Tuesday 31 December 2019

सह्यांकन- चक्रम हायकर्स ,ब्लॉग भाग -२



सह्यांकन- चक्रम हायकर्स
ब्लॉग भाग -२
रांगणागड ट्रेक
उंची - २२२७ फूट
ठिकाण- कोल्हापूर
चढाई श्रेणी - सोपी
दिनांक २२ डिसेंबर २०१९
रांगणादुर्गविषयी थोडक्यात माहिती-भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील रांगणा हा एक दुर्ग आहे. रांगणादुर्ग उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या दक्षिणेस पसरलेल्या, परंतु  घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच घाट कोकण व गोवा यापासून जवळच अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या दुर्गापैकी एक दूर असा याचा समावेश असे.म्हणूनच १७८१च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ दुर्गांपैकी रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. 
रांगणादुर्गचा थोडक्यात इतिहास -रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.
बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंत यांच्याकडे  हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आगऱ्याला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत:जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आगऱ्याच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.
रांगणा गडावरील पहाण्याची ठिकाणे-सहयाद्रीतील प्रत्येक गडावर प्रवेश करण्यासाठी  चढाई करावीच लागते. परंतु रांगणा हा गड थोडा वेगळा आहे. रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क डोंगर उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणाऱ्या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.


पहिल्या प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणाऱ्या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी बंद केलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. तिला निंबाळकरांची विहीर म्हणतात. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत.

दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्या बाजूस अनेक समाध्या दिसतात. एका कोपर्यात शिवमंदिर दिसते. इथेच आमची त्या दिवसाची छावणी होती.यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो. रांगणाई मंदिर आम्ही जेवणाआधी पाहून झाले होते रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे.रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दीपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. 
सह्यांकनचा दुसरा दिवस दिनांक २२ डिसेंबर २०१९. आमच्या तंबूतील आम्ही चौघी पहाटे साडेपाचचा कॉल व्हायच्या आधीच उठून आवरून तयार होतो.  शिवाय चहा घेऊन धरणाच्या काठाला सकाळचा व्यायाम करण्यास सर्वच सज्ज होते. भटवाडी छावणीचा उत्तम पाहुणचार घेऊन तेथील लीडर महेश भालेराव,चेतन,रमेश दादा, रंजन महाजन, मैत्री भट, मंगेश पंडित,आणि इतरांचा निरोप घेऊन आणि व्यायाम झाल्यावर लगेच नास्ता चहा घेऊन पूर्ण सामानाची मोठी सॅक पाठीवर अडकवून गोमाजी लाड यांना मार्ग दाखवण्यासाठी सोबत घेऊन रांगणा गडाकडे निघालो.

रांगणागड ट्रेक सकाळी साडेसात-आठच्या सुमारास सुरु केला. घनदाट जंगल पार करीत, मध्ये आमच्या वाटाड्याचे गोमा दा चे गाव चिकेवाडी गाव पार करीत जंगलातील अनेक वनस्पतींची, प्राण्यांची माहिती घेत-घेत तीन तास कसे गेले समजले नाही. हे कडगाव वनक्षेत्र आहे इथे गवा आणि इतर प्राणि पाहावयास मिळतात.जाताना एक ओढा आणि मध्यात गेल्यावर एक ओढा असे दोन ओढे पार करावे लागले. 

चिकेवाडीमध्ये काही घरे जांभ्या दगडात बांधलेली तर काही कारवीची कुडाची कौलारू घरे पाहावयास मिळाली. अंगणाला छानसे कुंपण, दारात मांडव असे सुंदर चित्र या चिकेवाडीत दृष्टीस पडले.दारात गाई-गुरे तर शहराप्रमाणे पाण्याची टाकी देखील आढळली. त्यातील पाणी अतिशय चवदार गोड होते.





रांगणाला जाताना जंगलात अर्ध्यापर्यंत वाट दाखवणारे गोमा दादा यांचे घर याच चिकेवाडीमध्ये आहे. मुबलक पाणी असल्याने शेती हा व्यवसाय इथे दिसतो. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत. अर्ध्या वाटेपर्यंत गोमा दाद माहिती द्यायला होते तर अर्ध्या वाटेत रांगण्यावरील लिडर्स आपटे सर आणि महादेव दादा आम्हाला घ्यायला आले होते. रांगणा गडावर पोहोचायच्या थोडेसे आधी बांदेश्वर मंदिर आहे परंतु त्याची पडझड झाली आहे.

