Wednesday, 13 September 2017

"आनंदाच्या तालावर सैराट झालेली रूपेरी कर्नाटक सहल.."

कर्नाटकी रंगीबेरंगी सहल -भाग २ 
अविस्मरणीय सहलीचे पुढचे ३ दिवस



कर्नाटक राज्याला आधी म्हैसूर या नावाने ओळखले जायचे. या राज्याची सीमा अरबीसमुद्र,उत्तर पश्चिम गोवाउत्तर महाराष्ट्रदक्षिण पूर्व तामिळनाडूदक्षिण केरळला जोडून अशी आहे. कर्नाटक राज्यात जास्तीत जास्त कन्नड भाषा बोलली जाते. तसेच तुळू आणि कोकणी भाषा देखील बोलली जाते.कर्नाटकी शास्त्रीय संगीताला जागतिक शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. 'फोना" टीमच्या सहलीचे कर्नाटकामध्ये फिरण्यासाठीचे फक्त ३ दिवस होते २ दिवस तर रेल्वेच्या प्रवासातच जाणार होते. त्यामुळे आमच्याकडे तसा वेळ कमी होता. ३ दिवसात जोग फॉलमुरुडेश्वर बीच-गोपुरमगोकर्ण महाबळेश्वरआणि जास्तीचा वेळ असला तर शिरशीच्या गणपती मंदिराला भेट देणेशिरशी याठीकाणी असलेल्या सहस्त्रलिंगचे दर्शन आम्हाला मिळाले तर आमचे अहोभाग्यच होते. कर्नाटक शहर म्हणजे मंदिरांचे शहर आणि स्वच्छ शहर आहे. 
कर्नाटकी रंगीबेरंगी सहलीच्या ब्लॉगच्या  पहिला भागात पुणे ते मुंबईमुंबई ते भटकळ प्रवास आणि कर्नाटकमध्ये पोहोचल्यावर दुपारी भेट दिलेल्या श्री मुरुडेश्वर बीच आणि गोपुरम याचे वर्णन आपण वाचले आता पुढे जाऊयात. 
पहिल्या दिवशी रूमवर पोहोचल्यावर आम्ही तिघी म्हणजे मी, नोवा आणि शोभा दिवसभरात काढलेले आपापल्या मोबाइल मधले  सगळे फोटोज  पाहत बसलो होतो. एकीकडे एकमेकींची उडत उडत ओळख करून घेत होतो कारण आम्हाला ओळखीची गरज आहे असे वाटलेच नाही आमची आधीच गट्टी जमली होती. त्यात निमा विंचू आणि विंचू सर मिळून आम्ही पाच पांडवांसारखे सगळीकडे एकमेकाला न सोडता वावरत होतो. पहिल्या दिवशी जेवताना देखील ३ दिवसाचे रहिवासी असलेल्या हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणत होता ४ लोगोंका टेबल है ४ लोगोंका ग्रुप करके बैठो और ऑर्डर करो. त्याला म्हटलं आम्ही जर पाच जण बसलो तर चलेगा क्या?? ( खरंतर त्यांना मराठी येत नसल्याने आम्ही गपचूप बोलून घेतले तुझं काय खपत का?) पण तिथे त्या गोयंद्याने ४-४ सिटचीच व्यवस्था  केल्याने  ५वि खुर्ची मिळते कुठे?? शेवटी त्या मॅनेजरचीच खुर्ची आणून आम्ही त्या टेबलवर ५ जणांनी एकत्र जेवण केले.
पहिल्या दिवशी रात्रीचे गेले २ वाजले तरी आम्ही गप्पा मारत होतो. काय गप्पा मारत होतो आमचे आम्हाला ठाऊक. आमच्यात मी फक्त फोना सोबत जाणारी एक साधी ट्रेकरशोभा जॉब करणारी आणि कराटे चॅम्पियन. ओळख म्हणून रात्री १ वाजता तिथेच २-४ कराटेच्या किका मारून दाखवल्यावर आम्हाला विश्वास पटला की आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा कोणीतरी बॉडीगार्ड आहे. आमची बाजू सुरक्षित झाली. चुकून हरवलो तरी चिंता राहणार नाही. आमच्यातली तिसरी पार्टनर नोवाची आई येणार होती तीचे कॅन्सल होऊन तिच्याजागी वेळेवर नोवा आली (MBBS,पटकन ऐकणारीउत्तम फोटो काढणारी आणि महत्वाचे म्हणजे फोटो काढायला कधीही न कंटाळणारी. खरे तर आम्ही रूममेट्स असे भारी भेटलॊ होतो एकमेकाला की कोणालाच फोटोचा कंटाळा नाही. पाहिल्याच  दिवशी १००० हुन अधिक फोटोज झाले असतील. त्यात आम्हाला फोटोसाठी उत्तम फोटोग्राफर म्हणून विंचू सर लाभले होते. भारी कॅमेरा त्यात ती दणकट सेल्फी काठी अहाहा क्या बात है...(सोबत एक डॉक्टर, एक फोटोग्राफर, एक बॉडीगार्ड,आणि काळजी घेणारी निमा असले भारी फ्रेंड्स घेऊन मी निश्चिन्त मिरवीत होते.)
आमची हॉटेलवरची कर्नाटकातील पहिली सकाळ ५ वाजून १५ मिनिटांची होती. रात्री २ नंतर झोपलेलो आम्ही कसेबसे उठलो. कारण ७ पर्यंत सगळ्यांनी रूमच्या बाहेर आलेच पाहिजे असा लीडर्सचा आदेश होता. खरंतर झोप झाली नव्हती उठायला जीवावर आले होते पण नाही उठून कोणाला सांगणार? पटापट आवरून तयार झालो बाहेर आलो तर आमच्या अगोदर बऱ्याच लोकांचे फोटोसेशन सुरु होते. आता ट्रिप असल्याने आणि सगळेच मेंबर्स वेळेत येत असल्याने लीडर्ससुद्धा फोटोग्राफीचा आंनद घेत होते.तू माझा फोटो काढ मी तुझा फोटो काढतो अशी देवाणघेवाण सुरु होती.  ती सकाळ रम्य होती सगळ्यांचे फ्रेश,आंनदाने फुललेले उत्साही चेहेरे सहल खूप छान होणार हे दर्शवित होते. हॉटेलच्या गेटवर ग्रुप फोटो काढून नास्ता करायला २ कि.मी वर इंद्रप्रस्थ हॉटेलवर गेलो. तिथले वातावरण अजूनच ताजेतवाने होते. हॉटेल एकदम स्वच्छ होते. त्यांना मराठी हिंदी फार काही समजत नव्हते. आमच्यातील फोनाचे माजी अध्यक्ष आणि लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्याची सज्ज असलेले रोहित सर यांना कन्नड येत असल्याने आम्हाला कसलीही चिंता नव्हती. ते कुडुकुड आमच्या डोक्यावरून जात होते ती गोष्ट वेगळीसगळं कसं सकाळच्या उन्हासारखे सोन्याहून पिवळच होत होतं.
सकाळी नाश्त्याला उडीद वडाइडली सांबारडोसाउपमा शिरा सगळं होतं आणि तेही स्वादिष्ट आणि अनलिमिटेड होते. ज्यांचा आधी नास्ता होईल ते आम्ही तिथेच लहानमुलांसारखी फोटोग्राफी करत असायचो. जे दिसेल तिथे फोटो काढत सुटायचो. सगळ्या वयाची लोकं असल्याने मी तरी सगळ्यांना मुले आणि मुली म्हणत असू तेवढेच सगळ्यांना लहान झाल्याचा आनंद. पोटभर नास्ता केल्यावर आम्ही त्यादिवशीचा जोग फॉलकडे निघालो. जाताना वाटेमध्ये इडगाउंजी या ठीकाणी एक गणपती मंदिर होते तिथले दर्शन घेतले कोणी तिथल्या आठवण म्हणून भेटवस्तू घेतल्या.मी शिवाजीराजेंची प्रतिमा असलेली एक कीचैन घेतली आणि जोग फॉलच्या वाटेल निघालो त्या ठीकाणाहून जोग फॉल सुमारे ८० कि. मी.वर होता. समुद्राच्या बाजूच्या रस्त्याने  आमच्या बसेस जात असल्याने दमट हवामान होते. मधेच समुद्र आल्यावर जरा गार हवा आल्यावर छान वाटत होते. त्यांनतर घाट मार्ग लागला. 
इतका वेळ बसमध्ये नुसतं शांत बसणार आणि इतरांना बोर होऊ देणार हे कोणाच्याच पचनी पडणारे नव्हते. सहलीला आलो तर प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटणे हा माझा नियम मी सगळ्यांना लागू करते आणि केला. मी,रेशमा,निमा,नोवाशोभा बसमधली टेप-गाणी बंद  हळूच गाण्याच्या भेंड्या सुरु केल्यावर सगळेच त्यात सहभागी झाले. धमाल सुरु झाली. एका  मागोमाग आमच्या ३ बसेस मस्त जंगल पार करत निघाल्या. तिकडचे रस्ते एकदम शांत आणि स्वच्छ होते. एकच उणीव होती मराठी/हिंदी सूचना फलक कुठे दिसेल तर शपथ. खरंतर कर्नाटक भाषियांचे त्यांच्या भाषेवरचे ते प्रेम होते.आपण महाराष्ट्रीयन लोक मराठी इंग्लिश आणि हिंदी या तिन्ही भाषांचे सूचना फलक लावतो के जेणेकरून भारतातील प्रत्येक व्यक्तीला आणि भारताबाहेरील व्यक्तीला ते वाचता यावेत. आपण सगळ्यांना सामावून घेणारे महाराष्ट्रीयन आहोत. मग तो कोणत्याही धर्माचा असोते त्यांच्या जागी ग्रेट आपण आपल्या जागी ग्रेटशेवटी सगळे भारतीय आहोत आणि माणूस आहोत हेच खरे. 
दुपारी ११.३० च्या सुमारास आम्ही जोगफॉलच्या जागेवर पोहोचलो त्यावेळीचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा मानला जाणारा आणि उंचावरून कोसळणारा तो पाण्याचा प्रवाह  आहे. कर्नाटकातील शरावती नदीच्या प्रवाहातून पुढे चार प्रवाह तयार होतात आणि ८२९ फूट खाली कोसळताना दिसतात. अतिशय सुंदर, मनमोहक, डोळ्यांना सुख देणारे आणि मनाला आनंद देणारे ते दृश्य होते. या कोसळणाऱ्या चार धारांना राजा,रोअर,रॉकेटराणीअशी चार नावे दिली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांकडून या ठिकाणी ऊर्जा प्रकल्प बनवले आहेत. तेथील एका ऊर्जा प्रकल्पाला देखील आम्ही दुरून भेट दिली. डोक्यावर कडाक्याचे ऊन झेलत होतो आणि एकीकडे त्या उंचावरून कोसळणाऱ्या त्या चार महाधारांचा नजारा पाहत होतो. त्या ठिकाणचा फोटो काढून व्हिडीओ बनवण्याचा मोह आमच्यातील एकालाही आवरला नाही. लाखांनी फोटोज काढले असतील. सह्याद्री रांगेच्या दक्षिण भारताच्या पश्चिम घाटामध्ये शिमोगा जिल्ह्यामध्ये हा जोग फॉल पहावयास मिळतो.२ दिवस अगोदर महाराष्ट्रात पावसाने जो कहर केला होता तितका पाऊस असता तर त्या जोग  धबधब्याचा प्रवाह आणिक वाढलेला असता आणि ते दृश्य अजून जास्त छान, जोरदार, जबरदस्त वाटले असते. 

