बागलाण रेंज ट्रेक
हरगड, मुल्हेरगड, मोरागड, साल्हेर, सालोटा
दिनांक- १६-१७ जानेवारी २०२१
ठिकाण- नासिक
“डोंगरयात्रा ट्रेक ग्रुप”
|
डोंगरयात्रा ट्रेकलिडर्ससोबत एक बॅनर फोटो |
२०२१ हे नवीन वर्ष नवे काय घेऊन येणार हे कोणालाच माहिती नाही. २०२०ने असे मोठेमोठे धक्के दिलेत की सध्या बाहेर पडायची भीती वाटते परंतु म्हणून काय आयुष्य जगणे सोडून द्यायचे का ??शरीर जर निरोगी ठेवायचे असेल तर चालींग,(walking)सायकलिंग, पळींग,(running)योगा,डांस,कोणताही मैदानी खेळ असा व्यायाम चालू ठेवावा आणि मन निरोगी,तंदुरुस्त,ताजेतवाने,प्रसन्न ठेवायचे असेल तर ट्रेकिंग हा उत्तम व्यायाम आहे. कारण इथे येऊन आपले शरीर तर तंदुरुस्त रहतेच शिवाय शुद्ध हवा खाऊन फुप्पुस निरोगी राहते. सध्या कोरोनाच्या काळात हे खूपच गरजेचे आहे.ट्रेकमध्ये आपण फोटोग्राफी करतो, स्लोमो करताना आनंदाने उड्या मारतो,गप्पा करताना कितीतरी विनोद होतात आणि आपण खळखळून हसतो, बेधुंद होऊन गाणी गातो,मोकळेपणाने बागडतो,असेल ती चटणी भाकरी खातो,घाम आल्याने भरपूर पाणी पितो.ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करतो आणि घरच्या,ऑफिसच्या चिंता विसरतो ऐतिहासिक गडांना भेटी देऊन आपला मराठी इतिहास जाणून घेतो,गडावर स्वतः कचरा करत नाही आणि इतरांना कचरा करू देत नाही,अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो,प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकतो. जो सह्याद्रीत फिरतो त्यालाच ते ट्रेकचे महत्व समजते.
|
हरगड किल्ला |
कोरोना लॉकडाऊनचे ५-६ महिने आपल्याला फार काही धडा शिकवून गेलेत. त्यातून आपण काही बोध घेतला नाही तर मग आयुष्य व्यर्थ आहे. लॉकडाऊननंतर ढाकोबा ट्रेक, कुसूर घाटवाट ट्रेक, असे मध्यम चढाई ट्रेक केल्यानंर एखादा रेंज ट्रेक करायची हुक्की आली आणि डोक्यात अनेक चक्रे फिरू लागली कारण कोरोनाची टांगती तलवार अजून डोक्यावर आहेच आहे. आमचे ट्रेकर फ्रेंड तुषारसर आत्ताच बागलाण रेंज करून आलेत त्यांच्याकडून सगळी इत्यंभूत माहिती घेतली आणि बघता बघता दहा बारा जणांची टीम तयार झाली. परंतु प्रवास जरा जास्त असल्याने आणि पहिल्यांदाच रेंज ट्रेकला निघाल्याने आम्ही विचार बदलला आणि डोंगरयात्रा ट्रेकग्रुप सोबत बागलाण रेंज ट्रेकला जायचे ठरवले. कोरोनाकाळात मोठ्या ग्रुप सोबत जाणार म्हंटल्यावर आमच्यातील एकदोन मेंबर कमी झाले.शिल्लक राहिलेल्यांनी मात्र जाण्याचे निश्चित ठेवले. दिनांक १६-१७ जानेवारी २०२१ या दोन दिवसात ५ किल्ले करायचे होते.आमच्या बाकीच्या ट्रेकमेट्सने या महिन्याला चार-चार ट्रेक केले होते त्यामुळे ते पूर्ण तयारीत होते. मला याच महिन्यात भावाबहिणीच्या लग्नानिमित्त मुंबईत जावे लागल्याने माझे हे सगळे ट्रेक हुकले होते. माझा या महिन्यातील हा पहिलाच ट्रेक होता. दोन दिवसात पाच किल्ले म्हणजे तसे अवघड होते कारण आम्ही एक दिवसीय ट्रेक करणारे ट्रेकर आहोत. तरीही म्हंटल आपल्याला आपली शारीरिक कुवत तपासून पाहायची असेल तर असे रेंज ट्रेक अधून मधून केले पाहिजेत.
