विश्वास बसत नव्हता की आम्ही त्या व्ही आकाराच्या खिंडीमध्ये आलोय. तिथून मात्र कलावंतीण चा शेवटचा टप्पा अतिशय कठीण दिसत होता.




संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या (होळीच्या)सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. गडाच्या माचीवर आदिवासी लोकांची वस्ती आहे. कलावंतीण गडाच्या पायऱ्या पाषाणात कोरलेल्या दिसत होत्या आणि धरायला आधाराला काहीही  नव्हते. दुपारचे ऊन म्हणते मी. तरीही पुन्हा चढाई सुरु केली. भर उन्हात सपसप सपसप एखाद्या सापासारखे चढत राहिलो. कलावंतीण च्या वरच्या टोकाला रोप लावून चढावे लागले. यावेळी तो थरार देखील अनुभवला. आम्ही दुपारी १:३० वाजता गडावर पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून सगळा शीण निघून गेला. कलावंतीण गडाचा आकार किंचित त्रिकोणी आहे. गडावरून सभोवताली माथेरान,चांदेरी,इर्शाळगड,कर्नाळा गड दिसतात. मग काय विचारू नकात. गडाच्या सगळ्या बाजूने फोटोग्राफी केली. गृप फोटोज काढले एकमेकांचे फोटोज काढले. एक हात से फोटो दे एक हात से फोटो ले. अश्या गमती-जमती सुद्धा झाल्या.


गडाच्या शेंड्यावर शिवाजी राजेंच्या घोषणा केल्या तेव्हा समोरच्या खिंडीमध्ये त्या घोषणांची गुंज कानाला अतिशय सुमधुर वाटत होती. वरून उन्हाचे चटके मात्र असे लागत होते की ही टॅन झालेली स्किन आता २-३ महिन्यांनीच पुनःपदावर येईल असे वाटते. आता मात्र पोटामध्ये कावळे ओरडण्यास सुरुवात झाली. परंतु गडावर ३२ लोकांना बसायला एकही झाड नव्हते त्यामुळे पुन्हा ३ वाजता कलावंतीण गड उतराई सुरु केली. गडाच्या मध्याशी माची प्रबळ ह्या छोट्या गावाजवळ एका ठिकाणी ट्रेकर्स साठी बसण्यासाठी जागा होती तिथेच आम्ही जेवण केले. थोडी विश्रांती करून सूर्यास्त मिळाला तर बरे होईल असा विचार करून तिथल्या पठारावरच "फोना"सोबत आलेल्या सगळ्या मेम्बर्स ची ओळख करून घेतली तिथेच सूर्यास्तासोबत चहा घेतला आणि फोनाच्या इतर कार्याची सुद्धा माहिती दिली आणि गड उतरण्यास सुरु केले.शेवटी इतका अंधार झाला की पायाखालची जमीन काही दिसेना झाले होते. रात्री ७-३० पर्यंत सगळे मेम्बर्स बसच्या ठिकाणी जमा झाले आमची बस पुण्याकडे रवाना झाली.  सुमारे १३ कि.मी.चा कठीण चढाईचा कलावंतीण ट्रेक चा थरार अनुभवला. ट्रेक लीडर मंदार सर, मनोज सर, विवेक सर, आणि निकाळजे सर यांनी गडावर लई थंडगार हवा आहे याचे जणू आमिष दाखवून आम्हा सर्व मेंबर्सना ट्रेक पूर्ण करण्यास मदत केली. ट्रेक पूर्ण केल्याच्या समाधानाने रात्री १०:३० वाजता घर गाठले.




8 comments:

  1. Kay Baat hai Jayuu..mdm..mastach...photo..lajWab

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख... हे वाचुन मी स्वतः ट्रेक करून आल्यासारखे वाटले.

    ReplyDelete
  3. व्वा!तायडे!! मस्त हां.तुझा ट्रेक अनुभव भन्नाट आहे.आणि ज्या साध्या भाषेत इत्तन्भुत माहिती दिलीय ते तर अजून भारी.फोटो पण झक्कास.नविन लोकांना फारच मार्गदर्शक ठरेल हे सर्व.keep it up��

    ReplyDelete
  4. Thank you Jayu madam... khup sundar mahiti dilit trek chi ani gadachi sudhha👌🏻

    ReplyDelete