परंतु त्यातील मुर्त्या सुबक आणि कोरीव आहेत. थकलेल्या ट्रेकर्सना कोकम सरबताचा आस्वाद घेता आला. चक्रम हायकर्स किती छान काळजी घेता आणि वेळोवेळी उत्तम सोय उपलब्ध करता. या ठीकाणाहून रांगणाकडे जाताना खाली उतरून मग पुन्हा मुख्य दरवाज्याकडे चढून जावे लागते.इथे अगदी जवळ गेल्यावर रांगणाचा बुरुज आणि रांगण्याचे सौन्दर्य खुलून दिसते.
आपटे सर वेळोवेळी गडाची उत्तम माहिती देत होते. प्रत्येक ट्रेकमध्ये इतिहासाची उत्तम जाण आणि आत्मीयता असलेला असा मेंबर आमच्यासोबत असला तर आमचे अहोभाग्यच. भन्नाट फोटोग्राफी करीत आपटे सरांचे ऐतिहासिक भाष्य ऐकत रांगणागडाच्या छावणीवर दुपारी १२च्या सुमारास पोहोचलो.
तिथे आमच्या सॅक ठेवून रांगणाई देवीच्या मंदिरापाशी गेलो. आपटे सरांनी प्रत्येक बुरुजाची, प्रत्येक मंदिराची उत्तम माहिती दिली.  छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या देवी देवतांच्या वाहनावरून कशा ओळखायच्या ते समजून सांगितले.

इतिहासाबद्दलचे ज्ञान आणि लढवय्यांबद्दलची आत्मीयता सर्वकाही वाखाणण्याजोगे होते. ऐकत राहावेसे वाटत होते. कोकण दरवाजा पाहून झाल्यावर पुन्हा कॅम्पसाईटवर येऊन पाहतो तर काय. तेथील लीडर अनिकेत आणि विलास दादा यांनी गरमगरम पुरी भाजीचा बेत केला होता. माहेरवाशिणीला माहेरी आल्यावर जसे आयते जेवण मिळाले की जे सुख मिळते ते आम्हाला सह्यांकनच्या प्रत्येक छावणीत मिळत होते. “मला सांगा सुख म्हणजे काय असते.”
दमल्या थकल्या जीवाला आयते पाणी आणि दोन घास प्रेमाचे मिळाले की स्वर्गसुखच जणू. जेवण आटोपून मंदिरात थोडीशी विश्रांती घेऊन साडेतीनच्या सुमारास पुन्हा रांगणागड फिरावयास निघालो. विश्रांती घेताना समजले की दुपारचे जेवण इतके चविष्ट झाले होते की बनवणाऱ्या लीडर्सना जेवण शिल्लक राहिले नाही.स्वतः ड्राय स्नॅक्स आणि फळे खाऊन दुपारची वेळ भागवली परंतु थकलेल्या ट्रेकर्सना भरभरून वाढले काहीही कमी पडू दिले नाही. दुपारचे जेवण खरंच एखाद्या लग्न कार्यात बनवावे तसे चविष्ट झाले होते.
छावणी लीडर अनिकेत आणि विलासदादा तुमचे मनापासून आभार. इतक्या उंच गडावर इतके सगळं सामान नेऊन ते चार-पाच दिवस पुरवणे आणि प्रत्येक वेळी चहापाण्याची,जेवणाची उत्तम व्यवस्था स्वतः करणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक छावणीवर पिण्याचे वेगळे पाणी, प्लेट्स धुण्यासाठी व खरकटे कचरा टाकण्यासाठी खड्डे, हात तोंड धुण्यासाठी पाण्याचे वेगळे भरलेले ड्रम, त्यावर सूचना फलक, शौचालयासाठी पुन्हा प्रत्येक छावणीवर खड्डे त्याला किंतन आणि तंबूचे आच्छादन अशी सगळीच व्यवस्था उत्तम केली जाते.
दुपारी जेवण करून थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही रांगणाचे प्रशस्त पठार फिरण्यास निघालो. अवाढव्य घेऱ्यामुळेच त्याला रांगणा हे नाव पडले असावे. प्रचंड मोठा विस्तार.असलेला असा हा रांगणा गड आहे. इथे एक ओढा आहे तो सध्या कोरडा आहे. काही ठिकाणी अगदी थोडे पाणी इथे आहे. हा ओढा पावसात भरून वाहत असतो त्या ओढ्यातील पाण्यामुळे तटबंदी ढासळू नये त्यासाठी मोठी दगडी कमान बनविली आहे पाणी जाण्यासाठीची ती वाट आहे. अतिशय सुंदर कल्पनेने गड बांधला गेला आहे. 

इथे एक पडझड झालेला जुना राजवाडा आहे तो सोडला की पुढे एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. त्या पिंडीस दोन लिंगे आहेत. अशा प्रकारची पिंड मी पहिल्यांदाच पाहिली. तलावाकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्या पायवाटेने पुढे चालत राहायचे.