१६-१७ ला जरी ट्रेक असला तरी लांबचा पल्ला असल्याने आम्हाला पुण्यातून शुक्रवारी निघावे लागणार होते. पुणे ते साल्हेर हे अंतर जवळपास तीनशे ते साडेतीनशे कि. मी. आहे. इथे पोहोचावावयास ६-७ तास लागतात. आमची बस शुक्रवारी रात्री पुण्यातील ट्रेकपार्टनर गोळा करत निगडी-मोशीवरून नासिकमार्गे साल्हेरकडे रवाना झाली. रात्री दहाच्या सुमारास निघालो. मुंबईहून एक बस येणार असल्याने दोन्ही बस एकत्र येईपर्यंत थोडासा वेळ गेला. रात्री आमच्या बससमोर रोडवर एक कार पलटी झाली होती.एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या नियमाने त्या कारमधील पोरांना बाहेर निघायला मदत करून पुढचा प्रवास सुरु केला. बसमध्येच डुलकीवाली झोप घेऊन सकाळी सूर्य उगवायच्या आत मुल्हेरच्या पायथ्याशी पोहोचलो. फोटोपुरते फ्रेश होऊन चहा-नास्ता करून लीडर्सच्या नियोजनानुसार दुपारच्या जेवणासाठी गावातून चपाती भाजी डब्यात भरून घेतली.गडाच्या पायथ्याशी मुल्हेर गावात पोहोचल्यावर लीडर्सने हरगड, मुल्हेर, मोरागड या तीन गडांविषयी थोडक्यात माहिती दिली.डोंगरयात्रा ट्रेकग्रुपचा लोगो असलेले बॅचेस आणि सगळ्यांना ors चे वाटप करून आवश्यक सूचना देऊन ट्रेक सुरु केला. मला तर एका दिवसात तीन किल्ले करणे म्हणजे उरात थोडी धडकी भरली होती.परंतु एकदा ट्रेक सुरु केला की मग थांबायचं नाही असे मी ठरवलेले असते. आजकाल मला ट्रेक विडिओ करायचा नाद लागल्याने थोडा वेळ त्या व्हिडिओरेकॉर्डिंग साठी द्यावा लागतो त्यामुळे ग्रुप फोटो मध्ये मला सारखे हजर राहणे जमले नाही सॉरी टू आमची गॉगल गॅंग. परंतु जेव्हा ग्रुप जवळ आला की मग फोटो झाला.पहिला गड हरगड चढाई सुरु केली. साल्हेर - मुल्हेर किल्ले ही जोडगोळी महाराष्ट्रात ट्रेकर्समध्ये प्रिय आहे. साल्हेर हा किल्ला मुल्हेरपासून थोडा लांब आहे. हरगड-मुल्हेर-मोरागड हे अगदी सक्खे शेजारी शेजारी आहेत. मुल्हेर गावातून समोर दिसणारा मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड किल्ला आहे. हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.या दोन्ही वाटा मुल्हेरवाडी गावातूनच जातात. मुल्हेरवाडी गाव ते किल्ल्याचा पायथा यात जवळपास २-३ कि.मी चे अंतर आहे. धनगरवाडी वरून जाणारी वाट पकडावी. साधारण पाऊण तासांनी २ वाटा फुटतात, एक कच्ची डांबरी वाट सरळ, तर दुसरी उजवीकडे वळते. उजवीकडे जाणाऱ्या वाटेने ४५ मिनिटांत मुल्हेर माची आणि हरगड यांच्या मधील खिंडीत पोहोचता येते. या खिंडीतून डावीकडे मुल्हेर तर उजवीकडे हरगड चढाई करावी.
ट्रेकच्या सुरुवातीला सगळ्यांनाच दम लागत असतो. दुसऱ्यांना दम देणाऱ्यांनादेखील दम लागतो बर का. हरगडचा एक टप्पा पार केला तेव्हा आजूबाजूच्या डोंगररांगा खूपच देखण्या दिसत होत्या.फोटोसाठी जवळजवळ हातात घालून उभ्या आहेत जणू. जाताना एका ठिकाणी हरभऱ्याची शेती आणि त्याची राखण करणारे एक म्हातारे जोडपे आम्हाला भेटले. नाव विचारल्यावर मुलाखत दिल्याप्रमाणे स्वतःची माहिती खूप छानरीत्या मला त्या आजोबांनी सांगितली. मोतीराम विष्णू पवार असे त्यांचे नाव होते. हरबर्याच्या शेतीचा परिसर तर जणू स्वर्गच होता.
|
मोतीराम विष्णू पवार |
ती गवताची झोपडी म्हणजे माझ्या स्वप्नातील माझा बंगला जणू तो.आजूबाजूला हिरवीगार शेती, डोंगररांगा ते आजीआजोबा दोन टोकाला दोघे बसले होते शेतिची राखण करत. अगदी तसेच मी कुठेतरी सह्याद्रीत सूर्यकिरणांच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या झोपडीत तुम्हा ट्रेकर्सची वाट बघत बसलेली असेल. |
माझे स्वप्नातील घर |
त्या आजोबांना भेटून पुढे एका घळीतून आम्ही हरगडवर चढाई केली. मला आणि सगळ्यांना चांगलीच धाप लागत होती. आमच्या गँगची तुफानी फोटोग्राफी सुरु होती. गडावर पोहोचल्यावर पडझड झालेल्या कमानी, दरवाजा असल्याच्या खुणा केवळ शिल्लक आहेत. सर्वात शेवटच्या दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे, बाहेर उभ्या मारुतीची दगडात कोरलेली देखणी मूर्ती आहे तर गाभाऱ्यात शिवपिंडी आहे. हरगडाचा गडमाथा प्रशस्त आहे. मंदिराच्या समोर दगडी तोफगोळे पडलेले आहेत.
|
हरगडावरील शिवमंदिरातील पिंडी
|
|
हरगडावरील मारुती |
मंदिरासमोरुन दोन वाटा फ़ुटतात.एका वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते. तेथेच समोर घरांचे व वाड्याचे अवशेष दिसतात. उजवीकडची वाट पकडून गडाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो गडाच्या या टोकावर भली मोठी १४ फ़ूट लांबीची तोफ़ पडलेली दिसते तिला बांगडी तोफ असे म्हणतात. बांगडीच्या आकाराच्या अनेक रिंग्स एकत्र आणून त्या जोडून ही अवाढव्य तोफ बनवली आहे. बलाढ्य तोफ़ किल्ल्यावर कशी आणली असेल हा मला पडलेला प्रश्न आहे. |
हरगडावरील बांगडी तोफ |
तोफेजवळून डाव्या बाजूला उतरल्यावर एक चोर दरवाजा आहे. त्याला आम्ही भेट दिली.
