Friday 8 September 2017

तुफानी रंगीबेरंगी कर्नाटकी सहल...

कर्नाटक-जोग फॉल ट्रिप

पुणे ते मुंबईमुंबई ते भटकळ शहर आणि
सहलीचा पहिला दिवस श्रीमुरुडेश्वर बीच आणि गोपुरम 
२ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०१७



सप्टेंबर महिना म्हणजे माझ्या खूप साऱ्या एव्हरग्रीन मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसांचा महिना आहे. २० ऑगस्टच्या कातळधाराच्या धुव्वाधार ट्रेक नंतर तुफानी काहीतरी हवेच ना नाहीतर माझी ट्रेकमुळे रुळावर असलेली(२० टक्के तंदुरुस्त शरीर आणि मन) गाडी आणि बॉडी एकदमच बंद पडते.खरे तर सध्या माझे शरीर साथ देत नाहीये काहीतरी कुरबुरी सुरूच होत्या त्यामुळे हाताला सलाईन टोचून इंजेकशन टोचून बोर झाले होते पण मन मात्र सदैव आंनद उपभोगायला आणि हुंदडायला तयार असते अर्थात सगळ्या जबाबदारी पेलूनच. त्यात  २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरची "फोना"ग्रुपची 'कर्नाटक जोगफॉल ट्रेक कम सहल" कोण सोडणार. त्यात सगळ्या वयाचे मित्र मैत्रिणी असणार होते. मग मी तर हा प्रवास आणि आणि सगळ्यांच्यातली धमाल सोडणेवाली नाहीये.या सहलीचे बुकिंग ३-४ महिने अगोदर करावे लागते त्याप्रमाणे केले होते परंतु खरी तयारी सहलीच्या एक दिवस अगोदरच झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि परवानगीने थोडा गरजेपुरता दवाखाना घेऊन शेवटच्या दिवशी शोभाबरोबर बोलले तेव्हा मी माझे जाणे पक्के केले. कारण मी सहलीला आहे म्हणून ही पोरगी येणार होती. तिला एकाच बॅगेत सगळं कसं बसवायचं याची माहिती दिली आणि चार-पाच दिवसांचा भन्नाट आंनद माझ्या पदरात पडणार या हव्यासाने मी माझी सॅक भरली.

२ सप्टेंबरला शनिवारी दुपारी चिंचवडहून ४:१५ ची कोयना-सी एस टी एक्सप्रेससाठी माझे मिस्टर दीपक आणि मुलगी प्रभा मला स्टेशनला सोडायला आले. तिथेच सहलीला जाणारे इतर मेंबर्स उपस्थित होते.२ च लोक ओळखीचे होते बाकी अनोळखी होते तरीही मी सवयीप्रमाणे थोडाही वेळ न घालवता बेझिजक लगेच आमची तिथेच टीम बनवली आणि फोटोला सुरुवात झाली. (मी,रेशमा रणसिंगमिस्टर रणसिंगसुमित म्हेत्रेमनोज राणे सरशोभाआणि डॉक्टर संदीप बाहेटी इतके लोक आम्ही चिंचवड स्टेशन ला गाडीमध्ये चढलो.)   गाडी सुटली कितीही नाही म्हंटले तरी मुलीला आणि मिस्टरांना निरोप देताना डोळे भरून आले पण ते मी दाखवले नाही इतकेच.😢😔🤗मुंबईचा प्रवास सुरु झाला. पुण्याहून काही लोक आधीच या ट्रेनमध्ये बसून आले होते त्यात सुनील विंचु आणि निमा विंचू हे दोघे होते आणि अजून काही मेंबर्स होते तसेच तळेगावला आणि लोणावळ्याला बरेच सहलीचे लोक बसणार होते. त्याप्रमाणे तळेगावचे लोक गाडीमध्ये चढल्यावर आणि तेव्हा झालेल्या गर्दी आणि गोंधळाने मग खरे मोठ्या सहलीला निघालो आहोत याचा प्रत्यय आला..😊
लगेच एक ग्रुप सेल्फी काढून गप्पा सुरु. लोणावळा गेल्यावर लगेच कर्जत आले. आणि दुपारी जेवण करून निघाल्यावर फारशी भूक नव्हती त्यामुळे कर्जतचा स्पेशल चविष्ट वडा आम्ही घेण्याचे टाळले परंतु वडेवाल्याचा वड्यासहित फोटो मात्र घेतला. त्याने पण मस्त पोज दिली. गाडीने घाट सोडला तसे गरम होऊ लागले. मी देखील मुंबईचीच आहे तरीही आता पुण्याच्या थंड हवेची  सवय झाल्याने मुंबईचा उकाडा सहन होत नाही.