या अगोदर या ठिकाणी फोनाची सहल गेली असताना या जोग फॉलचे चित्र खूप वेगळे होते. समोर कोसळणाऱ्या धारांचा प्रवाह इतका जोरदार होता की आम्ही जिथे फोटोग्राफी करत होतो तिथपर्यंत ते पाण्याचे तुषार उडत होते. तरीही जे दृश्य आम्ही पहिले ते सगळ्यात छान होते. अवर्णनीय होते. १२ वाजून गेले होते जेवणाची वेळ होत आली होती. परंतु आमच्या लीडर्सने तिथे असलेल्या जोगव्हॅलीमध्ये ज्यांना जमेल त्यांनी पटकन जाऊन येऊ असे सांगितले. पटकन जाऊन येऊ म्हणजे थोडेसे जवळच एखादा पिकनिक पॉईँट असणार असे आम्हाला वाटले.
आम्ही फोटोग्राफी करत असताना २ लीडर्स आणि अजून ३-४ इच्छुक मेंबर्स पुढे गेले देखील. "हम पाँच ढुंढते ही रह गये." जोग फॉल परिसर खूपच मोठा आणि अप्रतिम आहे. आमच्या  फोनाच्या  सहलीचे आयोजक श्री नितीन पवार सर यांनी आमच्या ६० लोकांच्या जेवणाची सोय आधीच केली होती परंतु ऐनवेळी त्या तिथल्या जेवण बनवणाऱ्याने तिथे आलेल्या २०० लोकांच्या ग्रुपमुळे आमचे जेवण कॅन्सल करून त्यांना दिले.  लीडर्स आणि  सगळ्यांचाच राग अनावर झाला. अशी ऐनवेळी फजिती करणाऱ्या लोकांना आणि थोड्या फायद्यासाठी चांगल्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना अद्दल घडवायला हवीच. परंतु आम्ही दुसऱ्या राज्यात होतो. आता त्रागा करून काही उपयोग नव्हता. वेळेवर असा  प्रसंग येऊ शकतो त्यातून कसा मार्ग काढायचा हे 
'फोना" च्या लीडर्सना पक्के माहिती आहे. "फोना लीडर्स रॉक्स." आम्ही सगळे फोटोग्राफ़ी मध्ये मग्न असतानाच तात्काळ तिथे असलेल्या दुसऱ्या जेवण बनवणाऱ्या स्थानिकांना ६० लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि त्यांनी लगेच जेवण बनवून वाढणास सुरूही केले. कारण अश्या मोठ्या पर्यटनस्थळी तेथील लोकांना अंदाज असतोच की वेळेवर कितीही लोकांचे जेवण बनवावे लागू शकते आणि तोच तिथला मुख्य व्यवसाय असल्याने बऱ्यापैकी तयारी आधीच दिसून आली. एकीकडे लोक जेवण जेवायला सुरु करत होते एकीकडे काही लोक लीडर्सच्या नावाने शंख करीत होते.लीडर सुद्धा माणूसच असतो त्यालाही वेळेवर काहीतरी तरतूद करावीच लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणाला थोडासा उशीर झाल्यामुळे इतरांनी समजून घ्यायला हवे.  तितक्यात आम्ही तिंघी व्हॅलीचा मार्ग विचारून व्हॅली उतरावयास लागलो. खूप लोक ती जोगफॉलची व्हॅली चढत आणि उतरत होते. तसेच शाळेच्या मुलांची सहल आली होती ती मुले देखील पटापट उतरताना दिसली त्यामुळे हा एखादा छोटा पिकनिक पॉईंटच असेल असे वाटले होते. आम्हाला आमचे लीडर्स काही दिसेनात. आमच्यातले काही लोक परत येताना दिसले. आम्ही तिघी उतरत गेलो उतरत गेलो. सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या होत्या त्याने खूप पाय दुखू लागले होते. किती खाली उतरायचे याचा अंदाज नव्हता कारण नुसत्याच पायऱ्या दिसत होत्या आणि मधूनच जोग फॉल दिसला की हायसे वाटायचे. मधेच काही १८-२० वयोगटामधील मुले या व्हॅलीतून चढत होती ते मला म्हणाले,"मॅम, आप मत जावो चढ नहीं पाओगे." तरीही आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत उतरत राहिलो आणि आमचे लीडर्स दिसेपर्यंत उतरतच राहिलो. शेवटचा टप्पा पार करताना खूप दमायला झाले होते. शिवाय मला आत्ताच उतरलेल्या पायऱ्या चढण्याची काळजी वाटू लागली कारण माझ्याकडे फक्त अर्धी बाटली बिसलेरीचे पाणी होते. ते मी अक्षरशः स्टोलमध्ये लपवून ठेवले होते.(sorry फ्रेंड्ज माझ्याकडे पर्याय नव्हता.)  मी नोवा आम्ही खाली उतरत गेलो शोभा अर्ध्यातून परत गेली होती कारण खरंच उतरताना भारीच दम लागत होता आणि चढताना काय हालत होणार याचा अंदाज आल्याने बरे झाले शोभा तू परत गेलीस. पुढच्यावेळी तुला सोबत नेऊ हो.  तिकडे खाली उतरल्यावर धबधब्याच्या पाण्याशिवाय प्यायचे पाणीच नव्हते आणि पोटाच्या इन्फेक्शनमुळे मी यावेळी किमान सहल संपेपर्यंत तरी बिसलेरी पाण्याशिवाय पाणी पिण्याचे टाळले. आणि यात मला माझ्या पाच पांडवांनी खूप मदत केली. मला बिसलेरीशिवाय पाणी पिऊ दिले नाही. थँक्स शोभा, नोवा, निमा, आणि विंचू सर आणि रोहित सर.  आम्ही व्हॅलीमध्ये उतरलो तिथून दिसणारा तो जोग फॉल अजूनच अप्रतिम दिसत होता. पांढरा कापूस हवेत उडतो आहे असा भास होत होता. तिचे गेल्यावर समजले की मंदार सर राणे सर नवीन शिर्के आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन लेडीज त्यात एक त्या साडी घातलेल्या जयश्री काळोखे ग्रेट होत्या.  साडी आणि चप्पल वर त्या दरीत उतरल्या होत्या. जयश्री काळोखे सलाम तुम्हाला.त्यांना पाहून मला के टू एस ला साडीवर आणि साध्या बुटांसोबत आखा कात्रज ते सिहंगड ट्रेक आढाव मॅडमने बिनधास्त पूर्ण केला होता ते आठवले. महत्वाचे म्हणजे जोगफलच्या व्हॅलीमध्ये मोठ्या कष्टाने पोहोचण्याच्या टीम मध्ये मुलींची संख्या जास्त होती. 
फोना टीमच्या मुली रॉक्स. सुमारे ८३० फूट खोल दरीमध्ये भर उन्हात १ वाजता उतरणाऱ्यांचे अभिनंदन आणि कौतुक. मीनोवाज्ञानदाजयश्री काळोखेमंदार सरराणे सरनवीन शिर्केसुप्रिया शेवाळे आणि अजून २-३ जणांची नावे ठाऊक नाहीत.   इतके जण ती खोल व्हॅली उतरलो आणि लगेच चढलो.  व्हॅलीतून जोग फॉल मानसोक्त अनुभवून घेतला आणि लगेचच १० मिनिटांमध्ये लीडर्सने व्हॅली चढण्याचा आदेश दिला. आम्ही त्या जोग फॉलचे पाणी तोंडावर मारले आणि ग्रुप फोटो घेऊन लगेचच निघालो. मी ज्ञानदामंदार सर पुढे निघालो होतो परंतु कोणाला तरी व्हॅली चढताना खूप त्रास होऊ लागला आणि मंदार सर मागे थांबले. अशा अनोळखी ठिकाणी कृपा करून कोणी ट्रेकिंगची सवय नसेल स्वतःचा स्टॅमिना माहित नसेल तर बिलकूल दारी उतरायचे धाडस करू नये.  मंदार सर आणि इतर लीडर्स केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यासोबत आलेल्या मेंबर्सना सोडून येत नाहीत.उलट काहीतरी क्लुप्ती करीत गोड बोलून थोडेच अंतर राहिले आहे असे सांगत ट्रेक पूर्ण करवून घेतात.मला तर खुप त्रास होत होता पण माझ्यामुळे मी उशीर होऊ दिला नाही ज्ञानदा, मी, राणे सरांसोबत १ मिनिटांचा उभ्या उभ्या थांबा घेत ३ वाजता व्हॅली चढलो. आणि क्षणभर बसलो होतो त्यावेळी आम्ही चढत असताना उतरणारी एकमेव मुलगी होती सुप्रिया शेवाळे.  ती दरीत उतरताना इतक्या 1385 पायऱ्या मोजत-मोजत उतरली होती. हॅट्स ऑफ सुप्रिया. आम्ही वर येऊन बसतोय तोवर ती आली देखील काय वेग असावा तिचा. आणि त्यात ती जेवण करून लगेच उतरली होती. मस्त सुप्रिया, मानले बाबा तुला मी. 
सुप्रिया आम्ही सगळे लगेच जेवायला गेलो थोडा रस्सम भात खाल्ला. कोणी आईस क्रीम खाल्ले,पान खाल्ले आणि त्यानंतर मागे राहिलेल्या मेम्बर्सना घेऊन मंदार सर आले. व्हॅलीमध्ये उतरताना काहीच अंदाज नसल्याने उतरत गेलो आणि एक दोघं मेंबर्सना सांभाळून आणताना जरा उशीर झाला. इकडे बाकी लोकांनी काहीतरी गोंधळ घातला होता.लीडर्सना आणि आयोजकांना बरेच काही ऐकावे लागले. कारण पुढच्या ट्रिपला उशीर झाला होत असल्याने २ बसेस जेवून पुढे निघाल्या आमची एक बस मागे राहिली. आमची बस चार वाजता तिथून निघाली भर उन्हात ट्रेक पूर्ण केला आणि खाली दरीमध्ये खूप ऊन असल्याने आणि वेळेअभावी फक्त १० मिनिटे थांबून लगेच ८३० फूट वर त्या १३८५ पायऱ्या आम्ही चढलो आणि लगेच घाटामध्ये प्रवास केल्याने मला थोडा त्रास झाला आणि दुपारचे जेवलेले सगळे बाहेर आले पण त्याला फक्त १० मिनिटे गेली असतील.काहींनी माझ्यामुळे उशीर झाला त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे सांगत आहे की माझ्यामुळे कसलाही उशीर झालेला नाही. मंदार सर आणि डॉ. नोवा मनापासून धन्यवाद . नोवा माझी पाठ चोळत उभी होती आणि मंदार सर पाणी घेऊन उभे होते. या कौटुंबिक वातावरणामुळेच  फोना ग्रुप सोबत मला पाठविले जाते. थँक्स फोना टीम. 
आमचा प्रवास चालू होता संध्याकाळ होत आली होती लाल संधिप्रकाशाने आकाश लालसर झाले होते परंतु घनदाट जंगलामुळे ते सुंदर आकाश अधून मधून दिसत होते.  अंधार पडू लागला आता आम्हाला गोकर्ण बीचवर जाता येणार नाही हे समजून होतो आम्ही परंतु त्याहून जोग फॉलच्या व्हॅलीत उतरून क्षणात ती व्हॅली चढण्याचा आनंद स्वर्ग सुखाहून जास्त होता. त्यावेळी गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाल्याने आम्हाला बाप्पानी दर्शन दिले.
त्या मिरवणुकीमधील आमच्या पुढे गेलेल्या मेम्बर्सनी तिथल्या कलाकारांच्या छान छब्या टिपून घेतल्या आहेत.  पण मिरवणुकीमुळे आम्हाला उशीर झाला हे मात्र खरे. आम्ही गोकर्ण महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा आमच्या दुसऱ्या दोन बसेस त्या ठिकाणाहून निघाल्या होत्या.
x

गोकर्ण म्हणजे गायीचा कान. कर्नाटकच्या उत्तरकन्नड जिल्ह्यातले दोन नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी वसलेले गोकर्ण महाबळेश्वर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच येथल्या सुंदर सम्रुद्रकिनार्‍यांसाठी पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे. गोकर्णला गोव्यातून जसे जाता येते तसे अन्य ठिकाणांहूनही जाता येते. एका बाजूला पश्चिम घाटाचा डोंगरी भाग व दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यातून जाणारी गोकर्णची वाट पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालते.गोकर्णला पाहायचे ते महाबळेश्वर मंदिर आणि महागणपती मंदिर. मुख्य रस्त्याच्या पश्चिम टोकाला असलेले महाबळेश्वर हे शिवमंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. येथे शंकराचे आत्मलिंग किवा अमृतलिंग पिंडस्वरूपात आहे आणि गाईच्या कानाच्या आकारात आत हे लिंग आहे. बाहेरून पाहताना याचे स्पष्ट दर्शन अवघड होते हे खरे पण या मंदिरामागची कहाणी अतिशय सुंदर आहे.
असे सांगितले जाते की रावण मोठा शिवभक्त होता. शंकराची आराधना करून कडक उपासना करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला तुला काय देऊ असे विचारले तेव्हा रावणाने शंकराला आत्मलिंग मागितले. आत्मलिंग ज्याच्याजवळ त्याला मृत्यूचेपराभवाचे भयच नाही. भोळ्या सांबांनी आपले आत्मलिंग रावणाला दिले पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही. रावण आत्मलिंग तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे निघाला. पण त्यामुळे देवलोक चिंतेत पडले. आता रावण अजिंक्य होणार. कांहीतरी करून लिंग परत आणले पाहिजे. शेवटी गणपतीने हे आव्हान स्वीकारले. समुद्रकिनार्‍यांवर तो गुराखी होऊन आला.रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते. दरम्यान रावणाला लघुशंका आली. पण लिंग जमिनीवर ठेवायचे नाही आणि लिंग हातात असताना लघुशंका करणार कशीत्याला मोठा प्रश्न पडला तोपर्यंत गुराखीरूपातला गणपती त्याला दिसला.
रावण खाली उतरला आणि गुराख्याला थोड्यावेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले तेव्हा गुराखी म्हणाला तीन म्हणायच्या आत आला नाही तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन. रावणाने अट मान्य करून तो लघुशंकेसाठी गेला. हे पाहताच गणपतीने तीन आकडे मोजले आणि लिग गाईच्या कानात ठेवले. घाईघाईने परत येऊन रावणाने ते लिंग घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा गाय जमिनीत अदृष्य झाली पण तिचा कान रावणाच्या हातात आलो तो जमिनीत रूतला. रावणाला तो बाहेर काढता आला नाही आणि शेवटी आत्मलिंग गाईच्या कानात तसेच राहिले. तेथेच भव्य शिवमंदिर उभारले गेले. या मंदिराजवळच हुषारीने आत्मलिंग परत मिळविणाऱ्या गणेशाचे महागणपती मंदिरही आहे. दरवर्षी हजारो भाविक या स्थानाला भेट देत असतात. येथेच श्राद्धविधीही केले जातात
गोकर्णला पाच बीच आहेत आणि डोंगरावरून पाहिले असता हाताची पाच बोटे पसरावीत तसे हे किनारे दिसतात. सर्वात प्रमुख असलेला ॐ किनारा प्रेक्षणीय. हिंदू धर्मियात अतिशय पवित्र मानले जाणारे ॐ  चिन्हाच्या आकाराचा हा किनारानिळाशार समुद्र डोळ्यांना पुरेपूर तृप्त करतात. येथे जाण्यासाठी चांगला काळ म्हणजे आक्टोबर ते फेब्रुवारीचा.राहण्यासाठी अनेक लॉज आणि धर्मशाळा आहेत. जेवणाखाण्याच्याही सोयी चांगल्या आहेत. तेव्हा एकदा गोकर्ण महाबळेश्वरला नक्की भेट द्या.
आम्ही पटापट उतरून तेथील शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले ते मंदिर ८ वाजताच बंद होते तिथे आम्हाला आरती मिळाली. मला मात्र काही सुचेना झाले होते. थ्रोट इन्फेकशन वाढले होते बोलता येत नव्हते. तिथे नारळ पाणी घेतले ते सुद्धा पिता आले नाही. उशीर होणार असल्याने तिकडचे आम्ही जेवायला जाणारे हॉटेल आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत बंद होणार याचा अंदाज आल्यावर लगेच लीडर्सने दुसऱ्या ठिकाणी आमची जेवणाची सोय केली. आम्ही रात्री एका ठिकाणी १०:३० वाजता जेवण केले. मी घसा  शेकवण्यासाठी गरम पाणी मागितले असता तिथल्या एका वेटरने मला मीठ आणि कडक पाणी लगेच आणून दिले गुळण्या केल्यावर जरा बरे  वाटले. त्या हॉटेल मध्ये जेवण छानच होते.तितक्या रात्री पटपट ऑर्डर्स घेऊन आम्हाला जेवण दिले गेले. तिथे मस्तानी आईस्क्रीम सारखा एक प्रकार होता त्याचे नाव गडबड होते. ते सर्वांना फारच आवडले. बऱ्याच लोकांनी ते मागवून खाल्ले.
जेवण करून आम्ही रात्री १२:१५ राहत्या हॉटेल वर पोहोचलॊ. खूप थकलो होतो. आमच्यात फोटो पाहण्याचे देखील त्राण नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्हाला  पॅकअप करून निघालायचे असल्याने मोठ्या कष्ठाने आम्ही जड अंत:करणाने आमच्या सॅक पॅक केल्या आणि  रात्री १ ते २  वाजता  पुन्हा सकाळी उठण्याचा नंबर दुसऱ्याच्या नावी झटकून झोपी गेलो. 
सकाळी ५:३० उठून पटापट तयार होऊन दुसऱ्या दिवशीचा स्पॉट 'YANNA रॉक" पाहण्यासाठी आमच्या पूर्ण तयारीत होतो. फोना ब्यानर फोटो आणि आमच्या बसच्या ड्राइवर भाऊसोबत सोबत ग्रुप फोटो काढून आणि आदल्या दिवशीच्याच इंद्रप्रस्थ हॉटेल मध्ये सकाळचा नास्ता करून  आम्ही YANNA रॉक" च्या वाटेला निघालो. आज मात्र माझा घसा  दुखत होता तरीही उत्साह तोच होता त्यामुळे डॉ.  रेश्मा,मनीषा, निमा शुभांगी मॅम नोवा, शोभा मीमंदार सर, राणे सर, रोहितसुमित म्हेत्रेमिस्टर रणसिंग,डॉ. बाहेटी डॉ. राजेंद्र कुलकर्णी, नवीन शिर्केविंचु सर, विश्वासकाका आणि सगळेच यांची आमच्या गणेश बसमध्ये आता मस्त टीम तयार झाली होती. आज सहलीचा शेवटचा दिवस आहे आज जास्त धमाल करू असे ठरवून अंताक्षरी सुरु केली. शुभांगी मॅमने  त्यांच्या मधुर आवाजात सुंदर जुनी मराठी गाणी म्हंटली तसेच त्यांना विश्वास काकांनी छान सोबत केली. राजेंद्र कुलकर्णी यांची तर जुनी हिंदी मराठी गाणी राणे सरांसारखीच तोंडपाठ होती. क्या बात है एकाहून एक भारी गायक आज आम्हाला लाभले होते . आज विंचू सर आणि  इतर सगळेच सुरात गात होते. उलट आम्हीच आमची गाणी बाजूला ठेवून त्यांची गाणी ऐकली. आते राहो गाते राहो. "YANNA रॉक" इथून सुमारे ६५ कि. मी. वर होते.आमच्या बसेस मागेपुढे होत होत्या त्यामुळे एका ठिकाणी थांबून पुन्हा बस आल्यावर पुढचा प्रवास सुरु व्हायचा. थांबलो की फोटो सेशन झालेच म्हणून समजा.  पुन्हा तेच कारवारचे घनदाट हिरवेगार जंगल पार करत यांना रॉकचा स्टॉप केव्हा आला समजलेच नाही. बसेस थांबून आम्ही खाली उतरून चालायला सुरु केले.त्या कुमटाच्या जंगलात थंडगार हवा आणि  झुळू झुळू वाहणारे झऱ्याचे पाणी याचा सुंदर मिलाप झाला होता. सगळ्यांचे चेहरे ताजेतवाने होते. आणि उत्साह त्याहून जास्त होता. "YANNA रॉक" चे सुमारे ३ कि. मी चे अंतर कसे कापले ते आमचे आम्हालाच कळले नाही. यांना रॉक पाहिल्यावर निसर्गाचा अजून एक अद्भुत, सुंदर चमत्कार पहावयास मिळाला याची अनुभूती आली. 

