Monday 26 September 2016

"भोरगिरी-भिमा" तुफानी ट्रेक

भोरगिरी ते भिमाशंकर ट्रेक
चढाई श्रेणी-मध्यम
ठिकाण- पुणे जिल्हा
दिनांक - २५ सप्टेंबर २०१६


पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले. राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावर,भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे.भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या किल्ले भोरगिरी विसावला आहे. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ७००मीटर आहे.भोरगिरी किल्ला छोटेखानी असून,पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. भोरगिरी ते भीमाशंकर हे अंतर ८ कि.मी. आहे परंतु भोरगिरी गड जाऊन-येऊन आणि भीमाशंकर असे एकूण अंतर आम्ही १० ते ११ कि. मी. चाललो असेल.

घनदाट जंगल आणि ओढे,धबधबे,नदी यातून जाताना रमतगमत करता येणारा छान,सुंदर असा ट्रेक  होणार यात शंका नव्हती. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात.  भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरुनगरपासून साधारण ५० कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते. भोरगिरी गाव हे पुण्यापासून किमान ९० कि.मी.अंतरावर येते.इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात अंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते.किल्ल्यावर खोदलेल्या गुहा आहेत. तेथे एक शंकराचे आणि महालक्ष्मीचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.


'भोरगिरी-भीमाशंकर' जरी हा ट्रेक असला तरीही भारतातील बारा जोतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक जोतिर्लिंग आहे त्यामुळे बारा जोतिर्लिंगाची माहिती द्यावी असे मला वाटते त्यामुळे या बारा जोतिर्लिंगाची माहिती मी इथे देत आहे.ही माहिती मी नेटवरूनच शोधल्याने यामध्ये किलोमीटरचा थोडाफार फरक असू शकतो.
बारा जोतिर्लिंगे-
सोमनाथ- हे बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी पहिले जोतिर्लिंग देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जाता येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे.
मल्लिकार्जुन- गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
महाकालेश्वर- उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे. येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता. ओंकारमांधाता उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे.
अमलेश्वर- ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असें म्हणतात.
वैद्यनाथ- शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
रामेश्वर- दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.
नागेश्वर- श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
काशीविश्वेश्वर- जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. गंगा नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात.
त्र्यंबकेश्वर- शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.
केदारेश्वर-हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
घृष्णेश्वर- (घृष्णेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर म्हणतात.
भीमाशंकर-शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून ९० किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला. शिवाजी महाराजही या देवळात येऊन गेल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड आहे. तसेच घनदाट जंगल आहे. शेकरू हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी येथे आढळतो. 



२५ सप्टेंबर २०१६ या दिवशी 'फोना' चा ६७ वा भोरगिरी ते भोरगिरी ते भिमाशंकर हा ट्रेक आयोजित करण्यात आला या गोष्टीचा आनंद होताच परंतु २६ सप्टेंबर माझा वाढदिवस असल्याने जर त्या दिवशी ट्रेक असता तर अजून जास्त मज्जा करता येईल असे वाटले. पण मजाच करायची म्हटली दिवस आनंदातच घालवायचा म्हंटलं तर इन ऍडव्हान्स मध्ये पण आपण ते करू शकतो. किंबहुना २५ तारखेला ट्रेकिंग च्या फ्रेंड्स सोबत वाढदिवस साजरा करणे आणि २६ तारखेला घरच्यांसोबत वाढदिवस साजरा करणे अशी दुहेरी पर्वणी मला मिळाली होती. परंतु हा आठवडा जरा धावपळीचा गेल्याने मला केक वैगेरे बनवून नेता आला नाही. पण ट्रेक चुकवायचा नाही असे मी मनोमन ठरवले होते. त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझी शाळेची मैत्रीण ममता ही देखील माझ्यासोबत ट्रेक ला येणार होती. आम्ही १० वि नंतर पुन्हा असे भेटलोच नव्हतो.त्यामुळे मी जास्त खुश होते. ती पुण्यातच राहत असून आम्ही फक्त वॉट्सऍप वर आणि फोन वर बोलत असायचो. मला कुठल्याही संधी चे सोने कसे करायचे हे चांगले माहित आहे.



२५ सप्टेंबर ला सकाळी आमची बस तळेगाव, निगडी, चाकण मार्गे भोरगिरी ला निघाली. पुणे ते भोरगिरी हे अंतर सुमारे ९० कि.मी. आहे. राजगुरूनगर मार्गे जाताना चासकमान धरण अतिशय सुंदर दिसत होते . असे वाटत होते की बस थांबवून मनसोक्त फोटोग्राफी करावी. परंतु वेळेचे बंधन असते त्यामुळे ते निसरसौंदर्य फक्त डोळ्यात साठवले, बसमध्येच पोह्याचा नास्ता करून १० वाजता भोरगिरीला पोहोचलो. ग्रुप लीडर नी  ट्रेक ची माहिती देऊन आम्ही आधी भोरगिरी हा छोटा गड एका तासात पूर्ण केला. या गडावर ५-६ पाण्याचे टाके आहेत, एक शंकराचे मंदिर आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले. हिरवे हिरवेगार गालिचे पसरले होते जणू. सहज ओठावर 'हिरहिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे' या ओळी येतात। या गावात आम्हाला भातशेती पाहायला मिळाली. आम्ही पुन्हा भोरगिरीच्या पायथ्याशी येऊन त्या गावातील एक शेतकरी गाईड म्हणून घेतला आणि भीमाशंकरच्या ट्रेक ला सुरुवात केली.