गाडीतून मुबईच्या नाल्यांचे ओढ्यांचे दर्शन झाले तेव्हा मन खिन्न झाले जेव्हा केव्हा प्रलय होईल तेव्हा हाच आपणच माणसाने फेकलेला प्लास्टिक आणि इतर कचरा आपल्याच नाकातोंडात जाईल. कचर्याची योग्य विल्यवाट नाही लावली तर आपले आरोग्य धोक्यातच आहे."फोना" टीम ट्रेकिंग दरम्यान आणि कुठेही प्लास्टिक आणि  न विरघळणारा कचरा सोडून येत नाही उलट जमेल तेव्हा तोच कचरा गोळा करून आणतो. आमच्या ट्रेनच्या डब्यामध्ये सगळ्यांच्या ओळखी नाही झाल्या तरी १० बारा लोक यांची खाऊ वाटप, मजा मस्ती फोटोग्राफी सुरुच होती.  म्हणता म्हणता  रात्री ८.२० वाजता आम्ही शिवाजी टर्मिनन्सला पोहोचलो. आमची मुंबई-मंगळुरु एक्सप्रेस ९:३० वाजता होती परंतु ती ४-५ दिवस सतत ४-५तास उशिराने येत होती त्यादिवशी तरी ती म्हणे आली तर वेळेवर येईल नाहीतर २२ तास लेट होती ते ऐकून आमचे धाबे दणाणले. २२ तास इथेच राहिलो पुढच्या सहलीचा खेळ खंडोबाच होईल. आम्ही आपले वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन घरून आणलेले रात्रीचे जेवण करून घेतले.
मी तांदळाची पांढरी शुभ्र उकडीच्या पिठाची भाकरी,भेंडीची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आणली होती. निमाने आणलेली चकली, बटाटा भाजी आणि कोबीची कोशिंबीर फारच आवडली. वेटिंग रूममध्ये छोटे छोटे ग्रुप करून बसलो होतो आम्ही. रेशमा रणसिंगे यांच्या ग्रुपची पूर्ण पोळी आणि इतर डिशेश एक एक घास टेस्ट केल्या मस्त होत्या. गाडी पकडायची लगबग असल्याने सगळ्यांनी आणलेल्या  पदार्थांची चव घेत आम्ही बसलॊ नाही. त्यातही आम्ही आईस्क्रीम घेऊन खाल्ले हे मात्र खरे.  आम्ही टेन्शन मध्ये असतानाच थोड्याच वेळात आमच्या एक्सप्रेसची घोषणा झाली आणि गाडी वेळेत येणार आहे इतके समजले आणि आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
९:३० वाजता ट्रेन आली आमच्या लीडर्सने आमची गाडीची  तिकिटे आमच्या हातात दिली अनोळखी लोक बोगीच्या एका कंपार्टमेंट मध्ये आलो होतो. प्रमिला गुंजाळ, मिस्टर गुंजाळ,शिल्पा बाब्रसमी आणि शोभा. क्या हुवा अनोळखी है तो ओळख करून घेणे में हम पटाईत है. आम्ही लगबगीने गाडीमध्ये आमचे सामान टाकले आणि १० वाजता गाडी निघाली. मुंबई सोडताना मला माझ्या मुंबईतील जुन्या सुखद आठवणी आल्याशिवाय राहिल्या नाही. बहुदा  मी मुंबईची असल्याने सगळ्यागोष्टींमध्ये फास्ट असते.😊👍 प्रलय आला तरी दुसऱ्या दिवशी पाणी ओसरताच पूर्वपदावर येणाऱ्या माझ्या मुंबईचा आम्ही निरोप घेतला आणि गाडीमध्ये बसलोआमचे लीडर्स म्हणाले की मुख्य गाडी वेळेत आलीच नाहीये सी एस टी-मंगळुरु एक्सप्रेस मुख्य गाडीऐवजी दुसरी जादाची गाडी रेल्वे खात्याने मागवली होती. हे आमचे  अहोभाग्यच होतं म्हणा.

