Wednesday 7 September 2016

मी "स्री" "मनाची उकल"

मी "स्त्री" "मनाची उकल"

मी आतापर्यंत माझ्या "भिंगरी" या ब्लॉग मध्ये जास्तीत जास्त "ट्रेकिंग" या विषयावर लिखाण केले आहे. मी म्हणजे काय मोट्ठी लेखिका किंवा कवयत्री नाही किंवा एखाद्या सामाजिक विषयावर मोठमोट्ठे लेख लिहिणारी सामाजिक लेख लिहिणारी समाजसुधारक नाहीये. परंतु जे लिहिते ते मनापासून मनापर्यंत पोहोचते आणि वाचक मनातून सुधारतो असे मला बऱ्याच वाचकांनी सांगितले आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. मी माझ्या आनंदासाठी तर लिहितेच शिवाय ज्यांना हे लिहिलेले वाचून आनंद मिळतो त्यांच्यासाठी लिहिते. आज मी स्त्री च्या मनाची उकल हा विषय समोर ठेवून जे मनाला पटले ते लिहिणार आणि जे मनाला बोचले ते लिहिणार आहे.  "मी" म्हणजे एक मुलगी आहे एक "स्त्री" आहे हे विसरून चालत नाही कारण आपण मुलगी आहोत स्त्री आहोत हे समाजात आपल्याला सारखं सारखं आठवून दिले जाते. तरी बरे आम्हा स्रियांना स्वतःला या गोष्टीचा अजून तरी विसर पडलेला नाहीये.
आज मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचे आणि प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन उल्लेख करू इच्छित नाही. माझा जन्म एका खेड्यात झाला आहे. माझ्या जन्माआधी माझ्या आईची एकूण सात मुले जन्माला येऊन काही दिवस जगायची आणि मग त्या मुलाचा मृत्यू व्हायचा.  मी जयू जन्माला आले आणि जगले आणि त्यांनतर ची ३ मुले जगली. त्या माऊलीला या मुलांच्या जन्मावेळी काय त्रास झाला असेल हे मी स्वतः आई झाल्यावरच मला समजले आणि आईला मानसिक त्रास झाला असेल ते आणि वेगळेच. घरात मूल जन्माला न येणे म्हणजे त्यात स्त्रीचाच दोष असल्यासारखे तिला नको त्या नावाने संभोधले जाते हे कुणाला सांगायला नको शिवाय आमच्या जन्माच्या वेळी खेड्यात घरोघरी एका नवरा-बायकोला किमान ५-७ मुले तरी असायची. त्यामागे कारणे भरपूर असतील. घरची श्रीमंती असेल, घरात खूप माणसे असली की आनंदी वातावरण असेल, असे असेल, अशिक्षितपणा असेल, कुटुंबनियोजनाचा अभाव असेल. कारणे खूप असतील. परंतु मी जन्माला आले आणि माझ्या नंतर ची ३ मुले जगली आणि माझ्या बाबांनी खूप जमीन वैगेरे घेतली त्यामुळे मी भाग्ग्याची होते. असे घरातले म्हणायचे अजून म्हणतात. "बेटी धनाची पेटी" तसे झाले असावे. आणि हो माझ्या पाठीवर मला ३ भाऊ आहेत. माझे मामा मावशी काका सगळॆ मुंबईत नोकरी करीत होते आणि चांगले सुशिक्षित होते त्यामुळे त्यांनी आधीच सांगितले की बाय ला म्हणजे माझ्या आईला लाडाने अजूनदेखील बाय म्हणतात. ही  मुलगी "मी जयू"जगली, सुखरूप असली तर पुढे एक मूल झाल्यावर तिचे कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेऊ.  आधीच तिला इतक्या डिलिव्हरीज करून तिचे शरीर कमजोर झाले आहे. माझ्या पाठीवर माझ्या नंतर  २-२ वर्षाच्या अंतराने मला भाऊ झाले परंतु माझी आई तेव्हाची इयत्ता चौथी शिकलेली असताना सुद्धा तिचे विचार आधुनिक होते. तिला तिच्या शरीराची पर्वा नव्हती. ती म्हणाली  मला अजून एक मुलगी हवी आहे. जर आत्ताही मुलगा झाला तर मी मग कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करून घेईन आणि शेवटचा चार नंबर चा ही मुलगाच झाला. म्हंजे घरात मुलगी मी तशी एकटीच. परंतु माझे फक्त खायचे प्यायचे लाड केले जायचे बाकी शिस्त म्हणजे शिस्त. आजीने,आईवडिलांनी, काकाने, मामा मावश्यांनी,आत्यांनी लावलेली शिस्त आजही कामाला येतेच येते. या कडक शिस्तीमुळे मी माझ्या मुलांना आणि घरात जरा कमी लाडकी आहे.परंतु माझ्या दोन्ही मुलांना शिस्त ही आहेच आहे. परंतु माझे माझ्या प्रभाशी आणि ट्रेक मधल्या सगळ्या लहान मुलांशी छान जमते.