तिथे एक शिलालेख आढळला.चोर दरवाज्याच्या बाजूने देखील गडावर चढाई करता येते परंतु तिथे रोपची गरज भासेल. |
हरगडावरील चोर दरवाज्याजवळ असलेला एक शिलालेख |
|
हरगडावरून दिसणारी मुल्हेर आणि मोरागडची डोंगररांग |
गडावरुन मुल्हेर गडाची माची, मोरागड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि धूसर साल्हेर असा सगळा परिसर दिसतो. गडमाथा फ़िरण्यास किमान दोन तास लागतात. हरगडावरून मुल्हेर गडावर असलेले गणपती मंदिर आणि तेथील तलाव उठून दिसत होता. हरगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही तसेच जेवणाची सोयदेखील नाही.उन्हाळ्याच्या दिवसात एक दिवसासाठी हरगड वर ट्रेकसाठी गेलो तर आपले आपण किमान चार लिटर पाणी घेऊन जावे.जेवणाचा चपाती भाजीचा डबा असावा.आमच्यासारखे दुरून जाणारे बरेच ट्रेकर्स हरगड मुल्हेर आणि मोरागड हे तिन्ही गड एकाच दिवसात करतात.अशावेळी आपल्याजवळ पाचसहा लिटर पाणी,orsकिंवा सरबत असावे. थोडा खजूर, आवळा कँडी, गुळशेंगदाणा चिक्की, लिम्लेटच्या गोळ्या असा खाऊ असावा की ज्याने आपल्याला एनर्जी मिळेल.शेवचिवडा अशा गोष्टींनी तहान जास्त लागते आणि मग पाणी जास्त लागते. गटागटा पाणी प्यायल्याने पोटात दुखू शकते. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत पण नेमक्या त्याच आपण विसरतो. हरगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४४२० फूट इतकी आहे.इंटरनेटवर वेगवेगळे अंतर दाखवले आहे.गडावर पाण्याची टाकी आहेत परंतु पाणी पिण्यालायक नाही. बांगडी तोफ पाहून चोरदरवाज्याला भेट दिली आणि ती मोठी घळ उतरून खिंडीत थांबलो.जाताना आमच्याकडील पाणी संपत आले होते. हरबऱ्याच्या शेतीजवळ त्या आजोबांकडून आम्ही आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि त्यांना त्याचे थोडे पैसेदेखील दिले कारण त्या वयस्कर व्यक्तींनी ते पाणी खूप खाली उतरून भरून आणले होते. बिसलेरी बाटल्यांचे कसे आपण लागेचच पैसे मोजतो तसेच आम्हीदेखील त्यांना दिले. नैसर्गिक पाण्याची किंमत त्याहून अधिक आहे असे मला वाटते कारण ते पाणी अगदी वेळेत आम्हाला मिळाले होते. सकाळी भरपेट नास्ता असून भरपेट केला गेला नव्हता त्यामुळे पोटात डोमकावळे ओरडत होते. दोनच्या सुमारास जेवणाचे डबे काढले आणि आवडती बटाटा भाजी खराब झालेली पाहून सगळ्यांचाच मूड ऑफ झाला. आम्ही पहाटे पोहोचून लगेच ट्रेक सुरु करू या दृष्टीने मुल्हेर गावातील डबा बनवणाऱ्यांनी ही भाजी रात्री बनवली असावी कारण ५०-५३ लोकांचे जेवण आणि सकाळचा नास्ता बनवण्यास जास्त वेळ जातो. आपण घरून आणलेले जेवण देखील उन्हामुळे एखाद्यावेळेस खराब होऊ शकते. त्यांनी इतक्या मेहनतीने बनवलेले जेवण आम्हाला जेवता आले नाही याची खंत वाटली. परंतु ट्रेकमध्ये असेही खूप जेवण करायचेच नसते बरे का??? आम्ही सगळ्यांनीच आपापल्या जवळ असलेला स्नॅक्स खाऊ काढला आणि पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेतली आणि मुल्हेर चढाई सुरु केली.
|
क्षणभर विश्रांतीवेळी दिसणारा हरगड |
या खिंडीत डावीकडून मुल्हेरच्या गणेशमंदिराजवळून येणारी वाट सुध्दा येऊन मिळते. आम्ही गेलो ती वाट दाट झाडी आणि काट्याकुट्याची होती. परंतु वाट चालताना मजा आली कारण तिथून गडपायथ्याचा परिसर रमणीय दिसतो आणि आपण किती उंचावर आलोय याचा आनंद होतोयेथून पुढे एक तास चालत गेल्यावर आपण एका घळीपाशी पोहचतो. या घळीतून वर चढल्यावर आपण हरगडाचे पहिले प्रवेशद्वार गाठू शकतो. संपूर्ण घळ पार करण्यास १ तास लागतो.
|
मुल्हेर चढाई करताना दगडात कोरलेली हनुमानाची मूर्ती दिसते आहे.
|
घळीच्या मुखापाशी आल्यावर समोरच भगव्या रंगातील हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती दिमाखात उभी होती. अवाढव्य दगडी भिंतीवर भव्य मूर्ती असणे म्हणजे ट्रेकर्ससाठी एक दिशादर्शक आहे. घळीतून वर पोहोचल्यावर उजव्या बाजूला गुहा आहेत तिथे रहाण्याची सोय होऊ शकते परंतु मुल्हेरवरदेखील जेवणाची सोय नाही ती आपली आपण करावी. चढताना कमानींची कलाकुसर पाहण्यासारखी होती. मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वतरांगांमध्ये आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ४२९० फूट आहे. मुल्हेरला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. चढाईची श्रेणी-मध्यम आहे.