मला गोव्याचा दूधसागर धबधबा एकदा तरी किमान पाहायचा तरी होता. खर तर दूधसागरच्या वाटेने आमची गाडी जाणार नव्हती तरीही मला आपला वेड्या मनाला वाटलं चुकून दूधसागर आला तर आला मला भेटायला.  (गमतीचा भाग आहे हा लगेचच विचार करत बसू नका.😂😂) गाडीमध्ये आम्ही सगळे सामान लावून झोपण्याच्या तयारीने आपल्या सीटवर जाऊन बसलो खरे. परंतु शोभा आणि मला सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या होत्या आणि झोपदेखील आली होती. पूर्ण बोगी आमच्या "फोना"च्या ६० लोकांच्या मालकीची होती. ओळखी व्हायच्या असल्याने आम्ही जरा शांत होतो. घरात किमान वॉट्स अँप वर संपर्क राहावा म्हणून मेसेज करायला तर जिओ सिमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे शोभाच्या फोनवरून घरी कॉल करून वोडाफोन वर नेट आणि बॅलन्स टाकून तात्पुरते नेट सुरु केले.थँक्स शोभा.😍 कारण का? तर माझ्या मुलीचे प्रभाचे बास्केटबॉल खेळामध्ये चांगला खेळ खेळली म्हणून पेपरला नाव आले होते. पाखरांना सोडून चिमणी घराबाहेर पडली तरी पाखरांची ओढ ही जास्त  आणि कायम असते. 😍  २ तास गेल्यावर झोपायचे ठरवले परंतु कणकवलीला उतरणारे जवळ जवळ १५ लोक(बिना रिझर्वेशन वाले) आमच्या बोगीमध्ये मस्त आमच्या सीटच्या जवळ बसले होतेकोणी झोपले होते. कोणी फोनवर खेळत होते.काळजी वाटली म्हणून लीडर्सने येऊन त्यांना दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी विनंती केली. आधी ते जागचे हलायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्रत्येक आठवड्याचा प्रवास असेल.  नंतर ते गेलेही परंतु रात्री ३ नंतर मला जाग आली तेव्हा ते आमच्या सीट जवळ येऊन खाली जमिनीवर झोपलेले मी पाहिले. मराठी कोकणी माणसं होती त्यांचा तसा त्रास काहीच नव्हता. मी आपली दूधसागरच्या आशेने ५ वाजता उठले परंतु सगळे झोपले असल्याने मला ६ वाजेवाजेस्तोवर वाट पाहावी लागली. ६ वाजता उठून मी शोभाने चहा घेतला आणि शोभा परत झोपली मी मात्र सकाळची शुद्ध हवा खाण्यासाठी आणि कोकणातील निसर्गसौंदर्य  अनुभवण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी खाली उतरून सगळं आवरून खिडकीजवळ येऊन बसले. कणकवली गेल्याने ते १५ लोक उतरले होते आमची बोगी आता फक्त आमच्या ६० लोकांची होती. आजच्या पिढीतील सर्वांचे आवडते गीतकार, कवी, व्यंगचित्रकार  गुरु ठाकूर यांचे गाव गोवा आणि तिथली कौलारू घरे आणि हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग  एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव भासत होते. गोवा जणू आम्हाला खुणावित होते की येवा कोकण आपलाच असा राजापूर, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, गोवा असा तोच सुंदर निसर्ग डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद करून घेत आम्ही वेगाने पुढे जात होतो.