घरात वडील अतिशय शिस्तीचे होते आणि त्यांना सगळे गावातले देखील खूप घाबरायचे. माझ्या वडिलांना फकिराच्या झोळीतून काढले असल्याने त्यांचे एक नाव रघुनाथ तर दुसरे नाव फकीर होते. आजीला ३ मुलीनंतर जो मुलगा झाला होता तो म्हणजे माझे वडील. पूर्वी काय नि आता काय वंशाला दिवा हा हवाच. तर माझे वडील माझ्या आजोबांच्या वंशाचा दिवा आहेत. माझ्या वडिलांच्या वडिलांना पाहण्याचे माझे भाग्य नव्हते परंतु सगळे म्हणायचे की आजोबा खूप गोरे होते. वडिलांचा रंग ही गोराच आहे. मला ६ आत्या एक काका आईवडील असे मोट्ठे कुटुंब होते. सगळ्या आत्त्यांचे सासर जवळच होते एखाद किलोमीटर अंतरावर. त्यामुळे येणे जाणे असायचेच. मला लहानपणी वाटायचे थोड्या दिवसांसाठी कुठेतरी जात असाव्यात ह्या आत्या. माझ्या आत्या माझे लाड करायच्या माहेरी आल्यावर मला झोपताना गोष्टी सांगायच्या. माझ्या आईला बिचारीला कामातूनच वेळ मिळत नव्हता.
माझे काका (की ज्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत) दुसरीत असताना माझे आजोबा वारले त्यामुळे माझ्या वडिलांचे शिक्षण फक्त इयत्ता सातवीपर्यंतच झाले कारण त्यांच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पडली होती. वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे होते. कारण आमचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय फक्त शेती होता. वडिलांनी शाळा सोडली आणि शेतीमध्येच लक्ष घातले. आमचे किराणा मालाचे दुकान ही होते तेदेखील माझे वडील बाहेर गेले की आम्ही मुले चालवायचो. आम्ही भावंडे आज मुंबईत शिकलो असतो इंग्रजी शाळेत तर कदाचित डॉक्टर इंजीनीअर असतो. पण जे शिकलो तेही शिक्षण घेणे काहींच्या नशिबात नसते. जो तो आपापल्या परीने शिकत असतो. आम्ही मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटायचे परंतु माझे भाऊ शेतीच्या कामात बाबांना मदत करायचे आणि शिकायचे. कधी गुरे राखणारा गुराखी नाही आला की भाऊ शाळेला दांडी मारून गुरे राखायला जायचे. कधीकधी मी सुद्धा हे काम केले आहे. पण हे  काम सुद्धा इमानदारीतच केले बरे. कधी गुरे दुसऱ्याच्या शेतात घातली नाहीत. पण ज्या दिवशी माझ्यावर गुरे राखायची वेळ येई त्यादिवशी मात्र मी तापाने फणफणत असायची. वडिलांच्या नकळत विटी दांडू, गोट्या, लगोरी, लपाछुपी,पत्ते, असे खेळ खेळत लहानाचे मोठे झालो. आई बाबा सांगायचे इथे कामं केलीस तरच सासरी कामं करशील हो. त्यामुळे आईला घरकामात मदत करायला शेतात काम करणाऱ्या बायका असायच्या त्या मदत करायच्या. मग माझ्या वाट्याला काय काम असायच तर मोट्ठे घर झाडणे, विहिरीवरून हंडा कळशीने पाणी आणणे, कपडे धुवायला विहिरिवर जाणे. कारण तेव्हा नळयोजना नव्हती किंवा इंधन विहिरी  नव्हत्या. आता घरोघरी इंधन विहिरी आहेत. गावातल्या सुनांची मजा आहे, शहरासारखं घरातच पाणी.  माझे भाऊ १०-१२ ग्रॅज्युएट आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट असे आम्ही शिकलो. फकीर पाटलाची पोर असे मला सगळे हाक मारत असत.