मुल्हेर हा किल्ला बागुल वंशाच्या राजांनी बांधला होता.बागूल वंशाच्या राठोर घराण्याने १३१० ते १६३८ दरम्यान बागलाणवर राज्य केले. मुल्हेर किल्ला ही त्यांची राजधानी होती. त्यानंतर मोगलांनी बागलाणवर ताबा मिळवला.१६६४ च्या जानेवारी आणि ऑक्टोबर १६७०च्या सूरत लूट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बागलानातून सुरत जाण्यासाठी ह्या मार्गाचा उपयोग केला होता.पहिल्यांदा पुण्यापासून सुरतपर्यंतचा संपूर्ण प्रदेश मुघलांच्या ताब्यात होता तर दुसर्या प्रसंगी बागलाण प्रामुख्याने त्यांच्या ताब्यात होता.परतीच्या प्रवासात मोगलांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला परंतु महाराजांनी त्यांचा कांचन खिंडीत पराभव केला. त्यानंतर लवकरच शिवाजी महाराजांनी या भागात मोहीम सुरू केली.जानेवारी १६७१ मध्ये पहिल्या हल्ल्यामुळे साल्हेर किल्ला मराठा राजवटीखाली आला.त्यानंतर त्यांनी मुल्हेर किल्ल्यावर हल्ला केला पण मोगल किल्लेदार यांनी हा हल्ला परतावून लावला. तथापि, मराठ्यांनी चौल्हेर किल्ला ताब्यात घेतला. ऑक्टोबर १६७१ मध्ये मोगलांनी साल्हेर किल्ल्याला वेढा घातला.पण शिवाजी महाराजांनी मोरोपंत व प्रतापराव यांना वेढा मोडून काढण्यासाठी पाठविले. त्यांनी केवळ साल्हेरला वेढा घातला नाही तर फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरवर हल्ला केला आणि ताब्यात घेतला.या पराक्रमामुळे संपूर्ण बागलाण प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला.मुल्हेरचा इतिहास शोधताना "द इनक्रेडिबल महाराष्ट्र"यांच्या लेखात वरील उल्लेख आढळला.
|
बन के तितली दिल उडा उडा ...... कही दूर |
|
आमची गॉगल गॅंग |
माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर एका झाडाजवळ भडंगनाथाचे छोटे मंदिर आहे इथून उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते.मुल्हेरवरून मोरागडचा पसारा आवरता दिसतो. पाठीमागचे ट्रेकर्स येईपर्यँत आम्ही मुल्हेरच्या पठारावर स्लोमोज घेऊन पुढे निघालो. उतरताना मुल्हेरचा एक टप्पा अगदी कोथळीगडच्या सगळ्यात वरच्या टप्प्याप्रमाणे वाटला. मोरागडच्या प्रवेशद्वाराजवळच्या पायऱ्या उंच आहेत.
मोरागडवरून हरगडकिल्ल्याची रांग मावळत्या सूर्याच्या किरणांमध्ये न्हाऊन निघाली होती. मोरागडच्या पाठरावरून एक फेरी मारून आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला. एक छोटेसे धरण किंवा बंधारा दिसत होता तो मॅप मध्ये नरखोल असे दाखवत होता. एकंदरीत परिसर सुंदर रमणीय होता. त्यात संध्याकाळची वेळ असल्याने तिथेच बसू वाटत होते. अंधार पडत आल्याने आम्ही मोरागडला टाटा करून घळीतून उतरू लागलो.
|
ती पहा अतिशय सुंदर दिसणारी हरगड आणि मुल्हेरची रांग |
|
मोरागडवरील सूर्यास्त आणि आम्ही |
थॊड्या वेळात सोमेश्वर मंदिर दिसले मंदिराचा गाभारा आणि पिंडी खूपच सुंदर होती. पाच मिनिटांनी लगेचच पायथ्याची वाट चालू लागलो. पायाच्या पिपाण्या वाजू लागल्या होत्या. वाटेत एका ठिकाणी पाण्याची टाकी आहे तिथून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि तोंडावर पाणी मारले. थोडे पुढे आल्यावर हरगडावरून दिसणारा तो तलाव आणि गणेश मंदिर दिसले.
|
हा फोटो राहुल दर्गुडे यांनी काढला आहे. (मुल्हेर हद्दीतील सोमेश्वर मंदिर ) |
|
हा फोटो राहुल दर्गुडे यांनी काढला आहे. |
|
मुल्हेर आणि मोरागडच्या खिंडीत असलेली ही दगडी तटबंदी अतिशय सुंदर कलाकुसर आणि मजबूत बांधणी |
रस्त्याचे बांधकाम आणि गडाची डागडुजी चालू असल्याने खूप ठिकाणी सिमेंट आणि खडी पडलेली होती.अंधार झाला सगळ्यांचे हेडटॉर्च काजव्यांप्रमाणे चमकू लागले.रात्री साडेसातच्या सुमारास आम्ही पायथ्याला असलेल्या आमच्या बसमध्ये पोहोचलो. कमालीचा थकवा कमालीची भूक आणि एका दिवसात तीन गड सर केल्याचा कमालीचा आनंद असं सगळं एकसाथ अनुभवत होतो. आमच्या बसेस साल्हेरच्या दिशेने रवाना झाल्या.गाईड मधुकरच्या घरात आम्ही गरम-गरम वरणभात चपाती मटकीची भाजी असे फक्कड जेवण केले आणि आमचा भुकेला आत्मा शांत केला.सकाळी पहाटे पाचला साल्हेर सालोटा चढाई करायची असल्याने अकराच्या आत सगळेच चिडीचूप झोपून गेले.तीन गड एका दिवसात केल्याने एक वर्षांपूर्वी पायावर लोखंडी तवा पडला होता ते दुखणे बाहेर आले. पायाचा पंजा सुजून दुखू लागला होता. त्यात माझा आर्थ्ररायटीजचा बाबा पण याच वेळी हॅलो करत स्मित हास्य करीत येतो.(आर्थ्रायटीजचं माझे दुखणे डोकावते आणि आठवण करून देते की जयु जरा सांभाळून ट्रेक करा)त्यामुळे एकाच वेळी सगळं जर का दुखायला लागले तर मग इतक्या दूर येऊन साल्हेर सालोटा सर करायचा राहील आणि मला रडू आल्याशिवाय रहाणार नाही.