सगळे हळूहळू जागे झाले.मग ओळखी सुरु झाल्या. आमच्या जवळ बसलेले प्रमिला वाळुंज आणि मिस्टर वाळुंज (पुणे लायन्स क्लब चे अध्यक्ष होते.) अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. प्रमिलाने आणलेले घरी बनवलेले बुंदीचे लाडू एकदम आवडले मला आणि सर्वांनाच.👌👌 मला पोटामध्ये जरा इंन्फेकशन  असल्याने मी ट्रेनमधले काही खाणे टाळलेच. फक्त चहा तेवढा  घेतला. सगळ्यांनीच सोबत आणलेला खाऊचा नास्ता करून घेतला. आणि मग सगळ्या बोगीमधून हास्यकल्लोळचा आवाज येऊ लागला आता खरा सहलीचा रंग चढू लागला होता. मी शोभाने बोगीमध्ये चक्कर टाकली बोर झालेल्या पल्लवी, सुप्रिया, शिल्पा यांना घेऊन अंताक्षरी सुरु केली. मग जरा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. तितक्यात मंदार सर म्हणाले अरे आपलं स्टेशन येईल आता आवरून मग अंताक्षरी खेळू. मग बॅगांची आवराआवरी करून पुन्हा अंताक्षरी  खेळू लागलो. मध्येच मोठमोठे बोगदे यायचे तेव्हा आम्ही उत्साहाने सगळेच मोठमोठ्याने शिट्या मारीत होतो,ओरडत होतो,प्रवासाची मरगळ घालवण्यासाठी हा छोटा उपाय छान 👌होता..😊एकाच बोगीतून एकमेकाला साद घालीत होतो. एकीकडून मंदार सर,मिस्टर वाळूंज आणि आम्ही सगळे तर दुसरीकडे राणे सर,रोहीत सर असे सगळे होते. पूर्ण एक्सप्रेसमध्ये आमचाच गोंधळ चालू होता..फोना Team Rocks✌...
१२ च्या सुमारास कारवार,गोकर्ण रॊड, कुमटा नंतर दुपारी दीड वाजता दक्षिण भारताच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड  जिल्ह्यात भटकळ स्टेशनवर आम्ही पोहोचलो.
आम्ही अन्ताक्षरीचा वेग कमी केला आमच्या वजन बॅगा घेऊन भटकळ स्टेशनला उतरलो. आमच्या ट्रिपचे नियोजन करणारे श्री नितीन पवार यांनी अगोदरच आम्हा ६० लोकांसाठी ३ बसेसची सोय केली होती. भटकळ स्टेशन स्वच्छ होते.
थोड्या वेळातच आम्ही ज्या ठिकाणी ४ दिवसांचे रहिवाशी होतो तिथे आर एन एस हायवे हॉटेल मध्ये पोहोचलो. आम्हाला सगळ्यांना फ्रेश होण्यासाठी एक एक रूम दिली फ्रेश होऊन आधीपासूनच तयार असलेले जेवण केले.  तिथे जाईस्तोवर आम्ही एकएकटे आलेल्यांना काहीच  माहिती नव्हते आमचे रूम पार्टनर कोण आहेत ते. तिथे गेल्यावर आमच्या हाती रूम नंबर आणि रूम पार्टनरची नावे दिली. शोभा आणि नोवा शिंदे मी असे भारी,हसवणारे 😊😂रूममेट्स एकमेकांना मिळालो होतो.
आपल्या रूममध्ये जाऊन जरा रिलॅक्स होऊन आवरून ४च्या सुमारास पहिल्या दिवसाच्या प्रवासाला निघालो. पहिल्या दिवशी तेथील ३ कि मी वर असलेला मुरुडेश्वर बीच आणि गोपुरम इथे पोहोचलो. अरबीसमुद्राच्या जवळ हे ठीकाण आहे. मुरुडेश्वरचा किनारा हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्र किनारा आहे. पर्यटकांसाठी दोन्ही बाजूने लाभदायक आहे. धार्मिक स्थळांचे दर्शन होते आणि निसर्गाचा आनंददेखील लुटता येतो. इथे गोपुरम् ही २१ मजली इमारत 232 फूट उंंच आहे  इथे लिफ्टची सोय आहे. तसेच गोपुरम च्या दारात भव्य हत्तीची प्रतिकृती आहे. तसेच गणपती मंदिर आहे.  श्री. मुरुडेश्वरची मूर्ती 123फूट उंच अशी भव्य आहे. तेथील एन. आर. शेट्टी नावाच्या व्यावसायिकाने  ४ करोड रुपये खर्च करून ही मूर्ती बनवली आहे.ही  भव्य सुंदरसुबक मूर्ती अशी बनवली आहे की सूर्याची किरणे या मूर्तीवर पडली तर ही मूर्ती चमकते हे वैशिष्ट्य आहे. आम्ही आधी समुद्रामध्ये बांधलेल्या नवीन बीच रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथून ती  गोपुरमची इमारत  आणि श्री मुरुडेश्वर ची मूर्ती मनमोहक दिसत होती त्यामुळे आम्ही लगेच तिकडे निघालो.
विंचू सरांनी आमची गोपुरम् ची तिकिटे काढली. कर्नाटकमध्ये मंदिराच्या आवारात सॉक्स आणि चपला काढल्या. आपण आपल्या महाराष्ट्रात मंदिरात जाताना चपला तर काढतोच पण सॉक्स कधीतरी घालून जात असतो पण तिकडे  सॉक्स काढायचे म्हणजे काढायचे असा कडक नियम आहे.  आधी गोपुरम मध्ये गेलो. २१ माजली इमारत आहे परंतु १८ व्य मजल्यापर्यंत जाण्यास परवानगी आहे. १० -१० च्या ग्रुप ने लिफ्ट ने वरती गेल्यानंतर तिथून श्री मुरुडेश्वरची मूर्ती अतिशय भव्य आणि सुबक दिसत होती. तिथे त्या खिडकी मध्ये फोटो काढण्यासाठी आमच्याच लोकांची दाटी झाली होती. तिथून मुरुडेश्वर डोळ्यात आणि मानत साठवून आम्ही लिफ्टने उतरून  मंदिरात गेलो तिथे गाभाऱ्यात कोणत्याच देवाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. कर्नाटक मध्ये त्यांचे  कर्नाटकी भाषेवर इतके प्रेम आहे की आम्हाला कुठेही मराठी किंवा हिंदी सूचना फलक पहावयास  मिळाला नाही. कन्नड आणि फार तर इंग्रजी मध्ये सूचना फलक लावले होते. आम्ही गणपती मंदिरातून मुरुडेश्वरची मूर्ती पाहावयास निघालो. सूर्य अस्ताला निघाल्याने आमची एकच धांदल उडाली होती कारण आम्हाला त्या बीचवर जायचे होते. परंतु इकडे मुरुडेश्वरच्या मूर्तीजवळ मानवनिर्मित गुहा देखील पाहायची होती. आम्ही आपले फोटोग्राफी करत ती गुहा फिरून १५ मिनिटामध्ये बाहेर आलो तोवर सूर्य अस्ताला गेलाच. पण त्या संधीप्रकाशात खरोखर ती मूर्ती चमकत होती. डोळे तृप्त होत होते. पण मन मात्र भरत नव्हते. प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयीगोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