"YANNA रॉक" हे गाव कुमटा जंगलाच्या हद्दीत आहे. कारवारच्या जंगलापासून ६० कि.मी अंतरावर आहे. "YANNA रॉक" म्हणजे नैसर्गिक ज्वालामुखी बाहेर येऊन त्याचा मोठा खडक तयार झाला आहे आणि हा खडक अतिशय सुंदर आकारामध्ये तिथे उभा आहे. शिवाय त्यात एक मोठी गुहा तयार झाली आहे. असे दोन खडक तयार झाले आहे . एकल भैरवेश्वर  शिखर म्हणतात आणि एकाला मोहिनी शिखर म्हणतात. भैरवेश्वर शिखरांची उंची सुमारे १२० मीटर इतकी आहे आणि मोहिनी शिखराची उंची ९० मीटर इतकी आहे. आम्ही काही जण तिचे पोहोचलॊ तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. तिथले असणारे पुजारी आम्हाला म्हणाले चपला सॉक्स काढून गुहेत जाऊन या ते बंद होईल. अरे बापरे आमचे बाकीचे लोक तर अजून यायचे होते. जर ही गुहा बंद झाली तर इतक्या दूर येऊन काय उपयोग होता. त्या जंगलात म्हणे जळवा खूप आहेत असे ऐकले होते त्यामुळे मी घाबरून अंगात जॅकेट घातले होते आणि बूट काढले पायातून पण त्या जळवांच्या भीतीने सॉक्स काही पायातून काढले नाही आणि सुप्रिया शिल्पा मी आणि अजून ३ जण त्या गुहेत जाऊ लागलो. गुहा अप्रतिम होती. इतकी उंचच उंच अवाढव्य आणि अप्रतिम गुहा मी आतापर्यंत तरी पहिली नव्हती ती पहावयास मिळाली.

शंखनाद आणि घंटानादाचा आवाज येऊ लागला. मी तर चक्रावूनच गेले. नेमका आवाज येतो कुठून हे समजेनाच. शेवटी "YANNA रॉक"ची एक कि. मी. ची प्रदक्षिणा पूर्ण झाली मोहिनी शिखर सुद्धा पाहिले तेव्हा समजले की तिथे कालभैरवाचे मंदिर आहे ते बंद होणार होते. गुहा वैगेरे काही बंद होणार नव्हती. त्यामुळे आमच्या सगळ्या मेम्बर्सना निवांत गुहेत जात आले  आणि कालभैरवाला प्रदक्षिणा मारता आली.
मी त्या कालभैरवाच्या मंदिरातून एक शंख वाजवून पाहिला मला तो थोडा तरी वाजवता आला आणि मगच मी तो शंख"YANNA रॉक" ची एक आठवण म्हणून विकत घेतला. निमानोवाशोभाविंचु सर मात्र माझ्या पासून खूप दूर राहिले होते. आता आम्ही सुप्रिया, शिल्पा, पल्लवी,शुभांगी मॅम, विश्वास काका, निकाळजे  सरआणि अजून इतर लोक सोबत चालत होतो. स्मिता म्हणजे प्राणी पक्षी पाने फुले यांचे फोटोज काढणारी तर आम्ही निसर्गासोबत माणसांचे फोटोज काढणारे सोबत चाललो होतो
काहींना ते ३कि.मी. अंतर चढाव असल्याने चालण्यास त्रास होत होता त्यामुळे फोना टीम ची एक बस २ कि. मी. आतापर्यंत आणली गेली त्यात ते सगळे बसून गेले. आदल्या दिवशी आम्ही ट्रेकमुळे दमलेलो होतोच त्यामुळे आता आम्ही देखील जरा दमलोच होतो. परंतु आम्हाला त्या बसेपर्यंत ३ कि.मी अंतर चालूनच जावे लागले. सगळे मेंबर्स आल्यानंतर रेशमाप्रमिला यांच्याकडे घरून आणलेले बेसन लाडू आणि बुंदीच्या लाडूने आमची थोडी भूक शमवली. आमच्या बस आता जेवणाची प्रतीक्षा करत हुबळी रेल्वे स्टेशन कडे निघाल्या होत्या. ३ तासाचे जंगल पार करून आम्ही ४ च्या सुमारास एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. तिथे जेवण केल्यावर त्या ठिकाणी शो केस मध्ये सेल साठी असलेल्या कर्नाटकी साड्या घेण्याचा मोह मुलींना आवरला नाही. 
तिथे त्या हॉटेलमध्ये इटालियन जातीचे एक कुत्रे आम्हाला पहावयास  मिळाले.अवघे ७ महिने वय असलेले ते कुत्रे भले मोठे दिसत होते. जेवण आवरून आम्ही हुबळीकडे निघालो होतो. येताना जर जास्तीचा वेळ असला तर मध्ये शिरशी या गावी गणपती मंदिराजवळ सहस्त्रलिंगांचे दर्शन मिळाले असते परंतु वेळेअभावी आम्ही शिर्शी येथे वळलो नाही. संध्याकाळी एका ठिकाणी चहा घेऊन आम्ही निघालो. दुपारी जेवल्यानंतर आता कर्नाटकमधील बसचा शेवटचा प्रवास थोडा होता सगळे लीडर्स एकेक बस पुढे सोडीत अनावधानाने आमच्या बसमध्येच येऊन बसले.  मधल्या प्रवासात अंताक्षरी सुरूच होती. हुबळी स्टेशन यायला अर्धा तास बाकी होता. त्यावेळेची रेशमा रणसिंग हिने मला सांगितले की आता थोडा वेळ राहिला आहे तर आता मस्तपैकी झिंगाट झाला पाहिजे. मी वेळ वाया न घालवता शोभारेशमा आणि नोवाला म्हंटले आता एकेक करून सगळ्यांना नाचवायचे मग तो कोणी असो. सकाळी बस मध्ये लावलेली गाणी आधी सुरु केली. औंदा लगीन करायचंतुझ्या पिरतीचा विंचू मला चावलाशांताबाय आणि अर्थात सैराटचे झिंगाट गाणे झाल्याशिवाय नाच पुरा होऊच शकणार नाही. गाणे लावल्यावर आम्ही ५ जणींनी आधी आमचीच पावले बसूनच  थिरकवायला सुरु केले आणि ड्राइवर सीट जवळ बायकोच्या आठवणीने झुरत बसलेल्या रोहितला मंदार सरांनी आधी उचलूनच आणले.(आम्हाला काही तो ऐकला नाही) सगळ्यात आधी नाचायला सुरु केले ते आमच्या बस मध्ये असलेले डॉ. परांजपे काकांनीमग औंदा लगीन करायचे या गाण्यावर रोहितला नाचवले आणि रोहित नाचला,👌👌😊 नंतर मग विश्वास काकामग शुभांगी मॅममग विंचू सरनिमामनीषा आणि मनीषाचे मिस्टर,राणे सरमंदार सरसुमित म्हेत्रेडॉ. बाहेटी,डॉ. कुलकर्णीमिसेस परांजपेनवीन शिर्केनोवाशोभा सगळेच नाचून नाचून झिंगाट झाले. रेशमा  आणि तिचे मिस्टर तर कोणी बघत नाही आपल्याला असे समजून त्यांनी तर डीजे डान्स केला. डान्सचे क्रेडिट रेशमा आणि शोभा यांना.  त्या २०  सीटरच्या बसमध्ये नाचायला जागा नव्हती तरीही सगळे रंगात आले होते आणि आपली दडून बसलेली कला बाहेर काढत होते. बसचा ड्राइवर पण खूप मजेत होता कारण त्याला असे धमाल करणारे लोक मिळाले होते. सगळे झिंगाट झाले असतानाच  ७:३० च्या सुमारास हुबळी स्टेशनवर पोहोचलो सगळ्या बसेस सोबत आम्ही फोना ग्रुप फोटो घेतला आणि हुबळी स्टेशन मध्ये प्रवेश केला. हुबळी स्टेशन म्हणजे एक विमानतळच आहे असे भासत होते इतके स्वच्छनीटनेटकेप्रकाशमान होते ते. आम्ही वेटिंग रूम मध्ये आमच्या सॅक ठेवून जरा फ्रेश झालो आणि स्टेशनवरच जेवणासाठी आलो. उशिरा जेवल्याने सगळ्यांनाच भूक नव्हती त्यामुळे काहींनी पार्सल घेतले. आम्ही जूस घेतला. आमची एक्सप्रेस अगदी वेळेत होती.आम्ही  तिथले कंधीपेढे  आणि थोडी मिठाई घेऊन हुबळीलाचा निरोप घेऊन  एक्सप्रेसमध्ये बसलो. गाडी सुटायला थोड़ा अवधी होता. माझी बँग फारच जड झाली होती त्यामुळे आणि माझे रूममेट्स मला सोडून हुबळी स्टेशनवर फोटो काढून आले त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली होती.नंतर ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही  गप्पा मारत आमचे फोन चार्जिंगला लावले तितक्यात शिल्पाचा फोन एकाने मारून तो चोर पळू लागला. जोरात चोर चोर चा आरडाओरडा झाला सगळे त्या चोराच्या मागे धावले शोभा तर बिनाचप्पल पळत जाऊन चोराला धोपटणार तितक्यात चोराने मोबाईल आणून दिला. चोर वैगेरे काही नव्हता तो. ते आमच्यातलेच एक मेंबर होते श्री गुंजाळ. थोडी अशीही गंमत. नितीन सर जरा चिडले की अशी थट्टा करू नये. पण मिस्टर गुंजाळ तुम्ही जरा छान  थरार अनुभववला. असे घडू शकते याचे उत्तम उदाहरण दिले. नितीन सर तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. गुंजाळ तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. आमची गाडी १० वाजता सुटली आपापल्या जागा पकडून सगळॆ सामान जागेला लावून आम्ही झोपून जाण्याचे ठरविले परंतु आता भूक लागल्याने झोप येत नव्हती.विमानतळाप्रमाणे असणाऱ्या  हुबळी स्टेशनवर आम्हाला थोडी फोटोग्राफी करायची होती आणि शोभा मला सोडून फोटो काढून आल्याने मी तिच्यावर जरा रागवले होते नंतर मग पुन्हा गाडी रुळावर आली. तयारीचे १२ वाजता मी प्रमिला आणि मिस्टर गुंजाळ यांनी मिळून तिच्या घरचे बुंदीचे लाडू खाल्ले तेव्हा कुठे जरा झोप यायला लागली.त्यावेळी आमच्या हसण्याच्या आवाजावरून आमच्या सोबत पुण्याला जाणारे एक म्हातारे जोडपे होते त्यांचे मात्र आम्हाला बोलणे खावे लागले. पण गुंजाळांनी त्यांना मस्त गॉड भाषेत ठणकावून सांगितले.  मग मात्र सगळेच झोपले. . "डायरेक्ट चिल्लाने का नाही. पहले अच्छे से बात करना सीखो. प्यार से बोलो फिर हमें बताओ. और इतनी तक्लीफ होती है तो एसी का बुकिंग करने का" मग ते जोडपे गप्प बसले आणि आम्ही पण गप्प बसलो. सहल संपत आल्याने सगळेच शांत झाले होते. रात्री १ वाजता झोप लागली असेल ती सकाळी ६ वाजता ट्रेन मधल्या सारख्या फेऱ्या घालणाऱ्या चहावाल्याच्या आवाजाने जाग आली तेव्हा दौंड स्टेशन आले होते.काही कारणाने  ट्रेन बराच वेळ मधेच थांबली होती. ९ व्दच्या दरम्यान पुणे स्टेशन वर पोहोचलो आणि मग इथून आम्ही ट्रेन नेबस नेकॅब ने आपापल्या घरी पोहोचलो. ६० जणांचा इतका मोठा ग्रुप म्हंटल्यावर वेळेचा थोडाफार इकडे  तिकडे होणारच.
माझ्या दृष्टीने म्हणाल तर आमची कर्नाटक सहल सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि लीडर्सच्या उत्तम नियोजन आणि कार्यवाहकांच्या उत्तम कार्यामुळे उत्तम रित्या पार पडली.  फोना ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि लाईफ मेंबर मंदार थरवळमाजी अध्यक्ष रोहित सरफोनाचे मेंबर राणे सर, हजारो साप पकडून त्यांना सुरक्षितरित्या जंगलात सोडणारे सर्प मित्र निकाळजे सरनितीन पवार सर यांना खास धन्यवाद आणि हॅट्स ऑफ "फोना टीम" इतक्या भल्या मोठ्या  ग्रुपची सहल अरेंज करून नाना तऱ्हेच्या लोकांना झेलून वेळ प्रसंगी बोलणी खाऊन डोकं शांत ठेऊन ती सहल सुखरूप पार पाडणे  मोठ्या कौशल्याचे कार्य आहे आणि कौतुकास्पद कार्यं आहे. सगळ्या सहलीच्या मेंबर्सना मनापासून धन्यवाद. या वेळीसुद्धा वेळेअभावी माहिती परेड राहून गेल्यामुळे मला सगळ्यांची नावे टाकता आली नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा फोनाच्या ट्रेक आणि ट्रिपला येत रहावे हा यावरचा उत्तम उपाय आहे.  उत्तम फोटोग्राफर विजू काकाविंचू सरभूषण,ह्रिषीकेश,स्मिता बांदल,निसर्गप्रेमी पल्लवी शेवाळे,रोहित, सुप्रियानोवा आणि सर्वच जणांनी उत्तम फोटोग्राफी करून फोटोरूपात सहलीच्या आठवणी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. (५ दिवसाची सहल असल्याने ब्लॉग देखील तेवढा मोठा असणार त्यामुळे ब्लॉगचा दुसरा भाग लिहिण्यास थोडासा वेळ लागला. परंतु तरीही सहलीच्या प्रत्येक क्षणाची एक आठवण म्हणून मी हा ब्लॉग लिहिला आहे. तो कसा झाला आहे हे आपणच ठरवा.) 