|
पहाटे दिसणारा सालोटा,खिंड आणि साल्हेर |
मला काही दुखणी मागे लागल्यांनंतर मी ट्रेक सुरु केला आणि त्यावर मात केली. हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही. दुखण्याचा बाऊ करत बसले असते तर मी कधीच ट्रेक केला नसता.ज्याला काही त्रास असतो त्यालाच ते ठाऊक आहे. ज्याला काहीच शारीरिक पीडेचा त्रास नाही त्यांनी आपले शरीर निरोगी आणि आयुष्य स्वच्छंदी ठेवण्यासाठी ट्रेक जरूर करावा आणि आपल्या अमूल्य शरीराला व्यायामाची सोबत करून आपले आयुष्य निरोगी ठेवून उत्तमरीत्या आयुष्य जगावे. आपल्याला कोणत्याही संकटातून कोणत्याही दुःखातून कोणत्याही आजारातून बाहेर पाडणारा एकमेव माणूस म्हणजे आपण स्वतः आहोत.आपली प्रबळ इच्छाशक्ती, रोजचा कोणताही एक व्यायाम,योग्य आहार पद्धती, वेळेवर झोप, संगीत ऐकणे, रोजचे हसणे,यागोष्टींनी आयुष्य समृद्धबनते आणि आपण पुढच्या वाटचालीसाठी सज्ज होतो हा माझा स्वतःचा विचार आहे. कोरोना लोकडाऊनच्या ब्रेकनंतर आमच्या ट्रेकमेट्सचे या महिन्याला तीन ते चार ट्रेक झाले होते. मुंबईतील नातेवाईंकाकडे लग्नाला जावे लागल्याने मी हे सगळे ट्रेक मिस केले होते त्यामुळे मनात थोडीशी धाकधूक होतीच. उद्या काय होईल त्याचा विचार आज केला तर आजही आपण शांत राहू शकत नाही.आज शांत झोपते सकाळचे सकाळीपाहू असे स्वतःशीच पुटपुटत सकाळचा साडेचारच्या अलार्म लावून झोपी गेले.मला पहाटे तिनच्या सुमारासच जाग आली हातपाय हलवून पहिले जागेवरच होते.या कुशीवरून त्या कुशीवर वळून कविता आणि हर्षुला नकळतपणेजागे करू पाहत होते.पूनम प्रतिभा मॅडम रात्रीच सगळंच आवरून झोपल्या होत्या. त्यामुळे ती वेळेवर उठून तयार होणार होती. मुंबईच्या ग्रुपचे कोणीतरी बिचारे उठून फरफर नाक साफ करीत होते. बहुतेक काहींना सायनसमुळे पहाटे-पहाटे असा त्रास होतो असे वाटते किंवा काहीही असेल. असो आम्ही साडेचारला उठून पटापट आवरून तयार होऊन सोबत आणलेला क्रिमरोल चहात डुबून खाल्ला आणि ट्रेक लीडर्सच्या सूचनेनुसार आम्ही लगेचच अंधारात हेडटॉर्च लावून साल्हेर-सालोटा ट्रेक सुरु केला. सुरुवातीला टेकडी चढतानाच एकदोन ट्रेकर्सना थोड़ा त्रास झाल्याने ते माघारी गेले. बाकीच्या ट्रेकर्सची पुन्हा मोजणी घेऊन ट्रेक चढाई सुरु केली.
|
ट्रेकर्स विद लिडर रवी सर |
|
साल्हेरवरून सालोटा किल्ल्याचे विहंगम दृश्य |
|
साल्हेर किल्ल्यावरील शिलालेख |
साल्हेर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५१४१फूट इतकी आहे.प्रकार गिरीदुर्ग असून चढाईची श्रेणी मध्यम-कठीण अशी आहे. जवळचे गाव वाघांबे आणि साल्हेरवाडी आहे तसेच सेलबारी-डोलबारी(बागलाण)डोंगररांगेत हा किल्ला वसला आहे. सध्याची अवस्था व्यवस्थित आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे.नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास ५६ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे हा प्रांत सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत. साल्हेरवाडीतून गडावर जायला चार ते पाच तास लागतात. वाघांबे मार्गे रस्ता अतिशय सुंदर आहे.आम्ही वाघांबे मार्गे त्या घळीतून चढाई केली. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर-साल्हेर असे याचे नाव पडले अशा लोककथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.माझी पाठीवरील सॅक स्वतःहून गाईड मधुकरने घेतल्याने मला स्वर्गसुखच मिळाले. त्यामुळे मी साल्हेरवर मनसोक्त बागडून घेतले. धन्यवाद मधुकर.
साल्हेरविषयी पौराणिक संदर्भ -भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदा त्यांचे स्थान प्रचितगडाजवळील चाकदेव पर्वतावर होते परंतु तेथून त्यांच्या बाणाचा नेम लागत नसावा म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूचा सहावा अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतःला जागा करण्यासाठी बाण मारून कोकण भूप्रदेश तयार केला.अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
|
ट्रेकगाईड मधुकर |
साल्हेरचा थोडक्यात इतिहास-साल्हेरचे युद्ध- इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेर गड जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. ‘एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले. मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती तर मराठी फौज त्यांच्या तुलनेने सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल, पठाण, रजपूत, तोफची, हत्ती,उंट, आराबा घालून युद्ध जाहले.युद्धात जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले.सव्वाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली.बावीस नामांकित वजीर धरिले. युद्धात खासा इख्लासखान याचा पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे,सडे पळाले, असे युद्ध जाहले.’ या युद्धात शिवाजीराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे छोट्या तोफेचा गोळा लागून पडले. महाराज म्हणाले, 'माझा सूर्याराऊ पडिला.तो जैसा भारतीचा कर्ण होता.' साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला तेव्हापासून ते शिवाजी महाराज अजिंक्य आहे असे मानू लागले.
साल्हेर किल्ल्यावरील जंगलात बिबट्या आहेत. बिबट्याचे दर्शन काहीवेळा होते असे ऐकलेय तसेच माकडे खूप प्रमाणात दिसली. मागील बाजूस घारी आहेत. ह्या किल्याच्या चारही बाजू पावसाळ्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांनी भरलेल्या दिसून येतात.काय सुंदर असेल पावसाळ्यातील दृश्य. सकाळी पावणेसहाला चढाई सुरु केली दोन तासात खिंडीत पोहोचलो. थोडीशी फोटोग्राफी करून साल्हेरच्या पुढच्या टप्प्याकडे वळलो. वाटेत जाताना लीडर रवि सर यांनी दगडी भिंतीवर असलेला एक शिलालेख दाखवून त्याविषयी माहिती दिली. काही तुटलेल्या काही चांगल्या पायऱ्या ओलांडल्यावर एक दरवाजा पार करून सालोट्याचे विहंगम दृश्य दिसले ते शब्दात सांगणे कठीण आहे. मोठ्या भावाच्या रक्षणार्थ लहान भाऊ उभा असून स्मित हास्य करत आहे असे वाटते. मंदिराच्या आकाराचा सालोटा खूपच सुंदर आणि प्रशस्त दिसत होता. नऊच्या सुमारास गंगासागर तलावाजवळ पोहोचलो आणि दहाच्या सुमारास परशुराम मंदिराजवळ गडाच्या माथ्यावर पोहोचलो.
|
रेणुका देवी मंदिर |
|
गंगासागर तलाव |
साल्हेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती असे दिसते. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे.ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे.गडाच्या एका अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर तलावाशेजारी गंगा-यमुना टाके आहे. ह्यांचे पाणी व गंगोत्री -यमनोत्री च्या उगमाचे पाणी सारखे आहे. गाईड मधुकरने असे सांगितले की त्यांचे आजोबा म्हणायचे की १८ फेटे एकाला एक बांधून एका फेट्याला मोठा दगड बांधून त्या टाक्यांमध्ये सोडून पहिला असता तो दगड टाक्यांच्या बुडाला पोहोचायचा त्यामुळे त्या टाक्या किती खोल असतील याचा अंदाज येतो. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.इथे रहाण्याची सोय होऊ शकते.गडाच्या माथ्यावर गंगासागरतलावाजवळ रेणुका देवीचे मंदिर असून ही परशुरामाची माता आहे. ह्या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात.येथील गुहेत आणि गुहेसमोर टेन्ट लावून रात्री वस्ती करून राहू शकतात.स्वतः जेवण बनवू शकतो अथवा पायथ्याच्या गावातील माणूस घेऊन जाऊन जेवण बनविता येते. फक्त इथे राहिल्यांनंतर तेथील परिसर साफ करायला कोणीही विसरू नये. परंतु हा किल्ला उंच असल्याने इथे फार कमी लोक रात्री वस्तीला थांबत असावेत असे वाटते. किल्ल्यावरून समोर छिद्र पडलेला डोंगर दिसतो तो म्हणजे म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर पाहणे आनंददायी ठरते. वातावरण चांगले,स्पष्ट असेल तर साल्हेरच्या माथ्यावरुन अचला,अहिवंत मार्कंड्या, रावळा-जवळा,धोडप, कांचन, राजदेहेर ,चौल्हेर,भिलाई, मुल्हेर,मोरा,रतनगड,पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच आकाश स्वच्छ असेल तर जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तसेच समोर नाखिंद्या व कोठ्या डोंगर लक्ष वेधून घेतात.
|
किल्ल्यावरील सगळ्यात उंच ठिकाण परशुराम मंदीर |
|
वरून दिसणारा गंगासागर तलाव |
|
रहाण्याची सोय होऊ शकते अश्या किल्ल्यावरील गुहा |
माथ्यावर पोहोचल्यावर हवेचा दाब इतका होता की उडून जातो की काय असे वाटत होते. माझे जाकेट उडत असताना कोणीतरी म्हंटलेदेखील की मॅम ते जाकेट काढा नाहीतर उडून जाल. गाईड मधुकर म्हटला की साल्हेरवाडीच्या बाजूने रोप वे चे काम चालू केले होते. लगेच लीडर म्हणाले की ते गडसंवर्धनवाल्यानी बंद पाडले आहे. ज्यांना गडकिल्ल्यांबद्दल आदर नाही ते लोक रोप वे झाला की आयतेच वर येऊन गडावर घाण करून त्याची वाट लावतात. असे गडसंवर्धनवाल्यांचे ठाम मत आहे आणि ते बरोबर आहे. तेथील माथ्यावरील परशुराम मंदिर तसे फार मोठे नाही परंतु छान आहे. मंदिराला एक फेरी मारून क्षणभर मनभरून बसलोदेखील नाही आणि बॅनर फोटो घेऊन लगेचच सालोटा सर करायला निघालो. ऊन होऊ नये म्हणून लीडरने तश्या सूचना केल्या आणि आम्ही साल्हेर उतराई सुरु केली. माझा पायाचा पंजा तिथूनच त्रास देऊ लागला मी थोडे दुर्लक्ष केले जसजसे उतरू लागलो तसा मात्र पाय ठणकू लागला. आपले शरीर आणि मन ही अशी यंत्रणा आहे की त्यात काही बिघाड होत असेल तर आपल्याला वेळेवर सूचित करत असते. परंतु कधीकधी आपण दुर्लक्ष करतो. मनातून खूप इच्छा होती की इतक्या दूर आलोय तर सालोटा पूर करू परंतु पाय काय साथ देईना. त्यामुळे मी खाली साल्हेरसालोटा खिंडीत बसायचे ठरवले कारण अजून एका मैत्रिणीचा पाय दुखत होता. म्हटलं चला आपण दोघी बसुयात. परंतु त्या मैत्रिणीने पायाला स्प्रे मारून पाय थोडा बरा केला आणि ती सालोट्यावर जायला तयार झाली. मी बसल्यावर अजून काही ट्रेकर्स म्हणाले मॅम आता इतका पुढे राहून ट्रेक केला तर आता हा एवढा एक पूर्ण करा.परत मन फिरले. मधुकर तू तर देवासारखाच धावून आलास बाबा.मधुकर गाईड जवळ माझी सॅक दिली आणि मी चालू लागले.माझा स्पीड चांगला होता,स्टॅमिना पण चांगला होता फक्त पायाला खूप महिने आधी थोडी दुखापत झालीये त्यामुळे तो सुजून बुटामध्ये मावत नव्हता आणि त्यामुळे दुखत होता. नाहीतर मी आतापर्यंत एकही ट्रेक अपूर्ण ठेवला नाही आणि ठेवणारदेखील नाही."जो आपुन बोलता है वो आपुन करताइच है पर जो आपुन नहीं बोलता वो आपुन डेफिनेटली करता है."
|
साल्हेर किल्ल्यावरील परशुरामाच्या मंदिरातील मूर्ती |
|
डोंगरयात्रा ट्रेकलीडर्ससोबत आमची गॉगल गॅंग |
एकदा ट्रेकला गेले के काय होईल ते होईल पण ट्रेक पूर्ण करायचाच. ट्रेकगुरुजी तुषार बरोबर म्हंटले होते की दमछाक झाली तर एखादा गड सगळ्यांनी स्किप करायचा आणि आराम करून गडाचा आनंद घ्यायचा आणि गडावर थोडे अधिक वेळ थांबायचे. परंतु जेवणाची व्यवस्था खाली पायथ्याच्या गावात होती शिवाय इतर ट्रेकर्सनादेखील सालोटा सर करायचा होता त्यामुळे मुंबईचे आठदहा ट्रेकर्स सोडले तर बाकीचे सगळेच सालोट्याच्या वाटेला निघालो.
|
त्यादिवशीचा माझा दगाबाज पाय |
सालोटा किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ४५५० फूट इतकी आहे. वाघांबे मार्गे खिंडीतून गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात. मी गाईडच्या मतानुसार ७०-७५ टक्के सालोटा सर केला फक्त पावकिलो कील्ला सर करणे बाकी राहिले. काही गोष्टींची गोडी अपूर्णतेतच असते असे म्हणतात. "मी पुन्हा जाईन मी पुन्हा जाईन." |
मी या पॅच पर्यंत सालोटा पूर्ण केला |
|
सालोटा किल्ल्यावरून दिसणारा साल्हेर किल्ला |
मी अर्धा तास चालून गेल्यावर एक छोटा पॅच चढल्यावर पाय अजूनच ठणकू लागला. मग मात्र मी माघार घेतली आणि लीडरना सांगून पुन्हा खिंडीकडे निघाले. लीडरने तेवढा पॅच खाली उतरवून मग ते टीमसोबत गेले. एक मालेगावचा ट्रेकग्रुप उतराई करत होता त्यांच्यासोबत गप्पा करत दहावीस मिनिटांमध्ये खिंडीत उतरले.तिथे लीडर मनोजसर मुंबईचे काही ट्रेकर्स आणि आमच्या टीममधील आदित्य आणि निलेश मस्त आराम करताना दिसले आणि जीव जळाला. कारण ना मी सालोटा पूर्ण केला ना मी आराम केला. फार वाईट वाटले. असे वाटले होते की इथे शांत आडवे होऊन एक वामकुक्षी घ्यावी परंतु लीडरने फक्त पाच मिनिटे विश्रांतीसाठी मला दिले कारण सालोटावर न गेलेले बाकीचे आधीच बसले होते. बसले होते म्हणजे त्यांची विश्रांती झाली होती. लगेच दुसरा अर्थ काढू नये. दुपारी साडेबाराच्या सुमारास खिंड सोडून सकाळी चढलेल्या घळीतून आम्ही उतरू लागलो. इतर एकदोन ट्रेकरनादेखील उतरण्यास त्रास होत होता त्यामुळे आम्ही थांबत थांबत २च्या सुमारास घळ उतरलो.आमची बस आम्हाला घेऊन एका मोकळ्या मैदानात घेऊन गेली. हॉटेल न्यू चिकारचा फलक वाचून आश्चर्य वाटले. मस्त चवदार चिकन रस्सा ,चपाती भात,लिंबूच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पोट भरले, मन तृप्त झाले आणि कालच्या जेवणाची कसर भरून निघाली सर. अन्नदाता सुखीभव.लीडर्सना या उत्तम आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद. राहिलेले ट्रेकर्स पाठोपाठ आले संध्याकाळी चारपर्यंत सर्वांची जेवणे आटोपून आम्ही पुणेकडे आणि मुंबईवाले मुंबईकडे रवाना झाले. वेगवेगळ्या ठिकाणहून आलेले ट्रेकर्स होते तरीही असे वाटत होते की सगळे एकमेकांना आधीपासून ओळखत आहोत. सहयाद्रीतच अश्या किमया घडत असतात.दोघे जण तर पंढरपूरहून ट्रेकसाठी आलेले होते. सगळ्यांचीच नावे लक्षात नाही राहिली. येताना गाण्याच्या भेंड्या रंगल्या नाहीतर मग काय केलं आम्ही?? मध्ये बस पंचर झाली त्यासाठी फक्त अर्धा तास थांबलो त्या वेळेत ज्याने त्याने आपापला चहा, भजी प्लेटवर ताव मारला. दूरचा प्रवास संपवून रात्री एक ते दीडच्या सुमारास घर गाठले. दोन दिवसात पाच किल्ले तसे आमच्या एकदिवसीय ट्रेकर्ससाठी अवघड होते परंतु खूप छान प्रयत्न सर्वांनी केला. डोंगरयात्रा ट्रेकग्रुपचे लीडर मनोज सर, रवी सर,राहुल,आमची ट्रेक गॅंग आणि आलेले सर्व ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्सना मनापासून धन्यवाद. "भेटू माझ्या लाडक्या सह्याद्रीत."
|
आमची गॉगल गॅंग |
ढलता सुरज कल का उजाला लेकर आयेगा......
मस्त लिहिलंय 👍
ReplyDeleteThank you 😊
Deleteखूपच छान वर्णन केलंय, योग्य रीतीने मांडलं सुद्धा आहे, खूपच सुंदर आणि थरारक अनुभव आलाय या ट्रेकला, आपल्या ग्रुपचा असा मोठा पहिलाच ट्रेक तरी आपण तो यशस्वीरित्या पूर्ण केला 😁
ReplyDeleteThank you 😊
Deleteसुंदर वर्णन अप्रतिम अशेच अनेक ट्रेक करत राहा आणि असाच सुंदर लिखाण करत राहा 😊
ReplyDeleteThank you 😊 keep treking
Deleteतुमच्या सारख्या इतरही महिला घरदार, संसार आणि प्रपंच करून आपला ऐतिहासिक भटकंतीचा छंद पूर्ण करतात त्या सर्व गॉगल गँगचा मला कायम हेवा आणि अभिमान वाटतो. तुम्ही आणि इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीमुळे हा रेंज ट्रेक पूर्ण होऊ शकला शेवटी आम्ही काय तर फक्त मार्गदर्शक, पण तुम्हांलाच व्हावे लागते तुमच्या ट्रेकचे शिल्पकार या न्यायाने तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात. भेटूया असेच पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत.वेळ काढून सह्याद्रीत फिरुया, फिरवत राहूया आणि शिकूयात. 😊
ReplyDeleteThank you sir,😊
Deleteअप्रतिम लिहिलंय तुम्ही,
ReplyDelete2 दिवसात जे काही बघितलेले आणि अनुभवलेले असते, ते अगदी हुबेहूब शब्दात मांडायचे म्हणजे ती सुध्धा एक छान कला आहे.
आणि मी अनुभवलेला बागलाण रेंज ट्रेक असा वाचताना खूप मस्त वाटत आहे.
Thank you 😊
DeleteVery nice 👌
ReplyDeleteThank you 😊
Deleteमॅडम, मी ट्रेक प्रत्यक्षात एकदा केला परंतू ब्लॉग वाचुन दोनदा केल्याची अनुभूती आली. सत्यापेक्षा तुम्ही केलेलं वर्णन सरस ठरलं आहे. आपणां सर्वांच्या साथीनं हा ट्रेक करणं ही खरोखर पर्वणीच होती! ब्लॉग लिहिताना, फोटोग्राफीसाठी, ट्रेकदरम्यान, माहिती संकलीत करतांना, इतकेच नव्हे तर ट्रेकच्या प्लॅनिंगपासून तुम्ही जे अथक परिश्रम घेतले आहेत त्यासाठी, Hats off to you!!
ReplyDelete〽️🚩
आम्हा 11 जणांच्या टीमला आपल्यासमावेत सामावून घेतलं यासाठी टीम डोंगरयात्रा चे मनःपूर्वक आभार! आपल्या ग्रुपशी कनेक्ट होतांना आमच्यापैकी प्रत्येकास अतिशय आनंद होत आहे! 😊
Thank you 😊 👭👭👭👬👫👭
Deleteअप्रतिम वर्णन ,खूप छान hats off to you jayuu👍✌
ReplyDeleteThank you dear ❤️❤️we rocks 👭👫👬👭👫👫😊💃
DeleteKhoop masta!!!👌
ReplyDeleteThanx
Deleteखूप छान माहिती जयू ताई !
ReplyDeleteछान लिहिलंय..लिहीत राहा..फिरत राहा..आणि लेखनातून लोकांना आनंद आणि माहिती देत राहा
ReplyDeleteSir, thanks a lot.
DeleteKhup sundar lihilay madam.
ReplyDeleteTrekking la tr maja alich
Pn vatal navhat Ganyachya bhendya na pn evhadhi maja yeil 😅😀
Hehehe Thanx a lot..😊
Deleteतरी सगळे ट्रेक रपेट करून दमले होते... नाही तर अजून धमाल केली असती.गाण्याची तिच खरी हमरी तुमरी ठुमरीवाली मजा असते.भेटू पुन्हा सह्याद्रीत💃keep treking 😊