५ मिनिटे तिथे बसून लगेचच बसजवळ निघालो कारण लीडर्स ने ७ च्या आत घरात ची वेळ दिली होती. त्या नियमानुसार आम्ही लगबगीने निघून त्या बीच वरच्या रेस्टॉरंट मध्ये मस्त कॉफी  चा आस्वाद घेतला. तिथे आम्हाला एक पर्वणी मिळाली. लीडर्स म्हणाले ज्यांना नॉनव्हेज खायचे त्यांनी ४ दिवसांचे निवासी असलेल्या घरी जावा आणि ज्यांना व्हेज खायचे त्यांनी बाहेरच्या हॉटेलवर चला.आमची नॉनव्हेज खाणाऱ्यांची एक बस हॉटेल जवळ आली आणि २ बस तिकडेच बाहेर व्हेज जेवण करून आल्या. आम्ही २० लोक नॉनव्हेज जेवलो म्हणजे भरमसाठ काही खाल्ले असं काही नाही थोडासा बदल म्हणून कर्नाटकच्या नॉनव्हेज जेवणाची चव घेतली इतकेच. जेवण झाल्यावर पुन्हा यावरून सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी म्हणून राहत्या हॉटेलच्या बाहेर आलो परंतु बरेचसे लोक थकले असल्याने आणि सकाळी लवकर उठायचे असल्याने गुड नाईट म्हणून विश्राम करण्यास गेले. आम्ही 8ते 10 लोकांनी बाहेर आईस क्रिम मागवले अर्थात माझा वाढदिवस बळंच साजरा करून ट्रीट घेतली. त्यातदेखील वेगळी गम्मत. त्यावेळी काही लोकांची तरी ओळख झाली. त्यानंतर मात्र आम्ही तिघी १२ वाजता आमच्या रूम मध्ये गेलो. इतके थकलो असून आम्ही गप्पा मारत आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठण्याचा नंबर दुसऱ्याच्या नाव ढकलत २ वाजता झोपी गेलो.आमची तिघींची याआधी इतकी ओळख नव्हती तरीही इतरांना वाटले की  शोभा माझी मुलगी तरी असावी (शोभा कोणत्या अंगाने माझी मुलगी दिसली ते आम्हा दोघींना समजले नाही हहाहाहाहा) आम्ही तिघी बहिणी तरी असू.आमचे  तिघाड पहिल्याच दिवशी छान जमले. अश्या प्रकारे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते भटकळ प्रवास आणि सहलीचा पहिला दिवस एकदम आनंदात आणि धमाल मध्ये गेला.उत्तम नियोजनासाठी नितीन पवार सरमंदार सरराणे सररोहित सरनिकाळजे सर यांना माझ्यावतीने सगळ्यांकडून धन्यवाद. जितकी धमाल तितका ब्लॉग मोठा असल्याने २ऱ्या आणि ३ऱ्या दिवसाचा ब्लॉग वेगळा लिहिला जाईल आणि जमेल तसे सगळ्यांचा उल्लेख आणि फोटोज येतील याची कृपया वाट पाहावी.






6 comments: