Saturday 28 December 2019

सह्यांकन - पहली नजर

सह्यांकन - पहली  नजर

भुदरगड उंची- ३,२१२ फूट.
प्रकार- गिरिदुर्ग.
चढाईची श्रेणी-सोपी.
ठिकाण-कोल्हापूर
जवळचे गाव-पेठ शिवापूर (गारगोटी)  

माझ्या महाराष्ट्र राज्यात पुण्यापासून सुमारे ३१५ कि.मी. अंतरावर भुदरगड हा दुर्ग आहे. कोल्हापूर शहरापासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर असलेला हा दुर्ग ३,२१२ फूट उंच असून तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती परंतु सध्या गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधली गेली आहे. येथे दरवर्षी माघकॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

भुदरगडचा थोडक्यात इतिहास -भुदरगड हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता.त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला... १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मुघलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच,परंतु मुघलांच्या प्रमुख सरदाराला ठार मारले. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही या देवळात आहेत.१८व्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला... १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच तोडफोड  केली.(माहिती नेटवरून)
चक्रम हायकर्स मुलुंड ही सह्याद्रीतील ट्रेक आयोजित करणारी संस्था १९८३ साली स्थापन झाली. अनेक लोकांचे योगदान यामागे आहे. माझ्या मते दर दोन वर्षांनी सह्याद्रीतील सलग चारपाच दिवसांचा ट्रेक आयोजित करणारी ही एकमेव संस्था आहे. सह्याद्रीतील या कृतीला "सह्यांकन" असे म्हणतात.  "चक्रम  हायकर्स" यांचे १९ वे सह्यांकन होते. दिनांक २० डिसेंबर २५ डिसेंबर अशी आमची पहिली बॅच होती याशिवाय एक दिवस पुढे अश्या आणिक दोन बॅचेस होत्या
मला आणि माझ्या मैत्रिणीला तुषार कोठावदे याच्यामुळे सह्यांकनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती आणि मिळालेल्या त्या संधीचे सोने करायचे हा माझा मूलमंत्र आहे. दिनांक २० डिसेंबर २०१९ या दिवशी रात्री मुलुंडहून साडेआठच्या सुमारास आमची सह्यांकनची पहिली बॅच निघाली. काही ट्रेकर्स पुण्यातले असल्याने ट्रेकबस मुबंई -पुणे -बंगलोर हायवे अशीच जाणार होती. मी पुण्यात माऊंटन एज आडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांच्यासोबत ट्रेकिंग करते. चक्रम हायकर्स सोबत माझे हे पहिलेच सह्यांकन असल्याने, व नवीन ग्रुप असल्याने, शिवाय सलग पाच दिवसांचा ट्रेक असल्याने थोडीशी धाकधूक होती. परंतु तुषार,प्रशांत, प्राची हे तिघे पाषाणहून वाकडला आम्हाला भेटायला आल्याने माझी अर्धी काळजी तिथेच कमी झाली. आमच्या सह्याद्रीच्या गप्पांच्या नादात रात्री बाराच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आलिशान ऐसपैस बस येऊन थांबली तरी समजले नाही. आमचे ट्रेक लीडर आदित्य आणि व कोलीडर अनिकेत बसमधून खाली उतरून तुषारला भेटल्यावर मलाच फार खास व्यक्ती असल्यासारखे वाटले. आजच्या युगात निर्मळ आत्म्याची माणसे मिळणे म्हणजे मी आपले भाग्य समजते. सह्याद्रीमध्ये फिरणारा प्रत्येक व्यक्ती निर्मळ आणि समजूतदार बनतो असे माझे मत आहे. लीडर आणि कोलीडरच्या प्रेमळ, आदरयुक्त  वर्तणुकीतून  माझ्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये माझी एक सीट कायम राखीव असते या गोष्टीची मला प्रकर्षाने आठवण झाली आणि हा माझा पाच दिवसांचा ट्रेक तुफानी होणार याची ग्वाही तिथेच मिळाली. रात्री बाराच्या सुमारास आम्हाला सह्यांकनच्या हस्ते सुपूर्त करण्यास आलेल्यांचा निरोप घेऊन त्याच्याकडून स्लिंगरोप घेऊन मी बसमध्ये बसले. गप्पा मारत मधेच डुलक्या घेत रात्रीचा बसचा प्रवास सुरु होता.
(खालील फोटो  पहाटे साडेतीन वाजता एका टोलनाक्यावर टिपला आहे.)