  


Friday, 8 September 2017

तुफानी रंगीबेरंगी कर्नाटकी सहल...

कर्नाटक-जोग फॉल ट्रिप

पुणे ते मुंबईमुंबई ते भटकळ शहर आणि
सहलीचा पहिला दिवस श्रीमुरुडेश्वर बीच आणि गोपुरम 
२ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०१७



सप्टेंबर महिना म्हणजे माझ्या खूप साऱ्या एव्हरग्रीन मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसांचा महिना आहे. २० ऑगस्टच्या कातळधाराच्या धुव्वाधार ट्रेक नंतर तुफानी काहीतरी हवेच ना नाहीतर माझी ट्रेकमुळे रुळावर असलेली(२० टक्के तंदुरुस्त शरीर आणि मन) गाडी आणि बॉडी एकदमच बंद पडते.खरे तर सध्या माझे शरीर साथ देत नाहीये काहीतरी कुरबुरी सुरूच होत्या त्यामुळे हाताला सलाईन टोचून इंजेकशन टोचून बोर झाले होते पण मन मात्र सदैव आंनद उपभोगायला आणि हुंदडायला तयार असते अर्थात सगळ्या जबाबदारी पेलूनच. त्यात  २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरची "फोना"ग्रुपची 'कर्नाटक जोगफॉल ट्रेक कम सहल" कोण सोडणार. त्यात सगळ्या वयाचे मित्र मैत्रिणी असणार होते. मग मी तर हा प्रवास आणि आणि सगळ्यांच्यातली धमाल सोडणेवाली नाहीये.या सहलीचे बुकिंग ३-४ महिने अगोदर करावे लागते त्याप्रमाणे केले होते परंतु खरी तयारी सहलीच्या एक दिवस अगोदरच झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि परवानगीने थोडा गरजेपुरता दवाखाना घेऊन शेवटच्या दिवशी शोभाबरोबर बोलले तेव्हा मी माझे जाणे पक्के केले. कारण मी सहलीला आहे म्हणून ही पोरगी येणार होती. तिला एकाच बॅगेत सगळं कसं बसवायचं याची माहिती दिली आणि चार-पाच दिवसांचा भन्नाट आंनद माझ्या पदरात पडणार या हव्यासाने मी माझी सॅक भरली.

२ सप्टेंबरला शनिवारी दुपारी चिंचवडहून ४:१५ ची कोयना-सी एस टी एक्सप्रेससाठी माझे मिस्टर दीपक आणि मुलगी प्रभा मला स्टेशनला सोडायला आले. तिथेच सहलीला जाणारे इतर मेंबर्स उपस्थित होते.२ च लोक ओळखीचे होते बाकी अनोळखी होते तरीही मी सवयीप्रमाणे थोडाही वेळ न घालवता बेझिजक लगेच आमची तिथेच टीम बनवली आणि फोटोला सुरुवात झाली. (मी,रेशमा रणसिंगमिस्टर रणसिंगसुमित म्हेत्रेमनोज राणे सरशोभाआणि डॉक्टर संदीप बाहेटी इतके लोक आम्ही चिंचवड स्टेशन ला गाडीमध्ये चढलो.)   गाडी सुटली कितीही नाही म्हंटले तरी मुलीला आणि मिस्टरांना निरोप देताना डोळे भरून आले पण ते मी दाखवले नाही इतकेच.😢😔🤗मुंबईचा प्रवास सुरु झाला. पुण्याहून काही लोक आधीच या ट्रेनमध्ये बसून आले होते त्यात सुनील विंचु आणि निमा विंचू हे दोघे होते आणि अजून काही मेंबर्स होते तसेच तळेगावला आणि लोणावळ्याला बरेच सहलीचे लोक बसणार होते. त्याप्रमाणे तळेगावचे लोक गाडीमध्ये चढल्यावर आणि तेव्हा झालेल्या गर्दी आणि गोंधळाने मग खरे मोठ्या सहलीला निघालो आहोत याचा प्रत्यय आला..😊
लगेच एक ग्रुप सेल्फी काढून गप्पा सुरु. लोणावळा गेल्यावर लगेच कर्जत आले. आणि दुपारी जेवण करून निघाल्यावर फारशी भूक नव्हती त्यामुळे कर्जतचा स्पेशल चविष्ट वडा आम्ही घेण्याचे टाळले परंतु वडेवाल्याचा वड्यासहित फोटो मात्र घेतला. त्याने पण मस्त पोज दिली. गाडीने घाट सोडला तसे गरम होऊ लागले. मी देखील मुंबईचीच आहे तरीही आता पुण्याच्या थंड हवेची  सवय झाल्याने मुंबईचा उकाडा सहन होत नाही.

गाडीतून मुबईच्या नाल्यांचे ओढ्यांचे दर्शन झाले तेव्हा मन खिन्न झाले जेव्हा केव्हा प्रलय होईल तेव्हा हाच आपणच माणसाने फेकलेला प्लास्टिक आणि इतर कचरा आपल्याच नाकातोंडात जाईल. कचर्याची योग्य विल्यवाट नाही लावली तर आपले आरोग्य धोक्यातच आहे."फोना" टीम ट्रेकिंग दरम्यान आणि कुठेही प्लास्टिक आणि  न विरघळणारा कचरा सोडून येत नाही उलट जमेल तेव्हा तोच कचरा गोळा करून आणतो. आमच्या ट्रेनच्या डब्यामध्ये सगळ्यांच्या ओळखी नाही झाल्या तरी १० बारा लोक यांची खाऊ वाटप, मजा मस्ती फोटोग्राफी सुरुच होती.  म्हणता म्हणता  रात्री ८.२० वाजता आम्ही शिवाजी टर्मिनन्सला पोहोचलो. आमची मुंबई-मंगळुरु एक्सप्रेस ९:३० वाजता होती परंतु ती ४-५ दिवस सतत ४-५तास उशिराने येत होती त्यादिवशी तरी ती म्हणे आली तर वेळेवर येईल नाहीतर २२ तास लेट होती ते ऐकून आमचे धाबे दणाणले. २२ तास इथेच राहिलो पुढच्या सहलीचा खेळ खंडोबाच होईल. आम्ही आपले वेटिंग रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन घरून आणलेले रात्रीचे जेवण करून घेतले.
मी तांदळाची पांढरी शुभ्र उकडीच्या पिठाची भाकरी,भेंडीची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आणली होती. निमाने आणलेली चकली, बटाटा भाजी आणि कोबीची कोशिंबीर फारच आवडली. वेटिंग रूममध्ये छोटे छोटे ग्रुप करून बसलो होतो आम्ही. रेशमा रणसिंगे यांच्या ग्रुपची पूर्ण पोळी आणि इतर डिशेश एक एक घास टेस्ट केल्या मस्त होत्या. गाडी पकडायची लगबग असल्याने सगळ्यांनी आणलेल्या  पदार्थांची चव घेत आम्ही बसलॊ नाही. त्यातही आम्ही आईस्क्रीम घेऊन खाल्ले हे मात्र खरे.  आम्ही टेन्शन मध्ये असतानाच थोड्याच वेळात आमच्या एक्सप्रेसची घोषणा झाली आणि गाडी वेळेत येणार आहे इतके समजले आणि आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
९:३० वाजता ट्रेन आली आमच्या लीडर्सने आमची गाडीची  तिकिटे आमच्या हातात दिली अनोळखी लोक बोगीच्या एका कंपार्टमेंट मध्ये आलो होतो. प्रमिला गुंजाळ, मिस्टर गुंजाळ,शिल्पा बाब्रसमी आणि शोभा. क्या हुवा अनोळखी है तो ओळख करून घेणे में हम पटाईत है. आम्ही लगबगीने गाडीमध्ये आमचे सामान टाकले आणि १० वाजता गाडी निघाली. मुंबई सोडताना मला माझ्या मुंबईतील जुन्या सुखद आठवणी आल्याशिवाय राहिल्या नाही. बहुदा  मी मुंबईची असल्याने सगळ्यागोष्टींमध्ये फास्ट असते.😊👍 प्रलय आला तरी दुसऱ्या दिवशी पाणी ओसरताच पूर्वपदावर येणाऱ्या माझ्या मुंबईचा आम्ही निरोप घेतला आणि गाडीमध्ये बसलोआमचे लीडर्स म्हणाले की मुख्य गाडी वेळेत आलीच नाहीये सी एस टी-मंगळुरु एक्सप्रेस मुख्य गाडीऐवजी दुसरी जादाची गाडी रेल्वे खात्याने मागवली होती. हे आमचे  अहोभाग्यच होतं म्हणा.

मला गोव्याचा दूधसागर धबधबा एकदा तरी किमान पाहायचा तरी होता. खर तर दूधसागरच्या वाटेने आमची गाडी जाणार नव्हती तरीही मला आपला वेड्या मनाला वाटलं चुकून दूधसागर आला तर आला मला भेटायला.  (गमतीचा भाग आहे हा लगेचच विचार करत बसू नका.😂😂) गाडीमध्ये आम्ही सगळे सामान लावून झोपण्याच्या तयारीने आपल्या सीटवर जाऊन बसलो खरे. परंतु शोभा आणि मला सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या होत्या आणि झोपदेखील आली होती. पूर्ण बोगी आमच्या "फोना"च्या ६० लोकांच्या मालकीची होती. ओळखी व्हायच्या असल्याने आम्ही जरा शांत होतो. घरात किमान वॉट्स अँप वर संपर्क राहावा म्हणून मेसेज करायला तर जिओ सिमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे शोभाच्या फोनवरून घरी कॉल करून वोडाफोन वर नेट आणि बॅलन्स टाकून तात्पुरते नेट सुरु केले.थँक्स शोभा.😍 कारण का? तर माझ्या मुलीचे प्रभाचे बास्केटबॉल खेळामध्ये चांगला खेळ खेळली म्हणून पेपरला नाव आले होते. पाखरांना सोडून चिमणी घराबाहेर पडली तरी पाखरांची ओढ ही जास्त  आणि कायम असते. 😍  २ तास गेल्यावर झोपायचे ठरवले परंतु कणकवलीला उतरणारे जवळ जवळ १५ लोक(बिना रिझर्वेशन वाले) आमच्या बोगीमध्ये मस्त आमच्या सीटच्या जवळ बसले होतेकोणी झोपले होते. कोणी फोनवर खेळत होते.काळजी वाटली म्हणून लीडर्सने येऊन त्यांना दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी विनंती केली. आधी ते जागचे हलायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्रत्येक आठवड्याचा प्रवास असेल.  नंतर ते गेलेही परंतु रात्री ३ नंतर मला जाग आली तेव्हा ते आमच्या सीट जवळ येऊन खाली जमिनीवर झोपलेले मी पाहिले. मराठी कोकणी माणसं होती त्यांचा तसा त्रास काहीच नव्हता. मी आपली दूधसागरच्या आशेने ५ वाजता उठले परंतु सगळे झोपले असल्याने मला ६ वाजेवाजेस्तोवर वाट पाहावी लागली. ६ वाजता उठून मी शोभाने चहा घेतला आणि शोभा परत झोपली मी मात्र सकाळची शुद्ध हवा खाण्यासाठी आणि कोकणातील निसर्गसौंदर्य  अनुभवण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी खाली उतरून सगळं आवरून खिडकीजवळ येऊन बसले. कणकवली गेल्याने ते १५ लोक उतरले होते आमची बोगी आता फक्त आमच्या ६० लोकांची होती. आजच्या पिढीतील सर्वांचे आवडते गीतकार, कवी, व्यंगचित्रकार  गुरु ठाकूर यांचे गाव गोवा आणि तिथली कौलारू घरे आणि हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग  एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव भासत होते. गोवा जणू आम्हाला खुणावित होते की येवा कोकण आपलाच असा राजापूर, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, गोवा असा तोच सुंदर निसर्ग डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद करून घेत आम्ही वेगाने पुढे जात होतो.