आमच्यासोबत असलेल्या महादेव वाटाड्याने सांगितले की वाटेत छोटेसे गणेशमंदिर आहे. गडाचा पसारा खूपच मोठा असल्याने गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही येताना वळणार होतो त्यामुळे हत्ती सोंडेकडे चालत राहिलो. इकडे फारसे ट्रेकर्स येत नसल्याने गड खूप शांत आणि स्वच्छ आहे. तसेच वाटा फार मळलेल्या नाहीत त्यामुळे दगडगोट्यांवर पाय अचानक मुरगळतो.जाणाऱ्यांनी काळजी घावी.
इथे आमच्यातील एक मेंबर अचानक मागे राहून गायब झाल्याने काही जण त्याची शोधाशोध करीत मागे गेले. आम्ही काहीजण जिथे पोहोचलॊ होतो तिथेच थांबलो.तिकडे मोबाइलला रेंज नसल्याने पुन्हा छावणीपर्यँत जावे लागले. इकडे तिकडे भटकत रहाण्यापेक्षा आणि आमच्या सगळ्यांच्या परतीची वाट पाहण्यापेक्षा ट्रेक मेम्बर छावणीवर परत गेला होता. खरे तर असे कोणी अचानक गायब झाले तर खूप काळजी वाटते कारण या जंगलात अनेक प्राणी आहेत. त्यामुळे एकट्याला टाकून जाणे किंवा गायब झाला तर दुर्लक्ष करणे हे चुकीचे ठरते. सगळे जण छावणीत सुरक्षितरित्या पोहोचलेच पाहिजेतच. आमच्यातील वाटाड्याला छावणीमध्ये पाठविण्यात आले तिथे हा मेंबर सुरक्षित आहे हे समजल्यावर सर्वांना हायसे वाटले. "वो दुसरा तिसरा कोई नहीं था वो तो सूर्या था."  कितीही महत्वाचे काम असो ग्रुपलीडर, को-लीडर किंवा ग्रुपमधील इतर कोणालाही किमान एका व्यक्तीला सांगून जाणे हा नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे.
छावणीवर मेंबर सापडल्याने ३५ मिनिटांनी पुन्हा आम्ही त्याला घेऊनच हत्तीसोंडीच्या कोकण दरवाज्याकडे निघालो.जाताना डाव्या हाताचा आजूबाजूच्या घाटमाथ्यावरचा परिसर लक्षवेधी होता.  ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायऱ्याही आहेत.