टोल नाका आला की मी पूर्ण जागी होऊन एक तरी फोटो घेण्याचा प्रयत्न करीत असे. सकाळी साडेपाचच्या सुमारास आमची बस गारगोटीच्या हद्दीमध्ये पोहोचली.झोपेतून जागे होऊन थोडीशी आवराआवर करून  सातच्या सुमारास हॉटेल वैष्णव रेस्टोरंट येथे फक्कड चहाचा आस्वाद घेऊन पोह्याचा नास्ता करून बसमधून आम्ही भुदरगडकडे निघालो.  
आजूबाजूच्या हिरवळीतून कौलारू घरे, छोटे-छोटे रस्ते न्याहाळीत सूर्यदेवाची कोवळी सूर्यकिरणे डोळ्यांवर झेलीत आमची बस घाटवळने पार करीत साडेआठच्या सुमारास भुदरगडावर पोहोचली.
चक्रम हायकर्सचे १९व्या सह्यांकनचे बॅच आणि कॅप वाटप करून सर्वांची ओळख परेड करून भुदरगडची वारी सुरु केली.किल्ले भुदरगडवरून भुदरगड हे नाव या तालुक्याला दिले आहे. साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका आहे.  गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव आहे, तालुकास्तरीय सर्व कामकाज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.
गडावर जाण्याच्या वाटा-गडावर जाण्यासाठी गारगोटी वरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटी वरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते.मंदीराभोवती ओवऱ्या,कमानी दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ तोफ आहे.देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.


वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे.

तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते.
येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची मुर्ती दिसते.
 

आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतो.गडावर चिर्याच्या कोरडया पडलेल्या विहिरी दोन तलाव आहेत.परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.गडावरील सर्वात सुस्थितीतील प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य आंबोली घाटाचा हिरवागार परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्वबाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो. गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.
गडाच्या तटबंदीवर अनेक ठिकाणी तोफा लावण्याचे मोठमोठाले कोनाडे, मशाली लावण्यासाठीचे छोटे खाचे अशा अनेक गोष्टी निरीक्षण करून पहिल्या तर निदर्शनास येतात. गडावरील कचरा उचलायला जमलं नाही तरी किमान प्लास्टिकसारखा कचरा करू नये हा आम्हा ट्रेकर्सचा नियम आहे. तरीही न राहवून आम्ही गडावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. 


भुदरगडावरील जांभ्या दगडातील घरे खूपच आकर्षक होती. ते कोंबडीच्या पिल्लांचे लुटूलुटू फिरणे, दुपारच्या वेळी बायकांचे ओसरीवर बसून गप्पा मारणे पाहिले आणि मन क्षणात कोकणात रवाना झाले. 

सह्यांकनच्या पाच दिवसांच्या ट्रेकमधील पहिल्या दिवशी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये भुदरगड पूर्ण फिरून झाल्यावर गडावरील गावातील एका शाळेतील अंगणात आम्ही दुपारचे जेवण आटोपले (चक्रम हायकर्सने आयोजित केलेले दुपारचे जेवण) गप्पाटपा करीत थोडी विश्रांती घेऊन लगेच भटवाडी कॅम्पसाईटकडे रवाना झालो. जाताना मौनी महाराज यांच्या समाधीला आणि वाड्याला भेट दिली.  



मौनी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीविषयी येथे लिहिलेले आढळले.मौनी महाराज छत्रपति शिवाजी महाराज या दोन विभुतिंची भेट जेथे घडली ते पाटगाव.मौनी मठ हा लाकुड दगडातील बांधकामाचा दुर्मिळ नमुना मनाला भुरळ पाडतो. येथे मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेउन काही वेळ शांत बसलो तर खूप वेगळा शांत अनुभव येतो.पाटगावची छोटीशी बाजारपेठ आहे. कोकणाच्या तोंडाशी वसलेले हे दुर्गम गाव अतिपर्जन्याचे ठिकाण आहे असे म्हणतात.गावचे वेदगंगेला अडवणारे मौनीसागर धरण वेळ असल्यास पहावे, निसर्गइतिहाससंस्कुती यांचा त्रिवेणि संगम अनुभवायचा असेल तर  भुदरगड पाटगावला अवश्य  भेट द्यावी.

मौनी महाराज समाधीचे दर्शन घेऊन साडेचारच्या सुमारास आम्ही पाटगाव धरणाजवळच्या आमच्या भटवाडी कॅम्पसाईटवर पोहोचलो. पोहोचताच आमचे स्वागत गरमागरम चहा.बिस्किटे थॊड्या वेळाने हलका नास्ता स्वीट कॉर्न विद चाटमसालाने झाले. तेथील तंबूमध्ये आमच्या सॅक ठेवून आम्ही धरणाच्या जलाशयाच्या दिशेने सूर्यास्ताचा परमानंद घेण्यासाठी रवाना झालो. एकीकडे आमच्यासाठीचा स्वयंपाक बनत असल्याचा सुवास येत होता तर एकीकडे सूर्य अस्तास जात होता. दोन्ही गोष्टी परमानंद देणाऱ्या.
ओळख नसल्याने आम्ही नकळत ग्रुप लीडर्सकडूनदेखील फोटोग्राफी करून घेतली. फोटोग्राफी करून सूर्य अस्ताला गेल्यावर लगेच गरमागरम रस्समचा आस्वाद घेता आला. लगेचच गरमागरम रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो. जनरेटर लावून लाईटची व्यवस्था छान होती. पिण्याचे पाणी, हात आणि प्लेट धुण्याचे पाणी त्यावर सूचना फलक लावलेले होते. जवळच घनदाट देवराई असल्याने गावकऱ्यांनी तिथे एक नंबर, दोन नंबरला जाण्यास बंदी आणली होती त्यामुळे सह्यांकनच्या लीडर्सने निसर्गाला कोणतीही हानी पोहोचवता शौचखड्डे खणून माती टाकण्याची सोय केली होती. बाजूला किंतन लावले होते. तंबू लावले होते. मुले मुलींसाठी वेगळी सोय केली होती. अरे कुठून आणता हा उत्साह आणि  ह्या वेगळ्या भन्नाट कल्पना??
सगळे कसे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे घडत होते.
 

आम्ही नवीन जागी आहोत याचे भान हरपले होते. कोण कुठून आलाय कशाची चिंता नाही. सगळे एकत्र मिळून सर्व कामे करीत होते. चक्रम  हायकर्सच्या या मेहनतीला माझा सलाम आहे. रात्रीचे जेवण आटोपून थोडा वेळ म्हणता-म्हणता रात्री साडेदहापर्यंत जुन्या-नव्या हिंदी- मराठी गाण्याची महफिल छानच रंगली होती.
त्यानंतर गारवा वाढल्याने आणि ग्रुपच्या नियमानुसार सकाळी लवकर रांगणागड ट्रेक असल्याने सर्वजण आपापल्या तंबूमध्ये रवाना झाले.सह्यांकनचा पहिला दिवस इतक्या आपुलकीने आणि उत्तमरीत्या पार पडला की आम्हाला नवीन ग्रुपमध्ये आहोत याचा विसर पडला. चक्रम हायकर्स रॉक्स. 

(या लेखात  सह्यांकनच्या पहिल्या दिवसाचा पहिला भाग आहे. बाकीचे लेख दुसऱ्या भागात येतील)




10 comments:

  1. खूप सुंदर वर्णन। स्तुत्य उपक्रम। 👍

    ReplyDelete
  2. सह्याकंन च्या उपक्रमातून ... ब्लॉग च्या सुरवातीलाच माऊंटन एज आडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे ग्रुप ची बिनधास्त...हरहुन्नरी जयु... चक्रम हायकर्स सोबत पहिल्यांदा ट्रेक करतेय हे वाचून नवीन काहीतरी वेगळं वाचायला मिळेल अशी अपेक्षा झाली अणि ती बरोब्बर पण होती..😊😊 भुदरगड किल्ला... त्यावरील भैरवनाथचे वेगळ्या धाटणीचे हेमाडपंती मंदिर... तेथील दूधसागर तलाव... जखुबाईचे मंदिर... त्या काळातील सुसज्ज बांधकाम... त्याचे बारकावे सगळे काही तुझ्या ब्लॉग मधून कळते... प्रत्येक ब्लॉग वाचताना आपणही ट्रेक करत आहोत असच feel होत.... 😍😍एवढ सुंदर तुझ ब्लॉग लिखाण असत... ✍️तुझा ट्रेक चा पहिला दिवस तर खूपच छान गेला... 🧗‍♂️आता प्रतीक्षा ब्लॉग च्या दुसर्‍या भागाची 💜

    ReplyDelete
    Replies
    1. Thanx a lot Dear gituuu 😍😍😍 झाला दुसरा भाग लिहून ☝️keep reading 😊

      Delete
  3. सुंदर लिहिले आहे.

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन. फोटोमध्ये caption/ ठिकाण असे काही टाकता आले तर बघा. अजून मजा येईल.

    ReplyDelete
  5. Thankuu so much sir 😊
    Blog जसा लिहिते तसे फोटोज् टाकत जाते...तरीही suggestion विचारात घेवून अंमलात आणले जाईल😊

    ReplyDelete