तसे गावाकडे मुलगी जेमतेम दहावी-बारावी झाली की तिचे लग्न लावून देत असत. कारण मुलगी मोट्ठी दिसायला लागल्यावर तिला आपसूकच लग्नासाठी स्थळे यायला लागतात. आणि वडिलांनाही काळजी लागते. माझेही तसेच झाले होते. मी बारावी झाल्यावर मला स्थळे यायला सुरु झाले होते परंतु मला अजून शिकायचे होते आणि  वडिलांचीही खूप इच्छा होती मुलीने शिक्षिका व्हावे आणि किमान गावाकडच्या हायस्कुल मध्ये मुलीने शिकवावे. मी म्हणता म्हणता मुंबई, नासिक आणि पुणे येथे राहून पोस्ट ग्रॅजुयेशन आणि बीएड पूर्ण केले. त्यात मी टायपिंग च्या परीक्षेतही डिस्टिंक्शन मिळवले आहे. आता नोकरीसाठी काम्पुटर मध्ये एक्सपर्ट असावं लागतं तसं पूर्वी नोकरीसाठी किमान टायपिंग परीक्षा पास असाव्या लागत असत. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला जे-जे चांगले आणि उपयोगी पडणारे शिक्षण घेता येईल ते घेण्याचा सल्ला दिला होता. आणि मी आपली जमेल तसं जमेल तिकडे राहून शिकत होते. कधी मामा कधी मावशी, कधी मुंबई,कधी नासिक, कधी पुणे. शिक्षणासाठी मी घरापासून दूर राहिले खरी पण आज तिन्ही शहरातली माणसे मी जोडली ती कायमची जोडली.
मी बाहुली किंवा भातुकली हा खेळ कधी खेळायचे नाही. मला नेहमी वेगळे काहीतरी करायला आवडते त्यामुळे सगळे मुलांचे खेळ खेळत असे मी. आणि अश्या आम्ही बऱ्याच मुली होतो.गावातल्या आम्ही २-३ मुली तेव्हा माझ्या बाबांची मोट्ठी उंच सायकल घेऊन गुपचूप चालवायला शिकलो. आज मी टू व्हिलर तर विमानासारखी चालवते. पण फोर व्हिलरचे आर. टी.. चे लायसन असून मला गाडी हातात मिळत नसल्याने तेव्हढी एक हौस बाकी आहेच. पण मला उत्तम गाडी येते. म्हणजे सांगायचं मुद्दा एकच आहे की प्रत्येक मुलींमध्ये काहीतरी वेगळे असतेच असते. ते तिला स्वतःला शोधता आले पाहिजे. तिने स्वतःच स्वतःमधील क्षमता ओळखून अनेक कला अंगी जोपासाव्यात. या सगळ्याला कुटुंबाची थोडी तरी साथ हवीच. मी हे सगळं करते ते सगळॆच काही माझ्या घरच्यांना आवडतेच असे नाही. पण तरीही मला कर म्हंटले जाते हेच खूप आहे माझ्यासाठी.आपल्यावर घरचे विश्वास टाकतात ना तो आपण सार्थ करून दाखवायचा एव्हढेच मला माहित आहे.आपण मुलींनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही घ्याचा म्हणजे झाले तर. मी घरातल्यांना सगळे वेळेवर देते किव्वा कुठे कमी पडत नाही म्हणून मी बिनधास्तपणे हे असं पेटी शिकणे, ट्रेकिंग करू शकते. कोणाला विश्वास बसेल की नाही माहित नाही मी ट्रेक ला जाताना पहाटे ५ वाजता कपडे धुवायची एक मशीन लावून जाते तेव्हढेच घरातल्यांचे एक काम हलके होते. हे मी का सांगते तर कोणाला हर्ट होण्यासाठी नाही तर  मुलींनो मला खूप लोकांनी ऐकवले आहे की तू मज्जा करते, फिरते, त्यांना मला हे सांगावेसे वाटते की हो मी आयुष्य जगते पण मी मला जमेल ती जबाबदारी पार पाडते आणि मग जाते बाहेर.    
मी मला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून माझ्या वाढदिवसाला स्वतःसाठी हार्मोनियम विकत घेतले होते २-३ वर्षांपूर्वी पण त्यासाठी चांगल्या संगीत शिक्षाकडून शिकणे गरजेचे होते. त्यासाठीचा क्लास मात्र मी आता लावला आणि मला पेटी वाजवणे जास्त आवडू लागले आहे. कारण मला संगीत आवडते. आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगू इच्छिते की  सगळ्या काळज्या,चिंता,दुःख, यांना विसरायचे असेल तर संगीतासारखा दुसरा सोबती नाही.
पदवीने एम.ए. बीएड.झाले खरी परंतु नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा नव्हती त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत किंवा कॉलेजात शिकविले नाही. शिक्षकदिन च्या दिवशी हे देखील विसरून गेले मी मी देखील एक शिक्षिका आहे. हो पण जिथे मिळेल त्या ठिकाणी फुकट सल्ले द्यायला मात्र मी विसरत नाही.
मला लग्नाआधी स्वयंपाक फार काही येत नव्हता सासू आणि ननदांनी मला शिकवले  आणि मी शिकत गेले. मी कुठलेही काम मन लावून शिकते आणि मन लावून करते त्यामुळे कदाचित माझ्या हातचे पदार्थ चांगले होत असावेत. परवाच्या "झी मराठी" चॅनेल वरच्या "हवा येऊ द्या" या कार्यक्रमात "पदमश्री. पद्मजा फेणाणी-जोगळेकर" यांना हवा येऊ द्या मधल्या कलाकारांनी सहज प्रश्न विचारला की तुम्हाला स्वयंपाक येतो किंवा नाही? त्यावर त्यांनी खूप छान उत्तर दिले की"मला स्वयंपाक येतो मी रोज स्वयंपाक करते देखील पण मला ते काम करायला आवडत नाही." मला ते वाक्य अगदी पटले. मी मनोमन हसले कारण माझेही तसेच आहे मला स्वयंपाक करायला आवडत नाही पण मी ते काम रोजच न चुकता करते.  खरे तर  मला हे जेवण बनवणे आणि वाढत राहणे बिलकुल आवडत नाही.पण हे काम प्रत्येक स्त्री ला मरेपर्यंत करावे लागते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही हे काम करावेच लागते. पण जर या कामाची तिचा पावती मिळाली तर कोणतीही स्त्री तेच काम आनंदाने करते. तसे मात्र होत नाही. बाहेरची दुनिया तारीफ करते. आणि घरातल्यांना काय वाटते की रोजच चांगले बनवते रोजच काय तारीफ करायची?? तारीफ करायला पैसे लागत नाही किंवा फार खूप कष्ट पडत नाहीत. हा फक्त मोट्ठे मन लागते. की जे प्रत्येकाकडे नसते.
लग्न झाल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आल्याचं. लग्न होऊन पुण्यात आल्यावर मी आजपर्यंत एकदाही राखी पौर्णिमेला माहेरी गेलेली मला तरी आठवत नाही. कारण माझ्या दोन्ही दिरांना भाऊ मानून राखी बांधते, आणि नणंदेच्या मिस्टरांनाही राखी बांधते त्यामुळे मला माहेरी ३ भाऊ असून मी तिकडे फक्त पोस्टाने राखी पाठवते  आणि भाऊबीजेला भाऊ मला भेटायला येतो किंवा सासरची भाऊबीज झाल्यावर दिवाळीच्या सुटीमध्ये मी गावी गेले तर तिकडे भाऊबीज होते.नाहीतर  इथेच राखी पौर्णिमा,इथेच भाऊबीज इथेच दिवाळी इथेच सगळे सण साजरे करतेय. मला बहीण नाही त्यामुळे मी माझ्या नणंदांना, आणि माझ्या जावांना बहीण समजून प्रेम देत आले. पण सासर ते सासर असते सगळे हेवे दावे गैरसमज आले. चालायचंच पण म्हणून आजपर्यंत कुठल्याही जबाबदारीपासून, कर्तव्यापासून मी दूर नाही गेले. प्रत्येक  स्त्री ला काहींना काही दिव्यातून जावेच लागते. त्यातून देखील मार्ग शोधणे हे महत्वाचे.