सगळे हळूहळू जागे झाले.मग ओळखी सुरु झाल्या. आमच्या जवळ बसलेले प्रमिला वाळुंज आणि मिस्टर वाळुंज (पुणे लायन्स क्लब चे अध्यक्ष होते.) अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. प्रमिलाने आणलेले घरी बनवलेले बुंदीचे लाडू एकदम आवडले मला आणि सर्वांनाच.👌👌 मला पोटामध्ये जरा इंन्फेकशन  असल्याने मी ट्रेनमधले काही खाणे टाळलेच. फक्त चहा तेवढा  घेतला. सगळ्यांनीच सोबत आणलेला खाऊचा नास्ता करून घेतला. आणि मग सगळ्या बोगीमधून हास्यकल्लोळचा आवाज येऊ लागला आता खरा सहलीचा रंग चढू लागला होता. मी शोभाने बोगीमध्ये चक्कर टाकली बोर झालेल्या पल्लवी, सुप्रिया, शिल्पा यांना घेऊन अंताक्षरी सुरु केली. मग जरा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. तितक्यात मंदार सर म्हणाले अरे आपलं स्टेशन येईल आता आवरून मग अंताक्षरी खेळू. मग बॅगांची आवराआवरी करून पुन्हा अंताक्षरी  खेळू लागलो. मध्येच मोठमोठे बोगदे यायचे तेव्हा आम्ही उत्साहाने सगळेच मोठमोठ्याने शिट्या मारीत होतो,ओरडत होतो,प्रवासाची मरगळ घालवण्यासाठी हा छोटा उपाय छान 👌होता..😊एकाच बोगीतून एकमेकाला साद घालीत होतो. एकीकडून मंदार सर,मिस्टर वाळूंज आणि आम्ही सगळे तर दुसरीकडे राणे सर,रोहीत सर असे सगळे होते. पूर्ण एक्सप्रेसमध्ये आमचाच गोंधळ चालू होता..फोना Team Rocks✌...
१२ च्या सुमारास कारवार,गोकर्ण रॊड, कुमटा नंतर दुपारी दीड वाजता दक्षिण भारताच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड  जिल्ह्यात भटकळ स्टेशनवर आम्ही पोहोचलो.
आम्ही अन्ताक्षरीचा वेग कमी केला आमच्या वजन बॅगा घेऊन भटकळ स्टेशनला उतरलो. आमच्या ट्रिपचे नियोजन करणारे श्री नितीन पवार यांनी अगोदरच आम्हा ६० लोकांसाठी ३ बसेसची सोय केली होती. भटकळ स्टेशन स्वच्छ होते.
थोड्या वेळातच आम्ही ज्या ठिकाणी ४ दिवसांचे रहिवाशी होतो तिथे आर एन एस हायवे हॉटेल मध्ये पोहोचलो. आम्हाला सगळ्यांना फ्रेश होण्यासाठी एक एक रूम दिली फ्रेश होऊन आधीपासूनच तयार असलेले जेवण केले.  तिथे जाईस्तोवर आम्ही एकएकटे आलेल्यांना काहीच  माहिती नव्हते आमचे रूम पार्टनर कोण आहेत ते. तिथे गेल्यावर आमच्या हाती रूम नंबर आणि रूम पार्टनरची नावे दिली. शोभा आणि नोवा शिंदे मी असे भारी,हसवणारे 😊😂रूममेट्स एकमेकांना मिळालो होतो.
आपल्या रूममध्ये जाऊन जरा रिलॅक्स होऊन आवरून ४च्या सुमारास पहिल्या दिवसाच्या प्रवासाला निघालो. पहिल्या दिवशी तेथील ३ कि मी वर असलेला मुरुडेश्वर बीच आणि गोपुरम इथे पोहोचलो. अरबीसमुद्राच्या जवळ हे ठीकाण आहे. मुरुडेश्वरचा किनारा हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्र किनारा आहे. पर्यटकांसाठी दोन्ही बाजूने लाभदायक आहे. धार्मिक स्थळांचे दर्शन होते आणि निसर्गाचा आनंददेखील लुटता येतो. इथे गोपुरम् ही २१ मजली इमारत 232 फूट उंंच आहे  इथे लिफ्टची सोय आहे. तसेच गोपुरम च्या दारात भव्य हत्तीची प्रतिकृती आहे. तसेच गणपती मंदिर आहे.  श्री. मुरुडेश्वरची मूर्ती 123फूट उंच अशी भव्य आहे. तेथील एन. आर. शेट्टी नावाच्या व्यावसायिकाने  ४ करोड रुपये खर्च करून ही मूर्ती बनवली आहे.ही  भव्य सुंदरसुबक मूर्ती अशी बनवली आहे की सूर्याची किरणे या मूर्तीवर पडली तर ही मूर्ती चमकते हे वैशिष्ट्य आहे. आम्ही आधी समुद्रामध्ये बांधलेल्या नवीन बीच रेस्टॉरंटमध्ये गेलो तिथून ती  गोपुरमची इमारत  आणि श्री मुरुडेश्वर ची मूर्ती मनमोहक दिसत होती त्यामुळे आम्ही लगेच तिकडे निघालो.
विंचू सरांनी आमची गोपुरम् ची तिकिटे काढली. कर्नाटकमध्ये मंदिराच्या आवारात सॉक्स आणि चपला काढल्या. आपण आपल्या महाराष्ट्रात मंदिरात जाताना चपला तर काढतोच पण सॉक्स कधीतरी घालून जात असतो पण तिकडे  सॉक्स काढायचे म्हणजे काढायचे असा कडक नियम आहे.  आधी गोपुरम मध्ये गेलो. २१ माजली इमारत आहे परंतु १८ व्य मजल्यापर्यंत जाण्यास परवानगी आहे. १० -१० च्या ग्रुप ने लिफ्ट ने वरती गेल्यानंतर तिथून श्री मुरुडेश्वरची मूर्ती अतिशय भव्य आणि सुबक दिसत होती. तिथे त्या खिडकी मध्ये फोटो काढण्यासाठी आमच्याच लोकांची दाटी झाली होती. तिथून मुरुडेश्वर डोळ्यात आणि मानत साठवून आम्ही लिफ्टने उतरून  मंदिरात गेलो तिथे गाभाऱ्यात कोणत्याच देवाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. कर्नाटक मध्ये त्यांचे  कर्नाटकी भाषेवर इतके प्रेम आहे की आम्हाला कुठेही मराठी किंवा हिंदी सूचना फलक पहावयास  मिळाला नाही. कन्नड आणि फार तर इंग्रजी मध्ये सूचना फलक लावले होते. आम्ही गणपती मंदिरातून मुरुडेश्वरची मूर्ती पाहावयास निघालो. सूर्य अस्ताला निघाल्याने आमची एकच धांदल उडाली होती कारण आम्हाला त्या बीचवर जायचे होते. परंतु इकडे मुरुडेश्वरच्या मूर्तीजवळ मानवनिर्मित गुहा देखील पाहायची होती. आम्ही आपले फोटोग्राफी करत ती गुहा फिरून १५ मिनिटामध्ये बाहेर आलो तोवर सूर्य अस्ताला गेलाच. पण त्या संधीप्रकाशात खरोखर ती मूर्ती चमकत होती. डोळे तृप्त होत होते. पण मन मात्र भरत नव्हते. प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयीगोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

५ मिनिटे तिथे बसून लगेचच बसजवळ निघालो कारण लीडर्स ने ७ च्या आत घरात ची वेळ दिली होती. त्या नियमानुसार आम्ही लगबगीने निघून त्या बीच वरच्या रेस्टॉरंट मध्ये मस्त कॉफी  चा आस्वाद घेतला. तिथे आम्हाला एक पर्वणी मिळाली. लीडर्स म्हणाले ज्यांना नॉनव्हेज खायचे त्यांनी ४ दिवसांचे निवासी असलेल्या घरी जावा आणि ज्यांना व्हेज खायचे त्यांनी बाहेरच्या हॉटेलवर चला.आमची नॉनव्हेज खाणाऱ्यांची एक बस हॉटेल जवळ आली आणि २ बस तिकडेच बाहेर व्हेज जेवण करून आल्या. आम्ही २० लोक नॉनव्हेज जेवलो म्हणजे भरमसाठ काही खाल्ले असं काही नाही थोडासा बदल म्हणून कर्नाटकच्या नॉनव्हेज जेवणाची चव घेतली इतकेच. जेवण झाल्यावर पुन्हा यावरून सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी म्हणून राहत्या हॉटेलच्या बाहेर आलो परंतु बरेचसे लोक थकले असल्याने आणि सकाळी लवकर उठायचे असल्याने गुड नाईट म्हणून विश्राम करण्यास गेले. आम्ही 8ते 10 लोकांनी बाहेर आईस क्रिम मागवले अर्थात माझा वाढदिवस बळंच साजरा करून ट्रीट घेतली. त्यातदेखील वेगळी गम्मत. त्यावेळी काही लोकांची तरी ओळख झाली. त्यानंतर मात्र आम्ही तिघी १२ वाजता आमच्या रूम मध्ये गेलो. इतके थकलो असून आम्ही गप्पा मारत आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठण्याचा नंबर दुसऱ्याच्या नाव ढकलत २ वाजता झोपी गेलो.आमची तिघींची याआधी इतकी ओळख नव्हती तरीही इतरांना वाटले की  शोभा माझी मुलगी तरी असावी (शोभा कोणत्या अंगाने माझी मुलगी दिसली ते आम्हा दोघींना समजले नाही हहाहाहाहा) आम्ही तिघी बहिणी तरी असू.आमचे  तिघाड पहिल्याच दिवशी छान जमले. अश्या प्रकारे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते भटकळ प्रवास आणि सहलीचा पहिला दिवस एकदम आनंदात आणि धमाल मध्ये गेला.उत्तम नियोजनासाठी नितीन पवार सरमंदार सरराणे सररोहित सरनिकाळजे सर यांना माझ्यावतीने सगळ्यांकडून धन्यवाद. जितकी धमाल तितका ब्लॉग मोठा असल्याने २ऱ्या आणि ३ऱ्या दिवसाचा ब्लॉग वेगळा लिहिला जाईल आणि जमेल तसे सगळ्यांचा उल्लेख आणि फोटोज येतील याची कृपया वाट पाहावी.






Monday, 21 August 2017

"कातळधारा ट्रेक"एक अविस्मरणिय,थरारक अनुभवगाठ..


"कातळधारा ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (लोणावळा)
चढाई श्रेणी-मध्यम कठीण
दिनांक - २० ऑगस्ट २०१७

जुलै महिन्यातील अंधारबनच्या  अतिशय सुंदर,अप्रतिम, थरारक पावसाळी ट्रेकनंतर मी ट्रेकर् दुसऱ्या थरारक ट्रेकची  वाट पाहत होते ."फोना" फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन ने ७६ वा कातळधारा हा ट्रेक आयोजित केला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. कारण कातळधारा ट्रेक हा तसा रिस्की आणि कठीण ट्रेक आहे. परंतु "रिस्क इज माय पॅशन" या नियमानुसार मी मनातून जायचे ठरवले होते खरे परंतु शरीरात जरा तांत्रिक बिघाड झाल्याने डॉक्टरांनी यावेळी ट्रेकला न जाण्याचा चांगला सल्ला दिला होता. तरीही पंधरा दिवस दवाखान्याच्या वाऱ्या पूर्ण करून मनाची तयारी करून ट्रेकच्या वारीसाठी सज्ज झाले. मी या गोष्टीचा उल्लेख अशासाठी करते की आपल्या मनाने आपण एखादी चांगली गोष्ट करण्याचा पक्का निर्धार आणि निश्चय केला सर्व काही साध्य होते. इच्छाशक्ती प्रबळ असली की आपला मार्ग सोप्पा होतो. 
माझ्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात "कातळधारा" हे ठिकाण आहे.पुण्यापासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर आणि चिंचवड पासून ५२ कि.मी.लोणावळा-खंडाळा हे थंड हवेचे नावाजलेले ठिकाण आणि चिक्कीसाठी प्रसिद्ध असे उत्तम सगळ्यांचे आवडते पर्यटनस्थळ आहे.लोणावळ्यापासून एक ते दीड कि.मी. च्या अंतरावर कातळधारा आहे.  ठरल्याप्रमाणे आमची बस दिनांक २० ऑगस्ट ला सकाळी ७ वाजता निगडी-तळेगाव-लोणावळा मार्गे निघाली. बसमध्येच पोह्याचा नास्ता करत आणि एका ठिकाणी थांबून चहाचा आस्वाद घेत श्री. सचिन दीक्षित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोटा केक कापून त्यांच्याच हस्ते नारळ फोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.  "हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट.. " अशी अनेक उल्हासित करणारी गाणी गात(तालासुरात गाणे गाणाऱ्या आणि जल्लोषात शिवगर्जना करणाऱ्या मस्तीखोर प्रतिकदादाची आठवण काढत) कातळधारा धबधब्याकडे जाणाऱ्या घनदाट जंगलाच्या वाटेजवळ थांबली.

इथून पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जाणारा राजमाची हा किल्ला सुमारे १४ कि. मी. वर आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. खंडाळा घाटातून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला होय.परंतु आम्हाला आज राजमाचीला न जाता कातळधाराचा ट्रेक करावयाचा असल्याने आम्ही इथेच थांबलो. आधीपासूनच ट्रेक लीडर्स ट्रेकसाठीच्या दिलेल्या सूचना आम्ही पाळल्या होत्याच. म्हणजे एक छोटी कमी वजनाची सॅक त्यात किमान एक लिटर पाण्याची बाटली,चॉकलेट्स गोळ्या(टाईमपास)दुपारच्या जेवणाचा भुकेपुरता टिफिन, प्रॉपर ट्रेकिंगचे शूज,कॅप,जॅकेट, जरुरीप्रमाणे लागणारी स्वतःसाठीची औषधे,पूर्ण हात आणि पाय झाकले जाणारे कपडे घालून तयारीत आलोच होतो. तिथे गेल्यावर घनदाट जंगलात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ओडोमास लावून घेतले. आम्ही ट्रेकला सुरु करण्यापूर्वी इतर कोणा ग्रुपचे ५ मेंबर्स त्यांचा ग्रुप त्यांना उशीर झाल्याने पुढे गेला असल्याने आम्हाला सामील होऊ पाहत होते. त्यांच्या विनंतीवरून आमच्या लीडर्सनी त्यांना "दिलेल्या सर्व सूचना ऐकणार"या अटीवरच आमच्यात सामील करून घेतले अर्थात जो ट्रेकर सूचनांचे पालन करेल साथ देईल त्यालाच फोना ग्रुप मदतीचा हात पुढे करेल. ही ग्रुपची खासियत आहे.