ट्रेक सुरु झाला त्यावेळी भिमानदीने आमचे स्वागत केले. भिमानदीचा उगम भीमाशंकर च्या मंदिराजवळून होतो. पिवळी फुले आणि त्या पाण्याचा खळखळ आवाज वाह खरंच मन मोहून टाकणारे वातावरण होते ते.. सर्वच डोंगरांनी धुक्याची  शाल पांघरली होती. आम्ही ओढे, जंगल पार करत चालत होतो. जंगल पार करत असतांना भिजण्याचा आनंद आम्ही घेतला. भीमाशंकरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या जंगलामध्ये चित्ता आढळतो तसेच हरीण आढळते असे म्हणतात. तसेच अनेक प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात. जंगल पार करताना अंधारबन ची खूप आठवण झाली. धुक्यामुळे फार दूरचे काही दिसत नसायचे. तरीही फोटोग्राफीचा मोह आवरत नव्हता आणि त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. दुपारचे २:३० वाजता आम्ही गुप्त शिवलिंग आहे त्याठिकाणी आम्ही ग्रुप फोटो काढून जेवण केले आणि लगेच भीमाशंकर चढायला सुरुवात केली.भीमाशंकर च्या वाटेमध्ये कारवींचे जंगल आहे.  शिवाय कारवीच्या झाडांना ५-७ वर्षातून फुले येतात. ती या वर्षी आम्हाला पाहायला मिळाली. निळ्या आणि सफेद रंगाची फुले दिसत होती सर्वत्र. 


एक तासात भीमाशंकर गाठले. तिथे  मस्त गरम गरम चहा घेतला आणि नागफणी पॉईंट ला जायचे ठरवले कारण त्या पॉईंट वरून खाली गोरखगड, कोथळीगड हे अतिशय सुंदर दिसतात. परंतु धुक्यामुळे आम्हाला ते दृश्य दिसू शकले नाही. भीमाशंकर च्या जंगल चा ट्रेक केला तो छान झाला. परंतु भीमाशंकर च्या मंदिरातील जे निर्माल्य मंदिराजवळ कुठेही टाकले जाते ते निर्माल्य आणि तिथला प्लास्टिक पिशव्यांचा आणि इतरही कचरा याचे व्यवस्थापन याची सोय केलेली नाही. ते थेट नदीतून आणि जंगलाच्या ओढ्यामधून जसे ओढे वाहतात तसे जंगल भर पसरले आहे.मोट्या प्रमाणावर  हा कचरा सगळीकडे पसरतो आणि मग प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरतो. प्रसिद्ध तीर्थस्थळी स्वच्छता ही आढळून आली नाही ही एक गोष्ट खटकली. बाकी मंदिराजवळ जंगलात अनेक औषधी वनस्पती विकावयास होत्या. मंदिराचे आवार मोट्ठे आहे आणि बांधणी देखील उत्तम आहे. ट्रेक संपल्यानंतर आम्ही वेळेअभावी मंदिराचे दुरूनच दर्शन घेतले आणि आम्ही ५:३० ला पुण्याकडे निघालो. थकलो होतो तरीही जाता-येता  अंताक्षरी जोशात सुरु होती.
त्यात भर म्हणजे माझ्या वाढदिवसाची ट्रीट मला द्यायचीच होती. त्यामुळे मुख्य रस्ता येईस्तोवर आम्ही मराठी, हिंदी, तामिळ, पंजाबी, ऐराणी, जर्मन गाण्याचा आस्वाद घेतला. आणि एका हॉटेलमध्ये थांबून माझ्या वाढदिवसाची ट्रीट म्हणून मी सगळ्यांना अनलिमिटेड वडापाव आणि चहा दिला.(खाणाऱ्यांनी१किंवा२ च खाल्ला ती गोष्ट वेगळी) दुसऱ्या दिवशीच्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सगळ्यांनी गाण्यातून, कवितेतून केला. मंदार सर,राणे सर, निकाळजे, महेश पाठक, रूपा, तनया, रोहिणी, स्नेहल, अबोली, सोरभ, प्रतीक, आनंद, निखिल, मी आणि माझी मैत्रीण ममता आम्ही सगळ्यांनी धमाल केलीच परंतु अंताक्षरी च्या वेळी विवेक,रोहित,शालाभ,स्नेहल खोल्लम, रश्मी, शुभांगी  आणि शैलजा ला खूप मिस केले. सगळ्यांची नावे नाही आठवत सॉरी फ्रेंड्स परंतु नव्या जुन्या सगळ्याच मेम्बर्सने तुफानी मजा आणली. माझी मैत्रीण ममता आणि आम्ही २५ वर्षांनंतर भेटल्यामुळे मनसोक्त गप्पा मारल्या आणि ट्रेक चा आणि फोटोग्राफीचा देखील मनमूराद आनंद लुटला. आम्ही रात्री १०:३० घरी पोहोचलो ट्रेक अतिशय सुरेख अप्रतिम आणि अविस्मरणीय झाला. धन्यवाद सगळ्यांना. 

18 comments:

  1. छानच लिहिले आहे

    ReplyDelete
  2. छानच लिहिले आहे

    ReplyDelete
  3. Good....Add photos- Gupta Bhimashankar & friends together photo...

    ReplyDelete
  4. Good....Add photos- Gupta Bhimashankar & friends together photo...

    ReplyDelete
  5. सुंदर लिहिलस वर्णन जयू ताई...👌🏻

    ReplyDelete
  6. वाह अप्रतिम लेख....

    ReplyDelete