लग्नानंतर सगळंच बदलतं म्हणतात तसंच माझ झालं होत माझ्या स्वतःच्या सगळ्या आवडी- निवडी सगळ्या बाजूला ठेवल्या अगदी खाण्यापिण्याच्या आवडी सुद्धा. मुलांना, नवऱ्याला काय आवडेल, पाहुण्यांना काय आवडेल  तेच बनवायचं अर्थात चांगलंच  आणि तेच मी खायचं. इतरांना काय आवडते तेच करायचं असंच सगळं चालायचं. अश्या खूप गोष्टींचा राग, समज-गैरसमज  सगळं मागे ठेवून आता इतरांच्या आवडी जपण्याबरोबरच स्वतःच्याही आवडी जपू लागले आहे. मला आधीपासूनच फोटोग्राफी चे वेड आहेच, त्यात महिन्यातुन एकदा ट्रेकिंग ला जाते. त्यामुळे फोटोग्राफी ची कसर भरून निघते आणि ब्लॉग लिहिला की मग लिखाणालाही आनंद मिळतो. शिवाय वाचकांनाही सफारीचा आनंद देता येतो. ब्लॉग वाचणारे अनेक प्रकारचे वाचक आहेत. काही फक्त चांगला म्हणणारे. काही माझ्या ब्लॉग मधल्या त्रुटी सांगणारे, काही माझा ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत, काही ब्लॉग लिहायचा आग्रह करणारे आहेत, काही ब्लॉग ब्लॉग न वाचणारे सुद्धा आहेत, काही ब्लॉग म्हणजे काय माहित नसूनही ब्लॉग आवर्जून वाचणारे आहेत. काहींना विचारावे लागते ब्लॉग पाठवून का ?? त्याचे उत्तर ही न देणारे फ्रेंड्स आहेत. "व्यक्ती तितक्या प्रकृती." काही म्हणतात ब्लॉग मध्ये घरच्यांचा उल्लेख करत जा, काही जण म्हणतात अशी प्रत्येकवेळी उल्लेख करण्याची आवश्यकता नाहीये. असे अनेक हजारो स्वभावाची माणसे मला भेटली. परंतु मी त्यांच्या सल्ल्याचा माझ्या लिखाणात चांगल्यासाठी वापर करते आहे.
आयुष्यात हे करायचं राहून गेले ते करायचे राहून गेले. ह्या सगळ्याला इतरांइतकेच आपण स्वतः देखील तितकेच जबाबदार असतो हे लक्षात असू दे मुलींनो, स्त्रियांनो. सगळ्या गोष्टींचा ताण घेत बसलो तर अनेक आजार मागे लागतात आणि  कशातून  निष्पन्न होत नाही. मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ठराविक वय हवे असे काही नाही. मला एव्हढे आजार असूनदेखील मी ट्रेकिंग करते. ब्लॉग वाचणार काही जण मला विचारतात की घरात कोण करते मग?? काही जण विचारतात अगं आत्ताच तुझ्या घरात पूजा झाली ना मग तू लगेच ट्रेकिंग ला कशी चालली दमली की नाही?? त्यांना मी सांगू इच्छते की माझ्या घरात फक्त भांडी फारशी ला बाई आहे ते देखील मला संधिवात आहे. पाण्यात खूप खूप काम केले की माझी हाडे सुजतात त्यामुळे भांडी घासायला बाई असली तर माझा आजार कवटाळत बसण्यातला वेळ वाचवते. तोच वेळ मी एखादी कला शिकण्यात घालवते. त्यामुळेच मी पेटीचा क्लास लावून सध्या  पेटी सुद्धा शिकते आहे शिकत राहीन. ट्रेकिंग करते, पेटी शिकते म्हणजे घरात लक्ष नसते किंवा घरातली कामे टाकून बोंबलत फिरते असे नाहीये. आणि हो हे पेटी वैगरे शिकते ते काही रोज रोज नसते आठवड्यातून एकदा किव्वा दोनदा असते ते देखील एकच  तास असते. आणि हा एक तास आपण कितीदातरी गप्पा मारण्यात टी व्ही बघण्यात घालवतो.. मी त्याच एक तासाचा असा वापर करते. माझ्या कित्तेक मैत्रिणी आहेत की ज्यांना देखील नोकरी करण्यास परवानगी नाहीये त्या घरच्या घरी शिकवण्या घेऊन आपल्या ज्ञानाचा चांगला वापर करतात. मला घरी असा काही करणे मनापासून आवडत नाही. कधी कधी स्वतःचा राग येतो की मी गृहिणी आहे. परंतु आज मी सकारात्मक विचार करते की  मी आज नोकरी करीत नाही त्यामुळे एका अर्थाने हे खूप चांगले आहे. कारण मी जर नोकरी करून तारेवरची कसरत करत असते तर मी माझ्या कुटुंबाकडे आणि स्वतःकडे तितके उत्तमरित्या लक्ष देऊ शकले नसते आणि माझ्या मुलांचे नवऱ्याचे आरोग्य आता जसे चांगले आहे तसे राहिले नसते. मुलांचे आणि स्वतःचे छंद देखील मला जोपासता आले नसते.
माझ्या घरी आत्ताच ऑगस्ट महिन्यात सत्यनारायणाची पूजा झाली त्यावेळी. माझ्या घराची साफसफाई मी एकटीनेच केली. कारण ह्या कामवाल्या असली कामे आपल्या मनासारखी करत नाहीत त्यांना वेळ नसतो आणि केलंच तर थुका लावल्यासारखे करतात. माझ्या घरात ५-६ वर्षांपूर्वी सफेद रंगाचे फर्निचर जास्त आहे त्यामुळे ते जरा जास्तच स्वच्छ ठेवावे लागते. घराची साफसफाई आपण स्त्रिया रोजच करतो पण. पण तरीही एकूण एक कोपरा पुसायला मला २० दिवस लागतात. मधेच माझी तब्बेत बिघडते आणि रोजचे रुटीन चे काम असतेच मुलांना सोडा आणा माझी बाहेरची कामे सगळं सुरु असते.माझ्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती मला सांगते की आत्ताच घराचे रिनूयेशन केलास का ग? म्हणजे याचा अर्थ  असा होतो की माझं घर सुद्धा नेटनेटके आणि स्वच्छ असतेच. मला नावे ठेवणाऱ्यांनी एकदा माझ्या घरी येऊन बघा मी ट्रेकिंगला बोंबलत फिरते की काय करते ते... अश्या कामाच्या वेळी मी वॉट्स अँप बंद ठेवले आणि मिस्टरांना म्हंटलं मी वॉट्स ऍप बंद ठेवलं होते  ५-६ दिवस तर बरीच कामे झाली माझी. तर त्याचा माझ्यावर विश्वास  बसला नाही. घरातली माणसे इतकी नालायक समजतात मला???  माझ्या हातात फोन असतो म्हणजे मी वॉट्स अँप फेसबुक बघत असते हा लोकांचा फार चुकीचा गैरसमज आहे. फोटो एडिटिंग चे मला वेड  आहे. याची त्याची उणीदुणी काढत बसण्यापेक्षा आणि आपले दुःख उगाळत बसण्यापेक्षा स्वतःला आवडत्या कामात गुंतून घेते. 
काही जण टोमणे मारतात की जयू ला ट्रेकिंग म्हंटले की खूप उत्साह येतो. तर असे बिलकुल नाहीये. मला सगळ्या कामात सारखाच उत्साह असतो. मग ती घरची पूजा असो, घरी २५-३० लोक जेवायला येणार असो, कुठला सण असो, कुठे लग्नाला जायचे असो, नटणे सजणे असो, किव्वा अपार्टमेंट चा एखादा प्रोग्रॅम असो, होळी असो, दिवाळी असो, सगळीकडे सारखाच उत्साह असतो. फक्त आपली खोपडी सटकलेली नाही पाहिजे.
मी जे आहे ते समोर बोलते पण सगळ्याच व्यक्ती तश्या नसतात. माझ्या तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलत असतात. त्याचा आता माझ्यावर काहीही दुष्परिणाम होऊ देणार नाही मी. कारण अर्धे आयुष्य या असल्या फालतू गोष्टींमध्ये गेले. मला जे शिकता आले नाही ते शिकण्याचा सल्ला मी माझ्या मुलांना देते. मुलांचा अभ्यास मीच तर घेते. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त एखादी तरी कला शिकावी असा माझा आग्रह असतो. गाणे शिकावे किंवा एखादे वाद्य वाजवायला शिकावे. मैदानी खेळ खेळावेत. फक्त बक्षिसे मिळविण्यासाठीच नव्हे तर आपण शारीरिक दृष्ट्या सुधृढ रहातो यासाठी भरपूर खेळा. माझा मुलगा करते ब्लॅक बेल्ट आहे. स्केटिंग केले ५-६ वर्षे. क्रिकेट देखील खेळत होता. आता फुटबॉल खेळतो.नुसता पुस्तकी कीडा  होण्यापेक्षा अभ्यासा व्यतिरिक्त दुसरंही खूप काही शिकण्यासारखे आहे. माझी मुलगी देखील तिच्या शाळेत उत्तम गुणांनी पास होते.बास्केट बॉल खेळते. मी जर फक्त माझ्या स्वतःच्यात च मश्गुल असते तर मला सांगा हे सगळं शक्य असता का??
स्त्री मनाची अवस्था कोणीही कधीही जाणू शकत नाही फक्त स्त्रीच एका स्त्री ची व्यथा समजू शकते. मग ती व्यथा कुठलीही असो.
तेव्हा शिकलेल्या टायपिंग चा मला खूप उपयोग झाला आणि आता ब्लॉग लिहिण्यासाठी देखील उपयोग होत आहे. बाहेर नोकरी करायला नको म्हणत हतोय घरातले त्यामुळे मी घरी काही व्यवसाय करावा या हेतूने डेटा एंट्री चे कामदेखील केले १-२ वर्षे पैसे भरपूर मिळाले आणि मनालाही शांतीही  मिळाली की मी सुद्धा काहीतरी करू शकते याची. परंतु चेतन शाळेत गेला की मी सगळी कामे करून संगणकावर टायपिंग चे काम सुरु करीत असे. माझा टायपिंग चा वेग जास्त असल्याने मला मजा वाटायची आणि जास्तीत जास्त पाने टाईप करून व्हायची आणि माझे काम लवकर व्हायचे.  पण सतत च्या जास्तीच्या कामामुळे मानेचे दुखणे मागे लागले ते लागले. २ वर्षांनी मग काम बंद करावे लागले.  मग ऑनलाईन एम एल एम पण केले. हे करू की ते करू या नादात स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच दिले नाही आणि अनेक आजार मागे लागले. गृहिणी काय आणि नोकरी करणारी स्त्री काय. तिला दोन्हीकडे कसरत करावीच लागते. या विषयावर बोलावे तेव्हढे कमीच आहे.
आपण स्त्रिया अशाच असतो सगळ्यांकडे लक्ष देतो इतरांची काळजी घेतो. परंतु स्वतःसाठी खूप कमी जगतो. इतरांचेही लाड करा कुटुंबाचे लाड करा सगळ्यांचे करा पपण आधी स्वतःचे लाड करा, छंद जोपासा,आरोग्यासाठी योगा-प्राणायाम करा, दुसऱ्यांना जसे चांगले पदार्थ खायला घालतो तसे स्वतःदेखील खा. डाएट वगैरे मी तरी करीत नाही. जेव्हा हेवी जेवाल तेव्हा जास्तीचे चालणे करा फक्त. आणि माझा म्हणाल तर मी स्वतः २ एक वर्षांपासून ट्रेकिंग करतेय त्यामुळे मला त्याचा फायदा खूप झाला आहे. माझा संधीवात आणि मानेची दुखणी, मणक्यातील ग्याप, अशी बरीच दुखणी गायब झाली आहेत. शिवाय ट्रेकिंग करता करता फोटोग्राफी ची हाऊस देखील पूर्ण होते. आणि ब्लॉग लिहिला की लिखाणाची हाऊस देखील पूर्ण होते. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेकिंगच करा. पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी किमान रोज चालणे तरी असावेच. कोणतीही गोष्ट शिकायला वयाची अट नाही हे मी माझ्यावरून सांगतेय. पण तरीही ज्यांच्या मनात जे प्रश्न पडतात ना कि मी फक्त ट्रेकिंग ला भटकत राहते आणि घरात दुर्लक्ष असते तसे मात्र बिलकुल नाहीये. माझ्या घरातल्यांना विचारू शकता. कारण माझ्या कुटुंबाचे आरोग्य माझ्यापेक्षा चांगले आहे. अजून काय हवे आहे.
