Thursday 29 September 2016

"नजर भेट"

"नजर भेट' 
दिनांक-२७ सप्टेंबर २०१६
डहाणू गड (मुसळ्या डोंगर)
ठिकाण- ठाणे जिल्हा.   


गेला सप्टेंबर महिना काहींना काही कारणाने खूप धावपळ चालू आहे. जाम दमछाक झालीये माझी. पण मन मात्र आनंदी आणि उत्साही आहे. हाताला खाज आल्यासारखं झालंय सध्या. म्हणजे मला काहींना काही ना काही चांगलं लिहावसं वाटतं. २५ सप्टेंबर चा भोरगिरी भीमाशंकर चा ट्रेक केला. दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याने त्याच दिवशी ट्रेक चा  चा लेख पूर्ण करायचे ठरवले आणि लेख पूर्ण केला सुद्धा.अर्थात इतर सगळी कामे करूनच. दुसऱ्या दिवशी गुजरात च्या दिशेने रवाना व्हायचे होते. माझ्या वाहिनीची आई अचानक ४-५ दिवस आजारी पडून देवाघरी गेली. वहिनीला भेटायला जायला जमले नाही. त्यामुळे २७ तारखेला वहिनीच्या आईच्या तेराव्या दिवशीच्याउत्तर कार्यास जायचे ठरवले आणि पहाटे उठून मुलांच्या शाळेची तयारी करून आणि अजून थोडी कामे आटोपून घेऊन पुणे-लोणावळा-मुंबई पुणे हायवे -ठाणे - घोडबंदर रोड- वसई- मनोर - चारोटी -उर्से अशा प्रवासाच्या दिशेने निघालो.
नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला ट्राफिक जाम होताच एक ते दीड तास आमचा ट्राफिक मधेच गेला.कधी कधी हा  ट्राफिक मात्र उगाच असतो. कोणीतरी वाहन चालक उगाच मध्ये घुसून स्वतःची लेन सोडून समोरची लेन देखील ब्लॉक करतात. आम्हाला वाटले रस्त्याचे काम चालू असेल परंतु नंतर ट्राफिक पोलिसांनी दंडुके दाखवल्यावर रस्ता चुटकीसरशी मोकळा झाल्यावर समजले की जाण्याच्या घाईमुळे वाहन चालकांनी उगाचच समोरचा आमचा रास्ता अडवून धरला होता. 

एक ते दीड तासांनी रास्ता मोकळा झाल्यावर आम्ही गुजरात कडे निघालो.  तेव्हा पावसाने चांगलीच हजेरी लावली. खरे तर आम्हाला मुंबई-अहमदाबाद हायवे वर डहाणूजवळ चारोटी नाक्यापासून आत १०-१२ कि. मी. जायचे होते. आणि वाहिनीच्या आईचे उत्तर कार्य आटोपून आणि तिथल्या सर्व मंडळींना भेटून  आम्हाला लवकरात लवकर निघून अंधार व्हायच्या आत पुणे गाठायचे होते. चारोटी नाक्यापासून आत जायचा रास्ता खूप छोटा आहे. परंतु सध्या पावसामुळे सगळे नदी-ओढे भरून वाहत होते. सर्वत्र हिरवे गवत आणि हिरवी भातशेती छान दिसत होती. त्यामुळे प्रवासाचा थकवा जात होता. उर्से या गावी वाहिनीचा भाऊ श्री संतोष पाटील (ज्यांनी माझा "के-टू-एस ट्रेक' चा लेख आवडल्यावर "दैनिक महासागर' या बातमी पत्रामध्ये छापून आणला होता.) यांच्या घरी आम्ही पोहोचलो. कार्य पार पडले. त्या कार्याच्या वेळी मी त्या ठिकाणी काही गोष्टी ऐकल्या त्या मला मनोमन पटल्या त्या इथे नमूद करते. उत्तर कार्याला खूप गर्दी होती.  नातेवाईक आणि मित्र परिवार हजर होता. संतोष पाटील हे गरजू लोकांसाठी लगेच धावून जाणारे आहेत धडपडणारे आहेत. स्वतःचे कुटुंब सांभाळून त्यांना जे जे चांगले कार्य करता येईल ते ते त्या ठिकाणी ते करतात. त्यांच्या उर्से या गावात जेवणासाठी गावातल्याच सर्व महिला कार्यरत होत्या. गावात एक समाजगृह आहे. संतोष पाटील यांनीसमाजगृहाच्या च त्या समाजगृहासाठी त्यांची स्वतःची जागा गावाला दिली होती.  त्या समाजगृहाच्या ठिकाणी गावातले सगळे कार्यक्रम होतात. आजकाल कोणत्याही गावात एकी नसते. परंतु या गावात एक गाव -एक गणपती,तसेच नवरात्र मध्ये गावमिळून एकाच देवीची स्थापना केली जाते. आपण हे जे सण साजरे करतो ते एकत्र येण्यासाठीच. त्यामुळे संतोष पाटील यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना राबविली आहे आणि आजपर्यंत जपली आहे याचे मला कौतुक वाटले. माणसाकडे पैसे असला तरी दानत नसते किंवा माणुसकी विसरतो माणूस. परंतु खूप श्रीमंत नसून देखील श्री संतोष पाटील हे वेळोवेळी गरजूंना मदत करतातच. त्यांच्या आईच्या कार्याच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना त्यांनी साधे परंतु उत्तम जेवण दिले शिवाय गावात आठवीपर्यंत शाळा आहे त्या सर्व 150 विद्यार्थ्यांना देखील त्यांनी जेवण दिले. ऐकून समाधान वाटले. समाजाची सेवा सेवा म्हणजे नेमके काय असते ? तर आपला एक माणूस म्हणून समाजातील सर्व थरातील गरजूंना उपयोग झाला पाहिजे असे माझे मत आहे.

तिथल्या सर्व मंडळींना भेटून संध्याकाळी ४ वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो सोबत माझे आई-बाबा, काका, एक आतेबहीण असे आम्ही ५-६ जण निघालो. तिथून निघाल्यावर जाताना मला एक गड दिसला होता परंतु कार्यस्थळी वेळेत पोहोचायची घाई असल्याने मी फोटोग्राफी करणे टाळले. येताना मात्र गाडीतूनच का होईना काही फोटो काढले. तो गड अतिशय देखणा दिसत होता त्यामुळे मला मोह आवरला नाही. तो गड म्हणजे ठाणे जिल्यातील पालघर तालुक्यातील  डहाणू च्या महालक्ष्मी देवीचा डोंगर आहे. दिसायला अगदी मुसळासारखं दिसतो त्यामुळे त्याला मुसळ्या डोंगर असेही म्हणतात. आजकाल ट्रेकिंगसाठी सुद्धा हा गड प्रसिद्ध आहे. त्या भागात असे खूप गड आहेत  की जे ट्रेकिंगसाठी प्रसिद्द आहेत परंतु आपण "फोना" ट्रेकर्स ना थोडे दूर आहे इतकेच. तरीही एकदा तरी त्या भागात म्हणजे पश्चिम कोकणात जाणे होईल अशी आशा करते.


आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं.त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस मण रत्नं , हिरे , मोती , पाचू , माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता.देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिरपायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे.हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गर्दी  असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज, पूजेचं साहित्य , देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वजलावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी आईची प्रसिध्द याञा साधारण  एप्रिल मध्ये  असते. ही याञा १५ दिवस चालते. मंदिरातील पूजेचा आणि गडावर ध्वज लावण्याचा मान वर्षानुवर्षे आदिवासी बांधवाचा आहे . जव्हार च्या संस्थाना कडून ध्वज वाघाडी मार्गे विवळवेढे गावात आणला जातो. आणि चैञशुध्द पौर्णिमेला रात्री मुसळ सारख्या दिसणाऱ्या डोंगरावर (मुसल्या डोंगर-महालक्ष्मी गड) ध्वजारोहण होते आणि याञेला सुरूवात होते. जिल्हयातील आदिवासींची आदिमाता म्हणून ओळखली जाते. माझा भाऊ रुपेश आणि माझ्या माहेरच्या गावातील लोक आणि आसपासच्या गावातील लोक या देवीच्या यात्रेच्या दरम्यान पदयात्रा करतात.


त्या गडाचे फोटोकाढून मुंबई-अहमदाबाद हायवे वर  शिरसाट या ठिकाणी माझ्या बाबांनी दिलेला स्पेशल चहा प्यायलो आणि पुण्याकडे निघालो. नेहमीप्रमाणे घोडबंदर रोड ला खाडीपुलाजवळ ट्राफिक जाम होताच. पण गाडीत बसल्या बसल्या तिथेही  सुंदर संध्याकाळचे फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. एका बाजूला सोनाच्या गोळा अस्ताला चालला होता तर दुसऱ्या बाजूला खाडीमध्ये डोगर उभा होता असे भासत होते. ट्राफिक मधून पादचारी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही मी कॅमेऱ्यात कैद केले आहे. एक ते दीड तासाने तिथला रास्ता थोड़ा मोकळा झाल्याने आम्ही पुन्हा न थांबता रात्री १० वाजता पुण्यात घरी पोहोचलो. जे मनाला पटले ते लिहिले, जे खटकले ते ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे बघा तुम्हाला आवडतंय का ते....





No comments:

Post a Comment