संध्याकाळ होत आल्याने पावले जोरात उचलावी लागत होती.पुढे घनदाट जंगल तर एकीकडे कोकण दिसत असलेली खोल दरी होती. हत्तीसोंड दुरून रुबाबदार दिसत होती. अंधार होत आल्याने आम्ही फक्त कोकण दरवाज्यापर्यंत जाऊन पुन्हा पायपीट करून दोनलिंग असलेल्या पिंडीच्या तलावाजवळ आलो आणि तिथून त्या छोट्या गणेशमंदिराला भेट दिली.
गणेश मंदिराच्या आवारातील भिंतीवर बसून क्षणभर विश्रांती घेतली. त्याठिकाणाहून आजूबाजूचा घाटमाथा आकर्षित करतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाप्रमाणे विस्तीर्ण पिवळसर गवताळ जमीन आणि दूरदूर पसरलेले हिरवे-निळे डोंगर माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आशेने पाहत होते, खुणावत होते. खरंच ट्रेकिंगच आयुष्य किती रम्य बालपणाप्रमाणे आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि पुन्हा पुन्हा या रांगण्यावर यावे.
सदानंद आपटे सर इतिहासाची इतकी सुंदर माहिती देत होते की पुन्हा पूर्ण गड फिरून पुन्हा-पुन्हा तोच इतिहास ऐकत रहावा वाटत होता. परंतु अंधार झाल्याने छावणीकडे रवाना झालो. लीडर अनिकेत आणि विलास दादा यांनी ओल्या भेळची सोय केली होती. त्या संध्याकाळी त्या गडावर गवतावर बसून ओल्या भेळ खाण्याची मजा काही वेगळीच होती. त्यानंतर गरमागरम चहा आणि कॉफी. अहाहा शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे रे. त्यासाठी प्रत्यक्ष सह्यांकनमध्ये सहभागी व्हावे लागेल. शिवमंदिरात लाईटची व्यवस्था नव्हती परंतु गॅसबत्तीची सोय छान होती. लहानपणी गावाला लाईट गेली की एकतर गॅसबत्ती अथवा रॉकेलची बत्ती लावून अभ्यास करत असू. त्याची आठवण प्रकर्षाने झाली. थोडी विश्रांती घेऊन तोंडावर पाणी मारून गरमागरम सूपचा आस्वाद घेऊन आपटे सरांचे प्रतापराव गुर्जर यांच्या आयुष्यावरचे अनेक प्रसंग आणि इतर सर्वच ऐतिहासिक युद्ध किस्से ऐकताना भारावून गेलो होतो. आपटे सरांना तर ते प्रसंग कथन करतानादेखील गहिवरून आले होते. काय तो इतिहासाचा गाढा अभ्यास किती ती शौर्याविषयी आत्मीयता. आपटे सर तुम्हाला आम्हा सर्वांचा सलाम. तुमचे इतिहासावरील भाष्य पुन्हापुन्हा ऐकायला आवडेल. टाचणी पडली तरी आवाज यावा इतक्या शांत वातावरणात  सुमारे एक तास इतिहासातील किस्से ऐकून लगेचच गरमागरम खिचडी लोणचे, पापड, कोशिंबीर स्वीटडिश शिरा आणि थोड्या वेळाने गरमगरम मसालादुधाचा आस्वाद घेतला. छावणीचे लीडर अनिकेत रहाळकर, विलास दादा, प्रकाश पवार, अमोल, कृष्णा  खरंच आम्हाला माहेरी आल्याचा आनंद दिलात तुम्ही. अन्नदाता सुखींभव.
तेथील शिवमंदिरात सर्वांना जागा होणार नसल्याने आम्ही बरेच मेम्बर्स मंदिराच्या उघड्या प्रांगणात झोपायचे ठरवले. इथे तंबू नसल्याने ज्याने-त्याने आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये घोरण्याच्या वेगवेगळ्या तालावर एकमेकांशी जुगलबंदी सुरु केली आणि सकाळी उठून जोतो म्हणतो तो मी नव्हेच. जमिनीची गादी, टिपूर चांदण्यांच्या आकाशाचे पांघरून करून मी आभाळाकडे पाहत बसले होते. मला काही झोप येत नव्हती.  मी आपली दुसऱ्याला झोपऊन रात में तारे गिननेवाली. रात्री १२ नंतर झोप यायला लागली तर रात्रीस वाऱ्याचा खेळ सुरु झाला. स्लीपिंग बॅग मध्ये वारा घुसून बॅग उघडू पाहत होता. मी आपली डोळे बंद करून माझ्या मैत्रिणीला ढोसकून जागे केले. तू पहिले जागी हो आणि तुझ्या डोळ्यावरची स्लीपिंग बॅग बाजूला करून तुझे तोंड मला दिसेल अशी झोप आणि माझी स्लिपिंग  बॅग कोण उचलतंय ते बघ आणि लाईट कोण  मारतंय ते बघ. त्या शिवमंदिराच्या आवारात कोणाची बिशाद आपल्याला त्रास द्यायची ?? विलासदादाच ते रात्री बऱ्याच उशिरापर्यंत जागे होते आणि पहारा करीत होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून देत होते. हे नीट ठेव, ते नीट ठेव सकाळी सापडणार नाही. किती ती खरी काळजी. लीडर्सहो. इतकी अफाट,रांगडी माया कुठून आणता ओ??
मैत्रिणीला जागेकरून तिला जागे रहाण्याचा आग्रह करून त्रास देऊन मी इतरांच्या घोरण्याच्या तालावर थोडावेळ झोपी गेले. खरंच त्या चांदण्यांच्या छताखाली दोनतीन तासांची झोपदेखील स्वर्गसुख देऊन गेली. पहाटे नेहमीप्रमाणे ५ला उठून साडेपाचला पहिला बेड टी(आम्हाला तर घरी पण बेड-टी मिळत नाही रे)  मग सामानाची आवराआवर करून सकाळची मुख्य कामे उरकून व्यायाम करून ओळख परेड करून पुन्हा चहाबिस्कीट खाऊन छावणी लीडर्सचा आणि रांगण्याचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन आमचे लीडर्स आदित्य,अनिकेत यांच्या सूचनेवरून नारायणगडाकडे निघालॊ. सह्यांकनचा दुसरा दिवस लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे  उत्तमरित्या पार पडला. चक्रम हायकर्स रॉक्स.
संदर्भ- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे, दुर्गदर्शन - गो.नी. दांडेकर, नेटवरून साभार. 


2 comments:

  1. Hats off to your efforts for the events as well as for writing!!

    Keep it up! 👍

    ReplyDelete