घनदाट जंगलात जाण्यापूर्वी पुन्हा सूचना दिल्या गेल्या आणि शिवगर्जना करत सकाळी ९:३० ला ट्रेकची सुरुवात झाली. दुसऱ्या वाहनाने आलेले ५ मेंबर्स आम्ही आमच्यात सामील करून घेतले आणि एकूण ५३ ट्रेकर्सने ट्रेकिंग सुरु केले.  पाऊस सतत सुरु असल्याने ओढे,धबधबे भरून वाहत होते. सर्वत्र हिरहिरवे गालिचे होतेच परंतु एखादा ढग वितळला की सुरुवातीला डाव्या बाजूची दरी एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव आणि अतिशय सुंदर दिसत होती. सुरुवातीलाच छोटासाच परंतु घसरून पाडणारा ओढा ओलांडताना थोडी रांग लावूनच पार केला. त्यांनतर पुन्हा एक छोटा ओढा आला आणि आता पायातले बूट पूर्ण भिजवून पार करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण भारतीय आहोत आणि श्रद्धाळू आहोत. कोणतेही कार्य पार पाडताना शुभ सुरुवात व्हावी म्हणून  देवाचा आशीर्वाद घेतो.  तसेच घनदाट जंगलाची सुरुवात करताना एका दगडावर शेंदूर लावला होता शेंदूर लावलेला दगड म्हणजे श्रद्धाळू लोक त्याला देव म्हणतात.आज आपण त्याला दिशादर्शक समजू.  देव दगडात नाही तर आपल्या मनात असतो त्यामुळे त्याला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. कातळधारा ट्रेक ला जाताना असे काही मोजमाप केले नाहीकी नेमके किती फूट खोलदरीत उतरलो आहोत.  फक्त हे जंगल खूप रिस्की आहे हे मात्र खरे. माहित नसलेल्या लोकांनी कातळधाराचा नाद करूच नये कारण एक वाट चुकली की माणूस भरकटत जातो आणि घाबरतोच.या जंगलातुन सहीसलामत परत यायचे असेल तर अनुभवी ट्रेकर्स सोबतच अशा कठीण ट्रेकला जाण्याची हिंमत करावी. "उगाच मस्ती नहीं पडती सस्ती" 
कातळधारा ट्रेक कठीण असल्याने कमी लोक इकडे जातात त्यामुळे जंगलात नेमक्या कोणत्या वाटेने कातळधारकडे निघावे हा संभ्रम नव्यांना तसे जुन्यांना देखील पडतो. परंतु अचूक वाट दाखवणारा तोच खरा लीडर असतो. लीडर्स च्या मागोमाग आम्ही निघालो होतो. मधेच कुठेतरी एखाद्या झाडाच्या फांदीला भगव्या रंगाच्या छोट्या पट्ट्या लावल्या होत्या की जेणेकरून वाट सापडावी. आमचे एक लीडर राणे सर पुढे होते मागोमाग आम्ही सगळेच होतो. काही लीडर्स मध्ये तर काही लीडर्स सर्वात शेवटी होते. ग्रुप मध्ये सगळ्यांचा चालण्याचा वेग एकसारखा नसतो त्यामुळे अधून मधून थोडेसे अंतर राहतेच राहते. त्यासाठी मागच्या मेंबर्सना वाट अचूक सापडण्याची आमचे लीडर खूण म्हणून एकावर एक तीन दगड ठेवून पुढे जात होते. तसेच झाडा झुडपांना पटकन न बघता आधार म्हणून हात लावू नका. चापड्या हा हिरव्या रंगाचा विषारी साप असला तरी कळणार नाही आणि चावला तर पळता भुई थोडी होईल. अश्या सूचना वारंवार देत होते. काळजी घेत आम्ही जंगल उतरत होतो. किती अंतर चालतो किती खोल उतरतोय काय थरार असतो हे प्रत्त्यक्ष अनुभवानेच समजते.
सगळ्या वाटा  एकसारख्याच दिसत होत्या. मधेच एका बाजूला राजमाचीची शिखरे डोकावत होती. जणू लटक्या रागाने खुणावत होती, निमंत्रण देत होती की,"अस्सं काय ??कातळधारालाच जात काय?? आमच्याकडे तुमची पावले केव्हा वळतील." अप्रतिम असा नजारा होता तो. मधेच खळखळ असा आवाज येऊ लागला एक मोठ्ठा ओढा होता तो. आम्ही कितिदा वाट चुकता-चुकता रहायचो. त्या खळ्खळ्णाऱ्या ओढ्याजवळ पोहोचलो तिथे मनसोक्त भिजून घेतले आणि मनसोक्त छायाचित्रण केले आणि पुढच्या वाटेला निघालो. एक तास होऊन गेला होता आम्ही जवळ जवळ अर्धे अंतर पार केले होते.एक मोट्ठे झाड नैसर्गिकरित्या आडवे पडले होते ते जणू एखाद्या वाटाड्या प्रमाणे सांगायलाच थांबले होते की  "बाबांनो जरा संभाळून जा रे पुढे धोका आहे." आता पुढे अजून घनदाट जंगल आणि रिस्की पॅच होता. तिथे ५ मिनिटे थांबून लीडर्सने पुन्हा महत्वाच्या सूचना केल्या आणि निघालो.
घनदाट जंगल आणि अंधार ओढा गेल्यावर पुन्हा किर्र... शांतता असायची परंतु बडबडे ट्रेकर्स आणि लिडर्स सोबत असताना भीती कुठच्या कुठे पळून जायची. मुसळधार पाऊस असल्याने दगडावर खूप शेवाळ साठून सगळेच दगड घसरडे झाले होते. मी या मताची आहे की कायम आपल्या पुढे दांडगा आत्मविश्वास असलेला ट्रेकर हवा.त्याचा वेग जास्त आपला वेग जास्त, त्याचा आत्मविश्वास दांडगा तर आपला आत्मविश्वास दांडगा, तोच जिथे त्याची काळजी घेतो आणि मागच्याला म्हणजे आपल्याला काळजी घ्या म्हणतो तिथे आपण आपली काळजी घेतो आणि मागच्याला काळजी घे म्हणतो म्हणजे आपोआप ही चांगुलपणाची आणि टीम वर्कची साखळी तयार होते. आणि टीमवर्क यालाच म्हणतात. जे कार्य आपण एकटे करू शकत नाही ते फक्त ग्रुपनेच साध्य होते. 
एक तास अंतर चालून गेल्यावर आता उतरलेले जंगल चढायचे होते. भूक लागल्यावर कसे आपण पहिले मला-पहिले मला  हावरेपणा करतो तसे झाले. कारण कातळधारा ची ती उंचावरून कोसळणारी धबधब्याची धार भयानक मोट्ठी मोट्ठी परंतु तरीही नयनरम्य, अप्रतिम दिसत होती. तिथे जायला अजून अवकाश होता परंतु या ठिकाणाहून फोटो घेण्याची मजा देखील वेगळीच.

मी तर फोटोसाठी हावरीच आहे हे सगळ्यांना आणि मला स्वतःला माहित आहे. मी आणि सर्वच ट्रेकर्स हावऱ्यासारखी फोटोग्राफी करून ती कोसळणारी कातळधार आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागले. परंतु ती जागा फारच निमुळती असल्याने क्रमानुसार आपापल्या जीवाची काळजी घेत संयम ठेवून सगळे फोटोग्राफी करीत होते. तिथे अजून एक गृप आल्याने थोडी जास्त गर्दी झाली होती.लिडर्सच्या सूचनेनुसार आम्ही पुढचा टप्पा पार करण्यास सुरुवात केली.एक कठीण पॅच पार केल्यावर ती  कातळधार आम्हाला समोरून दिसली. अहाहा.... ते वर्णन शब्दात सांगणे कठीण आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या.  पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आणि त्या कातळधारेजवळील गुहेत जाण्यासाठी खोल दरीत उतरवायचे होते. परंतु प्रचंड घसरडे खडक त्यात त्या कोसळणाऱ्या धबधब्याचा मारा सर्व ट्रेकर्सना सहन होईल किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी स्वतः लीडर्स आणि अजून २-३ ट्रेकर्स पुढे गेले आणि बाकीच्यांना आधीच्या गुहेजवळ थांबवयास सांगितले. तोपर्यंतआम्ही आणलेले जेवणाचे डबे काढून उभ्या उभ्या जेवण उरकून घेतले.कारण गुहेत आम्ही ५३ ट्रेकर्स आणि इतर ग्रुपचे मेंबर्स जास्त असल्याने जागा तशी कमी होती त्यामुळे कोणी गुहेत कोणी पावसाच्या धारेत थांबून जेवण केले पोट भरले परंतु ट्रेक पूर्ण व्हायचा होता त्यामुळे अजून आमचे मन भरायचे बाकी होते.

अर्ध्या तासाने लीडर्स म्हणाले सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे ज्याला आत्मविश्वास आहे त्यांनीच चला. ५३ मधले आम्ही किमान ३० ट्रेकर्स दरीत उतरू लागलो. एकीकडे त्या कातळधारेचा मारा, वाऱ्याचा मारा आणि घसरडे खडक असल्याने खूप भीती वाटत होती. त्यात छोटे छोटे दगड सैल झाले होते. एखाद दुसरा दगड निसटतदेखील होता.   रोप लावला होता त्याला धरून काही ठीकाणी रॅपलिंग करून उतरलो खरे परंतु उंचावरून ती कातळधार कोसळत असल्याने आणि पाऊस जोरदार असल्याने तोंडावर आणि डोळ्यावर ते पाणी चापट्या मारल्यासारखे लागत होते. खडकाचा आधार घेत आम्ही खाली बसत होतो. त्या कातळधारेकडे पाहिल्यामुळे उत्तम खडपला चक्करच आली. इतके असून एकीकडे आमच्यातले हौशी फोटोग्राफर प्रशांत, विवेक यांनी त्या ठिकाणी त्या थराराचे फोटोज काढले आणि व्हिडीओ शूटिंग केले. तुम्हाला सलाम आणि धन्यवाद.   
समोरचा राजमाची किल्ला जणू ट्रेकर्सचा पाठीराखा असल्यासारखा उभा होता. राजमाचीवरून कातळधारचे दृश्य अतिशय विहंगम दिसते. (खालील फोटो राजमाची गडावरून दुसऱ्याने काढला आहे राजमाचीवरून कातळधार कशी दिसते हे समजण्यासाठी मी इथे दिला आहे.) 

राणे सर आणि ४ मेंबर्स त्या दरीतून त्या भयानक रौद्र रूप असलेल्या धबधब्याखालून गुहेत पोहोचले होते परंतु ते आम्हाला न्यायला येईपर्यंत बराच वेळ झाला होता त्यामुळे आमचे धाबे दणाणले होते आणि मला तर खूप काळजी वाटत होती.आता गुहा फक्त १० मिनिटांच्या अंतरावर होती परंतु सॉल्लिड रिस्क होती शिवाय जायला जाऊ परंतु  सुखरूप परत येणे महत्वाचे होते.अशावेळी हेल्मेट आणि पोहताना वापरतो तो गॉगल हवा होता. पुढच्या कातळधारा ट्रेकला रॅपलिंग चे हेल्मेट आणि पाण्यातला गॉगल नेऊयात.  

"रिस्क इज अवर पॅशन" असले तरी तिथून पुढे जाणे सगळ्यांनाच शक्य नाही असे समजल्यावर त्या दरीतून आम्ही काही जण लिडर्स च्या आदेशावरून पुन्हा रोपच्या सहाय्याने दरी चढू लागलो. त्यावेळी "फोना' गृप सोबत केव्हातरी ट्रेकला येणारे किरण टेकवडे आणि प्रदीप अडागळे, रोहन स्टोरीटेलर, रघुनंदन पाटील असे काही मेंबर वेगळा मोठा गृप घेऊन आले होते ते त्या दरीत उतरत होते आणि आम्ही काही मेंबर्स दरी चढत होतो.असाही मी या आधी मी एकदा त्या रौद्र धारेखालुन गुहेत जाण्याचा थरार अनुभवला होता. तरीही १० मिनिटांच्या अंतरावर जाऊन  माघारी येणे माझ्या पचनी पडत नव्हते. अशी हाव प्रत्येकामध्ये असणे खऱ्या ट्रेकर्सचे लक्षण आहे. मला यावेळी ठीक नसल्याने आणि पाऊस असल्यायाने पाणी प्यायलेच नाही पाणी कमी पडल्याने पायात चांगलीच चमक येत होती माझ्यामुळे इतरांचा ट्रेक का खराब करा. असा विचार करून मी दरी चढू लागले. या अवाढव्य निसर्गापुढे आपण किती क्षुद्र प्राणी आहोत आणि आपल्या अडचणी किती क्षुल्लक आहेत याची प्रचिती येते.कोणी कितीही अनुभवी ट्रेकर असला तरीही त्या भयानक पाण्याच्या प्रवाहात रोप सैल होऊ शकतो आपण घसरू शकतो. दैव बलवत्तर, ट्रेकिंगचे तंत्र आणि जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली तरच आपण मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो हे ट्रेकमध्ये आलेल्या थरारक अनुभवाने शिकलो.  
सगळेच पाठीमागून येतात असे समजून आम्ही १५ जण वरच्या गुहेजवळ आलो परंतु तरीही आमच्यातील ३० ट्रेकर्सनी त्या कातळधारेचा थरार अनुभवला आणि सुरक्षितरित्या दरीतून आणि त्या कातळधारेतून जणू स्वतःची सुटका करून आले यातच त्या ३० ट्रेकर्सचे खूप कौतुक. (खालील फोटोमध्ये जे झाड दिसते आहे त्याच झाडावर चापड्या बसला होता.)

सगळे ट्रेकर्स आल्यावर "फोना बॅनर गृप फोटो" काढून आम्ही दुपारी २ वाजता परतीच्या वाटेला निघालो. उतरताना २-३ गृप एकत्र निघाल्यामुळे आणि आमचेच ५३ ट्रेकर्स असल्याने एका ठिकाणी ट्राफिक जॅम झाला होता आणि नेमका त्याच ठिकाणी चापड्या (पिट बांबू वायपर)आमच्या वाटेतच एका झाडावरच्या फांदीवर अगदी डोक्यावर वेटोळे करून बसला होता तो एकाने पहिला आणि आम्हाला पण सांगितले. तो जणू सांगत होता की चुपचाप जा नाहीतर मग माझ्याशी गाठ आहे. त्यात आमचे सर्प मित्र निकाळजे सर देखील नव्हते. त्यामुळे जरा घाबरगुंडी उडाली. परंतु दुसरा पर्याय नसल्याने त्या चापड्याच्या भीतीने आमच्यासारखे बडबड करणारे बडबडेवीर थोडा वेळ तरी गप्प बसले. त्याठिकाणी रोप लावल्याने आणि घसरडे असल्याने इतरांना डावलून जाता येत नव्हते. थोड्या वेळाने तो रोप-पॅच मोकळा झाला आणि आम्ही सपासप ते जंगल पार करू लागलो. लिडर्स मागेपुढे झाले होते पण आता आलो तश्या मार्गानेच निघालो होतो परंतु त्या झाडाला लावलेल्या भगव्या रंगाच्या छोट्या रिबिनींमुळे वाट थोडी सोप्पी वाटत होती. अधून मधून दुसरे गृप विचारीत होते फोना गृपची ट्रेकिंग फी काय आहे.त्यांनी त्यांची फी सांगितल्यावर समजले की फोना गृपची ट्रेकिंग फी ट्रेक दरम्यान मिळणार्या आनंदाच्या,समाधानाच्या मानाने खूपच कमी आहे." "फोना रॉक्स"असाही एक अनुभव. 
झाडांच्या फांद्यांच्या भगव्या रिबिनी लावलेल्या दिसल्या नाही की आम्ही नव्हतो चुकत तर वाट चुकत होती.
ट्रेक एकदम  वेळेत होता त्यामुळे जातांना एका मोट्ठ्या ओढ्यात बॅनर फोटो काढायचा राहिला होता तो काढून घेतला आणि चिखलाने भरलेले कपडे त्या ओढ्यात बसल्याने मस्त आयते धुवून निघाले. ह्या कातळधारेचा प्रशस्त प्रवाह आणि इतर मोठमोठ्या ओढ्यांचा प्रवाह सर्व दऱ्यांमधून एकत्र येऊन जी नदी  उगम पावते तिला उल्हास नदी म्हणतात.सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगांमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरेम्हणून ओळखला जातो.
ओढा पार करून निघालो की सकाळी उतरलेलो ते घनदाट जंगल अंधार व्हायच्या आत चढून वर यायचे होते. कातळधारेच्या ओढीने हसत हसत सपसप पार केलेले जंगल आता चढताना मात्र पाय भरून येत होते. एका ठिकाणी आम्ही बडबडे ट्रेकर्स गप्पा टाकत निघालो आणि अनावधानाने एक टर्न चुकलो आणि दुसऱ्या बाजूने  क्षणात उतरायला लागलो. पायांना आराम वाटला परंतु रस्ता चुकलो होतो हे १५ मिनिटांच्या आत लीडर्सच्या लक्षात आले म्हणून बरे आणि त्यात ग्रुप मध्ये जास्त अंतर नव्हते म्हणून बरे नाहीतरी काही ट्रेकर्स तर कुठच्या कुठे भलत्याच दरीत उतरले असते. परंतु अनुभवी आणि चाणाक्ष लिडर्स असलेल्या गृपसोबत जाण्याचा हा मोठ्ठा हितकारक फायदा आहे. म्हणून आम्ही "फोना" सोबतच जातो.  तरीही एक चिंता राहिली होती की मोरे सरांसोबत ४-५ मेंबर्स पुढे गेलेत ते वाट चुकले नसावेत म्हणजे झाले. तिथून फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.
२ वर्षांपूर्वी ४-५ मुले कातळधाराच्या ओढीने कोणतीही माहिती नसताना फक्त थोडेसे पाणी सोबत घेऊन अंदाजाने गेले आणि वाट चुकले, रस्ता भरकटले आणि खोल दरीत उतरले. कोणाशीही संपर्क होत नव्हता. अखेरीस २ दिवसांनंतर पोलिसच अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधू शकले. परंतु त्यांना मच्छरांनी चावून हैराण केले होते शिवाय २ दिवस अन्न पाण्यावाचून आणि भीतीने भेदरले  होते ते वेगळेच. असे विचित्र प्रसंग येऊ नये यासाठी माहिती असणाऱ्या ग्रुप सोबत सर्व तयारीनिशी ट्रेकला जावे.
शेवटचा टप्पा धापा टाकत पार केला कारण ट्रेक संपताना जर चढाव असेल तर मला तरी जास्तच जीवावर येते. म्हणता-म्हणता जाताना दिसलेला दगडातला देव दिसला आणि ते घनदाट जंगल संपले आणि हायसे वाटले. संध्याकाळी ५ वाजता बसजवळ आलो तेव्हा समजले की पुढे गेलेले मोरे सर आणि इतर काही मेंबर्स सुरक्षित पोहोचले होते. एकट्याने जाऊन सुरक्षित पोहोचणे हा देखील एक मोठा  सपोर्टच असतो धन्यवाद मोरे सर आणि इतर. ट्रेक संपला आणि कपडे बदलून मस्त चहा घेतला तेव्हा हायसे वाटले. सकाळी वेळेवर आम्हाला सामील झालेल्या अनोळखी पाच ट्रेकर्सना सुरक्षित आणल्याबद्दल पूर्ण फोना टीमला त्यांनी चहाची ट्रीट दिली. धन्यवाद अनोळखी ट्रेकर्स. पावसाळी ट्रेकला  खूपदा नवीन मेंबर्सची ओळख करून घेण्याचे राहून जाते. त्यासाठी सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा ट्रेकला यावे. तसेच अंताक्षरी खेळताना आम्ही आधी नवीन ट्रेकर्सना संधी देतो पण कोणी जागचे हालले नाही की मग आम्हीच सगळॆ बस हालवतो. संधी मिळाली की मग सगळ्या कला आणि भडास बाहेर  काढतो. जुने नवीन असे काही नसते हो. मी तर प्रत्येक ट्रेकला नव्याने जाते.  कारण प्रत्येक ट्रेकच्या वेळी आपली मनस्थिती आणि शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. आपली शारीरिक क्षमता तपासून ती वाढवण्यासाठी आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी महिन्यातून  किमान एक ट्रेक हे एक उत्तम औषध आहे.  लग्न ठरलेले २ जण फक्त बाहेर बाईकवर न फिरता आपापल्या पार्टनरला घेऊन ट्रेकला आले होते.जसे स्नेहल खोल्लम(इंजिनियर,ट्रेकर,योगा चॅम्पियन,सायकलिस्ट,) आणि ज्ञानराजे (इंजिनियर,ट्रेकर,सायकलिस्ट).आताची पिढी देखील आरोग्यासाठी खूप जागरूक आहे असे दिसते. असाच चालू ठेवा रे ट्रेक.(खालील फोटो हा कातळधारची आतली गुहा आणि त्यात पोहोचलेले आमचे ३० ट्रेकर्स)

सगळ्यात आधी माझ्या फॅमिलीला(श्री.दीपक साने,चेतन,प्रभा) खूप सारे थँक्स ज्यांनी मला बरं नसताना माझ्यावर विश्वास टाकून माझा आत्मविश्वास वाढवून मला ट्रेकची परवानगी दिली. इतका चांगला आणि सुरक्षित ट्रेक घडवून आणलात ट्रेकलिडर राणे सर, मंदार सर, रोहित  सर अनिल जाधव सर  मनापासून धन्यवाद. फोन फुटल्यामुळे मला स्वतःला या ट्रेकला जास्त फोटोग्राफी करता आली नाही त्यामुळे कविता,दिनेश,स्नेहल,सुरेखा,अस्मिता, निकिता,ऋजुता दिनेश, निलेश, रोहित, आनंंद,प्रशांत गुंड, विवेक, दीक्षित सर सुपेकर सर, अभिजित आणि ज्यांनी फोटोग्राफीसाठी आणि इतरही सपोर्ट केला त्यासाठी त्यांंचे  खूप कौतुक आणि सर्वच ट्रेकर्सचे  मनापासून कौतुक आणि अभिनंदन."फोना"सोबत आते रहो और बढीया ट्रेक करते रहो....



x

Monday, 17 July 2017

"अंधारबन धुवाधार ट्रेक"

"अंधारबन पावसाळी ट्रेक"
ठिकाण-पुणे जिल्हा (ताम्हिणी घाट)
दिनांक -१६ जुलै २०१७


पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटामध्ये "अंधारबन" हे घनदाट जंगल आहे. हे पुण्यापासून सुमारे ६६ कि.मी. अंतरावर आणि तळेगावपासून जवळ जवळ ८० कि. मी. अंतरावर आहे. "अंधारबन ते भिरा डॅम" हा "फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशन" (फोना)चा एका बाजूने सुमारे १३ कि. मी. चा  ७४वा ट्रेक आयोजित केला. यावेळी माझे  ट्रेकला जाणे पक्के नव्हते परंतु माझ्या कुटुंबाने ट्रेकला येणाची मनापासून तयारी दाखवल्याने मलाही ट्रेकला येणे जास्त गरजेचे आणि आनंदाचे वाटले.  
रविवार दिनांक १६ जुलै २०१७ या दिवशी आमच्या दोन बसेस सकाळी ६ वाजता तळेगाव-निगडी-वाकड-चांदणीचौक-पिरंगुट मार्गे मुळशी धरणाच्या कडेकडेने ताम्हिणी घाटातून अंधारबनकडे निघाल्या. पावसाची संततधार आधीपासूनच सुरु होती. यावेळी "फोना' टीम च्या ५०-५० सीट्स च्या २ बसेस होत्या. १ बस पुढे गेली परंतु आम्ही ज्या बसमध्ये होतो त्या बसचा ड्रायवर नेमका गाडीचे परमिट घरी विसरला. तिथे १ तास थांबावे लागले. असे एखाद्या वेळेस फार क्वचित घडते. परंतु त्या वेळात आम्ही बसमध्येच सोबत आणलेला पोह्याचा नास्ता केला आणि तिथे निसर्गात थोडी फोटोग्राफी केली.परमिट आल्यावर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला.
जाताना रस्त्यालागत भातखाचरे पाण्याने आणि भाताच्या रोपाने भरलेली दिसली आणि शेतकरीण कुटुंबासोबत  भाताची रोपे घेऊन भातलावणीच्या लगबगीत दिसली.  ताम्हिणी घाटामधील ट्रेक ला जाताना इथल्या रस्त्यालगत असलेल्या छोट्या साध्या शिवसागर हॉटेल आहे तिथे आम्ही चहा घेतला. त्या परमिट च्या गडबडीमुळे बस थोड्या मागेपुढे झाल्या होत्या आणि नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा करायचा राहून गेला होता. यावेळी माझे मिस्टर श्री. दीपक सानेंच्या हस्ते नारळ फोडून ट्रेकचा श्रीगणेशा केला आणि प्रतीक पेंढारे याने राजे श्री.छत्रपतीं शिवरायांची आणि संभाजी राजेंची स्फुर्तीपूर्ण गर्जना करून पुढील प्रवास सुरु झाला.
प्रौढप्रताप पुरंदर,क्षत्रियकुलावतंस,राजणिती धुरंधर,शास्त्रास्तशास्त्र पारंगत,महाराज,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...धर्मवीर संभाजी महाराज की जय...राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय...हर हर महादेव...जय भवानी, जय शिवाजी..
१०० ट्रेकर्स मधील ८० टक्के ट्रेकर्स आम्हाला नवीन होते त्यामुळे आत्तापर्यंत बसमध्ये सगळेच शांत होतो.कदाचित पहिल्यांदा ट्रेक करणाऱ्या काहींच्या मनात १३ कि.मी. चा इतका मोठा ट्रेक पूर्ण करू शकू की नाही अशी भीतीही असेल.चहा घेताना लीडर च्या परवानगीने आम्ही काही मेंबर्स अंताक्षरीसाठी दुसऱ्या बस मध्ये गेलो आणि तास भर अंधारबन येईपर्यंत गाण्याने सगळ्यांचे मनोरंजन करून(अंताक्षरीचा कल्ला) करून अंधारबन च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो."आपल्याला आनंद हवा असेल तर आपणच आंनदाजवळ गेले पाहिजे,आनंद आपोआप पाय चालत आपल्या पायाशी येणार नाही मी या तत्वाची आहे. इतरांचे माहित नाही परंतु मी हा आनंद मिळवण्यासाठी ट्रेक करीत असते. शारीरिक आरोग्य आणि मनाचे आरोग्य चांगले हवे असेल तर त्यासाठी महिन्यातून किमान एक तरी ट्रेक हवाच हवा.
मुळशी तालुक्यात वांद्रे फाट्यापासून आमची बस ज्या रस्त्याने गेली तो रस्ता पिंपरी, भांबर्डे, तैलबैला फाटा मार्गे लोणावळ्याला जातो. इथून भांबर्डे १८ कि.मी.आहे भांबर्डे गावातून घनगडला जाता येते.इथून आंबवणे ३० कि.मी. आहे आणि लोणावळा ५ कि.मी. आहे. तसेच तिथले  पिंपरी गाव ५ कि. मी.वर आहे. सकाळी ११:३० वाजता पिंपरी गावाच्या पाझर तलावापाशी आमची बस थांबली. मोबाइल पाण्यामुळे खराब होऊ नये आणि इतक्या सुंदर अंधारबन मध्ये फोटोग्राफी सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी मी खास amazon.in वरून एक मोबाइल कव्हर आणले होते ते मी यावेळी वापरले कारण एका पावसाच्या ट्रेकमध्ये माझा मोबाईल आणि डिजिटल कॅमेरा दोन्ही खराब झाले होते त्यामुळे मी पावसात माझ्या मोबाईलची जरा जास्तच काळजी घेते आणि तुम्ही देखील स्वतःच्या फोन आणि कॅमेऱ्याची काळजी घ्यावी असे मला वाटते.  ताम्हिणी घाट न्याहळत होते,बसमधून सुद्धा फोटोग्राफी सुरूच होती परंतु तिथे उतरल्यावर त्याहून अतिशय सुंदर निसर्गाचा अद्भुत मनमोहक नजारा पहावयास मिळाला. अश्यावेळी ओठांवर अनेक काव्यपंक्ती आणि गाणी सहज येतात,
"हिरवे-हिरवेगार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
"हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांगो चेडवा दिसतो कसो  ताम्हिणीचो  घाट.... हिरव्या हिरव्या.."

आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळली. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटली.
निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरी नका करू.”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.
सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात असभ्य वर्तन करताना दिसतात. निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील आठवड्यात कर्जत जवळील पेब किल्ला(विकत गड)आणि ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली आहे. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त आहे आणि या अपघाताची घटना अजून ताजी असल्याने कोणाही पर्यटकांना किंवा ट्रेकर्सना भिराधरणाकडे जाऊ दिले नाही. हे तिथे जवळ गेल्यानंतर समजल्यामुळे अंधारबन ते भिराडॅम च्या ऐवजी "अंधारबन ते हिरडी गाव" जाऊन परत येणे असा हा सुमारे १०ते११ कि.मी. असा ट्रेक करण्याचे ठरले.

अंधारबन ट्रेक च्या सुरुवातीलाच तेथील पिंपरी हे छोटे गाव आहे त्या गावचा हा पाझर तलाव दुथडी भरून वाहत होता आणि मुसळधार पावसामुळे चिखलमय झाला होता.  ट्रेक प्रमुखांनी यात उतरू नये अशी सूचना आधीच दिली असल्यामुळे आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली.दर वर्षी पावसाळी ट्रेकला जरा जास्त गर्दी असते त्याप्रमाणेच यावेळीदेखील गर्दी होतीच. "फोना"ग्रुपचे जरी १०० ट्रेकर्स होते तरी २५-२५ चे ४ ग्रुप करून एका ग्रुप सोबत किमान ३ लीडर होते. संपूर्ण ट्रेक विषयी आणि घावयाच्या दक्षतेविषयी सूचना दिल्या गेल्या. रघुनंदन पाटील याने त्याच्या ग्रुपकडून खूप सारे सीड बॉल्स बनवून आणले होते त्याचे वाटप करून ते ट्रेक दरम्यान जमिनीत कसे लावता येतील याची माहिती त्याने दिली.  जगामध्ये जैवविविधता असलेले एकूण ७ जैवविविधता हॉट-स्पॉट आहेत त्यातील आपल्या भारतामध्ये  २ आहेत.  त्या २ मधील ताम्हिणी घाट हा एक आहे. आपण खूप नशीबवान आहोत की आपण जैविविधता असलेल्या आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्य असलेल्या ताम्हिणी घाटाच्या इतक्या जवळ आहोत आणि बरेचदा इथे आपण ट्रेक करत असतो, इथल्या निसर्गाचा आनंद लुटत असतो. जर आपण निसर्गाकडून इतकं काही घेत असतो तर मग याच निसर्गाचे आपण देणे सुद्धा लागतो. "एक हाथ से ले और एक हाथ से दे" ही म्हण  सार्थ ठरवण्यासाठी असे सीड बॉल्स लावणे किंवा किमान बिया लावणे,अशी निसर्गसंवर्धनाची कार्ये आपण करू शकतो.  या अगोदर ताम्हिणी घाटाचा हा स्पॉट फक्त ट्रेकर्स च्या गर्दीचा असायचा परंतु आता इथे सहलीचा आनंद लुटण्यासाठीसुद्धा लोकांची तुडुंब गर्दी असते. कारण पुण्यातील लोणावळ्यातील भुशी धरण आणि तिथले सगळेच पॉईँट तुफान गर्दीने आणि दुर्दैवाने कचऱ्याच्या साम्राज्याने व्यापले आहेत.आम्ही ट्रेकर्स कोणत्याही गडावर कचरा करीत नाही.थर्माकोलच्या प्लेट चा वापर करीत नाही आणि जंगलात किंवा गडावर त्याचा कचरा टाकून येत नाही.  सहलीला गेलेल्या पर्यटकांनी आणि सर्वच ट्रेकिंग ग्रुपनेसुद्धा हा नियम पाळला तर आपला निसर्ग आपणच आपल्यासाठी स्वच्छ ठेवू शकू.
ट्रेक ला सुरुवात झाली आणि छोटे छोटे धबधबे घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे तसे आमचे पाय धुवून स्वागत करू लागले.धबधब्यांच्या रूपाने ते प्रेम ओसंडून वाहत होते. आमच्यासोबाबत अजून काही ट्रेकिंग ग्रुपदेखील होते. डाव्या हाताला खोल दरी होती तिला "कुंडलिका व्हॅली" म्हणतात. पावसाचे ढग असले तर ती व्हॅली बिलकुल दिसत नाही. परंतु ढग दाटून आला आणि पाऊस पडल्यावर एक-दोनदा कुंडलिका व्हॅलीने दर्शन दिले. त्या व्हॅलीतून दिसणाऱ्या  भिरा धरणाने आमच्याकडे वाकून पहिले तेव्हाचे दृश्य अप्रतिम होते. एका बाजूला व्हॅली एका बाजूला धुक्याने भरलेले उंच डोंगर आणि  विरघळल्यावर मुसळधार पावसाने धुथडी भरून वाहणारे धबधबे.अश्यावेळी डोळे तृप्त झाले होते प्रश्न पडतो की ट्रेक करू की फोटोग्राफी करू की ते दाटलेले ढग विरघळेपर्यंत पाहत राहू. छोटे छोटे धबधबे ओलांडल्यावर एक मोठा ओढा-धबधबा पार करण्यासाठी ग्रुप लीडर्सने साखळी करून एकेकाला सुरक्षितरित्या दुसऱ्या बाजूला पाठवले. त्यानंतर पुढचे २ धबधबे असेच हाताची साखळी करून आणि काही ठिकाणी दोर बांधून ट्रेकर्सना पुढे पाठवून त्यांच्या मागून लीडर्स येत असत.  ढगांचा धुके-पावसाचा खेळ सतत सुरु होता.  अंधारबनचे घनदाट जंगल आम्ही चालत होतो. दिवसा चालत असून रात्रीचे जंगल पार करीत आहोत की काय असा भास होत होता इतका अंधार होता. एक तास जंगल पार करून गेल्यावर एक मोठा धबधबा पार करताना पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने जरा अवघड वाटत होते  परंतु रोप लावून हाताची साखळी केल्याने कठीण गोष्ट थोडी सोप्पी जात होती.   ट्रेकलीडर्स आणि सगळेच मेंबर्स तुम्ही उत्तम कामगिरी केलीत. अंधारबनची वाट चालताना मधेच धबधबे, मधेच चिखलमय वाट, मधेच जोरदार पाऊस मधेच लक्ख उजेड आणि उंच हिरव्या डोंगरांवरून फेसाळणारे दिसणारे पांढरे स्वच्छ धबधबे. अवर्णनीय असे ते रम्य देखावे डोळ्यात आणि मनात कॅमेऱ्यात साठवून घेतले.

उन्हाळी ट्रेक असल्यावर पाणी खूप जास्त प्यावे लागते आणि सोबत न्यावे लागते. पावसाच्या ट्रेकचा हा एक फायदा आहे की पाणी कमी असले तरी चालते. हिरडी गावाच्या जवळपास गेल्यावर दुपारी २:३० च्या सुमारास अंधारबन मधेच थांबून आम्ही जेवण केले. "फोना" बॅनर फोटो घेतला आणि अंधारबन मध्ये थांबलो असल्याने १०० ट्रेकर्स च्या समूहाने एका ट्रेकला प्रदीप अडागळे यांनी गायलेला शाहीर राजू राऊत यांचा  एक पोवाडा सादर केला, "अंधार फार झाला,एक दिवा पाहिजे.. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे."  त्यावेळी त्या अंधारबनात त्या पोवाड्याचा सूर खूप छान लागला होता.



पावसाचा जोर वाढल्याने तिथून परतीची वाट धरली कारण अंधार व्हायच्या आत १०० ट्रेकर्स ना इतके सारे धबधबे सुरक्षितरित्या पार करून सुरक्षितरित्या घेऊन जाणे काही खाऊ नाहीये.  परत येताना पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जंगलाची वाट पाण्याने भरून वाहत होती आणि जास्त चिखलमय झाली होती. ट्रेकर्स देखील एक माणूसच आहे तो  देखील थकतो. पाण्यात चालल्याने माझे तर पाय दुखतातच. पण तरीही ट्रेक पूर्ण झाल्याशिवाय थांबणे नाही. जाताना वाटेत लागली धबधबे आता प्रचंड वेगाने वाहू लागले होते. चॉकलेटच्या नद्या वाहताना दिसत होत्या. अचानक वाहत्या पाण्याचा रंग बदलला की समजावे पाण्याचा वेग वाढला आहे. एका ओढ्याजवळ पाणी इतके वाढले होते की जाताना सहज पार केलेला तोच ओढा पार करणे सहज शक्य नव्हते. थोडा वेळ रांगेत थांबून पाण्याचा वेग थोडा कमी झाल्यावर पुन्हा रोप लावून हाताची मजबूत साखळी करून हळूहळू एकेक, दोनदोन मेम्बर्सना ओढ्यातून बाहेर काढणे शक्य झाले. असे ३ मोठे ओढे पार केल्यावर जरा हायसे वाटले. आता ५ वाजून गेले होते अंधारबन अंधार पडायच्या आत पार करणे गरजेचे होते. त्यात पुन्हा पाऊस सुरुच होता आणि इतका उशीर होत असताना आम्ही अंधारबनातून बाहेर येऊ पाहत होतो आणि इतर लोक फक्त धबधब्याखाली भिजणारे लोक दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, चखणा घेऊन जाताना दिसली, पिताना दिसली ट्रेक च्या वाटेत पाण्यात शुद्ध हरपून लोळताना दिसली. अशीच मग तोल जाऊन पाण्यात पडतात आणि दुसऱ्या दिवशी बुडून मेला म्हणून बातमीपत्रात झळकतात. अश्या लोकांना तिथेच तुडवावे वाटत होते आणि पोलिसांकडे द्यावे वाटत होते. अशा लोकांमुळेच ट्रेकर्स बदनाम झाले आहेत.
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची" हे ज्याला समजले तो जिंकला. 

अंधारबन ट्रेक दरम्यान रघुनंदन याने आणलेले जवळवळ १५० सीड-बॉल्स सगळ्यांनी मिळून अख्या अंधारबनात ट्रेकच्या वाटेजवळ थांबून छोटे छोटे खडे करून लावले. आणि येताना अंधारबन मधला प्लास्टिक कचरा,प्लास्टिक बाटल्या आम्ही उचलून आणल्या. मागच्या वर्षी अंधारबन ते भिरा डॅम हा एका बाजूने १३.की. मी. चा ट्रेक पूर्ण करता आला होता तो आनंद काही वेगळाच आणि आत्ताच्या ट्रेकचा अनुभव त्याहून वेगळा आणि आनंद देखील वेगळाच होता. मुसळधार पावसामुळे यावेळी सुमारे १०-११ की. मी. चा ट्रेक करता आला. हाताची पाची बोटे सारखी नसतात, नाटकातील सगळीच पात्रे सारखी नसतात त्याचप्रमाणे आलेले  ट्रेकर्स हे सगळे काही एकसारखे वागतील याची गॅरेंटी देता येत नाही. एखादा न ऐकणारा असतो, एखादा जास्त मस्ती करणारा असतो, काही एकदम शिस्तीत चालणारे असतात. अश्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या १०० लोकांचा ट्रेकिंगचा ग्रुप घेऊन जाणे, उत्तम ट्रेक घडवणे आणि कोणताही अपघात न होता त्या सर्व ट्रेकर्सना सुरक्षितरित्या बसजवळ परत आणणे हे खूप जिगरीचे कार्य आहे आणि ते लीडर्सच्या युक्ती-क्लुप्ती आणि कौशल्याचे, संयमाचे काम आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे आलेल्या सर्व ट्रेकर्सच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. 
इतका अप्रतिम,मनोरंजक आणि आठवणीत राहणारा असा ट्रेक घडवून आणल्याबद्दल सर्व प्रथम माझे मिस्टर श्री. दीपक साने यांचे आणि माझ्या दोन्ही मुलांचे (चेतन,प्रभा)मनापासून आभार कारण या ट्रेकसाठी माझी सिस्टीम ठीक नसल्याने मला हे तिघे मला घेऊन आले होते. त्यांनतर ट्रेक प्रमुख श्री. मंदार सर श्री. राणे सर, श्री. निकाळजे सर, रोहित सर आणि विशेष आभार श्री माजगावकर काका, गोलांडे सर, सोनार सर, मंगेश, विनोद मुळे आणि खास आभार सीड बॉल्स आणणारा रघुनंदन पाटील (तू माझा बाप निघालास सोलापूरची सोलापुरी आणि तुमची कोल्हापुरी भाषा मला नेहमीच आवडते) गंमतीचा भाग सोडला तर सारखे रघु पाटील रघु पाटील असे ऐकायला मिळाल्याने मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली कारण माझ्या वडिलांचे नाव श्री.रघुनाथ पाटील असे आहे) त्यांनतर आलेले सर्व नवीन ट्रेक मेंबर तुमच्या सहकार्यामुळे ट्रेक यशस्वी होणे अशक्य होते. वेळेअभावी आणि जोरदार पावसामुळे यावेळी ट्रेक मेंबर्सची ओळख करून घेणे शक्य झाले नाही त्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक ट्रेकला यावे. तसेच माझे ट्रेकफ्रेंड्स,हिरल राणे,ऋतुजा,सुरेखा,अबोली,कविता,पूर्णिमा,तनया,प्रतीक पेंढारे,विवेकानंद,आनंद,प्रशांत भावसार, उमाकांत पोतदार, मंदार चिंचलीकर, नितीन वाकुलकर,संदीप गोरे, गायक शेवकर सर,मिताली, प्रज्ञा, ज्वाला, स्नेहा, स्नेहल,डॉ गिरीश, डॉ.आकाश, यशल आणि जय तसेच सगळे जुने नवे ट्रेक फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.. संध्याकाळी ५:३० वाजता ट्रेक संपवून ६:३० अंधारबनमधील  त्या फेसाळलेल्या धबधब्यांचा, त्या हिरव्या गालिच्यांचा, धुक्याच्या शालीचा जड अंतःकरणाने निरोप  घेऊन आम्ही पुन्हा त्याच रस्त्याने पुण्याची वाट धरली.  रविवार असल्याने वर्षासहलीला जाणारे पर्यटक, तसेच ट्रेकर्स अश्या सगळ्यांच्या गाड्यांच्या  ताम्हिणी घाटामध्ये ट्रॅफिकमुळे रांगाच रांगा लागल्या होत्या तरीही एका बाजूला मावळत्या दिवसाचा हलकासा संधिप्रकाश आणि एकीकडे मुळशी धरणाचे दुरून शांत दिसणारे पाणी  एकीकडे वाहनांचा प्रकाश असे सुंदर दृश्य होते.  आमच्या बसच्या मागेपुढे प्रकाशाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत असे भासत होते. मुसळधार पावसात येताना चांदणी चौकातून ट्रेकमेम्बर्सना सोडत सोडत आम्ही घरी रात्री ११:३० वाजता पोहोचलो. असा हा पावसाळी अंधारबन चा ट्रेक सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्तमोत्तमरित्या पूर्ण झाला. खरे तर नेहमीप्रमाणे मला अजून ब्लॉगला अनुसरून काही स्नॅप्स या ब्लॉगमध्ये टाकायचे होते परंतु ब्लॉग मोठा झाल्याने जागा उरली नाहीये त्यामुळे बाकीचे स्नॅप्स आपल्या सगळ्यांकडे आहेतच शिवाय फेसबुकवर सापडतील. तसेच ब्लॉग लगेच पूर्ण झाल्यामुळे आश्चर्यचकित होऊ नये. माझे असे मत आहे की कोणतीही गोष्ट करावी तर पॅशनने करावी नाही तर केव्हाही करूच नये. मग तो ट्रेक असो अथवा ब्लॉग असो. हे पॅशन सगळ्यांकडे आहे आणि असावे. मित्र हो.. धन्यवाद.!