माझी मावशी मुंबईमध्ये नोकरी करते परंतु तिचे घर बघाल तर काय म्हणाल.चकाचक असते कायम. तिच्याकडे मी एक-२ वर्षे शिकायला होते त्यामुळे तिचा हा गुण माझ्यात उतरणे सहज शक्य आहे. ती जेवणाचे पदार्थ अतिशय सुंदर चविष्ट आणि नाजूकरित्या करायची तशीच सवय मला लागून गेली.माझ्या आजीच्या आणि आईच्या हातच्या पदार्थांना खूप छान चव होती त्यामुळे ती देखील माझ्यात उतरणे आलेच.. मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्या सभोवताली जेव्हढी माणसे आहेत त्यांच्यात चांगले वाईट दोन्ही गुण असतात. त्यातला आपण चांगलाच गुण अचूक हेरायचा आणि आपल्यात आणायचा. बघा काय कयामत होते. माझ्या खाण्याच्या पदार्थाची तारीफ करणाऱ्या व्यक्ती भरपूर असतील पण अचूक तारीफ करणारी रूपा पाठक. ती म्हणते जयू तू नुसत वारं जरी फोडणीला घातलस तरी ते चविष्ट बनते. माझा भाऊ त्याला माझ्या हातचे जेवण आवडते. मी कुठलाही ड्रेस सारी परिधान केले तरी त्याला माझ्यात माधुरी दीक्षित दिसते. म्हणतो ताई तू माधुरी दीक्षित दिसते आज. हे जरा जास्तच होते. पण त्याला वाटते ते वाटते. पण आपल्याला कोणाची तारीफ करावीशी वाटली तर मनापासून खरंच करून घ्या. समोरच्याला तुमचे मन किती सुंदर आहे हे समजते. मी राहते त्या अपार्टमेंट मध्ये सगळ्या लोकांना मी केलेल्या पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, तसेच व्हेज नॉन व्हेज जेवण अतिशय आवडते मी जेवण सुंदर बनवते. तसेच बाकी गूण आहेत. घरातली माणसे कायम घरातल्या स्त्री ला गृहीतच समजतात. तू काय रोजच चांगले बनवतेस त्यात काय कौतुक करायचे?? म्हणजे काय तर घरकी मुर्गी दाल बराबर. असेच झाले की हे..   पण जर मी बेचव जेवण बनवले तर लगेच सांगाल की नाही?? तसे चांगले बनवल्यावर देखील चांगल्याची देखील तारीफ कार्याला शिका.
आजकाल मी जे लेख लिहिते त्या लेखांचे वाचन केलेले जास्त आवडेल. कौतुकच केले पाहिजे असे काही नाही. त्यातल्या त्रुटी सांगा. एक समीक्षक म्हणून वाचा. तुम्हाला त्या लेखातून काहीतरी चांगलेच घ्यावयास मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, माझा ब्लॉग वाचून सुमित भावसार या छोट्या मुलाला देखील असा ब्लॉग लिहावासा वाटतो माझ्या बऱ्याच मैत्रिणींना देखील काहीतरी लिहावेसे वाटते. म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी आहे. सहज आठवलं म्हणून सांगतेय एका ग्रुपवर एक वर्षांपूर्वी एकदाच माझा ब्लॉग टाकला होता आणि म्हंटले होते ब्लॉग वाचा परंतु  त्यातल्या एक-दोघांच्या फक्त प्रतिक्रिया आल्या. ब्लॉग वाचल्याच्या... बाकीच्यांना विचारले तर तर म्हणे वेळ नाही मिळाला मोठ्ठा आहे फार लेख.मी ते वाक्य लक्षात ठेवून पुन्हा त्या ग्रुप वर आजतागायत ब्लॉग टाकला नाहीये. मी म्हणते रोजचे वर्तमानपत्र तर आवर्जून वाचता ना वेळ काढून न चुकता?? त्या वर्तमानपत्राएवढा मोठ्ठा तर माझा ब्लॉग नक्कीच नाही. दुसऱ्यांची उणीदुणी काढत बसतात, स्वतःची दुःख उगाळत बसतात. त्यापेक्षा हा ताजा ताजा महिन्याचा महिन्याचा ब्लॉग वाचा. आणि आनंदी व्हा.
माझ्या कित्तेक वाचणाऱ्या मैत्रिणी म्हणतात जयू तुला इतके सुचते कसे आणि एव्हढा सय्यम येतो कुठून तुझ्यात लिखाणाचा. ?? “यही तो बात है..शायद इसे प्याशन बोलते हैस्वतःला चांगल्या कामात गुंतवले की सगळं आपोआप चांगले सुचते आणि चांगलेच लिहिले जाते..... लिहावे तेव्हढे कमीच आहे. वाचकांचा आग्रह झाला तर राहिलेल्या गोष्टी सुद्धा दुसऱ्या ब्लॉग मध्ये लिहिल्या जातील. म्हणजे.. क्रमशः ... 
     



6 comments: